खारे दाणे

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
4 Feb 2018 - 1:02 pm

खारे दाणे

.

खारे दाणे कोणाला आवडत नाहीत?मी तर फॅनच आहे.लहानपणी शनिवरी सकाळची शाळा असे.पपा 10 पैसे देत असत,त्या दहा पैशांचे स्कर्टचा खिसा भरून जाईल इतके खारे दाणे येत असत.राजा बढे चौकात भडभुंजाचे दुकान होते.फुटाणे,गोडे शेंगदाणे,खारे शेंगदाणे,कुरमुरे,चूनखडीची माती,भाजलेले चिंचोके असं काय काय मिळायचं तिथं. आत तिथे चांदीच्या वस्तूंचं दुकान आहे.पुढे आशिष मेडिकलच्या शेजारीही एक दुकान होतं, त्याने आता चाटही ठेवायला सुरवात केली आहे.जसजशी जागांची किंमत वाढू लागली तसतशी बऱ्याच ठिकाणची भडभुंजांची दुकाने कमी होत नाहीशीच झाली.पण खरे दाणे तर लागतातच.आणि तेच दहा पैशात मिळणारे खारे दाणे आर दहा रुपयाचाही मिळत नाहीत.
थोsडेसे,हो अगदी थोsडे sसेच कष्ट घेतले तर हे आपण घरच्या घरी करू शकतो,हवे तितके आणि हवे तेव्हा.तेव्हा अधिक लांबड न लावता मी तुम्हाला मला माहीत असलेल्या तीन प्रकारांची ओळख करून देते.

प्रकार पहिला
साहित्य:-
१.दोन वाट्या मीठ,

२.एक वाटी शेंगदाणे,

3.लोखंडाची कढई.

कृती:-

१.कढई मोठ्या गॅसवर चांगली तापवून त्यात मीठ घालावे.

२.मीठ छान गरम जरून घ्यावे.

3.त्यात शेंगदाणे घालून परतत राहावे. मिनीटभराने शेंगदाणे तडकायला लागतील तसेच मोठ्या आचेवर परतत राहावे,जेव्हा शेंगदाणे तडतदायचे कमी होतील तेव्हा गॅस बंद करावा.मिनिटभर तसेच परतत राहावे.

४.नंतर शेंगदाणे चाळणीत ओतून मीठ वेगळे करावे,हे मीठ पुन्हा पुन्हा वावरत येते,तेच थंड झाले की,भरून ठेवावे.

प्रकार दुसरा

साहित्य:-

१.एक वाटी शेंगदाणे,

२.दोन वाट्या पाणी,

३.दोन मोठे चमचे मीठ,

४.मायक्रोवेव्ह प्रूफ भांडे.

कृती:-

१.भांड्यातत पाणी घालून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करावे.

२.मीठ,पाणी व शेंगदाणे एकत्र करून तीन तास तसेच ठेवावेत.

३. तीन तासांनी निथळून घ्यावेत.

४.स्वच्छ कपड्यावर पसरून सुकवावेत.

५. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ८ मिनिटे हाय पॉवरवर भाजावेत,३-३ मिनिटांनी व नंतर १-१ मिनिटाने हलवावेत.

प्रकार तिसरा.

साहित्य:-

१.एक कप शेंगदाणे,

२.अर्धा कप पाणी,

3.एक टेबलस्पून मीठ,

४.मायक्रोवेव्ह प्रूफ भांडे.

कृती :-

१.पाणी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अर्ध मिनीट गरम करावे.

२. मीठ मिसळून त्यात शेंगदाणे पाच मिनिटे भिजवावेत.

३. दोन मिनिटे हाय पॉवरवर मायक्रोवेव्ह करावेत.

४.बाहेर काढून उथळ प्लेटमध्ये पसरून दोन मिनिटे हायपॉवरवर मायक्रोवेव्ह करावेत.

कुठल्याही प्रकाराने केलेत तरी थंड झाल्यावरच खावेत,ही विशेष सूचना विसरू नका.

.

प्रतिक्रिया

शेंगदाणे मात्र गुजरातमधले घ्यावेत जे आकाराने लांबट असतात, मायक्रोवेव्ह ऐवजी मात्र कढईत तापलेल्या वाळूवर भाजल्यावर खायला जाम मजा येते, एकदम कुरकुरीत, शिवाय दाण्यांना सुरकुत्या येत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2018 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान...!!चांगले दिसत आहेत. पाकृती टाकत राहा.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

4 Feb 2018 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा

+१

खारे दाणे (कोरडे) पेक्षा मीठ टाकून उकडलेल्या शेंगा आवडतात. मित्रांसोबत वगैरे. (म्हणजे प्रा.डॉ. असंच काही नव्हे).

उकडलेले मक्याचे दाणे नाही का आवडत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2018 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खारे दाणे पाहिल्याबरोबर काही मित्रांची आठवण आली होती. बस तळलेले उडदाचे पापड, एक कोळंबी फ्राय, आणि एक ९० एमएल. ब्लाइंडर असा बेत असला तर रविवार आपल्या मार्गाने रवाना होईल अशी एक कल्पना येऊन गेली. काही काही स्वप्नही चांगली असतात.

पण नुतनकाकूंना त्यांच्या धाग्यावर अवांतर आवडणार नाही म्हणून गप्प बसलो. अवांतर प्रतिसादाबद्दल सॉरी हं काकू...!

