मोजमापे, युनिट आणि दुर्घटना

अमितदादा's picture
अमितदादा in तंत्रजगत
15 Oct 2017 - 2:02 pm

प्रेरणा> माझ्या कंपनीमध्ये एका चर्चे दरम्यान माझ्या व्यवस्थापकाने एक अनुभव मला सांगितला त्यावरून भूतकाळात वाचलेल्या/ऐकलेल्या घटना आठवल्या, आणि मग परत एकदा जालावर माहिती शोधून मराठीत लिहून काढली.

टीप> १. खाली दिलेली सगळी माहिती (वैयक्तिक अनुभव वगळता) जालावर उपलब्ध आहे, मी फक्त ती माहिती संकलित करून मराठी अनुवाद केला आहे.
२. लेखात काही चुका असल्यास, सुधारणा करायची संधी असल्यास वाचकांनी सुचवल्यास बदल करण्यास आनंदच आहे. वाचकांना खाली दिलेल्या क्षेत्रातील किंवा त्यांच्या क्षेत्रातील अनुभव असल्यास जरूर शेअर करावेत.
३. ह्या लेखाचा स्कोप लिमिटेड असल्याने खालील घटना सांगताना खोलात जाण्याचं टाळले आहे.

मोजमापे, युनिट आणि दुर्घटना
ह्या लेखात आपण फक्त मोजमापे आणि युनिट मध्ये गफलत झाल्यास खऱ्या जगात कसे परिणाम होऊ शकतात किंवा कश्या गोष्टी / यंत्रे, गणना बिघडू शकतात हे पाहणार आहोत, ह्या लेखाचा रोख आणि स्कोप दोन्ही लिमिटेड आहे. तर थोडी बेसिक माहिती घेऊन मुद्द्याला हात घालूयात.

युनिट म्हणजे काय ?
सध्या आणि सोप्या भाषेत युनिट म्हणजे एखादे परिमाण/संज्ञा संख्येच्या स्वरूपात मोजण्यासाठी नियमाने ठरवून केलेली तरतूद. थोडक्यात काय तर युनिट हे एखाद्या गोष्टीच्या परिमाणाच्या (physical quantity/characteristics) मोजमाप करण्यासाठी वापरतात. बर युनिट ठरवण्याच्या पद्धती ह्या खूप वेगवेगळ्या आहेत, प्राचीन काळी प्रत्येक भागाची/संस्कृतीची/देशाची स्वतःची अशी पद्दत होती, पुढे काळानुसार, जागतिकीकरणामुळे, व्यापारामुळे अनेक पद्दतीत बदल झाले तर अनेक पध्दती बंद झाल्या. भूतकाळात न जाता फक्त वर्तमान काळाचा विचार केल्यास आज फक्त मेट्रिक/SI पद्दत (सगळे मेट्रिक युनिट, SI युनिट म्हणून गृहीत धरले जात नाहीत, उदारणार्थ> बार) आणि इंपिरिअल पद्दत वापरली जाते. अमेरिकेत वापरण्यात येणार्‍या पध्दतीला जरी इंपिरिअल पद्दत म्हणत नसले ती इंपिरिअल पध्दतीशी मिळतीजुळती असल्याने आपण तिला ह्या लेखापुरती इंपिरिअल पद्दतच मानूयात. आजकाल जगात बहुतांश देश SI पद्दत वापरतात आणि तीच जगमान्य पद्दत आहे, इंपिरिअल पद्दत हि अमेरिका, म्यानमार आणि लिबेरिया ह्या देशात वापरली जाते.

