३) हौझिंग सोसाइटी अकाउंट्स

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
11 Mar 2018 - 8:39 pm

*** *** *** *** ***
कंजूस
 यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
(३) अकाउंट्स (सोसायटी )

मागील (२) अकाउंट्स कसे लिहावेत ( अकाउंट बुक्स आणि एन्ट्रीज ) भागात आपण कॅश बुक, लेजर बुक आणि त्यातले अकाउंट याबद्दल माहिती करून घेतली. यासाठी जे छोटेसे उदाहरण घेतले होते ते अकाउंटींगची पूर्ण ओळख देण्यास पुरेसे नव्हते. आलेले पैसे -केलेला खर्च-उरलेली शिल्लक याचा ताळा केल्यावर काम संपले होते. आता आपण एका व्यवहारात येणारे तसेच बहुतेक लोकांना त्याच्याशी संबंध येतोच अशा एका उदाहरणाचा हिशेब पाहणार आहोत.
हौझिंग सोसायटीचे अकाउंट्स
हौझिंग सोसायटी ( सहकारी गृहनिर्माण संस्था ) मध्ये फ्लॅटधारक असल्याने कधीनाकधी कमेटी मेंबर होण्याची वेळ येतेच. त्यातही खजिनदार ( ट्रेजरर ) पद संभाळण्याची वेळ येते. अशावेळी अगोदरचा पदाधिकारी कार्यभार सोपवताना काही सल्लेही देतो. सोसायटीचे अकाउंट्स लिहिण्याचे काम हे बहुतेकदा एखादा व्यावसायिकच करत असतो त्यामुळे अगोदरच्या उदाहरणात जितके बारीकसारीक तपशिल,नोंदी ( बुक एन्ट्रीज ) दिल्या आहेत एवढ्या करण्याची वेळ खजिनदारावर येत नाही. ज्या सोसायटींत २४- ४० सभासद असतात तिथे काम आवाक्यातले असते. परंतू आताच्या संकुल पद्धतीत शंभरच्यावर सभासद असल्यावर हे काम करायला चारपाच कर्मचारीच पगारी ठेवले जातात. खजिनदार हा फक्त सहीचा धनी आणि पासबुक चेकबुकचा केअरटेकरमात्र उरतो. मागच्या लेखाच्या प्रतिसादांत आपण वाचलेच की हे काम वह्या-चोपड्यांत न करता कंम्प्युटरातले 'टॅली'सारखे सॅाफ्टवेअर वापरून सुगम आणि चटकन होते. ज्यांना ते साध्य आहे ते याप्रकारे करतीलच. या लेखात आपण प्रत्यक्ष सोसायटी अकाउंट्स कसे लिहायचे यावर भर न देता सोसायटी अकाउंट्स समजून घेणार आहोत. हे जेवढे योग्य प्रकारे करू तेवढे लवकर फाइनल अकाउंट तयार होते.

खरी लढाई पुढे येते ती म्हणजे अकाउंट्सचे ऑडिटरकडून ऑडिट होऊन आल्यावर 'वार्षिक सर्वसाधारण सभा' ( annual general body meeting) असते तेव्हा तो अहवाल ( ऑडिटर रिपॅार्ट ) सभेत वाचून त्यावर चर्चा होते, जे दोष दाखवलेले असतात त्याला पदाधिकाय्रांनाच स्पष्टीकरण द्यावे लागते. काही माहितगार सदस्य प्रश्नही विचारतात. अशावेळी यात काय लिहिले आहे हे कळले तर किती बरे होईल असे वाटू लागते.

कोणत्याही कंपनी,व्यवसाय,संस्थेसाठी मार्च महिना हा अकाउंट्ससाठी महत्त्वाचा असतो. या महिन्यात आर्थिक वर्ष संपते. काही फी, टॅक्स भरायचे राहिले तर ते बॅलन्सशीटमध्ये दाखवले जातात. काही पैशांची गुंतवणूक केली हे दाखवावे लागते. कोणाचे थकित मेंटेनन्स असतील तर ते त्या सभासदांच्याकडून २५मार्चपर्यंत चेकने घ्यावे लागतात. नोटिसा द्याव्या लागतात. मार्चचा जो शेवटचा बँक उघडी असण्याचा दिवस असेल त्यादिवशी हाताशी असणारी अधिकची कॅश बँक अकाउंटला भरायची असते.

