डोंगरवाटांचं सौंदर्य पाहायचं तर पायीच भटकायला हवं असं नाही. प्रवास ट्रेनचा असो, बस किंवा चारचाकीचा असो, घाटवाटा, धुकं, पाऊस, कोसळणारे धबधबे हे मोहवून टाकतातच!
उत्तर युरोपातील नॉर्वे या देशाचं नाव घेतलं की फ्योर्डस् (Fjords) आणि northern lights (aurora borealis) आठवतात. यातलं दुसरं आकर्षण पाहणं सोपं नसलं तरी फ्योर्डसचं संथ पाणी मात्र पर्यटकांचं स्वागत करायला असतंच. फक्त ऋतूनुरूप त्याच्या आजूबाजूचे पर्वत कधी बर्फ लेवून समाधिस्त दिसतात, तर कधी धबधब्यांचे तुषार उडवत असतात. नॉर्वेच्या या भागात प्रवास करणे हासुद्धा पर्यटनाचाच एक भाग आहे, असं वाचलं होतं. त्याचा प्रत्यय २०१४ साली नॉर्वेतील एका बसप्रवासात आला. पर्यटकांची गर्दी टाळून नॉर्वेच्या अंतर्भागात वाट वाकडी करून केलेल्या त्या प्रवासाने निसर्गाची इतकी अप्रतिम रुपं दाखवली की आजही नॉर्वे म्हटलं की तो प्रवास आठवतो.
प्रवासाला सुरूवात झाली Ålesund या पश्चिम किनार्यावरील शहरातून. गंतव्य होतं सुप्रसिद्ध Sognefjord च्या Lustrafjorden या शाखेवरील Nes हे चिमुकलं गाव. २६० किलोमीटरचा हा प्रवास बसने करायला सुमारे सात तास लागणार होते. एवढा वेळ लागायची कारणं होती कमी वेगमर्यादा असलेले काही रस्ते आणि फ्योर्डसमध्ये अनिवार्य असलेला जलप्रवास.
ऑलेसुंड (Ålesund) ते शाइ (Skei) साडेचार तास, नंतर Sogndal पर्यंत एक तास आणि शेवटी Sogndal ते Nes एक तास असा एकूण प्रवास होता. ऑलेसुंडहून सकाळी अकराला निघायचं होतं. पण सकाळपासून रूमच्या खिडकीतून दिसणारे ढग तिथेच होते.
बस सुटल्यावरही हवामान बदलायचं चिन्ह दिसत नव्हतं. तसाही शहरी भाग बघण्यात रस नव्हताच. थोड्या वेळाने फ्योर्ड ओलांडण्यासाठी पहिल्या फेरीत चढलो (म्हणजे प्रवाश्यांसकट अख्खी बस चढली) आणि कॅमेर्याला एकदाचं काम मिळालं.
२० मिनिटांचा फेरीचा प्रवास संपला आणि बस पुन्हा मार्गी लागल्यावर पाऊस सुरू झाला. फ्योर्डच्या दुसर्या शाखेतून येणारी फेरी फोटोत दिसत आहे.
आता रस्ता पाण्याच्या कडेने जात होता. वातावरण ढगाळ असलं तरी पलीकडच्या तीरावरचे डोंगर, कुठे पाण्याच्या काठावर असलेली टुमदार घरं सुरेखच दिसत होती. मे महिना असल्याने हिवाळा संपून थोडीफार हिरवळही होती.
फ्योर्डच्या तीरावर दिसलेले हे या प्रवासातील एकमेव शहर. पाचेक मिनिटांनी बस पुन्हा एका बोटीच्या धक्क्यावर आली तेव्हा लक्षात आलं आता तिकडेच जायचंय.
इथे थोडं या फेरींबद्दल लिहायलाच हवं. नॉर्वेच्या फ्योर्डसच्या भागात अनेक ठिकाणी फेरी बोटी या रस्त्याच्या जाळ्यात मोडतात. आमची बस ज्या E३९ या युरोपियन महामार्गावरून जात होती त्याच रस्त्याचा ही फेरी एक भाग होती. स्वतः गाडी चालवून नॉर्वेत फिरायचं असेल तर वाटेतल्या सगळ्या फेरींची वेळापत्रके पाळणं महत्त्वाचं ठरतं. कुठेतरी मस्त धबधबा वगैरे दिसला म्हणून थांबलो आणि फेरी गेल्यामुळे अडकलो असं होऊ शकतं. शिवाय फेरीचं शुल्कही द्यावं लागतं.