आता युनिट च्या साह्याने एखाद्या गोष्टीच मोजमाप करताना आपल्याला एक रेफरन्स किंवा बेस संख्या त्या गोष्टीची १ युनिट म्हणून ठरवायला हवी. आता आपण सगळ्यात महत्वाची आणि सर्वात जास्त वापरली वापरणाऱ्या संज्ञा अंतर, वेळ आणि वजन यांची युनिट्स SI पद्दतीत पाहू. तर १ मीटर म्हणजे काय , तर प्रकाशाने पोकळीत १/299792458 सेकंदात पार केलेलं अंतर. अर्थात आता हे ठरवण्यासाठी आपल्याला सेकंद हे युनिट ठरवयाला हवं, तर सध्य स्थितीला सेकंद हे ऍटोमिक क्लॉक च्या प्रयोगावरून निर्धारित केलेलं आहे जे caesium hyperfine frequency वर अवलंबून आहे. (Atomic Clock). म्हणजे थोडक्यात काय मीटर आणि सेकंद याच मोजमाप अश्या गोष्टीवर अवलंबून आहे जे स्थिर आहे कोणत्याही परस्थिती मध्ये बदलत नाहीत, उदारणार्थ प्रकाशाचा वेग आणि caesium hyperfine frequency. आता आपण १ किलोग्रॅम जेंव्हा म्हणतो तेंव्हा काय अभिप्रेत असते, तर आंतराष्ट्रीय परंपरेनुसार किंवा नियमानुसार १ किलोग्रॅम म्हणजे १ dm^३ पाण्याचं ४ डिग्री तापमानास असणारे वजन. मग हे वजन मोजून याचे नमुने बनवण्यात आले जे १ किलोग्रॅम म्हणजे किती हे ठरवण्यासाठी वापरले जातात. आता ह्या किलोग्रॅम मध्ये एक मेख आहे ते म्हणजे हे कोणत्याही स्थिर गोष्टीवर अवलंबून नाही म्हणून शास्त्रज्ञांनी २०१९ च्या आसपास १ किलोग्रॅम हे युनिट प्लॅन्क स्थिरांक, प्रकाशाचा वेग आणि caesium hyperfine frequency वर अवलंबून बनवायच ठरवलं आहे. आताच्या काळात अंतर, वजन आणि वेळ याचं ह्या इंपिरिअल पद्दतीत युनिट आहेत यार्ड, पौंड आणि सेकंद, याच SI पद्दतीशी नात आहे, ते असे १ यार्ड म्हणजे ०.९१४४ मीटर, १ पौंड म्हणजे ४५३.५९ ग्रॅम.

आता मोजमापे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच एखाद परिमाण (characteristic quantity) एका ठरवलेल्या बेस/रेफेरेंस पेक्षा किती मोठी किंवा किती छोटी आहे हि ठरवण्याची पद्दत. यातील बेस/रेफेरेंस म्हणजेच १ युनिट. जेंव्हा आपण म्हणतो कि १० किलोग्राम वजन तेंव्हा ती गोष्ट हि १ किलोग्राम ह्या ठरवून दिलेल्या वजनाच्या (prototype) च्या दहापट असते. आता खोलात न जाता मूळ विषयाला सुरुवात करतो.

आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार अश्या अनेक अगणित क्षेत्रात मोजमापे आणि युनिट याचं मोलाच महत्व आहे. मोजमाप किती काटेकोर हव हे कामाचं क्षेत्र, कामच स्वरूप, वापरण्यात येणार तंत्रज्ञान, व इतर अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. आता मोजमाप करण्यात चुकी झाली किंवा युनिट हे इंपिरिअल पद्दतीतून SI पद्दतीत बदलण्यात चूक झाली तर ती किती महागात पडू शकते याची खाली काही विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रातील उदाहरणे.

प्रसिद्ध उदाहरणे
१. वैज्ञानिक इतिहासातील सर्वात मोठ उदाहरण म्हणून नासाच्या मार्स क्लायमेट ओर्बीटर च उदाहरण दिल जात. नासाने डिसेंबर १९९८ साली मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे रोबोटिक यान रवाना केलं मात्र सप्टेंबर १९९९ साली हे यान मंगळाच्या वातावरणाशी घर्षण होऊन नष्ट झालं. ह्या घटनेची जेंव्हा चौकशी झाली तेंव्हा अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट/गोंधळ लक्षात आला, तो गोंधळ होता वेगवेगळ्या पद्धतीतील युनिट मधील गोंधळ. तर ह्या मागचं कारण असे होते कि लॉकहिड हि कंपनी नासाला ह्या प्रोजेक्ट साठी एक सॉफ्टवेअर पुरवत होती आणि जे नासाच्या सॉफ्टवेअर इंटरफेस शी जोडलेलं होत. ह्या यानाला योग्य कक्षेत पोहचवण्यासाठीचा जो इम्पल्स (impulse) आवश्यक होता तो नासाला Newton-seconds मध्ये अपेक्षित होता. परंतु लॉकहिड हि कंपनी इंपिरिअल पद्दत वापरत होती आणि त्यांचे सॉफ्टवेअर सुद्धा गणना इंपिरिअल पद्धतीमध्ये करत होते. त्यामुळे ह्या कंपनीच्या सॉफ्टवेअर ने आवश्यक असलेला इम्पल्स Newton-seconds मध्ये द्यायच्या ऐवजी pound-seconds मध्ये दिला ज्याची परिणीती ह्या यानाला जास्त इम्पल्स मिळण्यात झाली आणि हे यान मंगळापासून जवळजवळ ५७ किलोमीटर पर्यंत जाऊन पोहचलं आणि मंगळाच्या वातावरणात जावून नष्ट झालं. मंगळाच्या वातावरणापासून सुरक्षेत राहण्यासाठी किमान ते ८० किलोमीटर अंतरावर हवे होते. या घटनेमुळे कित्तेक बिलिअन डॉलर चे नुकसान आणि अनेक शास्त्रज्ञांच्या कामाचं नुकसान झाले. [१,२,३,८]

