सर्व रसिक खवय्यांना दीपोत्सवाच्या मंगलदायी शुभेच्छा. मौका है दस्तूर भी, तो कुछ मीठा हो जाये? :)
साहित्य :
३ भाग साखर. १ भाग कॉर्नस्टार्च. १ भाग बटर. २-३ चमचे साजूक तूप. ४ भाग पाणी. बदाम. १/२ चमचा वेलची / जायफळ पूड. केसर. खायचा रंग (ऑप्शनल.)
कृती :
नॉनस्टिकच्या काढईत ३ भाग साखर आणि ३ भाग पाणी एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहावे
थोड्या कोमट पाण्यात केशर भिजत ठेवावा. १ भाग कॉर्नस्टार्चमध्ये १ भाग पाणी आणि भिजवलेले केशर टाकावं.
साखरेच्या पाकाला उकळी यायला सुरुवात झाली (तळाला बुडबुडे दिसायला लागले) की त्यात कॉर्नस्टार्च टाकून ढवळावं.
मिश्रण दाट होऊ लागलं की त्यात २ चमचे साजूक तूप घालून ढवळत राहावं. मध्यम आचेवर तूप मिश्रणात एकजीव झाल्यानंतर त्यात १ मोठा चमचा बटर टाकावं. बटर एकजीव झालं की पुन्हा १ चमचा बटर टाकावं.
दरम्यान मिश्रणात हवेचे लहान लहान बुडबुडे तयार झालेले दिसतील. नंतर बदाम/काजू आदी सुक्या मेव्याचे तुकडे टाकून ढवळत राहावं. हे मिश्रण स्वत:हून कडा सोडायला लागेपर्यंत ढवळत राहावं. (साधारण दिलेल्या प्रमाणाला २०-२५ मिनिटे लागतात.)
ताटलीमध्ये हे मिश्रण काढून गार करत ठेवावं. (किमान १-२ तास.)
थंड झाल्यावर हव्या त्या आकारात तुकडे करावे.
प्रतिक्रिया
12 Nov 2012 - 7:00 am | रेवती
दिवाळीला जे मिश्र मिठाईचे बॉक्सेस भेट म्हणून येतात त्यात मला वाटते हा प्रकार असतो.
अश्याप्रकारे तो बनवला जातो ही माहिती अगदी नवीन आहे. आम्ही बरेच अंदाज लावून (दुसर्यांचे म्हणणे खोडून काढत) शेवटी हा प्रकार गव्हाच्या चिकात काहीतरी (माहित नसलेला) प्रकार मिसळून बनवला आहे असा निष्कर्ष काढला होता. आता तो अंदाजही साफ चुकला आहे. नवीन माहितीबद्दल धन्यवाद रे गणपा! फोटू आवडले.
अवांतर: या हलव्यात तर्जनी खुपसून (विष्णूने सुदर्शन चक्र घेतल्यागत) झोपाळ्यावर झुलत ही मिठाई मी खात असे. ;)
12 Nov 2012 - 2:34 pm | सुहास झेले
आयला सहीच... मला देखील ह्या पदार्थाचे नेहमी कुतूहल असायचे रे. एकदम भन्नाट पाककृती :) :)
12 Nov 2012 - 3:15 pm | सविता००१
गणपा, खरच भन्नाट पाककृती . बेस्टच. बाकी मी पण आत्तापर्यंत रेवतीताईशी सहमतच होते-रेसिपीबद्दल. आता केलाच पाहिजे हा हलवा लवकरात लवकर! :)
12 Nov 2012 - 4:35 pm | प्रचेतस
क्या बात है गणपासेठ. पाकृचे डिटेलिंग खूपच छान.
12 Nov 2012 - 5:49 pm | अनन्न्या
आवडतो पण क्रुती परफेक्ट आज कळली. मी एकदा गव्हाचा चीक काढून प्रयत्न केला पण जमला नाही. आता जमलाच पाहीजे.
