पावनखिंड लढा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in भटकंती
20 Mar 2018 - 12:45 pm

काही काळापुर्वी पावनखिंडीतला भेट देण्यासाठी गेलो असता तेथे झालेल्या लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
काही माहिती होती, काही नव्याने लक्षात आली. वाटले मिसळपावर बर्‍याच कालावधीनंतर धागा टाकावा. या लढ्यातील ऐतिहासिक बाजू, भौगोलिक परिस्थिती, तात्कालिक राजकारणातील डावपेच यावर अभ्यासू मिपाकरांच्या लेखनातून काही नवे समजून घ्यायला मिळेल…
काही विचारणा…
१. विशाळगडाला महाराजांनी आधी जिंकले होते का? १३ जुलै १६६० रोजी महाराजांच्या बाजूने कोण गडकरी होते? तिथे किती सैन्य असावे?
२. विशाळगडाला सध्या काय रंग रूप आहे? तिथे कोणाचे स्मारक उभे आहे?
३. बाजीप्रभूंचे लढाईत प्राणांतिक समर्पण जिथे सध्या दाखवले जाते तिथेच झाले असावे का?
४. त्या लढ्यात सिद्दी मसूदच्या बाजूने लढणारे किती कामी आले? घोड खिंडीत आणि विशाळगडाला पायथ्याशी मिळून?
५. सिद्दी जोहरला पुढचा काळ कसा गेला?
६. अनेक उत्साही गिरी-दुर्ग संघटनांचे कार्यकर्ते दर वर्षी सुमारे त्याच दिवशीचा मुहूर्त साधून पायी चालत जायचा प्रयत्न करतात. मिपाकरांच्या पैकी गेलेल्यांचे काय अनुभव आहेत?
या लढ्याची गाथा मिलिट्री कमांडरच्या नजरेतून पहायचा प्रयत्न केला आहे का? करायची इच्छा आहे असे वाटणारे कोणी आहेत का?

प्रतिक्रिया

माझ्यापरिने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो.
१ ) अफझलखानाचा पाडाव झाल्यानंतर शिवाजी राजे आणि नेताजी पालकर यांनी संयुक्तपणे आदिलशाही मुलुखात जे आक्रमण केले त्यात बलदंड अश्या पन्हाळगडाबरोबरच विशाळगडाचाही ताबा मिळवला. त्यामुळेच पन्हाळगडावरुन सुटका करताना विशाळगडावर जाण्याची योजना राजांना करता आली. इथेले गडकरी कोण ते आठवत नाही आणि सैन्यही फारसे नसावे. शिवरायांनी विशाळगडाच्या मजबूतीकरीता ५००० होन खर्च केल्याचा उल्लेख आहे.
२) विशाळगडाला सध्या जे काही महत्व उरलयं ते फक्त मलिक रेहानच्या दर्ग्यामुळे. वास्तविक ईतिहास समजून घेतला तर हा सगळाच मुर्खपणा आहे, पण बरेच लोक सध्या दारु, मटणाच्या पार्ट्या करण्यासाठीच विशाळगडावर जातात. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्‍या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना (?) होईल तोच सुदिन. मात्र सध्या बरेच दुर्गप्रेमी बाजी, फुलाजी देशपांडेंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातात हा बदल सुखावतोय.
३ ) सध्या जी जागा पावनखिंड म्हणून दाखवली जाते ते पावनखिंड नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे. एक तर मुख्य मार्गापासून एका बाजुला हि तथाकथित खिंड आहे. शत्रुला बाजुने जाउन महाराजांचा पाठलाग करणे शक्य आहे. शिवाय झाडाच्या मुळीवरून उतरून युध्द करीत बसण्याचे कारणच काय? मुळात हा ओढा म्हणजे कासारी नदीचे उगमस्थान आहे आणि कोणतीही माणसांसाठीची रुळवाट अशी नदीपात्रातून असणार नाही. त्यावर पावसामुळे या परिसराची भौगोलिक रचना बदलली असेही मानले जाते, पण पावसामुळे साडेतीनशे वर्षात असा कितीसा बदल होणार? खिंड हि अशा जागी पाहिजे कि तिथून जाण्यासाठी पर्यायी मार्ग असता कामा नये. सह्याद्रीमधे कावळ्या घाटावर असणारी कावल्या बावल्याची खिंड, किंवा करतलबखानाला मात दिलेली उंबरखिंड ह्या रचना हेच सांगतात. शिवाय बखरीप्रमाणे बाजींनी तोफेचा आवाज एकून प्राण सोडले. लक्षात घ्या, इथून विशाळगडाचे हवाई अंतर सात कि.मी. आहे. आषाढात कोसळणार्‍या पावसात ईतक्या लांब हा आवाज एकू येईल असे मला तरी वाटत नाही. माझ्यामते गजापुरच्या जंगलात कुठेतरी पावनखिंड असावी.
४ ) जवळपास २००० फौज घेउन सिध्दी मसुद निघाला असावा, पण बाजीप्रभुंनी केलेल्या प्रतिकारात त्याने हाय खाल्ली असावी. अर्थात केवळ साडेतीनशे मावळे घेउन लढणार्‍या बाजींच्या सैन्यातील फार थोडेजण जिवंत असावेत. कदाचित सिद्दी मसुद विशाळगडाकडे गेला असेलही, पण तो पर्यंत महाराज गडावर पोहचले होते आणि जसवंतराव पालवणीकर व सुर्यराव सुर्वे यांचा पराभव झालेला होता.
५ ) सिध्दी जोहरने महाराज पन्हाळ्यावरुन सुटल्यानंतरही वेढा कायम ठेवला, मात्र या प्रकारात आदिलशहाला फंदफितुरीचा संशय आला. त्याने सिद्दीला परत बोलावून विष देउन मारुन टाकले. कर्नुलच्या या पराक्रमी हबश्याचा असा अंत झाला. हाच प्रकार आदिलशहाने परांडा किल्ल्याच्या वेढ्यातून औरंगजेबाला सोडल्यानंतर अफझलखानाच्या सांगण्यावरुन खानजमान या सरदाराला विजापुरच्या वेशीत प्रवेश करतानाच तलवारीने मारण्यात आले.
६ ) आणखी किती मिपाकरांनी हि पदयात्रा केली आहे याची कल्पना नाही, पण मी गेलो होते, त्याचे अनुभव माझ्या धाग्यात लिहीले आहेत.त्याची लिंक देतो.
पन्हाळगड ते विशाळगड, एक स्मरणयात्रा

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:35 am | शशिकांत ओक

मित्रा, आपल्या स्मरणयात्रेतील नकाशातून अनेकांना पटकन या मार्गातील जागांचे आकलन व्हायला मदत होईल म्हणून ते इथे न परवानगी घेता डकवत आहे...धन्यवाद...
1
तू दाखवतोस ती पावनखिंडीची जागा व तिचे फोटो यावरून तिथल्या प्राकृतिक भागाची संकल्पना येऊन तीच जागा हातघाईच्या लढ्याला योग्य का याचा विचार होऊ शकेल

