भूनंदनवन काश्मीर – भाग ६ (सोनमर्ग)

के.के.'s picture
के.के. in भटकंती
3 Nov 2017 - 4:36 pm

भूनंदनवन काश्मीर – भाग ६ (सोनमर्ग)

====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
भाग-५
====================================

आज आम्ही सोनमर्गला भेट देणार होतो. सोनमर्ग श्रीनगरच्या ईशान्येला साधारणपणे ८० किमी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे कारगील व लेहला जातो. रस्ता चांगला आहे. बराचसा डोंगराळ भागातून जातो आणि गान्देरबल जिल्ह्यात गेल्यावर सोनमर्गपर्यंत ‘सिन्ध' नदीच्या सोबतीनेच जातो. सोनमर्ग हे श्रीनगरच्या अजुन उत्तरेला असल्याने तसेच ऊंचावर असल्याने हिवाळ्यात सोनमर्ग पूर्णपणे बर्फाच्छादित असते. सोनमर्ग-कारगील-लेह रस्तादेखिल बर्फामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असतो. साधरणपणे एप्रिलमधे हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला होतो.

सोनमर्गचे मुख्य आकर्षण म्हणजे थाजीवास हिमनदी. ही अशी हिमनदी आहे की तिथपर्यंत आपण सहज पोचू शकतो. पण इथे जाण्यासाठी घोडा/कार करावी लागते. खरेतर, आपण चालत देखिल जाऊ शकतो पण लहान मुलगा बरोबर असल्याने आम्ही घोडा करायचा ठरवला. काश्मीरमधल्या इतर पर्यटनस्थळाप्रमाणे इथेदेखिल घोडेवाले भयानक त्रास देतात. भयानक घासाघीस आणि जवळपास वाद घालून शेवटी आम्ही घोडेवाला ठरवला. पहलगामच्या डोंगराळ भागाएवढा हा रस्ता अवघड नव्हता. चालत येणे सहज शक्य होते. परंतु, शेवटच्या टप्प्यात पावसामुळे खूप चिखल राडारोडा झालेला होता. तिथे मात्र घोड्याशिवाय जाणे अवघड झाले असते. घोडेवाल्याबरोबर अजुन एक माणुस होता. थाजीवासला पोहोचल्यावर कळाले की तो स्लेजवाला होता. तिथे पोहोचल्यावर तो मागेच लागला की स्लेज आणि इतर काही बर्फाचे खेळ त्याच्याकडूनच करायचे. आणि त्यांचे मागे लागणे म्हणजे ते अक्षरशः पिच्छा पुरवतात. शेवटी ‘करतो बाबा तुझ्याकडुन, पण पिच्छा सोड' अशी वेळ येते. त्यानंतर पुन्हा पैशांची घासाघीस. एकुण काय, तर अशा ठिकाणी तुम्हाला निवांतपणे निसर्गाचा किंवा त्या जागेचा आनंद घेताच येत नाही.

थाजीवास जागा मात्र फारच छान होती. पूर्ण बर्फाळलेले डोंगर आणि त्यामधुन येणारी हिमनदी हा एक फार छान अनुभव होता.

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

1

सोनमर्ग नंतर आमचा मुक्काम गान्देरबलमधील एका काश्मीरी कुटुंबात होता. ‘असीम’च्या काश्मीरमधील अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे ते काही कुटुंबांना ‘होम स्टे' चालवण्यासाठी उद्युक्‍त करतात. उद्देश हा की पर्यटकांना काश्मीरी जीवनशैली जवळुन अनुभवता येईल, त्या कुटुंबालापण थोडेफार उत्पन्न मिळेल आणि पर्यटकांच्या येण्याजाण्यामुळे ते घर अजुन नीटनेटके व सोईसुविधांनी युक्‍त ठेवतील. तर, आम्ही ज्या ख़ान कुटुंबाकडे उतरलो होतो त्यांचे घर म्हणजे एक प्रशस्त टुमदार बंगलाच होता. ऐसपैस बंगला, त्यापुढे मोठे अंगण एकुणच सुखवस्तु कुटुंब होते. एकत्र कुटुंब असावे कारण घरात बरेच लोक होते. तसेच, घरात स्त्रीवर्गाची संख्या लक्षणीय होती. अर्थात, पुरुषवर्ग व्यवसाय/कामानिमित्त बाहेर असावा. आम्ही घरात गेल्यावर सगळ्याजणी घोळका करून चौकशी करू लागल्या. सगळ्या टीपीकल काश्मीरी पेहेरावात होत्या. एक लहान मुलगी तर थेट बजरंगी भाईजानच्या मुन्नी सारखी दिसत होती. तिथे गेल्यावर प्रथम चहापाणी झाले. फारच सढळ हात होता. दोन मोठाले कप होतील एवढा चहा एका माणसासाठी होता. वर बिस्कीट्स आणि स्नॅक्स. कसेबसे संपवले. नंतर मुलींशी गप्पा मारत असताना शिक्षण, शाळा, विषय असे विचारत होतो. तेव्हा कळाले की त्यांना हिंदी हा विषयच नाही. त्यांना विचारले की मग आमच्याशी कसे काय बोलत आहात. तर त्या म्हणाल्या की ‘हम तो आपसे ऊर्दू मे बात कर रहे हैं| हमे तो हिन्दी आती ही नहीं|’ :-) हसायलाच आले. बोलता बोलता कळाले की त्यांची सर्वात मोठी मुलगी १०वी पर्यंत शिकली व नंतर शाळा सोडुन घरातच मदत करत आहे. दोन चुलत बहिणी ८वीत आहेत आणि त्यांना पुढे अजुन शिकायची खूप इच्छा आहे. आम्ही काही activity games घेऊन गेलो होतो. संध्याकाळी सर्व लहान मुलांबरोबर त्या खेळलो. रात्री जेवायला काश्मीरी पद्धतीने बनवलेले दाल-राजमा-चावल असा बेत होता. स्वयंपाक फारच छान बनवलेला होता. रात्री कामावर गेलेले घरातील पुरुष मंडळी परत आली तेव्हा त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा-टप्पा. एकुण छान वेळ गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचे शेत पहायला गेलो. नंतर ब्रेकफास्ट करून आवरायला घेतले. घरमालकीणीने बायकोला ‘डोसा' कसा बनवायचा ते शिकवा असे सांगून ठेवले होते. बायको ते शिकवून आली. बायको आवरत असताना म्हणजे नेहेमीचा मेकअप करत असताना, घरातली एक मुलगी कुतुहलाने बघत होती. बायकोने विचारले असता ती म्हणाली ‘हमे ये सब करने की इज़ाजत नहीं है| पावडर-लिपस्टीक वगैरा कुछ नहीं|’

ब्रेकफास्ट करुन सगळे आवरून आम्ही त्यांचा निरोप घेतला. एकुणच हा एक वेगळा आणि छान अनुभव होता.

====================================
भाग-१
भाग-२
भाग-३
भाग-४
भाग-५
====================================

प्रतिक्रिया

श्रीधर's picture

4 Nov 2017 - 11:49 am | श्रीधर

खूप छान फोटो आणि वर्णन

पद्मावति's picture

4 Nov 2017 - 3:35 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय. काश्मीरी कुटुंबासोबत राहण्याचा तुमचा अनुभव खासच. फोटो फार सुंदर.