12 Nov 2012 - 7:54 pm | जयवी
जबरी :)
12 Nov 2012 - 7:54 pm | विशाखा राऊत
बस शब्द संपले आहेत :) इतके सुरेख
12 Nov 2012 - 9:05 pm | स्मिता.
अहां, असा बनवतात तर हा हलवा!! तो कश्यापासून आणि कसा बनवत असतील याचं अनेक दिवसांपासून कुतूहल होतं, ते आज उलगडलं.
याचे अंदाजे १सेमी आकाराचे क्युब्स करून त्यावर पिठीसाखर भुरभुरवून छान लागते. (पिठीसाखरेमुळे हात चिकट होत नाहीत हे महत्त्वाचं ;))
13 Nov 2012 - 12:11 am | क्रान्ति
आवडता हलवा कसा करतात ते आता कळलं. वरच्या सगळ्या प्रतिसादकांप्रमाणे मलाही तो कशाचा बनतो, हे माहित नव्हतंच. आता बनवून बघावा.
13 Nov 2012 - 7:55 am | मीनल
हा कसा काय करत असतील याचा विचार ही केला नव्हता. फक्त खायचे काम केले होते. आता करून पाहेन.
13 Nov 2012 - 5:01 pm | सानिकास्वप्निल
बदामी हलवा खास दिवाळीच्या मिठायांमध्ये असणार हमखास पदार्थ
किती आठवणी जोडल्या गेल्या आहेत ...लहानपणी ह्या हलव्यांवरून बहिणीशी होणारे लुटुपुटूचे भांडण आठवते :)
पाकृ जबरदस्त आहेच पण शेवटचा फोटो अहाहा! क्या बात है
15 Nov 2012 - 4:16 pm | ज्योति प्रकाश
मला हा गव्हाच्या चिकाचा करतात हे माहीत होते,अश्याप्रकारे पण करतात हे आजच कळले.आवडीचा पदार्थ असल्याने नक्की करून पाहीन्.सोपी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.
16 Nov 2012 - 6:39 pm | निनाद मुक्काम प...
मस्तच
दिवाळीला माझे काका काकू बेंकेत असल्यामुळे मिठाई चे डब्बे घरी यायचे.
त्यात ही मिठाई आवर्जून असायची.
एरवी वर्षभर ती खायची संधी फारशी येत नसे.ह्या मिठाई व दिवाळीचे समीकरण लहानपणी डोक्यात एकदम घट्ट होते.
आता एकदा ती करून पहिली पाहिजे.
16 Nov 2012 - 6:57 pm | चाफा
हा हा मी आजवर याचा जिलेटीनशी काहीतरी संबंध आहे असं समजत होतो :)
16 Nov 2012 - 9:15 pm | मदनबाण
अच्छा असा बनतो काय हा पदार्थ ! मला तर या पदार्थाचे नाव "माहिमचा हलवा" असे असते असेच वाटत होते आत्ता पर्यंत ! :)
बाकी "बदामी" आकार छान दिलास हो याला ! ;)
26 Nov 2012 - 12:08 pm | गवि
माहीम हलवा वेगळा. पुलंनी वर्णन केल्याप्रमाणे: "अनेक कागदांत गुंडाळून आतमधे कागदाइतकाच पातळ माहीम हलवा मिळे."
तो अपारदर्शक असतो आणि पातळ स्लाईससारखा असतो.
दोन्ही हलवे उत्तमच असतात. फक्त कोणत्या हलवायाकडून विकत घेतला याने जमीनअस्मानाचा फरक पडू शकतो (विशेषतः माहीम हलव्याच्या तलमपणात.)
गणपाने दिलेली ही कृती आता घरी करुन पहायलाच हवी.
16 Nov 2012 - 9:45 pm | पैसा
कुरियर चार्जेस देते, लवकरात लवकर पाठवून देणे.
18 Nov 2012 - 10:25 pm | सस्नेह
मुलांची आवडती मिठाई !
पण कशाची बनवतात हे आज समजलं.