२. दुसरे उदाहरण म्हणजे एका मोठ्या ऐतिहासिक जहाजाच, ज्याच नाव वासा आणि ते सध्या वासा संग्रहालय, stockholm येथे जतन करून ठेवलेलं आहे. तर हे जहाज १६२६ साली बांधायला घेतलं होत आणि १६२८ साली बांधून झालं. त्या काळाच हे सर्वात ताकतवर जहाज होत, परंतु जेंव्हा हे पूर्ण होवून समुद्रात प्रवासासाठी निघाल तेंव्हा बंदरापासून काही अंतरातच बुडालं. हे जहाज बुडण्यामागच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण म्हणजे उजव्या आणि डाव्या बाजूला असणार्या लाकडी बांधकामातील (structure) जाडीमधील असमानता, ज्याने जहाजाचा तोल हरवला. हे का झाल? संशोधकांनी असे अंदाज लावला कि उजव्या आणि डाव्या बाजुचे काम करणाऱ्या कामगारांची टीम वेगवेगळ्या मोजपट्या वापरत होती, कारण संशोधकांना ४ वेगवेगळ्या मोजपट्या मिळाल्या त्यातील २ पट्या ह्या स्वीडिश पट्टी होत्या ज्या १ फुट बरोबर १२ इंच मानणार्या होत्या आणि दोन पट्या ह्या amsterdam पट्टी होत्या ज्यामध्ये १ फुट म्हणजे ११ इंच होत. हे जहाज मी पाहिलेलं आहे हे आज हि उत्तम स्थितीत आहे. [२, ४]

३. तिसरे उदाहरण म्हणजे एअर कॅनडा चा विमानाचा किस्सा जो १९८३ साली घडला, त्या विमानाचं नाव फ्लाईट 143 आणि जे बोईंग 767 पद्धतीचं अत्याधुनिक विमान होत आणि बोईंग ने एअर कॅनडा ना नुकतंच सुपूर्द केलेलं होत, याच दरम्यान एक मोठा बदल कॅनडा मध्ये घडत होता तो म्हणजे कॅनडा इंपिरिअल युनिट पद्धतीतून मेट्रिक पद्धतीमध्ये रूपांतरित होत होते आणि एअर कॅनडा ने सुद्धा नुकतीच आपली युनिट पद्दत इंपिरिअल युनिट्स मधून मेट्रिक /SI युनिट्स मध्ये बदलली होती. एअर कॅनडा ला पुरवण्यात आलेली बोईंग 767 विमान मेट्रिक पद्दत वापरत होती परंतु यासाठी वैमानिकांना कोणताही प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हते तसेच विमानातील काही वापरकर्ता हस्तपुस्तिका सुद्धा जुन्या होत्या, ज्यामध्ये इंपिरिअल पद्धतीबद्दल माहिती होती. ह्या विमानाचं तेल मोजण्याच यंत्र बंद पडल होत तेंव्हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी विमानात असणारे तेल मोजण्यासाठी floatstick चा आधार घेतला, त्यांनतर वैमानिकांनी एकूण किती तेलाची हे किलोग्रॅम मध्ये गरज आहे याच गणित केलं, परंतु वजनाचं घनफळात रूपांतर करताना मेट्रिक रूपांतरित फॅक्टर वापरायच्या ऐवजी इंपिरिअल रूपांतरित फॅक्टर वापरलं, आणि अधिक गरजेचं तेल भरण्याच्या सूचना विमानतळवरील कर्मचार्यांनी केल्या. परंतु झालं असं कि चुकीचा वजन -घनफळ फॅक्टर वापरल्यामुळे २०००० लिटर ऐवजी फक्त ५००० लिटर तेल भरलं गेलं. हि गोष्ट वैमानिकाच्या खूप उशिरा लक्षात आली तरीही सुदैवाने त्यांनी विमान ताबडतोब गीम्ली ह्या जुन्या विमानतळवर/सध्याच्या रेसिंग ट्रॅक वर उतरवल आणि पुढचा अनर्थ टाळला. हे विमान पुढं गिमली ग्लायडर म्हणून प्रसिद्ध पावलं. [१, २, १२]