बसच्या वाहतुकीत फेरी अंतर्भूत असल्याने वेगळा आकार नसतो. फेरी चालवणार्या वेगवेगळ्या कंपन्या असतात. बस आणि फेरीची वेळापत्रकं integrated असल्याने आणि बसेस (मे महिन्यात तरी) वेळेवर धावत असल्याने अजिबात व्यत्यय न येता प्रवास सुरू राहतो. शाइला पोहोचेपर्यंत तीनदा फेरीने वेगवेगळे फ्योर्डस् ओलांडले. प्रत्येक फेरीच्या वेळी एकच दृश्य दिसले. सगळ्या खासगी गाड्या धक्क्यावर रांग लावून असत. बस आली की सरळ फेरीवर चढून दुसर्या टोकाला जाऊन थांबत असे. मग बाकीच्या गाड्या चढत. पलीकडच्या धक्क्यावर सगळ्यांत आधी बस बाहेर पडे. पण त्यामुळे उगाच आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत्येय असं वाटायचं!
फेरीत बस चढली की चालकासकट सगळ्यांनाच पाय मोकळे करायला मिळत. भणाणणारा वारा खायला मिळे. अर्थात फेरीगणिक इतर खानपानाचीही सोय असते. त्यात मला विशेष आवडले Brunost हे कॅरेमलच्या चवीचं चीझ भरलेले पॅनकेक्स. एका फेरी कंपनीच्या बोटींवर खाल्ले त्या चवीचे पॅनकेक्स इतर कुठे मिळाले नाहीत.
फेरीनंतर E३९ हा महामार्ग सोडून बस FV६५१ या लहान रस्त्याने निघाली. E३९ फेरी न घेता लांबून वळसा घेऊन Nordfjordeid ला जातो. अर्थात रस्ता कोणताही असला तरी बाहेर दिसणारी निसर्गाची रूपं अप्रतिमच होती. डोंगरमाथ्यावर वितळणारं बर्फ खाली आणणार्या असंख्य जलधारा आणि कुठे मोठे धबधबे डोळ्यांना सुखावत होते.
Nordfjordeid ला बस थोडा वेळ थांबणार होती. मग थोडी झोप काढली. जाग आली तेव्हा बस पुन्हा महामार्गावरून धावत होती. बाहेरचं दृश्य पाहून झोप लागल्याची हळहळ वाटली.
पुन्हा एक छोटा जलप्रवास पार पडला. शाइला पोहोचायला सुमारे एक तास होता. खिडकीतून बाहेर बघण्यात मस्त वेळ जात होता.
शाइला उतरल्यावर बस पुढे निघून गेली. डोंगरांनी वेढलेलं सुंदर गाव होतं शाइ. वीसेक मिनिटांनी Sogndal ला जाणारी बस आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. Jostedalsbreen राष्ट्रीय उद्यानाच्या जवळून रस्ता जात होता. Jostedal हिमनदी ही युरोपातील मोठ्या हिमनद्यांपैकी एक आहे. तिच्या आजूबाजूचा मोठा पर्वतीय भाग संरक्षित केलेला आहे. उन्हाळ्यात तिथे भटकायला नक्कीच आवडेल.
ढगांनी आणखी गर्दी केल्याने काळोख दाटला. त्यामुळे एकदाची कॅमेर्याला विश्रांती मिळाली. थोड्याच वेळात सोग्नला पोहोचलो. पण प्रवास अजून संपला नव्हता! तिथून तिसर्या बसने Lustra फ्योर्डच्या तीरावरील चिमुकल्या Nes ला एकदाच आणून सोडलं. फ्योर्डच्या बाजूने रस्ता आणि रस्त्यापलीकडे छान सजवलेलं गेस्ट हाऊस बघून सगळा शीण गेला. इथे पुढचे दोन दिवस आराम आणि जवळपास पायी निरुद्देश भटकायचं एवढाच बेत होता. पुस्तक वाचणं नाहीतर पाण्याच्या पलीकडे डोंगरातल्या प्रचंड धबधब्याचा आवाज ऐकणं, कुराणात बागडणारी कोकरं पाहणं यात मस्त वेळ गेला..
भटकताना या सुंदर रंगवलेल्या पोस्टाच्या पेट्या दिसल्या एकदा रस्त्याच्या कडेला.