मिलिटरी कमांडर म्हणून असा विचार करता येईल की ...
त्या काळात वापरातील रस्ता जो मसाई पठारावरून जात होता, त्या वाटेने न जाता दुसऱ्या बाजूने गेले तर पकडले जायचा चान्स कमी होऊन लढाईत वेळ व सैनिक न गमावता विशाळगडावर सुखरूप पोहोचता यावे.
सिद्दीचे ​सैन्याला महाराजांच्या निसटून गेलेल्याची जाणीव झाली नसावी. शिवा काशीद पकडला गेल्यानंतर सध्याच्या माहिती अनुसार (किती ते नंतर पाहू) सैन्याची जमवाजमव करून तातडीने विशाळगडाच्या दिशेने ते निघाले. त्यात किती वेळ लागला? ते किती होते? यावर (टाईम मोशन स्टडी) विचार नंतर करता येईल. आत्ता महाराजांच्या जाण्यासाठी वापरला गेलेला मार्ग कुठला असावा हे पाहू.
वरील दुर्गविहारींचा नकाशा दुर्गप्रेमी पायी जाताना वापरताना दिसतात.
शक्यतो पावसाच्या वाहत्या प्रवाहाला पकडून ८०० मीटरउंची वरच्या जंगलातून कुठवर जाता येईल असा निकष ठरवून नकाशा मिलिटरी कमांडरच्या वतीने तयार केला आहे. या मार्गावरून मी प्रत्यक्ष गेलेलो नाही. म्हणून यात भरपूर त्रुटी असण्या शक्यता नाकारता येत नाही.
पन्हाळ्याची उंची 954मीटर... विशाळगड 760 मीटर...

मेट्याची जागा

3

नकाशा १ - विविध मेटांच्यास्थापैकी एका मेटाची साधारण जागा दर्शवतो. गड डाव्या उजव्या बाजूंनी दिसावा, मलकापूर कडे जाणारा रस्ता नीट दिसावा, शिवाय पुसाटी बुरुजाच्या बाजूने आक्रमक हालचाली झाल्या तर त्याची बातमी वरिष्ठांना पोहोचविण्यासाठी ते स्थान मोक्याचे वाटते.

नकाशा २-
1
शिवा काशीद या मार्गाने पाठवला गेल्याची शक्यता वाटते.

नकाशा 3 -
2
यातील काही ठिकाणी गूगलवर निळ्या ठिपके वाल्या रेषांनी पायी तिथून जाता येते असे ते दाखवले गेले आहे. पण जर ८००मीटरची उंचीची कंटूरलाईन धरली तर काळ्या रंगाच्या रेषेने दर्शवलेल्या वाटेने निळ्या रेषा सोडून देखील पांढरे पाणी या ठिकाणी पोहोचता येते. यात रात्रीच्या अंधारात पावसाने धार धरल्याने सर्व अंगावरील कपडे गिच्च झाल्यानंतर, तलवारी, भाले यासह जंगलातील झाडी, वेली व पाण्यातील कीटकांचे चावे सहन करत शीत वार्‍यातून सर्व (सध्या मान्य माहिती अनुसार) ६०० सैनिक पुढे व मागे राहून जात असताना महाराज कधी पालखीतून तर काही अवघड ठिकाणी पालखीचा तोल जाऊन पडायची भिती असेल तेंव्हा उतरून चालत असतील. भोयांच्या चालीचा वेग न पकडला गेला किंवा दमायला झाले तर सर्वांना थांबायला लागू नये म्हणून ही खबरदारी घेतली गेली असावी. असो.
नंंतरच्या भागात वेळ आणि अंतर याचा अंदाज...

माझ्या ’ऐसी’वरील पाच वर्षांपूर्वीच्या प्रतिसादामध्ये मी दुर्गविहारी ह्यांना जाणवलेले पावनखिंडीबाबतचे आक्षेप असेच नोंदविलेले होते.

एक जागा 'पावनखिंड' म्हणून दाखवितात. मला वाटते दांडेकर-पुरंदरे ह्यांपैकी कोणीतरी तसे ठरविले आहे आणि त्यामुळे सश्रद्धांचा त्यावर विश्वास असून त्या जागेस आज तीर्थस्थानाचे महत्त्व आले आहे. मी स्वत: ती जागा जाऊन पाहिली. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही वा युद्धशास्त्राचा जाणकार नाही. तरीहि सामान्यज्ञानातून दोन गोष्टी लगेच जाणवल्या. ती जागा एका घळीत २०-२५ फूट खाली घळीच्या तळाशी आहे. येथे वरून सातवे चित्र पहा. चित्रातील लोखंडी शिडया घळीत उतरण्यासाठी केल्या आहे. मी तसाच आत उतरलो. अशा घळीत बाजी प्रभु उतरला असेल तर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा नाश करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर वरून धोंडे टाकणे हा अतिशय सोपा उपाय शत्रूला मिळाला असता. हातघाईची लढाई होण्यापूर्वीच आपल्या सैनिकांसह डोक्यात धोंडा पडून बाजी प्रभु मरून गेला असता. ही तथाकथित 'पावनखिंड' विशाळगडापासून ४ ते ५ किमी अंतरावर आहे. इतक्या दूर अंतरावर लढाईच्या धुमाळीत तोफांचे आवाज कानावर पडतील हे मला तरी अशक्यप्राय वाटते.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:55 am | शशिकांत ओक

तथाकथित 'पावनखिंड' विशाळगडापासून ४ ते ५ किमी अंतरावर आहे. इतक्या दूर अंतरावर लढाईच्या धुमाळीत तोफांचे आवाज कानावर पडतील हे मला तरी अशक्यप्राय वाटते.

लढाईची 'धुमाळी' यात आवाजाचे 'कोलाहल' असे आपल्याला सूचित करायचे असावे.... 'आवाज न करता' बाजीच्या सैन्याला शत्रूला किमान जखमी करायचे असे प्रयत्न असावेत, ही शक्यता होऊ शकते... या विपरीत आपण म्हणता तसा कोलाहल सिद्दीच्या बाजूने केल्या जाणाऱ्या ठासणीबार बंदुकातून केला जाणे शक्य आहे. पण तो सावज नेम धरता येईल इतक्या खात्रीचे झाले की मारायचे असे मानले तर बाराचे आवाज होत असावेत पण थांबून थांबून....
तोफांच्या बाराचा आवाज डोंगरातील अडथळ्यांनी वारंवार प्रतिध्वनी होऊन तो ऐकू यायला व ओळखायला शक्य असावे म्हणून तो पर्याय जवळचा व खात्रीचा वाटतो...
अशी ही शक्यता आहे....

