मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in भटकंती
8 Dec 2017 - 3:17 pm

जगदीश्वराच्या प्रासादाचे शिखर स्पष्ट दिसत होते, कारण त्याच्यामागेच सुर्य हळुहळु मावळत होता. मावळतीच्या केसरी रंगाच्या पार्श्वभुमीच्या अलीकडे, जगदीश्वराच्या कळसाची गडद आकृती इतक्या लांबुन देखील समजत होती.

पुर्वेकडुन चंद्रप्रकाश हळुहळु आकाश व्यापत होता. सुर्य आणि चंद्राच्या दरम्यानचे आकाश मात्र धुकटसे झाले होते. मध्येच एखादासा इवलासा ढगुला, कदाचित वाट चुकलेला ही असेल, आकाशात तरंगत दिसत होता. त्या ढगांच्या ही वर आकाशात घिरट्या घेणारे तीन भले मोठे गरुड कमी अधिक उंची वर एका विशिष्ट कक्षेत फिरत होते. मधुनच कड्या कपा-यांमध्ये मातीचे घरटे करणा-या पाकोळ्या देखील थोड्या कमी उंचीवर हवेत सुर मारीत होत्या.
रायलिंग वरुन दिसणारे दृश्य

इतरत्र वातावरण म्हणावे इतके नितळ नव्हते. धुकट वातावरणाचा थर सभोवताली असल्याने सह्याद्रीच्या कड्या कपा-यांतील धार काहीशी अस्पष्टच दिसत होती. डावीकडे दुरवर मधुमकरंद गड, महाबळेश्वराचे पठार, त्याच्या थोडे अलीकडे रायरेश्वराचे पठार देखील अंधुक अंधुकच दिसत होते. तीच अवस्था उजवी कडे असणा-या डोंगररांगेची. धुकट वातावरण असुन देखील, सह्याद्रीच्या रौद्र रुपाचा साक्षात्कार करुन घेण्यासाठी, आम्ही उभे होतो त्यापेक्षा अधिक चांगली जागा दुसरी कुठे नसेलच कदाचित.

आमच्या समोर, अगदी समोर लिंगाणा आणि त्यामागे, रायगड व रायगडावरील जगदीश्वराच्या शिखराची भरीव गडद सावलीतील आकृती, व त्याही मागे सुर्यनारायण. अंधार पडायला, अजुन किमान एखादा तासाचा अवकाश होता. आम्हाला मावळत्या सुर्याचे दर्शन घेऊन निघायचे असल्याने, व अंधार पडण्यापुर्वी गाडी गाठायची होती.

घिरट्या घेणा-या गरुडांच्या अगदी खालोखाल, लिंगाण्याचा सुळका चढणाच्या प्रयत्नात असणारे अनेक फिरस्ते दिसत होते. त्यांनी दोर आणि बाकी योग्य ती सर्व साधने वापरुन लिंगाणा चढण्यासाठी एका पाठोपाठ एक, अशी हळु हळु वा सरकणारी रांग तयार केली होती. रायलिंगाच्या पठारावरुन ही रांग मुंग्यांच्या रांग असल्यासारखीच वाटत होती.

साधारण एखाद्या तासापुर्वी, जेव्हा सुर्य लिंगाणाच्या माथ्यावर तळपत होता, त्यावेळी आम्ही मोहरी मध्ये आमची गाडी लावुन रायलिंगाची वाट धरली होती. वाट अगदी नेहमीचीच व पायाखालची असल्याने व वेळाचे अचुक नियोजन केलेले असल्याने, मी अगदी निश्चिंत होतो. पठारावर पोहोचण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला तरी चालणार होते. यावेळी माझ्या सोबत आठ मुलींचा चमु होता. २० ते २५ या वयोगटातील असल्याने, त्यांचे चालणे तसे दमदार होते. ह्या सगळ्यामुळे जाताना पायाखालची वाट न्याहाळत, निरीक्षण करीत, चालण्याचा अंतरंग अनुभव घेत जावे असे मनात आले. पाऊसकाळा संपुन बराच अवधी लोटला होता. हिरवे हिरवे, असंख्य फुलांनी बहरलेली मैदाने आणि डोंगर, जागेवरच होते, पण आता ती फुल ही नव्हती आणि हिरवाई देखील नव्हती. गवत सुकुन गेल्याने एक करड्या रंगाचा नवीन गालिचाच जणु आता दिसत होता. मागच्या मोसमात कारवीला फुले येऊन, जुन कारव्या मरुन गेल्या होत्या. त्यांचे बीज रुजुन, पावसाळ्यात त्या कारव्याची इवलीसी रोपे पाहीलेली मला आठवत होती. आता मात्र, ती इवलीशी रोपे चांगली मांडी एवढी वाढलेली होती. करड्या सुकलेल्या गवताच्या पट्ट्यांमध्ये व डोंगर उतारांवर, ठिकठिकाणी ही नवीन कारवीची विस्तृत बेटे लक्ष वेधुन घेत होती. अजुन एक दोन महीने ह्या कारवीच्या कामठ्यांची जास्तीत जास्त उंची गाठण्यासाठी वाढ होईल. मग पानगळ होईल आणि पुन्हा ही कारवी आणि वृक्ष, द्रुम, लता वेली, झुडपे, अगदी करपुन गेलेली गवताची जमीनीच्या आतमधील मुळे, मैदाने, डोंगर, द-या, अवघे पुन्हा त्या काळ्या, गडद, वजनदार ढंगाची आतुरतेने वाट पाहतील. कसे ना सगळे विशिष्ट, योजनाबध्दरीतीने, अव्याहतपणे घडत आहे!
The participants
द सुपरगर्ल्स, निसर्गशाळा कॅम्पसाईट वर

उन्हाचा चटका जरी असला तरी ऊन जाणवत नव्हते कारण अधुन मधुन येणारी वा-याची झुळुक ऊन्हा्ची तीव्रता कमी करीत होती. मोहरी धनगर पाड्याचे पठार जसे आपण सोडतो, तशी झाडाझुडुपांची गर्दी वाढु लागते. त्यातच पायवाटेच्या डावीकडे, एक मृतदेह मला दिसला. आणि अकल्पित असा आनंद मला झाला. एरवी मृतदेह पाहुन आपण खिन्न, उदासच होऊ. या जीवनातील असार, मानवी जीवनाच्या, या मृण्मयी शरीराच्या, माणुस म्हणुन असलेल्या क्षमतांच्या मर्यादा आणि मृत्यु समोरील माणसाची अगतिकता याने आपण अंतर्मुख होऊ शकतो, पण आनंदी नक्की होणार नाही. मग माझ्या आनंदाचे कारण काय असेल?

मी जो मृतदेह पाहीला तो, कुण्या मनुष्याचा नव्हता. तो एका वृक्षाचा मृतदेह होता. आणि त्यातील आनंदाची बाब अशी होती की हा भला मोठा वृक्ष वार्धक्याने मृत्युला पावला होता. म्हणजे कसल्याही मानवी हस्तक्षेपा शिवाय, ह्या वृक्षाने त्याचे सगळे जीवन यापन केले होते. कधी काळी ते एक इवलेसे रोपटे असेल, तेव्हा कदाचित वणवा लागला नसेल, किंवा कुणी रानमाळ वणवले नसेल, त्यामुळे ते रोपटे मुळ धरु शकले. पुढे आणखी काही पाऊसकाळे गेल्यावर, चांगले मांडी एवढे जाड त्याचे खोड झाले असले, तेव्हा कुणी ही, हे झाड मेढ, नांगर, कुळव आदी साठी तोडले नाही, त्यामुळे हे जगु शकले होते. आणखी पुढे, जेव्हा याचे खोड दोन माणसांच्या कवेत मावेल एवढे जाड झाले, तेव्हा देखील कुण्या व्यापा-याची नजर यावर पडली नाही, त्यामुळे देखील झाड जगु शकले. आणि किमान शंभरेक पाऊसकाळे अंगावर झेलल्यावर कदाचित वार्धक्याने त्याचे निधन झाले होते. तो वृक्ष त्याचे सगळे आयुष्य जगला होता. त्यासाठी होता हा सुखाचा अनुभव. माझ्यासाठी ही बाब खरच खुप समाधानाची होती. अशी अनेक झाडे, वृक्ष जे वार्धक्याने मरतात असे अनेक मला पाहायचे आहेत. आणि प्रत्येक वेळी ह्या सुखाचा अनुभव घ्यायचा आहे.

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.

रायलिंग पठारावर

आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता. संधीकाळ होता हा. तन आणि मन दोन्ही प्रसन्न झाले होते. काही वेळापुर्वी रौद्र वाटणारा सह्याद्री आता मायाळु आहे की काय असा प्रश्न पडावा इतका वातावरणातील बदल मनाला आल्हाद प्रदान करीत होता. सुरुवातीला अधुन मधुन येणारी वा-याची झुळुक आता नव्हती. आता एका विशिष्ट लयी मध्ये हळुवार वारा, सतत सर्वांगाला विळखा घालत होता. त्या वा-याच्या झोतांमध्ये ऊब होती. कदाचित सह्याद्रीच्या मायेची ऊब असेल ती. सुर्य जसजसा क्षितिजाला स्पर्श करण्यासाठी खाली खाली सरकत होता तसतसा आमच्या मागे चंद्र आकाशात वर वर सरकत होता. मावळतीचा सुर्यप्रकाश, संध्याकाळचा संधीप्रकाश आणि पुर्वेकडचा चंद्रप्रकाश, हे सारे एकमेकांमध्ये मिसळल्याने जणु आमच्या वर अमृताचाच वर्षाव होत आहे की काय इतके प्रसन्न आम्ही सारे झालो. थोड्या वेळापुर्वी ढगांच्या ही वर, आकाशात घिरट्या घेणारे गरुड आता तिथे नव्हते. समोर लिंगाण्यावर दिसणारी ती माणसांची मुंग्यासारखी दिसणारी रांग ही नव्हती. पाकोळ्या देखील आता सुर मारीत नव्हत्या. कदाचित कड्या कपा-यांना असलेल्या त्यांच्या घरट्यांत जावुन निज येण्याची वाट पाहत असतील एव्हाना.

सुर्य अगदी क्षितिजाला टेकला. शिवप्रभुंच्या स्मृतींची, भव्यतेची साक्ष देणा-या त्या जगदीश्वराला, मावळत्या सुर्याला आणि सह्याद्रीच्या ह्या अनुपम सौंदर्याला मनोमन नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली.

आमच्या या ट्रेक ची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी इथे क्लिक करा

श्री. हेमंत सिताराम ववले
निसर्गशाळा, पुणे

प्रतिक्रिया

अतिशय उत्कॄष्ट, नितळ आणि थेट भिडणारे लिहीलय. अगदी थेट गोनिदांच्या लेखणीतून उतरल्यासारखा वाटला हा धागा. फोटो का दिसत नाहीत ते पहा.
तपशीलातील एक चुक सांगतो.

डावीकडे दुरवर मधुमकरंद गड, महाबळेश्वराचे पठार, त्याच्या थोडे अलीकडे रायरेश्वराचे पठार देखील अंधुक अंधुकच दिसत होते. तीच अवस्था उजवी कडे असणा-या डोंगररांगेची. धुकट वातावरण असुन देखील, सह्याद्रीच्या रौद्र रुपाचा साक्षात्कार करुन घेण्यासाठी, आम्ही उभे होतो त्यापेक्षा अधिक चांगली जागा दुसरी कुठे नसेलच कदाचित.