तासनतास पाहत राहावं, एवढा प्रवास करून आल्याचं सार्थक वाटावं असं दृश्य खोलीच्या बाल्कनीतून दिसत होतं...
प्रतिक्रिया
25 Feb 2018 - 10:23 pm | तुषार काळभोर
हेवा, मत्सर, ईर्ष्या, जेलसी!!!
-(रोज मगरपट्टा-मुंढवा-वाघोलीच्या ट्रॅफिकमधून अप डाऊन करणारा) पैलवान
26 Feb 2018 - 4:56 am | निशाचर
होऊन जाऊ दे मग छोटीशी सहल किंवा ट्रेक!
25 Feb 2018 - 10:50 pm | फारएन्ड
खूप आवडले फोटो आणि वर्णनही. अजून माहिती येउ द्या!
25 Feb 2018 - 11:17 pm | पद्मावति
आहा...सुरेख!
26 Feb 2018 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे
ऋतू कोणताही असो, पाहताच ताबडतोप प्रेमात पडावे इतका सुंदर देश आहे नॉर्वे.
हिवाळ्यात बर्फाने मढलेले नितळ पांढरे सौंदर्य आणि उन्हाळ्यात हिरवाईने नटलेला व असंख्य धबधब्यांनी सजलेला मनमोहक परिसर ! त्या हिरवाईचे आणि धबधब्यांचे फोटो पाहून डोळे निवले ! वर्णन अजून जरा जास्त असते तर अजून जास्त मजा आली असती.
या लेखाने माझ्या नॉर्वे भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि थोडासा झाय्रातीचा दोष पत्करूनही, माझी नॉर्वेची हिवाळ्यातली सफर इथे पाहता येईल, हे सांगायचा मोह आवरला नाही.
26 Feb 2018 - 5:21 am | निशाचर
प्रचंड सहमत!
लेखातल्या जागा बसच्या खिडकीतूनच बघितल्या. त्यामुळे जास्त वर्णन करावं असं वाटलं नाही.
तुमच्या सफरीच्या दुव्यासाठी धन्यवाद, त्यात जाहिरातीचा दोष कसला! मध्यंतरी एक भाग वर आला होता तेव्हापासून ती लेखमाला वाचून काढायची असं ठरवलंय. वाचल्यावर सविस्तर लिहीनच. नॉर्दर्न लाईट्स साठी ट्रूम्सोला जायचं आहे, लोफोटेन बेटंही बघायची आहेत. बघू कधी योग येतो ते.
20 Sep 2018 - 3:40 am | सोन्या बागलाणकर
म्हात्रे सर,
तुम्ही दिलेली लिंक उघडत नाहीये. लिंक बरोबर आहे का ?
23 Sep 2018 - 4:49 am | निशाचर
@सोन्या बागलाणकर, जुन्या लिंकमधील http च्या जागी https टाकल्यास योग्य लिंक मिळेल. डॉ म्हात्रे यांची उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर.
26 Feb 2018 - 2:51 am | मनो
अप्रतिम, स्विस आल्प्स मध्ये किंवा Yosemite नॅशनल पार्क मधले धबधबे आठवले.
अवांतर - स्क्रोल करता येणारा गुगल मॅप कसा जोडायचा? Iframe वापरून पाहिली मागे पण नाही चाललं.
26 Feb 2018 - 5:39 am | निशाचर
गुगल मॅप जोडणीसाठी मीसुद्धा iframe च वापरते. पण iframe कोडमध्ये टाकावी लागते. (त्यासाठी लेखन किंवा प्रतिसाद टंकण्यासाठी असलेल्या चौकटीवर < > हे चिन्ह आहे.)
तुम्हाला माहित असावं, तरीही: iframe साठी गुगल मॅपच्या मेन्यूत (वरच्या बाजूला डावा कोपरा) 'share or embed map' मध्ये गेल्यावर 'embed map' मध्ये iframe मिळेल. तिथे नकाश्याची साईझही देता येते. लॉगिनची गरज नाही.
26 Feb 2018 - 8:39 am | मनो
धन्यवाद, मी कोडमध्ये टाकली नाही म्हणून चालली नसावी. पुन्हा पाहतो करून पुढच्या वेळी.
26 Feb 2018 - 5:23 am | निशाचर
पैलवान, फारएन्ड, पद्मावति, डॉ म्हात्रे आणि मनो, प्रतिसाद दिल्याबद्दल आभार!
