महाराष्ट्रात अनेक शहरांना किल्ल्यांची पाश्वर्भूमी लाभली आहे. अशाच अनेक शहरांपैकी एक शहर धुळे शहर आहे, अहिराणी ही या शहराची मुख्य भाषा आहे. या भागातील किल्ले फिरण्याची मजा काही औरच कारण दिवसा येथील तापमान ४० पर्यत जाते, तर रात्री तेच १० ते १२ पर्यंत खाली उतरते. येथील किल्ले फिरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे झाडांचे प्रमाण फारच कमी आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने धुळय़ाहून नाशिकच्या दिशेने जाऊ लागलो की, अदमासे दहा किलोमीटरवर एक डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगेला छेदत हा महामार्ग वाहतो. खरे तर तो इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे. या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक बळीवंत दुर्गठाणे कधीचे इथे ठाण मांडून बसलेले आहे, नाव लळिंग!
महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारुकी’ घराणे एक मोठे. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले. या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा दुर्ग लळिंग!
नाशिक-आग्रा महामार्गावर मालेगावहून धुळ्याकडे जाताना धुळ्यापूर्वी ८ किमी अंतरावर लळिंग गावात दुर्ग अवशेषांनी संपन्न असा लळिंगचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून १८०० फुट उंचीवर तर पायथ्या पासुन साधारण ६०० फुट उंचीवरील हा किल्ला बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर उभा असुन भामेर नंतर खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला मध्ययुगीन कालखंडात खानदेशाची राजधानी होता.
आदल्या दिवशी थाळनेर, सोनगीर पहाण्यासाठी धुळ्याकडे जाताना वाटेत हा लळींग पाहिला होता. खालून देखील दिसणार्या त्याच्या तटबंदीने व एका बाजुला घुमटीने लक्ष वेधून घेतले. साहजिकच दुसर्या दिवशी लळींगची ओढ लागली. मात्र नाशिक, मालेगावकडे जाणार्या गाड्या लळींगला थांबत नाहीत. एकतर सडगावला जाणारी बस पकडायची नाहीतर एखाद्या ट्रक किंवा टेंपोचा आसरा घ्यायचा. मी थोडी वेगळी कल्पना वापरली, मालेगाववरून धुळ्याचे तिकिट काढले. मात्र लळींगपासून दोन कि.मी. वर टोलनाका आहे, तिथे प्रत्येक गाडी थांबते. तिथे उतरून एका ट्रकड्रायव्हर सरदारजीला विनंती केली, त्याने लळींग फाट्याला मला उतरवले.
गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत पण बरेच पर्यटक गावातील मुख्य वाट वापरतात.
गावातून किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावरच एक काळ्या पाषाणात बांधलेले मुखमंडप सभामंडप सारे पडून केवळ गर्भगृह शिल्लक असणारे प्राचीन शिवमंदिर आहे. शिल्लक भिंती, त्यावरील कलात्मक कोनाडे, दरवाजावरील नक्षीकाम हे सारे आजही मंदिराचे प्राचीन वैभव दाखवते. मंदिराच्या मागे एक पाण्याची टाकी असुन या टाकीच्या खालुन गडावर जाणारी वाट आहे. गडावर पाण्याची सोय नसल्याने पुरेसा पाणीसाठा जवळ ठेवावा. स्थानिकांची गडावर ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट मळलेली असुन गडावर जाण्याचा वाटेवर दिशादर्शक खुणा केलेल्या आहेत.
खालुन बघताना गडाचा उजवीकडचा पांढरा विशाल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. येथून किल्ला व तटबंदी उजवीकडे ठेवत वर जायचे. वाटेवर अनेक खुरटी झाडे आहेत. गावातून बाहेर पडताच लळिंगचा डोंगर भिडतो. लळिंगची उंची समुद्रसपाटीपासून ५९३ मीटर आहे! सह्य़ाद्रीच्या ऐन धारेवरील किल्ल्यांच्या मानाने ही उंची मात्र बेताचीच. मळलेली वाट गडाकडे निघते. वाटेत काही ठिकाणी पायऱ्यांचे अवशेष दिसतात. दोन ठिकाणी दगड रचलेल्या तटबंदीच्या भिंतीही आडव्या येतात. काही ठिकाणी प्रवेशद्वाराचीही रचना वाटते. या डोंगरावर अनेक खुरटी झाडे आहेत. पावसाळय़ानंतर यामध्ये गवताळ कुरण तयार होते. या गवतातून अनेक रानफुलेही उमलतात, कोंबडतुरे डोकावू लागतात.
