नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरी विभागाच्या दक्षिणेस १०-१२ कि.मी. पसरलेल्या कळसुबाईच्या रांगेत १५०० मीटरपेक्षा जास्त उंचीचे एक कातळ त्रिशूळ आकाशात घुसलय. दुर्गभटक्यांच्या कौशल्याची परिक्षा पहाणारे हे गड आहेत, अलंग, मदन आणि कुलंग.
आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग, कुलंग, मदनची रांग ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
सह्याद्रीतील सर्वांग सुंदर आणि सर्वात कठीण मानली जाणार्या भटकंतीची आपण ओळख करुन घेणार आहोत. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा ,भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.
( अलंग, कुलंग, मदन परिसराचा नकाशा )
बहुतेक किल्ले भटकायचे वेड लागले कि, नवीन नवीन किल्ले माहिती होतात. केव्हातरी अनुभवी ट्रेकर्सकडून किंवा एखाद्या पुस्तकामधून किंवा ट्रेकब्लॉगवरून या दुर्गत्रयी बध्दल म्हणजे सध्याच्या भाषेत बोलायचे तर ए.एम.के ( AMK ) विषयी समजेत आणि तिथे जाण्याचे नियोजन सुरु होते. पण हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे.तेव्हा ईतर गडाप्रमाणे नियोजन न करता, एखाद्या क्लायबिंग ग्रुपबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. साहजिकच ह्या ट्रेकच्या फि खुप असतात.
मी ट्रेकिंग सुरु केल्यानंतर प्र.के.घाणेकरांच्या पुस्तकामधे या गडाविषयी वाचले आणि तिथे जाण्याची ओढ निर्माण झाली. मात्र हे सोपे नाही याची कल्पना होतीच. बरेच ट्रेक झाल्यानंतर एके दिवशी माझा मित्र सचिन जोशीचा फोन आला, "आपल्याला अलंग आणि मदन करायचा आहे". वास्तविक बरीच महत्वाची कामे होती. पण 'हिच ती वेळ, हाच तो क्षण' असे समजून मी तयारीला लागलो.
अलंगला जायचे तर दोन मार्ग आहेत. एक भंडारदरा मार्गे आंबेवाडी किंवा घोटी-आंबेवाडी. यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. घोटीवरून भंडारदर्याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. आणि दुसरा रस्ता आहे तो भंडारदरामार्गे उडदवणे. भंडारदरा किंवा शेंडीवरुन घाटघरला जाण्यासाठी बस किंवा खाजगी जीप वहातुक आहे. ह्या गाड्या उडदवणे मार्गे घाटघरला जातात.
( अलंग गडाचा नकाशा )
आम्ही उडदवणे कडून जाण्याचे ठरवले. रात्री पंधरा जण मिनीबसमधून निघालो. अलंग पहायचा या कल्पनेने मला मात्र फार झोप आली नाही. भंडारदर्यापाशी आलो आणि अंधुक उजेडात रतनगडाने स्वागत केले. मागे दोन दिवस केलेल्या रतनगड, कळसुबाई ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. रतनगडावरूनच पहिल्यांदा हे दुर्गत्रिकुट पाहिलेले होते.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
बस उडदवण्याला एका प्रशस्त अंगणात वळसा घेउन थांबली. कडक्याच्या थंडीने आमचे स्वागत केले. शेकोटीभोवती जमुन गप्पांना उत आला. पु.लं.च्या पुस्तकातले उतारे म्हणत खिदळून झाले. शेवटी गाईड आला.
त्याने गावातूनच दिसणारी अलंगची भिंत दाखवली, साकिरा, किर्डा या शिखरांची ओळख करुन दिली. मागे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट, अर्थात शैल कळसुबाई खुणावत होते. नाष्ट्याचे पोहे चापून गाइडच्या मागून निघालो. ओढा ओलांडून, एक खडा चढ फासफुस करत चढत अलंगच्या भल्या थोरल्या पठारावर दाखल झालो.
इथेच डाव्या बाजुने घाटघरकडून येणारी वाट मिळाली.
