लिंगाणा...

विमुक्त's picture
विमुक्त in जनातलं, मनातलं
8 Nov 2009 - 11:47 am

तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं.
"गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो...
लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.

बरेचजण तोरण्यावरुन निघून घाटमाथ्यापर्यंत येतात आणि मग लिगाण्याजवळच्या शिंगापूर-नाळ किंवा बोराट्याच्या-नाळीने कोकणात उतरुन रायगड, असा ट्रेक करतात. किमान तीन दिवस तरी लागतात ह्या ट्रेकला. माझ्याजवळ एकच दिवस होता आणि लिंगाणा जवळून बघायची जाम इच्छा होती. दुचाकीवरुन हारपुड गावी पोहचायचं आणि मग चालत रायलिंग पठार गाठायचं आणि लिगाण्याचं जवळून दर्शन घ्यायचं ठरवलं.

मी, ‌ऋशी, स्वानंद आणि अजय असे चौघेजण दोन दुचाकीवर रवीवारी पहाटे सिंहगडाच्या दिशेने निघालो. डोणजे फाट्यावर उजवीकडे वळाल्यावर अंदाजे ५-६ कि.मी. पुढे गेल्यावर डाव्या हाताला पाबे खिंडीतून वेल्ह्याला जायच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता सिंहगडाला वळसा घालून वेल्ह्याला पोहचतो. मस्त रस्ता आहे... फारशी रहदारी नाही... रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि शेतं आहेत... अधून-मधून लहानशी वाडी लागते... जवळच्या गवताळ टेकड्यांवर गुरं चरताना दिसतात. खिंडीच्या माथ्यावरुन राजगड आणि तोरणा सोबतच दिसतात.

खिंड उतरल्यावर पाबे आणि मग वेल्हा लागतं. साधारण एक तासात आम्ही वेल्ह्याला पोहचलो. वेल्ह्यात नाष्टा उरकला आणि कानंद खिंडीच्या रस्त्याला लागलो (केळद, कुंबळे आणि मढे-घाटला हाच रस्ता जातो). हा रस्ता तोरण्याला प्रदक्षीणा घालून जात असल्यामुळे तोरण्याचं चौफेर दर्शन घडतं. कानंद खिंड ओलांडून ७-८ कि.मी. उतरल्यावर मुख्य रस्ता सोडून आम्ही उजव्या हाताला हारपुडला जाणारी वाट धरली (ह्या फाट्यापासून केळद (मढेघाट) ५-६ कि.मी आहे).

पीकलेल्या भातशेतीचा फिकट-पीवळा रंग सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी भासत होता. पीकलेल्या भाताचा गोड सुगंध हवेत दरवळत होता. पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी शेतात उभी केलेली वेगवेगळी बुजगावणी बघत वरोती गावात पोहचलो. इथून हारपुड हाकेच्या अंतरावर आहे, पण वाट मात्र जरा बिकटच आहे. आमच्या आणि दुचाकीच्या सगळ्या अवयवांची चाचणी घेत हारपुडला पोहचलो. गावातल्या शाळेच्या आवारात दुचाकी लावल्या.

पावसामुळे खराब झालेलं अंगण दुरुस्त करण्यात एक आजोबा मग्न होते. त्यांच वय किमान ८० तरी असेलच. आम्हाला बघताच आजोबांनी विचारलं...
"लिंगाण्याला चाल्लाव काय?"
भटकण्यासाठी शहरातून लोकं आपल्या गावात येतात ह्याबद्दलचा आनंद आणि कौतुक त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर जाणवत होतं. गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...

आजोबांनी दाखवलेली वाट धरली आणि मोहरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अजून ओढ्यांमधे भरपुर पाणी होतं...

(ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दिसणारे दगडगोटे...)

पावसाळा संपला होता आणि वाढत्या उन्हामुळे गवत जरा पीवळट दिसत होतं... गवताच्या पात्यांच्या मागे कसली कुसं दिसतायत? म्हणून जरा नीट नीरखून पाहीलं तर सुरवंटं होती... ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...

