हुलग्याची (कुळीथ) शेंगोळी

शाली's picture
शाली in पाककृती
5 Jun 2018 - 4:54 pm

ईथे ही माझी पहिलीच पाककृती आहे. आमच्या मावळप्रांताची ही पारंपारीक पाकृ आहे. शेंगोळी. हिची आवड एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येते. नविन मानसाला हा पदार्थ शक्यतो आवडत नाही. खायला आणि पहायलादेखील. खास केलेला पदार्थ शेजारी द्यायची पध्दत असल्याने मी हा प्रकार एकदा आमच्या शेजारी दिला होता पण त्यांनी पहाताक्षणीच “ई ऽ हे क्काये?” म्हणत असा काही चेहरा केला की विचारु नका. हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पिठाचा करतात अनेकजन. पण आम्ही हुलगेच (कुळीथ, हॉर्स ग्राम) वापरतो. त्या शिवाय मज्जा नाही. तर पाहूयात साहित्य आणि पाकृ.

साहित्य:
हुलग्याचे पिठ - दोन वाटी
भाजलेले शेंगदाने - अर्धा वाटी
कोथिंबीर
जिरे
हिंग
लसुण
मिठ
लाल तिखट (मिरची पावडर)
भरपुर तेल (शक्यतो शेंगदाना तेल)

कृती:
पिठ सोडून बाकी सगळे साहीत्य थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यावे. ही पेस्ट हुलग्याच्या पिठात टाकून पिठ घट्ट मळावे. गरजेपुरते पाणी टाकावे. पिठ घट्टच मळावे. सैल झाले तर वेढे पाण्यात विरघळतील किंवा जास्तच घट्ट झाले तर शिजणार नाहीत. हा अनुभवाने येणारा भाग आहे. आता या पिठाचे लहाण लिंबायेवढे गोळे (पेढे) करुन घ्यावेत. येथून पुढील भाग बराच ट्रिकी आणि प्रॅक्टीसचा आहे. तळहाताला थोडे पाणी लावून एक गोळा दोन्ही तळहातांच्या मध्ये हलकेच धरावा. मग दोन्ही तळहात दाब देत मागेपुढे करत सोऱ्यातुन चकली जशी बाहेर पडते अगदी त्याच प्रमाणे आणि तेवढ्याच जाडीचे पिठ हलके हलके खाली येवू द्यावे. ते तुटू न देता खालील ताटात चकली प्रमाणे आकार द्यावा. हा बऱ्याच सरावाचा भाग असल्याने पहिल्यांदा सरळ पोळपाटावर शेंगोळीला लांब आकार देवून मग वेढे करावे.
हे वेढे करत असताना गॅसवर चार वाट्या पाणी ऊकळायला ठेवावे. त्यात दोन चमचे तेल आणि मिठ टाकावे. पाण्याला खळखळून ऊकळी आली की एक एक करत सगळे वेढे पाण्यात सोडावे. ज्या ताटात पिठ मळले असेल ते धुवून, पिठाचा एक पेढा पाण्यात कुस्करुन ते पाणी टाकावे. गॅस मंद करावा आणि जरा खोलगट झाकण ठेवावे. त्यात थोडे पाणी टाकावे. साधारण चाळीस मिनिट न हलवता शिजवावे शिजवावे.
या पदार्थाला कोणत्याही सजावटीची गरज नाही. गरमागरम वाढावे, वरुन कच्चे तेल घ्यावे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खावे. तोंडी लावायला कांदा हवाच. शेंगोळी जर ऊरलीच तर सकाळी लोखंडाच्या तव्यावर गरम करावी. अप्रतिम लागते.

[१.तयार शेंगोळीचा फोटो मुद्दाम दिला नाहीए. कारण जे पहिल्यांदाच हा पदार्थ ट्राय करणार असतील तर फोटो पाहून करणार नाही असे वाटले.
२. फोटोतील शेंगोळी मी हातावर केली आहे, बायकोने नाही:) ]

shengoli

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Jun 2018 - 5:06 pm | यशोधरा

मस्त आहे पाकृ.
कुळीथ पिठीचे पिठलेही भारी चविष्ट असते. मस्त लसणाच्या फोडणीवर ओतायचे! बदाबदा पाऊस पडत असताना गरमा भात व कुळीथ पिठीचे पिठले!! अहाहा!

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 10:00 pm | श्वेता२४

मी पण कुळीथ च फक्त पिठलंच खाल्लं आहे . आणि अत्यन्त आवडतं. हही पाकृ पण करून बघायला हरकत नाही सोपी वाटतेय

manguu@mail.com's picture

5 Jun 2018 - 5:37 pm | manguu@mail.com

छान

पद्मावति's picture

5 Jun 2018 - 6:05 pm | पद्मावति

मस्तं!

अंतु बर्वा's picture

5 Jun 2018 - 9:06 pm | अंतु बर्वा

>>शेंगोळी जर ऊरलीच तर सकाळी लोखंडाच्या तव्यावर गरम करावी. अप्रतिम लागते.
ह्याला अनुमोदन. आमच्या मातोष्री उत्तम शेंगोळी बनवतात. पीठ कुळथाचेचं. सोबत गरम बाजरीची भाकरी. :०)

सकाळी ऊरेल या बेतानेच करतो मी :)

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 10:04 pm | श्वेता२४

मिक्सर मध्ये पण तेल टाकायचे का

नाही. मिक्सरमध्ये नाही टाकायचे. पिठ मळतानाही नाही टाकायचे.

