सिंगापूरचा दरवाजा

विखि's picture
विखि in भटकंती
27 Nov 2017 - 11:38 am

नाव वाचून तुमच्या डोक्यात आलं असेल ते हे सिंगापूर नाहीये. हे कुठलं परदेशातलं सिंगापूर नसून आपल्याच देशातलं, आपल्याच मातीतलं, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात वसलेलं एक लहानसं ठिकाण आहे. पुण्या पासून 90 एक किमी अंतरावर, तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं वेल्हा गावच्या परिसरात हे सिंगापूर वसलंय.

ट्रेकिंग मध्ये सक्रिय असलेल्या मंडळींना या गावाची चांगलीच ओळख असेल. 'लिंगाणा' ट्रेक साठी जाताना सिंगापूर हे छोटेखानी वस्ती असलेलं गाव लागतं.

कोणताही ट्रेक असो वा ट्रिप असो, भटकंती म्हणलं की बरेचसे सुखद अनुभव हे येत असतात. काही गोष्टी घडतात त्या आपल्या डोक्यात ठाण मांडून बसतात. अशा अनुभवाचा आपल्यावर काही प्रमाणात प्रभाव देखील पडतो ज्याने दैनंदिन आयुष्यात आपला काही गोष्टींकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलून जातो. असा माझा वयक्तिक अनुभव आहे, ज्याची प्रचिती मला माझ्या आजपर्यंतच्या भटकंती मध्ये आली. सिंगापुरचा अनुभव व्यक्तिशः मला बरंच काही देऊन गेला, तो पुढीलप्रमाणे.

झालं असं की काही कामा निमित्ताने मला मढे घाटात जायचं होतं. त्या साठी मी महेश नावाच्या मित्राला तयार केलं. सर्व तयारी करून आम्ही सकाळी 8 दरम्यान पुण्यावरून निघालो. 10 वाजता वेल्हा गाठलं. नाश्त्यासाठी तोरणा गडाच्या पायथ्याला असलेलं 'तोरणा विहार' ला थांबलो. भटकंती साठी मी कुठंही गेलो की प्रथम तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारायची मला सवय आहे. त्याने होतं असं की, आपल्याला त्या भागातली बरीचशी माहिती तर मिळतेच व त्यानुसार आपण आपली भटकंतीची रूपरेषा ठरवू शकतो. हॉटेल मालकाशी च्या चाललेल्या गप्पा दरम्यान 'लिंगाणा' ट्रेक चा विषय निघाला. खूप दिवस लिंगाणा देखील मला खुणावत होता. तसा आमचा प्लॅन जरा बदलला आणि आम्ही मढे घाट ला येताना जाऊ असं ठरलं. वेळेचं असलेलं बंधन बघता आम्ही 'रायलिंग पठार' जे सिंगापूर च्या पुढे आहे जेथून लिंगाणाचं अफाट दर्शन होतं, तिथं थोडा वेळ देऊन मागं फिरायचं असा छोटेखानी प्लॅन बनवला आणि त्याप्रमाणे सिंगापूर कडे कूच केले.

केळद गांव च्या अलीकडं एक फाटा लागतो, तिथून आमचा सिंगापुरचा प्रवास सुरु झाला. वातावरण अचानक बदललं. रिमझिम पाऊस आणि धुकं दाटून आलं, तसं आम्ही आमची पावसाळी अंगवस्त्र चढवली.
सुरुवातीला रस्ता सुरेख होता, नंतर तो प्रचंड घसरडा होत गेला. चालू गाडी सोडा पण बंद गाडी पण ऐका ठिकाणी थांबेनाशी झाली. रस्ता संपूर्ण शेवाळलेला दिसू लागला. माझे संपूर्ण ड्रायविंग स्किल पणाला लावून मी बरंच अंतर कापलं,ज्यात 3/4 वेळा माझी घसरकुंडी खेळून झाली.मग या शेवाळलेल्या, हिरव्यागार रस्त्याच्या सन्मानार्थ मी माझी गाडी बाजूला व्यवस्थित पार्क करून पायीगाडी पकडली. कित्येक दिवसात या रस्त्या वरून एखादी गाडी गेल्याच चिन्ह दिसत न्हवंत. धुकं वाढत गेलं तसं मला लिंगाणा दर्शन धूसर होताना दिसू लागलं. पण आता इथवर आलोच आहे तर जरा प्रयत्न करू या आशेनं आम्ही झटपट पाऊलं टाकू लागलो.

