उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वाचा होता कारण उत्तरेकडील शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी या मार्गाचा वापर करीत. तर मागच्या बाजुने जाणारा रस्ता नंदुरबार-सुरत या मध्ययुगीन महत्वाच्या शहरांना जोडतो. त्यामुळे या आक्रमकांना प्रतिबंध करण्या साठी मध्ययुगात उत्तर महाराष्ट्रातील या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधण्यात आले. सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. २५० मध्ये अहिर राजांनी तो जिंकला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. १२ व्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा. १३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती. पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने इ.स. १३७० मध्ये सोनगीरवर हल्ला चढवून हिंदू सरदाराकडून हा किल्ला जिंकून घेतला. फेरिस्त्याने हि घटना लिहून ठेवली आहे, मात्र त्यावेळी सोनगीर कोणत्या हिंदु राजाच्या ताब्यात होता हे तो लिहीत नाही. पुढे फारूकी घराण्याचे राज्य इ.स. १६०१ मध्ये संपुष्टात आले त्यावेळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता. त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले त्यामुळे अकबराने त्याला सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता असणारा शेवटचा मुघल सम्राट होता. हा किल्ला १७५२ पर्यंत मोगलांच्या ताब्यात होता.
पण याचवर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नारोशंकरकडे दिला. पेशवेकाळात गडाची चांगली निगा राखली जात होती. इ.स. १८०६-०७ च्या जमाखर्चात सोनगिरचा किल्ला दुरुस्त करण्यासाठी १७ रु. खर्च केल्याचा उल्लेख आहे. इ.स. १७०६-०७ मध्ये रोषणाई व गस्तीसाठी खर्च केल्याचा उल्लेख आहे. शेवटी १८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. इतिहासातील अनेक राजवटीचा आणि घटनांचा साक्षीदार असलेला सोनगीरचा किल्ला आज मात्र उपेक्षीत ठरला आहे.
सोनगीर किल्ल्याचा नकाशा
सकाळी थाळनेर व शिरपुर गावाची सैर करुन मी बसने सोनगीर गावाच्या फाट्याला उतरलो. या गावाच्या मागच्या बाजुला म्हणजे पश्चिमेला सोनगीर उभा आहे.
गावाच्या दक्षीणेला सुध्दा एक ताशीव कडे असलेली टेकडी आहे. सुरवातीला तोच सोनगीर किल्ला असावा असे वाटते, मात्र सोनगीरवर असलेली तटबंदी दिसल्यानंतर सोनगीर नेमका कोणता ते लक्षात येते. विशेष म्हणजे त्या शेजारच्या टेकडीवरही भगवा ध्वज लावलेला आहे. मुख्य किल्ल्याच्या आजुबाजुला सबरगडासारख्या लहान लहान टेकड्या आहेत. सोनगीर स्टॉपवर उतरुन किल्ल्याच्या दिशेने निघालो. धुळ्याहून थेट सोनगीर किल्ल्यास भेट देण्यासाठी ईंदोरकडे जाणारी कोणत्याही गाडीने धुळ्यापासून १८ कि.मी.अंतरावर आग्रा हायवेवर असणारे गड पायथ्याचे सोनगीर गाव गाठायचे. सोनगीर फाट्यावरून गावात शिरताना चौकातच गडावरची गावात स्थापित केलेली तोफ दिसली. सोनगीर किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून १००० फुट उंच आहे. दिसते. गावातील ग्रामपंचायती समोरुन एक छोटीशी वाट गडावर जाते.
सोनगीर गावात किल्ल्याच्या पायथ्याशी पुष्पदत्त दिंगबर जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर सुमारे ४५० वर्षे जुने आहे. येथील लोक असे सांगतात कि जेव्हा गावावर आक्रमण होत असे तेव्हा या जैन मंदिरातील मुर्ती गडावर ठेवत असत. या मंदिरात पुरातन मुर्ती आजही पहायला मिळतात. सोनगीर गावात विठ्ठल-रुक्मीनी मंदिर आहे.या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ बेवारस पडलेली आहे.
मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी रथ ठेवलेला आहे. या लाकडी रथाचे नक्षीकाम पाहून आपण किल्ल्याकडे निघतो. किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. समोरच्या घरांच्या रांगांमध्ये मधून मधून मागे जाण्यासाठी बोळ ठेवलेल्या आहेत. त्यातील एखाद्या बोळातून घरांच्या मागच्या बाजूला आपल्याला पोहोचावे लागते. किल्ल्याचा पुर्वउतार या घरांपर्यंत येवून पोहोचलेला आहे. हा परिसर अतिशय अस्वच्छ आहे.
गडावर जाण्यास एकमेव वाट असुन गडाच्या पाय-यांची सुरुवात नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. सुरुवातीच्या पाय-या या अलीकडील काळात सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. या वाटेच्या टोकावरच सोनगीर किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या पूर्वाभिमुख दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे.
या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची तटबंदी व त्यामध्ये असणारे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची पडझड झाली असून त्यातील दरवाजा मात्र उभा आहे. दरवाजावर कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पुर्वी एक शिलालेख होता. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरुन खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला हा शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेवून ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. या शिलालेखावर पुढील प्रमाणे ओळी आहेत.
शके १४९७ युवा संवत्सरे मार्गशीर्ष शुध्द्पंच
मी. सोमे ते दिने राजश्री उग्रसेन रविराजो
ये हुडा केसा जयश्री शुभंभवतु श्रीरस्तु
तत्सुत मानसिंगजी महाप्रतापी अभूतीचरं ||
म्हणजे हा शिलालेख इ.स. १५७५ मधील आहे. कोण्या उग्रसेन नावाच्या राजाचा मुलगा मानसिंग येथे मोठा पराक्रम गाजवून धारातिर्थी पडला, असे या शिलालेखात म्हणले आहे. ई.स. १५७५ म्हणजे फारुखी राजवटीचा अखेरचा काळ. मोगल काळात राउळ म्हणून संबोधले जाणारे राजपुत लोक रखवालीचे काम करित, अश्याच राजपुतापैकी उग्रसेन असावा. कदाचित तो या किल्ल्याचा किल्लेदार किंवा अधिकारी असावा.
दरवाजातून आत शिरल्यावर सुंदर नक्षीकाम केलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत येते.
हे स्तंभ पाहता इथं दरवाजापाशी एखादे देउळ असावे अथवा प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पायऱ्यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते. सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्यामुळे याठिकाणी नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.
या दरवाज्याच्या आतल्या बाजुला एक पाण्याचे टाके किंवा भुयार आहे. काही गावकर्यांनी या भुयाराचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला मात्र काही सापडू शकले नाही. हि माहिती त्या मुलांनी दिली.
पुढे माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पंधरा-वीस पायऱ्या चढून आपण गडावर पोहोचतो. पायथ्यापासून अर्ध्या तासात आपण किल्ल्याचा माथा गाठतो. सोनगीरचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असुन रुंदीला १६० फुट तर लांबीने १२०० फुट आहे. माथा बऱ्यापैकी सपाट असुन वर फारशी झाडी नाही. गडमाथ्यावर आपल्याला चुनाविरहीत तटबंदी दिसते. ती छोटे-छोटे दगड एकमेकांवर रचून केलेली असुन बऱ्याच ठिकाणी ढासळलेली आहे. आहे.
ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने दक्षिण बाजूला असणाऱ्या बुरूजाच्या माथ्यावर जायचे. या बाजूस तट व बुरूज वगळता दुसरे कोणतेही दुर्गअवशेष नाहीत. उत्तरेकडील तटबंदीवर बुरुजांचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात.
या टोकावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरूज असून त्यात तोफेची तोंडे बाहेर काढण्यासाठी दगडी झरोके आहेत. हे झरोके ईतर किल्ल्यांवरच्या बुरुजांच्या झरोक्यासारखे चौकोनी नसून नक्षीदार आहेत. पुर्वी या किल्ल्यावर काही तोफा होत्या. किती याची माहिती मिळत नाही. सध्या काही तोफा धुळ्याच्या राजवाडे संशोधन मंडळात ठेवलेल्या आहेत.
या वाटेवर पडीक घरांचे अवशेष तसेच इतिहासकाळात तेल तुप साठविण्यासाठी वापरले जाणारे एकुण चार दगडी रांजण दिसतात. हे रांजण जमिनीच्या पोटात असून त्याच्या शेजारीच गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठी आयताकृती १०० फूट खोल विहीर आहे.
विहिरीतील झाडांच्या दाटीमुळे तिची खोली लक्षात येत नाही. आता या विहीरीत थोडसे पाणी असले तरी गड राबता असताना या विहीरीचे पाणी खापराच्या नळ्यांनी गडपायथ्याच्या शिबंदीसाठी नेत असत.या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणतात. या विहीरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रु. खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे. या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा गावात केली जाते असे म्हटले जाते की ह्या विहीरीत तिथले दरोडेखोर त्यांची लूट ठेवत असत. असेही सांगितले जाते की शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी ह्या विहीरीतून गडाखाली जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे.
या विहीरीच्या बाजूला एका पुष्करणीचे अवशेष असून तिच्या चारही बाजूंच्या भिंतीत प्रत्येकी पाच कोनाडे बांधलेले आहेत. पाणी पाझरु नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षीत केलेले आहे. सांगाती सह्याद्रीचा या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे पुष्कर्णीच्या पुर्व भिंतीवर " शके १४९७- उग्रसेन पुत्र मानसिंग हा बलाढ्य राजा होता " असा शिलालेख आहे. मात्र मला तो सापडला नाही.
पावसाचे पाणी या पुष्कर्णीत साठते. माथ्यावरील पठारावर आज एकही वास्तू नाही.
गडावर हल्लीच एक मोठा भगवा ध्वज लावला आहे.
गडावरून आजुबाजुला टेकड्यासारखे डोंगर दिसतात. या टेकड्याच्या रचनेवरून ईतिहासात घडलेला एक प्रसंग मला आठवला. सन १८१८ मधे दुसरे बाजीराव पेशवे ईंग्रजांना शरण गेले त्याकाळात सरदार विंचुरकर यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्याचा ताबा ईंग्रजांकडे आल्यानंतर एके दिवशी भल्या पहाटे दोन हजार अरबांनी सोनगीर गावावर हल्ला करुन हे गाव व किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. गावाची तटबंदी फोडून त्यांनी गावात प्रवेश केला, त्यावेळी गावाच्या रक्षणासाठी केवळ २५० ब्रिटीश सैनिक होते. त्यांना लक्षात आले कि ईतक्या मोठ्या सैन्याला आपण प्रतिकार करु शकणार नाही, त्याबरोबर त्यांनी गावच्या देश्मुखाच्या घराचा आश्रय घेतला. बारा सैनिक किल्ल्याकडे पळाले आणि किल्ल्याचा दरवाजा बंद करुन घेतला आणि तोफंचा मारा सुरु केला. बापु गिकमान हा येथील मामलेदार होता. तो मोठा हुशार होता. त्याने गावालगतच्या टेकड्यावर संरक्षणासाठी ५० सैनिक तैनात केले होते. हे अनपेक्षित संकट दिसताच हे स्वार आरडाओरड गावात आले आणि त्यांनी आवई उठवली कि ब्रिटीशांची मोठी फौज गावाच्या दिशेने येत आहे, अरब लुटारुंना हे खरेच वाटले आणि त्यांनी गावातून पळण्यास प्रारंभ केला. या झटापटीत २१ माणसे ठार झाली आणि ४० जखमी झाली. किल्ल्यावरून झालेला तोफांचा मारा, मामलेदाराची हुशारी, टेकडीवरच्या स्वारांनी एनवेळी मारलेली मुसंडी यामुळे सोनगीर गावाचे आणि किल्ल्याचे संरक्षण झाले.
गडावरून पुर्वेला डोंगरगाव धरण, मुंबई- आग्रा तसेच धुळे- शहादा महामार्ग नजरेस पडतात. येथे आपली तासाभराची सोनगीरची गडफेरी पूर्ण होते. इ.स.१८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे.
जर काही कारणाने गडावर मुक्काम करायची वेळ आली तर गडावर काहीच सोय नाही, त्यापेक्षा गावात कोणाकडे सोय होईल. मुंबई -आग्रा महामार्ग जवळच असल्याने एखाद्या धाब्यावर खाण्याचीही सोय होउ शकेल.
उतरुन हायवेवर जाताना मी दुसर्याच रस्त्याने गेलो तर मला सोनगीर गावात तांबट आळी दिसली. तांब्याच्या भांड्यावर टाके घालायचे काम चालु होते. कुतुहलाने मी ते काम पहात थोडावेळ थांबलो. एकुण गावानेही किल्ल्याबरोबरच प्राचीन वारसा जपला आहे.
सोनगीरचा किल्ला पाहून आपण २-३ तासात धुळ्याला परतू शकतो. धुळ्यामध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन केंद्र असून या ठिकाणी अनेक दुर्मिळ हस्तलिखिते, शिलालेख, सुंदर दगडी मूर्ती व तोफा यांचे संग्रहालय असून सोनगीर भेटीत आपण तेही पाहू शकतो.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा. डॉ. जी.बी. शहा
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) धुळे जिल्हा गॅझेटियर
प्रतिक्रिया
15 Dec 2017 - 1:44 pm | एस
या किल्ल्याची बरीच पडझड झालेली दिसतेय. गावकऱ्यांकडून आणि पुरातत्त्व खात्याकडूनही किल्ला उपेक्षित राहिल्याचे वाटतेय.
उत्तम लेख.
18 Dec 2017 - 6:20 pm | प्रचेतस
हा लेखही छान, गडावर कलाकुसरीने समृद्ध मंदिरे नक्कीच असली पाहिजेत, किल्याच्या अवशेषांत कोरीव स्तंभ भरपूर दिसत आहेत.
खूप पूर्वी लळींग केला होता तेव्हा वेळेअभावी सोनगीर करायचा राहिला होता.
19 Dec 2017 - 3:19 pm | सस्नेह
तपशीलवार लेख !
जुन्या वास्तू प्राचीन कलांसारख्याच लुप्त होत चालल्या आहेत.
19 Dec 2017 - 4:41 pm | कपिलमुनी
आपण असे पुरातन गोष्टी संवर्धित करत नही याचे वाईट वाटते.
आणि तुम्ही एवढे फिरता याचे खूप कौतुक वाटते