-दिलीप बिरुटे

mahayog's picture

5 Feb 2018 - 12:02 am | mahayog

छान कल्पना आहे.☺️

रमेश आठवले's picture

6 Feb 2018 - 2:28 am | रमेश आठवले

मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगात दाणे मऊ होतात आणि खारट पाणी त्यांच्या मध्ये सर्वत्र पसरते व त्यामुळे चव जास्त चांगली होते. शिवाय शेंगांची टरफले मऊ झाल्याने ती काढणे सोपे जाते.

अरविंद कोल्हटकर's picture

18 Apr 2018 - 9:12 am | अरविंद कोल्हटकर

लहानपणी आई मोठ्या भांड्यात मिठाच्या पाण्यावर शेंगा उकडून त्या नंतर छपरावर वाळवत असे. त्यातील आमच्या वाटमारीतून उरलेल्या आणि अगदी कोरड्या कुडकुडीत झालेल्या शेंगा आम्हाला फार आवडत असत.

तशा शेंगा कित्येक दशके पुनः खाण्यात आल्या नाहीत.

अलीकडे मला असा शोध लागला की येथील चायनाबझारमध्ये इंडोनेशियातील खारवून सुकविलेल्या शेंगा मिळतात आणि जवळजवळ लहानपणी खाल्लेल्या शेंगांसारख्याच त्या लागतात. ह्या शोधामुळे आयुष्याला पुनः एक नवी लज्जत आली आहे!

नूतन's picture

4 Feb 2018 - 6:48 pm | नूतन

छान
मा वेव्हमधे सोपं होईल बहुदा
करुन बघेन

पैसा's picture

4 Feb 2018 - 7:30 pm | पैसा

नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटेल!

मुक्त विहारि's picture

4 Feb 2018 - 9:57 pm | मुक्त विहारि

घरच्या खारे दाण्यांपेक्षा, बाहेरचे खारे दाणे उत्तम.

वलसाडला, नवसारीला आणि भरूचला उत्तम खारे दाणे मिळतात.

भरूचला, चॉकलेट, नारळपाणी ह्या चवीचे पण दाणे मिळतात.भरूचला तसे ७-८ प्रकारचे भाजलेले दाणे मिळतात, पण नारळपाणी आणि चॉकलेट आमच्या कडे जास्त आवडलेले पदार्थ.

अर्थात, दाणे जेवल्यानंतर, झोपाळावर बसून गप्पा-टप्पा मारत खाण्यात जास्त रंगत येते."जेवणानंतर झोपाळ्यावर बसून खारे शेंगदाणे खाणे" हे एक घातक व्यसन आहे.

एक खरोखर घडलेला किस्सा,

मी मगोध मंदिर, वलसाडला असतांना, त्या गावातला एक मुलगा शिकायला म्हणून सूरतला गेला आणि शिक्षण सोडून चार दिवसात परत आला.कारण काय, तर तिथे झोपाळा न्हवता.त्यामुळेजेवणानंतर, झोपाळ्यावर बसून खारे शेंगदाणे खाण्यातले स्वर्गसूख त्याला मिळत न्हवते.

सुखीमाणूस's picture

6 Feb 2018 - 7:03 am | सुखीमाणूस

:) :) :)

II श्रीमंत पेशवे II's picture

14 Feb 2018 - 5:09 pm | II श्रीमंत पेशवे II

मुंबईत हल्ली बऱ्याच श्या दुकानात गुजरात मधील शेंगदाणे मिळतात.
वेस्टर्न लाईन ला तर मिळतातच
त्यामधील प्रमुख ब्रान्ड म्हणजे , सिकंदर , डबल डायमंड , लाल पतंग , जय जलाराम , भरूच किंग वगैरे अशी नवे आहेत.
हल्ली तर वाक्यम प्याक्ड ( हवाब्न्द - vacuum packed ) प्रकारात पण मिळतात आणि ६ महिने टिकतात हि

घरी करण्यात तर नक्कीच मजा येईल पण नंतर जर चुकून मऊ पडले तर उभ्या हयातीत पुन्हा घरी खारे दाणे हा विषय कायमचा बंद होईल त्यामुळे थोडी धाकधूक वाटते.
पाकृ छान

ओवन मध्ये एकदा - घरात कुणी नसताना प्रयत्न केला होता , भाजण्याचा पण आतून आवाज यायला लागल्यावर त्वरित बंद केला आणि शेवटी ग्यास वर पारंपारिक पद्धतीने भाजून काढले.

तिमा's picture

5 Feb 2018 - 12:13 am | तिमा

रेसिपी छान आणि सोपी.
आमच्या वेळेस, खूप काळी मुलगी जास्त पावडर लावून आली तर तिला 'खारा दाणा' म्हणत.

सुखीमाणूस's picture

6 Feb 2018 - 7:02 am | सुखीमाणूस

खारा दाणा:) :) :)

असंका's picture

18 Apr 2018 - 8:18 am | असंका

अजुनपण म्हणतात ... फक्त मुलीच नाही, मुलांना पण.

जागु's picture

6 Feb 2018 - 11:24 am | जागु

मस्तच.

पद्मावति's picture

7 Feb 2018 - 11:07 pm | पद्मावति

मस्तं!

चौकटराजा's picture

17 Apr 2018 - 3:59 pm | चौकटराजा

मी दोन्ही कृती करून पहातो. दोन्हीची मजा वेगवेगळी. सोललेले दाणे अर्धे करून फोडणीत टाकून तिखट मीठ व बारीक कांदा हे एकदम ब्येस !