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2018 - 5:56 pm | टवाळ कार्टा

बाजीप्रभूंचा एकेरी उल्लेख खटकला

उपरोक्त दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
सध्या समजली जाणारी पावनखिंड मी स्वतः पाहिली आहे. विशाळगडास लवकर पोहोचण्यासाठी खिंडीच्या वरील दोन्ही बाजूंकडून वाटा आहेत. शिवाय खुद्द घोडखिंड ही खिंडच मानता येणार नाही कारण ती मुखाच्या बाजूने बंदच आहे. शिवाय पुढील बाजूस कासारी नदीच्या पात्रात ऐन उन्हाळ्यात आजही खोल डोह असतात तर ऐन आषाढात ते उल्लंघून जाणे अवघडच आहे.
a

a

a

a

शशिकांत ओक's picture

21 Mar 2018 - 7:59 pm | शशिकांत ओक

नमस्कार,

सध्या जी जागा पावनखिंड म्हणून दाखवली जाते ते पावनखिंड नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे. एक तर मुख्य मार्गापासून एका बाजुला ही तथाकथित खिंड आहे. शत्रुला बाजूने जाऊन महाराजांचा पाठलाग करणे शक्य आहे.

इति दुर्गविहारी.

एक जागा 'पावनखिंड' म्हणून दाखवितात. ...मी स्वत: ती जागा जाऊन पाहिली. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही वा युद्धशास्त्राचा जाणकार नाही. तरीहि सामान्यज्ञानातून दोन गोष्टी लगेच जाणवल्या. ती जागा एका घळीत २०-२५ फूट खाली घळीच्या तळाशी आहे. ... अशा घळीत बाजी प्रभु उतरला असेल तर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा नाश करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर वरून धोंडे टाकणे हा अतिशय सोपा उपाय शत्रूला मिळाला असता. हातघाईची लढाई होण्यापूर्वीच आपल्या सैनिकांसह डोक्यात धोंडा पडून बाजी प्रभु मरून गेला असता. ही तथाकथित 'पावनखिंड' विशाळगडापासून ४ ते ५ किमी अंतरावर आहे. इतक्या दूर अंतरावर लढाईच्या धुमाळीत तोफांचे आवाज कानावर पडतील हे मला तरी अशक्यप्राय वाटते.

इति अरविंद कोल्हटकर

विशाळगडास लवकर पोहोचण्यासाठी खिंडीच्या वरील दोन्ही बाजूंकडून वाटा आहेत. शिवाय खुद्द घोडखिंड ही खिंडच मानता येणार नाही कारण ती मुखाच्या बाजूने बंदच आहे.

इति प्रचेतस...

धाग्यातील या बाजूवर आपली मते वाचून आनंद झाला. अस्सल कागदी पुराव्यांची कमतरता, लेखन करायची गरज न वाटणे, उसंत न मिळणे व अन्य कारणांनी मराठ्यांच्या इतिहासाला ज्ञात लढ्याच्या घटनांच्या तपशीलवार नोंदी कमी असल्याचे जाणवते. जी उपलब्ध साधने आहेत त्यांतील सत्यासत्यता, इतिहास लेखन करणाऱ्यांचे हेतू व पुर्वग्रह वगैरे आणखी व्यत्यय असू शकतात.
यातून असे वाटते की ...
जर आजच्या मिलिटरी कमांडरला (तो स्वतः) शिवाजी महाराज आहे व बाजीप्रभूंसारखे सरदार साथीला असतील असे मानले तर ते सध्याचे (मिलिटरी कमांडर ) -शिवाजी महाराज- त्या काळातील उपलब्ध परिस्थितीत लढ्याचे नियोजन कसे करतील? हातात घड्याळ नाही, डोळ्याला चष्मा नाही, पायात बूट नाहीत, पेटवायला आगपेटी नाही. अशा त्या काळातील उपयोगातील नियंत्रित वस्तूंना, शस्त्रसंभाराला वापरून - तलवारी, भाले, गोफणी, क्वचित सेनेकडे ठासणीच्या बंदुका, तोफांच्या मारा करायची कला व साहित्य असेल इतपत प्रगत दूरमारक शस्त्रे अशा अंगाने विचार करायला हा धागा प्रवृत्त करत आहे... यातून त्या लढाईच्या घटनांच्या निदान 70 ते 80टक्के जवळपास आपण जाऊ शकतो का?
आपणांपैकी सेनेबाहेरील अभ्यासू सदस्यांनी आणि सेना दलातील माहितगारांनी यावर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करून काय व कसे नियोजन करता आले असेल. प्रत्यक्ष घटना घडताना त्या नियोजनात वेळोवेळी बदल करून शेवटी सुरक्षितपणे गडावर कसे ते पोहोचले असावेत यावर लिहावे. मी देखील माझ्या बाजूने प्रयत्न करीन. मी ठरवेन तेच खरे असा अभिनिवेश नसावा. अनेक शक्यता पडताळून पाहायला काय हरकतआहे?

सध्या आपण असे मानू की कासारी नदीच्या पात्रालाच घोड खिंड म्हणतात... शिवा काशीद याने तोतया शिवाजी बनून महाराजांना विशाळगडावर पोहोचायला लागणाऱा वेळ मिळावा म्हणून अन्य मार्गाने जाऊन सिद्दीच्या सेनेची दिशाभूल करायला जावे अशी योजना केली होती... विशाळगडाला वेढा पडलेला असू शकतो असा अंदाज महाराजांना असावा... जाताना वाटाडे, वाटेत खायला काही शिधा, इरली, शस्त्रांशिवाय अन्य दरवाजे फोडायला लागणारे सामान, जादाची शस्त्रे, पालखी सारख्या हलक्या बुट्ट्या उचलून न्यायला सोईने बरोबर असावीत. महाराज कधी पालखीत तर कधी पायी असे वाटेतील अवघड व चढाच्या वाटांवरून जात असावेत. वगैरे... सध्या सुचवावेसे वाटते यात आणखी भर पडू शकते.
आपले विचार वाचायला आवडतील... मला ही पुढे लिहायला हुरूप येईल....

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Mar 2018 - 12:11 am | राजेंद्र मेहेंदळे

मी पन्हाळ विशाळ एकदिवसीय ट्रेकएकदिवसीयकेला आहे. त्याचे वर्णन ईथे वाचा

http://www.misalpav.com/node/28324

आता पावनखिंडीच्या जागेबद्दल (मी ईतिहासाचा अभ्यासक आहे, जाणकार नाही हे पहीले सांगतो)

विशाळगडापासुन पावनखिंडीचे अंतर आणि दिशा बघता ही खरी पावनखिंड (म्हणजे जिथे लढाई झाली ती) नसावी. शिवाजी महाराज विशाळ्गडाला चालले असताना बाजींच्या तुकडीने सिद्दिच्या सैन्याला खेळवत ईथे नदीच्या उगमाशी आणले आणि वेळ काढण्यासाठी झुलवत ठेवले. तोवर सरळ रस्त्याने महाराज विशाळगडाला पोचले असावेत. खरी पावनखिंड कुठे आहे ईतिहासालाच माहीत.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:06 am | शशिकांत ओक

शिवाजी महाराज विशाळ्गडाला चालले असताना बाजींच्या तुकडीने सिद्दिच्या सैन्याला खेळवत ईथे नदीच्या उगमाशी आणले आणि वेळ काढण्यासाठी झुलवत ठेवले.

