साहित्य
१ कप रात्रभर भिजवलेला सोया
१ कप सोया चंक्स
१ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
१ मोठा चमचा प्रत्येकी, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा प्रत्येकी, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला
४ ते ५ चमचे घट्ट दही
२ ते ३ चमचे तेल/तूप
चवीनुसार मीठ
आइस्क्रीम च्या काड्या, लागतील तश्या
कृती
एका मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवा. पाण्याला उकळी आली कि त्यात ३/४ चमचे मीठ टाकून, सोया चंक्स साधारण ५ ते १० मिनिटे उकळून घ्या.
चंक्स, गरम पाण्यातून काढून, गार पाण्यात थोडा वेळ गार करत ठेवा.
चंक्स गार झाले कि मग हाताने दाबून पाणी काढून, त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या.
रात्रभर भिजवलेले सोया, निथळून, मिक्सर मधून बारीक वाटून घ्या (लागल्यास थोडं पाणी घाला).
सोया चंक्स मध्ये हे वाटलेले सोया घाला. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. ह्या मिश्रणात, आता हळू हळू मैदा, आणि पीठ घालून हे कणकेसारखं मळून घ्या. मळून झाला कि त्यावर ओलं फडकं टाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.
ह्या मिश्रणाच्या आता आपल्याला जाडसर पोळ्या लाटायचा आहेत (मी ह्या साठी साधा रोटी मेकर वापरला, पण तुम्ही पोळपाट-लाटणे वापरून जराश्या जाडसर पोळ्या लाटून घेऊ शकता)
ह्या पोळ्यांचे लांब तुकडे कापून, ते आइस्क्रीम च्या काड्यांवर गोल फिरवून बसवा. सगळी कणिक अश्या प्रमाणे पोळ्या लाटून, तुकडे कापून चांप तयार करून घ्या. तयार चांप फ्रीज मध्ये १० ते १५ मिनिटे ठेऊन द्या.
एका मोठ्या पातेल्यात पाण्याला उकळी येऊ द्या [पाणी भरपूर घ्या]. पाण्याला उकळी आली कि सोया चांप गरम पाण्यात घालून, साधारण १५ ते २० मिनिटे उकळून, शिजवून घ्या. गरम पाण्यातून चांप काढून गार करून घ्या.
हे असे तयार चांप हवाबंद पिशवीत घालून फ्रीजर ला ठेऊ शकता. लागतील तसे बाहेर काढून वापरू शकता. फ्रीजर मध्ये साधारण २० ते २५ दिवस सहज टिकतात.
एका भांड्यात घट्ट दही, आलं, लसूण, मिरची पेस्ट, सगळे मसाले, २ चमचे तेल/तूप आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
ह्यात चांप घालून मसाला सगळ्या बाजूने नीट लावून घ्या. हे साधारण ३० ते ४५ मिनिटे मॅरीनेट करत ठेवा.
ग्रिल पॅन गरम करून त्याला ब्रश ने थोडंसं तूप/तेल लावून घ्या. ग्रिल पॅन नसल्यास साध्या तव्यावर सुद्धा थोडं तेल/तूप लावून हे चांप दोन्ही बाजूने छान भाजून घ्या (साधारण ४ ते ५ मिनिटे दोन्ही बाजूने). ओव्हन असल्यास ओव्हन मध्ये ब्रॉईल मोड मध्ये भाजून घेऊ शकता.
शेवटी एकदा वरून ब्रशने तेल/तूप लावून गरम गरम तंदूरी सोया चांप, पुदिना चटणी, कांद्याचे काप, बारीक कोथिंबीर आणि लिंबू पिळून आणि तव्यावर केलेल्या गार्लिक नान मध्ये गुंडाळून खायला घ्या!
[ह्या चांप ला गरम कोळसा आणि तुपाची धुरी दिली तर अजून छान चव येते. धुरी कशी द्यायची हे मी मागे बिना ओव्हन तंदूरी चिकन च्या पाककृतीत दिलेलं आहे.]
[ह्या चांप चे अफगाणी सोया चांप पण मस्त होतात. तव्यावरचे नान आणि अफगाणी सोया चांप ची पाककृती टाकेन पुढे कधीतरी]
प्रतिक्रिया
23 Feb 2018 - 7:42 pm | डॉ श्रीहास
तोंडाला पाणी सुटलंय .... एवढं बोलतो आणि खाली बसतो
23 Feb 2018 - 8:24 pm | जेम्स वांड
केडी भो, तुमच्या हातात अन्नपूर्णेचा वास आहे सरजी, बल्लवकला पारंगत मिपा बल्लवकर्म शिलेदार केडी भाऊंचा विजय असो.
27 Feb 2018 - 3:45 pm | केडी
धन्यवाद!
23 Feb 2018 - 8:40 pm | गवि
वेगळीच पाकृ आहे. मस्त असणार.
बाकी यावरुन हे आठवलं. हे काय असेल यावर चर्चा झाली होती:
धागा काहींना अजूनही आठवत असेल.
