ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in भटकंती
29 Dec 2017 - 10:48 am

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग २ - अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पे.
भाग १

अंगकोर वाटचे विहंगम दृश्य - विकिपीडियावरून, श्रेय चार्ल्स शार्प


अंगकोर वाटमधील भित्तिशिल्पांची स्थाने

अंगकोर वाट ह्या मंदिराचा भव्य आकार वर दिसणार्‍या त्याच्या विहंगम देखाव्यावरून कळतो. जगातील सर्वात मोठे अशी ख्याति असलेल्या ह्या मंदिराचे सुमारे ४०० एकरांचे आवार १५०० गुणिले १३०० मीटर्स लांबीरुंदीच्या भिंतीने वेढले आहे. मेरु पर्वताच्या आकाराच्या मध्यवर्ती शिखरापासून मोजल्यास मंदिराभोवती एकूण तीन ओवर्‍यांच्या ओळी - Galleries - आणि त्यापलीकडे दोन भिंती आहेत. सर्वात बाहेरच्या दोन भिंतींमध्ये पाण्याचा खंदक आहे. आतून मोजल्यास ओवर्‍यांच्या तिसर्‍या ओळीमध्ये रामायण, महाभारत आणि पुराणांमधील गोष्टी चित्रित करणारी भित्तिशिल्पे - bas reliefs - आहेत. सर्वात बाहेरील भिंतीपासून ह्या ओवर्‍यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ७०० मीटर्स लांबीचा दगडांमध्ये बांधलेला मार्ग आहे.

हे मंदिर सूर्यवर्मन् दुसरा (१११३ ते ११५० अदमासे) ह्याच्या कारकीर्दीमध्ये बांधण्यात आले. ख्मेर साम्राज्यातील अन्य मंदिरे बहुतांशी शैवपंथीय असतांना हे मंदिर मात्र विष्णूची उपासना करण्यासाठी निर्माण झाले. मंदिराच्या मेरु पर्वताच्या आकाराच्या केन्द्रशिखरामध्ये एकेकाळी विष्णुमूर्ति होती. सूर्यवर्मन् दुसरा हा मोठा विष्णुभक्त असावा कारण त्याचे मृत्यूनंतरचे नाव https://en.wikipedia.org/wiki/Posthumous_name ’परमविष्णुलोक’ असे आहे, म्हणजे मृत्यूनंतर तो विष्णुलोकामध्ये गेला आहे अशी श्रद्धा.* जयवर्मन् सातवा (११८१-१२१८) ह्याच्या कारकीर्दीमध्ये कंबोडियामध्ये हीनयान बौद्ध पंथाचा प्रसार झाल आणि मंदिरामध्ये मध्यस्थानी असलेला विष्णु तेथून हलवला जाऊन तेथे बुद्धमूर्ति स्थापन झाली. विष्णूला दुसर्‍या भिंतीमधील गोपुरामध्ये जागा मिळाली, जेथे तो अजूनहि आहे आणि त्याची देखभाल करणार्‍या भिक्षूला प्रवाशांनी दिलेली नाणी मिळवून देण्याचे कार्य तो करतो.