४. चौथे उदाहरण हे हि विमानाचं, एप्रिल १९९९ साली कोरियन एअरलाईन चे फ्लाईट नंबर 6316 हे मालवाहतूक विमान शांघाई ते सोएल जात होत, ते विमान उडत होत ४५०० फुटवरती आणि शांघाय च्या कंट्रोल रुम ने विमान १५०० मीटर उंचीवर ठेवण्याचा सल्ला दिला, हा संदेश को पायलट ने मुख्य पायलट ला देताना १५०० फूट सांगितले आणि मुख्य पायलट ने विमानाची उंची वेगात कमी केली, शेवटी विमान कंट्रोल झाले नाही आणि जमिनीवरती कोसळलं, यात ३ लोकांचा मृत्यू झाला . [१. ५]

५. आणखी एक उच्च वैज्ञानिक उदाहरण म्हणजे हबल टेलेस्कोप, ज्याने अंतरीक्ष विज्ञानात मोलाची भर घातली. हा हबल टेलिस्कोप अवकाशात सोडण्यात आला १९९० साली, अर्थात संशोधकांना याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या मात्र हबल टेलिस्कोप ने जेंव्हा पहिल्या काही इमेजेस पाठविल्या त्या पाहून संशोधकांची घोर निराशा झाली याच कारण म्हणजे खूप धूसर अश्या ह्या इमेजेस होत्या. जेंव्हा इंजिनिअर आणि टेक्निशिअन नि यामागचं कारण शोधलं तेंव्हा त्यांना असे आढळून आले कि ह्या टेलिस्कोप च्या मुख्य मिरर मध्ये काही मायक्रॉन ने विचलन होत ज्या मुळे ह्या टेलेस्कोप कडून पाठवण्यात आलेली चित्रे अपेक्षेप्रमाणे नव्हती. हे विचलन किती होत तर मानवी केसाचा ५० वा भाग एव्हडं. याच मुख्य कारण चौकशी नंतर माहिती पडलं ते म्हणजे म्हणजे हा आरसा तयार करताना ग्राइंडिंग करण्यासाठी तसेच मोजमाप करण्यासाठी असणारी उपकरणे योग्य रीतीने calibrate केलेली नव्हती, त्यामुळे ग्राइंडिंग करताना काही मायक्रॉन चे असणारे विचलन पडताळणी करताना सुद्धा सापडले नाही. अर्थात मुख्य मिरर बदलणे शक्य नव्हते म्हणून नासाने नंतर दुसरे यंत्र बनवले आणि १९९३ साली अंतराळवीराकडून हे बसवून ह्या टेलिस्कोप ची दुरुस्ती केली. [६]

६. डिसेंबर २००३ साली जपान मधील टोकियो शहरात Disneyland’s चा roller coaster अचानक axel तुटल्याने मध्येच बंद पडला, axel बदलल्या नंतर ह्या घटना वारंवार व्हायला लागल्या. जेंव्हा याची चौकशी झाली त्या चौकशीमधून आलेल कारण म्हणजे axel आणि बेअरिंग मध्ये असणारा मोठे अंतर ज्यामुळे अधिकची vibrations आणि पर्यायाने अधिकच स्ट्रेस तयार होऊ लागला आणि शेवटी याची परिणीती एक्सल तुटण्यामध्ये होत होती. याच कारण म्हणजे जुनी इंपिरिअल युनिट्स मधली design वापरणे आणि त्यानुसार भागांची निर्मिती करणे हे होय. [७, ८]

७. असाच एक किस्सा जर्मनी मधील Laufenburg नामक एक शहर आणि त्याच नावाच्या असणाऱ्या स्विस शहराला जोडणाऱ्या नदीवरील एका पुलाच. हा पूल बांधायला दोन्ही बाजूनी सुरुवात झाली, अर्थात दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी (एक जर्मन आणि एक स्विस) ने पूल बांधायला सुरुवात केली, जेंव्हा पूल मध्यभागी आला तेंव्हा असे कळले कि पुलाच्या उंचीत ५४ cm चा फरक आहे. कसा पडला हा फरक, तर जर्मनी समुद्रसपाटीपासून उंची मोजताना नॉर्थ सी/ उत्तर समुद्र याचा आधार घेते तर स्विस लोक Mediterranean Sea/मध्य समुद्राचा आधार घेतात. अर्थात ह्या दोन्ही समुद्राच्या पाण्याची पातळी एक समान नाहीये त्यामुळे जवळजवळ २७ cm चा फरक पडतो, त्यामुळे ह्या पुलाच्या design मध्ये जर्मन बाजूने २७ cm चा बदल करण्यात आला जेणेकरून उंची मध्यभागी एकसमान होईल पण अपघाताने हा बदल उलट्या बाजूला झाला (sign error) आणि पुलाची उंची एकसमान व्हायच्या ऐवजी ५४ cm च अंतर पडले. पुढे जर्मनीच्या बाजूच बांधकाम उतरून घेऊन हा पूल नव्याने बांधून पूर्ण करण्यात आला. [२, ८]

८. फ्रांस मध्ये रेल्वे कंपनी ने नव्या ट्रेन बांधणीचं च कंत्राट एका फ्रेंच कंपनीला दिले हे करताना रेल्वे कंपनी ने रेल्वे बांधणी कंपनीला रेल्वे रूळ आणि फलाट यामधले अंतर दिले होते आणि जेंव्हा काही नवीन ट्रेन सर्विस मध्ये दाखल झाल्या तेंव्हा काही जुन्या स्थानकात ह्या शिरू शकत नव्हत्या याच कारण म्हणजे रेल्वे कंपनीतील अधिकारी हे विसरले कि त्यांच्याकडे रूळापासून फलाटापर्यंतच अंतर एकच नाहीये. अनेक जुने फलाट हे रूळापासून जवळ अंतरावर होते त्यामुळे नवीन ट्रेन स्थानकात शिरू शकत नाहीत, अर्थात हे खूप उशिरा लक्षात आल्यामुळे जवळजवळ १२०० फलाट हे दुरुस्त करावे लागले. [९]

काही वैयक्तिक/ऐकलेले अनुभव
१. माझ्या व्यवस्थापकाने ने सांगितलेला अनुभव, जेंव्हा माझा व्यवस्थापक एका कन्सल्टिंग कंपनीत काम करत होता तेंव्हा त्याला एका इंजिन निर्मिती कंपनीने पिस्टन हेड च्या fatigue crack (Fatigue) मुळे होणार्या failure ची चौकशी करण्यासाठी बोलवण्यात आले होते आणि चौकशी अंती असे आढळून आले कि piston head ला देण्यात आलेला फिलेट (फिलेट म्हणजे शार्प कॉर्नर स्मूथ करणे) हा कमी त्रिजेचा चा होता ज्याच्यामुळे स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनं (Stress concentration) होऊन crack तयार होत असे. कमी त्रिजा ठेवण्याचं कारण होत, designer ने drawing software मध्ये एका ठराविक त्रिजेचा चा फिलेट काढता येत नसल्यामुळे (software bug) छोट्या त्रिजे चा फिलेट काढला होता ज्याची परिणती engine failure मध्ये होत होती. हा फरक फक्त काही मिलीमीटरचा होता.

