योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना
योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)
योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर
योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई
योग ध्यानासाठी सायकलिंग ५: चौथा दिवस- वाई- महाबळेश्वर- वाई
६: पाचवा दिवस- वाई- सातारा- सज्जनगड
२ ऑक्टोबर. दोन दिवस वाईमध्ये थांबल्यानंतर आज वाईमधून निघायचं आहे. निघण्याच्या आधी पहाटेच्या अंधारात थोडं फिरण्याचा आनंद घेतला! आज ह्या मोहीमेचा पाचवा दिवस! खरोखर काय सायकलिंग होतं आहे! अजूनही विश्वास बसत नाहीय खरं तर की मी काल खरोखर महाबळेश्वरला गेलो होतो! आज तसा सोपाच टप्पा आहे. इथून बत्तीस किलोमीटरवर सातारा आणि मग पंधरा किलोमीटर सज्जनगड! काही अडचण येऊ नये. पण आपल्याला जसं वाटतं तसं नेहमी होत नाही!
सामान बांधून लवकरच निघालो. काल खरं आव्हान आरामात पार झाल्यामुळे मन अगदी प्रसन्न आहे. सकाळची थंड हवा, निर्जन रस्ता आणि हिरवेगार वातावरण! चौदा किलोमीटर गेल्यावर एनएच ४ लागला. इथून अठरा किलोमीटरवर सातारा आहे. अगदी रुंद हायवे! मस्त वाटतंय. इथे काही वेळ तर असं वाटलं की, मी पिसाळलेल्या कुत्र्याच्या त्वेषाने सायकल चालवली! मध्ये मध्ये छोटी गावं दिसत आहेत. आणि दूरवर डोंगर. पण हायवेजवळचे अनेक डोंगर कापत आहेत, हे बघून वाईट वाटलं. हळु हळु सातारा जवळ येत गेलं. मी पूर्वी इथे अनेकदा आलोय, पण सायकल कधीच चालवली नाही आहे.
महाबळेश्वरवरून आलेली वेण्णा नदी
साता-याचा फाटा घेण्यापूर्वी एका ठिकाणी धावडशी फाटा दिसला! प्रतापी बाजीरावांच्या वेळच्या व त्यांचे गुरूतुल्य असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचं हे स्थान! मराठा इतिहासाशी संबंधित आणखी एक गांव. साता-यामध्ये नाश्ता केला. थोडा वेळ गेला त्यात. खरं तर नाश्ता आधीच करायला पाहिजे होता. पण सातारा जवळ येत होतं, म्हणून थांबलो. असो. शक्य तितक्या लवकर सातारा गाव बायपास करून सज्जनगडाच्या रस्त्याकडे निघालो. अनेकदा रस्ता विचारावा लागतोय. समोर अजिंक्यतारा दिसतोय! सज्जनगड आणि अजिंक्यतारा ह्या दोन किल्ल्यांवर मला सायकलवर जायचं आहे. आज सज्जनगडावर तर जातो आहे, पण वाटेत अजिंक्यता-याजवळूनच रस्ता जातोय. इथे बराच तीव्र चढ लागला. इतका तीव्र चढ असेल, असा मला अंदाज नव्हता. पण रस्त्यावर गर्दी होती, त्यामुळे उतरून १-१ गेअर टाकला नाही व २-१ वरच पुढे निघालो. काल- परवापासून १-१ गेअर डायरेक्ट पडत नाहीय, खाली उतरून पाडावा लागतोय. पण न थांबता २-१ वरच हा चढ ओलांडला व त्यामुळे बराच त्रासही झाला. धापा टाकत तो पार केला. अजिंक्यतारा अगदी समोर आहे! आणि ह्या चढामुळे त्याचीही भिती वाटतेय. पण चढ संपल्यावर मोठा उतार लागला. सातारा गांवही संपलं, बोगदा पार केला व निघालो. लवकरच दूरवर सज्जनगडही आला व त्याचं पहिलं दर्शन झालं! दूरवर पवनचक्क्याही दिसत आहेत.
साता-यामध्ये मिलिटरीतील सैनिकांची/ शहिदांची अशी अनेक गांव लागत आहेत…
पति हुतात्मा झाल्यानंतर स्वाती महाडीकांनी कठिण प्रशिक्षण पूर्ण करून सेनेत प्रवेश मिळवला व त्या लेफ्टनंटही झाल्या!