विष्णुमूर्ति
मंदिराच्या विशाल आकारामध्ये आणि त्याच्या मोजमापांमध्ये प्राचीन भारतीय शिल्पशास्त्रांमधून वर्णिलेली खगोलशास्त्रीय आणि कालगणनेशी संबंधित अशी तथ्ये दडलेली आहेत असे अभ्यासकांना जाणवले आहे. भारतीय शैलीतील मंदिर हे खगोलशास्त्राच्या पायावर बांधलेले असते आणि अंगकोर वाटची मोजमापे भारतीय वर्षगणनेची आणि युगकल्पनेची उदाहरणे आहेत. ’शिल्पप्रकाश’ ह्या ११व्या-१२व्या शतकात लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचे अभ्यासक बोनर अणि रथ शर्मा ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ". . the temple must, in its space-directions, be established in relation to the motion of the heavenly bodies. But inasmuch as it incorporates in a single synthesis the unequal courses of the sun, the moon and the planets, it also symbolizes all recurrent time sequences: the day, the month, the year and the wider cycles marked by the recurrence of a complete cycle of eclipses, when the sun and the moon are readjusted in their original positions, a new cycle of creation begins. "Astronomy and Cosmology at Angkor Wat" (लेखक Stencel, R., Gifford, F., Mor´on, E., Science, 193, (1976), 281-287.) ह्या निबंधामध्ये दाखविल्याप्रमाणे अंगकोर वाटच्या पश्चिम-पूर्व अक्षावर जर पुढील मापे मोजली: १) खंदकाची रुंदी, २) मंदिराकडे जाणार्‍या पदपथावर पहिल्या पावलापासून पदपथाच्या अखेरपर्यंतची लांबी, ३) पदपथावर पहिल्या पावलापासून मध्यवर्ती मेरुशिखराच्या पहिल्या पावलापर्यंतची लांबी आणि ४) पदपथावर पहिल्या पावलापासून मेरुशिखराच्या केन्द्रबिंदूपर्यंतची लांबी तर त्यांच्यामध्ये जवळजवळ बिनचूक १:२:३:४ हे गुणोत्तर दिसते. हेच गुणोत्तर भारतीय युगसंकल्पनेतील कलि, द्वापार, त्रेता आणि कृत युगांतील वर्षांमध्ये आढळते. (ह्या विषयावर अधिक माहितीसाठी Eleanor Mannikka: ’Angkor Wat: Time, Space, and Kingship’ हे पुस्तक अथवा डॉ. सुभाष काक ह्यांचे निबंध पाहावेत.)

दुसर्‍या भिंतीपासून सुमारे ३५० मीटर लांबीच्या लांबलचक दगडी रस्त्याने चालून आपण तिसऱ्या भिंतीत आणि मंदिरात प्रवेश करतो. ह्या तिसऱ्या भिंतीची लांबी-रुंदी २१५ गुणिले १८५ मीटर आहे आणि ह्या सर्व लांबीरुंदीवर आतील बाजूस bas relief पद्धतीची भित्तिशिल्पे कोरलेली आहेत. पश्चिम-दक्षिण कोपर्‍याकडून सुरुवात करून घड्याळाच्या उलट्या दिशेने मोजल्यास पश्चिम भिंतीवर महाभारत युद्ध, दक्षिण भिंतीवर मंदिराचा निर्माता सूर्यवर्मन दुसरा ह्याची राजसभा, यमाचे पाताळ, पापपुण्याचा निवाडा, स्वर्ग आणि नरक अशी शिल्पे आहेत. पूर्वेच्या भिंतीवर पहिल्या अर्धात समुद्रमंथन आणि दुसऱ्या अर्धात विष्णु आणि असुरांचे युद्ध दाखविले आहेत. उत्तरेच्या भिंतीवर प्रथम कृष्णाच्या जीवनातले प्रसंग आणि नंतर नाना देवदेवतांचे चित्रण आहे. तेथून पश्चिम भिंतीकडे वळल्यावर रामरावण युद्ध दर्शविले आहे.
आता सर्वप्रथम महाभारत युद्धातील देखावे पाहा.

अर्जुन आणि सारथि कृष्ण


अन्य चार पांडव रथारूढ


शरपंजरी पडलेला भीष्म

रथारूढ द्रोणाचार्य

ह्यानंतर आपण दक्षिणेच्या भिंतीसमोर येतो. ह्या भिंतीचा निम्मा भाग मंदिराचा निर्माता सूर्यवर्मन् दुसरा ह्याची राजसभा, गजारूढ सूर्यवर्मन् दुसरा आणि त्याचे सैन्य, पालखीतून जाणाऱ्या राजस्त्रिया असे देखावे आहेत.

