यमनोत्री,गंगोत्री,केदारनाथ,बद्रिनाथ अशा चारधाम यात्रेतील घटना आहे ही.हरिद्वार,ॠषिकेश,यमनोत्री,गंगोत्री,केदारनाथपर्यंतची यात्रा छान पार पडली होती आणि बद्रिनाथ यात्रा सुरु झाली होती. आम्ही चाळीसजण पांच सुमोतुन यात्रा करत होतो.पण आज सुरवातीपासुनच वेळेचे नियोजन गडबडले होते.सकाळी सहा वाजता गुप्तकाशी सोडायची असे ठरले होते पण सगळी निघता निघता आठ वाजले.सारा प्रवास घाटांचा,जवळचा मार्ग म्हणून चंद्रवदनीदेवीच्या डोंगराजवळून ड्रायव्हरनी गाड्या काढल्या पण तो रस्ता छोटा आणि अवर्णनीय निसर्गसौंदर्य असलेला होता.वाटेतल्या धबधब्यांवर मजा करत,दाट जंगलात आडू{ओले जरदाळू} पाडत खात जाताना वेळेचे भान राहिले नाही आणि जोशीमठचे दोन वाजताचे गेट हुकले,जोशीमठला गाड्या अडल्या आणि एक ते दीड तास थांबावे लागले.मग तेवढ्या वेळात आम्ही श्रीमद् आदि शंकराचार्य मठात जाऊन दर्शन घेतले.
चार वाजता गाड्या निघाल्या.रस्त्याचे काम चालू होते घाट चढायचा होता,गोविंद घाटी पार करुन रात्री साडेसातला बद्रिनाथला महाराष्ट्रमंडळात मुक्कामाला गेलो.हातपाय धुवुन बद्रिनाथांचे मुखदर्शन घेऊन उद्याच्या पुजेचे तिकिट घेतले आणि धर्मशाळेत जाऊन झोपलो.
पहाटे अलकनंदानदीमैया जवळील गरमपाण्याच्या कुंडात स्नान करुन पुजासाहित्य घेऊन रांगेत उभे राहिलो.सुर्योदय होताना समोरील नरनारायण पर्वत सुवर्णासारखे झळाळू लागतात ते दृश्य पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते.प्रत्यक्ष सभामंडपात बसून बद्रिनाथभगवानांचे दर्शन म्हणजे मोठा आनंद सोहळा असतो.एक तास भगवंतासमोर बसून विष्णुसहस्त्रनाम,गीतेचा पंधरावा अध्याय यांचे पठणश्रवण करताना आपण मानवाच्या या आद्यधर्माचे पाइक आहोत याचा सार्थ अभिमान वाटतो.सर्व कार्यक्रम आटोपुन आठ वाजताचे गेट गाठण्यासाठी गाड्या रांगेत लावल्या.
आता सर्व प्रवास उताराचा होता,आमची गाडी सर्वात पुढे होती.आणि मागच्या गाड्या लाइट देऊ लागल्या,काय झाले म्हणून आमच्या ड्रायव्हरने गाडी डावीकडे घेऊन मातीचा ढिगारा पाहून त्याला टेकवून थांबवली.मागच्या गाड्याही थांबल्या आणि आमचे टूर मॅनेजर गिरीश खाली उतरून आमच्या ड्रायव्हरला म्हणाले,खाली उतरुन बघ काय झाले आहे ते.सारेजण खाली उतरलो,बाप रे!! परमेश्वराची कृपा म्हणूनच आम्ही वाचलो.आमच्या गाडीच्या डावीकडचा मागच्या चाकाचा रॉड चाकासह बाहेर आला होता,काहीक्षणांचा अवकाश होता की चाक निखळले असते आणि गाडी पलटून अतिशय खोल दरीत कोसळली असती.
सगळ्या ड्रायव्हरनी मिळून खटपट करुन तो रॉड आणि चाक बसवले.गिरीश म्हणाले तुम्ही दुसर्या गाडीत बसा,पण आपला जीव वाचविण्यासाठी बाकिच्यांचा जीव पणाला लावणे आम्हाला मंजुर नव्हते,आम्ही नाही म्हणालो व त्याच गाडीत बसलो.पुढचा प्रवास रानीखेतमार्गे नैनिताल असा होता.कर्णप्रयाग येईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते.नैनितालच्या हॉटेलला फोन करुन रात्री अकरावाजेपर्यंत येतो असे कळवले.आमची मुलगी जावई आणि नाती तिथे पोहोचल्या होत्या.
आता पुन्हा घाट चढायचा होता,संध्याकाळचे सात वाजले होते,काळोख पडायला लागला होता आणि पुन्हा तीच घटना घडली,चाकासह रॉड बाहेर आला पण आम्ही सावध असल्याने लगेच लक्षात आले.जंगलचा रस्ता,काळोख त्यात आजुबाजुला गाव किंवा वस्ती दिसत नव्हती.आमचा ड्रायव्हर गजानन म्हणाला मी इथेच थांबतो सकाळी गाडी ठीक करुन घेईन तुम्ही सारे चार गाड्यांमधे बसुन जा.मग तसेच केले आमचे आठ लोकांचे सामान चारी गाड्यांवर बांधून आम्ही विभागुन त्या गाड्यांमध्ये कसेतरी सामावून बसलो.आणि पुढचा प्रवास सुरु केला.