सिंगापूर जवळ आलं तसं लहान पोरांचा गलका ऐकू येऊ लागला, तेवढ्यात काही बारकी पोरं आमच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.त्या पोरांशी जरा गप्पा गोष्टी झाल्या. धुकं प्रचंड होतं, रायलिंग पठारावरून लिंगाणा दर्शन व्हायची चिन्ह दिसत न्हवती.ती बारकी पोरं पण आम्हाला सांगू लागली, 'काय उपयोग नाय, तिकडं जाऊन,धुक्यात काय बी दिसणार नाय' तसा आमचा पण मागं फिरायचा विचार झाला होता कारण परत मढे घाटात पण जायचं होतं, आणि येताना घसरा-घसरीत पण आमचा बराच वेळ गेला होता. निघायच्या आधी कुठं चहा पाण्याची सोय आहे का विचारलं असता ती पोरं आम्हाला त्यापैकी एकाच्या घरी घेऊन गेली.
झोपडीवजा असं ते घर होतं. व्हरांड्यात एका टोपली मध्ये एक लहान बकरी ऊबं घ्यायला बसली होती. तिच्या बाजूला आम्ही बसलो. तेवढ्यात त्या पोराच्या आई ने आम्हाला बसायला घोंगड टाकलं.मी विचारलं "मावशी चहा भेटल का?" तशा त्या म्हणाल्या "व्हयं,करती की" आणि एक रंग उडलेलं पत्र्याचं कपाट उघडलं, आत कुठंतरी हात घालून त्यांनी एक लहानशी पुरचुंडी काढली, त्यात थोडी चहा पावडर दिसत होती. चहा बनवत आमच्या गप्पा सुरु झाल्या. पावसाळ्यात गावाची परिस्थिती, तिथल्या अडचणी, अशी चर्चा चालू होती. फार दुर्गम भागात ही वस्ती होती.तेवढ्यात चहा आला. बिन दुधाचा चहा देत म्हणाल्या "दूध नाय जी इकडं" असू दे म्हणत आम्ही त्या चहाचे घोट घेऊ लागलो. अर्थात तो चहा त्या वेळेस आणि त्या वातावरणात अमृताहून कमी नाही वाटला. तिकडं बाहेर पोरांचा गलका परत वाढू लागला तशी त्या पोराची आई पोरांना कायतरी सूचना देऊ लागली. मी विचारलं , ' काय चाललंय पोरांच?' तसं उत्तर मिळालं की 'काय नाय, घराला दरवाजा करत्यात ती' मी जरा आश्चर्याने परत विचारलं, दरवाजा?
चहा संपवत उंबऱ्यात उभं राहून मी पाहू लागलो. 10-12 वर्षातली ती पोरं त्यांच्या घराला दरवाजा बनवत होती. कोण बांबू आणतंय, कोण लाकडं तोडतय, काही जण बांबू चे बारीक पापुद्रे करून त्याला पीळ मारत होते.4 फुटाची पोरं 6-7 फुटांचा बांबू लीलया मधून चिरत होती, एक मोठा कोयता घेऊन त्याच्या काठ्या करत होते. मी आणि महेश सगळं कौतुकाने बघत होतो.
Corporate Culture मध्ये Team Management, Team Player,Team Building असलं कायतरी चालू असतं :) आणि कित्येक वेळा ते सगळं कृत्रिम वाटत मला. त्या सगळ्या Concept प्रत्यक्ष इकडं एका आडगावात, या बारक्या पोरांमध्ये बघत होतो. संपूर्ण मित्र-परिवार मिळून मित्राच्या घराचा दरवाजा बनवण्यासाठी झटत होते.भान हरपून सगळे त्या कामात खारुताई चा वाटा देत होते.
स्वतः स्वतःच्या घराचा दरवाजा बनवणं ही कल्पनाच मला सुखावून गेली.ते देखील या वयात. चौकशी केली असता समजलं की सर्वात मोठ पोरगं नववीला होतं बाकी पाचवी-सहावी ला होते. मला खरंच खूप कौतुक वाटलं या पोरांच्या टीमवर्कचं...
नकळत या सर्वाची तुलना मी करू लागलो,आपण दरवाजा बनवणे तर सोडा, पण दैनंदिन जीवनात किती लहान-सहान गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो.एखादी नवीन गोष्ट बनवणे लांबच राहिले पण आहे त्या गोष्टी बिघडल्या, नादुरुस्त झाल्या तरी त्यात फार लक्ष न घालता जवाबदारी टाळू पाहतो, अंग काढू पाहतो. काही जण असतीलही की जे या गोष्टी गांभीर्याने घेत असतील.सर्वांना या गोष्टी लागू नाही पडत, शेवटी अपवाद सगळ्याच गोष्टीना असतात.निदान जी कामं आपल्या आवाक्यात असतील त्यात लक्ष घातले पाहिजे, मग त्या तुमच्या वैयक्तिक वस्तू-गोष्टी असतील किंवा काही असू दे. या सर्व लहान लहान कामातून आनंद तर मिळेलच पण त्याकडं पाहायचा दृष्टिकोन देखील बदलेल.थोड्या वेळात ही लहान पोरं बरंच काही शिकवून गेली.