सूर्यवर्मन दुसरा आणि मन्त्रिगण


गजारूढ सूर्यवर्मन् दुसरा आणि सैन्य
सूर्यवर्मन् राजाच्या सभोवती छ्त्रे, चवऱ्या, आणि अन्य सत्तादर्शक चिह्ने आहेत. त्याच्यासमोर नम्रपणे आणि खालच्या पातळीवर त्याचे मन्त्री बसलेले आहेत. त्यापैकी प्रमुख मन्त्री राजाला काहीतरी वाचून दाखवीत आहे. शिल्पामध्येच लहान अक्षरांनी राजाचे नाव आणि मन्त्री वीरसिंहवर्मन्, धनंजय, जयेन्द्रवर्मन्, वीरेन्द्राधिपतिवर्मन् इत्यादि नावे कोरली आहेत.

राजसभेनंतर आपण जातो यमाची सभा, पापपुण्याचा निवाडा आणि स्वर्गनरकांची चित्रे इकडे. वाहन रेड्यावर बसलेला अनेक हातांचा यम दिसत आहे. त्याच्यावरहि छत्र, चवऱ्या असा सरंजाम आहे. अशी छत्रे आणि चवऱ्या ह्यांची संख्या त्या त्या व्यक्तीचे उतरंडीतले स्थान दाखविते. त्याचे साहाय्यक चित्रगुप्त आणि धर्म शेजारीच बसलेले आहेत आणि धर्माच्या सल्ल्याने चित्रगुप्त समोर आणलेल्या दीनवाण्या आणि आर्जवे करणाऱ्या लोकांच्या पापपुण्याचा हिशेब करीत आहे. एक यमदूत पापकर्म्यांच्या नाकातून आणि गालातून दोर ओवून आपल्या मागे त्यांना दोराने ओढत यमापुढे घेऊन जात आहे.

रेड्यावर आरूढ यम

चित्रगुप्त आणि धर्म

पापकर्म्यांना ओढत नेणारा यमदूत

निवाड्यानंतर स्वर्गाकडे अगर नरकाकडे निघालेले लोक ह्यापुढील दोन चित्रांमध्ये दिसतात. पहिल्या चित्रातील तीन पातळ्यांपैकी वरच्या दोनांमधील लोकांचा मार्ग स्वर्गाकडे जातो आणि खालची पातळी नरकाचा मार्ग आहे. स्वर्गाकडे निघालेल्यांपैकी पुष्कळांच्या डोक्यावर मुकुट आहेत, काहीजण अश्वारूढ आहेत. पुष्कळांना उच्चस्थाननिदर्शक अशा छत्र्या आणि चवर्‍याहि मिळाल्या आहेत. खालचे नरकाकडे नेले जाणारे मात्र यमदूतांकडून ओढले-फरफटले जात आहेत. त्याच्या पुढच्या चित्रातील लोक स्वर्गाकडे पालख्यांमध्ये बसून सुखाने जात आहेत.

स्वर्गाकडे की नरकाकडे?


पालख्यांतून स्वर्गाकडे वाललेले पुण्यात्मे

पुराणग्रन्थांमध्ये उल्लेखिलेल्या अनेक नरकांचे देखावे ह्यापुढे आहेत. त्या त्या नरकांची नावेहि तेथेच लिहून ठेवली आहेत त्यांपैकी तीन येथे दाखवीत आहे. कृमिकाय नरकामध्ये पाप्यांना कीटकांमध्ये टाकून यमदूत त्यांना छळतात. महारौरवामध्ये त्यांच्या पायांना वजने बांधून त्यांना टांगून ठेवले जाते आणि त्यांच्या शरीरावर खिळे ठोकले जातात. तप्तलाक्षामय नरकामध्ये त्यांना तापलेल्या लाखेचे चटके दिले जातात.