मागच्या आजुला अलंगचा कडा आणि डाव्या हाताला त्याला चिकटलेला बाळ्या सुळका दिसत होता. या पठारावर जरा विसावलो. प्रंचड मोठा मुलुख नजरेच्या ट्प्प्यात येत होता. खाली कोकणात तीन शिंगांचा माहुली, आजोबा, करंडा, कात्राबाई, रतनगड, घनचक्कर, पाबरगड, कळसुबाई हे आजुबाजुला होतेच, पण नीट लक्ष दिल्यानंतर हाजी मलंग- माथेरान रांग दिसली, हरिश्चंद्रगड, नाणेघाट, जीवधन, ढाकोबा हे सुध्दा ओळखता आले.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
आराम जरा जास्त होतोय असे वाटल्याने गाईडने सगळ्यांना हल्या केले.अलंगच्या कड्याला वळसा घालून चालु लागलो. या वाटचालीत अलंगचा कडा उजवीकडे ठेवत आपण चालत असतो. बाळ्या सुळक्यानंतर अलंगच्या कड्याला घळी आहेत. यातल्या तिसर्या घळीतून वाट आहे हि गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे चुकायचा प्रश्न नाही. दाड झाडीतुन वाटचाल करीत एका सपाटीवर आलो, तो अचानक उजव्या बाजुला अस्ताव्यस्त पसरलेला अलंग, मधोमध मदनाचा सुळका आणि डाव्या बाजुला त्याला टाळी देणारा कुलंग असा पॅनोरमा समोर आला. सगळ्यांचे कॅमेरे क्लिक क्लिक करु लागले.
उजव्या बाजुच्या झाडीतुन एक ओढा खाली आलेला होता. आता पुढची वाटचाल या ओढ्यातून करायची होती. या संपुर्ण पठारावर बर्यापैकी झाडी आहे. मात्र मानवी वावर फारच कमी आहे. याला 'तासचे पठार' म्हणतात. थोडेफार लाकुडतोडे आणि ससा, घोरपड असे प्राणी पकडण्यासाठी सापळे लावणारे फासेपारधी यांचाच काय तो वावर असतो.
ओढ्यातून चढून आम्ही एका तुटलेल्या कातळकड्यापाशी आलो. ईथे पर्यंत येण्यासाठी दुसरी वाट आहे ती अलंग -मदनाच्या खिंडीतुन अलंगच्या कातळकड्याला बिलगून याच वाटेला मिळते. मदनाच्या खिंडीतून साधारण तासाभरात आपण येथे पोहचतो. ईंग्रजांच्या कृपेने इथल्या पायर्या तुटल्यात, गावकर्यांनी इथे एक लाकडी ओंडला ठेवलाय, खाली दगडात काही पाचरी मारल्यात. आधी वाटाड्या पुढे गेला आणि त्याने वर चढून बरोबर आणलेला घायपाताचा दोर बांधला, त्याला पकडून, ओंडक्याला फुटलेल्या फाट्यांवर पाय देउन वर चढलो.
थरारक अनुभव होता हा, पण सगळेच सुरक्षित वर पोहचलो.
कातळकोरीव पायर्यांनी आमचे स्वागत केले.
पुढे एक अखंड पाषाणात कोरलेला दरवाजा आणि वर गणेशपट्टी आहे.
मात्र कोसळलेल्या दगडांनी हा दरवाजा चिणला गेला आहे. सहाजिकच शेजारी उजव्या बाजुला दगडांची रास रचलेली आहे. त्यावर चढून वर पोहचलो. दरवाज्याच्या मागेच एक कातळकोरीव गुहा आहे. जेमेतेम दोघेजण बसतील इतकीच आहे. पहारेकर्यांसाठी हिची योजना असावी. हल्ली बर्याच गडावर दुर्गसंवर्धनाची कामे होतात, त्या अंतर्गत जर अलंगला जाण्यासाठी या ठिकाणी लोंखडी शिडी बसवता आली आणि दरवाज्यातले दगड मोकळे करुन दरवाजा खुला करता आला तर फारच बरे होईल.
आता वाटचाल खरोखरच थरारक होती. अलंग ज्यासाठी ओळखला जातो तो प्रंचड मोठा ट्रॅव्हर्स ( एकाच पातळीतील आडवी वाट ). जवळपास दिड किलोमीटरचा हा ट्रॅव्हर्स सुरवातीला रुंद आहे , मात्र पुढे काही ठिकाणी जेमेतेम पाउल बसेल ईतकीच त्याची रुंदी आहे. उजव्या हाताला खड्या कातळकड्याची सोबत असते , तर डाव्या हाताला दरी पोटात गोळा आणते. या वाटेवर असंख्य कौले आणि बांधकामाच्या वीटा सापडतात. किल्यावरच्या बांधकामाचे अवशेष पाउअपाण्याने वाहून या वाटेवर आणून टाकलेत.