तुम्ही बहुधा रायलिंग पठारावर उभे असताना दिसणार्‍या निसर्गाचा वर्णन करित आहात असे गॄहित धरुन लिहीतो, लिंगाण्याच्या परिसरातून हवा खुप स्वच्छ असली तरी मधुमकरंदगड दिसेल असे वाटत नाही. कारण या कोनातून महाबळेश्वरचा ऑर्थरसीटचा भाग आणि प्रतापगडाचा डोंगर याच्या मागे मधुमकरंदगड लपेल. रायरेश्वरचे पठारही कितपत दिसेल याची शंका आहे. फारतर त्याचे नाखिंदा हे टोक दिसेल. असो. हि फार मोठी बाब नाही. उत्तम धागा. पु.ले.शु.

हेमंत ववले's picture

11 Dec 2017 - 3:33 pm | हेमंत ववले

दुर्दैवाने, गोनिदांचा संग मिळाला नाही. जेव्हा पायाला भिंगरी बांधली गेली व १ जुन १९९९ (मी ) ला सिंहगड स्वच्छता मोहीमे मध्ये सहभागी झालो, त्याच दिवशी गोनिदां विषयी सर्वप्रथम समजले. कारण पुण्यातील श्री मोहन शेटे सरांनी तेव्हा गोनिंदाच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, ४ जुन दुर्ग दिन म्हणुन साजरा करण्याचा उपक्रम सुरु झाला. त्यावेळी पहिल्यांदा त्यांचे नाव ऐकले. वाचन तर खुपच उशिरा सुरु झाले. पवना काठचा धोंडी आणि वाघरु, यांनी कायमचे मनात घर केले आहे.
त्यांचे सारखे लिहिण्यासाठी त्यांचेसारखे जगले पाहीजे. सह्याद्रीच्या आणि जगण्याच्या प्रेमात पडले पाहीजे. माझ्या मध्ये ती योग्यता नाहीये. तरीही तुम्ही केलेल्या कौतुकाने थोडे तरी मास नक्कीच चढले यात संशय नाही. धन्यवाद.

रायलिंग पठारावरुन, आर्थरसीट पॉईंट दिसतो, तसाच, त्याच्या उजवीकडे (आपण रायलिंग पठारावर, दक्षिणेला म्हणजे घाटमाथ्याशी समांतर तोंड करुन उभे राहीले तर) एल्फिस्टन पॉईंट देखील दिसतो. आणि आणखी उजवी कडे प्रतापगड. एल्फिस्टन व प्रतापगडाच्या मध्ये, प्रतापगडाच्या मागे, थोडे उंच मधुमकरंद गडाचे टोक दिसते. पुढच्या वेळी शक्य झाल्यास त्या शिखरांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो.

नाखिंदा नेमके शेवते घाटाच्या मागे लपते.

पण बरे झाले, याविषयी सविस्तर व अचुक माहीती संकलित करणे आता क्रमप्राप्त आहे.
धन्यवाद. तुमच्या सकारात्मक प्रतिसादांमुळे उभारी मिळते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Dec 2017 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन ! फोटो दिसत नाही... बहुतेक तुम्ही फोटोंना "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही, तो दिल्यास दिसतील.

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 6:54 pm | सिरुसेरि

सुरेख लेखन

पाटीलभाऊ's picture

12 Dec 2017 - 1:20 pm | पाटीलभाऊ

सुंदर वर्णन...फोटो थोडे अजून टाकले असते.

आवडले.विस्ताराने लिहा़ पुलेशु.

सुंदर लिखाण आणि सुरेख वर्णन.
पण ते शीर्षकात उगीच 'मृतदेह' टाकून लेख promote केल्या सारखा वाटतो. 'सह्याद्रीत झालेल्या जीवघेणा अपघातांचं वर्णन' असा चुकीचा समज घेऊन वाचक वाचायास येतो आणि सामोरं काही तरी वेगळंच येते.

आदिजोशी's picture

28 Dec 2017 - 3:51 pm | आदिजोशी

आणि मुळात ज्या झाडाचा उल्लेख केला त्याचा फोटोच नाही

मनोज डी's picture

28 Dec 2017 - 3:03 pm | मनोज डी

फोटो बघायला मिळाले असते तर खूप मजा आली असती
मोहरी गावापर्यन्त रस्ता कसा अहे ? मातीचा का डाम्बरी ?