उन्हाळी भटकंती: मधू-मकरंद गड ( Madhu Makarandgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
18 May 2018 - 11:03 am

पर्यटकांमधे प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वरला प्रत्येक पाँईटवर दिवसभर हि गर्दी असते, मात्र संध्याकाळ होईल तशी या गर्दीची पावले वळतात, "मुंबई पॉंईट" किंवा आधीचा "बॉम्बे पॉईंट" कडे, अर्थातच सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी. महाबळेश्वरच्या पश्चिम टोकावर असलेल्या या पॉईंटवर उभारल्यास उजव्या हाताला शिवभारताची साक्ष देणारा प्रतापगड खुणावत असतो. मात्र बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे. सुर्यास्ताचे फोटो तर काढले जातात, पण हा सुर्यास्त ज्या डोंगराच्या मागे होतो आहे तो एक प्राचीन गड आहे, हे कोणाच्या गावीही नसते. या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड". ईंग्रजांनी त्याचा खोगीरासारखा आकार ध्यानी घेउन त्याला "सॅडलबॅक" असे यथार्थ नावही दिले आहे.
Madhumakarandgad1
सह्याद्रीची सरासरी उंची २००० ते ३५०० फुट आहे. काही ठिकाणी ती चार हजार आणि तीन ठिकाणी ( कळसुबाई, साल्हेर, घनचक्कर ) पाच हजाराच्या वर जाते. महाबळेश्वरच्या दक्षिणेला मात्र सह्याद्रीची सरासरी उंची फार तर ३५०० फुटापर्यंत पोहचते. सह्याद्रीतील बहुतेक उंच शिखरे त्याच्या पुर्वेला पसरलेल्या डोंगररांगात आहेत. मात्र सह्याद्रीच्या मुख्यरांगेत रतनगड, आजोबा,भागरीया, ढाकोबा आणि मधुमकरंदगड हि पाचच शिखरे चार हजार फुटापेक्षा उंच आहेत. जवळपास ४०६४ फुट उंची, ताशीव कडे असणारी दोन शिखरे आणि अभेद्य कवच्यासारखे आजुबाजुला पसरलेले जंगलाचे नैसर्गिक संरक्षण यामुळे या अचुक जागा पकडलेल्या या डोंगरावर दुर्ग उभारणी न झाल्यास नवल होते. हा गड नेमका कोणी उभारला ते अज्ञात असले तरी, गडावर असलेल्या खांब टाक्यावरुन गड प्राचीन नक्कीच आहे, बहुधा पन्हाळ्याचा दुसरा भोज याच्या हातचे स्थापत्य असावे. नंतरच्या ईतिहासाचे विशेष उल्लेख नसले तरी, बहुधा शिर्के आणि नंतर जावळीच्या मोर्‍यांच्या ताब्यात हा प्रदेश होता. ई.स. १६५६ मधे ( जानेवारी ते मे ) जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सातारा जिल्हा गॅझेटिअरप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधला असा उल्लेख येतो ,परंतु सभासदाच्या बखरीत अशी नोंद सापडते, "हणमंतराव म्हणून चंदररायाचा भाउ चतुर्बेट म्हणून जागा जावलीचा होता, तेथे बल धरुन राहिला. त्यासही मारले". बहुधा आदिलशाहीत इतर गडाप्रमाणे या गडाकडेही दुर्लक्ष झाले असणार आणि ते बेवसाउ बनले असतील. शिवाजी महाराजांनी ते बांधून काढले असती किंवा दुरुस्ती केली असेल. एकूणच प्रतापगड ते वासोट्या या गडादरम्यानचा हा दुवा. प्रतापगड परिसरात झालेल्या अफझलखानाच्या वधाच्या प्रसंगात या मधुमकरंदगडावर काही लष्करी हालचाली झाल्या होत्या का? याचे मात्र उल्लेख मिळत नाहीत. मकरंदगड मे १८१८ मधे ईंग्रजांनी घेईपर्यंत स्वराज्यात होता, इतके याचे महत्वाचे स्थान होते.