26 Feb 2018 - 6:26 am | कंजूस
फोटोसह लेख आवडला. रम्य भाग.
26 Feb 2018 - 8:35 am | प्रचेतस
प्रचंड सुंदर आहे हे.
ह्या फ्योर्डस् हिवाळ्यात गोठत असतील ना? अशा वेळेस प्रवासाची पर्यायी सुविधा काय आहे?
26 Feb 2018 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. नॉर्वेच्या संपूर्ण पश्चिम किनार्याच्या बाजूने गल्फस्ट्रीम नावाचा विषुववृत्तापासून सुरू होणारा बारमाही गरम पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यामुळे त्या देशाचा संपूर्ण किनारा व असंख्य बेटांच्यामध्ये असलेला समुद्राचा भाग हिवाळ्यातही द्रवरूप राहतो... बर्फाने झाकून जात नाही. त्यामुळे, नॉर्वेच्या किनारपट्टीवर बाराही महिने जलवाहतूक चालू असते...
(चित्र जालावरून साभार)
मात्र नॉर्वेचा किनारा संपताच गल्फस्ट्रीमचा प्रवाह कमजोर होतो आणि त्यापुढे सुरू होणारा बॅरेंट समुद्र व रशियाचा किनारा तिथल्या दीर्घ हिवाळ्यात इतक्या जाड बर्फाने गोठलेला असतो की त्याच्यावरून स्नोमोबिलने निर्धोक प्रवास करता येतो. फक्त जमिनीच्या बर्याच आत शिरलेल्या सामुद्रधुन्या व फ्योर्ड्स बर्फाच्छादित होतात. गंमत म्हणजे, यामुळे हिवाळ्यात नॉर्वेच्या अतीउत्तर किनार्याचे तापमान १२-१५०० किमी दक्षिणेला असलेल्या जमिनीने वेढलेल्या भागापेक्षा कधी कधी १०-१२ अंश सेल्सियने जास्त असते !
खालील भर थंडीच्या मोसमात काढलेल्या फोटोत, बर्फाच्छदित 'नोर्डकाप्' उर्फ 'युरोपचे सर्वात उत्तरेकडील भूशीर' आणि त्याच्या उत्तरेकडील द्रवरूप असलेला बॅरेंट समुद्र दिसत आहे...
२. नॉर्वेमध्ये मुख्य भूमी आणि त्याच्या हजारो बेटांच्या समुहाला जोडणारे ७५० किमी पेक्षा जास्त लांबीचे ९०० पेक्षा जास्त भुयारी मार्ग आहेत.
त्यातल्या एकमेकाला छेदून जाणार्या दोन भुयारीमार्गांनी तयार झालेला हा एक भुयारी चौक !...
३. याशिवाय, (अ) भर हिवाळ्यातल्या -१८ किंवा कमी तापमानात व मीटर-दोन मीटर उंच हिमवर्षावाने भरलेल्या विमानतळांवरून सुव्यस्थित चालणारी विमानव्यवस्था आणि (आ) त्याच अवस्थेतल्या रस्त्यांवरून वाहनवाहतूक चालू ठेवण्याची व्यवस्था, केवळ नॉर्वेजियन तंत्रज्ञ व प्रशासनच करू जाणे !
26 Feb 2018 - 1:19 pm | प्रचेतस
रोचक आहे.
धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
26 Feb 2018 - 10:09 pm | निशाचर
गल्फस्ट्रीमच्या नॉर्वेच्या हवामानावर होणार्या प्रभावाची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! नॉर्ड्कापचा फोटो मस्त आहे.
