भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
भाग ११ - गूढरम्य डेल्फी १
भाग १२ - गूढरम्य डेल्फी २
भाग १३ – अक्रोपोलिस
अथेन्स आणि ग्रीसचा निरोप घ्यायची वेळ आली होती. शेवटच्या दिवशी विमानतळाकडे जाण्याआधी सकाळी मोकळा वेळ होता. त्या वेळात काय पाहायचं हा प्रश्नच आला नाही. अथेन्सच्या इतर पुरातन वास्तू आणि अवशेष किंवा बेनाकी संग्रहालय वगैरे बघण्यात रस होता. पण ग्रीसच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाला (National Archaeological Museum, अर्थात NAM) अग्रक्रम होता. डेल्फी वा मायसिनी सारख्या प्रसिद्ध पुरावशेषांजवळही संग्रहालये आहेत, तिथे मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहता येतात. परंतु सगळ्यांत महत्त्वाचे पुतळे, भांडी, धातूकाम, दागिने हे राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात मांडून ठेवलेले आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या या संग्रहालयाची निओक्लासिकल शैलीतील इमारत लक्ष वेधून घेते.
प्रागैतिहसिक, मायसिनिअन, मिनोअन अश्या अनेक विभागांमध्ये पसरलेल्या या संग्रहालयातील काही वस्तूविशेष पाहू.
इ.स. पूर्व २८०० ते २३०० या काळातील नाव आणि लाटांची नक्षी असलेला मातीचा तवा
'Thinker' या नावाने प्रसिद्ध नवपाषाण युगाच्या इ.स. पूर्व ४५०० ते ३३०० काळातील चिकणमातीचा पुतळा
रथ कोरलेली इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील शिळा
मायसिनीच्या थडग्यांत मिळालेले इ.स. पूर्व सोळाव्या शतकातील सुवर्णालंकार. मायसिनीविषयी तिसर्या भागात वाचता येईल.
मायसिनीचे सुवर्ण
Mask of Agamemnon म्हणून प्रसिद्ध असलेला मायसिनीचा सोन्याचा मुखवटा.
मायसिनीच्या भित्तिचित्रात दाखविलेली कंठभूषण स्वीकारणारी देवता (इ.स. पूर्व तेरावं शतक)
काही भित्तिचित्रांचे अवशेष
शिश्याच्या इ.स. पूर्व चौदाव्या शतकातील मिनोअन मूर्त्या, डावीकडे नर्तकी आणि उजवीकडे बासरीवादक
ग्रीक भाषेच्या सगळ्यांत जुन्या लिप्यांमधील एक असलेली मायसिनिअन काळातील Linear B लिपी. Pylos (Palace of Nestor), Knossos या काही ठिकाणी Linear B लिपीत लिहिलेल्या मातीच्या पट्ट्या सापडल्या आहेत. फोटोतील वरच्या दोन पट्ट्यांवर तीळ, धणे, जिरं, केशर अश्या मसाल्याच्या पदार्थांच्या नोंदी आहेत. खालच्या एका पट्टीवर कामगारांची आणि दुसर्या पट्टीवर तेलाच्या साठ्याची नोंद आहे.
Pylos ला सापडलेल्या या Linear B लिपीतील पट्ट्यांवर मेंढपाळ आणि त्यांच्याकडील मेढ्यांच्या कळपांच्या नोंदी आहेत.
Linear B लिपीतील काही चिन्हे
मायसिनीअन सोन्याच्या अंगठ्यांचे नमुने. मध्यभागी असलेल्या मुद्रेवर सिंहाचे शिर असलेले यक्ष आसनावर बसलेल्या देवतेला अर्पण करण्यासाठी हातात सुरया घेऊन जात आहेत; आकाशात चक्ररूपी सूर्य आणि चंद्राची कोर आहे. उजवीकडे वरच्या मुद्रेवर नाविकांसह नौका आणि दोन दांपत्ये आहेत.