Madhumakarandgad2
या गडावर जायचे तर तीन पर्याय आहेत.
१) चतुरबेटमार्गे:-
महाबळेश्वरवरुन कोयनेच्या खोर्‍यात दुधगाव या ठिकाणी थेट बस आहे. हि बस वाडा-कुंभरोशी पार फाटा- शिरपोली मार्गे दुधगावला पोहचते. दुधगाववरुन कोयना नदी ओलांडून चतुर्बेट या गावी जायचे किंवा स्वताची गाडी असेल तर थेट चतुर्बेटला जाता येते. गावातूनच एक पायवाट थेट गडावर जाते. जीपसारखे कच्चा रस्त्यावरुन जाणारे वहान किंवा बाईक असेल तर थेट मकरंदगडाच्या खांद्यावर वसलेल्या घोणसपुर या गावापर्यंत मातीचा कच्चा रस्ता झालेला आहे, त्याने थेट जाउन बरीच पायपीट टाळता येते.यासाठी चतुर्बेटवरुन एक रस्ता दाभे-मोहन या गावी जातो, त्या रस्त्यावरच घोणसपुरकडे जाणारा कच्च्या रस्त्याचा फाटा उजव्या हाताला आहे.
२ ) हातलोट मार्गे:-
गडावर जाणारा मुळ मार्ग हातलोट गावातून होता.
Madhumakarandgad3
या गावात उभारल्यास गडाची मधु आणि मकरंद हि दोन्ही शिखरे दिसतात आणि त्याचा खोगीरासारखा आकारही स्पष्ट जाणवतो.
Madhumakarandgad4
हातलोट गावाच्या पहिल्या वाडीत मारुती मंदिर आहे. ईच्छा असल्यास इथे मुक्काम करता येईल.मंदिराच्या समोरच लोखंडी पुल आहे. तो पार करुन सव्वा तासाच्या खड्या चढाने गडाच्या डाव्या कड्यापाशी पोहचतो. तिथे उजवीकडे वळाल्यानंतर वीस मिनीटात मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पोहचतो. तिथून वीस-पंचवीस मिनीटात गडावर.
३ ) बॅबिंग्टन पॉईंटमार्गे:-
हा तिसरा मार्ग म्हणजे "चरती चरतो भगः"वर विश्वास ठेवणार्‍यांसाठी, अर्थातच पदभ्रमंतीची हौस भागवणार्‍यांसाठी. यासाठी, महाबळेश्वरवरुन तापोळ्याला जाणारी बस पकडायची आणि बॅबिंग्टन पॉईंटला उतरायचे. महाबळेश्वरची बाजारपेठ ते बॅबिंग्टन पॉईंट हे २ ते २.५ कि.मी. आहे. इथून मागे सोळशी नदीचे खोरे आणि समोर पश्चिमेला कोयना नदीचे खोरे दिसते. या ठिकाणी दोन पर्याय आहेत. इथून रॉबर्टस केव्ह म्हणजे चोरांच्या गुहेशेजारून मालुसरे गावी जावे. तिथल्या गवळणी पॉईंटवरुन खाली उतरले कि झोलाई खिंडीतून खाली एक रस्ता थेट चतुरबेट गावाकडे जातो , पण जर हि वाट सापडली नाही तर मस्त मळलेल्या वाटेने उतरुन झांजवाडी, दुधगावमार्गे गाठायचे आणि तिथून मकरंदगडावर चढाई करायची. ह्या मार्गे जवळपास तीन-साडे तीन तास लागतात.
महाबळेश्वर भटकताना आणि सुर्यास्ताच्या वेळी हा मधुमकरंदगड पाहिला होता, मात्र एखादा ग्रुप असल्याशिवाय त्यावर जाणे योग्य नाही, कारण या जंगलात अस्वले मोठ्या प्रमाणात आहेत याची माहिती होती. एके दिवशी पुण्याच्या 'गिरीदर्शन ट्रेकिंग क्ल्बचा' मेसेज आला. त्यांनी एक दिवसाचा मधुमकरंदगडाचा ट्रेक आयोजित केला होता. वाईमधे मिनीबसमधे बसून मस्त पैकी झोप काढली.