आता या फटूतल्या इतर पदार्थांच्या पाकृ देखील मिळाव्यात.
23 Feb 2018 - 8:49 pm | पद्मावति
आहा!!
23 Feb 2018 - 9:11 pm | कपिलमुनी
व्हेज लॉलीपॉप म्हणून मिळते , या पद्धतीने करून पाहिल्यावर फोटू टाकण्यात येईल
23 Feb 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्लsssर्प !!! मांसाहारी लोकांबरोबरच शाकाहारी लोकांच्याही तोंडाला (अपराधीपणाची भावना न बाळगता) पाणी सुटायला हरकत नाही ! ;) :)
26 Feb 2018 - 4:20 pm | केडी
:-)) धन्यवाद!!
24 Feb 2018 - 5:46 am | manguu@mail.com
अगदी मस्त
24 Feb 2018 - 10:25 am | अनुप ढेरे
परवाच एका हाटेलात मेनुवर चिकन चाप हा पदार्थ पाहिलेला आणि हे काय असेल असा विचार केला होता. फोटो छान दिसतायत.
24 Feb 2018 - 9:23 pm | manguu@mail.com
छान
25 Feb 2018 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
व्वाह! मजा आया.
25 Feb 2018 - 2:15 am | रमेश आठवले
हे समजले नाही.
सोया चंक्स हे सोयाच्या दाण्यांच्या पेस्ट पासून बनवले जातात व ते मासाच्या तुकड्या ऐवजी शाकाहारी मंडळी वापरू शकतात अश्या समजुतीत मी आहे. हे जर खरे असेल तर अशा चंक्स ची पेस्ट करुन त्यात भिजवलेल्या सोयाबीन ची पेस्ट का मिसळावी लागते हे समजले नाही.
25 Feb 2018 - 10:27 am | manguu@mail.com
सोया चंक्सचे तुकडे , चुरा एकमेकाना चिकटत नाही. भिजवलेल्या सोयाबीनची पेस्ट binder म्हणून काम करते . सगळे घटक एकत्र धरून ठेवते. नंतरचे मसालेदेखील त्यालाच चिकटून रहात असणार.
25 Feb 2018 - 11:06 am | रमेश आठवले
' चंक्स गार झाले कि मग हाताने दाबून पाणी काढून, त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या.'
25 Feb 2018 - 12:16 pm | manguu@mail.com
पण ते बुर्जीसारखी होइल , म्हणजे खिमा टाइप. पोळी लाटायला त्यात सोयाबीनची पेस्ट , कणीक , मैदा इ इ घालावे लागेल.
पॅटीस करताना जसा उकडलेला बटाटा घालतात तसे .
4 Mar 2018 - 11:18 am | manguu@mail.com
चित्रात वर पांढरेशुभ्र आहे ती सोयाबीनची पेस्ट
खाली भरड आहे ती चंक्सची भरड.
25 Feb 2018 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख....!
-दिलीप बिरुटे
25 Feb 2018 - 6:40 pm | अभिजीत अवलिया
असलं काही टाकत जाऊ नको रे. आम्हाला घरी ऐकून घ्यावं लागतं. :)
बाकी प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच एकदम भारी.
27 Feb 2018 - 3:46 pm | केडी
:-))
बाकी आभारी आहे!
27 Feb 2018 - 7:42 pm | शलभ
मस्त हो शेफ केडि..
28 Feb 2018 - 2:44 pm | देशपांडेमामा
काय दीसतेय डीश. तोंपासु !
पथ्यातुन मोकळा झालो की आधी तुमच्या घरी येणार :-))
देश
1 Mar 2018 - 11:53 am | केडी
या हो, केव्हाही या... :-)
4 Mar 2018 - 9:41 am | सविता००१
आईग्ग... करते आता
4 Mar 2018 - 1:42 pm | manguu@mail.com
त्यामुळे पोळी लाटून त्याच्या छोट्या वाटीने पुर्या केल्या. अर्धी दुमडून अर्धगोल केले.
मॅरिनेट व पुढची प्रोसेस करायला हा आकार सोयीचा आहे.
5 Mar 2018 - 10:33 am | केडी
वाह, आता ते चांप वापरून पाकृ कराल तर त्याचे फोटू नक्की टाका इथे..
5 Mar 2018 - 5:44 pm | सूड
व्हेज खाणार्यांची सोय झाली.
5 Mar 2018 - 7:03 pm | sagarpdy
वैच.
5 Mar 2018 - 8:57 pm | केडी
ह्या वर्षी (आणि निदान वर्षभरासाठी) अस्मादिक शाकाहारी झालेले आहेत, त्यामुळे घासपुस पाककृतीच टाकणार जास्तीतजास्त .....
17 Mar 2018 - 8:34 pm | Nitin Palkar
बऱ्यापैकी खटाटोप आहे पण 'चांगलं चुंगलं खायचंअसेल तर मेहनत घ्यावीच लागते' असं आई म्हणत असे त्याची आठवण झाली. पाकृ खूप आवडलेली आहे हे वेगळे सांगणे नको.....