लळींग किल्ल्याचा नकाशा
साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने तुटलेल्या दगडी पाय-या लागतात. त्या चढून गेले की समोरच एक थडगे व टाके दिसते. या ठिकानी पायवाटेच्या दोन्ही बाजूस दगडाचे ढिगारे पडल्याचे दिसतात. हा गडाचा दरवाजा असावा. किल्ल्याचे साधारणपणे दोन भाग पडतात एक बालेकिल्ला तर दुसरा माची. इथुन डावीकडील वाट बालेकिल्ल्याकडे जाते तर उजवीकडील वाट किल्ल्याच्या माचीवर जाते.
डावीकडून पुढे गेल्यावर वाटेत चार-पाच कातळात कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहा गडाचे प्राचीनत्व सिद्ध करतात. साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा.
यापैकी काही गुहांमध्ये रहाता सुध्दा येते. येथून डाव्या बाजूचा रस्ता तटबंदीच्या बाहेर जातो तर उजवा रस्ता तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. गुंहा मागे टाकुन आपण किल्ल्याच्या पडझड झालेल्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. दरवाजाच्या उजव्या बाजूला भिंतीवर एक व्यालशिल्प कोरलेले दिसते. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वास्तूंवर दिसणारा हा काल्पनिक पशू. मगर, सिंह, वाघ, कुत्रा अशा अनेक प्राण्यांच्या संयोगातून तयार झालेला. हे शिल्प विविध कालखंडात आणि हिंदू-मुस्लीम अशा दोन्हीही स्थापत्यावर दिसते. समोरच गडाची सदर असून आजमितीस त्या वास्तूची भिंत व देवळ्या तेवढय़ा शाबूत आहेत.
लळिंगचा घेर आटोपशीर. मध्यभागी एक छोटीशी टेकडी, तिच्यावरच गडाचा बालेकिल्ला आणि उर्वरित सपाटीचा भाग तटाकडेने धावणारा. या तटाकडेच्या फेरीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून डावी-उजवीकडे दोन वाटा फुटतात. अगदी सुरुवातीला उजव्या हाताला वळावे.
लळिंगला निघाल्यापसून सतत खुणावत असणारे कमानींचे बांधकाम इथे पुढय़ात उभे असते. पूर्व तटालगतचे हे बांधकाम. तटावरच विटांचे काम केलेले.
त्यामध्ये गवाक्षांच्या कमानी नटवलेल्या. भिंतीच्या डोक्यावर पुन्हा पाकळय़ांच्या नक्षीची ओळ! शेजारच्या तटावरही मारगिरीच्या या चर्या! मुस्लीम स्थापत्यशैलीतील ही सारी कलात्मकता! बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा नेमका अंदाज येत नाही.
येथून वर आल्यावर उजवीकडे गडाची तटबंदी व बुरुज त्याच्या माथ्यावर तोफेचा गोल कट्टा पाहायला मिळतो. या तोफेच्या माऱ्यात गडाच्या या उत्तर बाजूच्या खालचा सर्व टप्पा येतो.
या बुरुजावरून खाली पाहिल्यास एक बांधीव पण सध्या कोरडा पडलेला तलाव व त्याच्या काठावर असलेली घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेते.
गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत आपल्याला दिसते ती याच ठिकाणी नजरेस पडते. मुस्लीम स्थापत्यशैलीतील हे बांधकाम विटांचा व चुन्याचा वापर करून केलेले आहे. बाहेरून भव्य वाटणाऱ्या या वास्तूची आतील बाजू पडलेली असल्याने तिचा अंदाज येत नाही. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे.
येथुन मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते तसेच वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही दिसतो. या बुरुजापलीकडे गडाच्या सुंदरतेत भर घालणाऱ्या पाच-सहा चर्या पाहून पुन्हा दरवाजापाशी येउन डाव्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते.