महाबळेश्वरकडून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या वाडा-कुंभरोशी गावाच्या अलिकडे पार-चतुर्बेट-हातलोट या गावाला जाणारा फाटा फुटतो. रात्री हा फाटा कदाचित लक्षात येत नाही, त्यासाठी या फाट्यावर "वरदायिनी माता" असे लिहीलेली सिमेंटची मोठी कमान आहे हि खुण लक्षात ठेवायची. आम्ही कुंभरोशीला चहा घेउन या मार्गे चतुर्बेटला निघालो. वाटेत बस रस्ता चुकल्याने थोडा वेळ मोडला. त्यावेळी थोडा वेळ खाली उतरलो. मे महिन्याचे दिवस होते, काही झाडे काजव्यांनी अक्षरशः फुलून गेली होती. निसर्गाची हि रोषणाई आम्ही स्तब्ध होउन पहात होतो. तो क्षण न विसरण्याजोगा. रात्री तीन साडे तीनला चतुर्बेट या गावी पोहचलो. एखाद्या महासागरातील बेटाचे असावे असे या गावाचे नाव, मात्र जवळ समुद्र सोडा, नदीही लांब आहे. या गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात उरलेली झोप पुर्ण केली. पहाटे घंटा नादाने उठलो. आवराआवर नाष्टा करुन एका वर्तुळात उभे राहिलो. ओळख परेड संपली आणि गडाकडे कुच केले. गंमत म्हणजे, चतुर्बेट हे पायथ्याचे गाव असले तरी इथून मात्र मकरंदगड दिसत नाही.
Madhumakarandgad5
घनदाट जंगलातून थोडावेळ चढल्यानंतर थोडक्या सपाटीनंतर वाट एका ओढ्यात उतरते. साधारण अर्ध्या तासात आपण ईथे पोहचतो.ओढा ओलांडून मात्र मस्त मळळेली वाट घनदाट झाडीतून चढायला सुरवात करते, ती जवळपास पाउण-एक तासानंतर उघड्यावर येते.
Madhumakarandgad6
इथेच आपल्याला गड माथ्याचे म्हणजेच मकरंदगडाचे दर्शन घडते. आता थोडीच चढण बाकी असते. इथे थोडी लिंबु पाणी, सरबत, चिक्की अशा इंधनाची देवाण घेवाण झाली.
Madhumakarandgad7
थोड्या वेळात आपल्याला मातीची कच्ची सडक आडवी जाते. वाटल्यास या सडकेवरुन पुढची वाटचाल करायची किंवा पाउलवाट शॉर्ट्कटने वर चढते, त्याने पटापट चढून सपाटीवर पोहचायचे. डाव्या हाताला वीजेच्या तारा आणि खांब सोबत करतात आणि समोर दिसते,
Madhumakarandgad8
गडाच्या खांद्यावर वसलेले, बहुतेक जंगम लोकांच्या वस्तीचे "घोणसपुर". गडावर जेव्हा राबता होती तेव्हा हे मेट होते, इथे परवानगी घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही. आपल्याजवळ शिधा असल्यास इथे दिला तर जेवण तयार करुन मिळते.
Madhumakarandgad9
ग्रुप लिडर पुरुषोत्तमने आधीच फोनवर एका घरात जेवणाचे सांगून ठेवले होते. त्यामुळे फार वाट न पहाताच चपात्या आणि कांदा बटाट्याचा रस्सा ताटात आला.
Madhumakarandgad10
बर्‍याच दिवसानंतर पडवीत सहभोजनाचा आनंद घेतला. आणि वामकुक्षीच्या मोहात न पडता गडाकडे निघालो.
Madhumakarandgad11
प्रशस्त मातीच्या रस्त्याने थोडे अंतर चालल्यानंतर समोर मल्लिकार्जुन मंदिर दिसु लागले.
Madhumakarandgad12
गडाच्या या परिसरात घनदाट जंगल असल्याने या वाटेवर नीट लक्ष दिले तर वन्यप्राण्यांचे ठसे दिसु शकतात. बिबट्याने आपण इथून गेलो याचा माग मागे सोडला आहे.
Madhumakarandgad13
दाट वनराईत लपलेले हे मंदिर म्हणजे सह्याद्रीत मुक्काम करण्याजोग्या आदर्श जागातील एक. एन मे महिन्यात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे मुक्काम अगदी आवश्यकच आहे.
Madhumakarandgad14