मार्चमधली कामे -

१ ) शिक्षण कर
मागच्या वर्षीची बॅलन्सशीट काढून त्यात डावीकडच्या रकान्यात Liabilities खाली education tax -- "**" नोंद दिसली तर ३१ मार्च २०१७ पर्यंतची थकबाकी आहे असे समजावे. यामध्ये यावर्षीची रक्कम मिळवून ती भरावी लागेल. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे कार्यालय अथवा सोसायटीचे बँक खाते ज्या सहकारी बँकेत आहे तिथे ही रक्कम भरून पावती मिळते. ( स्थानिक नगरपालिकेला जो प्रापर्टी टॅक्स भरतो त्यामध्येही शिक्षण आणि वृक्ष कर असतो परंतू तो वेगळा आणि हा वेगळा आहे.)

आर्थिक वर्ष २०१३-१४ पासून शिक्षणफंडाची वर्गणी रु१० प्रति महिना, प्रति वर्ष/ प्रति सभासद आहे.
कल्याण तालुका ओफिस - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ,फडके वाडा, मुकुंद हरदास चौक, दूधनाका कल्याण पश्चिम.
फोन - 02512202333

२) सहकारी हौजिंग फेडरेशनची वार्षिक फी/ सबस्क्रिप्शन
बॅलन्सशीटच्या लाइबिलटिज बाजुला ही रक्कम दिसत असल्यास यामध्ये यावर्षीची फी मिळवून भरावी लागेल. साधारणपणे तीनचारशे रुपये असेल. सोसायटीजना कायदेशिर सल्ला मिळण्यासाठी ही व्यवस्था असते. या फेडरेशनचे सभासद असणे प्रत्येक सोसाइटीस बंधनकारक आहे.

३) सिंकिंग फंड गुंतवणूक.

लाइबिलटिज बाजुला ही रक्कम दाखवलेली असते आणि तेवढ्याच रकमेची इन्वेस्टमेंट केलेली अॅसेट साइडला दाखवलेली अपेक्षित आहे.
इथे थोडक्यात सिंकिंग फंड म्हणजे काय ते पाहू. हा एक स्टट्युटरी ( कायद्याने बंधनकारक) फंड असतो. त्याचे कॅलक्युलेशन असे - समजा तुमच्या सोसाइटीची "लँड आणि बिल्डिंगची" अॅसेट वॅल्यु दहा लाख रु आहे. जमिनीची किंमत कमी होत नाही परंतू इमारत मात्र काळाने कमकुवत होत जाते. दहा वीस वर्षांनी त्याची मोठी दुरुस्ती करायची झाल्यास काही निधि उपलब्ध असावा म्हणून दरवर्षी काही रक्कम बाजूला काढून गुंतवावी लागते. साधारणपणे अर्धा टक्का किंवा अधिक रकमेचा फंड केला जातो. म्हणजे दहा लाखाच्या अर्धा टक्का पाच हजार रु. हे पाच हजार रु सर्व सभासदांत वाटले जातात. ते मासिक बिलात दाखवले जातात. पहिल्या वर्षी पाच हजार रुपयांची बँक ठेव ठेवावी लागेल. मुदत ठेव पुन्हा आलेल्या व्याजासह गुंतवणूक करावी लागते. दुसय्रा वर्षी आणखी पाच हजार रुपयांची ठेव ठेवावी लागेल. या ठेवी सरकारने ठरवलेल्या ठराविक सहकारी बँकेतच ठेवाव्या लागतात. त्याच्या रिसीटवर "सिंकिंग फंड" असे बँकच छापून देते. याचे पैसे रेजिस्ट्रार ओफ सोसायटीजच्या अनुमतीशिवाय वापरता येत नाहीत.
सिंकिंग फंडाची रक्कम बॅलन्सशीटमध्ये लाइबिलटिज साइडला जेवढी दाखवली असेल तेवढ्या ( किंवा अधिकसुद्धा) रकमेची इन्वेस्टमेंट असली पाहिजे म्हणजे फंडाची रक्कम आहे असे म्हणता येते. ही नोंद लेजरमध्ये "इनवेस्टमेंट ओफ सिंकिंग फंड" या अकाउंटमध्ये होते.

४ ) स्पेशल फंड्स

कधी कधी रंगकामासाठी पैसे जमा करण्याचे मीटिंगमध्ये ठरते. उदा० यावर्षी एक लाख आणि पुढल्या वर्षी एक लाख असे दोन लाख रु जमवायचे आहेत. यावर्षी नव्वद हजार रु जमा झाले आहेत. तर हा पेंटिंग फंड एक लाख रु दाखवला जाईल आणि जमा झालेले नव्वद हजार रुपयांची शॅाटटर्म फिक्स डिपॅाझिट करायची. ही नोंद लेजरमध्ये "इनवेस्टमेंट ओफ पेंटिंग फंड" या अकाउंटमध्ये होते. जेव्हा कामास सिरुवात होते तेव्हा हे पैसे वापरता येतात.

थोडक्यात फंड याचा अर्थ " एवढे रुपये जमा करायचे आहेत" आणि अॅसेटसाइडला दाखवलेली रक्कम खरोखर बाजूला काढून ठेवली आहे.

५) रिझव फंड
समजा सोसाइटीच्या बँक अकाउंटमध्ये बरेच पैसे शिल्लक आहेत आणि पुढच्या एप्रिल महिन्यात पगार, पाणी- वीज बिल, नगरपालिका कराचा हप्ता भरायला लागणारे पैसे वगळूनही वीस हजार रु उरतील तर त्याच्या पंचवीस टक्के म्हणजे पाच हजार रु रिझव फंड म्हणून इनवेस्ट करावी लागेल. ही गुंतवणूक पुन्हा नंतर वापरू शकता आणि नेमून दिलेल्या सहकारी बँकेतच ठेवली पाहिजे असा नियम नाही. दुसय्रा बँकेतही ठेवता येते. फक्त तसा ठराव करून ते पत्र बँकेस द्यावे लागते.

६) थकबाकी नोटिसा देणे
सभासदांकडून मासिक शुल्क / मेंटेनन्स चार्जेस सर्वच्या सर्व रकमेचा भरणा मार्चपर्यंत होणे अपेक्षित असले तरी तसे होत नाही. थकबाकी राहतेच. अशावेळी सहा महिन्यांच्यापेक्षा अधिक काळ थकबाकी असणाय्रांना नोटीस द्यायच्या असतात. सप्टेंबर ३० पर्यंत जी रक्कम येणे आहे आणि त्यानंतर भरणा/पेमेंट झालेले नाही त्यांना १०१ची नोटीस देता येते. ( बाइलॅाजमध्येच शेवटी फॅामस आहेत त्यात हे पेज असते त्याची फोटोकॅापी काढायची) फॅाममध्ये सभासदाचे नाव, ब्लॅाक नंबर, कोणत्या तारखेपर्यंत कोणकोणत्या बिलाची रकमेची बेरीज करून येणे रक्कम लिहून कमेटी मेंबरच्या सह्या करून सभासदास नोटीस मिळाल्याची सही घ्यायची. कोणास नोटीस दिली याची नोंद कमिटी मीटिंग मिनिटस/ठरावात करायची. बिनखर्चात काम होते.

७) बिले देणे

सभासदांकडून घेतल्या जाणाय्रा मासिक शुल्क उर्फ मेंटनन्सचे बिल देणे आवश्यक असते. चाळीसपेक्षा कमी सभासद असल्यास या कामासाठी मनुष्य ठेवणे परवडेलच असे नाही आणि पदाधिकारी हे काम वेळच्यावेळी करू शकतीलच असे नाही. कामाचा बोजा वाढतो. बिलामध्ये १) नगरपालिका कर, २)सिंकिंग फंड, ३)पाणी,कॅामन लाइटिंग,साफसफाई, लिफ्ट देखभाल इत्यादीचे एकत्रीत शुल्क, ४) वैयक्तिक पार्कींग चार्ज, ५) नो ओक्युपेशन चार्ज यांची वर्गवारी करून बेरीज अपेक्षित असते. बिल दर महिन्याऐवजी तीन महिन्याचा पर्याय निवडल्यास काम कमी होऊ शकते. सभासदांनी आपापले चेक्स स्वत:च थेट सोसाइटीच्या अकाउंटमध्ये भरल्यास आणखीनच सोपे जाऊ शकते. फक्त चलनाची कॅापी आणून द्यायची. बिलस दिल्याने काम सोपे होते आणि पुढे थकबाकीची नोटीस द्यावी लागल्यास आवश्यकता भासते.

सभासदांनी वेळोवेळी लक्ष घातल्यास वेळ व पैशाचे येग्य नियोजन होते. संभाव्य अपहार टाळला जातो. माहितगार व्यक्ती वाढल्याने कामात सुसुत्रता येते.

वर्गणी / मासिक शुल्क ( subscription / society charges /society maintenance )
याचे जरा सूक्ष्म अवलोकन करुया. सोसाइटी आस्थापना या Non - Profit - Organization असतात. त्यामध्ये सभासद असतात. सभासदांकडून घेतलेल्या वर्गणीतून ( subscription) व्यवहार चालतो. मुख्य उद्देश नफा करणे हा नसतो. एक कोणतातरी मूळ आणि मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी सभासद एकत्र येतात. उदाहरणार्थ घरे देणे , सुखसोयी - वीज, पाणी उपलब्ध करून देणे. वापरलेल्या गोष्टींचा खर्च सभासदांत वाटला जातो. नगरपालिकेचा प्रापर्टी टॅक्स सर्वांचा मिळून सोसाइटी देते. घेतलेल्या वर्गणीपेक्षाही खर्च कमी झाल्यास त्यास "नफा" न म्हणता ती रक्कम सभासदांच्याच सोयीसुविधांसाठी पुढल्या आर्थिक वर्षासाठी बाजूला काढली जाते. यास रिजर्व फंड किंवा "excess of income over expenditure" म्हणतात. एखाद्या वर्षी खर्च अधिक झाल्यास पुढच्या वर्षीच्या वार्षिक सभेत बजेटचा( अंदाजपत्रक) मुद्दा घेताना सभासदांची वर्गणी सर्वानुमते वाढवली जाते.

हौजिंग सोसाइटी सभासदांकडून प्रत्येकी किती रुपये येणे आहे याचे बिल सोसाइटीतर्फे
प्रत्येक सभासदास दिले जाते. या बिलामध्ये बय्राच गोष्टी अंतर्भूत असतात. त्या कोणकोणत्या असाव्यात हे बाइलॅाज पुस्तकात नमुद केलेले असते. आता असे बिल प्रत्येक सभासदास दर महिना द्यायचे झाल्यास १६-२४ सभासदांपर्यंत काम कमिटीचे लोक स्वत: करू शकतात. परंतू १९९५ नंतर ६०-१००-१५० सभासद असलेल्या हौ० सोसाइट्या होऊ लागल्या आणि कामाचा व्याप संभाळणे अवघड होऊ लागले. त्यासाठी पगारी माणसे /अकाउंटंटस बाहेरून ठेवण्याची प्रथा सुरू झाली. वह्या चोपड्यांतून हाती लिहिण्याचे काम जाऊन कंप्यूटरांची मदत घेतली जाऊ लागली. परंतू काम कमी न होता वाढतच गेले. सतत बॅकप घेणे आणि कागदांच्या भेंडोळ्या वाढू लागल्या. फाइनल अकाउंट तयार करून ऑडिट रिपोर्टही रेजिस्ट्रारकडे ऑनलाइन पाठवण्याचे प्रमाण वाढले.

बिलामधल्या शुल्काची वर्गवारी

बिल नमुना
सोसाइटी नाव :_______________________
सभासद नाव : _____________________
फ्लॅट नंबर : _______________________
बिल __________पासून ___________पर्यंत
________________________________

१) म्युनिसिपल टॅक्स
(contribution to municipal tax )
२) सिंकिंग फंड
( contribution to sinking fund)

३) स्पेशल फंड
( contribution to special fund)

४) पार्किंग चार्जेस/शुल्क

५) NOC ( non occupancy charges) शुल्क

६ ) water charges/ पाणी वापर शुल्क

७) Electricity charges / वीज वापर शुल्क

८) लिफ्ट शुल्क

९) वॅाचमन/ सफाइवाला सर्विस शुल्क

१०) लेट फी
===============
या बिलाची रक्कम = रु
==============
मागील थकबाकी /जमा +/-
==============

एकूण देय रक्कम = रु
________________________________________
हा नमुना झाला.

राहाण्याच्या जागेचे भाडे ( किंवा क्लबची फी) हे महिन्याच्या एक तारखेलाच लागू ( payable ) होते. वीज,पाणी इत्यादी सुविधा आपण वापर झाल्यावरच त्याचे शुल्क भरत असतो. परंतू सर्व मिळूनचे बिल एक तारखेस काढता येते. बिल कालावधी दर तीन महिन्यांनी करण्याचा ठराव ( रेझलुशन) सर्वसाधारण सभेत केल्यास कामाचा ताण फारच कमी होते. प्रत्येक सभासदाची चार बिले पावत्या होतात. म्हणजे एप्रिल-मे-जूनचे तीन महिन्यांचे बिल १ जूनला काढता येईल. याप्रमाणे जुलै- ओगस्ट-सेप्टेंबरचे १ सेप्टेंबरला; ओक्टोबर-नोव्हेंबर -डिसेंबरसाठी १ डिसेंबरला; जानेवारी - फेब्रुवारी - मार्चसाठी १ मार्चला बिल काढता येईल. ही सोय सभेमध्ये ठराव करूनच करावी.

क्रमांक १- म्युनिसिपल टॅक्स वजा करून मासिक शुल्काच्या दहा टक्के कमाल रक्कम कुणी फ्लॅट भाड्याने दिल्यास NOC म्हणून घेता येते.

२, हे प्रत्येकासाठी वेगळे लिहावे.
सिंकिंग फंड हा नियमाने बंधनकारक फंड करायचा असतो त्यामुळे सभासदांकडून घेतलेल्या वर्गणीचे विवरण बॅलन्सशीटमध्ये असणे आवश्यक असते. सर्व रक्कम दरवर्षी बँकेत इन्वेस्टमेंट केलेली दाखवावी लागते.

क्रमांक ३ : हा पेंटिंग /वगैरेसाठी केलेला फंड असेल आणि त्यासाठी दरमहिना वर्गणी गोळा करणार असेल तर.
क्रमांक ४ आणि ५ हे प्रत्येकासाठी असेलच असे नाही.

क्रमांक ६,७,८ आणि ९ या सर्वांसाठी मिळून एक सामयिक रक्कम निश्चित करता येते व ती लिहावी. हे खर्च प्रति सभासद/ प्रति फ्लॅट असेच घेतले जातात. मागच्या वर्षीचे वीज,पाणी बिलस अधिक सर्व पगार अधिक लिफ्टसाठीचा खर्च बेरीज करून त्यास सभासद संख्येने आणि बाराने भागून महिन्याचा सर्वसाधारण जेनरल मेंटेनन्स मिळतो.
१०) लेट फी/ थकित रकमेवर व्याज हे सभेमध्ये निश्चित झाले असेल तरच लिहावे. याबाबत खूप भांडणे होतात.

//थकीत रकमेवर व्याज किती आणि। कसे काढावे --
बाइलॅाज नियमाप्रमाणे थकबाकीवर २१% दराने व्याज आकारण्याची व्यवस्था आहे. ते घ्यावे का नाही वादाचा विषय असला तर तो बाजूला ठेवून ते कसे गणित करावे ते पाहू. समजा बॅलन्सशीटमध्ये थकित रकमेच्या अनेक्जरमध्ये एका सभासदाची थकबाकी ३१ मार्च २०१८ ची रक्कम रु दहा हजार पाचशे आहे. ३० सेंप्टेंबर २०१८ पर्यंत यामध्ये सहा महिन्यांचे चार्जेस वाढतील. या दरम्यान त्याने अडीच हजार रु भरले आहेत. याचा अर्थ आठ हजार रु ही किमान रक्कम सहा महिन्यांसाठी त्याच्याकडून थकवली गेली हे निश्चित. त्यावर सहा महिन्यांचे २१ टक्के दराने किंवा ठरलले व्याज आकारू शकता. एप्रिल ते सेप्टेंबर या काळातील चार्जेसवर लेट फी लावू शकता. व्याज लावताना प्रथम तोंडी कल्पना देऊन वाट पाहून मगच बिलात घेण्याने कटुपणा टाळता येतो.

लेजर नोंदी

एका मोठ्या लेजरमध्ये प्रत्येक पानावर एकेका सभासदाचे नाव , फ्लॅट नंबर लिहून डाविकडे डेबिट ( येणे रक्कम ) तारीख तर उजव्या अर्ध्या भागात दिलेली रक्कम आणि तारीख असते. जर्नल फोलिओ ( JF) कॅालम हा क्रॅास रेफ्रन्ससाठी असतो. बॅलन्स शीट मध्ये कुणाची थकबाकी ( उदाहरणार्थ ३१-०३-२०१८) दाखवली असेल तर ती रक्कम त्या सभासदाच्या लेजर अकाउंटला डेबिटला १-०४-२०१८ अशी येते. दर महिन्याच्या बिलाची रक्कम तारखेने डेबिटला लिहावी. दरम्यान त्याने दिलेल्या रकमेच्या (कॅश/चेक) नोंदी उजवीकडे तारखेने क्रेडिटसाइडला पडतात. कोणत्याही वेळी किती रुपये येणे आहे हे पाहण्यासाठी दोन्ही बाजुंच्या बेरजा करून फरक पाहवा लागतो. तरीही ही सर्वमान्य स्टँडर्ड पद्धतच आहे. थोड्याशा अभ्यासाने आणि सवयीने कोणीही शिकू शकतो. शिवाय एका माणसाकडून दुसय्राने काम करायला घेतल्यासही गडबड घोटाळा होत नाही.

(( सर्व मुद्दे देण्याचा प्रयत्न केला आहे. सूचना आणि दुरुस्त्यांचे स्वागत. ))

// थोडे मुद्दे लिहून सोसायटी अकाउंट्सची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. शंका/प्रश्न/दुरुस्ती/सूचनांचे स्वागत आहे.//

प्रतिक्रिया

अतिशय उपयुक्त माहिती सोप्या शब्दांत दिली आहे. धन्यवाद!

चौकटराजा's picture

14 Mar 2018 - 8:38 pm | चौकटराजा

सोसायटी व्यवास्थापना मध्ये एक तरी जागा वाणिज्य शाखेच्या पदवी धारका साठी राखीव असली पाहीजे नाहीतर मेकेनिकल वा आय टी वाले कशी वाट लावतात ते अनुभवीत आहे .

रामदास२९'s picture

21 Mar 2018 - 8:51 pm | रामदास२९

मान्य .. माझ्या सोसायटी मधील सेक्रेटरी ने .. पैश्याचा हिशोब ठेवला नाही आणि कागदपत्र गहाळ झाली(केली).. सोसायटीला देखभाल नाही.. पुननिर्माण कारायच्या वेळेला अडथळे येतात (आणतो).. बाकिचे सदस्य तोन्डावर एक आणि मागे दुसरे बोलतात .. तो राजकिय पक्षाचा मी आहे, बघून घेईन म्हणून धमकी देतो... लोकान्मधे एकी नाही .. काय करावे कळत नाही ..

रामदास२९, गैरव्यवहारास आळा घालण्याचा उपाय म्हणजे सभासदांनीच वेळोवेळी १)कागदपत्रांत लक्ष घालणे,प्रश्न विचारणे.
२) "कामे काढा कामे काढा आणि ती मलाच द्या अथवा अमुक कॅान्ट्रॅक्टरलाच द्या" यास विरोध करणे. हे बंद झाले की त्या व्यक्तिचा दाब कमी होतो.
३) कोणास काम दिले की ते कमिटीच्या मिनिट्समध्ये नोंद करायला भाग पाडणे.
४) एक डुप्लिकेट बुक ठेवून त्यातून कामाच्या वर्क orders काढायला भाग पाडणे. कोणाला काय काम दिले याची नोंद मिळत राहाते. पदाधिकारी बदलले किंवा चेअरमन/सेक्रट्रीने कामे दिली तरी बुकात संगतवार नोंद मिळत राहाते.
५) एकापेक्षा अधिक सभासदांनी लक्ष घातल्यास तो सभासद एकटा पडत नाही आणि चांगलाच वचक राहतो. अपहार वाढत जात नाही.

नितिन थत्ते's picture

23 Mar 2018 - 12:26 pm | नितिन थत्ते

>>३) कोणास काम दिले की ते कमिटीच्या मिनिट्समध्ये नोंद करायला भाग पाडणे.

काम देण्यापूर्वी ते कमिटी मीटिंगमध्ये मंजूर करून घ्यावे लागते ना?

छोटीमोठी मेंटेनन्सची कामे कमिटिलाच करायची असतात त्यास मंजूरीची गरज नसते. परंतू त्याची नोंद असावी.

कागदपत्रांत लक्ष घालणे,

प्रश्न विचारणे.

यालाच तर त्याचा विरोध आहे..

सोसायटी चा Bank acc. पहिले चालू होता, नन्तर त्यात पैसे न टाकल्याने(सभासदान्नी चेक न देता cash रक्कम त्या माणसाला दिली, आम्ही सोडून) बन्द पडला, सोसायटी कडे पैसे राहिले नाहीत. cash रक्कमेची जमा बान्केत केली नाही.

प्रश्न विचारल्यावर, मलाच सोसायटी कडून पैसे येणा आहे, अशी गुन्डगिरी आहे. त्यामुळे सोसायटी चा पुनर्निर्माण पण होत नाही.. अडवणूक करतो..
पुनर्निर्माण मीच करतो किन्वा माझ्या ओळखीचा बिल्डर करेल असा त्याच आग्रह आहे( ज्याला Bank acc. साम्भाळता नाही आला तो काय पुनर्निर्माण करणार ??????)

काही सद्स्य एवढे सगळे माहीत असूनही खोटी बाजू घेतात.. पुनर्निर्माण करताना त्यान्ना काही फायदे त्याने सान्गितले असावेत..

एकन्दरित सामान्य मध्यम वर्गीयान्ची उदासीनता, खोटी बाजू घेणे, खोटी स्तुती करणे, एकी नसणे, राजकिय धाक दाखविल्यास घाबरणे हे भ्रष्टाचाराच मूळ आहे

खरं आहे. विचारणारा एकटा पडला की यांचा फायदा होतो.
>>पुनर्निर्माण मीच करतो किन्वा माझ्या ओळखीचा बिल्डर करेल असा त्याच आग्रह आहे>>
अशा भूलथापांना काही बळी पडतात हेही बरोबर. शिवाय त्यांची दादागिरी.
सोसायटी फॅार्म करून देण्याची आश्वासने देऊन तीन वर्षे रखडवलेल्या दोन केसेस मार्गी लावल्या आहेत. चारपाचजण बोलले पाहिजेत मग पुढचे काम सोपे असते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Mar 2018 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

उपयोगी माहिती. पुभाप्र.