Cycladic संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या नग्न संगमरवरी मूर्त्या (इ.स. पूर्व २८०० ते २३००). बहुतांशी स्त्री मूर्त्या मिळाल्या असून त्या प्रजननाच्या देवता, अप्सरा यांच्या असाव्या.
Cycladic काळातील पुरुष मूर्त्या शिकारी, योद्धे, वादकांच्या आहेत. त्यातील हार्प वादकाची मूर्ती
Cycladic काळातील भांडी (इ.स. पूर्व २८०० ते २३००). खालचं Kernos नावाचं भांडं पूजेत देवतांना अर्पण करायच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी वापरत.
यानंतरच्या काही दालनांत अप्रतिम शिल्पकला पाहता येते. ग्रीक संस्कृतीतील देवदेवता, पुराणांतील गोष्टींवर आधारित शिल्पे अश्या अनेक कलाकृती मांडून ठेवलेल्या आहेत. यातील अनेक शिल्पे देवांना अर्पण करण्यासाठी घडविण्यात आली होती. तशी माहिती कोरलेली आढळते.
'Artemision Jockey' नावाने प्रसिद्ध झालेल्या या पुतळ्याचे भाग एका जहाजाच्या अवशेषांत मिळाले. इ.स. पूर्व १४० च्या कांस्य पुतळ्यातील छोट्या जॉकीच्या डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात आसूड असावा.
अथेना देवीचा पुतळा
ग्रीक देवता झ्यूस किंवा पोसायडनचा हा कांस्य पुतळा. उजव्या हातात thunderbolt किंवा त्रिशूळ असावा.
इसवीसनाच्या दुसर्या शतकातील Sarcophagus
देवांना अर्पण करण्यासाठी बनविलेल्या या शिल्पात डावीकडे तीन अप्सरा, मध्यभागी हेर्मिस आणि बकर्याचे पाय असलेला पान हे देव आणि उजवीकडे अर्पण करणारा अगाथेमेरोस आणि त्याला वाइन देणारा सेवक आहेत. (इ.स. पूर्व ३३०)
ग्रीक शिल्पकलेचा आणखी एक सुंदर नमुना. एका अप्सरेच्या अपहरणाची कथा या शिल्पात दिसते.
कालिमाखोस नावाच्या शिल्पकाराने घडविलेल्या इ.स. पूर्व पाचव्या शतकातील या शिल्पात एक उच्चकुलीन स्त्री हातात धरलेला दागिना पाहत आहे. तिच्या सेविकेने दागिन्यांची पेटी धरली आहे. त्या स्त्रीच्या कुटुंबाच्या अथेन्समधील प्राचीन दफनभूमीतील जागेत हे शिल्प होते.
हॉकीसारखा खेळ दाखविणारे हे शिल्प एखाद्या खेळाडूच्या थडग्यावर असावे.
या प्रचंड कुंभावर देव आणि giants यांच्यातील लढाईचं दृश्य आहे. वरती देव आणि खालच्या बाजूचे giants यांच्या रेषांनी दाखवलेल्या हालचाली, कुंभाच्या आकाराचा केलेला उपयोग अप्रतिम आहे.
Epinetron नावाच्या या कुंभावर नवविवाहिता आणि तिच्याबरोबर देवता दाखवल्या आहेत.
संग्रहालयाच्या शेवटच्या दालनांमध्ये मिनोअन काळातील पूर्ण आकारातील भित्तिचित्रे आहेत. मिनोअन ही मायसिनिअन संस्कृतीपेक्षा जुनी संस्कृती इ. स. पूर्व २६०० ते ११०० या काळातील आहे. क्रिटी (Crete) बेटावर उगम पावलेली ही संस्कृती तिथून इतर बेटांवर पसरली. अथेन्सला पाहता येणारी मिनोअन भित्तिचित्रे (frescoes) ही मुख्यत्वे सांटोरिनी किंवा थिरा या बेटावरील आहेत. पांढर्यानिळ्या रंगसंगतीची घरे आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटावरील अक्रोटिरीचे (Akrotiri) पुरावशेषही पाहण्यासारखे आहेत. इ. स. पूर्व १६२७ साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने अक्रोटिरीचा विध्वंस केला. पण ज्वालामुखीच्या राखेमुळे काही अवशेष नष्ट होण्यापासून वाचले. त्यातील काही भित्तिचित्रे अथेन्सला पाहता येतात.