Madhumakarandgad15
मंदिरात काही प्राचीन शिल्प आहेत.
Madhumakarandgad16
एकुण मंदिराची बांधणी काहीशी अनगड आहे. देउळ निसंशय जुने आहे. शिवकालापुर्वी चंद्रराव मोर्‍यांनी ज्या सात शिवमंदिरांना ईनामे दिलेली होती, त्यातील हे एक. हि मंदिरे उभारणारे कलाकार नसतात, पण अत्यंत बिकट जागी भक्तिभावाने उभारलेली हि राउळे पाथंस्थाच्या वाटचालीत सुखागरे ठरतात.
बरीच चाल झालेली होती. जेवणही हातापायत उतरले होते. मोठा ग्रुप असल्याने बरेच नवखे आणि शारीरीक क्षमता कमी असणारे गार्डाचे डबे होते. आम्ही देवळात पोहचलो तरी बहुधा हि पिछाडीची फळी अजून निघायची होती. साहजिकच वेळ होता म्हणून सभामंडपात अंग टाकले. जमीनीच्या थंडावा संपुर्ण शरीरार झिरपला आणि विलक्षण सुखाची अनुभूती झाली. पाचच मिनीटाची ती झोप ताजेतवाने करुन गेली.
Madhumakarandgad17
मे महिना असल्याने जांभळे झाडाला लगडली होती. त्याचा आस्वाद घेत आणि बीया आजुबाजुला भिरकाउन देत पुढची वाटचाल सुरु झाली. मात्र थोड्यावेळात झाडांनी सोबत सोडली आणि वरुन कळकळते उन आणि खालून भट्टीप्रमाणे तापलेली जमीन यातून आमची वाटचाल सुरु झाली. त्यात खडी चढणारी वाट, परिणामी छातीचा भाता सुरु झाला. घामाच्या धारा टिपून एका वळणावर आलो, तो फार मोठा पॅनोरमा समोर आला. गडाची मधू आणि मकरंद हि दोन्ही शिखरे आणि त्यांना जोडणारी धार दिसु लागली.
Madhumakarandgad18
पश्चिम क्षितीज्यावर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे दुर्ग त्रिकूट असलेली रांग दिसू लागली. उंचीशी सह्याद्रीशी स्पर्धा करणारी कोकणातील हि एकमेव रांग. सह्याद्री आणि हि रांग यांच्यामधे जगबुडी नदीचा उगम होतो. यातील सुमारगड त्याच्या कातळटोपीमुळे आणि आडवातिडवा पसरलेला महिपतगड सहज ओळखू येतात. मात्र रसाळगड बराच लांब असल्यामुळे बारकाईने पाहिल्यावर ध्यानी आला. अगदी तळात एक त्रिकोणी आकाराची टेकडी दिसत होती, याच्या पायथ्यातून कोंड नाळेसारखी अवघड वाट खाली उतरते.
Madhumakarandgad19
एका बाजुला सपाटीवर वसलेले घोणसपुर आणि गावकर्‍यांची शेत दिसत होती.
Madhumakarandgad20
वाटेत एक मुर्ती दिसली कशाची आहे ते समजले नाही.
Madhumakarandgad21
यानंतर एका नैसर्गिक दगडाचा बुरुजासारखा उपयोग करुन मधून वाट कोरुन काढली आहे. इथे निश्चितच पहार्‍याची चौकी असणार.
Madhumakarandgad22
यानंतर एक सपाटी येते. इथे आपण जवळपास माथ्यावर पोहचलो असतो. इथे एक वैशिष्ट्यपुर्ण खडक आहे. एखाद्या नेढ्यासारखा तो खालून पोकळ आहे.
Madhumakarandgad23
बहुधा खडकाचा हा भाग पाण्याच्या लोटामुळे वाहून जाउन हि अशी रचना तयार झाली असावी.
इथून पुढचा रस्ता आपल्याला थेट माथ्यावर नेतो. यापुर्वी हि वाट थोडी अवघड होती. मात्र पर्यटन विकासांतर्गत मकरंदगडावर काही विकासकामे झाली, त्यात घोणसपुरला येणारा कच्चा गाडी रस्ता, गडावर चढणार्‍या वाट रुंद आणि सोप्या करण्यात आल्या.
Madhumakarandgad24
गडमाथा त्रिकोणी आकाराचा आहे. सुरवातीला एक गदडी स्तंभ दिसतो. बहुधा हि एक प्रकारची दिपमाळ असावी.
Madhumakarandgad25
याच्या समोर प्राचीन दगडी बांधणीचे कौलारू मल्लिकार्जुन मंदिर दिसते. शंकर हा पर्बताचा निवासी आणि सह्याद्रीत हि अशी मोक्याची जागा पाहून बांधलेली असंख्य शिवमंदिरे दिसतील.
Madhumakarandgad26
आतमधे काहीसा एकांतवास भोगणारा शंभु महादेव नागराजाच्या सोबत बसला आहे.
Madhumakarandgad27
भर्राट वारा गडमाथ्यावर आपले स्वागत करतो. प्रचंड मोठा परिसर नजरेत मावत नाही. एका बाजुला पुर्वेकडे महाबळेश्वरचे पठार आणि सह्याद्रीची रांग दुभागणारी कोयनामाई धरणाच्या पाण्याचे शिवसागर रुपात सोबतीला असते.
Madhumakarandgad28
तर शिवछत्रपतीच्या पराक्रमाच्या सोनेरी क्षणात हरवून गेलेला प्रतापगड झाडीतून आपला माथा उंचावतो. या खेरीज हवा स्वच्छ असेल तर लांब उत्तरेला कांगोरी उर्फ मंगळगड नजरेला पडू शकतो. पश्चिमेला रसाळ, सुमार आणि महिपत हे त्रिकुट तर दक्षिणेला महिमंडणगड, चकदेव खुणावतात.
समोर गडाचे दुसरे "मधूगड" हे शिखर दिसते.
Madhumakarandgad 29
गडमाथ्यावर थोडी विश्रांती घेतली आणि उत्तर बाजुला असलेल्या दुसर्‍या वाटेने खाली उतरु लागलो.
Madhumakarandgad 30
उभ्या उताराची हि दिड दोनशे फुटाची वाट जपूनच उतरायची. इथे पाय घसरल्यास क्षमा नाही.
Madhumakarandgad 31
इथून खाली उतरलो कि आपण एका उभ्या कड्यात खोदलेल्या प्रचंड मोठ्या खांब टाक्यापाशी येतो. गडाच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब करणारी हि खुण.
Madhumakarandgad 32
खांब सोडून कोरलेले टाके याचा अर्थ इथे किमान सातव्या शतकापासून इथे मानवाचा वावर आहे हे निश्चित.
Madhumakarandgad 33
टाक्याच्या वरच्या बाजुला चक्क मारुतीचे शिल्प आहे. 'पुच्छ ते मुरडीले माथा', या आवेशात मारुतीराया आहेत. पाण्यावर पिवळ्या शैवालाचा तरंग असला तरी तो बाजुला करुन पाणी पिता येते. बाटलीत भरुन मी ते पाणी तोंडाला लावले. अक्षरशः एकाच वेळी पोटात आणि मेंदुत विलक्षण थंडावा देणार्‍या पाण्याची जादू अनुभवायची असेल तर एन उन्हाळ्यात सह्याद्रीची भटकंती करायला पाहिजे.
Madhumakarandgad 34