इथे फ्योर्ड्सविषयी थोडं लिहिल्यास अप्रस्तुत नसेल. फ्योर्डस हे तांत्रिकदृष्ट्या समुद्राचा भाग आहेत. (फ्योर्डसना धरल्यास नॉर्वेची किनारपट्टी साधारण ३० हजार किलोमीटर लांब आहे!) फ्योर्डसना नद्या, झरे, धबधबे असे गोड्या पाण्याचे स्त्रोत येऊन मिळतात. हे गोडं पाणी आणि समुद्राचं खारं पाणी एकमेकांत मिसळत असतं. पाण्याच्या तापमानातील फरक, गल्फ स्ट्रीम, मुखापासून अंतर, उन्हाळ्यात वाढलेलं गोडं पाणी अश्या घटकांमुळे फ्योर्ड्सच्या गोड्या आणि खार्या पाण्याचं प्रमाण बदलत असतं. उदाहरणार्थ साधारणतः हिवाळ्यात खारं पाणी फ्योर्ड्सच्या जास्त आत येतं, जे गल्फस्ट्रीममुळे कमी थंड असतं. त्यामुळे नॉर्वेतले फ्योर्ड्स सहसा गोठत नाहीत. बारमाही धबधबे, फ्योर्ड्ससदृष तळी मात्र गोठतात किंवा काही अंतर्भागातील फ्योर्ड (बहुतेक ओस्लो फ्योर्ड) गोठू शकतात.
26 Feb 2018 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
पाण्याच्या प्रवाहाने जमीन झिजून डोंगरांच्यामध्ये बनलेल्या खोल भागाला दरी म्हणतात; तर हिमनद्यांच्या प्रवाहाने जमीन झिजून डोंगरांच्यामध्ये खोल बनलेल्या आणि सलग असलेल्या समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या भागाला फ्योर्ड म्हणतात. समुद्रापासून खूप अंतरापर्यंत भूभागात पसरलेल्या फ्योर्डमधले पाणी, त्यांच्याकडे सतत वाहणार्या हिमनदी/नदीच्या पाण्यामुळे, गोडे असू शकते.
26 Feb 2018 - 9:28 am | सुबोध खरे
सुंदर अप्रतिम
26 Feb 2018 - 11:13 am | अनिंद्य
@ निशाचर,
सुंदर लेखन आणि फोटो.
आपल्या एकाच ग्रहावर निसर्गाचे किती वैविध्य !
तुम्हाला २०१४ मध्ये केलेली ही बस-जलफेरी यात्रा सुसूत्रपणे आठवली याचे कौतुक वाटले.
स्वगत:- एकदा गोठलेल्या नॉर्वेला जायलाच हवे :-)
- अनिंद्य
26 Feb 2018 - 9:13 pm | निशाचर
अवश्य जा नॉर्वेला, मग तो बर्फाने गोठलेला असो किंवा उन्हाळ्यातला धबधब्यांनी नटलेला!
ते माहिती साठवलेली असल्यामुळे :)
1 Mar 2018 - 11:33 am | अनिंद्य
अवश्य जा नॉर्वेला, मग तो बर्फाने गोठलेला असो किंवा उन्हाळ्यातला धबधब्यांनी नटलेला!.....
God willing, soon !!
ओस्लोचे ऑपेरा हाऊस, पाब्लो पिकासोच्या चित्रावर बेतलेले Y ब्लॉक, रेंझो पियानोची लाकडी इमारत, Gustav Vigeland ची डुईंग ह्युमन थिंग्स शिल्पे..... मला तर निसर्गाच्या बरोबरीने तेथील इमारती पाहण्यातही प्रचंड रुची आहे. Architecture there has a different flavour altogether :-)
26 Feb 2018 - 1:28 pm | खटपट्या
छान माहीती. खर्च कीती आला? कोणती साइट आहे का ही ट्रीप बूक करण्यासाठी तेही सांगा...
26 Feb 2018 - 10:38 pm | निशाचर
खर्च या बसप्रवासाचा सांगणे शक्य होईल. परंतु हा प्रवास पूर्ण सहलीतील एक छोटा टप्पा होता. अश्या सहलीचा खर्च किती दिवस कुठे जाणार, कुठे राहणार, काय पाहणार सारख्या अनेक गोष्टींप्रमाणे बदलत असल्याने खर्चाचा अंदाज देणे कठिण आहे.
एकूण सहलीत Geiranger Fjord, Norway in a Nutshell सारखी आकर्षणंही समाविष्ट होती. बुकिंगसाठी कुठलीही साइट किंवा टूर वापरली नव्हती. सगळी माहिती जालावर शोधून (त्यासाठी TripAdvisor उत्तम), त्याप्रमाणे आराखडा ठरल्यावर हॉटेल्स, काही आवश्यक तिकिटं हे सगळं स्वतःच जालावर बुक केलं होतं. त्यासाठी अर्थातच खूप वेळ, आवड आणि चिकाटीही हवी.