कृमिकाय नरक


महारौरव नरक


तप्तलाक्षामय नरक

अशा रीतीने दक्षिण बाजू संपवून आपण पूर्व बाजूकडे वळलो की पहिल्या अर्धामध्ये प्रथम समोर येते ते समुद्रमंथनाचे दीर्घ शिल्प. देव आणि असुरांनी ह्या दोन पक्षांनी सागरातून अमृत बाहेर काढण्यासाठी वासुकि नागाची दोरी करून ती मंदार पर्वताभोवती बांधली आणि दोन्ही बाजूंनी ती ओढून क्षीरसागर घुसळला. नंतर त्यातून अमृत आणि अन्य रत्ने बाहेर पडली ह्या पुराणकथेचा बराच पगडा ख्मेर संस्कृतीवर पडला होता कारण अनेक ठिकाणी ह्या पौराणिक कथेचे चित्रण आढळून येते. पाण्याचे प्रवाह आणि खंदक पार करण्यासाठी बांधण्यात आलेले अनेक तकालीन दगडी पूल अजून आपल्या जागांवर उभे आहेत. त्यांचे दोन्ही बाजूचे कठडे म्हणजे वासुकि नागाचे दोन भाग आणि देवदानव त्यांना ओढत आहेत असा देखावा अनेक जागी आढळतो. अंगकोर थोम नगराच्या दक्षिण द्वाराकडे खंदक ओलांडून जाणारा जो पू्ल आहे त्यावर समुद्रमन्थन देखाव्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. दोन्ही बाजूस कठड्याच्या स्वरूपात देव अणि दानवांच्या प्रत्येकी सुमारे ५० प्रतिकृति आजहि उभ्या आहेत. ऑगस्ट १२९६ ते जुलै १२९७ ह्या काळात आलेल्या चिनी वकिलातीतील एक, झू दागुआन, ह्यानेहि ह्याच आकृतींचे वर्णन केले आहे.


समुद्रमन्थन करणारा दानव


समुद्रमन्थन करणार्‍या दानवांचा कठडा


समुद्रमन्थन दृश्याचा आणखी एक कठडा

अंगकोर वाटमधील समुद्रमंथन शिल्प बरेच मोठे आहे. आपण त्याची दोन टोके आणि मध्यभागातील विष्णु पाहू. रस्सीखेच खेळातल्याप्रमाणे दोन्ही टोकांना दोघेजण इतरांहून मोठ्या शरीराचे दिसतात. वासुकीच्या मुखाच्या बाजूस असुर होते अशी पुराणातील गोष्ट आहे. असुरांच्या बाजूस शेवटाचा महाकाय असुर कोण आहे हे कळत नाही. देवांच्या बाजूस शेपटाकडे हनुमानासारखा दिसणारा महाकाय पुरुष आहे पण पुराणातील मूळ कथेमध्ये हनुमान समुद्रमन्थनप्रसंगी होता असा काहीच उल्लेख नाही. मध्यभागी मन्दार पर्वताखाली आधारासाठी कूर्मरूपाने स्वत: विष्णु उपस्थित आहे. कूर्माच्या वर विष्णु देवांच्या रक्षणासाठी सज्ज आहे. आकाशामध्ये मन्दार पर्वतावर दिसणारा देव कोण आहे ते कळत नाही. तो इन्द्र असावा असे मत वर्तविले गेले आहे. खाली समुद्राच्या पाण्यामध्ये मासे आणि अन्य जीव तरंगतांना दिसतात.


वासुकीच्या पाच फण्य़ांच्या बाजूचे असुर


वासुकीचे शेपूट पकडलेले देव


मध्यभागी विष्णु, तळाशी कूर्म आणि आकाशामध्ये इन्द्र

समुद्रमन्थनानंतर पूर्व बाजूच्या उरलेल्या अर्ध्या भागात विष्णु आणि असुर कालनेमि ह्यांच्यातील युद्ध दाखविले आहे.


गरुडावर आरूढ विष्णु


असुर कालनेमि

ह्यानंतर वळून आपण उत्तरेच्या भिंतीवरील कृष्ण आणि बाणासुर ह्यांच्यामधील युद्ध ह्या कथेपाशी पोहोचतो. (अभ्यासकांच्या मते भित्तिशिल्पांचा हा भाग अन्य भित्तिशिल्पांहून बराच नंतर १६व्या शतकाच्या मध्यभागामध्ये कोरला गेला आहे. अशा अर्थाचा लेख शिल्पांमध्येच मिळाला. मूल शिल्पांच्या वेळी काढण्यात आलेल्या काही रेखनावरून हा भाग इतर शिल्पांनंतर सुमारे ४०० वर्षांनी कोरण्यात आला.)

विष्णुस्वरूपात आणि गरुडावर आरूढ कृष्ण, बाजूस बलराम आणि संकर्षण

बाणासुर
ह्या पुढील अर्ध्या भिंतीवर देव-दानवांचे युद्ध दाखविले आहे. त्यांपैकी काही देखावे असे.

गेंड्यावर बसलेला अग्नि

ऐरावतावरचा इन्द्र
विचित्र पक्ष्यांवरची असुरसेना

सूर्य आणि चन्द्र

मोरावरचा स्कन्द

रेड्यावरचा यम
पुन: वळून आपण पश्चिमेच्या भिंतीसमोर येतो. येथे रामायण चित्रित केले आहे. ह्यातील काही दृश्ये अशी :

राम आणि हनुमान, मागे लक्ष्मण आणि बिभीषण

सिंहानी ओढलेल्या रथावर रावण. त्याची दहा तोंडे एकावर एक अशा तीन पातळ्यांमध्ये

अंगद आणि वज्रदंष्ट्र ह्यांचे युद्ध

नील आणि प्रहस्त ह्यांचे युद्ध

रामाकडून वालीवध

मरणोन्मुख वाली आणि शोकाकुल तारा

पुढील भागात अंगकोर वाटपासून १० किमी अंतरावरील ’बान्तेय् स्रेई’ हे पुराणांतील कथांचे चित्रण करणार्‍या कोरीव शिल्पांसाठी प्रख्यात असे मन्दिर पाहू.

* अशी मृत्यूनंतरची नावे बादशहा, राजे इत्यादींना द्यायचा रिवाज बहुतेक सर्व पौर्वात्य देशांमध्ये चालत होत. जपानी सम्राट् मात्सुहितो (१८६७-१९१२), योशिहितो (१९१२-१९२६) आणि हिरोहितो (१९१२-१९८९) हे त्यांच्या मृत्यूनंतर अनुक्रमे मेइजी, ताइशो आणि शोवा ह्या नावांनी ओळखले जातात. हिंदुस्तानातहि मुघल राज्यकर्ते ही प्रथा पाळत. उदा. बाबरचे असे नाव ’फिर्दौस मकानी’ आणि अकबराचे ’अर्श अशियानी’ होते.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

29 Dec 2017 - 11:31 am | प्रचेतस

जबरदस्त लेख.

शिल्पांची वेशभूषा तत्कालिन स्थानिक जीवनाचे स्वरुप जाणवून देणारी असते हे येथेही दिसत आहेच.
बाकी ही शिल्पं एकाच अखंड दगडातली नसून वेगवेगळ्या शिळांवर कोरून एकत्र जोडली गेली आहेत असे बारकाईने पाहिल्यास दिसत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Dec 2017 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

तपशिलाने आणि सुंदर चित्रांनी भरलेला माहीतीपूर्ण लेख खूप आवडला ! अंगकोर वट पाहणे हा प्रचंड भारावून टाकणारा अनुभव असतो !

पुभाप्र.

शिल्पे अवाढव्य आणि सुबक आहेत .

गेल्या भागात मनिमौ ह्यांनी खाण्यापिण्यासाठी आणि राहण्यासाठी जागा, वाहतुकीची सोय ह्याबाबत विचारणा केली होती. त्याचे उत्तर येथे देतो.

कंबोडिया हा देश आत्ता कोठे कित्येक दशकांच्या अंदाधुंदीमधून बाहेर पडत आहे. हुन सेन सरकार भरपूर दडपशाही करत असते. सर्व अडचणीमध्ये पोलिसांचे ध्यान 'ह्यातून पैसे कसे काढता येतील' ह्याकडे असते, देशामध्ये भरपूर दारिद्र्य आहे, अशा प्रकारचे बरेच निघण्यापूर्वी माझ्या वाचनात आले होते. त्यामुळे शक्यतो स्थानिक सोयी, वाहतूकव्यवस्था ह्यांवर अवलंबून प्रवास करणे, इंटरनेटवरून तिकिटे/रिझर्वेशन्स हे माझे नेहमीचे तत्त्व सोडून मी आमच्या स्थानिक एजंटाची मदत घेतली. त्याने जे बुकिंग आम्हास दिले त्यामध्ये सिएम रीपमध्ये ५ दिवस हॉटेल, नॉमपेन्हमध्ये २ दिवस हॉटेल, सिएम रीप ते नॉमपेन्ह विमान प्रवास, दोन्ही जागी खाजगी गाडी + सर्व वेळ बरोबर गाइड अशी सोय करून दिली होती. सिएम रीप तसेहि परदेशी प्रवाशांनी रात्री एकट्याने हिंडावे असे गाव वाटत नाही त्यामुळे आम्ही सर्व खाणेपिणे आमच्या हॉटेलातच केले. तसाहि मला जादा इंटरेस्ट देवळे पाहण्यामध्ये होता आणि मला सर्व चायनीज विएतनामीज अन्न चालते. त्यामुळे खाण्यापिण्याबाबत सांगण्याजोगे माझ्याजवळ विशेष नाही.

माझी वाहतुकीचीहि उत्तम सोय असल्याने खाजगी वाहतुकीवर मला अवलंबून राहवे लागले नाही. पण मला दिसलेले लिहितो. कंबोडियामध्ये कोठेच मला अधिकृत मीटर्ड टॅक्सी सर्विस, सार्वजनिक बस असे काही दिसले नाही. तेथे आलेले काही धाडसी आणि तरुण गोरे प्रवासी वैयक्तिक मोटरसायकल्स, मोपेड्स भाड्याने घेऊन हिंडतांना दिसले. अंगकोर वाटचा परिसर एकूण २५ गुणिले २५ किमी इतका असावा, त्यामुळे मोटरसायकल्स, मोपेड्स घेऊन प्रवास करणे सहज शक्य आहे. इतरांसाठी 'टुकटुक' नावाचे मोटरसायकलला मागे दोन माणसे बसायचा हौदा जोडलेले खाजगी वाहन उपलब्ध असते.

माझे मत असे आहे की ८-१० दिवसांमध्ये कंबोडिया-विएतनाम-थायलंड अशी नाचानाची करण्यापेक्षा कंबोडियाला एक पूर्ण आठवडा द्यावा आणि त्यापैकी ४ ते ५ दिवस केवळ सिएम रीपसाठी ठेवावा, जेणेकरून अंगकोर वाट आणि आसपासची अन्य देवळे नीटपणे पाहता येतील. नॉम पेन्हला दोन दिवस पुरेत.

ह्या सर्व देवळांमध्ये भरपूर पडझड झालेली आहे - अंगकोर वाटचे देऊळ खूप सुस्थितीत आहे. मात्र तेथे चालायला खूप लागते आणि ऐन जानेवारी- फेब्रुअरी मध्येहि दुपारचे ऊन चांगलेच गरम असते. अन्य देवळांमध्येहि भरपूर चालायला लागते आणि इतस्ततः पडलेल्या दगडांमधून मार्ग काढायला लागतो.

नॉम पेम्हला आमच्या पॅकेजनुसार नदीवर रात्रीचे भोजन आणि फेरफटका होताच. तो केल्यावर दुसर्‍या दिवशी आम्ही राजनिवास, टेकडीवरचे बुद्धमंदिर आणि राष्ट्रीय संग्रहालय पाहिले. आमच्या कार्यक्रमामध्ये Killing Fields हे ख्मेर रूज काळातील अत्याचार दर्शविणारे म्यूजियम होते पण तेथील कवट्यांची फडताळे पाहण्याऐवजी मी त्याच वेळामध्ये राष्ट्रीय संग्रहालय पाहिले.

सर्व फोटो लोड झाले नाहीत. पण लेखावरून अंगकोर वाट च्या भव्यतेची प्रचीती येते आहे. पुभाप्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2017 - 10:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अंगकोर वाटची माहिती अप्रतिम. आभार.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

2 Jan 2018 - 3:32 pm | अनिंद्य

सुंदर फोटो.
भव्य अंगकोर वट मंदिराचे सौंदर्य आणि किलिंग फिल्ड्समधले क्रौर्य दोन्ही न विसरता येण्यासारखे.
पु भा प्र

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Jan 2018 - 6:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

अतिशय सुंदर माहिती आणि मस्त फोटो आहेत. एकदा वेळ आणि पैश्याचे गणित जमवुन बघायलाच हवे.

सुहास बांदल's picture

10 Jan 2018 - 2:52 pm | सुहास बांदल

सर्वप्रथम अरविंद कोल्हटकर यांचे अभिनंदन. लेख उत्तम झाला आहे. याच विषयावर मागे डॉ सुहास म्हात्रे यांचा लेख वाचण्यात आला होता आणि तो पण खूप च वाचनीय होता. त्या मुळे मी त्यात काही भर टाकून उपयोग नाही . दोघांचे लेख परिपुर्ण आहेत.

मी फक्त सिएम रीप मध्ये जे अनुभव आले ते लिहीत आहे.

२५ डिसेंबर ला सिंगापुर ला धाकट्या भावाकडे जाण्याचा योग् आला आणि मग बरेच वर्ष मनात असलेला अंगकोर वाट ला जाण्याचा विचार बळावू लागला. इंटरनेट वरून माहिती काढल्या वर लक्षात आले कि सिंगापोर ते सिएम रीप विमानाने २ तासावर आहे . त्या मुळे लगेच माझ्या २ बहिणीन ची आणि माझी टिकेट्स बुक केली.

जसे अरविंद यांनी सांगितल्या प्रमाणे हा देश आता कुठे स्थिरावत आहे. त्या मुळे हॉटेल च बुकिंग मी booking.com वरून केले. स्थानिक माहिती कमी असल्या मुळे आणि बरोबर २ बहिणी असल्या मुळे चांगले हॉटेल बुक केले. ज्या मध्ये गरज पडली तर जेवणाची सोय असावी म्हणुन पण याची गरज पडली नाही कारण सिएम रीप मध्ये भरपूर भारतीय रेस्टॉरंट आहेत. आम्हाला स्थानिक लोकांचा खूप चा चांगला अनुभव आला अगदी टुक टुक पासून ते आमच्या महागडया हॉटेल पर्यंत. कंबोडियन लोकांनी खूप मदत केली. भारताविषयी विशेष आस्था जाणवली .

सिएम रीप मध्ये आम्ही ३ दिवस होतो. त्यातिल १ दिवस संपुर्ण अंगकोर वाट मंदीर पाहण्यात जातो. कंबोडिया ला जाण्यापूर्वी tripadvisor वरून खूप माहिती गोळा केली. लोकांचे ब्लॉग्स वाचून खूप फायदा झाला. त्या माहिती च्या आधारे Journey Cambodia या स्थानिक टूर कंपनी ची टूर बुक केली. टूर गाईड खूप च सखोल माहिती पुरवत होता त्याचा असल्याचा खूप फायदा झाला. सिएम रीप मध्ये USD सर्रास वापरले जाते. बऱ्याच वेळा कॅश मध्ये व्यवहार करताना कंबोडियन चलन सुट्टे परत दिले जाते. त्या मुले कॅश देण्या आधी च खात्री करून घ्यावी . ATM मधुन पण USD काढता येते. सिएम रीप मध्ये आम्ही 'दक्षिण' आणि 'Vannkam India ' मध्ये जेवण्याचा आस्वाद घेतला. 'Vannkam India ' च्या मालकांनी तर खूप च गप्पा मारल्या. बोलण्या च्या ओघात त्यांनी माहिती पुरवली की दक्षिण भारतातून खूप पर्यटक येतात.

अजून काही स्थानिक माहिती हवी असल्यास बिनधास्त सांगा.

पैसा's picture

10 Jan 2018 - 8:53 pm | पैसा

फोटो आणि लेख प्रचंड आवडले. प्रतिक्रियातून्ही भरपूर माहिती मिळत आहे.