वाटेत कातळात तयार केलेली पाण्याची तीन टाकी असुन त्यात उन्हाळ्यात ब-याच काळापर्यंत पाणी असते. या पाण्याला कुबट असा वास येत असला तरी पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते परंतु हे पाणी पिण्यायोग्य वाटत नाही.
पुढे टेकडीलगत चुन्यात बांधलेले तेला-तुपाचे रांजण येतात. गडावर जसे दारूगोळय़ाचे, धान्याचे कोठार, पाण्याचे हौद, तसेच हे तेला-तुपाचे रांजण! गडकोट ही कायम संघर्षांची -युद्धाची भूमी. अशा या युद्धभूमीवर मग जखमींच्या उपचारासाठी या तेला-शुद्ध तुपाचे साठे ठेवावे लागतात.येथून पुढे बालेकिल्ल्याचे पठार सुरु होते. या ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. लळिंगच्या टेकडीभोवती दक्षिण अंगास काही टाक्या खोदलेल्या आहेत. पण गडावरील साऱ्याच हौदातील पाण्याने जणू वैर मांडलेले. हिरवा, पिवळा, काळा असे निरनिराळे रंग, वासही चार हात दूर ठेवणारे. काय करणार, या गडाची काळजी घेणारे त्याचे मालकच कधी शेकडो वर्षांपूर्वी हे घर सोडून खाली उतरले. तिथे मग हे पाणी रुसून बसणार नाहीतर काय!
पठाराच्या चहूबाजुंना तटबंदी असुन चर्या पहायला मिळतात. काही ठिकाणी महिरपी युक्त तटबंदी सुध्दा आढळते. लळिंग किल्ल्याच्या कातळ माथ्यावर जेथे गरज आहे तेथेच तट बांधण्यात आला असून काही ठिकाणी तटबंदीशिवाय बांधण्यात आल्या आहेत.
कमानींच्या या पाकळय़ांमधून दक्षिण-पश्चिमेकडील पिसोळगड, कंक्राळा, डेरमाळ, गाळणा अशी अनेक दुर्गशिखरे डोकावतात. पठारावरच एक टेकाड उंचावलेले आहे. या टेकाडाच्या पोटात अनेक गुहा खोदलेल्या असुन किल्ल्यावर अशा गुहांची संख्या बरीच दिसून येते.
टेकाडावर चढून गेल्यावर एक चुनेगच्ची बांधकाम असलेली दारुकोठाराची इमारत लागते.
या कोठाराच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा खंदक असुन कातळकोरीव तीन पाण्याची टाकी आहेत.
या पाण्याच्या टाक्यांना लागून एक काळ्या दगडातील बांधीव चौकोनी कुंड आहे.
समोरच ललितामातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. किल्ल्यावर राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात.
मंदिरासमोर अनेक चौथरे असून त्यातील एक राजवाडय़ाचा चौथरा आहे. लळिंगवरची ही सारी बांधकामे फारुकी काळातील.
एकुणच माथ्याचा विस्तार आणि पाण्याची गैरसोय विचारात घेता, गडावरील दारुकोठारात ४ ते ५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते किंवा प्रवेशव्दाराच्या अगोदर असणार्या काही गुहांमध्ये १० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मात्र या गुहा बर्याच प्रमाणात अस्वच्छ आहेत. प्रवेशव्दाराच्या जवळच पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. मात्र येथील पाण्याला कुबट असा वास येतो, तेव्हा खाली गावातून पाणी आणणे योग्य होईल.
गडाच्या काठाकाठाने लळिंग किल्ल्याच्या पश्चिमेकडील चोर दरवाज्यात पोहोचायचे.
हा छोटा दरवाजा त्याच्यात घेऊन जाणारा दगडी जिना व त्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत उभी आहे. या गुप्त दरवाजाने खाली उतरणारी वाट गडाच्या माचीवर घेऊन जाते.
गुप्त दरवाज्यातून खाली उतरत असतांना कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते. येथून थोडे खाली उतरल्यावर वाट उजवीकडे वळते.
वाटेतच देवीचे एक पडके मंदिर आहे. मंदिराच्या समोरुन जाणारी ही वाट सरळ माचीवर जाते.
या माचीवर पाण्याचा एक भला मोठा खोदीव बांधीव तलाव असुन त्याच्या काठावर एक घुमटवजा मनोरा आहे.
