लोकहो... म्हणता म्हणता दिवाळी आली आणि गेली पण. आता लागलो आम्ही नेहमीच्या स्वैपाकाला. फराळाचं खाउन कंटा़ळल्यावर काल फक्त ही व्हेज बिर्याणी हादडण्यात आली आहे. ़ओण ते म्हणतंय तिकडे की असे पदार्थ भाज्या घालून कोण खातं का म्हणून??????
आता आम्हीच खातो ना. :)
तर पाहू मी कशी केली ही बिर्याणी ते..
शाही व्हेजिटेबल बिर्याणी
वाढणी: ४ व्यक्तींसाठी.
साहित्यः
१.५ वाट्या बासमती तांदूळ, १.५ वाट्या चिरलेल्या भाज्या (यात मी गाजर, मटार, घेवडा, फ्लॉवर आणि बटाटा या भाज्या घेतल्या आहेत आणि एक हिरवी मिरची २ तुकडे करून. ). ७ कांदे,८-१० लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ मोठे पिकलेले टोमॅटो, १०० ग्राम पनीरचे तुकडे, १ टीस्पून शहाजिरे, ५ लवंगा, १ इंच दालचिनीचा तुकडा, २ मसाला वेलच्या, २ हिरवे वेलदोडे, १ तमालपत्र, २ टीस्पून बिर्याणी मसाला, केशराच्या १०-१२ काड्या २ टीस्पून दुधात भिजवून, २ टेबलस्पून घट्ट दही चांगले फेटून घेउन, प्रत्येकी १० बदाम आणि काजू बारीक तुकडे करून, प्रत्येकी मूठ्भर पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर धुवून आणि बारीक चिरून, चिमूटभर साखर,१/२ टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार. पाणी आणि तेल आवश्यकतेनुसार
कृती:
प्रथम तांदूळ धुवून रोवळीवर २ तास उपसून ठेवा. भाज्या चिरून घ्या. चिरताना फार बारीक न चिरता मध्यम तुकडे करा नाहीतर बिर्याणीत त्या भाज्यांचा शिजून गाळ होतो.
२ टोमॅटो ब्लांच करून त्यांची मिक्सरमधून प्रुरी करून घ्या. आलं लसूण आणि २ कांदे घालून ही पेस्ट तयार करा.
दोन तासांनी एका मोठ्या पातेल्यात ६ वाट्या पाणी गरम करत ठेवा. त्यात १ टीस्पून मीठ, ५ लवंगा, दालचिनी, १ तमालपत्र , दोन्ही प्रकारचे वेलदोडे घाला. १ टीस्पून तेल घाला. पाण्याला उकळी आली की धुवून उपललेले तांदूळ त्यात घाला. सतत ढवळू नका. तांदळाचा दाणा मोडतो.
तांदूळ साधारण ८०% शिजत आले की चाळणीवर ओतून त्यातील पाणी काढून टाका. भात तसाच निथळत ठेवा .
एकीकडे दुसर्या पॅन मध्ये १टीस्पून तेल घाला. गरम झाले की त्यात शहाजिरे घाला. ते तडतडले की त्यात आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट घालून चांगली परता. मग टोमॅटो प्युरी घालून परत परता. त्यात तिखट, बिर्याणी मसाला घालून परता. तेल सुटू लागलं की सगळ्या भाज्या घाला. भाज्यांना एक चांगली वाफ येउदे. आता पनीरचे तुकडे घाला आणि चांगलं ढवळा. भाजीला मसाला सगळीकडून नीट लागायला हवा. चवीनुसार मीठ आणि किंचित साखर घाला.
आता एका पॅन मध्ये खाली किंचित पाणी आणि १ चमचा साजूक तूप घाला. त्यावर या तयार भाताचा एक थर घाला. त्यावर भाजीचा थर घाला, त्यावर कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचा थर, नंतर काजू आणि बदाम तुकडे, मग फेटलेल्या दह्यापैकी अर्ध दही असे थर लावा. परत भात, भाजी, कोथिंबीर-पुदीना, काजू-बदाम, दही आणि परत भात असे थर येउदेत. त्यावर उरलेली कोथिंबीर-पुदिना पाने घाला. वरून केशर मिश्रित दूध घाला. ही झाली बिर्याणीचे थर लावायची पध्दत.
त्यावर चमचाभर दूधाचा शिपका मारा. आता एक तवा चांगला तापवा. त्यावर हे बिर्याणीचे पातेले ठेवा. त्यावर झाकण ठेवा आणि अगदी मंदाग्नीवर ५-७ मिनिटे शिजवा.
हे सगळे फोटो देण्यापेक्षा एकच कोलाज करून देतेय. कारण फक्त मी काय केलं त्याची कल्पना यावी म्हणून. :)
१. : साधारण शिजलेला भात,
२. साहित्य
३. भाजी करताना
४. भाजी तयार
५. बिर्याणीसाठी थर लावताना
६. आणखी थर रचताना
७. परत थर रचताना
८. शेवटचा थर
९ तयार बिर्याणी
आता जे कांदे बाजूला काढून ठेवले असतील, ते लांब पातळ चिरून तळून घ्या आणि बिर्याणी वाढताना तिच्यावर हा तळलेल्या कांद्याचा कीस घालून द्या.
या बिर्याणीचा आस्वाद टोमॅटो सूप, काकडीची कोशिंबीर आणि तळलेल्या पापडाबरोबर जरूर घ्या.
प्रतिक्रिया
22 Oct 2017 - 12:24 pm | तुषार काळभोर
शतशः धन्यवाद!!
दिवाळी फराळाच्या दिवसात इतकी उत्कृष्ट डिश दिल्याबद्दल!!
22 Oct 2017 - 3:19 pm | एस
वावावावावा! काय भन्नाट राजेशाही पाककृती आहे! मस्त.
22 Oct 2017 - 3:38 pm | स्वाती दिनेश
मस्तच दिसतेय ग तुझी व्हेज बिर्याणी..
(खूप दिवसात केली नाहीये, हे फोटो बघून करायला हवीय आता वाटायला लागलंय, :) )
स्वाती
22 Oct 2017 - 4:43 pm | नूतन सावंत
फराळाचे करून दमलेल्या बायकांना सुट्टीवर असलेल्या मुलांसाठी खास काहीतरी बनवण्यासाठी झांजस आहे ही बिर्याणी.
22 Oct 2017 - 4:45 pm | नूतन सावंत
झकास असे वाचावे
22 Oct 2017 - 7:30 pm | रेवती
कठीण आहे बाई आमचं! आधी तू असे निरनिराळे पदार्थ द्यायचेस आणि नंतर आम्ही ते मोहात पडून करायचे.
फोटू छान आलेत.
23 Oct 2017 - 7:10 am | पिलीयन रायडर
मस्तच!
मी काय करते ते मूड आला म्हणून सांगून ठेवते :p
मी भाज्यांना दही आणि मसाले लावून मॅरीनेट करत ठेवते. हे शक्यतो मातीच्या भांड्यात करायचं. तास भर ठेवून त्याच भांड्यात एक वाफ काढायची म्हणजे भाज्याही शिजतात आणि मस्त मातीचा सुगंध लागतो. मग पुढे थर लावणे वगैरे..
तयार बिर्याणी मसाला वापरला तर फार पटकन होते ही बिर्याणी.
24 Oct 2017 - 7:39 am | सविता००१
मातीचं भांडं नाही माझ्याकडे. पण तू म्हणतेस त्या पद्धतीने मी फ्लॉवरची भाजी करते. दही-मसाले लावून मॅरिनेट करून. ती पण भन्नाट होते.
23 Oct 2017 - 10:47 am | केडी
सविता, खूप छान ...एक सुचवतो.... थर लावताना खाली तेल/तूप घातल्यावर कांद्याच्या चकत्या (कच्च्या) घालाव्या सर्वात खाली. म्हणजे त्या छान खरपूस भाजल्या जातात, आणि खाली भात लागत नाही..
23 Oct 2017 - 11:46 am | सविता००१
पुढच्या वेळी नक्की. मग ती बिर्याणी दुसर्या भांड्यात अलगद केक सारखी उपडी केली तर कांद्याच्या चकत्यांचं मस्त डिझाईन पण दिसेल. बेस्टच.
26 Oct 2017 - 7:57 am | इशा१२३
मस्त सवे!
छान पाकृ व फोटो.
मि वेज बिर्याणी करताना दोन चमचे बडिशेपहि वापरते, छान चव येते एकदम. शिवाय दह्यात गरममसाला तिखट कांदा लासुण आल पेस्ट धनेजिरे पुड आणि उकडलेल्या भाज्या मेरिनेट करुन मग वापरते छान चव लागते.बिर्याणी मसाला वापरत नाहि.एक थर केशरभाताचाहि लावते.
*केडींची टिपहि आवडली .
2 Nov 2017 - 12:59 am | रुपी
वा मस्तच.. छान दिसत आहेत बिर्याणी!
मी आधी मिपावर वाचनमात्र होते तेव्हा गणपाच्या व्हेज बिर्याणीची पाकृ पाहून सदस्यत्व घेतले :)
पण अजूनही बिर्याणी बनवायचा फार कंटाळा येतो बुवा.. मला स्वतःला खायला फार आवडत नाही म्हणून बहुतेक ;)
2 Nov 2017 - 1:09 am | पद्मावति
मस्तच दिसतेय ही बिर्याणी.
14 Nov 2017 - 12:05 am | babu b
छान्