एक-दोन लहान टेकड्या चढल्यावर जंगल लागलं आणि शेवटचा चढ सुरु झाला. वाट गावकऱ्यांच्या पायाखालची असल्यामुळे मस्त मळलेली होती. चढ संपला आणि अचानकच समोर लिंगाणा आला. लिंगाण्याच्या मागचा रायगड तर अधीकच भव्य भासत होता. डाव्या हाताला लिंगाणा ठेऊन थोडावेळ चालल्यावर मोहरीला पोहचलो. लहानसं गाव आहे. पावसात धो धो पाऊस कोसळतो आणि उन्हाळ्यात पाणीच नसतं. मागच्याच वर्षी श्रमदानातून कातळ खणून एक मोठ्ठ टाकं बांधलय गावकऱ्यांनी. त्यात डोकावून पाहीलं; नितळ हिरवंगार पाणी त्यात साठलं होतं.

(मोहरी गावातलं एक घर... पाऊस, वारा आणि थंडीचा जोर कमी करण्यासाठी घराचं छत अगदी खालपर्यंत आणलयं...)

मोहरीच्या जरा खाली शिंगापूर गाव वसलयं. ह्या गावातुनच शिंगापुर-नाळीने कोकणातल्या दापोलीला (रत्नागीरीच्या जवळचं दापोली नव्हे) उतरता येतं. मोहरी गावातुन बाहेर पडल्यावर थोडावेळ पठारावर, थोडावेळ जंगलातून चालत साधारण एक तासात रायलिंग पठारावर पोहचलो. वाटेत सह्याद्रिचं विलोभनीय रुप पहायला मिळालं...

(शिंगापूर गाव...)

पठारावर कमरेपर्यंत गवत वाढलं होतं; वाऱ्यावर डुलत होतं. गवतातून वाट काढत पठाराच्या टोकाला पोहचलो. आलेल्या वाटेकडे मागे वळून पाहिलं तर काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडुने काढलेल्या रेघे प्रमाणे गवतामधे वाट उठून दिसत होती. रायलिंग पठारावरुन लिंगाण्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याशी गप्पा मारता येतात.

पठाराच्या अगदी काठावर पाय दरीत सोडून लिंगाण्याकडे बघत बसलो. इतक्या जवळून लिंगाणा बघण्याचं स्वप्न पुर्ण झालं... प्रत्यक्ष त्यावर चढताना येणाऱ्या रोमांचाची थोडी अनुभुती आली... एकट्या-दुकट्याचं ते काम नाही... पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...

(लिंगाणा...)

(लिंगाणा... जवळून)

पठारावर उभं राहून स्वताभोवती एक चक्कर मारली तर चौभेर केवळ अप्रतीम नजारा दिसतो...

(तळकोकणातलं दापोली गाव...)

एका झाडाखाली बसून जेवण उरकलं आणि थोडावेळ आराम केला.
पठाराच्या टोकावरुन फेकलेला दगड लिंगाण्यापर्यंत जाईल का? अशी शंका मनात आली आणि सगळेजण आपापला प्रयत्न करु लागले. मी पण दोन-चार दगड भिरकावले, पण एकही लिंगाण्यापर्यंत गेला नाही. मग माझ्या उच्च दर्जाच्या हिंदीत अजयला म्हणालो...
"वारेके बजेसे मेरा दगड लिंगाणे तक नही पहूँचा"
हे ऐकल्यावर इतरांना हसु येणं साहजीकच होतं. काय बरळलो हे ध्यानात आल्यावर मलापण जाम हसू आलं.

कोकणात उतरणारी बोराट्याची नाळ रायलिंग-पठारावरुनच सुरु होते आणि मग रायलिंग-पठार आणि लिंगाणा ह्यांच्या मधल्या अतीशय चिंचोळ्या खिंडीतून लिंगणमाचीला जाते. पठावरुन बोराट्याची नाळ नक्की कुठून सुरु होते हे बघून घेतलं, म्हणजे पुढे कधी ह्या नाळीने उतरायचं झालं तर अडचण नको.

साधारण दुपारी २ वाजता लिंगाण्याचा निरोप घेतला आणि परत फिरलो. आता पठारावर उन्हाचे चटके जाणवत होते. भरभर चालत जंगल असलेल्या टप्प्यापर्यंत पोहचलो. गार सावलीत थोडावेळ विसावल्या नंतर मोहरी गाठलं. पोटभर थंड पाणी प्यायलो आणि थेट हारपुडच्या जरा आधी एका ओढ्यात उताणे झालो. ओढ्यातल्या गार पाण्याने ताजेतवाणे होऊन हारपुड गाठलं. हारपुड - वेल्हा - नसरापुर फाटा आणि मग महामार्गाने पुणे असा परतीच प्रवास दुचाकीवर सुरु केला. वेल्हा मागे टाकून पुढे निघलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली होती. तोरण्याच्या मागे तांबडं-केशरी सुर्यबिंब बुडत होतं.