पहाडी प्रदेशात रात्री आठ नंतर वाहतूक बंद करतात.एका गावात पोलीसनी गाड्या अडवल्या.कसेतरी बाबापुता करत,आम्ही आमच्या जबाबदारीवर प्रवास करू असे लिहून दिले आणि प्रवास सुरु केला.घनदाट जंगल किर्र काळोख... आमच्या चार गाड्यांशिवाय कोणी नाही.अशावेळी जे व्हायचे तेच झाले.सर्वात पुढचा ड्रायव्हर रस्ता चुकला.रात्रीचे बारा वाजुन गेले तरी रानीखेत येईना मग एका गावातील लोकांना उठवून विचारले तर कळले आम्ही पुन्हा बद्रिनाथकडे जात होतो,पुन्हा गाड्या वळवल्या.
रात्रीचे दोन वाजले.जीव मुठीत घेऊन प्रवास सुरु होता.आता दुसरेच संकट समोर उभे ठाकले.जंगलात वणवा पेटला होता.अगदी रस्त्यालगतची झाडेझुडुपेही पेटली होती.एका बाजुला जळता डोंगर आणि दुसर्या बाजुला जळती दरी.आणि मधुन आमच्या गाड्या.किलोमिटरच्या किलोमिटर वणवा पेटला होता,जणू सारा हिमालयच जळत होता.ड्रायव्हर थकले होते आणि आम्हीही.शेवटी एके ठिकाणी सरकारी डाकबंगल्या सारखा बंगला दिसला,समोर मोकळे मैदान होते,गाड्या थांबवल्या.गाड्यांवरची ताडपत्री मैदानात अंथरली आणि त्यावर सारे पुरुष आणि गाड्यांमधे आम्ही स्त्रिया,असे विश्रांति घेत पडलो.दोन तास विश्रांति घेतली.झुंजुमुंजू झाले आणि समजले आम्ही रानीखेत मध्ये होतो.
देवदारच्या व्रुक्षराजीमधुन डोंगराच्या मागुन हळूहळू वर येणारा सुर्यनारायण पाहुन मधुमती सिनेमातील मुकेशचे प्रसिद्ध गाणे,
"सुहाना सफर और ये मौसम हसीं।हमे डर है हम खो न जाए कही॥ हे आठवले आणि मग सारेच एक सुरात म्हणायला लागले.
सुर्याच्या पहिल्या किरणांबरोबरच कालरात्रीचा भयानक प्रवास विसरला गेला आणि हिमालयाची सुंदर आणि उत्तुंग देणगी आपल्या देशाला देणार्या परमेश्वरापुढे आम्ही नतमस्तक झालो.
काळ रात्र होता होता उषःकाल झाला!
प्रतिक्रिया
2 May 2018 - 7:04 pm | अभिदेश
मध्ये पाठवला होता का हा लेख ? असाच काहीसा लेख वाचला होता.
3 May 2018 - 4:24 pm | खुशि
नमस्कार,भटकंती मासिकात वाचला असेल आपण त्यात छापुनआला होता.
2 May 2018 - 11:17 pm | एस
बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख वाचला. अविस्मरणीय अनुभवच म्हणायचा.
3 May 2018 - 9:45 am | डॉ सुहास म्हात्रे
अविस्मरणिय अनुभव ! अनुभवताना तंतरलेली असते पण नंतर आयुष्यभर एक गमतिशीर अनुभव म्हणून आठवणीचीशिदोरी बनते !
छान लिहिले आहे ! अजून असेच काही अनुभव वाचायला आवडतील.
3 May 2018 - 10:38 am | दुर्गविहारी
थरारक अनुभव. असा अनुभव ते सुध्दा हिमालयातील धोकादायल वळणावर म्हणजे किती भयानक असु शकतो याची कल्पना करु शकतो. इश्वर पाठीशी असल्याने तुम्ही यातून सहिसलामत राहिलात.
हाच प्रकार आमच्या बाबतीत झाला होता. त्याचा किस्सा या धाग्यत लिहीला आहे
अनवट किल्ले ९ : जंगलाने गिळलेला, मुडागड ( Mudagad)
बाकी तुमच्या तुलनेत आम्ही खुपच सुरक्षित होते, त्यामुळे तुमच्या अनुभवापुढे हा काहीच नाही.
3 May 2018 - 11:28 am | सस्नेह
भयंकर प्रसंग !
बाकी अनोळखी ठिकाणी प्रवास करताना काळजी घ्यावी. वाहने सुस्थितीत आहेत, याची खात्री करून घ्यावी, रस्त्यांची माहिती असलेल्यांना सोबत घ्यावे आणि महत्वाचे म्हणजे उशीर झाला म्हणून रिस्क घेऊ नये.
शुभास्ते पंथान: सन्तु !