"वरपेडा घाट आणि चांदमोड नाळ"
वरंध घाट परीसरातल्या दोन अपरिचित घाटवाटा
खरंतर १ मे ची सुट्टी अशीच वाया जाऊ द्यायची नव्हती. ट्रेकींग ग्रूपवर हाक दिली आणि लगेचच नेहमीच्या मंडळीतले चार जण यायला तयार झाले. सगळे नेहमीचेच असल्याने वेगळं काही सांगायची गरजच नव्हती. काय करायचं तर घाटवाटाच. कारण आता 'ट्रेक म्हणजे घाटवाटा' हे आम्हा सर्वांचं समीकरणच होऊन गेलंय. ट्रेकला जायचं म्हणजे घाटवाटांशिवाय दुसरं काही सुचतच नाही.
आता घाटवाटा ठीक आहेत हो! पण कोणत्या करायच्या? पहिलं तर त्या आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमधे आणि बजेटमधे बसायला हव्यात आणि दुसरं म्हणजे त्या दाखवायला घेऊन जाणारा माणूसही मिळायला हवा. बरं त्यातून त्या जर नवीन कळलेल्या असतील तर मग काय 'सोनेपे सुहागाच'.
काही दिवसांपूर्वीच वरंध घाटाजवळच्या 'चिकणा आणि कुंभेनळी' अशा दोन घाटवाटा केल्या होत्या. आल्यावर आमच्या 'घाटी' मित्रांना केलेल्या ट्रेकबद्दल सांगितलं तर त्यांच्या म्हणण्यानूसार मी जो कुंभेनळी म्हणतोय तो वाघजाई आहे. डोंगरयात्रा पुस्तकातल्या उल्लेखानुसार वाघजाई घाट हा उंबर्डीतून तळीये गावात उतरतो पण आम्ही तर कुंभेनळी गावातून चढून उंबर्डीत आलो होतो. कोकणात असलेल्या कुंभेनळी आणि तळीये या दोन्ही गावात तसं अंतरही बरंच आहे. मग वाघजाई घाट नेमका कोणता? हे गणित काही केल्या सुटत नव्हतं. म्हणून यावेळी या वाघजाईचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आणि त्याच्या सोबत नवीनच समजलेली वारदरा ऊर्फ वाव्हळाची वाट करायची असं ठरवलं होतं पण नशीबात मात्र काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं.
ट्रेकचं ठरल्यापासून शिरगावच्या गोविंदला म्हणजे आमच्या वाटाड्याला सारखा संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण फोन काही केल्या लागत नव्हता. अगदी मेसेज पण टाकून ठेवला होता. त्याचाही काही रिप्लाय आला नाही. मग शेवटी ट्रेकच्या आदल्या रात्री एक वाजता त्याला घरी जाऊनच उठवलं आणि दुसर्या दिवशीच्या आमच्या प्लॅनबद्दल सांगितलं. नशीबानं तोही लगेचच तयार झाला. एवढं सगळं करुन मगच दुर्गादेवीच्या मंदीरात मुक्कामाला पोहोचलो.
सकाळी लवकर उठून आवरलं. वरंध घाटातल्या आणि उंबर्डी गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'पवार हॉटेल' जवळ गाडी पार्क केली त्यावेळी आजूबाजूची बहूतेक सगळी हॉटेलं हळूहळू उघडत होती. आता इथून कोणती तरी 'वाघजाई' नावाची वाट तळीयेत उतरणारी असायला हवी होती. इथले बहूतेक हॉटेलवाले उंबर्डीचे आहेत त्यामुळे त्यांच्याकडेच वाघजाईबद्दल चौकशी केली. पण त्यांच्या म्हणण्यानूसार उंबर्डीतून या नावाची कोणतीच वाट तळीयेत उतरत नाही किंवा जवळपास वाघजाईचं असं ठाणंही नव्हतं की तिच्या जवळून एखादी वाट तळीयेत उतरत असेल. म्हणजे उंबर्डी ते तळीये अशी कोणताही 'वाघजाई' नावाची घाटवाट नव्हती हे नक्की झालं होतं. तिथे दुसरीच एक घाटवाट होती, तिचं नाव 'वरपेडा' घाट'. आम्हाला तळीये गावात जायचं असल्यामुळे वाघजाई घाटाऐवजी मग याच वाटेने उतरून गेलो. या वाटेने आठदहा वर्षांपूर्वी मी उतरुन माझेरी गाठली होती. त्या वेळच्या आणि आजच्या वाटेत खुपच फरक पडला होता. आताची वाट पुर्णपणे मोडली होती. सुरवातीपासूनच प्रचंड घसारा होता.