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 10:55 pm | श्वेता२४

असं लिहिलंय . पण पाकृ मध्ये 2 चमचे तेलाचाच उल्लेख आहे . बाकी तेल कुठे वापरायचे? वरून खाताना घेण्यासाठी का?

पाणी ऊकळायला ठेवताना त्यात दोन चमचे तेल आणि मिठ टाकायचे. वरून घेतानाही लागतेच.

हीच खरी शेंगोळ्यांंची पाककृती. मस्त.

इष्टुर फाकडा's picture

6 Jun 2018 - 12:32 am | इष्टुर फाकडा

करून पाहणार नक्की. चकलीच्या सोऱ्याने शेंगोळ्या पाडल्या तर सोपं जाईल असं वाटतंय.
शाली, छान लिहिता; तेवढं 'बाणाचं' आणि 'नळाचं' बघाकी!

सोऱ्याने नाही होणार. एकतर पीठ फार घट्ट असते त्यामुळे सलग येणार नाही. आणि चिकट देखील असते. हातावर किंवा पोळपाटावरच कराव्या लागतील.

.

भीडस्त's picture

7 Jun 2018 - 3:33 pm | भीडस्त

रुख्माईला काय हातावं शेंगुळ्या यती नाईत. मण्ग एका बारिनी तिन्ह्या सो-यावं करुन्सनी पघातल्या व्हत्या.
तव्हापुन आमच्याकं
मंडळिनी केल्या तं सो-यावं
आन्
म्हतारिनी केल्या तं हातावं

मह्यनातुन यक्दा शेंगुळ्या न यक्दा मासवड्या व्हयाच पायशेन....
मावळी भुतंच कनी आम्हि बोलुनचालुन

भीडस्त's picture

7 Jun 2018 - 3:37 pm | भीडस्त

शेंगुळ्याचं यवढं यढं तुम्ह्या यकट्यानि घातलंत
येक लम्बर .....

महिन्यातून एकदा पाहिजेच म्हणजे काय! पाहीजेच.
आमच्या घरात बायकांनाही हातावर जमत नाही. त्यामुळे हे काम माझ्याकडे असते आणि मला ते आवडतेही.

अशा चकलीच्या आकारातील शेंगोळ्या पहिल्यांदाच पहिल्या. छान दिसताहेत.
आम्ही एकतर आळीच्या सारख्या किंवा चिरोट्याच्या आकारात शेंगोळ्या करतो.

बबन ताम्बे's picture

6 Jun 2018 - 8:22 am | बबन ताम्बे

मला फार आवडते शेंगोळी. शेंगोळी, त्यावर थोडे तेल, बाजरीची भाकरी आणि कांदा . वर म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तव्यावर गरम केलेली शेंगोळी खूपच चविष्ट लागते.

सस्नेह's picture

6 Jun 2018 - 3:36 pm | सस्नेह

तेवढा तयार डिशचा फोटो दिला असता तर भारी 'दिसतेय' असे म्हणता आले असते ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2018 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख, अशा हटके पाककृती अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

हे पीठ घट्ट आहे आणि त्यात डाळ शेंगदाणे आहेत त्यामुळे सोय्राने अशक्यच॥ अन्यथा मउ पिठाच्या चकल्या हाताने घातल्या जातात तमिळनाडूत तंजावुर,पुदुकोट्टाइ भागात. एपिक चानेल राजा रसोई अन्य कहानियाँ यामध्ये आहे. युट्युबवर " Kai murukku" पाहा. ( कै = हात, मुरुक्कु = चकल्या.)

सुथू शक्यतो एका हाताने करतात. ही घ्या शेंगोळीची लिंक. पुढच्यावेळेस मी माझा व्हिडीओ टाकेन येथे. यावेळेस शुट करायचे लक्षातच आले नाही.
https://youtu.be/roc8fbZ0vfo

राही's picture

7 Jun 2018 - 3:52 pm | राही

मागे एकदा मला वाटते गौरीबाई गोवेकर या आय्डीने कुळीथपिठाच्या शेंगोळ्यांची एक जराशी वेगळी कृती मिपावर दिली होती.

शाली's picture

7 Jun 2018 - 4:09 pm | शाली

पाकृ सेम आहे. फक्त लाल तिखटाऐवजी लाल आख्या मिरच्या घेतल्या आहेत. वेढे केले नाहीत. आणि पाकृमध्ये थोडाफार फरक झाला तरी चवीतमात्र फारसा होत नाही. आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे नविन मानूस शक्यतो नाक मुरडतोच हा पदार्थ पाहून. त्यांनीही वाढणाऱ्या मानसांवर विश्वास ठेउनच खाल्ला :) मीही त्यामुळेच तयार डिशचा फोटो दिला नाही. ‘करून पाहूया एकदा’ म्हणनारेही मग फोटो पाहून ‘नकोच ते’ म्हणाले असते.

राही's picture

7 Jun 2018 - 8:58 pm | राही

manguu @mail.com,
तत्परतेने दुवा पुरवल्याबद्दल धन्यवाद.

दशानन's picture

7 Jun 2018 - 10:22 pm | दशानन

हे म्हणजे शेवया का?
मला हा पदार्थ समजला नाही आहे :(

जेम्स वांड's picture

24 Jun 2018 - 7:51 pm | जेम्स वांड

शेंगोळ्या नुसत्याच खायला नायत का चालत? म्हणजे बाजरीची भाकरी लागतेच का सोबत?