बाप..

रामदास's picture
रामदास in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 1:19 pm

सातवीच्या वर्गात असताना माध्यमिक शिष्यवृत्तीचे फॉर्म भरायची तारीख जवळ येत चालली होती.आमच्या शाळेतून आम्ही चार - पाच विद्यार्थी फॉर्म भरणार होतो. माझाच फॉर्म अजून भरला गेला नव्हता. सगळ्या तुकड्यात पहिला नंबर असल्यामुळे हेडबाईंनी सांगितलं होतं, भट्टेचा फॉर्म आल्याशिवाय खात्याकडे फॉर्म पाठवू नका.
गालगुंड झाल्यामुळे मी दोन दिवस शाळेत गेलो नव्हतो. मधल्या सुटीत पोळ बाईंनी मला स्टाफ रुममध्ये बोलावलं.
"ह्या दोन फॉर्मवर तुझ्या बाबांची सही घेऊन ये. पुढच्या आठवड्यात हे सगळं खात्याकडे पोहचवायचं आहे." मी मान डोलावली.
आमच्या शेजारचे मथुरेकाका तिथेच बसले होते. आमच्या शाळेत अर्धवेळ कलाशिक्षक म्हणून काम करायचे. त्यांचं बिर्‍हाड आमच्या बाजूच्या वाड्यातच होतं. चौकात बोर्ड रंगवायचं दुकान त्यांचच होतं. आमच्या दादांच्या वर्गात होते म्हणे ते! पण का कुणास ठाउक माझ्यावर नेहमी रागवायचे. चित्रं चांगली काढली तरीही रागवायचे.
बाईंना सांगितलं, देतो उद्या फॉर्म. बाहेर आलो आणि आठवलं दादा तर घरी नाहीयेत. मी परत बाईंकडे गेलो.
"बाई, आमचे दादा घरी नाहीय्येत. आता काय करायचं?"
स्कॉलरशिपची परीक्षा चुकणार म्हणून माझा जीव कासावीस व्हायला लागला.
मथुरे सरांनी मध्येच तोंड घातलं.
"अरे, दादा नसतील तर विश्वासराव नक्की घरी असतील बघ. त्यांची आण सही. एकूण एकच."
असं म्हणून खदाखदा हसायला लागले.
पोळ बाईंना भयंकर राग आला.
"मथुरे सर, मुलांच्या समोर असं वेडवाकडं बोलू नका. मी हेडबाईंकडे तक्रार करीन."
मथुरेंना राग आला. त्यांनी हातातलं रजिस्टर जोरात आपटलं.
"अहो बाई, तुम्ही का मनावर घेताय?"
आणि माझ्याकडे बघून म्हणाले,
"काय रे तुला काही वाईट वाटलं का?" आणि आणखी जोरात फिदीफिदी हसले.
बाईंनी मला जायची खूण केली .मी बाहेर आलो पण आतून बराच वेळ बाईंचा रागावलेला आवाज येत होता. मथुरेकाका असं का म्हणाले याचाच विचार करत राहीलो. माझी टर ऊडवली जाते आहे हे नक्की कळलं पण त्याचा अर्थ काही केल्या कळेना.
थट्टा माझीच नव्हती. दादांचीच होती हे मला कळलं आणि मला गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटायला लागलं. शर्टाच्या कॉलरजवळचं बटन लावल्यानंतर गळ्याला सारखं सारखं घट्ट वाटावं असं वाटायला लागलं.
घरी येताना मी रुमाला पण विचारलं. आता रुमा म्हणजे माझ्या मागे दोन वर्ग असली तरी मानापमानाचे सगळे प्रॉब्लेम मी तिलाच विचारायचो.
मग दुपारी घरी आल्यावर आईला विचारलं तर तिच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं मग मलाही रडावसं वाटलं .
संध्याकाळी रुमा धावत पळत घरात आली.
“रावांनी बोलावलंय तुला.”