अष्टकोनी हा तलाव साधाच पण त्याच्या एका कोनावर उभारलेल्या मनोऱ्याने त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
मनोऱ्याच्या समोरील बाजूस पाण्याची दोन टाकी आहेत. गडावर राबता असताना या तलावाला केवळ पाण्याचा साठा ईतकेच महत्व नक्कीच नसणार.
ज्या कलात्मक दृष्टीने याची बांधणी केली ती पहाता गडाच्या विशारदाच्या सौंदर्यदृष्टीचे कौतुक वाटते. मन नकळत त्या काळात जाते. कसे असेल त्यावेळचे दृश्य.. पाण्याने भरलेला हा जलाशय असेल, त्यामध्ये कमळांचे वेल असतील, बदकांच्या काही जोडय़ा त्यामध्ये विहार करत असतील आणि या साऱ्यांतील सौंदर्य अनुभवत कुणी शाही परिवार तिथे त्या मनोऱ्यात पश्चिमेच्या वाऱ्याशी हितगूज करत असेल! ..स्वप्नांची ही दुनिया आज कोरडय़ा पडलेल्या या तलावालाही थोडेसे ओले, नाजूक, तरल करून जाते.
टाक्याच्या वरील बाजुस एक कबर उघडयावर असुन दोन कबरी असलेला ढासळलेला दर्गा आहे.
किल्ल्याच्या माचीला काही ठिकाणी तटबंदी आहे. या भागातुन बालेकिल्ल्याच्या तटबंदी बुरुजांचे व त्यावरील महिरपी व चर्याचे सुंदर दर्शन होते. माचीवर फेरफटका मारुन आपण तलावाला उजवीकडे ठेवून पुढे वर चढत जायचे. ही वाट पुन्हा आपल्याला उध्वस्त प्रवेशव्दाराच्या जवळ घेऊन जाते. येथे दोन तासाची लळिंग माथ्याची गडफेरी पूर्ण झाली. सर्व परिसर पाहून आल्या मार्गाने परत लळिंग गावात उतरायला सुरवात केली. उतरताना या किल्ल्याचा ईतिहास मनात घोळू लागलो.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये खानदेशातील फारूकी घराणे एक मोठे राजघराणे. या घराण्याने खानदेशावर तब्बल दोनशे वर्षे राज्य केले. इ.स.१३७० मध्ये मलिक याने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली. इ.स.१३७० ते १३९९ या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. इ.स.१३९९ मध्ये मलिकच्या मृत्युनंतर त्याचा मोठा मुलगा नसीरखान याच्या ताब्यात लळिंगचा परिसर आला व हा भाग फारुकी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने या किल्याला राजधानीचा दर्जा दिला व लळिंग ही खानदेशाची राजधानी झाली. मलिकनें आपल्या मोठया मुलास थाळनेर ऐवजीं हा किल्ला दिला यातच या गडाचे महत्व अधोरेखित होते. इ.स.१४०० मध्ये नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व त्याला राजधानी घोषीत केले. पुढे १४३५ मध्ये बहमनी सुलतान व नसीरखान यांच्यात लढाई होऊन त्यात नसीरखानचा पाडाव झाला. बहमनी सुलतानाने बुऱ्हाणपूर जाळून खाक केल्याने नसीरखानने परत लळिंग किल्ल्याचा आसरा घेतला पण बहमनी सरदार मलिक-उल-तुजार याच्या सैन्याने त्याचा पाठलाग करत लळिंग परिसर गाठला. त्या वेळी नसीरखान स्वत: गडाखाली उतरून २००० घोडदळ व असंख्य पायदळाच्या मदतीने बहमनी सैन्यावर तुटून पडला. लळिंगच्या पायथ्याला मोठी लढाई झाली पण त्यात नसीरखानाचा पराभव होऊन त्याला लळिंग किल्ल्यावर परतावे लागले. या युद्धात बहामनी सरदाराला ७० हत्ती व प्रचंड संपत्ती मिळाली. त्यामुळे लळिंग किल्ला घेण्याच्या फंदात न पडता ही लूट घेऊन तो बिदरला निघून गेला. हा पराभव नसीरखानाच्या जिव्हारी लागला व आजारी पडून १७ सप्टेंबर १४३७ रोजी लळिंग किल्ल्यावर मरण पावला. इ.स. १६०१ मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र बनले. इ.स.१६३२ मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला लळिंगच्या किल्लेदाराच्या शिष्टाईने मुघल अधिपत्याखाली आला. १६३२ मध्ये लळिंगचा मोगल किल्लेदार मीर कासिम हा होता. लळिंग जवळील गाळणा गड त्यावेळी निजामशाहीत होता आणि तेथील किल्लेदार महमुदखान याने गड शहाजीराजेंच्या ताब्यात देण्याचे ठरविले होते. ही बातमी खानदेशचा सुभेदार खानजमान याला लागल्यावर खानाने लळिंगचा किल्लेदार मीर कासिमला लिहिले कि महमुदखानाला बादशाही नोकरीत येण्यासाठी प्रवृत्त करा आणि किल्ला शहाजीच्या हातात जाऊ देऊ नका. मीर कासिमने हे महत्त्वाचे काम बजावून गाळणा किल्ला मोगलाईत सामील केला. सन १७५२ मध्ये मराठय़ांनी भालकीच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यावर लळिंग मराठी साम्राज्यात सामील झाला. पेशव्यांनी गड मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला व त्यांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालु लागला. इ.स.१८१८ मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला.