अखेर कसाबसा हा ट्रेव्हर्स पार करुन गडाच्या उत्तर टोकाच्या सपाटीवर पोहचलो.
इथल्या कातळकड्यात दोन गुहा कोरल्यात. डावीकडच्या गुहेत आधीच एका स्थानिक मुलांच्या ग्रुपने मुक्काम केला होता म्हणून आम्ही दक्षिणेकडची प्रशस्त गुहा मुक्कामाला निवडली. या गुहेत आत पुन्हा तीन छोट्या गुहा होत्या, जणु बेडरुम्सच.
त्याच्यासमोर प्रशस्त पठार पसरलेले आहे. या पठारावर अनेक घरांचे उध्वत्स अवशेष पसरलेले आहेत.
काही उध्वस्त मंदिरे दिसतात. याच सपाटीवर पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. मात्र हे टाके जमिनीलगत असल्याने सहजासहजी सापडत नाही. वास्तविक मुक्कामाच्या गुहेच्या दरवाज्यातच पाण्याचे टाके आहे, पण पाणी खराब आहे. भांडी घासण्यासाठी हे पाणी वापरता येते.
उडदवणे गावातून निघून अलंगच्या या गुहेत पोहचायला तब्बल चार तास लागतात, आज पुरेशी चाल आणि दमणूक झाल्याने गुहेत थोडा आराम केला आणि सुर्य मावळतीला लागल्यावर माथ्यावर जाण्यास निघालो.
थोड्याफार अस्तित्वात असलेल्या पायर्यावरुन चढुन आम्ही माथ्यावर पोहचलो. एखाद्या सुपासारखा अलंगचा माथा तिरका आहे. ईतक्या प्रशस्त सपाटीवर बांधकामेमात्र जेमतेमच होती. हे गड तुलनात्मकदॄष्ट्या अवघड आहेत आणि मुख्य मार्गापासून काहीसे एका बाजुला पडतात, त्यामुळे संरक्षणाच्या दॄष्टिने फारचे महत्वाचे नाहीत. हे तीनही गड रतनगडाच्या अधिपत्याखाली असावेत. त्यामुळे साहजिकच गडावर फार ईमारती नाहीत, शिंबदीही जेमतेम असावी. पण गडावरच्या लोकांना पाणी कमी पडू नये याची काळजी घेतलेली दिसते. वर माथ्यावर पोहचल्यानंतर एकाच ठिकाणी अकरा टाकी खोदलेली दिसतात, पण उपश्या अभावी पाणी खराब झाले आहे. हि टाकी साफ केली तर सगळ्याच दुर्गभटक्यांना मोठा फायदा होईल, हि एकत्र कोरलेली टाकी पहातना मला चांवडवरच्या टाक्यंची आठवण झाली. एकंदरीच हे गड एकाच कालखंडात निर्मीलेले असावेत.
हि इमारत इतकी मोठी आहे कि मदन व कुलंग या गडावरून देखील हे अवशेष अगदी स्पष्ट दिसतात. तसेच इतर घरांचे देखील बरेच अवशेष आहेत.
कोरीव टाकी पाहून आम्ही पुढे निघालो, तर सर्वोच्च माथ्यावर एका प्रंचड मोठ्या वाड्याच्या अवशेषाने आमचे स्वागत केले. या वाड्याच्या तीन भिंती उभ्या आहेत, मात्र छप्पर गायब आहे. आजुबाजुला असंख्य कौले विखरुन पडलेली दिसतात, तसेच चपट्या वीटाही दिसतात. वाड्याची कलात्मक बांधणी पाहून आपण हा वाडा भुतकाळात कसा असेल याची फक्त कल्पनाच करायची. इथुन पुर्वेला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई दिसते, त्याच्यावरचे शेंदरी रंगाचे कळसुआईचे मंदिर आणि समोर फडकणारा भगवा स्पष्ट दिसतो.
या शिवाय मागच्या बाजुला औंढा, पट्टा, बितन आणि त्यांच्यावर असलेल्या पवनचक्क्या स्पष्ट दिसतात. उत्तरेला गडकोटांनी समृध्द असलेला नाशिक जिल्ह्यातील किल्ले अक्षरशः बुध्दिबळाची प्यादी मांडावी तसे दिसतात. यात त्रिंगळवाडी, मोरधन, हरिहर, अंजनेरी, त्रिंबकगड, पुर्ण सातमाळा रांग ओळखता आली. दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो.