मी म्हटलं, "कशाला? आत्ता तर बैठकीची वेळ आहे ना?"
"म्हणूनच तुला बोलावलंय."
मी माडीवरून खाली आलो.
बैठकीत सात आठजण बसली होती.
मला बघितल्यावर राव उठले.
"ये, आत ये."
ते आणि मी आतल्या खोलीत गेलो.
"आज मथुरे मास्तर काय म्हणाला?"
मला रडायला यायला लागलं. मग मी अडखळत सगळं काही सांगितलं.
रावांच्या चेहेर्‍यावर राग वाढत जात होता.
मग बोलताना मी थांबलो. "मग पुढे काय?”
"काही नाही."
राव अचानक शांत झाले. मला म्हणाले, "ठीक आहे. तू आईची सही घे त्या फॉर्मवर आणि पोळ
बाईला देऊन टाक."
आता मला थोडी हुशारी वाटत होती .
मी विचारलं, "मी जाऊ आता."
"हां. हां. जा आता. विचार करत बसू नको. आपल्याला स्कॉलरशिप मिळवायची ना?", राव म्हणाले. मी, “हो”, म्हटलं.
"मग जा आता आणि अभ्यास करा."
--------------------------------------------------------------------
साताठ दिवसात मी सगळं काही विसरलो.
ऑगस्ट महिन्यात, नागरीक शास्त्राच्या बाईंनी, आम्हाला निवडणूक आणि लोकशाही शिकवलं.
त्याच्या पुढच्या तासाला मथुरे सर आणि पीटीचे पाटील सर वर्गात आले.
"या वर्षी आपण शाळेत निवडणूका घेणार आहोत."
आमच्या वर्गात एक्कच गोंधळ. सगळेच जण निवडणूकीचे उमेदवार व्हायला तयार.
दोन चार जणांना चापटवल्यावर वर्गात बर्‍यापैकी शांतता पसरली.
वर्ग-समितीसाठी चार आणि शालेय समितीसाठी एक उमेदवार अशी निवडणूक होणार होती.
पाटील सर म्हणाले, "तू शालेय समितीसाठी उभा रहा. सातवीच्या सगळ्या तुकड्यातली सगळी मुलं तुला ओळखतात."
मथुरे सर काहीच बोलले नाहीत. पोळ बाईंनी झापल्यापासून माझ्याशी त्यांनी बोलणं टाकून दिलं होतं.
तासभर ओरडाआरडा झाल्यावर चार जागांसाठी सात उमेदवार आणि शालेय समितीसाठी आमच्या तुकडीतून मी एकटा.
"चला, उद्यापासून निवडणूकीच्या तयारीला लागा."
पुढच्या दोन तासात वर्गात कोणाचेच लक्ष नव्हते. सगळ्यांनी प्रचाराचे मनसुबे जाहीर केले. मला काही सुचेना.
मला सगळे हुशार मुलगा म्हणून ओळखायचे पण निवडणूक म्हणजे काय काय करायचं हे मला नव्हतं माहीती. रुमा मला डबा खायच्या सुट्टीत भेटली तेव्हा मी सांगीन म्हटलं तर तिला आधीच ते माहीती होतं. ती पण निवडणूकीला उभी राहणार होती .
"आपण दोघं दोघं शालेय समितीवर. मज्जा यील नाय," रुमा म्हणाली.
मी म्हटलं "त्यात मज्जा काय?"
तर मला म्हणाली कशी, "तुला माहीत्येय ना आपण दोघ, आं... आं... आं!
मी म्हटलं, "ते मोठेपणी गं. आत्तापासून काय त्याचं?"
खरं सांगायचं तर ती शालेय समितीवर माझ्या बाजूला बसेल. आम्ही दोघंच बोलत राहू. या कल्पनेनी मला छान छान वाटायला लागलं.
पोळ बाई भेटल्या. मला म्हणाल्या, "अरे, निवडणूक म्हणजे सगळ्यांना भेटायचं. सांगायचं, मला मत द्या. माझी निशाणी काय अमुक तमुक आहे, ते सांगायचं."
मला काही त्यात मजा वाटत नव्हती. पण पाटील सरांनी सांगितलं तर आता ऐकायलाच हवं.