या लढ्याचे वैशिष्ठ्य समोरा समोर उभे न राहता सुरक्षित जागी पोहोचायला लागणाऱ्या युक्त्या अमलात आणणे... असे मानले तर तोतया शिवाजी ही सुरवात आहे.

मी ईतिहासाचा अभ्यासक आहे, जाणकार नाही हे पहीले सांगतो

आपले डिसक्लेमर इथे सर्वांना लागू आहे असे मानू या म्हणजे त्यावरून चर्चा घरंगळणार नाही....

तिमा's picture

22 Mar 2018 - 1:23 am | तिमा

पावनखिंड खरी कुठली हा जसा वादाचा विषय असू शकतो तसाच ब्रिगेडी दिवसांत, बाजीप्रभूंनी खरच पराक्रम गाजवला का नाही, असा सुद्धा वाद तयार करतील आणि त्याला अनेक 'जाणते' नेते छुपा पाठिंबा देतील.

सुनील's picture

22 Mar 2018 - 7:45 am | सुनील

अवघ्या साडे-तीनशे वर्षांपूर्वीची सुप्रसिद्ध लढाई जिथे झाली त्या खिंडीची निश्चिती होत नाही, म्ह्णजे कमाल आहे!

मग तब्बल अडीच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या लढाईचा तपशील, मॅरेथॉन ह्या युद्धस्थाना पासून ते अथेन्सपर्यंत घावत जाऊन कळवणारा फिडिपिडिस हा सैनिक, नक्की कुठून कुठपर्यंत धावला आणि कुठल्या मार्गाने धावला, हे अगदी काटेखोरपणे (अंदाजपंचे नव्हे) शोधून, ते अंतर ४२ किमी आणि १९५ मीटर आहे, हे ठरवणार्‍या ऑलिंपिक समितीला शिसादंडवत!

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:18 am | शशिकांत ओक

नक्की कुठून कुठपर्यंत धावला आणि कुठल्या मार्गाने धावला,

प्रत्येक धावकाच्या मागे कॅमेरा टीम, ड्रोन चित्रण, डोक्यावरील शिरस्त्राणातील कॅमेरे, पाणी बाटल्या पुरवणारे मदतनीस वगैरे नसताना ... या मार्गातील बारकावे शोधून लोकांनी सर्वमान्य होईल असा मॅरेथॉनचा मार्ग शोधला जाऊ शकतो तर आपल्याला तसेच शोधकार्य महाराष्ट्रातील कुशल लोकांनी करायला काय अशक्य आहे....

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2018 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चर्चा चालली आहे.

दरवर्षी धोधो पडणारा पाऊस, कोसळणार्‍या कड्या-कपारी, भूस्खलन, इत्यादीने गेल्या ३५०+ वर्षांमध्ये सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यांमध्ये होणार्‍या बदलांचा या चर्चेत अभ्यास/समावेश करणे जरूर आहे असे वाटते.

विशेषतः; एकट्या-दुकट्याने (किंवा मूठभर मावळ्यांच्या मदतीने) जी खिंड यशस्वीपणे लढवली गेली, व जिला बाजूने ओलांडून मूठभर मावळ्यांच्या पिछाडीवरून हल्ला करणे शक्य झाले नाही; अशी खिंड खूप चिंचोळी असली पाहिजे आणि तिच्या दोन्ही बाजूचे कडे खूप उंच असले पाहिजेत. ३५०+ वर्षांच्या पावसाच्या पाण्याच्या ओहोळाने आणि/किंवा एखाद-दुसर्‍या भूस्खलनाने अश्या खिंडीचे आजचे स्वरूप पार बदलून गेलेले असल्यास आश्चर्य नाही. कोणी सांगावे, ती जागा फार मोठी नसल्याने, आतापर्यंत दोन्ही बाजूंचे कडे खिंडीत कोसळून ती सपाट/उथळ झाली असण्याची किंवा एका बाजूचा कडा खचून गेल्याने केवळ एकाच कड्याच्या स्वरूपात शिल्लक राहिलेली असण्याचीही शक्यता आहे. भूशास्त्राची जाण असलेले अजून काही शक्यता सांगू शकतील. पण, केवळ आजच्या भूभागाच्या परिस्थितीवरून अचूक अंदाज बांधणे शक्य होणार नाही, हे नक्की.

त्या वेळेच्या काही विश्वासू लेखी नोंदी असत्या तर त्यातले पुरावे ग्राह्य घरता आले असते. मात्र, सद्या उपलब्ध असलेले लेखी/वाच्य पुरावे केवळ पोवाडे, इत्यादींसारख्या लोकवांङ्मयातले असल्याने त्यांच्या अचूकतेवर आणि विश्वासूपणावर प्रश्नचिन्ह आहे.

पण, एकंदरीत चर्चा रोचक आहे आणि वाचायला मजा येत आहे.

शशिकांत ओक's picture

24 Mar 2018 - 7:55 am | शशिकांत ओक

नमस्कार डॉ. सर,
आपले या धाग्यावरील विचार इतरांना लेखन करायला प्रवृत्त करतील. धन्यवाद

पैसा's picture

24 Mar 2018 - 10:10 am | पैसा

वाचायला मजा आली. खरी पावन खिंड शोधायची आहे अशा दृष्टीने कोणी पुन्हा या मार्गाने जातील का?

धाग्याची कल्पना रोचक आहे.

