भूनंदनवन काश्मीर – भाग ७ (मानसबल सरोवर – दल सरोवर)
====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
भाग-५
भाग-६
====================================
गान्देरबलहून आम्ही मानसबल सरोवर पहायला गेलो. गान्देरबलहून मानसबलला जाताना वाटेत प्रथम आम्ही ‘खीरभवानी’ देवीच्या मंदिराला भेट दिली. काश्मीर खोर्यात तुरळक प्रमाणात असलेल्या हिंदू मंदिरांपैकी एक. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा प्रथम दिसला तो बंदोबस्त. मंदिराला CRPFची सुरक्षा पुरवलेली होती. मंदिराचा परिसर मोठा होता तसेच एकुण व्यवस्था चांगली होती. हे मंदिर रंग्या देवीला समर्पित असुन एका पवित्र झर्यावरती बांधण्यात आले आहे. महाराजा प्रतापसिंग यांनी मंदिर व परिसराची उभारणी ई. स. १९१२ मधे केली. तर, महाराजा हरीसिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीत मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य की इथे देवीला ‘खीर' अर्पण केली जाते. ह्या विशिष्ट परंपरेमुळे ह्या देवीला ‘खीर भवानी’ संबोधतात. ह्या मंदिराचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे की ज्या नैसर्गिक झर्यावर हे मंदिर उभारलेले आहे, असे म्हणतात की त्या पाण्याचा रंग वरचेवर बदलत असतो.
आंतरजालावरून साभार.
इथुन पुढे आम्ही मानसबलला गेलो.
मानसबल सरोवर श्रीनगरच्या उत्तरेला साधारण ३०किमी अंतरावर गान्देरबल जिल्ह्यात आहे. असे म्हणतात की ‘मानसबल' हे नाव ‘मानसरोवरा’वरुन देण्यात आलेले असावे. दूधपथरीसारखेच मानसबलदेखिल पर्यटकांमध्ये फारसे प्रसिद्ध नाही. इथे बरेचसे स्थानिक पर्यटकच येतात. सोहैल स्वतः बर्याच वर्षांनी मानसबलला चालला होता. आम्हाला म्हणाला की लहानपणी शाळेत असताना शाळेची ट्रीप आली होती इकडे त्यानंतर पहिल्यांदाच चाललो आहे. फारसे पर्यटक नसल्याने मानसबलला बर्यापैकी निवांतपणा होता. सरोवराच्या बाजूने ‘झरोका' नावाची मुघल बाग आहे. ही बाग नूरजहांने वसवली होती. मानसबल सरोवर काश्मीरमधील एक खोल सरोवर समजले जाते. ह्या सरोवरात देखिल रंगीबेरंगी शिकारे पहायला मिळतात. सरोवराचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे सरोवरातील कमळे. सरोवरात भरपूर प्रमाणात कमळे उगवतात. खरेतर, इथे कमळांची शेतीच केली जाते. स्थानिक लोक हे कमळाचे देठ खाण्यातसुद्धा वापरतात. स्वच्छ निळे पाणी, असंख्य कमळे, रंगीबेरंगी शिकारे, मुघल बाग आणि आजुबाजूचे हिरवेगार डोंगर हे सगळे मानसबल सरोवराला एक मनमोहक पर्यटनस्थळ बनवतात. हे सरोवर पक्षीनिरीक्षकांसाठीही नंदनवन आहे. पाणथळ जागी येणार्या पक्षांच्या अनेक प्रजाती इथे पहायला मिळतात.
मानसबल सरोवर पाहुन आम्ही श्रीनगरला परतलो. वाटेत हजरतबल दर्ग्याच्या जवळ असलेल्या ‘मूनलाईट बेकरी’मधुन ‘वॉलनट फज’ घेतले. संध्याकाळी दल सरोवरात शिकारा फेरी मारली. दल सरोवराबद्दल काय सांगणार. ही काही प्रकाशचित्रे. . . .
दल सरोवरातले मेडिकल स्टोर
मीना बाजार
दल सरोवरातील नागरिक
ट्रॅफिक जाम!!
Fruit Chaat
हाऊसबोटी
जाता जाता.. . . मानसबलचा परश्या. . .
====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
भाग-५
भाग-६
====================================
प्रतिक्रिया
21 Nov 2017 - 12:04 pm | श्रीधर
छान फोटो आणि वर्णन