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

कथा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोटो सह्हीच आहेत आणि वर्णनाने एकदम मजा आली. या विमुक्ताला महाराष्ट्र टूरिझमचा मॅस्कट बनवला पाहिजे.

अदिती

ज्ञानेश...'s picture

8 Nov 2009 - 12:15 pm | ज्ञानेश...

हेच म्हणतो.

वर्णन.. फोटो आणि त्यात अधुनमधून जीवनावर केलेले भाष्य हा विमुक्तच्या लिखाणाचा फॉर्म आपल्याला जाम आवडतो बुवा!

"Great Power Comes With Great Responsibilities"

स्वप्निल..'s picture

8 Nov 2009 - 3:14 pm | स्वप्निल..

एकदम मस्त नेहमी सारखंच!!

स्वप्निल

सुनील's picture

8 Nov 2009 - 12:01 pm | सुनील

मस्त!

तुमची भटकंती, भटकंतीची वर्णने आणि विशेषकरून फोटो छानच असतात!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

JAGOMOHANPYARE's picture

8 Nov 2009 - 12:09 pm | JAGOMOHANPYARE

गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात...

अप्रतिम..

***************************
नदियाँ, पहाड, झील और झरने, जंगल और वादी इनमे है किसके इशारे?
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

अवलिया's picture

8 Nov 2009 - 12:20 pm | अवलिया

बेष्ट!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

8 Nov 2009 - 12:25 pm | श्रावण मोडक

छान! प्रकाशचित्रे लक्षवेधकच. त्यात काही बदल आता अपेक्षित धरतो आहे.

मी_ओंकार's picture

8 Nov 2009 - 12:44 pm | मी_ओंकार

अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार...

हे तर आणखीच मस्त.

- ओंकार


१. "गावाकडच्या लोकांच्या आयुष्यात लहानपण आणि तरुणपण असे दोनच टप्पे असतात... म्हातारपण त्यांना कधी शिवतच नाही... मरे तोवर स्वावलंबी आयुष्य जगतात... बऱ्याच गरजांपासून विमुक्त असतात... पुरेपुर जगून शेवटी शांतपणे निसर्गात विलीन होतात..."
२. "ह्याच सुरवंटांची पुढे फुलपाखरं होणार... अचानक मिळालेल्या पंखांमुळे काय करु नी काय नको असं त्यांना होत असणार आणि म्हणूनच ही फुलपाखरं इतकी चंचल वागत असणार..."
३. "असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, "
खासच
आणि फोटो पाहुन खल्ल्ल्लासच
ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दगडगोटे दाख्विणारा फोटो तर अविश्वसनीय किती नितळ आणि निर्मळ पाणी. मन आत्मा सर्व शांत झाल बघा.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

JAGOMOHANPYARE's picture

8 Nov 2009 - 3:12 pm | JAGOMOHANPYARE

ओढ्याच्या नितळ पाण्याखाली दगडगोटे दाख्विणारा फोटो तर अविश्वसनीय किती नितळ आणि निर्मळ पाणी

ते पाणी आहे, हे मला माहीतच नव्हते... मला ते दगडाचे फोटो वाटले होते... तुम्ही सांगितल्यावर आता लक्षात आले. :)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विसोबा खेचर's picture

8 Nov 2009 - 1:57 pm | विसोबा खेचर

काय बोलू?!

सहज's picture

9 Nov 2009 - 7:00 am | सहज

!

नंदू's picture

8 Nov 2009 - 2:09 pm | नंदू

फोटो आणि वर्णन दोन्ही अप्रतिम.

लिंगाणा अफाट आहे. रायगडा वरून नुसता बघुनच छाती दडपते. लिंगाणा सर करण्यासाठी शुभेच्छा.

नंदू

प्रसन्न केसकर's picture

8 Nov 2009 - 2:41 pm | प्रसन्न केसकर

फोटो पण मस्तच आहेत. असेच भरपुर फिरत रहा अन लिहितही.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2009 - 2:53 pm | बिपिन कार्यकर्ते

नेहमीप्रमाणेच... बेष्ट!!!

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

8 Nov 2009 - 3:31 pm | ऋषिकेश

लई ब्येस राव!!!
तुमचे लेख फक्त फोटो अल्बम न रहाता तितक्याच छान शैलीमुळे जिवंत अनुभव होतात. मस्त!!
नेहमी प्रतिसाद दिला नाहि तरी वाचत असतोच.. अजून येऊ देत.