आता उतरताना मस्त वाटतंय. पण नाश्ता करण्यामध्ये थोडी गॅप पडल्यामुळे एनर्जी लेव्हल थोडी कमी वाटते आहे. इथून आता उरमोडी नदीपर्यंत मस्त उतार मिळेल. पण त्याचा दुसरा अर्थ हा की त्यानंतर मोठा चढ असणार. आणि मी ह्या रस्त्याचा सायकल मॅप व हाईट गेनसुद्धा बघितला आहे. इथून रस्ता आता वर चढत जाणार. तरीही मी काल महाबळेश्वर आरामात चढलो असल्यामुळे काही काळजी नाही. पण पुढे चढावर थकायला होतं आहे. एक गोष्ट अशी आहे की, कालपर्यंत मी जे घाट/ चढ चढलो, ते सगळे सकाळी ८- ९ च्या आत होते. आणि प्रत्येक चढापूर्वी मी ताजातवाना होतो. त्याआधी जास्त सायकल चालवली नव्हती. पण आज सुमारे चाळीस किलोमीटर सायकल चालवली आहे आणि सकाळचे दहासुद्धा वाजत आहेत. चांगलं ऊन आहे. त्यामुळे थोडं जड जातं आहे. असो, हीच तर खरी मजा! काल महाबळेश्वरने माझी काहीच परीक्षा घेतली नाही, आज ते काम सज्जनगड किंबहुना त्याच्या आधीचा चढच करतोय!
सज्जनगडाचे पहिले दर्शन!
“उरमोडी" नदी
इथे जरा जास्त थांबावं लागलं. १-१ गेअरवर हळु हळु पुढे जाता येतंय. सायकल चालवताना मनात अनेकदा काही गाणी ऐकतो. ह्यावेळी मनात हेच गाणं सारखं वाजतंय- रात अकेली है, बुझ गए दिए! सारखं तेच मनात ऐकू येतंय. मध्ये मध्ये सायकल चालवतानाच इतका त्रास होतोय की, एकदा तर ते गाणं ही 'बुझ गए दिए' सारखं बंद पडलं! पण परत थोड्या वेळाने सुरू झाल. आणि हळु हळु त्या गाण्यातून ऊर्जाही मिळाली, कारण ह्या गाण्यातही आशा भोसलेंनी आवाज उंच पट्टीत नेला आहे!
नजारे तर अतिशय जबरदस्त आहेत! आणि मी इतकाही थकलो नाहीय की, की ते मला दिसून न दिसल्यासारखे होतील. सज्जनगड जवळ येतोय. माझ्या मित्राचा फोन आला व त्याने सांगितलं की, कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला आहे व वाहतुकही थांबवली आहे. मी तिथे परवा जाईन, आज नाही. आज तर सज्जनगडावर थांबेन. पुढे गेल्यावर सज्जनगडाचा तिठा आला. इथून आता खरा घाट सुरू होईल. मनात अजूनही तेच गाणं वाजतंय- तुम आज मेरे लिए रूक जाओ, ऋत भी है, फुरसत भी है! ह्याच ओळीपासून ते परत परत वाजतंय आणि मलाही ऊर्जा देतंय, ताजं करतंय!
इथून किल्ला जेमतेम दिड किलोमीटर असेल. हळु हळु सायकल चालवत राहिलो. कालपर्यंत जितके चढ- घाट केले, तेव्हा कुठे डेस्परेशन झालं नाही की कधी पोहचेन. पण आज थोडं वाटतंय. पण शेवटचा टप्पा सोपाच गेला आणि मग तसा आरामातच गडावर पोहचलो. वेळ मात्र अपेक्षेपेक्षा जास्त लागला. सकाळचे साडे अकरा झाले आहेत. पार्किंगमध्ये सायकल लावली व वरच्या शंभर पाय-या लवकरच चढलो. तिथे चढल्या चढल्या समर्थांनी स्वागत केलं- केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!! व्वा! इथून अगदी मनोरम नजारे दिसत आहेत. इथून पुढे नजारे कसे आहेत, ह्याचं वर्णन करणार नाही! गडावर अनेक दरवाजे लागले व शेवटी किल्ल्यावर पोहचलो. वीकएंड नसल्यामुळे सहजच रूमही मिळाली. सज्जनगडावर प्रवाशांच्या राहण्याची व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था केली जाते.
थोडा वेळ आराम केला. एक भिती अशी होती की, गडावर इंटरनेटचं नेटवर्क तर असेल ना. कारण मी सोबत लॅपटॉप आणला आहे आणि मला कामही करायचं आहे. पण इथे बघितलं तर मस्त 4G नेटवर्क आहे. दुपारच्या भोजनाचा प्रसाद घेतला. थोडा वेळ फिरलो. माझ्या खोलीच्या गॅलरीतून उरमोडीवरच्या धरणाचं मस्त दृश्य दिसतंय! उरमोडी नदी म्हणजे अशी नदी जी ओलांडल्यानंतर लागतो त्या चढामुळे उर मोडता मोडता बाकी राहतो! आज जास्तच थकलो. नंतर गांधी जयंती असल्यामुळे माझ्याकडे अर्जंट सबमिशनचं काही काम नाही आलं आणि सज्जनगडावर लॅपटॉप उघडावाही लागला नाही.
मी ज्या रस्त्याने आलो तो रस्ता, तिथली बस आणि उजवीकडे ठोसेघरकडे जाणारा रस्ता!
"उरमोडी"वरील धरण
संध्याकाळी पूर्ण गड फिरलो. समर्थ रामदासांची समाधी, त्यांच्या वस्तु, त्यांनी बांधलेली मंदीरं! त्या काळी लोक कसे येत असतील अशा किल्ल्यांवर? इथे अनेकदा शिवाजी महाराजसुद्धा यायचे. त्यांची व रामदास स्वामींची भेट व्हायची. ते इथे काय बोलत असतील? दोघांविषयी मनात कृतज्ञता आणि आदर भाव वाटतोय. किल्ल्याच्या टोकाशी समर्थांचा धाब्याचा हनुमान आहे. तिथे थोडा वेळ थांबलो. मनमोहक दृश्य आहे! खाली येतानाचा रस्ता व मग ठोसेघरला जाणारा रस्ता! मी उद्या तिथूनच जाईन. किल्ल्यावरच्या शांततेचा थोडा वेळ आस्वाद घेतला. पण पर्यटक ब-याच संख्येने येत आहेत. मग कळालं की, कास पठाराकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे अनेक लोक इकडेच वळले आहेत. माझ्या टी- शर्टवर योग- ध्यान बघून एका पुजा-याने थोडी विचारपूस केली. रस्त्यावरही लोक मागे वळून सायकलचं बॅनर बघायचे. रात्री उशीरा मोठा पाऊस पडला. थोडी भिती वाटली की, माझी सायकल पार्किंगमध्ये दरीपासून फार लांब नाहीय, काही झालं तर नसेल? पण मग झोपलो.
आजचा चढ ७१२ मीटर
आज अठ्ठेचाळीस किलोमीटर सायकलिंग झालं आणि नंतर ट्रेकिंगही झालं. सज्जनगडावर मुक्काम करण्याचा अनुभव मस्त आहे. खरोखर इतक्या दुर्गम जागी भक्तांसाठी इतकी व्यवस्था करणं ही मोठी गोष्ट आहे! इथे सज्जनगडावर भोजन प्रसादही आहे. पण तो रात्री खूप उशीरा म्हणजे नऊ वाजता आहे. माझी तर इच्छा होती की, आठ वाजताच झोपेन. पण जेवणाचे व खाण्याचे इतर पर्याय नसल्यामुळे थांबावं लागलं. उद्या ठोसेघर धबधबा बघायचा आहे. रस्ता असाच मस्त असणार, चढ असणार! आता ह्या सायकल मोहीमेचे पाच दिवस पूर्ण झाले आहेत आणि फक्त दोन बाकी आहेत! पण काय मजा येते आहे!!
पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ७: सज्जनगड- ठोसेघर- सातारा
माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in
प्रतिक्रिया
1 Nov 2017 - 3:11 pm | पाटीलभाऊ
हाही भाग उत्तम...!
तुमच्या मोहिमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...!
1 Nov 2017 - 4:40 pm | sagarpdy
सहीच
1 Nov 2017 - 4:44 pm | सिरुसेरि
खुप सुरेख आणी सविस्तर प्रवास लेखन . पुप्रशु .
1 Nov 2017 - 5:06 pm | एस
छान सफर सुरू आहे.
1 Nov 2017 - 6:48 pm | mayu4u
छान चाललीये लेखमाला. जमल्यास सायकल चे आणखी फोटो टाका.
5 Nov 2017 - 4:25 pm | दो-पहिया
खूप छान प्रवास. तुमची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.
मात्र सायकलिंग करताना योगध्यान ह्या विषयावर विस्ताराने लिहिले असते तर आवडले असते. अजून यांचा परस्पर संबंध कसा ते उमजत नाही.
6 Nov 2017 - 12:20 pm | मार्गी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! ह्यावर सुरुवातीला इथे लिहिलं होतं- http://www.misalpav.com/node/41091
5 Nov 2017 - 5:28 pm | तेजस आठवले
छान लिहिलंय तुम्ही.नेहमीसारखंच. तुमची प्रवाही भाषाशैली तुमच्या लेखांमध्ये प्राण फुंकते.
शारीरिक चढ-उतार तर आहेतच, पण तुमच्या धाग्यांतून तुमच्या मनातील विचारांचे जे चढ-उतार प्रतिबिंबित होतात, त्यामुळे तुमचे धागे वाचनीय होतात, कंटाळवाणे/रटाळ होत नाहीत.
सायकल सुरक्षित कशी ठेवता ?चोरी/ समाजकंटक/टवाळखोरांपासून मोडतोड/उपद्रव इ. होऊ नये म्हणून काय करतात ?
सुरक्षेचे उपाय वगैरे तांत्रिक बाबी पण येउद्या.
6 Nov 2017 - 12:23 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद! :) :) तुम्ही असं वाचता, म्हणून लिहिण्याची प्रेरणा मिळत असते!
जिथे मुक्काम करत होतो, तिथेच सायकल ठेवत होतो (शक्यतो घराच्या गेटच्या आत/ हॉटेलमध्ये/ अंगणात). आणि अशी कोप-यात बाजूला लावली की, कोणी शक्यतो हात लावत नाही. बाकी तांत्रिक बाबी म्हणत असाल तर पूर्वी इथे थोड्या थोड्या अशा लिहिल्या आहेत: http://www.misalpav.com/node/35897
धन्यवाद.
6 Nov 2017 - 2:20 pm | पद्मावति
मस्तं चाललीय लेखमाला.