Madhumakarandgad 35
बहुतेक जण इथून माघारी फिरतात. पण गडाचे दुसरे म्हणजे मधु हे शिखर पहायचे असेल तर, या टाक्याजवळून एक पायवाट पश्चिमेकडे जाते, या वाटेने चालल्यास एक खडक चढून आणि पुढची गवताळ घसार्‍याची आणि निसरड्या वाटेने आणि एका डोकावणार्‍या खडकावरुन आपण मधुगडाच्या माथ्यावर पोहचतो. अर्थात हि वाट अवघड आहे आणि फारसा मानवी वावर इथे नाही, हे लक्षात घेउन एकटे दुकटे ईकडे येउ नये. गडमाथ्यावर तीन कोरड्या टाकी आणि एकदोन पड्क्या घरांच्या जोत्याशिवाय काहीच नाही. गवतातून सावधपणे पश्चिम टोकावर गेल्यानंतर मात्र डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा सामोरा येतो. थेट कोकणात कोसळेला मधुगडाचा कडा, त्याच्या उत्तर बाजुने उतरणारा हातलोट घाट हि सोपी वाट आणि एखाद्या नरसाळ्यासारखी रचना असणारी आणि खड्या उतारची आणि विलक्षण घसार्‍याची कोंडनाळ.
Madhumakarandgad 36
मधुमकरंदगडाच्या दोन बाजुने दोन वाटा खाली कोकणात उतरतात. यापैकी उत्तरेच्या हातलोट गावातून हातलोट घाट उतरतो. घाट हा बहुधा बैलांच्या सोयीच्या रस्त्याने केलेला असतो, सहाजिकच हि वाट उतरायला सोपी असते. मी काही या घाटाने खाली उतरलेलो नाही, पण या देशीचे काही जिद्दी तरुणांनी ते धाडस केले आहे. त्यांच्या या साहसाला मानाचा मुजरा म्हणून त्यांच्या ब्लॉगच्या लिंक देतो.

रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट

कोंडनाळ-मकरंदगड- हातलोट घाट
कोंडनाळ-मकरंदगड- हातलोट घाट

हातलोट घाट सोपा असला तरी एक अतिशय कठीण अशी नाळ मकरंदगडाच्या दक्षिण अंगाने कोकणात उतरते. हि नाळ म्हनजे कोंड नाळ. या मार्गे ज्यांना जायचे आहे त्यांच्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल.
कोंडनाळ - हातलोट घाट
कोंडनाळ-मकरंदगड- हातलोट घाट

कोंडनाळेमार्गे बिरमणीला उतरणार्‍या वाटेचा व्हिडीओ
भाग १

भाग २

Madhumakarandgad 37
टाक्यापसून परतीची वाट आपल्याला पुन्हा एकदा माचीवरच्या मल्लिकार्जुन मंदिरापाशी आणते. वाटेत हि कातळात कोरलेली गुहा दिसली, मात्र हिचा उद्देश समजला नाही.
Madhumakarandgad 38
घोणसपुरमार्गे पुन्हा एकदा उतरुन चतुरबेटला आलो आणि परतीचा प्रवास सुरु झाला. येतानाचा प्रवास रात्री झाल्याने एक महत्वाची गोष्ट बघायची राहून गेली होती, ती म्हणजे पार गावाच्या हद्दीतील शिवकालीन पुल. अफझलखान वधाचा अतिशय महत्वाचा प्रसंग याच परिसरात झाल्याने इथल्या दळणवळणासाठी शिवाजी महाराजांनी कोयना नदीवर या पुलाची उभारणी केली. आवर्जून पहावे असे हे ठिकाण. याच कोयना नदीवर हेळवाकजवळ आधुनिक तंत्राने बांधलेला पुल दहा वर्षात तीन वेळा पडतो त्याची ना आम्हाला खंत ना खेद. मात्र जवळपास चारशे वर्षे होउन हा पुल अजूनही खणखणीत आहे, अगदी एक चिरादेखील हललेला नाही. विशेष म्हणजे याच पुलावरुन डांबरी रस्ता गेलेला आहे आणि त्यावरुन आजदेखील नियमित वहातुक सुरु आहे.
Madhumakarandgad 39
कोयना नदीच्या वहाण्याची दिशा लक्षात घेउन पावसाळ्यात पुराचा तडाखा पुलाला बसू नये म्हणून अशी रचना केली आहे.
Madhumakarandgad 40
याच परिसरात पार गावातील प्राचीन "रामवरदायिनी मंदिर"आहे, इच्छा आणि वेळ असल्यास त्यालाही भेट देता येईल.
अलिकडेच रत्नागिरी-पुणे हा प्रवास कमी वेळात होण्यासाठी खेड-आंबिवली-बिरमणि-हातलोट-पार असा रस्ता मंजुर झाला आहे. तेव्हा या परिसरातील दळणवळण वाढेल आणि मधुमकरंदगड अधिक पर्यटकांचे आकर्षण बनेल.
मधुमकरंदगडाची व्हिडीओतून सैर