विशेष म्हणजे लळींगचे ईतिहासातील उल्लेख इथेच संपत नाहीत.लळींग किल्ल्याच पुर्ण उतारावर गवत पसरलेले आहे. लळिंगच्या या गवताला खरेतर ऐतिहासिक संदर्भ! महात्मा गांधींनी ज्या वेळी मीठाच्या सत्याग्रहाचे आंदोलन जाहीर केले त्या वेळी त्याच्या समर्थनार्थ खान्देशातही चळवळ उभी राहिली. फक्त अडचण आली, ती इथे समुद्र कुठून आणायचा? मग या भिल्ल, आदिवासी जनतेने ब्रिटिशांनी केलेला गवत कापण्याविरोधातील कायदा मोडण्याचे ठरवले. १ सप्टेंबर १९३० रोजी ही सारी जनता इथे लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी जमा झाली आणि गवताची कापणी करत सविनय कायदेभंग केला. लळिंगच्या गवताला जणू दांडीच्या मिठाचे महत्त्व आले! इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे.
झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर
या लळींग भेटीत आणखी एक न चुकता पहाण्याचे ठिकाण म्हणजे मालेगाव धुळे रस्त्यावरचे झोडगे येथील शिवमंदिर. लळींग पाहून मला ईथे पोहचायला संध्याकाळ झाली, अंधारुन आल्यामुळे जेमतेम प्रकाशात मंदिर पहाता आले, त्यामुळे फोटो काढता आले नाहीत, सहाजिकच आंतरजालावर मिळालेले फोटो टाकतो.
यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. ते गाव नाशकातील मालेगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्वरचे ते मंदिर सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिरासारखी आहे.
झोडगे येथील मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची रचना मुखमंडप, खांब नसलेला मुख्य मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या समोर चौथरा असून त्यावर नंदीची मूर्ती पाहण्यास मिळते. मंदिराचे शिखर पाहिले, की रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिराची आठवण होते. मंदिर पश्चिमाभिमुख असल्यामुळे मंदिरातील शिविपडीचा वारीमार्ग उत्तर दिशेकडे जाणारा म्हणजेच पर्यटकाच्या डाव्या हाताला दिसतो.
