लोकसभा निवडणुका-२००९ उत्तर भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
2 Mar 2009 - 11:41 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच हा लेख लिहायचे मनात होते. गेले काही दिवस मी माझ्या भविष्य आणि करियरविषयी काही गोष्टींमध्ये गुंतलेलो असल्याने मिसळपाववर येऊनही काही लिखाण करणे शक्य झाले नव्हते. देवदयेने सर्वकाही ठरविल्याप्रमाणे पार पडल्यास मिसळपाववर ते जाहिर करेनच.

गेल्या शनीवारी (२१ फेब्रुवारीला) मला मुंबईत एक छोटा अपघात होऊन माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे आणि दीड-दोन महिन्याची निश्चिंती झाली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे कारण त्यामुळे हा लेख मला अधिक सविस्तर लिहिता येईल आणि त्यासाठी जास्त वेळ देता येईल.

इतिहास आणि राजकारण आणि त्यातही निवडणुकांमध्ये मला अतोनात रस असल्यामुळे लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर कोणाला किती जागा मिळतील याचे अंदाज इतर अनेकांप्रमाणे मी पण बांधत असतो.कधी ते बरोबर येतात तर कधी नाही.तरी अंदाज बांधण्याची खोड काही जात नाही. तेव्हा माझे अंदाज मी मिसळपाववर लिहित आहे. ते किती प्रमाणावर बरोबर येतात हे काळच ठरवेल. त्यासाठी आपल्याला १६ मे पर्यंत थांबावे लागेल. तसेच हा लेख लिहिताक्षणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर जाणार की २००४ प्रमाणे काँग्रेसपक्षाबरोबर हे तितकेसे स्पष्ट नाही. या महत्वाच्या घडामोडीचा १५ व्या लोकसभेच्या चेहर्‍यामोहर्‍यावर परिणाम होणार आहे.

माझ्या अंदाजांचे स्वरूप राज्याराज्यांमधील परिस्थितीवरून अंदाज बांधणे असेल. त्यात काही सुधारणा मिसळपावच्या गावकर्‍यांना सुचवायच्या असल्यास त्याचे स्वागतच आहे. एकूण लेख ४ भागांमध्ये असेल. उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भारतासाठी एकेक लेख लिहायचा मानस आहे. सुरवात उत्तर भारतापासून.

हा लेख म्हणजे माझ्या कुवतीप्रमाणे राजकिय परिस्थितीचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीत काय होईल याविषयी बांधलेला अंदाज आहे. २००४ प्रमाणे अंदाज पार चुकायची शक्यता आहे. तेव्हा चु.भू.दे.घे ही विनंती.तसेच काही सुधारणा असल्यास सुचवाव्यात ही विनंती.

१) जम्मू-काश्मीर (एकूण जागा: ६)
राज्यातील जनतेने डिसेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीत आपला जनादेश दिला आहे.त्यानंतर ओमर अब्दुलांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार स्थापन झाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून राज्यातील वातावरण अमरनाथ जमीनप्रकरणामुळे ढवळून निघाले होते. काश्मीर खोरे आणि जम्मूमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्यात काश्मीर खोर्‍यात ३, जम्मू भागात २ आणि लडाखमध्ये १ अशा लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत. जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापित केले आहे. त्यापेक्षा खूप काही वेगळा निकाल लोकसभा निवडणुकीत लागेल असे वाटत नाही. तेव्हा जम्मू विभागातील दोन्ही जागा भाजप जिंकेल असे वाटते.काश्मीर खोर्‍यातील ३ पैकी २ जागा तरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी जिंकेल असे वाटते आणि १ जागा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी जिंकेल असे वाटते. माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद किंवा त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती लोकसभेत अनंतनागचे प्रतिनिधीत्व करेल असे वाटते. लडाखमधील जागा नॅशनल कॉन्फरन्स १९९८ ते २००४ मधील निवडणुकांप्रमाणे जिंकेल असे वाटते.

एकूण जागा: ६
भाजप: २
नॅशनल कॉन्फरन्स: २
काँग्रेस: १
पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी: १

२) हिमाचल प्रदेश: (एकूण जागा: ४)

राज्यात डिसेंबर २००७ पासून भाजपाचे प्रेमकुमार धुमल मुख्यमंत्री आहेत. मार्च २००३ च्या राज्य विधानसभा निवडणुका आणि मे २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस पक्षाने बाजी मारली होती. आताही राज्याची जनता विधानसभा निवडणुकांनंतर १६ महिन्यात लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करेल. साधारणपणे पहिले १.५ ते २ वर्षे राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाविरूध्द जात नाही (अपवाद: १९९९ च्या निवडणुका.त्यावेळी मध्य प्रदेश,दिल्ली आणि राजस्थानात काँग्रेस पक्षाचे सरकार ९ महिन्यांपूर्वी स्थापन झाले होते. तरीही पक्षाचा मोठा पराभव लोकसभा निवडणुकांमध्ये झाला. पण त्यावेळी कारगील हा महत्वाचा मुद्दा होता.यावेळी असा महत्वाचा मुद्दा नसल्यामुळे अपवाद होईल असे वाटत नाही.) लोकसभा निवडणुकांमध्येसुध्दा राज्यनिहाय मतदान होते असे १९९६ नंतरच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. (उदाहरणार्थ १९९८ मध्ये गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला पण त्याशेजारील महाराष्ट्र आणि राजस्थानात मोठा पराभव झाला.) हिमाचल प्रदेशात त्याकारणामुळे भाजपाचे वर्चस्व राहिल असे वाटते.मुख्यमंत्री धुमल आणि माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्यात विस्तव जात नाही हे जगजाहिर आहे. पण वाढत्या वयामुळे शांता कुमार फारसे प्रभावशाली राहिलेले नाहीत. तेव्हा राज्यातील ४ पैकी ३ जागा भाजपा जिंकेल आणि एक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल असे वाटते.

