गाणे
ओलांडून कितीकदा प्रकटले मी या जगाच्या मिती
येतानाच कळेल काय इथला मुक्काम माझा किती?
श्वासांची गणिते करून क्षणही जन्मांतरी मोजले
केव्हा या घरट्यामधून उडणे भाळी असे कोरले?
'आता येथुन एक पाउल पुढे आहे तुला जायचे
त्या ठायीच तुझे नवे घर असे, तेथेच थांबायचे'
कोणी सांगत राहते हर क्षणी कानी असे काहिसे
जाते मोजत पाउले किति तरी मुक्काम तो ना दिसे
पाकोळी घुमटात एकटी झुरे देहात आत्मा तसा
इच्छेवाचुन देहही वसतसे कोणी दिलेला वसा
होते निर्मम चित्त मात्र सुटका सोपी कुठे एवढी?
मुक्तीची अडवून वाट बसली दारी भुते केवढी
जन्माशी जुळला असे तरि कुठे मृत्यू कुणाला कळे?
त्याचा काढत माग जीव जळतो, आयुष्यही काजळे
आरंभातच अंत पाहत कसे नाट्यांश रंगायचे?
आरोही अवरोह गात कुठले गाणे पुरे व्हायचे?
क्रांति
प्रतिक्रिया
21 Oct 2017 - 10:01 pm | यशोधरा
सुर्रेख!
22 Oct 2017 - 2:11 pm | पद्मावति
अप्रतिम!
24 Oct 2017 - 10:22 am | अनन्त्_यात्री
इतकी अचूक वृत्तबद्ध आणि (तरीही) तरल, अर्थपूर्ण कविता वाचली!
28 Oct 2017 - 4:39 pm | Mahesh Bhalerao
एक वास्तव सत्य !........ छान मांडलाय !
30 Oct 2017 - 6:27 pm | पैसा
वा!
30 Oct 2017 - 6:57 pm | सूड
__/\__