तुम्हाला काही specific माहिती हवी असल्यास किंवा प्रश्न असल्यास अवश्य सांगा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
26 Feb 2018 - 1:44 pm | चौकटराजा
खरे तर बहुतान्श युरोप खण्ड हे जलाशयांसाठी व जलवाहतुक करण्यास योग्य अशा नद्यांसाठी नावाजलेले आहेच. त्यात हा देश म्हणजे तर कहरच ! आपण जर पुन्हा नॉर्वे ला जाणार असाल तर पिन्केर्टन ( असाच काहीसा उच्चार असलेले ) या ठिकाणास अवश्य भेट द्या. इथे ४०० फुटावरून खाली नदीत उड्या मारतात म्हणे.
26 Feb 2018 - 9:26 pm | निशाचर
Preikestolen (इंग्रजीत Pulpit Rock) म्हणायचं असावं तुम्हाला. सुंदर जागा आहे ती. वर जाण्यासाठी एक लहान पण खडा ट्रेक आहे.
हे ठिकाण आवडलं असेल तर Stavanger जवळच्या Trolltunga (ट्रोलची जीभ) चे फोटो नक्की पाहा. हवेत झेपावणारा हा कडा भारी आहे. इथे वर जायचा ट्रेक बराच मोठा आहे.
26 Feb 2018 - 9:36 pm | निशाचर
कंजूस, प्रचेतस, सुबोध खरे, अनिंद्य, खटपट्या आणि चौकटराजा, हा प्रवास आवडल्याचे आपण आवर्जून सांगितले, त्यासाठी धन्यवाद!
27 Feb 2018 - 6:33 am | विजुभाऊ
खुप सुंदर शब्द चित्रण
27 Feb 2018 - 12:01 pm | दुर्गविहारी
अप्रतिम फोटो आणि तितकेच सुंदर वर्णन !!! सुहास म्हात्रे साहेबांची लिंकही तितकीच छान. कधी जायला मिळेल कि नाही याची कल्पना नाही. पण उत्तम चित्रसफर घडली. पण हे वेळेच बंधन पाळायचे म्हणजे माझ्यासारख्याला अवघड जाणार. वाटेत काही चांगले दिसले कि थांबलोच मी.
आणखी असेच धागे तुमच्याकडून यावेत. पु.ले.शु.
27 Feb 2018 - 2:24 pm | सोमनाथ खांदवे
हूश्श ! , एक नं फोटो आणि प्रवास वर्णन .लोकसंख्य कमी असणारे देश स्वर्गा पेक्षा कमी नाही हे खरं .
1 Mar 2018 - 12:55 am | किल्लेदार
खरंतर कुंद, ढगाळ वातावरण आवडत नाही पण फोटो बघितल्यावर वाटलं की २-४ दिवस निरुद्देश भटकायला आणि संध्याकाळी फायरप्लेस जवळ एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात आवडती स्कॉच घेऊन बसायला जागा उत्तम दिसते.
1 Mar 2018 - 10:00 pm | निशाचर
विजुभाऊ, दुर्गविहारी, सोमनाथ खांदवे, किल्लेदार तसेच सगळ्या वाचकांचे आभार!
नॉर्वेसारख्या निसर्गरम्य देशाची एक छोटीशी झलक या लेखातून द्यायचा प्रयत्न केला होता. त्याला मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद पाहून अश्या आणखी काही ठिकाणांविषयी लिहिण्याचा उत्साह नक्कीच वाढला आहे.
@दुर्गविहारी, वेळेचं बंधन पाळण्यासाठीच गपगुमान बसचा प्रवास केला.
@खांदवे, लोकसंख्या कमी असणार्या देशांतील निसर्ग अधिक जपला जातो. पण तिथल्या लोकांचं जीवन खूप आरामदायी असतं असं नाही. अर्थात तो वेगळ्या लेखाचा विषय होईल.
@किल्लेदार, फ्योर्डसचं सौंदर्य अनुभवायला जर निवांत वेळ मिळाला तर क्या कहने!
18 Sep 2018 - 2:04 pm | महासंग्राम
वा वा क्या बात है, फोटो हॅरी पॉटर मधल्या hogwarts ची आठवण झाली, विशेषतः शेवटचा चॅपल(?) चा अतिशय सुंदर आहे
23 Sep 2018 - 4:58 am | निशाचर
शेवटचा चर्चचा फोटो मलाही आवडतो. बाल्कनीतून ते दृश्य दिसत असे.
प्रतिसादासाठी आभार!