एकूण जागा: ४
भाजप: ३
काँग्रेस: १

३) हरियाणा: (एकूण जागा: १०)
राज्यात फेब्रुवारी २००५ पासून काँग्रेस पक्षाचे भूपिंदरसिंह हुडा मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरूध्द माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी हरियाणा जनकाँग्रेस च्या माध्यमातून दंड थोपटले आहेत. भजनलाल यांचे पुत्र कुलदिप बिष्णोई यांची जुलै २००८ मधील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षातून हकालपट्टी झाली आहे.तेव्हा भजनलाल आणि हुडा यांच्या भांडणात काँग्रेसपक्षाचे नुकसान होणार हे नक्की. तसेच ओमप्रकाश चौटाला यांचा भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि भाजप यांची युती झाली आहे. भाजपला अगदी अयोध्या आंदोलनाच्या काळात उत्तर भारतात पाय रोवता आले पण हरियाणात मात्र हा पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नव्हता. तरीही दिल्लीजवळील गुडगाव, फरिदाबाद यासारख्या भागात आणि दिल्लीहून त्यामानाने लांब असलेल्या अंबालासारख्या भागात पक्षाची मते आहेत. एकट्याच्या सामर्थ्यावर भाजप या जागा जिंकू शकत नसला तरी चौटालांच्या मदतीने दोन्ही पक्षांना फायदा होईल असे वाटते.चौटाला-भाजप युतीला १० पैकी ७ जागा मिळतील असे वाटते. हरियाणा जनकाँग्रेस ला एक जागा (कुलदीप बिष्णोईंची कर्नाल) आणि काँग्रेस पक्षाला उरलेल्या २ जागा मिळतील असे वाटते.

एकूण जागा: १०
भारतीय राष्ट्रीय लोकदल: ४
भाजप: ३
काँग्रेस: २
हरियाणा जनकाँग्रेस: १

४) पंजाब: (एकूण जागा: १३)+ चंदिगढ (जागा: १)
पंजाबात फेब्रुवारी २००७ पासून अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री आहेत.तेव्हा त्यांच्या सरकारचा जवळपास अर्धा कालावधी संपलेला आहे. २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारला अशाच अर्धकालीन लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा अकाली दलाला ही निवडणुक जरा जड जाईल असे वाटते. दरमानच्या काळात राज्यात विधानसभा किंवा लोकसभेच्या महत्वाच्या पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या. तरीही वर्तमानपत्रातील बातम्यांवरून राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणावर अकाली दलाच्या विरूध्द आहे असे वाटत नाही. तरीही या राज्याविषयी keeping fingers crossed.

एकूण जागा: १४ (चंदिगढ धरून)
काँग्रेस: ९
अकाली दल: ३
भाजप: २

५) दिल्ली: (एकूण जागा: ७)
दिल्लीत डिसेंबर १९९८ पासून काँग्रेसपक्षाचे शीला दिक्षित यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. १९९९ च्या लोकसभा निवडणुका आणि २००७ च्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची पिछेहाट झाली. पण २००२ च्या महानगरपालिका निवडणुका, २००४ च्या लोकसभा निवडणुका आणि २००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला शीला दिक्षित यांनी एकहाती विजय मिळवून दिला. तेव्हा २००४ पेक्षा निकाल वेगळा लागेल असे वाटत नाही. दिल्लीमध्ये बहुजन समाज पक्षाचे बळ वाढत आहे. पण तरीही ते बळ लोकसभेची जागा जिंकायला पुरेसे आहे असे वाटत नाही.भाजपाला एक जागा मिळेल. जर लोकप्रिय उमेदवार असला किंवा दुसरा काही चमत्कार झाला तर दुसरी जागा पक्ष जिंकू शकेल.

एकूण जागा: ७
काँग्रेस: ६
भाजप: १

६) राजस्थान:
राजस्थानातील जनतेने नोव्हेंबर २००८ मध्ये वसुंधरा राजेंच्या भाजप सरकारला नाकारून काँग्रेस पक्षाला परत एक संधी दिली. अशोक गेहलोत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गेल्या ३ महिन्यांपासून आहेत. वसुंधरा राजेंची मनमानी आणि गुज्जर आरक्षण आंदोलनाचा परिणाम भाजपाला भोगावा लागला. तरीही १९९८ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे पक्षाचा धुव्वा उडाला नाही आणि २०० पैकी ७८ जागा मिळाल्या. जसवंत सिंहांनी वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणे चालूच ठेवले आहे आणि माजी उपराष्ट्रपती शेखावतांना महत्वाकांक्षी स्वप्ने पडू लागली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर भाजपला ६ पेक्षा जास्त जागा मिळवणे कठिण जाईल असे वाटते.

एकूण जागा: २५
काँग्रेस: १९
भाजप: ६

७) उत्तराखंड:
राज्यात फेब्रुवारी २००७ पासून भाजपचे भुवनचंद्र खंडुरी मुख्यमंत्री आहेत. तेव्हा भाजप सरकार पंजाबातील बादल सरकारप्रमाणेच अर्धवाटेवर आहे. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी आणि प्रदेशाध्यक्ष हरिश रावत यांचे भांडण आणि प्रस्थापितविरोधी मत याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे बहुसंख्य आमदार माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोशियारी यांच्या बाजूचे होते पण पक्ष नेतृत्वाने खंडुरींच्या बाजूने कौल दिला.काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या काही आमदारांनी खंडुरींविरूध्द आवाज उठवला होता.पण त्यांना शांत करण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले.तरीही राज्य भाजपमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे नाही. २००४ मध्ये भाजपला ३, काँग्रेसला १ आणि समाजवादी पक्षाला मैदानी प्रदेशातील हरिद्वारची एक जागा मिळाली होती. भाजपला एका जागेचा फटका नक्की बसेल असे वाटते आणि काँग्रेस पक्षाला एका जागेचा फायदा होईल असे वाटते.