मुष्टियुद्ध करणारी मुले (Boxing children fresco)
Antelopes fresco
वसंत ऋतूतील देखाव्याच्या या सुंदर चित्रात (Spring fresco) थिराची ज्वालामुखीजन्य भूमी आणि तिच्यावर उमललेली लाल लिलीची फुले दिसतात.
प्राचीन इतिहासातील ग्रीसचे स्थान पाहता हे संग्रहालय (इतर काही युरोपीय संग्रहालयांसारखं) प्रचंड मोठं, भारंभार पुतळे आणि पुरातन वस्तूंनी भरलेले असेल असं वाटलं होतं. पण तसं नसून संग्रह बर्यापैकी आटोपशीर आहे. वेगवेगळ्या संस्कृतींची उत्तम माहिती दिलेली आहे. प्राचीन संस्कृती आणि अवशेषांत रस असेल तर अथेन्सच्या भेटीत हे संग्रहालय पाहायलाच हवं.
संग्रहालयातील दोनतीन दालने बंद ठेवली होती, त्यामुळे थोडा विरस झाला. पण एकंदर संग्रहाचा आणि दिलेल्या माहितीचा आवाका पाहता वेळ कमीच पडला. ग्रीसच्या प्राचीन इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांमधील वस्तू पाहताना कधी ओळखीच्या खुणा दिसल्या. तर काही अपरिचित जागांची ओळख होऊन पुढच्या सहलींचं बीज रुजलं.
(समाप्त)
प्रतिक्रिया
13 Feb 2018 - 2:42 am | एस
अतिशय सुंदर झाली ग्रीसची सफर. सर्व छायाचित्रे आणि वर्णन आवडले.
13 Feb 2018 - 8:50 am | प्रचेतस
एकापेक्षा एक सरस असे अप्रतिम अवशेष आहेत एकेक.
ही सफर अतिशय आवडली.
13 Feb 2018 - 12:59 pm | अनिंद्य
पहिल्या भागापासून पूर्ण मालिका वाचून काढली.
उत्तम !
15 Feb 2018 - 8:43 pm | निशाचर
अरे वा! पूर्ण मालिका वाचून अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!
13 Feb 2018 - 8:23 pm | सिद्धार्थ ४
अतिशय सुंदर झाली ग्रीसची सफर. सर्व छायाचित्रे आणि वर्णन आवडले.
13 Feb 2018 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सफरवर्णन आणि चित्रे !
14 Feb 2018 - 11:54 am | दुर्गविहारी
अप्रतिम छायाचित्रे आणि तितकीच उत्कॄष्ट माहिती देणारी हि मालिका लिहील्याबध्दल धागाकर्ते यांचे आभार. ग्रीसला जायला मिळेल कि नाही ते माहिती नाही, मात्र या धाग्यांनी ग्रीसची सफर घडवून आणली हे निश्चीत.
15 Feb 2018 - 9:00 pm | निशाचर
एस, प्रचेतस, अनिंद्य, सिद्धार्थ ४, डॉ म्हात्रे आणि दुर्गविहारी, हा भाग तसेच ग्रीसची सफर आपणा सगळ्यांना आवडल्याचे वाचून आनंद झाला. आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद!
या सफरीत सहभागी झालेल्या वाचकांचे तसेच वेळोवेळी अभिप्राय व प्रोत्साहन देणार्या सगळ्यांचे अनेक आभार!!
15 Feb 2018 - 9:12 pm | पैसा
फारच सुरेख! कितीही बघितले तरी पुरे वाटणार नाही.
16 Feb 2018 - 9:43 pm | निशाचर
खरंय. माझ्यासाठीही ही भटकंती संस्मरणीय आहे. या सफरीला दोन वर्षं होऊन गेली असं खरंच वाटत नाही.
प्रतिसादासाठी आभार!