मी भानावर येत घड्याळ पाहिलं तर बराच वेळ झाला होता. आठवण म्हणून पोरांसोबत फोटो काढले. निघताना त्यांना विचारलं 'पोरांनो पुढच्या टायमाला येणार का आमच्या बरोबर लिंगाण्याला?'
तसं लाजत सगळे म्हणू लागले 'व्हय येणार की'
जाताना परत एकदा सिंगापूरच्या दरवाजा वर नजर टाकली कदाचित पुढच्या खेपेला तो घराला लागलेला असेल याचा विचार करत आम्ही मढे घाटचा रस्ता धरला.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2017 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विचार ! त्या मुलांचा आणि ते बनवत असलेल्या दरवाजाचा फोटो टाकला असता तर लेख अजून रोचक झाला असता... फोटो इथेच एका प्रतिसादात टाकू शकलात तर ते लेखात हलवण्याची व्यवस्था करता येईल.

फोटो टाकलाय... दिसत नाहीय पण ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2017 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो टाकताना तुम्ही चित्रांच्या थंबनेल्सच्या लिंक्स वापरल्या होत्या. त्याऐवजी, (चित्रांच्या छोट्या आकारावर क्लिक करून) चित्र पूर्ण मोठ्या आकारात दिसू लागल्यावर मिळणारी त्याची लिंक वापरल्यास चित्रे (लेखात दिसत असल्याप्रमाणे) दिसू लागतील.

विखि's picture

27 Nov 2017 - 11:01 pm | विखि

आभारी आहे म्हात्रेजी, मिपा आणि मटा पावला म्हणायचं :)

सिंगापूरला जायला गाडीरस्ता झाला का आता? छान! वरोतीवरून आधी पायवाटेने टेकडी चढून जावे लागत असे. दरवाजाचा फोटो असता तर बरे झाले असते. बादवे, या भागात, किंवा सर्वच आदिवासी भागात घर बांधण्याचे काम सर्व गावकरी एकत्र येऊन दोन तीन दिवसांत करून टाकतात. असे घर बांधणीचे प्रात्यक्षिक एकदा आम्हांला मोरोशीला पहायला मिळाले होते. फारच सुंदर!

गाडीरस्ता होऊन ४ / ५ वर्षे उलटली.

२६ जानेवारी २०१५ ला दुचाकी घेऊन सिंगापूरला गेलो होतो.

उपेक्षित's picture

27 Nov 2017 - 5:09 pm | उपेक्षित

१६ नोव्हेंबर च्या मटा मध्ये आपल्या विखी यांचा हाच लेख प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मनः पूर्वक अभिनंदन.