एकूण जागा: ५
भाजप: २
काँग्रेस: २
समाजवादी पक्ष: १

८) उत्तर प्रदेश: (एकूण जागा: ८०)

उत्तर प्रदेशविषयी नक्की अंदाज बांधणे धाडसाचेच आहे. या एका राज्यातील निकाल सर्व अंदाज आणि १५ व्या लोकसभेचा चेहरामोहरा उलटापालटा करू शकतो.

पण राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचेच वर्चस्व राहिल असे वाटते. २००४ मध्ये समाजवादी पक्षाने इतर सर्व पक्षांपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.पण त्यानंतर मायावतींनी सोशल इंजिनियरींग यशस्वी करून २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार यश मिळवले.त्यानंतरच्या २ वर्षांत मायावतींनी उच्चवर्णीयांना आपल्याबरोबर ठेवण्यात यश मिळवले आहे. समाजवादी पक्षाचे काही खासदार मायावतींबरोबर आले आहेत.तसेच मुलायमसिंगांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि सरकार तारले. तो मुख्य मुद्दा अमेरिकेबरोबरचा अणुकरार हा होता. अर्थात मुलायमसिंगांनी लोकसभा निवडणुकीत फायदा होईल म्हणून काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. आणि मायावती त्या कराराविरूध्द आहेत.तसेच कल्याण सिंह समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. त्यांचा अयोध्या आंदोलनातील सहभाग सर्वांना माहित आहे. काही मुस्लिम मते त्याकारणावरून समाजवादी पक्षाकडून बहुजन समाज पक्षाकडे जायची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बसपला ५० ते ५५ जागा मिळतील असे मला वाटते. तेव्हा सरासरी म्हणून ५२ जागा धरू.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तणातणी चालू असली तरी दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज सध्या आहे. या दोन पक्षांनी युती करून निवडणुक लढविल्यास २० पर्यंत जागा मिळू शकतील असे मला वाटते.

भाजपची मात्र या राज्यात पूर्णपणे वाताहत झाली आहे. कल्याण सिंहांनंतर जनतेत समर्थन असलेला नेता पक्षाकडे राहिला नाही.पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह गाझीयाबाद मधून तर ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी वाराणशीतून निवडणूक लढवणार आहेत. तरीही या दोन नेत्यांना यश मिळेल हे १००% खात्रीने सांगता येत नाही. अजित सिंगांबरोबरच्या युतीमुळे गाझीयाबाद मध्ये राजनाथ सिंगांना काही प्रमाणावर फायदा जरूर होईल. वाजपेयींनी राजकारण संन्यास घेतल्यानंतर लखनौमध्ये लालजी टंडन पक्षाचे उमेदवार असतील. वाजपेयींविषयी असलेल्या सद्भावनेचा फायदा होऊन ते निवडून यायची शक्यता आहे. तसेच मेनका गांधींसारखे काही उमेदवार स्वत:च्या बळावर निवडून येऊ शकतील. तसेच अजित सिंगांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबरच्या युतीचा पक्षाला पश्चिम उत्तर प्रदेशात (बागपत, मेरठ या भागात) पण पक्षाला ६ पेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हणणे मोठेच धाडसाचे ठरेल.

तेव्हा राज्याविषयीचा माझा अंदाज असा:

एकूण जागा: ८०
बहुजन समाज पक्ष: ५२
समाजवादी पक्ष: १४
भाजप: ६
काँग्रेस: ५
भारतीय लोकदल: २
अपक्ष: (कल्याण सिंह): १

तेव्हा उत्तर भारतात पुढील परिस्थिती असेल असे मला वाटते.

एकूण जागा: १५१

यु.पी.ए:
काँग्रेस: ४५
नॅशनल कॉन्फरन्स: २
समाजवादी पक्ष: १५
अपक्ष (कल्याण सिंह): १
एकूण: ६३

एन.डी.ए.:
भाजप: २५
अकाली दल: ३
भारतीय राष्ट्रीय लोकदल: ४
भारतीय लोकदल: २
एकूण: ३४

इतर:
पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी: १
हरियाणा जन-काँग्रेस: १
बहुजन समाज पक्ष: ५२
एकूण: ५४

(क्रमशः)

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

2 Mar 2009 - 11:48 pm | आनंदयात्री

जय हो क्लिंटनराव !!
मिपावर निवडणुक फिव्हर सुरु करणारा लेख. बाकी पुढले लिखाण वाचायलाही उत्सुक आहेच.

अवलिया's picture

3 Mar 2009 - 12:25 pm | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

क्लिंटन's picture

3 Mar 2009 - 3:12 pm | क्लिंटन

आनंदयात्री आणि अवलिया,

आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. माझा पश्चिम भारतातील परिस्थितीवरील अंदाजांचा लेख जवळपास पूर्ण आहे. तो आज संध्याकाळपर्यंत मिपावर लिहितोच.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

विसोबा खेचर's picture

3 Mar 2009 - 12:04 am | विसोबा खेचर

क्लिम्न्टनराव,

तब्येतीची काळजी घ्या अन् लौकर बरे व्हा..

असो..

आपला व्यासंग बाकी दांडगाच दिसतो आहे. आपल्या लेखमालेचे स्वागत..

आजच निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे ही अत्यंत ताजी घटना आहे. परंतु इतक्या लौकर तिचे पडसाद इतक्या विस्तृतपणे मिपावर उमटावेत हे मिपाच्या लोकाभिमुखतेचे, समाजाभिमुखतेचे एक लक्षण आहे असे अभिमानाने म्हणावेसे वाटते...! येथे प्रसिद्ध होणारे उत्तम साहित्य, उत्तम पाकृ यांच्यासोबतच ताज्या घटनांचा उहापोहही मिपावर तेवढ्याच तत्परतेने होतो आणि क्लिंटनराव, हे आपल्यासारख्या मिपाकरांमुळेच शक्य होतं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मिपा हे अत्यंत सजग, जिवंत असल्याचेच हे लक्षण आहे असंही म्हणावंसं वाटतं. मी सर्व मिपाकरांचा ऋणी आहे..!

असो, आता बॅक टू युअर सब्जेक्ट..

परंतु क्लिन्टनराव, त्यापूर्वी एक सांगा, की जी मंडळी आता हिरीरीने या निवडणुका लढवतील, त्याकरता कुठल्याही थराला जातील, सत्ता मिळवण्याकरता, खुर्ची मिळवण्याकरता वाट्टेल तसा पैसा खर्च करतील त्यापैकी एकाही व्यक्तिला, पक्षाला ही जाणीव आहे का की आपण ज्या सार्वभौम भारताचं प्रतिनिधित्व करणार आहोत, तो भारत आपल्याला काय किंमतीत मिळाला आहे? त्याकरता किती क्रान्तीकारकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे, कितीजण हासतहासत फासावर गेले आहेत?

आणि त्यानुषांगाने आपणही या देशाचं काही एक ऋण देणं लागतो, ही जाणीव किती उमेदवारांकडे आहे हे आधी सांगा!

मला खात्री आहे, आपण एकाही पक्षाचं, उमेदवाराचं नांव घेऊ शकणार नाही..!

सबब, या निवडणुकांशी निदान माझा तरी काही संबंध नाही. मी कुणालाही मतदान करू इच्छित नाही!

असो..!

आपला,
(भ्रष्ट व सत्तापिपासू उमेदवारांना, पक्षांना मतदान करून देशद्रोह करायची इच्छा नसलेला!) तात्या.

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 7:58 am | विनायक प्रभू

तात्यांशी एकदम सहमत.
मला एक सांगा क्लिंटन साहेब,
एकंदरीत हंग (की डंग) पार्लमेंट ची शक्यता पण वर्तवली जाते. अशा परिस्थितीत मायावती पंतप्रधान बनण्याची शक्यता पण आहे असे म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते?
तसे होणार असेल तर
अरे देवा......

क्लिंटन's picture

3 Mar 2009 - 3:17 pm | क्लिंटन

>>एकंदरीत हंग (की डंग) पार्लमेंट ची शक्यता पण वर्तवली जाते. अशा परिस्थितीत मायावती पंतप्रधान बनण्याची शक्यता पण आहे असे म्हटले >> जाते. तुम्हाला काय >>वाटते? तसे होणार असेल तर

ती शक्यता तर आहेच ना.पण काय करणार लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेल्या पंतप्रधानाला मान्य केलेच पाहिजे ना.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

क्लिंटन's picture

3 Mar 2009 - 3:15 pm | क्लिंटन

>>तब्येतीची काळजी घ्या अन् लौकर बरे व्हा..

धन्यवाद तात्या.तब्येतीची काळजी घ्यायची म्हणजे दुखावलेल्या पायावर वजन न टाकता पुढील दीड-दोन महिने वावरणे! ते तर करतच आहे. बाकी हाडाचं दुखणं फारच किचकट आणि वेळखाऊ. त्याविषयी शुभेच्छा दिल्याबद्द्ल आदिती आणि इतर सर्वांचेच आभार. असो.

>>आपला व्यासंग बाकी दांडगाच दिसतो आहे. आपल्या लेखमालेचे स्वागत..
बापरे व्यासंग असा मोठा शब्द ऐकून घाबरायलाच झाले. व्यासंगाबिसंगाचे माहित नाही पण राजकारण (कितीही घाणेरडे असले तरी) माझा जिव्हाळ्याचा विषय.मी पाचवीत असताना १९८९ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून राजकारण वाचायची चटकच लागली. आता राजकारणातील घाणेरडे प्रकार बघून माझा त्यातील रस बराच कमी झाला आहे पण इतक्या वर्षांची सवय सहजासहजी सुटणार नाही आणि सुटतच नाही.

>>मिपा हे अत्यंत सजग, जिवंत असल्याचेच हे लक्षण आहे असंही म्हणावंसं वाटतं. मी सर्व मिपाकरांचा ऋणी आहे..!
आणि मिपाकर सुध्दा असे मायबोली मराठीमध्ये सकस चर्चेसाठी माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि गेल्या दीड वर्षात ते समर्थपणे चालविल्याबद्दल आपले आणि संपादक मंडळाचे आणि त्यामागे असलेल्या सर्वांचे आभारी आहेत.मिपाची वाटचाल अशीच चालू राहू दे आणि अधिकाधिक दर्जेदार चर्चा मिपावर होऊ देत.

>>आणि त्यानुषांगाने आपणही या देशाचं काही एक ऋण देणं लागतो, ही जाणीव किती उमेदवारांकडे आहे हे आधी सांगा!
बरोबर अशा उमेदवारांची नावे अगदी हाताच्या बोटावर घेण्याइतकीच आहेत. आमच्या पुण्यात अरूण भाटिया निवडणुक लढविणार आहेत आणि मागे अविनाश धर्माधिकारींनी पण निवडणुक लढवली होती. असे सन्माननीय अपवाद सोडले तर बरेचसे उमेदवार आपल्या तुंबड्या भरणारे आणि भर लोकसभेत पैशाची बंडले आणण्यात काहीही गैर न वाटणारे!

>>सबब, या निवडणुकांशी निदान माझा तरी काही संबंध नाही. मी कुणालाही मतदान करू इच्छित नाही!
हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय झाला. उडदामाजी काळेगोरे काय निवडणार म्हणून कोणालाही मत देऊ नये असे वाटणे स्वाभाविक आहे.पण दुर्दैव असे की ११० कोटींच्या भारतात ५५० चांगले प्रामाणिक खासदार मिळू शकत नाहीत. काय करणार!

---विल्यम जेफरसन क्लिंटन

क्लिंटनराव,

भारताच्या राजकारणावर फार बारीक लक्ष ठेवून आहात! :-) ल्रेख आवडला. अर्थात यात "एस्टीमेशन" पेक्षा "गेस्टीमेशन" जास्त आहे असे वाटते. पण तरी देखील विश्लेषण आवडले.

आज भाजपा मधे असलेला तरूण नेतृत्वाचा अभाव हा त्यांच्या यशाच्या आड येणार आहे. काँग्रेसने एका अर्थी "अन इव्हेंटफूल" राज्य केले आहे. असे म्हणताना देखील अतिरेकी हल्ले, शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि आता आलेली मंदी याचा कितपत परीणाम होईल ते मे महीन्या अखेर समजेल.

बाकी या प्रतिसादाचे शिर्षक देण्यासाठी जरी मी महाभारत मालीकेच्या गीताचा वापर केला असला तरी त्यात निव्वळ "कथा है स्वार्थ की" इतकेच म्हणून थांबावेसे वाटत आहे. :-(

धन्यवाद!

भास्कर केन्डे's picture

3 Mar 2009 - 1:51 am | भास्कर केन्डे

यात "एस्टीमेशन" पेक्षा "गेस्टीमेशन" जास्त आहे असे वाटते. पण तरी देखील विश्लेषण आवडले.
-- लेख आवडला.

उ प्र मध्ये कालगीतुरा चांगलाच रंगणार आहे. त्याचे विश्लेषण आणखी खोलात जाऊन व खुसखुशीत करता आले असते. कल्याण सिंहांनी पुन्हा उडी मारल्याने किती धुराळा उडणार हे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

मला खरी उत्सुकता लागून आहे ती आपल्या महाराष्ट्राची. ठाकरे-पवार भेटीच्या गुळपीठात खरेच काही असेल तर सगळी समिकरणे बदलणार आहेत.

दक्षिण भारतातल्या विषेशतः कर्नाटक व आंध्रातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण तुम्ही कसे करणार याचीही उत्कंठा लागून आहे. पुढचा भाग येऊ द्या.

>>उ प्र मध्ये कालगीतुरा चांगलाच रंगणार आहे. त्याचे विश्लेषण आणखी खोलात जाऊन व खुसखुशीत करता आले असते.
मान्य. शक्य झाल्यास मला जेवढी माहिती आहे तेवढे राज्याच्या राजकारणाविषयी लिहायला आवडेल. मिपाच्या गावकर्‍यांची मते माझ्या मतांपेक्षा वेगळी असू शकतात.ती वाचायला नक्कीच आवडेल.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

क्लिंटन's picture

3 Mar 2009 - 3:19 pm | क्लिंटन

>>अर्थात यात "एस्टीमेशन" पेक्षा "गेस्टीमेशन" जास्त आहे असे वाटते.
नक्कीच हे गेस्टीमेशनच आहे. कारण एस्टीमेशन साठीचा विदा माझ्याकडे नाही.

बाकी अडवाणींचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होईल हे फारच कठिण दिसत आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

सुनील's picture

3 Mar 2009 - 7:48 am | सुनील

यात "एस्टीमेशन" पेक्षा "गेस्टीमेशन" जास्त आहे असे वाटते
या वर व्यक्त झालेल्या मतांशी सहमत. उत्कंठा आहे पुढील भाग वाचण्याची.

आणि हो, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

3 Mar 2009 - 7:52 am | सहज

निवडणुकीचे रंग भरायला सुरवात. :-)

अजुन येउ दे

आणि हो लवकर बरे व्हा.

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 8:48 am | छोटा डॉन

सर्वात प्रथम आमच्या आवडत्या विषयाला हात घातल्याबद्दल क्लिंटनरावांचे अभिनंदन व आभार ...
मी सुद्धा ह्याच विषयावर पण "महाराष्ट्र विधानसभेबद्दल" लेखमाला लिहीत आहे पण काही कारणामुळे मुड लागत नाहीये लिहण्यासाठी व अभ्यासासाठी.
असो.

अंदाज हे अंदाजच असतात, आपण फक्त मांडायचे, कारण ते बरोबर येणार का नाही हे आपल्या हातात नसते.

जम्मु काश्मिर, हरियाणा, उत्तराखंड आणि हि.प्र. बाबत आपल्याशी बहुतांशी सहमत आहे, बहुतेक निकाल असेच असतील , फारफार तर १-२ जागा इकडे तिकडे होऊ शकतात.

१. दिल्ली : मला असे वाटते की ह्यावेळीही दिल्ली काँग्रेस चक्क एकहाती जिंकणार, भाजपाची ताकदच नाही लढण्याची इथे. मात्र "बसपाचा हत्ती" इथे एखाद्यावेळी चमत्कार घडवुन १-२ सीट जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही महिन्यांपुर्वी मायावतींनी रामलिला मैदानावर घेतलेल्या जबरदस्त मेळाव्यातील गर्दी त्यांना इतका कॉन्फीडंस नक्की देऊ शकते. शिवाय ह्यावेळी मायावतीच्या मागे "इतर पार्ट्या" उभ्या राहण्याची शक्यता असल्याने मते तिकडे वळतील ...
ह्यावेळी मायावती ह्या पंतप्रधान पदासाठी डार्क हॉर्स असल्याने ह्या भावनेतुन त्यांना राजधानीतुन मतदान होऊ शकते, आज बसपाला उच्चवर्णीय पहिल्याइतके अस्पृष्य मानत नाहीत हे पाहणे रोचक ठरेल.
म्हणुन,
काँग्रेस : ४/५
भाजपा : ०/१
बसपा : १/२

२. राजस्थान :
जरी ह्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा साफ झोपले असले तरी लोकसभेसाठी असे होईल असे मला वाटत नाही, परिमाण वेगवेगळे आहेत. विधानसभेचा पराभव हा वसुंधराराजेंच्या छानछौकी, रईस, विक्षीप्त आणि एकसुरी कारभारामुळे तसेच आरक्षणाच्या मामल्यात गुज्जरांच्या असंतोषामुळे झाला असे मानायला हरकत नाही ...
पण त्याचवेळी भाजपाच्या खासदारांचे काम व इमेज ह्या गोष्टी गॄहीत धरल्या तर केवळ वसुंधराराजेंच्या पक्षाचा आहे म्हणुन लोक त्यांना नाकारतील असे वाटत नाही.
शेजारच्याच "गुजराथ"चे उदाहरण ह्यासाठी उपयुक्त आहे ..
त्यामुळे भाजपाला अजुन चान्स आहे असे वाटते
काँग्रेस : १३-१५
भाजपा : १० +/१
इतर : ०/१ ( बंडखोरी, इकडे हे अगदीच कॉमन आहे. )

३. उत्तर प्रदेश :
इथे सगळाच गोंधळ आहे तसे म्हणाल तर, पण तरीही आपल्याशी बहुतांश सहमत ...
"भाजपा" नक्की मार खाणार पण काही सज्जन व पुण्यवान अशी इमेज असलेल्या तसेच स्वबळावर निवडुन येण्याची ताकद असलेल्या नेत्यांमुळे ६-८ जागा नक्की जिंकु शकेल ...
"काँग्रेस" ला तसा जास्त चान्स नाही पण "राहुल गांधींचा" करिष्मा मात्र जर क्लिक झाला तर हा पक्ष १२-१५ जागा सुद्धा जिंकु शकतो. शिवाय जर ह्यांचे मायावतीच्या भितीने सपाशी समोरासमोर अथवा पडद्यामागे सेटिंग झाले तर हा आकडा अवघड नाही. चिन्हेही तशीच दिसत आहेत.
"सपा" ला मायावतीने पक्के कोंडीत पकडले आहे त्यामुळे ह्यांना जास्त संधी नाही. पण मागच्या विश्वासदर्शक ठरावाचा परिणाम म्हणुन काँग्रेसकडुन मायावतीविरोधात रसद मिळाल्यास व "अमरसिंगाचे" सेटिंग ह्यावेळीही चमकल्यास तसेच जातीच्या आधारे खच्चुन मतदान झाल्यास ह्या पक्षाने २०+ जागा जिंकल्यास आश्चर्य नको. सध्या मात्र १०+/-२ अशीच स्थीती आहे.
मुख्य आणि ताकदीचा पक्ष म्हणजे "बसपा", ह्यावेळी हत्तीची चाल मजबुत व धीराची आहे ह्यात शंका नाही. मायावती यांना ह्यावेळी पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असल्याने व इतर तिसरा मोर्चा त्याच उद्योगाला लागला असल्याने त्या सर्व ताकदीनिशी उतरतील ह्यात शंका नाही. सर्व गणिते जसे काही जात, विकास, पंतप्रधान ठरवण्यात महत्वाची भुमिका आदी जुळल्यास ह्या पक्षाने "६० जागा" जिंकल्यास आश्चर्य वाटु नये मात्र ह्यावेळी होणारे नुकसान हे सपा आणि भाजपाचे असेल. मात्र गणिते चुकल्यास व विरोधक एकवटल्यास ह्यांची मजल "४० जागा" पर्यंतच जाईल आणि तसाच विरोधकांचा प्रयत्न राहिल.
अजितसिंगाचे "लोकदल"२-३ जागा नक्की जिंकेल अशी खात्री आहे ...
राहता राहिले ते अपक्ष आणि फुटीर, ह्यातले बरेच जण बाहुबली असल्याने ह्यांचीही मजल "४-६ जागांपर्यंत" जाऊ शकते पण अर्थात हे तिकीटवाटपाच्या वेळी स्पष्ट होईल ...
महत्वाचे घटक आहेत ते जातेचे राजकारण, काँग्रेस आणि बसपा सेटिंग, मायावतींची घोडदौड आणि प्रस्थापित मतदारसघातले पक्षावर अवलंबुन नसलेले उमेदवार ...

बाकी, अजुन लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत ...

अवांतर :
ह्यावेळी काँग्रेस बहुसंख्य ठिकाणी "स्वबळावर" लढणार आहे, अशा परिस्थीतीत काय फरक पडेल ह्यावर राज्यनिहाय अंदाज येऊद्यात ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

क्लिंटन's picture

3 Mar 2009 - 3:24 pm | क्लिंटन

>>मी सुद्धा ह्याच विषयावर पण "महाराष्ट्र विधानसभेबद्दल" लेखमाला लिहीत आहे
वा. आपल्या लेखमालेची वाट बघत आहे. विधानसभा निवडणुकीवर लिहिण्यासाठी जिल्हापातळीवर अभ्यास हवा. तेव्हा विधानसभा निवडणुकीवर लिहिणे जास्त कठिण आहे असे वाटते.

>>अंदाज हे अंदाजच असतात, आपण फक्त मांडायचे, कारण ते बरोबर येणार का नाही हे आपल्या हातात नसते.
अगदी १००% मान्य.

>> मात्र "बसपाचा हत्ती" इथे एखाद्यावेळी चमत्कार घडवुन १-२ सीट जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बसपाचे दिल्लीतील वर्चस्व वाढत आहे. पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ७० पैकी २ जागा (बदरपूर आणि गोकलपूर) जिंकल्या. या दोन्ही जागा बाह्य दिल्लीतील आहेत. काही मतदारसंघांमध्ये पक्षाला ३०% पेक्षा जास्त मते मिळाली. तरीही २००९ मध्ये बसपा दिल्लीत लोकसभेची जागा जिंकेल असे मला स्वत:ला वाटत नाही. मायावतींच्या सभेला मोठी गर्दी झाली पण त्यातील सर्व लोक दिल्लीतील स्थानिकच लोक होते की उत्तर प्रदेश आणि हरियाणातून आलेलेही होते हा एक प्रश्न आहे. त्याच रामलीला मैदानात छगन भुजबळांनीही मोठी सभा घेऊन दाखवली आहे. पण त्यामुळे भुजबळ दिल्लीतून लोकसभेवर निवडून यायच्या स्थितीत आहेत असे नाही. अर्थात हा सगळा अंदाजांचा खेळ असल्यामुळे आपण सगळेच वेगवेगळे अंदाज लढवू शकतो.

>>(राजस्थानात)त्यामुळे भाजपाला अजुन चान्स आहे असे वाटते
हो भाजपला विधानसभा निवडणुकीत २०० पैकी ७८ जागा मिळाल्या म्हणजे पक्षाचा पूर्ण धुव्वा उडालेला नाही.१९९८ मध्ये भाजपला २०० पैकी अवघ्या ३३ जागा मिळाल्या होत्या तो मोठाच पराभव होता. आजही पक्षाकडे गिरिधारीलाल भार्गवांसारखे (कोटा) लोकप्रिय खासदार आहेत. १९८९ पासून ६ निवडणुका त्यांनी ओळीनी जिंकल्या आहेत. तसेच झालावाडमध्ये आणि आजुबाजूच्या भागात संस्थानिक कुटुंबातील असल्याचा फायदा वसुंधरापुत्र दुष्यंत सिंह यांना मिळेलच. तेव्हा भाजपाची पूर्ण वाताहत होईल असे नाही पण तरीही विधानसभा निवडणुकीतला कौल मोठ्या प्रमाणावर बदलेल असे मला तरी वाटत नाही.

>>(उत्तर प्रदेशात) "भाजपा" नक्की मार खाणार पण काही सज्जन व पुण्यवान अशी इमेज असलेल्या तसेच स्वबळावर निवडुन येण्याची ताकद >>असलेल्या नेत्यांमुळे ६-८ जागा नक्की जिंकु शकेल ...

मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे ६ जागा भाजप जिंकू शकेल असे मला वाटते. त्यात लालजी टंडन, संतोष गंगवार,मेनका गांधी आणि बुलंदशहरचे छत्रपाल सिंह यांचा समावेश असेल असे मला वाटते. अजित सिंहांच्या कृपेने राजनाथ सिंह पण निवडून येऊ शकतील असे मला वाटते. हथरसचे किशन सिंह दिलेर त्या भागात लोकप्रिय आहेत म्हणून ते आणि गोरखपूरमधून स्वामी आदित्यनाथ अशा ६ (किंवा ७) जागा भाजपाला मिळायला जड जाऊ नये असे वाटते.

>>(उत्तर प्रदेशात) काँग्रेस" ला तसा जास्त चान्स नाही पण "राहुल गांधींचा" करिष्मा मात्र जर क्लिक झाला तर हा पक्ष १२-१५ जागा सुद्धा जिंकु >> शकतो.
राहुल गांधींचा करिष्मा फारसा लाभदायक आहे असे वाटत नाही.कारण २००७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अवघ्या २५ जागा मिळाल्या होत्या. तरीही व्यक्तिगत लोकप्रियतेवर सोनिया गांधी (रायबरेली) आणि राहुल गांधी (अमेठी) या दोन जागा काँग्रेसला नक्की. त्याचबरोबर कानपूरमधून श्रीप्रकाश जयस्वाल, शाहजहानपूर मधून जतीन प्रसाद आणि झांसीमधून सुजान सिंह बुंदेला निवडून यायची शक्यता चांगलीच आहे. समाजवादी पक्षाने ६३ ठिकाणी आधीच आपले उमेदवार जाहिर केले आहेत. तेव्हा काँग्रेस पक्षाला जास्तीतजास्त १७ जागा समाजवादी पक्षाशी युती करून लढवता येतील. त्यात १२-१५ जागा पक्ष जिंकेल हे थोडे कठिण वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Mar 2009 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटन यांचा लेख आणि छोटा डॉन यांचा प्रतिसाद दोन्ही अभ्यासपूर्ण असल्यामुळे आवडले.

क्लिंटनराव, तब्येतीची काळजी घ्या. लवकरच तुमचा पाय पूर्ववत होईल अशी आशा!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

त्यावर क्लिंटनसाहेबानी लेख मालिका सुरु केल्यामुळे त्याचे आभार. आताच निवडणुकांचे अंदाज बांधणे घाईचे ठरेल. तरी पण वर व्यक्त केलेले अंदाज बरोबर येतिल असे आता तरी वाटते आहे. पंरतु बसपा मुळे भाजपाला मार बसेल का कॉग्रेसला हे पहाणे महत्वाचे ठरेल. उत्तरप्रदेश मध्ये सद्यातरी मायावतीची चलती आहे. पंरतु तिच्या कारभाराला लोक आताच वैतागले आहेत. त्यामुळे बसपा एकहाती ५० जागा मिळवेल असा अंदाज करणे धाडसाचे ठरेल.बसपा ३०ते ३५ मध्ये जागा मिळविल असे मला वाटते.
वेताळ

>>आताच निवडणुकांचे अंदाज बांधणे घाईचे ठरेल. तरी पण वर व्यक्त केलेले अंदाज बरोबर येतिल असे आता तरी वाटते आहे.
अर्थातच आताच्या परिस्थितीवरूनच हे अंदाज बांधले आहेत.परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली तर अंदाजही बदलावे लागतील. आणि शेवटी हे सर्व राजकिय घडामोडी बघून बांधलेले अंदाज आहेत.शेवटी मतदार राजाच कौल देणार.

>>उत्तरप्रदेश मध्ये सद्यातरी मायावतीची चलती आहे. पंरतु तिच्या कारभाराला लोक आताच वैतागले आहेत. त्यामुळे बसपा एकहाती ५० जागा >>मिळवेल असा अंदाज करणे धाडसाचे ठरेल.बसपा ३०ते ३५ मध्ये जागा मिळविल असे मला वाटते.

हो मायावतींच्या कारभाराविरूध्द कुरबुरी आहेतच. राज्य सरकारी सेवेतील अभियंत्याच्या हत्येनंतर त्या वाढीस लागल्या आहेत आणि मायावती आपले आणि कांशीराम किंवा आंबेडकर, शाहू महाराज यांचे पुतळे उभारण्यातच सर्व पैसा आणि वेळ खर्च करत आहेत हा एक तक्रारीचा सूर आहेच. तरीही दुर्दैवाने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातीपातीचे राजकारण जो यशस्वी करून दाखवेल तो जिंकतो.

१९९१ ते १९९८ या काळात भाजपचा आलेख उच्चीचा होता. त्यापूर्वीच्या काळात उच्चवर्णीय ब्राम्हण जनसंघ आणि काँग्रेस यात विभागलेला होता. तसेच कायस्थ आणि बनिया समाज जनसंघाचे पारंपारिक समर्थक होते. या जोरावर १०-१२% मते पक्ष मिळवत असे. पण १९९१ च्या निवडणुकीपासून कल्याण सिंहांच्या रूपाने पक्षाला मोठा नेता मिळाला. रामजन्मभूमी आंदोलनामुळे ब्राम्हणांची जवळपास एकगठ्ठा मते पक्षाला मिळाली. पारंपारिक बनिया आणि कायस्थ पक्षाच्या बरोबर होतेच. त्यात कल्याण सिंहांनी यादव सोडून इतर मागासवर्गीयांना पक्षाकडे आकर्षित केले. हे सोशल इंजिनियरींग पक्षाला जमले आणि ते निवडणुक जिंकायला पुरेसे ठरले.

१९९३ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाची ही एकगठ्ठा मते होतीच. पण समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती झाली. त्यामुळे यादव, मुस्लिम आणि दलित मते एकत्र आली.भाजपविरोधी मतांचे विभाजन सप-बसप युतीमुळे टळले आणि भाजपाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तरीही मतांची टक्केवारी वाढली होती.

१९९५ मध्ये मुलायम सिंह सरकारचा पाठिंबा बहुजन समाज पक्षाने काढून घेतला.त्यानंतर १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सप-बसप एकमेकांविरूध्द लढले.त्याचा फायदा भाजपला मिळाला. स्वत:ची मतांची टक्केवारी कायम ठेऊनही विरोधी मतांची विभागणी झाल्यामुळे भाजपने ८५ पैकी ५२ जागा (उत्तराखंड धरून) जिंकल्या. १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाची आणखी घसरण झाली आणि उच्चवर्णीय मते भाजपाला मिळून पक्षाने ८५ पैकी ६० जागा जिंकल्या.

१९९९ मध्ये काँग्रेस पक्ष सोनियांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने उभारी घेत होता.त्यामुळे काँग्रेस पक्षाने भाजपची हक्काची उच्चवर्णीय मते घेतली. तसेच भाजपने अयोध्या आंदोलन मागे ठेवल्यामुळे उच्चवर्णींयांचे एकगठ्ठा मतदान पक्षाला झाले नाही. त्यातच कल्याण सिंह नाराज असल्यामुळे त्यांनी स्वत: यादव सोडून इतर मागासवर्गीय मतदारांची मते पक्षापासून दूर नेली. त्या कारणावरून त्यांची नंतरच्या काळात हकालपट्टी पण झाली. पण जातींचे गणित चुकले आणि भाजपला मोठा फटका बसला.

पुढे रामप्रकाश गुप्तांसारखा निष्प्रभ मुख्यमंत्री भाजपने दिला आणि या सर्व जाती आपल्याबरोबर ठेवण्यात पक्षाला यश आले नाही.त्यातून भाजपाची घसरण चालू झाली आणि चालूच राहिली.

२००५ पासून मायावतींनी आपल्या हक्काच्या दलित मतांबरोबरच ब्राम्हण मते पण जोडली.हे २००७ च्या निवडणुकीत यशस्वी ठरले आणि बसपाने विजय मिळवला.

तेव्हा सांगायचा उद्देश म्हणजे राज्यात जातींचे राजकारण जो यशस्वीपणे खेळतो तो जिंकतो.मायावतींविरूध्द कुरबुरी असल्या तरी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही. उच्चवर्णीय मायावतींच्या कारभारावर नाखूष आहेत असे चित्र अजून तरी उभे नाही. मायावतींची मतपेढी सुरक्षित आहे. त्यात कल्याण सिंहांना बरोबर घेतल्यामुळे आणि अमेरिकेबरोबरच्या अणुकराराला मुलायम सिंहांनी पाठिंबा दिल्यामुळे काही मुस्लिम मते बसपा खेचू शकते. भदोही पोटनिवडणुकीत बसपचा बंडखोरीमुळे पराभव झाला. तेव्हा बंडखोरी रोखली तर बसप ५०-५५ जागा जिंकू शकेल असे मला स्वत:ला वाटते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Mar 2009 - 10:56 am | घाशीराम कोतवाल १.२

क्लिंटन यांचा लेख आणि छोटा डॉन यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत
उत्तर भारत मग पुर्व, पश्चीम आणी दक्षीण पण एक करा राव महाराष्ट्रासाठी एक अख्खा लेख येउ द्या
बास

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अमोल केळकर's picture

3 Mar 2009 - 1:04 pm | अमोल केळकर

साहेब,
आपण केलेले विश्लेषण आवडले. अभ्यासपुर्ण विवेचन
धन्यवाद;
अवांतर - महाराष्ट्राच्या ४८ जागांचे विश्लेषण अवश्य करा.

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा