माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी.
आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या सगळ्या इंटरप्रिटेशन्सना माझा तिरस्कार लागू आहेच.
पहिलं कारण अत्यंत साधं आहे. मला पोळीची चव आवडत नाही. इथे अनेक 'तव्यावरून-पोळी-ताटात' पंथातले लोक जागीच अस्वस्थ झाले असतील. त्यांना तसंच तडफडू दे. पण नाही आवडत मला पोळीची चव. फाशी देणार आहात? द्या. तरीही बाणेदारपणे हेच्च सांगीन. मला पोळी आवडत नाही. हरितक्रांतीनंतर शिरजोर होऊन बसलेल्या कणीक या फ्याशनेबल अर्वाचीन पदार्थाचा वास, पोत, चव, रंग यांतलं काहीच मला प्रिय नाही. कणीक भिजवायला घेतल्या-घेतल्या पाण्याचा स्पर्श झाल्यावर त्या पिठाला एक प्रकारचा उबदारपणा आणि मग सूक्ष्म बुळबुळीतपणा येतो, तिथपासून ते तव्यावरची पोळी उलटताना पोळीतून कणकेच्या वाफेचा एक भपकारा येतो, तिथपर्यंत. कोण ते, ग्लूटेन ग्लूटेन म्हणून ओरडतंय? वैज्ञानिक स्पष्टीकरण गेलं गाढवाच्या गावात. आत्ता-आत्ता साठच्या दशकापर्यंत ज्वारी-बाजरी-तांदुळाचा भाकरतुकडा खाऊन आपण ढेकर देत असू आणि अगदी आजही आपल्या पितरांना घालायला कणकेच्या बाट्या न भाजता भाताचे पिंडच शिजवतो हे पोळीमाहात्म्य गाणारे लोक विसरले असतील. मी नाही विसरलेय.
आप्ल्याला-आव्डत-नाई.
कबूल आहे. हा व्यक्तिगत चवीढवीचा-आवडीनिवडीचा मामला आहे. वास्तविक इतक्या क्षुल्लक नावडीमुळे मी पोळीला इतकं खलनायकी फूटेज दिलंही नसतं. पण ‘पोळी आवडते-केली-खाल्ली-ढेकर दिली-गपगुमान झोपलं’असं करून लोक थांबत नाहीत. ते पोळीचे देव्हारे माजवतात.
तुम्ही स्वतः कधी पोळी करून पाहिली आहे का? ‘आज जेवायला काय ऑस्ट्रेलिया आहे की इंडोनेशिया?’छाप थुतरक निष्क्रिय वरवंटा विनोदांचा वीट येऊन मी पौगंडावस्थेतच माझं बंडनिशाण फडकवलं होतं, ‘मला पोळी आव्डत नाही. मी कर्णार नाही.’ मला कुणी तसा पर्याय दिला, तर मी जन्मभर भात बोकाणून माझ्या कोस्टल एलिमेंटीय पूर्वजांना मोक्ष मिळवून देईन याची जाणीव 'आकाशवाणी'ला असल्यामुळे तिकडून कोणत्याही प्रकारचा अल्टिमेटम आला नाही. एवढ्यावरच माझे आणि पोळीचे संबंध थांबू शकले असते. पण एका मैत्रिणीच्या आईचं एक चतुर मत ऐकलं आणि मी थोडा पुनर्विचार करायला सुरुवात केली. तिचं म्हणणं होतं, "कुठे कुणाच्या स्वैपाकघरात मदतीला उभं राहायची वेळ आलीच, तर मी दणादण पोळ्या करून टाकते. मीठ कुठे गं, तिखट कुठे गं, तेल कुठे गं नि साखर कुठे गं, असल्या ताशी छप्पन्न विचारणा करायला अडून न बसता एकठोकी काम होतं आणि शिवाय 'केवढ्या पोळ्या लाटल्यात बाई!' असं एक हातासरशी गुडविल तयार होतं, जे नंतर वाढण्यासारखं भावखाऊ आणि तापदायक काम निघाल्यावर हक्कानं हॉलमध्ये पाय पसरून गप्पा ठोकायला नैतिक बळ पुरवतं." हे फारच बरोबर आणि सोयीस्कर होतं. त्यामुळे आपल्याला ही कृती शिकून टाकली पाहिजे, असं माझ्या मनानं घेतलं.
इथून पुढे रानावनांनी, काट्याकुट्यांनी, दर्याखोर्यांनी आणि श्वापदांनी भरलेला प्रदेश सुरू होतो. सावधान.
पहिला धडा: 'डिसाइड अॅज वी गो' हा पर्याय घेऊन कधीही कणीक भिजवायला घेऊ नये.
इतकी कणीक, इतकं पाणी, इतकं तेल, इतकं मीठ अशी सुनिश्चित, मोजणेबल प्रमाणं तय्यार हवीत. नपेक्षा 'मी कर्णार नाही, मला आव्डत नाही' मोडवर जाणं श्रेयस्कर. प्रमाणं नसली तर अनेक अभिजात आणि कंटाळवाणे गोंधळ होऊ शकतात. पीठ-पाणी-पीठ चिकट-पुन्हा पीठ-पीठ कोरडं-पुन्हा पाणी.... ही साखळी कितीही काळ चालू राहू शकते. कोणत्याही प्रकारचं पीठ भिजवणं या कृतीबद्दल क्रॉनिक नफरत पैदा होऊ शकते. तुम्ही पुरेसे निर्ढावलेले नसाल, तर घरी येणार्या भोचक मोलकरणीपासून आकाशवाणीपर्यंत अनेक जण तुमचं मनोधैर्य आणि ज्ञानपिपासा नेस्तनाबूत करू शकतात. हे टाळायचं असेल, तर प्रमाण वाजवून घ्यावं. मी हे शिकण्यासाठी माझ्या गिनिपिगांना मात्र प्लाष्टिकी ते इलाष्टिकी अशा सग्ग्ळ्या पोळ्यांतून जावं लागलं. असो. बाकी नुसतं प्रमाण कळून उपयोग नसतो. नक्की काय नि कसं केलं की पोळ्या 'मऊसूत, रेशमी, तलम' होतात त्याबद्दल बाजारात जे सल्ले मिळतात, ते सगळे ऐकायचे म्हटले तर आपण पोळ्या करणार आहोत, की काडेपेटीत राहू शकणारी नि अंगठीतून बाहेर निघू शकणारी ढाक्क्याच्या मलमलीची साडी विणणार आहोत अशा गोंधळात पडण्याचा धोका असतो. कुणी म्हणतं, आधी पाणी घालावं. कुणी म्हणतं, आधी तेल घालावं. कुणी साजूक तुपावर अडून असतं. एका बाईंनी सांगितलं होतं, की आधी पीठ चाळून घ्यावं. मग त्यावर चमच्या-चमच्यानं तेल सोडावं, थोडं मीठ भुरभुरवावं आणि मग सगळ्या पिठाच्या कणांना ते तेलमीठ लागेल अशा प्रकारे पीठ दोन्ही हातांनी नीट चोळून घ्यावं. मग लागेल तसतसं किंचित कोमट पाणी घालत.... होय. संताप होऊ शकतो. बरोबर आहे. तर - ते सल्ले फाट्यावर मारून आपली स्वतःची अशी एक क्रमवार कृती निश्चित करून घ्यावी आणि कणीक भिजवावी. गोळा म्हणता येईल, अशा प्रकारचं काहीही जमलं म्हणून खूश होऊन हात धुण्यातही अर्थ नसतो. तो गोळा भिजवून, दहा मिनिटं झाकून ठेवून, मग स्वच्छ धुऊन कोरडं केलेलं बोट त्या गोळ्याच्या पोटात खुपसलं असता - अ) जोर न लावता बोट सहज आत गेलं पाहिजे आ) बोटाला कणीक न चिकटता तेलाचा अंश आला पाहिजे. हे जमणं अत्यंत क्रिटिकल आहे, कारण त्यातल्या अपयशाचे परिणाम पोळी मरेस्तोवर मिरवणार असते. ते जमल्यावर पुढची पायरी. पोळ्या लाटणे.
दुसरा धडा: विनोद डोक्यात जाण्याच्याच लायकीचे असले, तरीही पोळी गोल होणंच मानसिक-शारीरिक-भौतिक-आर्थिक-सामाजिक अशा सर्व बाजूंनी सोयीस्कर असतं.
या पायरीवरही बाजारात अनेक सल्ले मिळतात. कणकेच्या गोळ्याची गोल लाटी करून ती थेट लाटावी; तिचा लंबगोल लाटून मग तिला चिमटा काढावा आणि दोन्ही अर्धुकांत तेलाचा ठिपका टेकवून ती अर्धुकं मिटवावीत व मग त्याची पोळी लाटावी; तिचा लहान गोल लाटून मग त्यावर तेल लावावं, अर्धी घडी करावी, पुन्हा तेल लावावं आणि चतकोर घडी करावी नि ही नानसदृश घडी लाटून गोल करावी (अगदीच वेळ जात नसेल, तेव्हा ही कृती करण्यासारखी आहे. टोकं वाढत वाढत समभुज-समद्विभुज-विषमभुज असे नाना प्रकारचे त्रिकोण मिळणं, भलत्या ठिकाणी पोळी जाड होऊन बसणं, भलत्या ठिकाणी ती अर्धपारदर्शक होऊन पोळपाट दिसू लागणं या सामान्य लिळा तर साधतातच. पण विशेष एकाग्रता साधलीत, तर आपल्या दिशेच्या पोळपाटाच्या अर्धवर्तुळाभोवती कबड्डीपटू फिरतात तसं गोलगोल फिरत पोळीला चुचकारण्यासारखा नाच-ग-घुमा खेळप्रकारही अनुभवायला मिळू शकतो. असो.); मधे तुपाचं बोट फिरवावं; तेल आणि पीठ यांची पेस्ट लावावी... होय, इथवर आल्यावर मला क्षणभर भीती चाटून गेली, की 'पटकन पंचामृताचं मिश्रण करून ते चटकन ब्रशनं हलक्या हातानं लावून घ्यावं' असंही कुणीतरी सांगायचं. पण मग मी सावरले आणि फाटा जवळ केला. लोकांना चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट... अशा कितीही घड्या घालून, त्यात तेल-तूप-मध-लोणी-मस्का-मेयॉनीज काय वाट्टेल ते घालून, त्याच्या पोळ्या लाटून, मग त्यांचे पदर सोडवण्याचे अश्लील चाळे करण्यासाठी वेळ असतो. आपण असल्या वायझेड उद्योगात पडायलाच हवं असं नाही. त्यामुळे मी गपचूप एक लाटी घेतली, भरपूर पीठ घेतलं आणि लाटणं फिरवलं. पोळी गोल झाली. इथे मी पहिला विजय मानला. सी, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट?! पण यानं होतं काय, की तुम्ही गाफील राहू शकता. तसं न होऊ देता लक्ष्यात ठेवायचं असतं, की एकच पोळी गोल होता उपयोगी नाहीय. शिवाय ती सगळीकडे एकसारख्या जाडीची असली पाहिजे. तिच्यावर इतकंही पीठ नको, की ती तव्यावर टाकताना आजूबाजूला खकाणा उडेल. पुढेही उरलेल्या पोळ्या याच दर्जाच्या नि आजच व्हाव्यात इतकाच वेळ आणि धीर आपल्याला या पोळीसाठी उपलब्ध आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या पोळीपर्यंत 'पोळी नीट लाटणे' या एकाच कृत्याचे पालक असलेल्या आपल्याला आता 'पोळी लाटणे' आणि 'पोळी भाजणे' ही जुळी कार्टी जोपासायची गोड कामगिरी करायची आहे. हे सगळं नीट करायचं असेल, तर पोळी गोल असणं सर्वाधिक रास्त आणि कमी कष्टाचं ठरतं.
तिसरा धडा: जगाची इंधनबचन गेली खड्ड्यात, तव्याखालची आच काही-केल्या कमी करायची नाही.
पोळी पापडासारखी कडक किंवा मैद्याच्या थंडगार रोटीसारखी चामट व्हायला नको असेल, तर व्यवस्थित तापलेल्या तव्यावर कमीत कमी वेळात पोळी भाजून होणं अत्यावश्यक असतं. उमेदवारीच्या काळात पोळपाटावरची पोळी गोल, आवश्यक तेवढी पातळ, एकसारख्या जाडीची, अगदीच लाज वाटणार नाही इतपत मोठ्या आकाराची आ.....णि पोळपाटाला वा लाटण्याला न चिकटणारी करण्यालाच मी पोपटाचा डोळा मानला होता. त्यामुळे झाली काय गंमत, की तव्यावर टाकलेल्या पोळीनं थेट तव्याशी काटा भिडवला. त्यांचं लफडं चांगलंच गरम होऊन धूर यायला लागल्यावर मला परिस्थितीचं भान आलं. पण तोवर पोळी मरून पडली होती. पुढच्या पोळीला हे टाळायचं म्हणून तव्यावर डोळा ठेवून बसले. परिणामी ती पोळी भाजून झाल्यावर तव्यावर वेकन्सी निर्माण झाली ती झालीच. तिकडे पुढची कच्ची पोळी पडेस्तोवर तवा इतका गरम झाला होता, की.... असो. तर टायमिंग इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स हिअर. गरम तव्यावरच पोळी भाजायची, चटकन भाजायची आणि ती भाजून होईस्तो खाली पोळपाटावर दुसरी पोळी तयार ठेवायची.
हे सगळं नीट जमलं, तर पोळीला काही भवितव्य असू शकतं.
आता मला सांगा, हे मुदलात किती लोकांनी करून जमवलेलं असतं? अर्धी लोकसंख्या तर सरळच बाद. या बाबतीत ते अत्यंत कुचकामीच असतात. उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला कदाचित स्वानुभव असू शकतो. पण तरीही पोळ्यांचं सांस्कृतिक महत्त्व हे लोक ज्या प्रमाणात वाढवून ठेवतात, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. उदाहरणार्थ -
मिथ क्रमांक एक: पोळीमुळे पोषण होतं.
हा काय फंडा आहे? पोळीमुळे होतं ते पोषण आणि इतर अन्नधान्यांमुळे काय उपोषण होतं काय? एकदा एका मित्रदाम्पत्याचा त्यांचा लेकीशी चाललेला संवाद ऐकला होता. त्या लेकराला भात जेवायचा होता. आणि दाम्पत्य पोळीवर अडून होतं. म्हणजे लक्ष्यात घ्या, भाजी विरुद्ध पिष्टमय पदार्थ, प्रथिनं विरुद्ध पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ विरुद्ध पिष्टमय पदार्थ - असं या लढ्याचं स्वरूप नव्हतं. एक पिष्टमय पदार्थ विरुद्ध दुसरा पिष्टमय पदार्थ असं ते होतं. काय लॉजिक आहे? तर पोळी खाल्ली की पाय दुखत नाहीत हे मित्राच्या सासूबाईंचं ठाम मत. आपण जगात मूल आणलं, तर आणि तेव्हा त्याला अन्नाच्या बाबतीत इतपत तरी निर्णयस्वातंत्र्य असेल अशी शपथ मी मनातल्या मनात वाहिली, ती तेव्हा. भलेही ते पोळी का खायला मागेना! मी ती देईन.
मिथ क्रमांक दोन: भातानं वजन वाढतं, पोळी खावी.
इथे मी भिवया उंचावून रोखून पाहते आहे असं कल्पावं. म्हणजे, हॅलो? सगळा दक्षिण भारत एव्हाना वजनवाढीचे रोग होऊन ठार नसता झाला अशानं? बासमती सोडून भाताच्या इतर जाती असतात, त्यात कोंडा असतो, चमक नसलेली आवृत्ती खाल्ली तर बी जीवनसत्त्व मिळतं, शिवाय आपण जे उष्मांक गिळतो ते जाळले नाहीत, तर कणकेचे गोळे गिळूनही वजन वाढतंच… वगैरे वगैरे सामान्यज्ञान वाटलं जात असतं तेव्हा हे लोक नक्की कुठल्या पिठाच्या चक्कीसमोर गव्हाचे डबे घेऊन उभे असतात?
मिथ क्रमांक तीन: पोळीभाजी हेच सर्वोत्तम अन्न आहे.
डोंबलाचं सर्वोत्तम अन्न. वैविध्य या गोष्टीची इतकी मारून ठेवणारं याच्याइतकं रटाळ, नीरस, कंटाळवाणं जेवण दुसरं कुठलं असूच शकत नाही. किंबहुना माझं तर असं मत आहे की अन्नाचा फार लळा मुदलातच लागू नये म्हणून शाळांमध्ये हेच जेवण देण्याची काळजी पहिल्यापासून घेत असावेत.
मिथ क्रमांक चार: पुरणपोळी हे मराठी अस्मितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
एकतर हे म्हणणार्या माणसानं ती स्वतः करावी आणि खावी. मला तितके कष्ट घेऊन चाखण्याइतकी ती आवडत नाही. ज्यांना आवडते, त्यांनी ती करावी आणि चाखावी. मेरा मूड बना, तो मैं भी चाखूंगी. पण माझ्यावर तुमच्या अस्मितेचं ओझं नको. माझं मराठीपण पुरणपोळीकडे ओलीस ठेवायला मी तयार नाही. मी मराठीच आहे. आणि मला नाहीच काही घेणंदेणं तुमच्या सांस्कृतिकदृष्ट्या बळंच उन्नत होऊन बसलेल्या पुरणपोळीशी. इट इज ओव्हररेटेड. जा, काय करायचं ते करा.
पुरणपोळीसारख्या मराठीच्या सांस्कृतिक गळवाला हा असा धसमुसळा धक्का लावल्यामुळे मला नोटीस बजावण्याची तयारी आता सुरू झाली असेलच. आन देव्. आपण काही तुमच्या पोळीला टाळी वाजवणार नाही.
प्रतिक्रिया
18 Oct 2017 - 12:30 am | रुपी
हा हा.. मस्त लिहिलंय.. तव्यावर मस्त खुसखुशीत भाजून ताटात आलेल्या पोळीसारखाच लेख :)
आ.न.
- कुठे कुणाच्या स्वैपाकघरात मदतीला उभं राहायची वेळ आलीच, तर दणादण पोळ्या करून टाकणारी ;)
18 Oct 2017 - 12:59 am | पिवळा डांबिस
अर्ध्या बाद लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून या लिखाणाला साष्टांग दंडवत!!
:)
18 Oct 2017 - 10:28 am | सविता००१
मेघना, प्रेमात पडलीये या लेखाच्या मी.. खरंच गं
काय बिनतोड युक्तिवाद आहे हा... केवळ उच्च
मला फार फार आवडलाय हा लेख. आणखीन काही सांगायचं म्हटलं तर शब्द संपले. :)
बादवे- तू पोळी नक्की उत्तम करत असणार ;)
18 Oct 2017 - 11:56 am | गुल्लू दादा
खूप छान लेख आहे. पण मला आईच्या हातच्या पोळ्या खूप आवडतात. दुसऱ्याच्या हातच्या खायचा कंटाळा येतो.
18 Oct 2017 - 12:47 pm | प्रभाकर पेठकर
लेखिकेच्या दुर्दैवाने तिचा हा वाचक पोळीप्रेमी आहे.
लहानपणच्या गुळतुप पोळी, तुपसाखर पोळी पासून आयुष्यात शिरकाव केलेल्या ह्या पोळीनामक पदार्थाच्या मी प्रेमातच पडलो आहे. लहानपणीच जर्रा... तिखट खायची सवय लागली तेंव्हा लोणचं पोळी आणि लोणचं जास्त तिखट लागलं तर दुधसाखर पोळी (पण दुधात कुस्करून हं. नुसती बुडवून नाही आवडत). पुरणपोळी पेक्षा संक्रांतीची गुळाची पोळी जास्त आवडते. त्या मागचं कारण पुरण पोळी खाताना ताटात पुरणाचा कचरा फार पसरतो म्हणून बाकी पुरणपोळीशी वैर असे कांही नाही. पोळीचच धाकट पण जरा जास्त चुणचुणीत भावंड म्हणजे पुरी हे जरा श्रीखंड, आमरस, शिरा वगैरे वगैरे श्रीमंतांच्या संगतीत रमलेलं. आमटी, चटणी, लोणच्याशी ह्याची घसट कमीच त्यातल्या त्यात आपली पातळी सोडून खाली आलंच तर बटाट्याच्या भाजी सोबत पाहिलंय ह्याला.
पोळीचीच चुलत-मावस भावंड म्हणजे ठेपले, डाळढोकळी, साटोर्या तर दूरची पंजाबातली धष्ट्पुष्ट भावंड म्हणजे परोठे आणि त्यांचे वैविध्य. साधा परोठा, भाजी भरलेला स्टफ्ड परोठा, चिझ परोठा, मुली का परोठा, कांदा परोठा, मेथी परोठा ही मंडळी शुद्ध तुपातली आणि दह्याशी तसेच, चवीला म्हणून, लोणच्याशी सलगी करणारी . तर भटूर्याचे छोल्यांशिवाय कोणाशी पटतच नाही. पण दोघेही मोहात पाडतातच.
गरम पोळीचे गुळतुप घालून केलेले लाडू मस्त लागतातच पण पोळी शिळी झाली (आणि ती तशी व्हावी म्हणून मी आईला आदल्या दिवशी जास्त पोळ्या करायला सांगायचो) की दुसर्या दिवशी पोळीचा कुस्करा, वर दही कींवा ताक घेऊन, पुन्हा 'पक्वान्न' म्हणून मिरवतो.
गरम तव्यावर भाजली जात असतानाचा खमंग वास हे एक अॅपिटायझरच म्हणावे. हा वास आला की नसलेली भूकही, नुसती उत्पन्न होत नाही तर, खवळते.
पोळी हा विषय शाळेतल्या गणितासारखा आहे. गणितं सुटत गेली तर विषयाची आवड निर्माण होते पण नाही सुटली तर त्याचाच 'गणोबा' होतो.
लेखातल्या मतांशी सहमत नसलो तरी मांडणी खुसखुशीत आहे. त्यामुळे लेख पोळी इतकाच चविष्ट झाला आहे.
18 Oct 2017 - 1:57 pm | नंदन
स्वतंत्र लेख म्हणूनही हा प्रतिसाद शोभून दिसेल. वाचूनच जीभ खवळली. (तेलपोळी आणि मालवणी वडे हेही सोबतीने आठवून गेले.)
18 Oct 2017 - 10:40 pm | रुपी
क्या बात है!
खरंच एक वेगळा लेख लिहाच पोळीप्रेमावर :)
18 Nov 2017 - 6:10 pm | शाली
अगदी!सहमतीसहमदीसहगदीस
18 Oct 2017 - 1:19 pm | गामा पैलवान
मेघना भुस्कुटे,
अगदी माझ्या आईची कथा (की व्यथा?) शब्दांत मांडलीये तुम्ही! :-)
आई म्हणते सकाळी उठल्यावर फ्रीज उघडून बाहेर काढायची ती कणीक. कणकेने दिवस सुरू होतो आणि रात्री फ्रीजमध्ये कणीक सरल्यावर संपतो. ज्या कोणी चपात्या शोधून काढल्या ना....! पण पुरणपोळ्या मात्र हौसेने करते.
आ.न.,
-गा.पै.
18 Oct 2017 - 2:03 pm | नंदन
खास मेघनाशैलीतला लेख!
कणीकरी? :)
18 Oct 2017 - 4:26 pm | सुचिता१
खुसखुशीत झालाय लेख !!!
पोळी सारख्या साध्या / सपक पाककृतीला अगदी खमंग फोडणी दिली आहे. मस्त .
18 Oct 2017 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
''तो गोळा भिजवून, दहा मिनिटं झाकून ठेवून, मग स्वच्छ धुऊन कोरडं केलेलं बोट त्या गोळ्याच्या पोटात खुपसलं असता..... ''
आता त्या कणकेच्या गोळ्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय लेखिकेला चैन पडणार नाही असे वाटलेच होते.
असो, पोळी पुराण खुसखुशीत झालं आहे.
-दिलीप बिरुटे
18 Oct 2017 - 6:01 pm | चौथा कोनाडा
मस्त लेख ! आवडला !
एक, एक पंच सही !
घरची खावी पोळी, अन या लेखासाठी वाजवावी टाळी !
18 Oct 2017 - 6:48 pm | अजया
दणदणीत, अफलातून ,एक नंबर, मेघना स्टाईल जबरदस्त लेख!
कुस्करा करण्यासाठी तरी पोळी करायला हवी ब्वा घरात :) पोळीभाजी हा तद्दन बोअर प्रकार आहेच !
18 Oct 2017 - 7:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
पोळीइतका नाही तर पुरणपोळीइतका खुसखुशीत लेख ! लेखिकेला पुरणपोळी पोळी आवडत नसली तरी हीच उपमा (साहित्यातली, स्वयंपाकघरातला नव्हे) देणार आम्ही... करा काय करायचं ते !
=)) =)) =))
18 Oct 2017 - 8:07 pm | स्वाती दिनेश
मेघना, पोळीपुराण छान !
स्वाती
19 Oct 2017 - 7:00 pm | मेघना भुस्कुटे
सर्वांचे मनापासून आभार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. :)
19 Oct 2017 - 7:17 pm | सुनील
लेख खुशखुशीत.
मूळात किनारपट्टीतील असल्यामुळे आम्हीदेखिल तसे भातखाऊच. अर्थात सध्या शहरी नोकरदार असल्यामुळे दिवसा पोळी-भाजी सोईस्कर पडते, तरीही भाताची हौस रात्री भागवून घेतोच!
19 Oct 2017 - 7:55 pm | अभ्या..
चर्हाट-ए-चपाती मस्तच
20 Oct 2017 - 2:04 pm | मनिमौ
वाक्यावाक्याशी सहमत आहे मी. पोळी हा अत्यंत बोअर पदार्थ आहे. लेख झक्कास लिवलाय
20 Oct 2017 - 2:37 pm | पगला गजोधर
.
.
या वाक्यासाठी लेखिकेला १+
20 Oct 2017 - 2:48 pm | धर्मराजमुटके
लै भारी ! दिवाळीनिमित्त मेघनातैने जालीय संन्यास सोडला हे ही नसे थोडके. आयुष्यभर आईच्या आणि बायकोच्या जीवावर गिळल्यावर आता कुठे स्वयंपाक करायला शिकतो आहे. पण चपातीच्या नादी लागायची हिंमत होत नाहीये अजुन. सध्या ज्वारी / बाजरी ची भाकर शिकण्याचे काम चालू आहे. चपातीच्या तुलनेत भाकर करणे सोपे आहे असे मला वाटते. शिवाय एक दोन भाकरी जास्त करायच्या आणि दुसर्या दिवशी मिक्सरमधे दळून, मिरची कोथींबिर टाकून नाश्त्यासाठी गरम करुन खायचे. हा जो अप्रतिम पदार्थ बनतो त्याची चव कोणत्याही पंचपक्वान्नाच्या तोंडात मारावी अशी असते. :)
ता. क. : आई आणी बायको अजुनही स्वयंपाक करतात.
20 Oct 2017 - 7:12 pm | बाजीप्रभू
मेघनाताई मस्त खुसखुशीत लेख... खूप आवडला..
पण एक राहिलं,
"चपाती फुगली पाहिजेना ताई"... नाही फुगली तर "मेरिट" हुकलं समजा.
असो,
लेख वाचून जुने दिवस आठवले,
दहावर्षांपूर्वी २ वर्षांसाठी झुरिकला बदली झाली होती... दोन तीन धटिंगण अजून होते जोडीला... सलग आठवडाभर ब्रेड खाऊन आऊट गोइंग बंद झालं.. इन कमिंगचं कर्ज गळ्यापर्यंत आलं होतं.... सगळा डिस्टर्बन्स झाला होता... मग आकाशवाणी झाली "फायबरचं नेटवर्क असेल तर इन कमिंग-आऊट गोइंग नीट चालेल.. थोडक्यात चपाती खा नाहीतर मृत्यू अटळ"... जीवाशी गाठ होती म्हणून भगीरथ प्रयत्न करून चपात्या बनवायला शिकलो.... तुम्ही लिहिलेल्या सगळ्या युक्त्या आणि प्रोसेस सेम टू सेम... फरक एव्हढाच कि चपात्या गोल होण्यासाठी मी स्वतःच चपाती भोवती गोल-गोल फिरायचो.. पण एक मात्र मान्य करायला हवं कि चपात्या येत असतील तर पंचक्रोशीत जबरदस्त मान मिळतो ... मित्र स्वतःहून बूट पॉलिश करून देतात.
हा १० वर्षांपूर्वीचा छोटासा व्हिडीओ...
25 Oct 2017 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हहपुवा झाली. व्हिडियोही पाहिला. छान.
-दिलीप बिरुटे
20 Oct 2017 - 8:03 pm | चष्मेबद्दूर
लोकांना चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ट... अशा कितीही घड्या घालून, त्यात तेल-तूप-मध-लोणी-मस्का-मेयॉनीज काय वाट्टेल ते घालून, त्याच्या पोळ्या लाटून, मग त्यांचे पदर सोडवण्याचे अश्लील चाळे करण्यासाठी वेळ असतो. ।।।।।।
भ न्ना ट। लिहिलंय. आणि अगदी सहमत आहे तुमच्या भावनेशी. "तुला पोळ्या छान लाटता येतात, पण मला किनई पोळीला डाग पडलेले आवडत नाहीत... " अशा कुचकट कमेंटा जीवघेण्या असतात.
तिरकस विनोदी अंगाने लेख छानच झालाय. दिवाळी अंकाच्या वाचनाची सुरवात छान झाली.
20 Oct 2017 - 8:50 pm | तिमा
मेघनाने नेहमीप्रमाणे खास स्टाईलमधे पोळ्यांचे भुस्काट पाडले आहे. लेख अत्यंत आवडण्यांत आलेला आहे.
एकेकाळी पोळीभक्त असलेला मी, आता पार्शियल डेंचर लावायच्या कंटाळ्याने भाताच्या आश्रयाला आलो आहे. तरी पुरणपोळीचा मोह अजून सुटलेला नाही. पण त्या तर आता आयत्या मिळतात आणि दूध घालून लुबलुबीत करुन खाताही येतात. तसाही मी 'वाईट अर्धा' याच कॅटेगरीतला असल्याने स्वतः पोळ्या करण्याची वेळ कधीच आली नाही आणि येणारही नाही. त्यामुळे वेळीअवेळी, इच्छा झाली तर 'पोळा' साजरा करण्याचे माझे स्वातंत्र्य अबाधित आहे.
21 Oct 2017 - 2:41 am | शब्दबम्बाळ
झक्कास लिहिलंय!
आपल्याला बुआ पुरणपोळ्या आवडत नाहीत त्यामुळे आईच्या मागे कधी भुणभुण नसायची.. तुला आवडत असतील तरच कर सांगून पण, केवळ "सोशल प्रेशर" पायी सणासुदीला हा प्रकार तिला करावा लागायचा आणि मला खायला लागायचा!
पण गरम गरम चपाती मात्र आवडायची त्यात पण लेयर असले पाहिजेत हा! :P
इतकी साधी सरळ वाटणारी चपाती करायला किती ताप होतो हे मात्र जर्मनीमध्ये राहायला लागल्यावर कळालं! बाकी कुठलीही भाजी/आमटी १५मिनिटात तयार करायचो पण चपातीने जीव घाईला आला... आता माझं कसे होणार हा विचार करत असताना माझ्या आयुष्यात टॉर्टिला नामक गोष्ट आली.
दिसायला चपाती सारखीच आणि "होल व्हीट" वगैरे लिहिलेलं असल्यामुळे तब्येतीला चांगलीच असेल असे मनाचे समाधान करून घरी आणून गरमागरम भाजीसोबत खाल्ली. अगदीच चपातीसारखी नाही लागली पण वाईट पण नाही लागली!
आणि तेव्हा पासून चपातीच्या भानगडीत पडलो नाही!
आता पोर्टलँडमध्येही आल्या आल्या सुपरमार्केट मधून टॉर्टिला आणून ठेवलीये! :)

पण या चपातीपायी बायकांना किती कष्ट करावे लागतात त्याची तरी जाणीव झाली!!
21 Oct 2017 - 8:32 am | चामुंडराय
टॉर्टिया, लावाश किंवा पिट्याचे रॅप्स पेक्षा आपल्या पोळी / चपाती / रुमाली रोटी च्या रॅप्स मध्ये मला खूप मोठे पोटेन्शिअल दिसते.
गरज आहे फक्त वेगेवेगळे प्रयोग करून आकर्षक प्रेझेन्टेशन आणि मार्केटिंग करायची. हिअर ऑर टू गो स्टाईल प्रमाणे पोळी रॅप्स हे फूड टू गो असे मार्केट करता येतील. पोळी-भाजी ला नाक मुरडणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय होऊ शकतो.
नुसते रॅप्स च नाही तर रोल्स, सँडविचेस, पनीनी, सब, बरिटो देखील पोळीचे बनवता येतील. त्याचप्रमाणे पोळी पासून थिन क्रस्ट पिझ्झा, कॅलझोन करता येतील.
एव्हढेच नव्हे तर वरणफळं हे पिस्ता आणि रॅविओली / न्योकी ला यशस्वी टक्कर देतील.
वेगवेगळ्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी वापरून आणि नॉन-व्हेज वापरून पोळीला वरील पैकी एखाद्या स्वरूपात सादर करता येईल.
पोळी हि भाजी किंवा रस्याबरोबर स्कुपिंग करून खाता येईल (पाशात्य पद्धतीप्रमाणे ) अशा प्रकारे सादर करावी लागेल.
पुरण पोळी, गुळ पोळी, खवा पोळी इत्यादी प्रकार अभारतीयांना नक्कीच आवडतील.
मी स्वतः पोळी कापून तिचे नूडल्स केले आहेत आणि बारीक तुकडे कापून एअर फ्रायर मध्ये दोन ते तीन मिनिटांमध्ये सेरिअल्स बनवले आहेत.
इति पोळी-ए-पुरण
21 Oct 2017 - 8:32 am | चामुंडराय
टॉर्टिया, लावाश किंवा पिट्याचे रॅप्स पेक्षा आपल्या पोळी / चपाती / रुमाली रोटी च्या रॅप्स मध्ये मला खूप मोठे पोटेन्शिअल दिसते.
गरज आहे फक्त वेगेवेगळे प्रयोग करून आकर्षक प्रेझेन्टेशन आणि मार्केटिंग करायची. हिअर ऑर टू गो स्टाईल प्रमाणे पोळी रॅप्स हे फूड टू गो असे मार्केट करता येतील. पोळी-भाजी ला नाक मुरडणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय होऊ शकतो.
नुसते रॅप्स च नाही तर रोल्स, सँडविचेस, पनीनी, सब, बरिटो देखील पोळीचे बनवता येतील. त्याचप्रमाणे पोळी पासून थिन क्रस्ट पिझ्झा, कॅलझोन करता येतील.
एव्हढेच नव्हे तर वरणफळं हे पिस्ता आणि रॅविओली / न्योकी ला यशस्वी टक्कर देतील.
वेगवेगळ्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी वापरून आणि नॉन-व्हेज वापरून पोळीला वरील पैकी एखाद्या स्वरूपात सादर करता येईल.
पोळी हि भाजी किंवा रस्याबरोबर स्कुपिंग करून खाता येईल (पाशात्य पद्धतीप्रमाणे ) अशा प्रकारे सादर करावी लागेल.
पुरण पोळी, गुळ पोळी, खवा पोळी इत्यादी प्रकार अभारतीयांना नक्कीच आवडतील.
मी स्वतः पोळी कापून तिचे नूडल्स केले आहेत आणि बारीक तुकडे कापून एअर फ्रायर मध्ये दोन ते तीन मिनिटांमध्ये सेरिअल्स बनवले आहेत.
इति पोळी-ए-पुरण
24 Oct 2017 - 10:08 am | राही
तसे पोळी/चपाती हा बेस घेऊन त्यावर भाज्यांची वेगवेगळी मिश्रणे पसरून आणि चीझ वगैरे किसून वर एक पातळ पोळी लावून हा सगळा बारदाना अतिकौशल्याने परतून वगैरे कलाकुसर आम्ही करतो हो कधीतरी ऐश म्हणून आणि मूड आला तर .
पण लेख आवडला म्हणून सहमतीची प्रतिक्रिया जरा जास्तच रसायन घालून लिहिली.
21 Oct 2017 - 12:58 pm | सस्नेह
मस्त खुसखुशीत लेख !
पोळ्या आता पोळ्यावालीला शिकवण्या इतक्या छान हातात बसल्यायत खर्या, पण खायला भाकरीच आवडतात आधीपासून !
21 Oct 2017 - 7:25 pm | हेम
जे म्हणतायत पोळी आवडते म्हणून त्यांना आठवडाभर तरी कणिक मळण्यापासून पोळ्या करायला सांगायला हवं. एकदम आमच्या मनातलं मोजक्या शब्दात मांडलय.. नुसत्या पोळ्यानी जेवणाचा फील येत नाही, पेक्षा ती नसली तरी चालते. भाताशिवाय जेवण नाही यावर माझे बाबा व मी दोघांचं शिक्कामोर्तब आहे.
धन्स मेघनाताय ..
23 Oct 2017 - 8:27 am | मेघना भुस्कुटे
सगळ्या पोळी-हेटर्सचे आणि पोळी-प्रेमींचे प्रतिसादासाठी आभार. ज्यांना पोळी आवडत नाही, त्यांचं ठीकच आहे. आवडते, त्यांनी ती लवकरात लवकर शिकून घ्यावी, हा भोचक सल्ला! ;-)
23 Oct 2017 - 12:38 pm | गामा पैलवान
सल्ला मस्तंय. फक्त अगोदर जगभरातले नकाशे शिकून घ्या! ;-)
-गा.पै.
23 Oct 2017 - 4:26 pm | मेघना भुस्कुटे
ते मला येतातच. ते ज्ञान माझ्या गिनिपिगांना व्हावं अशी मात्र माझी इच्छा नाही. :ड
23 Oct 2017 - 10:22 pm | गामा पैलवान
अहो पण त्यातंच तर खरी मजा आहे ना! गिनिपिगांना ज्ञान प्रदान करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आकाराची चपाती ब्राऊन रंगाची गरमागरम करायची. तर केनियाची एकदम काळीकुट्ट. सैबेरियाची थंडगार आणि इंग्लंडची थोडी उबदार. पाकिस्तानची बंदुकीच्या गोळ्यांना दाद देणार नाही इतकी जाड, तर बांगलादेशाची सुंदरबनीय पाण्यासारखी खारटढाण. अशा चपात्या खाल्ल्याने गिरवलेले गेलेले धडे गिनीपिगं आयुष्यात विसरणार नाहीत.
बघा जमतंय का! ;-)
-गा.पै.
24 Oct 2017 - 9:58 am | मेघना भुस्कुटे
तुमचे नकाशे पक्के झालेले दिसतात. असाच ज्ञानाचा वारसा पुढे चालवा. माझे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी... ;-)
24 Oct 2017 - 6:47 pm | सुबोध खरे
नकाशे करायची गरज नाही.
मी पहिल्यांदा पोळ्या लाटायला घेतल्या तेंव्हा माझी मुले कुतूहलाने पाहत होती. मी शांतपणे पोळी लाटली त्यावर एक ताटली टाकली आणि कडेची कणिक कापून परत कणकेच्या गोळ्यात टाकली. त्यामुळे पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल पोळी पाहून मुलांना मजा वाटली त्यानंतर त्याचे अर्ध चंद्र किंवा पोळीच्या मध्यभागी वर दोन आणि खाली एक जरा मोठे भोक पडून स्माइलीची पोळी करून मुलांना वाढली तेंव्हा त्यांना बापाबद्दल काय अभिमान वाटला होता. अर्थात हे चोचले रोज करणे शक्य नाही आणि पोळ्यांची बाई तर नक्कीच करणार नाही.
घरात मटकी किंवा मुगाची उसळ असेल तर पोळीच्या आत मेयॉनीज लावून फ्रँकी मसाला आणि चीज टाकून पोळीची फ्रँकी करून देतो.( आता मुले स्वतः फ्रँकी करून घेतात) यामुळे नुसती भाजी पोळी मध्ये भाजी कमी खाल्ली जाते तीच फ्रँकी मध्ये उसळ दुप्पट प्रमाणात खाल्ली जाते.
23 Oct 2017 - 12:11 pm | सूड
भारीच!!
स्वगत: पोळ्या, पुरणपोळ्या, खव्याच्या पोळ्या नुसत्याच करण्यात नव्हे तर करुन खाऊ घालण्यात जे सुख आहे ते तुम क्या ज्यानो भातबकाणे बाई!!
23 Oct 2017 - 1:16 pm | जागु
मेघना अग एकदम खुसखुशीत लेख झाला आहे.खुप आवडला. ऑफिसमध्ये वाचून हसू आवरतेय.
23 Oct 2017 - 4:27 pm | मेघना भुस्कुटे
करून घालण्यातल्या सुखावर मी पाणी सोडायला तयारे मोठ्या मनानी!
23 Oct 2017 - 4:33 pm | विशाखा राऊत
पोळीसारखाच मस्त खुसखुशीत लेख. आवडला
23 Oct 2017 - 6:50 pm | राही
या आधी लिहिला होता प्रतिसाद. सेंड केला गेला नाहीसं दिसतंय.
तर लेख इतका पटला, इतका पटला.... टाळ्या वाजवून हात दुखले. लेखाशी शतप्रतिशत सहमत. कितीही चांगली बनली असो पोळी घशाखाली उतरत नाही. तो ग्लुटेनचा चिकटपणा वात आणतो. खपलीसुद्धा आणून पाहिला. पोळी/ चपातीची चव आणि पोत ( टेक्सचर ) कशाशीही जुळत नाही. कोरड्या भाजीशी जशास तसे म्हणून अधिकच कोरडी होते आणि आमटीशी चिकट पीठ. अगदी श्रीखंड आमरसाशीही ती एकरूप होऊ शकत नाही. चिकोल्या, वरणफळं म्हणजे नुसता चिखल.भात बिचारा दही, ताक, कढी, वरण कशाशीही मिळतंजुळतं घेतो. कुणाच्याही रंगात रंगून जातो. कशातही समरसतो.
अशाच टाळ्या तुमच्या एका पोह्यांवरच्या लेखाला दिल्या होत्या. मऊ पोह्यांमध्ये शेंगदाणे घालून ते कचाकच चावायला लावणाऱ्या सुग्रणींचा उद्धार केला होतात त्यात . आता बेसनाच्या लाडवांना बेदाणे चिकटवणाऱ्या साटोपचंद्रिकांचा एकदा उद्धार व्हावा ही कळकळीची विनंती.
लेख आवडला हेवेसांन.
23 Oct 2017 - 8:27 pm | आनंदयात्री
चकोल्या वरणफळांचा चिखल होत असेल तर त्यांच्या रेसिपीजचा युट्युबिय रिफ्रेशर कदाचित मदत करू शकेल.
बाकी पोहे बिना शेंगदाण्यांचे (ना कम ना जादा फ्राय झालेले) खायला आपण नेपाळी किंवा सुदाम्याचे वंशज आहोत का? असा प्रश्न मनात येऊन गेला (इथे विचारात नाहीये).
बाकी, मेघनाचे लेखन आवडतेच. "...उर्फ सुगरणीचा सल्ला"तले बहुतेक सगळे लेख वाचलेत आणि आवडलेत. पोळी हे दुसरे प्रेम असूनही त्यावरची अशी तिखट टीका सहन करण्याची छाती त्यात ठासून भरलेल्या विनोदमूल्याने झाली!
24 Oct 2017 - 2:44 am | राही
पाककृती चिखलसदृश होते असे नव्हे, तर जिभेला तिचा पोत (टेक्सचर) चिखलसदृश जाणवतो.
निदान महाराष्ट्राततरी पोह्यांचा उगम भात पिकवणाऱ्या कोंकणातला असावा. आणि कोंकणात शेंगदाण्याच्या पिकाची परंपरा अजिबातच नव्हती. पोहे पुण्यात अथवा घाटावर आले आणि शेंगदाणे पोह्यांत घुसले.
अर्थात मुळात शेंगदाणा हे पीक भारतीय उपखंडातले आहे किंवा नाही इथपर्यंतही मागे जायला माझी हरकत नाही.
24 Oct 2017 - 7:19 am | पैसा
घरी पोहे (कांदेपोहे) करताना आम्ही शेंगदाणे कधीच घालत नाही. मात्र आता अगदी सिंधुदुर्गात किंवा इतर ठिकाणी हॉटेलात तसे शेंगदाणे व शेव घालून पोह्यांची मूळ चव घालवतात.
कोंकणात पूर्वापार शेंगदाणे उपासाचे पदार्थ किंवा लसणीचे तिखट, चिवडा असल्या संकीर्ण पदार्थात मर्यादित प्रमाणात वापरतात. कोंकणात शेंगदाणे हा 'उधळायचा' किंवा सढळ हस्ते वापरायचा पदार्थ नव्हता.
24 Oct 2017 - 9:53 am | मेघना भुस्कुटे
लेखातला टारगट सूर सोडून थोडं सिर्यसली बोलायचं तर, भात आणि पोहे यांच्या उगमप्रदेशाबद्दल माझंही मत राहींसारखंच आहे. कोकणात नि कर्नाटकात पोहे अगदी रोजच्या खाण्यापिण्याचा भाग असलेले दिसतात. पुढे ते भारतात सर्वदूर पसरले असणार. पण मुळातून ते तांदूळप्रधान प्रदेशातून आले असावेत. शेंगदाण्यांचं मात्र तसं नाही. पुन्हा राही म्हणताहेत, तसे ते भारतातच उशिरा अवतरले असतील ही एक शक्यता आहेच. पण ते कोकणातल्या लोकांच्या उत्पादनाचा भाग कधीच नव्हते. माझ्या आईच्या वडलांचं एक लहानसं किराणामालाचं दुकान होतं, ते अगदी अलीकडच्या कोकणात. खेडजवळ. तिथेही वाल आणि कुळीथ यांखेरीज इतर बरीचशी कडधान्यं, गहू, शेंगदाणा, ज्वारी-बाजरी इत्यादी गोष्टी देशावरून अगदी अलीकडेअलीकडेपर्यंत आणवल्या जात. याउलट नाचणी, तांदूळ, नारळ, कोकमं, आंबे-फणस, हळद, वाल, कुळीथ... इत्यादी गोष्टी भरपूर आणि सहज उपलब्ध असणार्या. त्यामुळे असेल कदाचित, कोकणातल्या बहुतांश पदार्थांत नारळ नि तांदूळ वरचेवर वापरलेला दिसतो. रोजच्या जेवणात भात नि तांदूळ वा नाचणीची भाकरी. पोळी मात्र सणासुदीला. अनेक समाजांत पोळी हे पुरणपोळीचंच संबोधन असतं. एरवी खायची ती चपाती. तसेच शेंगदाणेही अगदी कमी पारंपरिक कोकणी पदार्थांचा भाग असतात. उपासाच्या पदार्थांत काय ते दाण्याचं कूट असतं. एरवी ज्यात-त्यात नारळ. (एकदा मी हौसेनं रांधलेल्या पालक पनीरवर आमच्या आजीनं ओलं खोबरं शिवरलं होतं. 'एवढी लाडाकौतुकाची भाजी केलीस, तिला नारळ नको?' असा निरागस सवाल! तिच्या दृष्टीनं ते बरोबरच होतं!)
बाकी मला शेंगदाणे आवडत नाहीत असं नाही हो. दाणे-लसूण-मिरच्या या त्रिकूटाचा योग्य वापर केला कुणी, तर मी एखाद्दिवस विद्या बालनलाही 'बरी दिसत्ये की!' म्हणायला कमी करणार नाही. एकवेळ अंबाडीची, अळूची, ताकातली चाकवताची भाजी, चिवडा... यांत मी दाणे सहन करीन. पण माझ्या प्राणप्रिय पोह्यात मात्र दाण्यांनी मध्ये येऊ नये असं माझं माझ्या परंपरेला जागणारं कट्टर मत आहे. आता आहे, त्याला काय करणार!
24 Oct 2017 - 10:22 am | राही
१०० रेझ्ड टु १०० इतक्या वेळा सहमती. पोळी म्हणजे पुरणपोळी, किंवा काही खास गोडाचा प्रकार हे मीही ऐकले आहे. " जावई येणार आहेत तर काय पोळी करायची?" असाही प्रश्न ऐकला आहे. कोंकणातला शेंगदाणे आणि गहू यांचा मुबलक वापर गेल्या साठ सत्तर वर्षातला आहे. (आणि दारात एक तरी काजूचे झाड आणि आगरात माड असताना शेंगदाणे कोण कशाला वापरेल?)
24 Oct 2017 - 11:22 am | आदूबाळ
अवांतर: विद्या बालन बरी दिसतेच. काही सिनेमांत ती बरीच दिसते, पण त्यातही ती बरी दिसते.
24 Oct 2017 - 11:37 am | मेघना भुस्कुटे
हॉय. एक फरहान अख्तरसोबतचा सिनेमा बघायला गेल्याची भयाण आठवण आहे. त्यात ती इतकी होती, की 'ये मेरा दिल'मधली करीनाही शिडशिडीत वाटायला लागलेली.