चौकटराजा's picture

27 Mar 2018 - 7:10 pm | चौकटराजा

लहान सोसायटीत खर्चाचे मुद्दे मर्यादित असतात. जसे वाचमन, लिft वगैरे नसतातच . पण ६६अ हा बाय लो असे म्हणतो की मी दिल्याप्रमाणे बील दिले गेले पाहिजे .सरसकट बील कायदेशीर नाही . सबब हे काम सोपे होण्यासाठी टॅली सारखे आज्ञावली वापरणे क्रमप्राप्त ठरते कारण त्यात आपोआप खर्चाची विभागणी विविध निकषावर विनासायास करता येते . मोठ्या सोसायटीला तरी अशी आज्ञावली श्रेयस्कर आहे की नाही ?

लिहितो नंतर सविस्तर. आताच मिपा चालू झाले .

सोसाइटी बिलासंबंधी नवीन माहिती लेखामध्ये वाढवली आहे.

चौकटराजा's picture

3 Apr 2018 - 7:06 pm | चौकटराजा

आमची कमिटी असे सांगत आहे की सोसायटीच्या खात्यात उत्तरोत्तर व्याज वाढत जात असल्याने चार पाच वर्षानी वर्गणी कमी होईल . पण माझ्या अनुभवानुसार कोणत्याही फंड गुंतवणूक म्हणून गुंतवला की त्यावरचे व्याजही त्यात जमा होता रहाते .सोसायटीला ते वापरता येत नाही व नेहमी चे खर्च भागवून बख्खळ व्याज मिळेल इतके पैसे सोसायटी कडे शिल्लक रहात नाहीत .

चौकटराजा's picture

3 Apr 2018 - 7:24 pm | चौकटराजा

पूर्वी अवाच्या सवा मासिक वर्गणी भाड्याने जागा दिलेल्या सभासदाकडून घेता असत .यात आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की सेवा शुल्काच्या जास्तीत जास्त १० टक्के नॉन ओक्युपनसी आकार असावा. त्यात जागेत सभासद सोडून माता पिता मुली जावई मुलगा सुन नातू नात इ, रहात असले तर तो ही घेता येत नाही . आपाळ्या बिलातील अनेक बाबी सेवा शुल्कात येत नाहीत . उदा पाणी बिल ,विजा बील ई. बाय ला मध्ये सेवा शुलकाचे घटकाची यादी दिली आहे . याचा अर्थ असा की सभासदास जागा भाड्याने न देता ३००० इतके बील येत असेल तर ३३०० ये नोन आक्युपनसी वाल्याचे बील येउ नये . यातील फरक या केसमध्ये ३०० पेक्षा खूप कमी असेल .कदाचित तो फरक ४० रुपये देखील असू शकतो.

कंजूस's picture

3 Apr 2018 - 9:21 pm | कंजूस

१) NOC रक्कम वाटेल ती घेता येत नाही. पण इथे न राहणाय्रा लोकांना घाबरवून काही फसवणूक केली गेली असेल.

२) फंड म्हणजे काय, तो किती असावा, तो कसा खर्च करावा याविषयी गैरसमज असतील.

३) सिंकिंग फंड व्याजासह पुनर्गुतवणूक करावा लागतो. तो फक्त मोठ्या दुरुस्तीकरता रेजिस्ट्रार च्या परवानगी ने वापरता येतो.
४) पुण्यात (माझ्या माहितीप्रमाणे २००० सालाच्या काळात) फ्लॅटच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम "वन-टाईम-मेंटेनन्स-फंड" म्हणून बिल्डरांनी घेतली होती. म्हणजे आताच्या चाळीस लाखाच्या फ्लॅट ला दहा लाख घेतले तर त्याच्या व्याजात मेंटेनन्स निघणे हा हिशोब आठ टक्के व्याजदर कायम राहिला तर शक्य वाटेल. पण २००० च्या काळातला तेरा टक्के दर आता कुठे आहे?
पण या सर्व प्रिमिअम गोष्टी करणे सामान्य सोसाइटींसाठी नसणार बहुतेक.