यापुढे अलंगचा माथा प्रशस्त पसरलेला आहे, पण फारसे अवशेष नाहीत. थोडे पुढे गेल्यानंतर एक शिवमंदिर आहे. याच्या आवारात एक अस्पष्ट झालेला शिलालेख आहे. या शिवाय ईतरही काही प्राचीन अवशेष दिसतात. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
ईतिहासाच्या बाबतीत मात्र हे गड तसे अबोलच आहेत. किल्ल्यांच्या सुवर्णकाळात, म्हणजेच शिवकाळात यांचे फारचे उल्लेख नाहीत. पेशवाईत थोडेफार रसद पोहचण्यासंदर्भात उल्लेख सापडतात. यांचा उल्लेख मिळतो तो इ.स.१८१८ मध्ये शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात. इ.स.१८१८ मध्ये कर्नल मक्डोवेल याने आपल्या अधिकारी यांच्या सहाय्याने या पायऱ्यांवर तोफा डागून व सुरुंग पेरून त्या नष्ट करून टाकल्या.
गडमाथा भटकून सुर्यास्त पहाण्यासाठी पुन्हा गुहेसमोर येउन बसलो. कुलंगच्या मागे सुर्य बुडाला आणि काजळीचे राज्य पसरले.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
खाली दरीत आजुबाजुच्या ईटुकल्या गावांचे दिवे टिमटिमु लागले आणि थंडीचे राज्य पसरले.
झोपताना पांघरुण शोधण्यासाठी सॅक उघडली आणि एक घोडचुक केल्याचे ध्यानात आले. मी चक्क पांघरुण घरीच विसरलो होतो. कप्पाळावर हात मारुन घेतला. भविष्य स्पष्ट होते. अखेरीस गुहेच्या पार आत कोपर्यात जाउन झोपायचा निर्णय घेतला. त्यात संध्याकाळी एक छोटा साप गुहेत येउन गेला होता, तेव्हा ती धाकधुक होतीच. ऋषिकेश या माझ्या मित्राने कॅरीमॅट मला झोपण्यासाठी अॅडजस्ट करुन दिले. पायतले बुट न काढताच झोपण्याचे ठरवले. मात्र अलंग आणि कुलंगच्या याच्या मधे अर्धगोलाकार दरी आहे. रात्री पश्चिमवारा सुरु झाला कि, वारे या दरीत कोंडून गोल फिरु लागते आणि हाडे गोठवणारी थंडी पडते. याचा जिंवत अनुभव मी त्या रात्री घेतला. जवळपास झोप लागलीच नाही.
दुसर्या दिवशी उठून आंबेवाडीची बाजु पहाण्यास निघालो. या बाजुला जाण्यासाठी अलंगच्या पठारावर एक टेकडी आहे, त्याच्या शेजारुन एक वाट थेट उभी, घसार्यावरुन खाली उतरते.
पुढे उभ्या कातळकड्यात पायर्या कोरुन काढल्यात. समोर दरी दिसत असताना, या पायर्या उतरणे अंगावर काटा आणते. या पायर्यांवरुन चढणे सोपे जावे यासाठी दोन्ही बाजुला होल्ड कोरुन काढलेत.
या पायर्यावरुन खाली उतरुन गेलो तो पुर्ण तुटलेला कातळकडा समोर आला, अर्थातच ईंग्रजांची कृपा. आम्हाला मदनवर जायचे असल्यास ईथूनच उतरणे भाग होते.
बरोबर होती गाईडने आणलेली जनावरांच्या कासर्यासारखी दोरी. हि दोरी बांधून हा कातळकडा रॅपलिंग तत्रांने आम्हा पंधरा जणांना उतरायचा होता.
एखाद्याच्या हातून थोडी चुक झाली असती तर फक्त फुले वहाणे आणि आदल्या दिवशी काढलेले फोटो भिंतीवर लावणे ईतकेच हाती होते. अखेरीस सगळा अंदाज घेउन मदनचा बेत रद्द करण्यात आला आणि त्याच्या एवजी आम्ही अकोल्याजवळचा छोटा "पेमगिरी" किल्ला पाहून परत आलो. मदन गड रद्द करायचा निर्णय किती योग्य होता हे मी मदनला गेलो तेव्हा पटले.
थेट मदनगडावर जाणे शक्य झाले नाही तरी जवळून मदनाचा सुळका पहावा म्ह्णून आम्ही अलंगच्या टोकाशी गेलो.