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटिअर
२ ) आव्हान- आनंद पाळंदे
३ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतीश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर

प्रतिक्रिया

मस्त वृत्तांत. हि रेंज बरेच दिवस मनात आहे, कधी जमते बघू.

प्रचेतस's picture

18 May 2018 - 11:31 am | प्रचेतस

मस्त मस्त..!!!
फोटो आणि वर्णन उत्तम, थेट मकरंदगडावर गेल्याचे वाचताना जाणवते.
हातलोट घाटाची प्राचीन वाट नव्या रस्त्यामुळे बहुधा कायमची बंद होणार.

दुर्गविहारी's picture

19 May 2018 - 5:29 pm | दुर्गविहारी

सह्याद्री परिसरात बरेच बदल होत आहेत आणि कदाचित पुढे आणखी होत रहातील.पण नवीन रस्ता झाला तरी हातलोट घाट बंद होइल असे वाटत नाही. एकतर गाडीरस्ता बराच मोठा वळसा घालून जाईल, तर पायवाट बर्‍यापकी थेट उतरते. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम अजून बहुतेक सुरुच झालेले नाही. बहुधा २०१२ साली हि वाट मंजुर झाली आहे.

कंजूस's picture

18 May 2018 - 2:49 pm | कंजूस

फोटो भारी.

मधुमकरंदगड पुन्हा पाहून आनंद झाला. आम्हांला तेव्हा थेट पार गावापासून पायपीट करावी लागली होती. मल्लिकार्जुन मंदिर मुक्कामाला अतिशय भारी आहे. ऐन जंगलात हे स्थान असल्याने आणि उंचीमुळे उन्हाळ्यातदेखील थंडी भरून येईल असा अनुभव मिळतो. आता वर गडावर जाणारी वाट बरीच प्रशस्त केलेली दिसतेय. चतुरबेट या गावचे नाव 'चतुर्बेट' असे लिहायला हवे.

एकूणच मधुमकरंदगड आणि परिसर जावळीच्या खोऱ्यातील अवश्य भेट द्यावा असा भाग आहे. उत्तम लेख आणि माहिती.

प्रतिसादाबधल धन्यवाद. आपला मधुमकरंदगडाचा अनुभव बराच जुना दिसतोय, कारण मी २००५ आणि २०११ साली असे दोनदा मकरंदगडावर गेलो आहे. मात्र दोन्ही वेळा डांबरी रस्ता थेट चतुर्बेट गावापर्यंत होता. आतातर हाच डांबरी रस्ता थेट कांदाटी खोर्‍यात आराव, मेट शिंदीमार्गे थेट खेडला जोडण्याचे काम चालु आहे. तुलेनेने दळणवळणाच्या सुविधा वाढत असल्याने सह्याद्री परिसरातील भटकंती सोपी होत आहे.
बाकी चतुर्बेट गावाचे नाव अनवधानाने चुकले, धाग्यात दुरुस्ती केली आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबध्दल धन्यवाद.

उपेक्षित's picture

19 May 2018 - 12:26 pm | उपेक्षित

जबरदस्त, अजून एका दुर्गाची सविस्तर ओळख आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 May 2018 - 12:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

बॉबे पॉईंटला गेलो की बरोबर आलेलयांवर सर करण्यासाठी एक पॉईंट मिळाला.
या गडाबद्दल कधितरी वाचले होते पण फारसे काही माहीत नव्हते.
फोटो बघताना रमुन गेलो होतो.
पैजारबुवा,

शाली's picture

20 May 2018 - 5:17 pm | शाली

छान फिरवून आणले गड आणि परिसरात.

यशोधरा's picture

21 May 2018 - 5:51 pm | यशोधरा

वा! वा! वा!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2018 - 3:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटो बघुन गारेगार वाटले (मनात मांडे खाल्ले ट्रेक चे) आणि तिकडच्या उन्हाचीपण कल्पना आली.

पुणे ते पुणे दोन दिवसात होईल का हा? म्हणजे शनिवारी सकाळी निघुन रविवारी परत?

पहाटे निघालात तर एका दिवसातही आरामात होतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 May 2018 - 6:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

कोणता रस्ता घ्यावा लागेल त्यासाठी? ताम्हिणीमार्गे की भोर वरंधा? आणि पायथ्याचे गाव कोणते म्हणे?

दुर्गविहारी's picture

24 May 2018 - 7:59 pm | दुर्गविहारी

धाग्यामधे पुर्ण माहिती दिली आहे ना. पुण्यावरुन जाणार असाल तर महाबळेश्वरमार्गे प्रतापगड रस्त्यावरचा आंबेनळी घाट उतरा. वाडा कुंभरोशी गावाच्या अलीकडे पार या गावी जाण्यासाठी डावीकडे रस्ता फुटतो. ठळक खुण म्हणजे या रस्त्यावर "वरदायीनी माता" असे लिहीलेली सिमेंटची कमान आहे . त्यातून चतुर्बेट्ला किंवा हातलोटला जाउन गड पाहून परत येउ शकता. वाटेत कोयना नदीवरचा शिवकालीन पुल पहायला विसरु नका. पहाटे निघण्या एवजी आदल्या रात्रीच चतुर्बेट किंवा हातलोटला गेलात तर कदाचित वाटेत प्राणी पहायला मिळू शकतात. शिवाय काजव्यांनी लगडलेल्या झाडाचा अनुभव घेता येईल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 May 2018 - 1:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

नजर चुकीने परत तेच तपशील विचारले. आणखी माहितीसाठी धन्यवाद

Suraj nevaskar's picture

4 Jun 2018 - 5:44 pm | Suraj nevaskar

खूप छान माहिती

निशाचर's picture

25 May 2018 - 6:13 am | निशाचर

भटकंती आवडली.
छान वर्णन आणि फोटो!

खिलजि's picture

25 May 2018 - 4:48 pm | खिलजि

सुंदर माहीती गडासोबत सह्याद्रिचीही . आणि हो हे जे खाली रामवरदायिनीच मंदिर आहे ना तेथे मी जाऊन आलो आहे . साताऱ्याला वेण्णा धरणाशेजारीच हिचं आजोळ आहे तेथे हवापालटासाठी जाणेयेणे असते . असाच मागे सहकुटुंब कोसुम्बी मार्गे थेट गेलो रामवरदायिनीच दर्शन घ्यायला . एक थरारक आणि जबरदस्त अनुभव होता . तेथील जंगल तर इतके घनदाट आहे कि विचारून सोय नाही . भर दुपारी महाबळेश्वर उतरल्यावर इतकी घनदाट झाडी रस्त्यावर उतरली आहे कि सूर्यकिरण खाली जमिनीवर खूप कष्टाने पोहोचतात . सुंदर मंदिर आहे . तिथून सरळ पुढे गेल्यावर मला वाटत आपण कोकणात पोलादपूर येथे बाहेर पडतो .
सुंदर लेख , अप्रतिम माहीती .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

पैसा's picture

26 May 2018 - 9:47 am | पैसा

फार सुंदर लिहिलय. फोटो नेहमीप्राणेच उत्तम.

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून धन्यवाद. हा धागा शिफारस विभागात दिल्याबध्दल साहित्य संपादकांचे आणि मालकांचेही धन्यवाद.