दुर्गविहारी's picture

24 Mar 2018 - 2:04 pm | दुर्गविहारी

वेळे अभावी प्रतिसाद देता आला नाही. आज सविस्तर लिहीतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काही जीवावर बेतणारे प्रसंग आले त्यात हा एक. यावर अत्यंत बारकाईने विचार केला पाहिजे. हि घटना १३ जुलै १६६० ची. याआधी महाराजांनी केलेल्या युध्दाचा विचार केला तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१) सुरवातीच्या काळात सैन्यबळ कमी असल्यामुळे शिवाजी महाराजांनी समोरासमोरच्या थेट लढाया टाळळेल्या दिसतात.
२ ) महाराजांच्या सगळ्यात मोठा गुण म्हणजे "नियोजन".रोहिड्यावर हल्ला करुन बांदलांचा पराभव किंवा जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव, फत्तेखानाविरुध्द तर चक्क आदिलशहाच्या मालकीच्या किल्ल्यावरुन आदिलशहाच्या सरदारचा केलेला पराभव किंवा या सगळ्यांचा कळसाध्याय म्हणजे वाईचा सुभेदार असलेल्या अफझलखानाचा वाई परिसरात केलेला पराभव आणि त्यानंतर लगेच आदिलशाही परिसरात मारलेली मुसंडी आणि बराचसा मुलुख ताब्यात घेणे.
हे सर्व कमी सैन्यबळ असताना शक्य झाले ते उत्कृष्ट नियोजनाने.
आता येउ या पन्हाळगडावरुन सुटका प्रकरणाकडे. पन्हाळा परिसरात पडणार्‍या धुंवाधार पावसाने कंटाळून सिध्दी जोहर निघून जाईल हा अंदाज चुकला. त्याच वेळी स्वराज्यावर शाहिस्तेखान चालून आला होता. तेव्हा येणकेण मार्गे पन्हाळ्यावरुन सुटणे गरजेचे होते. जेव्हा हि सुटकेची योजना नक्की झाली त्यावेळी अनेक पर्यायांचा नक्कीच विचार झाला असेल. एकतर त्यावेळी पावनगड नव्हता, त्याच्यावर ताबा मिळवण्याचा सिध्दी प्रयत्न करीत होता. तो या टेकडीवर आला असता तर पन्हाळगडाची कमकुवत बाजु म्हणजे काली बुरुजाकडील बाजु अडचणीत आली असती. त्यात राजापुरकर ईंग्रजांनी केलेली लांब पल्ल्यांच्या तोफांची मदत. तेव्हा सुटकेचे प्रयत्न लवकर करणे गरजेचे होते.
Panhala parisar
पन्हाळा परिसराचा नकाशा विचारात घेतल्यासा बाकी सर्व परिसर सपाट मैदानी आहे. फक्त पश्चिम बाजुला पन्हाळ्याचा डोंगर मसाई पठाराला जोडला गेला आहे. सहाजिकच या भौगोलिक रचनेमुळे इथेच पहार्‍याची मेट बसवने सिध्दीच्या सैन्याला अवघड गेले असणार आणि ईथेच पहारे कमजोर असणार. महाराजांनी सुटकेपुर्वी या गोष्टीचा विचार नक्की केला असणार. शिवाय पन्हाळ्यावरुन बाहेर पडल्यानंतर कुठे जायचे हे महत्वाचे होते. कारण पन्हाळ्याला जवळचे दोनच बलदंड किल्ले स्वराज्यात होते. एक रांगणा, पण तो खुपच लांब होता ( मराठ्यांचा ईतिहासकार ग्रँट डफ लिहीतो, महाराज सुटून रांगण्यावर गेले, मात्र ते चु़कीचे आहे. ) उरला दुसरा किल्ला विशाळगड, पण यालाही जसवंतराव पालवणीकर व सुर्यराव सुर्वे यांनी वेढा दिला होता. सहाजिकच पन्हाळ्यावरुन नुसती सुटका होउन चालणार नव्हते तर वाटेत येणार्‍या सर्व संकंटाचा विचार करणे गरजेचे होते.
आता नियोजनात अत्यंत निष्णात असणार्‍या शिवाजी महाराजांनी काय केले ते पाहू.
१ ) तहाची बोलणी करुन सिध्दीला व सतत पावसाच्या मार्‍याने कंटाळलेल्या त्याच्या सैन्याला गाफील ठेवले.
२) मसाईच्या पठार व पन्हाळा हे जोडणार्‍या मार्गाचा वापर केला. मुख्य छावणीपासून हा मार्ग लांबचा असल्याने हि खबर सिध्दीला शक्य तितक्या उशीरा मिळाली असती. शिवाय या भागात पहाराही कमी असावा.
३) मुख्य म्हणजे चुकून सिध्दीच्या सैन्याला महाराज सुटलेत याची कुणकुण लागली असती तर त्याचा कालपव्यव व्हावा यासाठी सध्याच्या भाषेत "प्लॅन बी" म्हणतात तसे शिवा काशिदची योजना केली होती. जर त्यादिवशी सिध्दीच्या सैन्याला खबर लागली नसती तर कदाचित शिवा काशिदला बलिदान करायला लागले नसते. माझ्या मते शिवा काशिदची पालखी मुध्दाम डोंगरधारेवरुन उतरवून पुर्वेच्या दिशेने म्हणजे ज्योतिबाच्या डोंगराच्या दिशेने पाठवली असावी. सहाजिकच सैन्याचा भर हि पालखी शोधण्याच्या नादात चुकीच्या दिशेने तपास व्हावा हा हेतु साध्य होईल. शिवा काशिदने शक्य तितके बोलण्यात गुंतवून सिध्दीचा वेळ खायचा असे ठरले असावे. शिवा त्यात बर्‍यापैकी यशस्वी झालाही, मात्र अफझलखानाचा मुलगा फाझलखानही या वेढ्यात होता, त्याने प्रतापगड युध्दाच्या वेळी शिवाजी महाराजांना पाहिलेले होते. सहाजिकच सिध्दीचा फार वेळ वाया गेला नाही आणि त्याने मसुदला पुन्हा पाठलागावर पाठविले. पण एकुणच या प्रकारामुळे सिद्दीच्या सैन्यात गोंधळ उडाला असावा.
४ ) हे सर्व अंमलात आणण्यापुर्वी कदाचित महाराजांनी हेराकरवी या मार्गाची नक्की पहाणी केली असणार. वाट नेमकी कशी आहे, पर्यायी वाटा किती आहेत, किती वेळ लागु शकतो, विशाळगडापशी आदिलशाही सैन्य किती आहे याची खडानखडा माहिती घेतली असणारच हा माझा अंदाज.
५ ) जेव्हा मसाईचे पठार ओलांडून पुढची वाटचाल सुरू झाली तेव्हा ती रूळलेल्या वाटेवरूनच असेल असा माझा अंदाज. एकतर प्रत्येकक्षण मोलाचा होता, तेव्हा नेहमीची रुळवाट सोडून या प्रदेशातील घनदाट जंगलातून प्रवास करणे म्हणजे वेळ वाया घालवणेच ठरले असते. एकतर मुसळधार पाउस आणि शत्रु मागावर असताना , जिथे प्रत्येक सेंकद महत्वाचा तिथे राजे जंगलमार्गे गेले नसावेत हे नक्की. हा परिसर मी स्वतः पाहिलाय आणि धाग्यामधे लिहील्या प्रमाणे आंबेवाडीनंतर जंगलाचा पट्टा लागतो. इथे परिस्थिती अशी आहे कि कित्येक वेळा स्थानिक वाटाडे चुकलेत. तेव्हा शिवाजी महाराज हे रुळलेल्या मार्गेच गेले असावेत.
Pawankhind
६ ) यानंतर आपण येतो पांढरपाण्याच्या सपाटीवर. इथेच कासारी धरणामुळे विस्थापित झालेल्यांचे गाव "भाततळी" आहे. या गावाजवळच तथाकथित पावनखिंड दाखवली जाते. हि नक्की कोणी शोधून काढली ते मला माहिती नाही, पण बहुधा पन्हाळास्थित श्री. मु.गो. गुळवणी गुरुजी यांनी संशोधीत केली असावी. त्यांच्या माहितीचा आधार घेउन सुप्रसिध्द साहित्यिक आणि दुर्गपंडीत श्री. गो.नि.दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी हि जागा प्रकाशात आणली. मुळात हि जागा म्हणजे कासारी नदीचा उगम आहे, याठिकाणी उतरणेही अवघड आहे. आता शिड्या बसविल्या असल्या तरी पुर्वी झाडाच्या मुळीला धरुन उतरायला लागायचे. तेव्हा या जागेला पावनखिंड म्हणण्यात फारसे तथ्य नाही.मात्र या आधीच एतिहासिक फरसबंदी मार्ग लागतो, तेव्हा वाट याच्या जवळून असावी.
७ ) जेव्हा महाराज पहाटे पांढरपाण्याला पोहचले तेव्हा शत्रु जवळ पोहचल्याचे लक्षात आले. त्यामुळे निर्णय घ्यायला वेळ नव्हता, युध्दाला सोयीची जागा निवडता येण्यासारखी परिस्थिती नव्हती. शिवाय विशाळगडावर जायचे तर जसवंतराव पालवणीकर व सुर्यराव सुर्वे यांच्याशी युध्द करायचे होते. तेव्हा अर्धे सैन्य म्हणजे साडे तिनशे मावळे घेउन महाराज पुढे गेले आणि केवळ साडे तीनशे मावळ्यांबरोबर वाट अडवून बाजीप्रभु उभे राहिले. आता हि जागा किमान पर्यायी मार्ग नसलेली पाहिजे. शिवाय महाराज गडावर पोहचलेत याची खुण म्हणून तोफेची इशारत दिली जाणार होती. म्हणजे आषाढाच्या महामुर पावसात देखील तोफेचा आवाज एकू आला पाहिजे ईतकी विशाळगडाजवळ पाहिजे होती. लक्षात घ्या विशाळगडाला जवळपास ३०० अंशात सभोवती कडे आहेत. सध्या जिथे बसथांबा आहे तिथेच सपाटी आहे. म्हणजे गडावर ज्या थोड्या तोफा आहेत त्या याच बाजुला असणार आणि फार अंतरावर मारा करायचा नसल्याने त्या मुलुखमैदान किंवा कलालबांगडी इतक्या शक्तिशाली नक्की नसणार . याचा अर्थ या तोफांचा आवाज पावसातूनही एकु जाईल इतक्या जवळ पावनखिंड असणे आवश्यक आहे. म्हणून माझ्यामते हि जागा गजापुर या जुन्या गावाजवळच कुठेतरी असणार. गजापुर हे प्राचीन गाव आहे. औरंगजेब जेव्हा विशाळगड घ्यायला आला होता, तेव्हा त्याची छावणी या परिसरात पडली होती याचे उल्लेख आहेत.शिवाय गजापुर गावाला येण्याआधी सिध्दीच्या सैन्याला आषाढाच्या पुराने वहाणारी कासारी नदी ओलांडावी लागणार होती. ( शिवाजी राजांच्या सैन्याने हि नदी कशी ओलांडली याचे मलाही कुतुहल आहे)
गजापुरचे स्वातंत्र्य सैनिक श्री. गणपतराव सिनकर हे विनंती केल्यास गजापुरजवळची एक जागा दाखवायचे हे मला श्री. प्र.के.घाणेकर यांनी सांगितले होते. या जागेचा शोध घ्यायला हवा.