समोर जेमतेम तीनशे फुटाची मदन आणि अलंगची खिंड दिसली. मदनाचा कातळकडा चढण्याचा सराव करण्यासाठी एक ग्रुप खाली दिसला. आम्ही कड्यावर उभा राहूनच त्यांच्याशी गप्पा मारल्या. एका गडावर उभे राहून दुसर्या गडावरच्या ट्रेकर्सशी बोलण्याचा हा एक अनोखा अनुभव होता. इथून थेट समोर मदनगडाचा उभा कातळकडा, त्याच्यावरची झेड ( Z ) आकारात चढणारी पायर्यांची वाट पाहिली आणि आम्ही आल्या वाटेने अलंग उतरून परतीच्या मार्गाला लागलो.
आम्ही चढून आलो ती उडदवण्याकडून आलो ती वाट सोपी म्हणावी अशी अवघड आंबेवाडीकडची वाट आहे. या वाटेने यायचे तर आंबेवाडी गावात गाईड मिळतात. जर बरोबर कोणी अनुभवी ट्रेकर नसेल तर गाईड घेणे उत्तम. सध्या हे गाईड अव्वाच्या सव्वा रक्कम मागतात असे समजते. ( अगदी पाच हजार रुपयापासून सुरवात होते )
उपलब्ध गाईड आणि त्यांचे संपर्क क्रमांकः-
१ ) श्री. दत्ता भांगरे ( साम्रद) :- 86005151641
२ ) श्री. कमा ( बेलपाडा ) :- 9209615136
आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातून अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
अ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणाऱ्या तिसऱ्या घळीपाशी पोहोचतो. या घळीतच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात. तीन चारशे मीटर उंचीच्या कड्याला बिलगून जाणारा मार्ग उभ्या कड्यात खोदलेल्या पायऱ्यांचा आहे. हिच वाट उडदवण्याकडून येणार्या वाटेला मिळते.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
ब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
२ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्रा. प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५ ) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
26 Jan 2018 - 10:45 pm | एस
अलंग-मदन-कुलंग ही दुर्गत्रयी महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुर्गभटक्याला खुणावत असते. एक तो हरिश्चंद्रगड आणि हा सध्याचा एएमके ट्रेक.
इश्रीकांत या साईटवरील छायाचित्रे आवडली.
पुलेशु.
27 Jan 2018 - 12:38 am | किल्लेदार
थरारक.....
खूप वर्षांपासून इथे जायची इच्छा आहे. कधी जमेल माहीत नाही. फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद. अलंग-कुलंग-मदन प्रमाणेच रसाळगड-सुमारगड-महिपतगड ही दुर्गत्रयी केली आहे का आपण ?
27 Jan 2018 - 9:04 pm | दुर्गविहारी
रसाळ-सुमार-महिपत हा ट्रेक मी केला आहे. सुमार आणि महिपत एकदम पाहीले. मात्र त्यावेळी वेळे अभावी रसाळगड करता आला नाही. मात्र रसाळगड सोपा असल्याने नंतर पाहून आलो. त्याविषयी मी कदाचित पुढच्या हिवाळी भटकंतीत लिहीन. यावेळी मदन, कुलंग आणि चंद्रगड ते ऑर्थरसीट लिहून हिवाळी भटकंती थांबवेन. जोडीला अनवट किल्ले मालिका असेलच.
1 Feb 2018 - 1:22 am | किल्लेदार
एकदा तुमच्याबरोबर भटकंतीला यायला आवडेल.
1 Feb 2018 - 12:25 pm | दुर्गविहारी
मलाही मि.पा. करांबरोबर ट्रेक करायला नक्की आवडेल.
27 Jan 2018 - 6:20 am | कंजूस
चांगला लेख.फोटो खुप छान. पायय्रा शाबूत असत्या तर इकडे जाता आले असते का?
27 Jan 2018 - 9:08 pm | दुर्गविहारी
पायर्या शाबुत असत्या तरी चढणे थोडेफार कठीणच असते. तरीही आत्ता जे टेक्निकल क्लांईम्ब करावे लागते, ते नक्कीच लागले नसते. हरिहरला आपण जसे जाउ शकतो, तसे ईथे जाउ शकलो असतो.
कदाचित घनगडावर शिडी बसवली आहे, तशी इथेही कोणीतरी बसवेल आणी जाणे थोडे सोपे होईल.
27 Jan 2018 - 8:46 am | प्रचेतस
सह्याद्रीतील एक अवघड डोंगरयात्रा. किल्ले अलंग जबरदस्तच आहे. अफाट.
27 Jan 2018 - 9:34 am | अभिजीत अवलिया
हा भाग आवडला.
दत्ता भांगरे यांना गाईड घेऊन सांधण व्हॅली पार केली होती. माणूस प्रामाणिक आणि मदत करणारा आहे.
27 Jan 2018 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार
वर्णन वाचताना आणि फोटो पहाताना अंगावर काटा उभा राहिला.
कधितरी करायच्या लिस्टेत याचे नाव आहे.
पैजारबुवा,
27 Jan 2018 - 11:15 am | मुक्त विहारि
फोटो पाहूनच धडकी भरली....
दंडवत...
अर्थात, ह्या अशा गडांचा "लोहगड-सिंहगड" होत नसल्याने, जातीवतं ट्रेकर्सच जाऊ शकत असतील.
(लोहगड-सिंहगड होणे म्हणजे नखे आणि सुळे नसलेले वाघ-सिंह.)
27 Jan 2018 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त ! नेहमीपेक्षा वेगळ्या वाटेने आणि थरारक गडकिल्ल्यांच्या मोहिमांची रोचक माहिती आणि तितकीच सुंदर चित्रे हे तुमच्या लेखनाचे वैशिष्ठ्य आहे !
आता पुढची मोहीम कोणती ?
28 Jan 2018 - 2:27 am | गामा पैलवान
दुविकाका,
मोहीम खंगरी म्हणू की खदिरांगारी !
आ.न.,
-गा.पै.
29 Jan 2018 - 2:00 pm | वकील साहेब
भन्नाट, AMK आणि दुर्गविहारी दोन्हीही.
29 Jan 2018 - 3:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
१९९६ साली केले ल्या अयसश्वी आणि २००२ साली केलेल्या यशस्वी ट्रेकच्या आठवणी जागवल्यात.
पहिली मोहिम करतान आम्ही काळुस्थेवरुन सुरुवात केली होती आणि पहिले कुलंग करुन मुक्काम केला होता. दुसर्या दिवशी कुलंग उतरुन अलंग-मदनच्या खिंडीत राहिलो होतो. त्या दिवशी अलंगच्या पाठची १५० फुट कातळभिंत चढायचा अयश्स्वी प्रयत्न केला.तिसर्या दिवशी मदन करायला गेलो पण वर पोचेपर्यंत सुर्य मावळला आणि सगळेजण वर जाउ शकले नाहित. शे वटी कळसुबाई करुन ट्रेक संपवला.
दुसर्या वेळी मात्र सर्व बेत नीट पार पडला आणि तिन्ही किल्ले नीट बघायला मिळाले.
बादवे- कमा बरोबर सांधण आणि हरिश्चंद्र नळीच्या वाटेने केलाय. माणुस एकदम मस्त आहे.
1 Feb 2018 - 12:27 pm | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. उद्या याच रांगेतील मदन गडावर धागा टाकेन.
3 Feb 2018 - 8:53 am | प्राची अश्विनी
अर्थातच हाही लेख आवडला.
अलिकडेच वाचलेल्या शोध मध्ये या सगळ्याचा उल्लेख आल्याने अजूनच ओळखीचा वाटला.
7 Feb 2018 - 12:27 pm | सूड
एक नंबर, असं काही बघितल्यानंतर आम्ही ट्रेकला जातो, हे सांगावं की नाही लोकांना असा प्रश्न पडतो.
7 Feb 2018 - 2:06 pm | दिलीप वाटवे
लेख खुपच आवडला. पुन्हा एकदा अलंगवर गेल्यासारखं वाटलं. डिटेलिंग खुप मस्त केलं आहे. खरंतर उडदावणेच्या वाटेने चालणं जास्त असल्याने बहुतेक जण आंबेवाडीतुनच गडावर येतात. पुन्हा एकदा वाचणार. पुलेशु.
12 Feb 2018 - 12:55 am | Rahul Sable
लेख भारी झाला आहे
घाटघर मार्गे येणाऱ्या वाटेत तुम्ही उल्लेख केला त्या ठिकाणी स्थानिकांनी लोखंडी शिडी बसवली आहे (कदाचित २०१७ साली )
12 Feb 2018 - 1:07 am | Rahul Sable
http://www.discoversahyadri.in/2018/01/AMK-Alang-Madan-Kulang-ChotaKulan...