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

नंदन's picture

8 Nov 2009 - 3:35 pm | नंदन

वर्णन आणि फोटो दोन्ही क्लास.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती२'s picture

8 Nov 2009 - 4:33 pm | स्वाती२

खासच!

बाकरवडी's picture

8 Nov 2009 - 8:09 pm | बाकरवडी

पुन्हा अप्रतिम!!!!!!!
:)

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

तो पाण्याचा फोटो पाहून नितळ आणि निर्मळ शब्दाच्या सगळ्या व्याख्या संपल्या! केवळ अप्रतिम! :)
ह्या वेळची तुझी सफर नेहेमीसारखी धाडसाने भरलेली नव्हती पण नियम सिद्ध करायला एखादा अपवाद हवाच! :)

(आनंदी)चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

8 Nov 2009 - 11:55 pm | भडकमकर मास्तर

लिंगाण्याचे दोन फोटो अंगावर आले.. दडपून जायला झाले !!!
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मी-सौरभ's picture

9 Nov 2009 - 1:34 am | मी-सौरभ

सौरभ

गणपा's picture

9 Nov 2009 - 1:37 am | गणपा

विमुक्ता मस्तच रे.
तुझं भटकं आणि त्या नंतरचा सगळा वृत्तांत मला मिलिंद गुणाजीच्या भटकंती कार्यक्रमाची आठवण करुन देतो.

घाटावरचे भट's picture

9 Nov 2009 - 4:22 am | घाटावरचे भट

छानच वर्णन आणि फोटो!

विष्णुसूत's picture

9 Nov 2009 - 7:03 am | विष्णुसूत

फार सुन्दर. तुमचे सगळेच लेख आवडले.

हर्षद आनंदी's picture

9 Nov 2009 - 7:06 am | हर्षद आनंदी

लिंगाणा अंगावर आला!!

पुर्ण तयारीनीशी जायला हवं... असं कोण्या भेताडाला लिंगाणा आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देणार नाही, पण हिंमत असेल तर थांबवू पण शकणार नाही... एकदातरी लिंगाणा सर करायचाच असं मनात ठरवून टाकलं...

शुभेच्छा!! लवकरच पुर्ण कर...

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विमुक्त's picture

9 Nov 2009 - 4:00 pm | विमुक्त

एखाद्या group सोबत जावं लागेल रे... कारण equipments लागतील चढताना...

सुमीत's picture

9 Nov 2009 - 4:39 pm | सुमीत

अरे कसली हुरहुर लावलीस यार जीवाला.
उत्तम रेखाटला आहेस प्रवास , शब्दात आणि छायाचित्रांत पण.
कामशेत आणि बेडसे लेणी बद्दाल लिहिताना जसा नकाशा बनवला होतास तसा ह्या प्रवासाचा पण दे, मला रायगड दिसत नव्हता रे छायाचित्रांत.

विमुक्त's picture

10 Nov 2009 - 1:15 pm | विमुक्त

(लिंगाणा... जवळून) फोटो मधे उजव्या बाजूला लिंगाण्याच्या मागचा डोंगर म्हणजेच रायगड...

सुमीत भातखंडे's picture

9 Nov 2009 - 5:57 pm | सुमीत भातखंडे

वर्णन आणि छायाचित्र दोन्ही.

सन्दिप नारायन's picture

9 Nov 2009 - 6:36 pm | सन्दिप नारायन

सुंदर, लिंगाणाला मी १९८७ ला गेलो होतो.लिंगाणाच्या पाथ्याशी पाने नावाचे गाव आहे. लिंगाणा म्हणले की भिडे आटवतात. ( त्यांनी बोराट्याची नाळेच्या आधी आपले प्राण सोडले होते. डीह्यड्रेशन होउन).

संदीप नारायन

प्रभो's picture

10 Nov 2009 - 6:58 am | प्रभो

मस्त रे विमुक्ता... सहीच..

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

यशोधरा's picture

10 Nov 2009 - 1:33 pm | यशोधरा

सुरेख रे! हेवा वाटतो पहा तुझा...

sneharani's picture

10 Nov 2009 - 2:55 pm | sneharani

खरचं भटकंतीच्या माध्यमातून सुंदर आयुष्य जगतोयस.
फोटो देखील छानच...