रुमा मला म्हणाली, "आपण रावांना विचारू या. राव आमच्या गावात नेहेमी निवडणूकीच्या कामात असायचे."
शाळेची निवडणूक आणि रावांना विचारायचं. बाप रे!
रुमा म्हणाली, "मी सांगते आईला. ती रावांना सांगेल."
दुसर्‍या दिवशी रविवार होता. मी आणि रुमा मागच्या पडवीत, अभ्यास करायचा सोडून कागदाच्या चौकोर तुकड्यांवर, मते द्या. मते द्या. निशाणी अमुक तमुक असं लिहीत बसलो होतो.
रावांच्या फटफटीचा आवाजा सुध्दा आमच्या कानावर आला नाही.
आम्हाला चाहूल लागली तेव्हा कळलं की राव मागे उभं राहून आम्ही काय करतोय ते बघत होते.
राव बरेच खुशीत दिसत होते.
रुमानी हळूच त्यांना सांगितले, “आमच्या ना, शाळेत ना, निवडणूक आहे.”
"अरे मग तुमची पोस्टरं बनवा. जिंकून आलंच पायजे आपल्याला!"
राव जोरात हसले पण हसल्यावर एक आंबट वास आला.
रुमा म्हणाली, "राव म्हणाले तर आता आपण जिंकणारच हां!" रुमा जाम खूष झाली होती.
थोड्या वेळानी रावांच्या हाकेवर आम्ही बैठकीवर गेलो.
राव बोटावर बोट आपटत मला म्हणाले, "तू मला उद्या संध्याकाळी भेट. बरोब्बर सात वाजता ये."
ये म्हणजे काय मी तर असणारच ना."
दुसर्‍या दिवशी सकाळी राव आणि दादा सोबतच आले. दादांना आणायला राव नेहेमी स्टेशन वर जायचे. रावांच्या जीपमधून दोघं घरी यायचे. औषधपाण्यासाठी दादा दोन दोन दिवस ठाण्याला जायचे आणि दोन दिवसानी घरी आल्यावर एव्हढे थकलेले असायचे की सारखे सारखे झोपून जायचे.
दादा घरी आले की मला छान छान वाटायचं. आई आतूनच त्यांच्याकडे निरखून बघत रहायची ते पण छान वाटायचं. दादा घरी आले की आई त्या दिवशी दादांची आवडती आंबोळी आणि नारळाच्या दुधातली खीर बनवायची. अर्थात त्या दिवशी रुमा आमच्याकडेच जेवणार हे सांगायलाच नको. आम्ही दोघंही दादांकडे बघत बघत जेवायचो. जाळीदार आंबोळी लेसच्या पडद्यासारखी दिसायची. मधूनच दादा एक घास मला भरवायचे. माझ्याकडे बघून रुमा पुढे सरकायची. मग एक घास तिला पण. दादा फारसे बोलायचे नाहीतच. बोललेच तर एक दोन चार वाक्य. एव्हढे जपून जपून बोलायचे की एका शब्दानंतरचा दुसरा शब्द ऐकू येईस्तो पहिला शब्द विसरायला व्हायचं. पण हे नेहेमी नाही. औषधासाठी ठाण्याला जाउन आल्यावरच. मग मी दादांना निवडणूकीची गंमत सांगितली.
"निवडणूक लढायची म्हणजे मन खंबीर हवं."
"रिठ्याच्या काळ्या बी सारखं टणक. थोडसं घासलं की गरम होणारं. जास्त घासलं की घासणार्‍याच्या बोटाला चटका देणारं."
माझ्याकडे बघत मला म्हणाले, "तुझं मन नाही रे तसं. तुझं मन आहे सावरीच्या बोंडासारखं. थोडा उन्हाचा चटका बसला की उलणारं. मग सगळं काही वार्‍यावर आणि हातात रिकाम्या कुयर्‍या."
मला काही म्हणता काही कळालं नाही. दादांचं बोलणं असंच असायचं. आता ऐकलं की दोन तासानी हळूच मनात शिरून समजणारं.