लिंक -

http://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/shared/ShowArtic...

विखि's picture

27 Nov 2017 - 6:31 pm | विखि

धन्यवाद.. उपेक्षित भाऊ!

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2017 - 6:11 pm | चौथा कोनाडा

झकास लेख !

अभिनंदन विखि या लेखाच्या निमित्तानं मटामध्ये झळकल्या बद्दल !

पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा !

विखि's picture

27 Nov 2017 - 6:51 pm | विखि

धन्यवाद....

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Nov 2017 - 9:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे व्वा ! मटावर झेंडा फडकवल्याबद्दल हार्दीक अभिनंदन !!

दुर्गविहारी's picture

27 Nov 2017 - 6:17 pm | दुर्गविहारी

खुपच सुंदर लेख !!! मी आयुष्यातील दुसराच ट्रेक तोरणा ते रायगड याच सिंगापुर नाळेमार्गे केला होता. तेव्हा हे गाव फारच दुर्गम होते. हरपुडगावापर्यंतच बस जायची. तिथून आम्ही वाटाड्या करुन सिंगापुरगावात २६ जानेवारीचे झेंडावंदन करुन सिंगापुरनाळे मार्गे दापोलीला उतरलो होतो, त्या आठवणी ताज्या झाल्या. आता सिंगापुरपर्यंत थेट बस जाते असे कळाले. मोहरीपर्यंतही कच्चा रस्ता झालेला आहे. या सुधारणा झाल्या तरी पर्यटकांचे लोंढे वाढुन इथल्या अस्पर्श निसर्गाची वाट लागू नये हिच ईच्छा.
तुम्ही धाग्यात दिलेला प्रसंग अनेकदा पहायला मिळतो. ईतक्या दुर्गम भागात मनुष्यबळ नसल्याने, एकमेका सहाय्य करू याला पर्याय नसतो. तरीही आपल्या शहरी मनाला ते जरा अनोखे वाटते. मी कुर्डूगड ते कोकणदिवा हा ट्रेक तेल्याच्या नाळेतून केला तेव्हा वाटेतील कुंभलमाच या गावी रात्री मुक्काम केला होता, तेव्हा त्या घराचा मालक आपल्या बायकोसोबत राबून शेजारीच कळक रोवून नवीन घर बांधत होता, या प्रसंगाची आठवण झाली. रम्य असतात ट्रेकच्या आठवणी.
पु.ले.शु.

छान संदर्भ दिले...

सोंड्या's picture

27 Nov 2017 - 7:27 pm | सोंड्या

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पण एक सिंगापूर आहे. नाणेघाटाच्या पायथ्याशी आणि माझ्या गावापासून ९ किमी अंतरावर आहे.
आम्ही नाणेघाटासाठी चढाई तिथुनच सुरू करतो.

मुरबाड बस डेपो मधुन मुरबाड-सिंगापूर अशी नियमित बस सेवा आहे.

विखि's picture

27 Nov 2017 - 7:45 pm | विखि

उपयुक्त माहिती दिलीत..

सोंड्या's picture

27 Nov 2017 - 7:32 pm | सोंड्या

लेख आवडला.
आणि आमच्या सिंगापूरच्या मिळताजुळता वाटला

कपिलमुनी's picture

28 Nov 2017 - 12:02 am | कपिलमुनी

जुन्नर तालुक्यात एक सिंगापूर आहे ना ? जीवधन नाणेघाटाच्या भागात ?
नक्की आठवेना !

वर उल्लेख केलेला तोच सिंगापूर.
पण तो मुरबाड तालुक्यात आहे.

दुर्गविहारी's picture

28 Nov 2017 - 7:48 pm | दुर्गविहारी

आणखी एक सिंगापुर सासवड-भुलेश्वर रस्त्यावर आहे.

निशाचर's picture

28 Nov 2017 - 2:12 am | निशाचर

लेख आवडला.

रेवती's picture

29 Nov 2017 - 6:20 am | रेवती

झकास फोटू आणि लेखन.