उपेक्षित's picture

24 Mar 2018 - 8:54 pm | उपेक्षित

@ दुर्गविहारी _/\_ घ्या, अप्रतिम प्रतिसाद माझ्याकडून १ मिसळ पार्टी तुमास्नी :)

गामा पैलवान's picture

24 Mar 2018 - 9:35 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

उत्तम विवेचन आहे. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या पुस्तकात गजापूरची घोडखिंड पावन झाली असा उल्लेख वाचल्याचं आठवतं.

आ.न.,
-गा.पै.

सध्या प्रत्यक्ष दिसणार्‍या घळीच्या खिंडीला ती पावन खिंड नसावी आणि तोफेचा आवाज येणार कि नाही, किंवा अन्य माहितीच्या आधारे विविध कारणांनी ती खिंड गजापूर किंवा अन्य कुठेतरी किंवा सध्या पाण्यात बुडालेली असावी." या कथनांना मागे ठेवून मला हा धागा पुढे सरकला जावा अशी अपेक्षा आहे....

राजे जंगलमार्गे गेले नसावेत हे नक्की. हा परिसर मी स्वतः पाहिलाय आणि धाग्यामधे लिहील्या प्रमाणे आंबेवाडीनंतर जंगलाचा पट्टा लागतो. इथे परिस्थिती अशी आहे कि कित्येक वेळा स्थानिक वाटाडे चुकलेत. तेव्हा शिवाजी महाराज हे रुळलेल्या मार्गेच गेले असावेत.

शिवा काशिदची पालखी मुध्दाम डोंगरधारेवरुन उतरवून पुर्वेच्या दिशेने म्हणजे ज्योतिबाच्या डोंगराच्या दिशेने पाठवली असावी. सहाजिकच सैन्याचा भर हि पालखी शोधण्याच्या नादात चुकीच्या दिशेने तपास व्हावा हा हेतु साध्य होईल. शिवा काशिदने शक्य तितके बोलण्यात गुंतवून सिध्दीचा वेळ खायचा असे ठरले

महाराजांनी हेराकरवी या मार्गाची नक्की पहाणी केली असणार. वाट नेमकी कशी आहे, पर्यायी वाटा किती आहेत, किती वेळ लागु शकतो, विशाळगडापशी आदिलशाही सैन्य किती आहे याची खडानखडा माहिती घेतली असणारच हा माझा अंदाज.

पन्हाळास्थित श्री. मु.गो. गुळवणी गुरुजी यांनी संशोधीत केली असावी. त्यांच्या माहितीचा आधार घेउन सुप्रसिध्द साहित्यिक आणि दुर्गपंडीत श्री. गो.नि.दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी हि जागा प्रकाशात आणली. मुळात हि जागा म्हणजे कासारी नदीचा उगम आहे, याठिकाणी उतरणेही अवघड आहे. आता शिड्या बसविल्या असल्या तरी पुर्वी झाडाच्या मुळीला धरुन उतरायला लागायचे. तेव्हा या जागेला पावनखिंड म्हणण्यात फारसे तथ्य नाही.

तोफांचा आवाज पावसातूनही एकु जाईल इतक्या जवळ पावनखिंड असणे आवश्यक आहे. म्हणून माझ्यामते हि जागा गजापुर या जुन्या गावाजवळच कुठेतरी असणार.

श्री. गणपतराव सिनकर हे विनंती केल्यास गजापुरजवळची एक जागा दाखवायचे हे मला श्री. प्र.के.घाणेकर यांनी सांगितले होते. या जागेचा शोध घ्यायला हवा.