मग संध्या़काळी मथुरे सरांच्या दुकानातून एक माणूस आलेला मी बघितला आणि मी खाली गेलो. राव त्या माणसाशी बोलत होते. मला एव्हढंच कळलं की रावांनी त्या माणसाला माघारी पाठवून मथुरे सरांना बोलवायला सांगितलं.
तो माणूस परत फिरला तेव्हा रावांनी त्याच्या हातातली पिशवी काढून घेतली.
दहा मिनीटांनी मथुरे सर लगबगीनी आले तेव्हा मी आणि रुमा, राव कधी हाक मारतात याची वाट बघत उभं राहीलो. सर रावांना म्हणत होते,
“अहो पण मी त्याच शाळेत आहे ना…”
राव म्हणाले, चौकात दुकान मांडून बसला आहेत ना? मग…? मग...?
रावांशी वाद घालणं म्हणजे... मथुरे सरांना रावांचा दरारा माहिती असावा.
आम्ही वाट बघत होतोच. रावांनी एकच हाक दिली आणि आम्ही जिन्यावरून धडधड आवाज करत त्यांच्या घरात.
मग आम्ही मथुरे सरांच्या सोबत मागच्या पडवीत गेलो. सरांनी एक पांढर्‍या कापडाची गुंडाळी काढली.
रावांनी त्यांच्या गुरगुरणार्‍या आवाजात सरांना सांगितलं, “बॅनर झाले की सांगा.”
आमच्या डोक्यात प्रकाश पडला की मथुरे सरांना का बोलावलं आहे.
मग पडवीच्या भिंतीवर कापड ताणून लावलं.
सर माझी आणि रुमाची नजर टाळत कामाला लागले.
एकदाच मला आणि रुमाला विचारलं,
“काय रे, तुमच्या निशाण्या काय आहेत रे?”
माझी बासरी आणि रुमाची होडी.
सपासप ब्रश फिरायला लागला.
अर्ध्या तासात माझे दोन बॅनर तयार.
शालेय समितीसाठी निवडून द्या .
विश्राम भट्टे. निशाणी : बासरी. एक बासरीचं चित्र.
मग रुमाचे दोन बॅनरपण तयार झाले.
रुमा महीपती विश्वासराव. शालेय समीतीच्या मुलींच्या गटाचा उमेदवार.
निशाणी : होडी.
हातात पेंटचा डबा आणि ब्रश घेउन मथुरे सर उभे राहीले. मला म्हणाले, “जा रे, रावांना बोलाव.” आता. राव बैठकीत हिशेबाच्या गोष्टी करत बसले होते.
आता रावांना बोलावणार कोण?
पण रुमाला बघितल्यावर राव पटकन उभे राहिले.
भुवया उंचावत त्यांनी विचारलं,
“काय झालं?”
रुमानी फक्त आतल्या बाजूला खूण करून सांगितलं.
मग रावांनी गोपाळ्याला हाक मारली.
माझ्या पोटात गोळा उभा राहीला. गोपाळ्या म्हणजे रावांना एखाद्या माणसाला कुटायचं असलं की रावांच्या पाठीशी असणारा दैत्य.
आम्ही सरळ धूम ठोकली ती पडवीत.
राव आले.
त्यांनी मोठ्यांदी बॅनर वाचायला सुरवात केली.
रुमा महीपती विश्वासराव .शालेय समितीचा मुलींच्या गटाचा उमेदवार.
निशाणी : होडी.
“छान! छान! रुमा महीपती विश्वासराव.”
मग माझा बॅनर वाचायला सुरुवात केली.
शालेय समितीसाठी निवडून द्या.
विश्राम भट्टे. निशाणी : बासरी
मग जरा पुढे होऊन परत एकदा
शालेय समितीसाठी निवडून द्या .
विश्राम भट्टे. निशाणी : बासरी
पण दुसर्‍यांदा वाचताना त्यांचा आवाज पिचलेल्या बासरीसारखा आला.
मथुरे सर त्यांनी बनवलेल्या बॅनरकडे कौतुकानी बघत होते.
पण पुढे एकदम काय झालं ते कुणालाच कळलं नाही.
रावानी त्यांच्या हातातला रंगाचा डबा हिसकून घेतला.
अर्धा रंग लादीवर सांडला.
मथुरे सर घाबरून मागे झाले.
त्यांच्या मागे गोपाळ्या.
हातात ओतून रावांनी रंग माझ्या बॅनरवर फेकला.
“मादरचोद! वाच एकदा...”
मथुरे सरांना आता मागे सरकायला जागाच नव्हती.
ते म्हणाले, “राव केलेल्या कामावर रंग फेकू नका....”
पण असं म्हणता म्हणता ते रावांच्या जवळ आले.
नंतर फक्त खाडकन थोबाडीत मारल्याचा आवाज आला.
रुमा माझ्यामागे. माझे पाय थरथरायला लागले.
सरांच्या गालावर रंगाची चार बोटं उमटली होती.
मास्तर मटकन खालीच बसले.
“राव..., राव…, माफ करा….”
आणखी एकदा आवाज आला. दुसरा गाल.
मला ज्याम मुतायला लागली.
“मादरचोद...! फक्त विश्राम भट्टे…? बापाचं नाव कोण लिहीणार…?”
मथुरे सरांनी पाय धरलेले बघितले आणि मी अन् रुमा पळालोच.
दहा मिनीटांनी हाक मारल्यावर आम्ही पडवीत गेलो.
नव्या बॅनरचा कपडा फाडून मास्तरांनी रंगवायला सुरुवात केली होती.
राव दिसत नव्हते पण गोपाळ्या खांबाजवळ उभा होता.
नवीन बॅनर आणखी वळणदार अक्षरात तयार होत होता.
शालेय समितीसाठी उमेदवार.
विश्राम चित्तरंजन भट्टे.
मास्तरांच्या गालावर रंग तसाच होता.
रंगाच्या हातानी त्यांनी डोळे पुसलेले मी पाह्यले आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
स्कॉलरशिपचा फॉर्म आठवला.
रावांनी त्यांच्या पद्धतीनी न्याय केला होता.
निवडणूक झाली.
आम्ही दोघंही जिंकलो.
दिवाळीच्या सुट्टीनंतर मथुरे सरांनी शाळा सोडून दिली.

footer

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

12 Nov 2012 - 7:42 am | स्पंदना

कशी सणसणित बसली मथुरेला. लय वाईट्ट खोड असते एकेक्काला दुसर्‍याला वेंगाडुन दाखवायची. बरी जिरली.

रामदासकाका नमस्कार स्विकारा.

चीज झालं!

नाखु's picture

12 Nov 2012 - 11:27 am | नाखु

सुरुवात तुमच्या कथेने केली.... काका खरंच तुमची कथा वाचताना का कुणास ठाऊक बालपण आठवत राह्तं... हुळ्हुणार्या खपली सारख.. आपोआप पडेल अशी वाट पहात बसणं फक्त आप्ल्या हातात.

फार सुंदर आहे कथा. सूचकपणात कसं सौंदर्य असतं ते इथे दिसतं. लेखनाचा बॅकड्रॉप एस्टॅब्लिश करण्यासाठी बटबटीत निवेदनं, स्पष्ट करावे लागणारे नातेसंबंध या सर्वांची समर्थ लेखकाला गरजच नसते हे सिद्ध करणारं लिखाण.

सुहास झेले's picture

12 Nov 2012 - 12:36 pm | सुहास झेले

रामदासकाकांचा लेख म्हणजे माझ्यासारख्यासाठी पर्वणीच.... मस्त झालीय कथा :) :)

विसुनाना's picture

12 Nov 2012 - 12:58 pm | विसुनाना

कथा तितकीशी भिडली नाही.बरीच सांकेतिकही वाटली. म्ह्णजे लहान मुलाच्या दृष्टीकोनातून लिहिली म्हणून तशी असेल असे मानले तरी जास्त स्पष्ट करता आली असती.
रामदास सरांकडून मोठी अपेक्षा असल्याने असेल कदाचित पण थोडा अपेक्षाभंगच झाला.

दादांना निवडणूकीची गंमत सांगितली.
"निवडणूक लढायची म्हणजे मन खंबीर हवं."
"रिठ्याच्या काळ्या बी सारखं टणक. थोडसं घासलं की गरम होणारं. जास्त घासलं की घासणार्‍याच्या बोटाला चटका देणारं."
माझ्याकडे बघत मला म्हणाले, "तुझं मन नाही रे तसं. तुझं मन आहे सावरीच्या बोंडासारखं. थोडा उन्हाचा चटका बसला की उलणारं. मग सगळं काही वार्‍यावर आणि हातात रिकाम्या कुयर्‍या."

-हा मात्र खास रामदास टच.

श्रावण मोडक's picture

12 Nov 2012 - 1:29 pm | श्रावण मोडक

घाई झाली का थोडी? विसुनानांशी सहमत.
किंवा कदाचित कथा बांधली गेली, आरंभ आणि अंत यांत.

सविता००१'s picture

12 Nov 2012 - 2:26 pm | सविता००१

मस्तच. अंकाची सुरुवातच काकांच्या कथेने केली. त्याच चीज झालं! आणि जाळीदार आंबोळी लेसच्या पडद्यासारखी दिसायची हे तर खूपच मस्त. अगदीच पटणारं.

विसूनानांशी तंतोतंत सहमत.

- ( सांकेतिक ) सोकाजी

एकुजाधव's picture

14 Nov 2012 - 12:58 pm | एकुजाधव

़खास रामदास टच.

एकुजाधव's picture

14 Nov 2012 - 1:18 pm | एकुजाधव

़खास रामदास टच.

बॅटमॅन's picture

14 Nov 2012 - 2:00 pm | बॅटमॅन

एकदम अनवट, खास रामदास टच!!

ऋषिकेश's picture

14 Nov 2012 - 2:32 pm | ऋषिकेश

कथा आवडली

नगरीनिरंजन's picture

16 Nov 2012 - 1:16 pm | नगरीनिरंजन

कथा आवडली!
शब्दात पकडता येत नाही असं काहीतरी भिडलं मनाला!

चाफा's picture

16 Nov 2012 - 4:03 pm | चाफा

मनापासून आवडली, असे विषय हाताळावेत तर तुम्हीच, काका :)

मालोजीराव's picture

23 Nov 2012 - 2:51 pm | मालोजीराव

आमच्या कॉलेजातला एक शिपाई येता जाता पोरींची छेड काढायचा,डबल मिनिंग बोलायचा .....एकदा रात्री त्याच्यावर गोधडी टाकून त्याला चांगला चेम्बवला होता...अशी माणसं थोड्या फार फरकानी सगळीकडे असतात असं दिसतंय !!! चांगला हाणला त्या मथुरेला

पैसा's picture

23 Nov 2012 - 10:45 pm | पैसा

खूप आवडली.

चेतन's picture

25 Nov 2012 - 2:04 pm | चेतन

खास रामदास टच

>>माझ्याकडे बघत मला म्हणाले, "तुझं मन नाही रे तसं. तुझं मन आहे सावरीच्या बोंडासारखं. थोडा उन्हाचा चटका बसला की उलणारं. मग सगळं काही वार्‍यावर आणि हातात रिकाम्या कुयर्‍या."

सुंदर

चेतन

सिरुसेरि's picture

26 Aug 2020 - 4:08 pm | सिरुसेरि

सुरेख!

महासंग्राम's picture

26 Aug 2020 - 4:58 pm | महासंग्राम

कसली कडक लिहिली आहे कथा

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 8:21 am | NAKSHATRA

काका , खरच लहानपणीचे दिवस आठवले.
सगळे आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असे वाटते.
तुमची लेखणी अशीच चालू राहू द्या.

चौथा कोनाडा's picture

26 Jan 2021 - 12:58 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त कथा आहे ! आपल्या लेखणीला सॅल्युट, रामदासजी !

मिपा श्रीगणेश लेखमालेसाठी कथावाचन करायचा मोह आवरला नाही !
खालील धाग्यावर ही कथा आपण ऐकू शकता:

श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो)