योग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
16 Oct 2017 - 11:15 pm

योग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना

योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)

योग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर

४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई

३० सप्टेंबर. आराम चांगला झाला. पहाटे लवकर जाग आली. जवळूनच निरा नदी वाहते आहे! काल रात्री लक्षात आलं नव्हतं, पण आता नदीचा निनाद ऐकू येतोय! मी लवकर उठल्यामुळे घरातले सगळेच लवकर उठले. आज दसरा आहे! आज माझी पहिली परीक्षा आहे. सुरुवातीला वाटलं होतं की, धुकं असेल तर थोडं उशीरा निघावं लागेल. पण वेळेवर म्हणजे सव्वा सहाला निघू शकलो. मित्र दत्ताभाऊंनी वाईतला एक लॉज सांगितला आहे. तिथेच आज मुक्काम करेन. ताईंनी पहाटे उठून मला शिरा करून दिला. भूक नाहीय, पण तरी तो खाऊन निघालो. सायकलिंगसाठी आदर्श वातावरण आहे! पाऊस थांबलाय, पण पावसाचं वातावरण आहे!

भोरमधून निघाल्यापासूनच हलका चढ सुरू झाला. हळु हळु दूरवर दिसणारे डोंगर जवळ येत आहेत. मराठा इतिहासाच्या दृष्टीने रोहिडेश्वरचा किल्ला महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांनी इथेच स्वराज्य प्रतिज्ञा घेतली होती! त्याच रोहिड्याजवळून हा रस्ता जातो आहे. किंचितसं दडपण आहे येणा-या घाटाचं. हा पहिला घाट मला "पास" करेल ना? हलका चढ दहा किलोमीटरपर्यंत आहे आणि मग सहा किलोमीटरचा घाट. रस्ता एकदम चकाचक आहे. पावसाळा होऊन गेल्यावरही मस्त आहे. अगदी छोटे छोटे गाव लागत आहेत. एका गावातून दूरवरून गाणं ऐकू येतंय. ओळखीचं आहे, पण कळत नाहीय. जवळ गेल्यावर कळालं-

हृदयात वाजे समथिंग समथिंग
सारे जग वाटे हॅपनिंग
असतो सदा मी असा ड्रिमिंग!!

परफेक्ट गाणं! वा! अजूनच मस्त वाटतंय! सगळ्या गावांमध्ये नवरात्रीचं वातावरण आहे!


रोहिडेश्वरचं पहिलं दर्शन!

दहा किलोमीटर झाल्यानंतर रस्ता वळला आणि घाट सुरू झाला. पहिल्याच वळणावर तीव्र चढ आला. अर्थात् १-१ गेअरवर तितकं कठीण गेलं नाही. पण एकदा जरा जोर लावावा लागला. पुढे मग चढ सुरू राहिला, पण तितका तीव्र नाही आहे. पहिलं वळण असल्याने जास्त तीव्र होता बहुतेक. नजारे अतिशय जोरदार आहेत! आरामात पुढे जातोय. लवकरच जाणवलं की, काही अंतर तर मी १-१ ऐवजी १-२ वरही जाऊ शकतोय. फोटो घेत घेत पुढे जात राहिलो. अतिशय रोमांचक नजारे! कसं सांगू!


वर चढणारा रस्ता!


मागे वळून बघताना

काहीच अडचण येत नाहीय. ढग असल्यामुळे ऊनही नाहीय. आता मागे वळून बघितलं तर दूर खाली गावं दिसत आहेत. घाटाचा पुढचा टप्पा समोर दिसतोय. एक- दोनदा परत १-१ गेअरवर यावं लागलं. पण बाकी आरामात जातोय. इथे कोणतंच हॉटेल नाहीय. म्हणून त्या अपेक्षेनेच घाटाच्या आधी बिस्कीट व चिक्की खाल्ली होती. ताईंनी सकाळी उठवून बनवलेल्या शि-यामुळेच मला अजूनही फ्रेश वाटत आहे. नाही तर अडचणच झाली असती. आरामात घाट पूर्ण केला. इथून एक रस्ता मांढरदेवी मंदीराकडे जातो. इथे मस्त पोहे मिळाले. चहा- बिस्किटही घेतलं. आता वाईपर्यंत मस्त उतार मिळेल.


इथूनच मी वर आलो आहे.

पाच किलोमीटरचा घाट आणि मग पुढे हलका उतार. इथून आता महाबळेश्वरचे डोंगर आणि दूर खाली धोम धरण दिसतंय. एक छोटा धबधबाही लागला. लवकरच वाईला पोहचलो. बस स्टँडजवळ एका लॉजमध्ये रूम घेतली. मला पाहिजे होता, तसा अगदी साधा लॉज मिळाला. पण आता सकाळचे दहा वाजले आहेत. त्यामुळे वाईजवळचं धोम धरण बघायला संध्याकाळी जाईन. सगळं सामान उतरवलं. थोडा आराम केला. वाई बस स्टँडच्या अगदी समोर महाबळेश्वर रोडवरच हा लॉज आहे. आता इथेच दोन दिवस राहीन.

संध्याकाळी धोम धरण बघायला गेलो. जाताना मेणवली गावही बघितलं. इथेच स्वदेसचं शूटींग झालं आहे. आणि 'मन से रावण जो निकाले राम उसके मन में है' गाणं इथेच शूट झालं आहे आणि आज दसरा! मेणवली गावाचं आणखी एक महत्त्व म्हणजे इथे नाना फडणीसांचा वाडा आहे! मराठा किंबहुना भारतीय इतिहासातलं एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व! त्यानंतर नृसिंह मंदीरही बघितलं. पण आता संध्याकाळ झाली आहे आणि लवकरच अंधार पडेल. पाऊसही येऊ शकतो. त्यामुळे अगदी १ मिनिटात धरण व मंदीर बघून लगेचच परत निघालो. धरण बघण्यासाठी दोनशे मीटरचा एक चढ पायी गेलो. एक छोटा चढ. अगदी आरामात चढलो. तेव्हा जाणवलं की, माझा स्टॅमिना बराच वाढलाय. तीव्र चढ होता. पण धाप न लागता एकाच दमात चढलो आणि उताराची भिती न वाटता उतरलोही. मग न थांबता वळलो. अंधार पडायच्या आत वाईमध्ये पोहचलो. पण चांगलाच पाऊस आला. त्यामुळे थोडा भिजलोसुद्धा.


नाना फडणीसांचा वाडा


नृसिंह मंदीर


ह्याच मंदीरात धौम्य ऋषींची समाधी आहे. त्यामुळे गावाला धोम हे नाव मिळालं

काय दिवस आहे आजचा! सकाळी छत्तीस किलोमीटर सायकल चालवली आणि संध्याकाळीही वीस किलोमीटर. आज पहिला अवघड पेपर होता, पण आरामात "पास" झालो. चढाची भिती बरीच कमी झाली. आता संध्याकाळी लवकर झोपायचं आहे. उद्या महाबळेश्वरला जाऊन येईन. सामान लॉजवरच ठेवणार असल्यामुळे जरा सोपं जाईल. उद्या ह्या मोहीमेतला अर्धा टप्पाही पूर्ण होईल. बघूया!


भोर ते वाईमध्ये ८६० मीटरचा एकूण क्लाईंब


आजचं एकूण अंतर ५६ किमी झालं

पुढचा भाग- योग ध्यानासाठी सायकलिंग ५: वाई- महाबळेश्वर- वाई

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत- www.niranjan-vichar.blogspot.in

प्रतिक्रिया

मोदक's picture

16 Oct 2017 - 11:40 pm | मोदक

पुढच्या वेळी पुणे-भोर-रायरेश्वर-वाई असा रूट करा. निर्जन रस्ता आहे पण निसर्गाची उधळण..

घाट फार सुंदर दिसतो आहे. पुभाप्र.

मार्गी's picture

23 Oct 2017 - 1:11 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!