नुकताच वणवा लागून गेल्यामुळे नुसते हात-पायच नाही तर सगळे कपडे सुद्धा काळेकुट्ट झाले.
मग जसं जमेल तसं, अगदी वेळप्रसंगी सपशेल खाली बसूनच उतरावं लागत होतं. घसारा असल्यामुळे वाट कमी अंतराची असुनही प्रचंड वेळ लागत होता.
कोकणात उतरल्यावर तळीयेच्या वाटेवर असताना डाव्या बाजूला सुकून गेलेला 'मोरजोत' धबधबा लागला. पावसाळ्यात तर हा धबधबा वरंध घाटातून फारच सुरेख दिसतो.
धबधब्याचा ओढा ओलांडताना अगदी ओढ्यातच 'मावळाई' देवीचं ठाणं लागलं. या वनदेवीला कळकाच्या परड्या वाहतात.
तसंच पुढं तळीये गावाकडे जाताना डाव्या बाजूला थोडं वर 'चांदमोड' सुळका दिसतो.
त्याला लागून असलेली 'चांदमोड नाळ' आहे. या नाळेतुनच एक वाट उंबर्डीच्या दांडवाडीची एक छोटीसी वस्ती असलेल्या कोपीदांडावरच्या घरांपाशी चढून जाते.
नाळेतच बसून नाश्ता उरकला.
थोडं वर चढून गेल्यावर दोन समांतर नाळा सुरु झाल्या. डाव्या बाजूच्या नाळेतूनच पुर्वी वाट होती. पुर्वी वाट वाहती असल्याने त्यात कातळटप्पे नसावेत असा अंदाज बांधला होता. तरीही दोन कातळटप्पे लागलेच. पहिला होता ५०-६० फुटांचा सोप्या श्रेणीचा.
तर एक ३० फुटांचा अवघड श्रेणीचा. आम्ही ट्रेकला सोबत शंभर फुटी सुरक्षा दोर नेहमीच बाळगतो त्यामुळे हे दोन्ही टप्पे अगदी सुरक्षितपणे पार केले.
वाट नाळेतुन डाव्या बाजूला वळून कोपीदांडावर जाते. ती सापडली नाही म्हणून सरळ नाळेतुनच चढून थेट घाटमाथ्यावर पोहोचलो. आम्ही जिथं सह्यमाथ्यावर होतो त्याच्या थोडं पश्चिमेकडे कुंभेनळीच्या वाडीतून वारदरा घाट चढून येतो.
इथून पुर्वेकडे पाहिल्यावर समोरच्या बा़जूला थोडी वर उंबर्डीची दांडवाडी होती. त्याच्या थोडं अलिकडं कोपीदांडावर दांडवाडीचे वाडे होते. सात-आठ वर्षांपूर्वी शेती करण्यासाठी तिथे लोक रहात होते. पण हल्ली कुणीच रहात नाही. उजव्या बाजूला सोंडेखाली कुंभेनळी, कुंभेनळीवाडी तर डाव्या बाजूला तळीये गाव आणि नेमका पाठीमागे तळीयेच्या जननीचा डोंगर.
घाटमाथ्यावरच्या दाट झाडीत थोडी विश्रांती घेतली. जागोजागी गव्याचे शेण पडलेले दिसत होते. आसपास कुठे पाणी नसल्यामुळं त्यांनी आपला मुक्काम नीरा-देवघर धरण क्षेत्राजवळ हलवला होता असं गोविंदने सांगितल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला होता. कालच दोन गवे धरणात गतप्राण झालेत अशीही माहिती त्याने वर सांगितली.
तासाभरात कोपीदांडावर पोहोचलो. तिथले पडके वाडे पाहून दक्षिण दरीकडे गेलो.
डाव्या बाजूला खाली कुंभेनळी, उजव्या बाजूला कुंभेनळीवाडी आणि त्याला लागून असलेला वारदरा घाट पाहून परत कोपीदांडावर पोहोचलो. इथून एक वाट थेट पवार हॉटेलवरुन उंबर्डीत जाते. पण आमच्या वाटाड्याला गोविंदला ही वाट माहिती नसल्याने धोपट मार्गाने दांडवाडीच्या वाटेला लागलो. हा थोडा वळसा पडणार होता खरा पण वाट चुकण्याची भीती नव्हती.
वाटेत भेकराने झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा दिसल्या.
उंबर्डीच्या दांडवाडीत पोहोचायला तीन वाजले. तिथे असलेल्या गोविंदच्या बहिणीच्या घरी डबे खाल्ले.
थोडा आराम केला आणि पवार हॉटेल गाठले.
थोडा वेळ हातात असल्यामुळे वरंध घाटाची पायवाट, खोदलेल्या पायर्या, मुळ वाघजाईचं मंदीर, नऊटाक्या पाहिल्या. आजुबाजुला शेवत्या घाट, मढेघाट, उपांड्या घाट, कावळ्या किल्ला, माझेरी, पारमाची, रामदास पठार वगैरे ठिकाणं पाहून गाडीपाशी आलो आणि पुण्याला परतलो.
या ट्रेकमधे नेहमीप्रमाणेच काही नवीन वाटा कळल्यात.
१) उंबर्डीच्या दांडवाडीची काही घरं कोपीदांडावर होती. त्या घरांपासुन एक वाट चांदमोड नाळेतुन तळीये गावात जाते. खरंतर याच वाटेनं आम्हाला दांडवाडीत यायचं होतं पण ही वाट आम्हाला काही सापडली नाही.
२) उंबर्डीतुन पवार हॉटेलच्या जवळुन एक वाट कोपीदांडावरुन तळीयेत जाणार्या वाटेला मिळते. ही वाटही एकदा जाऊन पाहून यायची आहे.
३) पवार हॉटेलपासून एक वाट थेट माझेरीत उतरते. हॉटेलवाल्या पवारांनी हात करुनही उंबर्डीच्या स्टॉपवर एसटी थांबली नाही तर या वाटेने एसटी पोहोचण्यापूर्वी चालत माझेरी गाठत.
पाहूया कधी करायला जमतायत या वाटा. आता या वाटा धुंडाळताना अजूनही काही नवीन वाटा सापडतीलच. नाही का?
फोटो सौजन्य :- सुजय पुजारी, महादेव पाटील, शोएब तांबोळी आणि निनाद बारटक्के
प्रतिक्रिया
4 May 2018 - 1:29 am | कपिलमुनी
तुमची भटकंती उत्तम !!
दुर्गम भागातले वाड्या आणि वस्त्या उठत चालल्या आहेत. त्यामुळे वाटा नष्ट होत चालल्या आहेत ,अजून काही वर्षांत वाटाडे मिळणे अवघड होणार आहे.
4 May 2018 - 8:12 pm | दिलीप वाटवे
हो अगदी खरंय तुमचं म्हणणं. ही धोक्याची घंटा आहे. आजच वाटाड्या मिळणं अवघड झालंय. सह्याद्रीत असणार्या अशा वस्तीत राहणार्या आताच्या पिढीला बर्याच वाटा माहिती नाहियेत. त्यामुळे सध्याच्या ट्रेकर्सनी त्या वाटा मार्कींग करुन ठेवायला हव्यात. google एक चांगले माध्यम आहे ज्याने route mark करुन ठेवता येऊ शकतात. निदान मी तरी शक्य तेवढं हे करुन ठेवलंय.
4 May 2018 - 8:57 am | कानडाऊ योगेशु
१ मे म्हणजे दुपारी प्रचंड ऊन असणार. त्याचा काही त्रास झाला नाही का?
4 May 2018 - 8:21 pm | दिलीप वाटवे
झाला थोडासा पण its ok. घाटमाथ्यावर थोडी हवा असते पण कोकणात ती नसल्याने फारच गरम होतं. ट्रेक प्लॅनिंग करताना थोडा उन्हाचा विचार करुन केला तर थोडं सुसह्य होतं. माझ्या मागच्या 'चिकणा आणि कुंभेनळी घाट' या लेखातला एक उतारा इथे देतो म्हणजे थोडी कल्पना येईल.
((थंडीच्या मोसमात घाटवाटांच्या ट्रेकची सुरूवात थंड वातावरणामुळे कुठूनही केली तरी चालु शकतं पण उन्हाळ्यात तरी ती कोकणातुन केली तर बरं पडतं. याचं कारण असं की, बहुतेक सर्व घाटवाटा पश्चिमवाहीनी आहेत. त्यामुळे अगदी झाडोरा नसलेल्या धारेवरूनही चढाई करायची असेल तरी सुद्धा सकाळच्या वेळेत चारएक तास तरी उन्हाचा त्रास होत नाही. पण आम्ही ठरवलेला हा ट्रेक या नियमाच्या नेमका विरूद्ध करणार होतो त्यामुळं त्यातल्यात्यात काही वेगळं करता येईल काय? यावर शिरगावच्या संतोष सणस यांच्याशी बोलण सुरू होतं. त्यांनी एक चांगला पर्याय दिला तो म्हणजे चिकणा सोबत कुंभेनळी करण्याचा. याचं कारण असं होतं की सकाळी उन्हं चढायच्या आत आम्ही धारेवरच्या चिकण्याने उतरून जाणार होतो आणि दुपारनंतर झाडीभरल्या कुंभनळीच्या नाळेने चढून येणार होतो. सर्वच दृष्टीने हा एक उत्तम पर्याय होता त्यामुळे सगळ्यांनीच तो उचलुन धरला आणि आमचं चिकणा आणि कुंभनळी या दोन घाटवाटा करण्याचं नक्की झालं.))
4 May 2018 - 11:05 am | जयंत कुलकर्णी
मस्त...
4 May 2018 - 8:22 pm | दिलीप वाटवे
धन्यवाद
4 May 2018 - 12:41 pm | शाली
कमाल आहे तुमची. भारी आहे भटकंती!
4 May 2018 - 8:23 pm | दिलीप वाटवे
धन्यवाद
4 May 2018 - 2:05 pm | सुमीत
छान लिहिले आहे, तुमच्या मुळे नवीन घाट वाटा कळल्या. पण खरे सांगतो, मला ह्या ट्रेक चा रूट नाही कळला.
बाकी वरंध चा गूढ पणा तुम्ही छान टिपत आहात. माझा सर्वात आवडता घाट आहे हा.
निरे देवधर चा रम्य निसर्ग अजुन अबाधीत आहे तो पर्ञंत पाहून घ्या, एकदा नविन लवासा बनवायला घेतले तर तिथला निसर्ग आणी माणूस दोन्हि प्रदु़षित होतील.
शेवाट्चा सर्वात सुंदर फोटो कुठून टीपला आहे?
4 May 2018 - 8:49 pm | दिलीप वाटवे
धन्यवाद.
माझा जास्तीजजास्त प्रयत्न हाच असतो की अशा अनवट वाटा लोकांना कळाव्यात. त्यामुळे त्याचा माफक वापर होईल आणि त्या वाटा पुढच्या पिढीला निदन कळतील तरी. नाहीतर कपीलमुनींनी म्हटल्याप्रमाणे अजुन काही दिवसांनी वाटाडे मिळणे अवघड होणार आहे.
तुम्ही ट्रेकरुट कळला नाही म्हणता ते बरोबरच आहे. वर्णन थोडं क्लिष्टच आहे. पण दांडवाडी, उंबर्डी, पवार हॉटेल, कोपीदांड वगैरेची लोकेशन्स माहिती असतील तर समजायला थोडे सोपे जाईल.
शेवटचा फोटो उंबर्डीच्या दांडवाडीतुन काढलाय. त्यात कावळ्या किल्ला, न्हाविण सुळका, तोरणा, मढेघाट, उपांड्या घाट, आंबेनळी घाट, नऊटाक्या वगैरे ठिकाणं दिसतायत.
5 May 2018 - 11:11 am | दुर्गविहारी
अफलातून आणि आचाट झालाय ट्रेक. जबरी. निदान अशा काही घाटवाटा आहेत हे सामोरे येतेयं. फोटोही उत्कृष्ट काढलेत. शेवटचा फोटो "कमाल" आहे. तुम्ही वर लिहील्याप्रमाणे
पण उजव्या बाजुला राजगड त्याच्या बालेकिल्ल्यामुळे स्पष्ट ओळखून येतो आहे.
बाकी काही सुचना द्याव्या अशा वाटतात. एकतर शक्य झाल्यास ट्रेकरुटचा नकाशा टाकता आला तर बघा. त्याने नेमका मार्ग कसा होता हे समजायला मदत होते आणि वाचताना अंदाज येतो. शक्य झाल्यास विकीमॅपियाच्या स्क्रिनशॉट्वर मार्क करौन धाग्यात टाकता येत आहे का पहा. हवे असल्यास या संदर्भात मी मदत करायला तयार आहे. नंतर जाणार्यांना या नकाशाचा खुप उपयोग होतो.
याशिवाय आपण आतापर्यंत केलेल्या घाटवाटांची माहिती एकत्रित स्वरुपात एखाद्या ब्लॉगवर उपलब्ध करुन देता येते का पहा.
वाटाड्याचा संपर्क नंबर असेल तर मला कृपया व्य.नि. करा. या माहितीचा डेटाबेस मी तयार करतो आहे. जमल्यास आपल्याकडे जितके संपर्क क्रमांक आहेत ते सगळे पाठविले तरी चालतील.
बाकी अजून अशाच नवनवीन घाटवाटांची माहिती देणार्या धाग्याच्या प्रतिक्षेत.
5 May 2018 - 6:42 pm | दिलीप वाटवे
धन्यवाद.
हो बरोबर राजगडही दिसतो इथून. या शिवाय शेवत्या घाट, गोप्या घाट, खुटा घाटाचं टोक, उंबर्डी, पाळदार घाटाची उंबर्डी गावावरील नाळ, न्हावंदीण घाटाची खिंड, वरंध घाटाची खिंड(पायवाट), वरची वाघजाई आणि रामदास पठारही दिसतंय. अजूनही बरंच सांगता येईल पण एवढं सगळं लेखात लिहलं तर ते वाचणार्याला खुपच कंटाळवाणं होतं म्हणून थोडंच लिहलंय.
नकाशाचं म्हणता ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं पुढच्यावेळी लक्षात ठेऊन टाकेन. तसं मी रुट मार्क केलेला आहे. त्याचा धागा इथे दिला तर त्याचा उपयोग होऊ शकतो का? तुर्तास त्याच्या स्क्रिनशॉटचा फोटो टाकतो.
5 May 2018 - 9:15 pm | प्रचेतस
कंटाळवाणं काही होणार नाही, जितकं लिहाल तितकं कमीच आहे ह्या विषयावर.
लिहीत राहा. डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे घाटवाटांचे.
6 May 2018 - 11:20 pm | माहितगार
छान मस्तच
7 May 2018 - 5:10 pm | यशोधरा
लेख आवडला.