​मित्रांनो विशेष करून ​दुर्ग विहारी आणि अन्य गड ​ विहार​क​,
आपल्या विविध प्रतिसादातून या विषयाची आवड आणि माहिती भरभरून मिळत आहे.
दुर्गविहारींनी विशेष कष्ट घेऊन सादर केलेल्या वरील प्रतिसादातून नकाशे आणि विविध बिंदूंवर नवा धागा काढून विचार करायला अनेकांना प्रेरणा देईल असा अंदाज आहे.
माझ्या धाग्यात पावनखिंडीतला लढा मिलिटरीच्या अंगाने कसा लढला गेला असेल यावर भर देणारा आहे.
यासाठी " विविध कारणांनी सध्या प्रत्यक्ष दिसणार्‍या घळीच्या खिंडीला ती पावन खिंड नसावी आणि तोफेचा आवाज येणार कि नाही, किंवा अन्य माहितीच्या आधारे ती खिंड गजापूर किंवा अन्य कुठेतरी असावी". या कथनांना मागे ठेवून मला हा धागा पुढे सरकला जावा अशी अपेक्षा आहे....

माझ्या धाग्यात पावनखिंडीतला लढा मिलिटरीच्या अंगाने कसा लढला गेला असेल यावर भर देणारा आहे.

गृहीत धरलेले ठिकाणच चुकीचे असल्यास मिलिटरीच्या किंवा कोणत्याही इतर अंगाने केलेला विचार सुसंगत कसा असेल?

ह्या धाग्यावर तो लढा सध्या मान्य कासारी पात्राच्या खिंडीत झाला. या गृहितकावर आधारित धरून विचार केला आहे. समजा पुढील काळात अन्य मार्ग मान्य झाले तर त्याला मध्यवर्ती मानून कोणी अन्य मिलिटरी कमांडर त्या बाजूने अभ्यास करून काही विश्लेषण करतील. तेही तितकेच सुसंगत असेल. असो.

गामा पैलवान's picture

26 Mar 2018 - 5:57 pm | गामा पैलवान

दुर्गविहारी,

श्री. गणपतराव सिनकर हे विनंती केल्यास गजापुरजवळची एक जागा दाखवायचे हे मला श्री. प्र.के.घाणेकर यांनी सांगितले होते. या जागेचा शोध घ्यायला हवा.

सहमत आहे. गणपतरावांची जागा बघायला आवडेल.

एक शंका आहे. बाजीप्रभूंनी झुलवत मसूदला कासारी नदीमुखापाशी आणला असेल काय? शिवाजी आपल्यासोबत आहे असं खोटं सोंग आणण्यात बाजीप्रभू यशस्वी झाले असावेत काय? महाराज वेगळ्याच वाटेने विशाळगडावर सटकले असतील मग. ही शक्यता कितपत व्यवहार्य आहे?

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

26 Mar 2018 - 6:56 pm | दुर्गविहारी

ह्या परिसराला भेट दिली तर लक्षात येईल कि पांढरपाणी गावाजवळ सपाटी आहे आणि सध्या तिथेच पावनखिंड दाखवतात. कमी मनुष्यबळ असताना असे उघड्यावर युध्द म्हणजे आत्महत्याच. तेव्हा महाराजांनी अशी जागा निवडली असणार जिथून पर्यायी वाट नाही. पांढरपाण्याची सपाटी संपली कि कासारी नदीचे खोल खोरे समोर येते. विशाळगड हा महत्वाचा किल्ला असल्याने कासारी नदीवर एखादा दगडी पुल असावा असे वाटते. सध्या कासारी नदीवर गेळवडे धरण बांधलेले असल्याने मुळ प्रदेश पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे काहीही सांगणे कठीण आहे. पण गजापुरजवळ डोंगराची जी रचना आहे, त्याचा फायदा महाराजांनी करुन घेतला असावा असे माझे मत आहे.
माझ्यामते खिंडीसारखी रचना असेल तर दोन्ही बाजुच्या झाडीत मावळे उभे करून गोफणीतून दगडांचा मारा करुन किंवा मोठ मोठी दगडे वरुन ढकलून देउन फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स तयार केली असावी. त्यातून जे आदिलशाही सैनिक पुढे सरकले त्यांच्या बरोबर अडचणीची जागा बघून शस्त्रयुध्द केले गेले असावे.
महाराजांकडे वेळ नसल्याने ते वेगळ्या वाटेने गेले नसावेत.

शशिकांत ओक's picture

27 Mar 2018 - 1:11 am | शशिकांत ओक

खूपच विचारकरणीय आहेत. पाहू या बाजूने विचार करून....

मित्रांनो, माफ करा चित्र अंधुक झाले आहे, डोळे वटारून पाहता
खालील मजकूर दिसतो.
​डावीकडून पांढर्‍या रंगातील मजकूर -
१.सपाट प्रदेशात ​बा​जी स्वतः दोन्ही हातात तलवारी धरून उरलेल्या सैन्याला काटत असावेत. इथे तोफांचा आवाज ऐकू येतो.
२. कासारी नदीचे पात्र वळणदार जंगलातून जाताना सुमारे दोन किमी ची खिंड तयार होते. तिला मी पावनखिंड असे मानतो.
३​.​ मध्यभागातील जंगलाचा उताराचा भाग मसूदच्या सैन्याने पकडून वरून बंदुकीच्या गोळ्यांनी प्रतिकार केला असावा.
४. या संपूर्ण पट्ट्यातील दोन्ही बाजूच्या पहाडीत लपलेल्या बांदल सैन्या​ने गोफण दगडांनी, बाणांनी सिद्दीच्या सैन्याला जखमी करून लढायला निकामी करून सोडले. अशा जखमी व हताश सैनिकांना बाजी प्रभू आणि अन्य बहाद्दरांच्या तलवारी भक्ष्य करायला सज्ज होत्या.
५. धबधब्याची जागा.
६. सुरवातीचे कासारी नदीचे मुख.

निळ्या रंगाने दाखवलेल्या पूर्ण पात्राला 'पावनखिंड' मी मानतो- हे पुन्हा सांगायला आवडेल. खालील नकाशातून कासारी नदीचे 2 किमी लांबीचे जंगलातून व बिकट दुतर्फा पहाडीतून जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेला पावन खिंड असे मानले तर काही घटनांवर अधिक प्रकाश पडेल.