स्थापत्यशास्त्रानुसार ते भूमीज मंदिर आहे. त्याचा पसारा सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा लहान असला तरीसुद्धा त्या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. मंदिर शैव असल्यामुळे अर्थातच त्यावर शिवाच्या विविध मूर्ती पाहण्यास मिळतात. त्यातही एका देवकोष्ठात असलेली अंधकासुरवधाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. त्यासोबतच मंदिराच्या बाह्यांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन, शिखरावर असलेले कीर्तिमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहेत. चामुंडेचे भयावह शिल्प त्यातील बारकाव्यांसह तेथे पाहण्यास मिळते. अष्टदिक्पालसुद्धा तेथे मंदिरावर कलाकुसरीने कोरलेले आहेत. शिल्पकामाची एवढी विविधता असलेले हे मंदिर एकांतात वसलेले आहे. गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला झटुंब्याचा डोंगर असे म्हणतात. त्या डोंगरावरील देव हा घोड्यावर बसलेला असून तो गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
या माणकेश्वर मंदिराची आणखी माहिती देणारा मायबोलीवरचा हा धागा देवळांच्या देशा - "माणकेश्वर हेमाडपंथी मंदिर (झोडगे)"
(काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा. डॉ. जी.बी. शहा
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) धुळे जिल्हा गॅझेटियर
४ ) http://www.thinkmaharashtra.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
23 Dec 2017 - 8:56 am | प्रचेतस
खूप पूर्वी धुळ्याला जाताना लळिंग किल्ला बघून झाला होता. त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
23 Dec 2017 - 9:08 pm | एस
उत्तर महाराष्ट्रातील हा एक महत्त्वाचा किल्ला. बरेच दिवस झाले भेट देण्याच्या यादीत आहे. नक्कीच जाईन तेव्हा तुमच्या लेखाची मदत होईल हे नक्की.
28 Dec 2017 - 9:40 am | श्री गावसेना प्रमुख
फोटो तुषार कमलाकर देसले
28 Dec 2017 - 7:29 pm | दुर्गविहारी
आपल्याच प्रतिसादाच्या प्रतिक्षेत होतो. मी भेट दिलेली तेव्हा आपण ईथे रहाता हे माहिती नव्हते आणि मुख्य म्हणजे मी मि.पा.चा सदस्य नव्हतो. नाही तर शिवसेनाप्रमुखांची भेट झाली नाही तरी गावसेनाप्रमुखांची तरी झाली असती. ;-)
शक्य झाल्यास अजून थोडी माहिती द्या. तुम्ही टाकलेला फोटो अप्रतिम आहे. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.
28 Dec 2017 - 7:31 pm | दुर्गविहारी
सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. यानंतरचा अनवट किल्ले मालिकेतील भाग भामेर आणि रायकोटवर असेल.
21 Mar 2018 - 6:37 am | गोरगावलेकर
झोडगे येथील माणकेश्वर मंदिर माझ्या गावी जाण्याच्या वाटेवर असूनही कधी जाणे झाले नव्हते. आपला लेख वाचून गेल्याच महिन्यात येथे आवर्जून जाऊन आले. मंदिर अतिशय सुंदर आहे. येथे फोटो टाकायला जमले नाही. फोटोची लिंक देत आहे.
https://photos.app.goo.gl/lORACsVtWkqvnInE2
21 Mar 2018 - 1:11 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद. माझ्या धाग्यामुळे तुम्हाला माणकेश्वर मंदिराची माहिती झाली आणि नुसत्या माहितीवर समाधान न मानता तुम्ही मंदिर प्रत्यक्ष पाहून आलात हि बाब मनाला समाधान देउन गेली. याच कारणासाठी या अनवट ठिकांणावर लिखाण करत आलो आहे. अश्या प्रोत्साहनामुळे पुढेही लिखाण करण्याचा उत्साह वाढला.
बाकी मला अंधुक उजेडामुळे फार फोटो काढता आले नाहीत, पण आपण काढलेले फोटो मनापासून आवडले.
21 Mar 2018 - 1:14 pm | दुर्गविहारी
आज माझा एखादा धागा मुख्य बोर्डावर पाहून सुखद धक्का बसला. धागा वर आणल्याबध्दल सा.स.चे मनापासून आभार.
21 Mar 2018 - 8:50 pm | जयन्त बा शिम्पि
मी धुळे येथील रहिवासी असुन फक्त एकदाच लळिंग किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता. मात्र त्यावेळी इतक्या बारकाइने निरिक्षण केलेले नव्हते. लेखातील सर्व माहिती वाचून व फोटो पाहून , पुढच्याच महिन्यात किल्ला पहावयास नक्की जाणार . हे असे झाले की " तुझे आहे तुजपाशी,परि तु जागा विसरलाशी " पुलेशु.
23 Mar 2018 - 8:38 am | विशाल कुलकर्णी
अतिशय सुंदर लेख. पूर्वी त्या भागात नोकरीच्या निमित्ताने खुप फिरणे झालेय. या मार्गाने जाताना तो बुरुज पाहुन बऱ्याचदा उत्सुकता चाळवली जायची पण कधी वर गड चढून जाणे नाही झाले.