1

त्या आधी पावनखिंडीच्या लढ्यातीलदोन्ही बाजूंचे सैन्य बळ, त्यांची वैशिष्ठ्ये यावर विचार करताना -

विविध लेखकांनी या लढ्याच्या पुर्वपीठिकेची वर्णने केली आहेत ( ती एकमेकांशी मेळ खातातच असे नाही.) यावरून शिवाजी महाराजांच्या जवळच्या सैन्याला मिरजेत वेढा अयशस्वी ठरला म्हणून व सिद्धी जोहरला आपल्यावर स्वारी करायला पाठवायला सैन्य निघाले आहे असे समजताच विस्तीर्ण आणि जिंकायला अवघड अशा सर्वात जवळच्या पन्हाळा गडाची निवड केली​ गेली असावी​. तेथून पुढे कोकणात जाऊन नंतरच्या हालचाली ​गरज पडेल तशा ​करता येतील.​ असा विचार करता येतो.​ मध्यंतरीच्या काळात नेताजी पालकर आपल्याला मदतीला येऊन दोन्ही बाजूने सिद्दीची चढाई परतवून लावली तर व काही भाग आपल्या ​अख्त्यारीत आणला तर पुन्हा विजापूरच्या अदिलशाहीत दुफळी माजून शकले होतील. जितका नव्याने मिळवलेला प्रदेश पदरात पडेल तो पुढेमागे मुघलांशी वाटाघाटीत या परस्पर मिळवलेल्या विजापूरच्या राजसत्तेतून वाटा द्यायला सोईचे होईल. वगैरे वगैरे... अंदाज बांधा येतात... असो.
शिवाजी महाराजांच्या बरोबर पन्हाळगडावर किती सैन्य असावे? सिद्दी किती सैन्याची जमवाजमव करून वेढा घालायला लागला असावा? त्याच्या कमांड खाली सैन्यात कोणा कोणा सरदारांचे सैन्य होते. यावर विचारकांनी लेखन केले आहे. पैकी खालील वाचनात आले. त्यातील प्रत्येक जण काय म्हणतो सध्या लिहित नाही.
सेतुमाधव पगडी -
बाबासाहेब पुरंदरे -
प्रा. प्र. के. घाणेकर -
श्रीनिवास सामंत -
गजानन मेहेंदळे -
निनाद बेडेकर -
सर जदुनाथ सरकार -
वरील विचार व विविध आकडे वाचल्यावर निदान 35 हजार पायदळ, १० हजाराच्या वर घोडदळ, काही तोफखाना आणि तळ ठोकून राहायला गरजे प्रमाणात तंबू, शिधा सामुग्री, जनावरांच्या चाऱ्याची, पाण्याची सोय वगैरे गोष्टींचा समावेश होतो. रुस्तुम जमा व फाजल खान (अफ़ज़लखानाचा वाचलेला मुलगा) हे पठाण, तुर्की जमातीचे तर सिद्दीजौहर व त्याच्या जावई मसूद हे हबशी सध्याच्या इथियोपिया ​व आसपासच्या देशातील काळे, किरकोळ देहयष्टीचे, त्या किंवा त्यां​​चे पूर्वज गुलाम म्हणून भरती झालेल्या लोकांचे आश्रित म्हणून कमी मानाच्या दर्जाचे म्हणून पाहिले जात ​असत. तुरक, उझबेग, इराणी​,​ कुर्द​​, अफगाणी व सध्याच्या पाकिस्तानातील फाटा मधील कबीलेवाले वगैरे ( या सर्वांसाठी "पठाण' सर्वसामान्य निर्देश करतो) स्वतःला असली ​आणि ​शासक​ वर्गातील वडे दावेदार​ मानत. त्या​ ​​भागातील नव्याने रिक्रूट झालेल्या साहसी​ ​तरुणांना उत्तर भारतातील राजकारणात ​आपले बस्तान स्थिर करून राहिलेल्या सरदारांसमोर ​आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल असे दिसेनासे झाल्यावर ते भारतातल्या दक्षिणेकडे मोहिमेत सहभागी होऊन परत न जाता आपले बस्तान ​ति​थेच बसवायला पाहू लागले​.​ त्यातूनच बहामनी राज्यातील सरदारांच्या आपापसात वाटण्यात ५ संस्थाने झाली. म्हणूनच त्यांचा मुघल सत्तेशी संघर्ष होत होता. ​जरी ते धर्माने मुसलमान असले तरी विविध उपजाती, जमाती, पंथ, भाषा यात वाटले गेल्याने ते आपापसात सत्तेसाठी काहीही करायला तयार असत. तेंव्हा त्यांना आपण एकाच धर्माची लेकरे आहोत वगैरे भावडी भावना मनात येत नसावी.​ असो.
या सर्वसाधारण आढाव्यातून सिद्दीच्या सैन्य रचनेत एकसंधपणा कमी असावा. काही आज्ञा दिल्या तरी त्या लगेच पाळल्या जातीलच अशी खात्री नसावी. फाजलखानाचे विजापुरदरबारातील प्रस्थ सिद्दीची एक डोकेदुखी असावी. म्हणजे अत्यंत तातडीने सैन्य जमाकरून त्यांना रवाना करणे हे सहजी होणारी बाब नसावी.
वरील विचार कथन याकरिता केले आहे की शिवाजी महाराजांच्या मागे पाठवायला लागणारे सैन्याची जमवाजमव करायला, त्यांना रात्रीच्या पावसात बाहेर पकडायला जाताना ते खुष नक्कीच नसावेत. नक्की मार्ग कुठला निवडावा, वाटाड्यांवर किती विसंबून राहायचे? घोडदळ ​हे ​शोधायला​ ​पायी जाणाऱ्या सैन्याला उपयोगी असले तरीही पायदळाशिवाय असा घनदाट जंगलात घोड्यावरून लढाईत विजय मिळविला जाणे दुरापास्त असणार.
वरील गरजा जसा जसा गड घ्यायला उशीर व्हायला लागला तसतशा वाढून गेल्या.'वेळ' संकल्पनेवर विचार करताना यावर आणखी विचारणा करता येईल.
शिवाजी महाराज प्रताप गडावरील अफ़ज़लखानाला मारून मोहिमेला निघाले होते. त्यावेळी साधारण १० हजार सैनिकांपैकी निदान ५ हजार​ पेक्षा कमी​ घोडदळ व पायदळ मिळून बरोबर असावे असे ​विविध ​इतिहासकार सुचवतात. पन्हाळगडावर पोहोचेपर्यंत त्यातील मृत व जखमी वजा केले तर ते साधारण ४हजारापेक्षा जास्त नसावेत. शिवाय गडावर देखभालीसाठी साधारण ५शे धरले तर ती संख्या ४ हजार वा​ ​कमीजास्त असावेत.​ पैकी अंबेमोहोर तांदळासाठी प्रसिद्ध भोरच्या हिरडस भागातील बांदल सैनिक व त्यांचे सरदार बाजीप्रभू महाराजांनी निवडले यामागे ते सैनिक पारंपारिक भात शेती करणारे शेतकरी असावेत. त्यांना भाताची रोपे लावताना आणि अन्य कामासाठी चिखल आणि पावसात तासंतास उभे राहायचा काटकपणा जात्याच असल्याने ते इतरांपेक्षा जास्त उपयोगी वाटले असावेत.​
वाटाघाट​ ​करून, इंग्रजांना बोलावून लांब पल्ल्याच्या तोफा गाड्यावरून आणायला लागेपर्यंत व नेताजी पालकर​ना दोन वेळा वेढा तोडून गडाच्या दरवाजापाशी यायला जमले नाही. इथपर्यंत घटना घडल्या होत्या असे मानून आपण पावनखिंडीतला लढा कसा आखला आणि पार पडला यावर आजच्या मिलिटरी कमांडरच्या विचाराने पट मांडून पाहू.