२. माझ्या व्यवस्थापकाने चा आणखी एक किस्सा, माझा व्यवस्थापक नॉर्वे मध्ये डिप्लोमा करत असताना त्याच्या विद्यापीठ च्या काही प्राध्यापक चा एका दुर्घटनेच्या चौकशी समिती मध्ये किंवा त्या दुर्घटनेच्या संधर्भातील इतर कसल्या तरी समिती मध्ये समावेश होता (नक्की आठवत नाही). ती दुर्घटना म्हणजे Alexander L. Kielland ह्या ओईल रिग ची दुर्घटना, हि दुर्घटना कश्यामुळे झाली तर drilling साठी लागणार सोनार हे एका मोठ्या प्लेट ला जोडलेलं होत, त्या प्लेट च्या एका भागात वेल्डिंग चा फिलेट हा designer ने कमी ठेवलेला होता अंदाजे ६ mm जो आवश्यकतेपेक्षा काही मिलीमीटर ने कमी होता, drilling च्या प्रोसेस दरम्यान होणार्या vibration ने fatigue crack होवून ओईल रिग कोसळली आणि १२३ लोकांचा जीव गेला. [10]

३. माझ्या प्राध्यापक/गाईड ने सांगितलेला किस्सा, त्यांना एका मोठ्या इमारतीचा बांधकामा दरम्यान पडलेल्या हिस्याच्या चौकशी समिती साठी साठी बोलवण्यात आले होते, ज्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता . तर त्या चौकशी मध्ये असे निष्पन्न झाले कि designer ने काढून दिलेले drawing मध्ये मोजमापाशी संबंधित गफलत होती (नक्की काय गफलत, हे मला आता आठवत नाही). त्यामुळे चुकीच्या मोजमापाचे कॉलम आणि बीम बनवण्यात आले ज्याची परिणती एका इमारतीचा चा काही भाग काम चालू असताना कोसळण्यात झाली.

तर शेवटी काय विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात (किंवा इतर हि क्षेत्रात) मोजमाप, त्याच युनिट, आणि त्याच विविध पध्दतीतील रुपांतर खूप काळजीपूर्वक केल पाहिजे.

संदर्भ>
१. Units of measurement
२. BBC News
३. Mars Climate Orbiter
४. Vasa Ship
५. Korean Flight
6. Nasa hubble
7. Disneyland Japan
8. लोकसत्ता> विज्ञान
९. BBC news
10. Alexander L Kielland Platform
11. What is second
१२. Gimli Glider Accident

संपादनाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे आणि माहितीबद्दल डॉ. सुहास म्हात्रे यांचे आभार.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

15 Oct 2017 - 2:52 pm | प्रमोद देर्देकर

मस्त खूप मनोरंजक. येवू द्या अजून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Oct 2017 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोजमापांत वेगवेगळी एकके वापरल्याने खूप गोंधळ होतात, त्यांची रोचक उदाहरणे आवडली !

दशमान पद्धती जगभर शास्त्रिय वापरात वापरात आल्यापासून जरा कमी घोळ होत आहेत. याला अनेक दशके लोटून गेल्यानंतरही, जगातल्या विकसित देशांच्या यादीत वरचे स्थान असल्याचा दावा करणार्‍या यु एस ए आणि यु के या देशांत अजूनही बर्‍याचदा सर्वसामान्य व्यवहारात लांबीकरिता फूट / मैल ; वजनाकरिता औंस / पाऊंड; आणि तापमानासाठी फॅरेनहाईट ही एकके वापरली जातात... जी तिथे जाणार्‍या प्रवाशांना नेहमीच गोंधळात टाकतात !

सुनील's picture

15 Oct 2017 - 3:31 pm | सुनील

युकेत लांबीकरीता फूट-मैल वापरत असले तरीही वजनाकरीता किलोग्रॅमच वापरतात असा अनुभव आहे.

भारतीयांची मात्र थोडी गंमत आहे -
दशमान पद्धत सरकारमान्य असल्यामुळे म्हाडा घरांची मोजमापे चौरस मिटरमध्ये देते. परंतु, अन्यत्र सर्व व्यवहार चौरस फूटात होतात!
एरवी अंश सेल्सियसमध्ये तापमान मोजणारे आम्ही शारीरिक ताप मोजताना फॅरनहाईट वापरतो!

अभिजीत अवलिया's picture

15 Oct 2017 - 3:47 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

अनिकेत कवठेकर's picture

15 Oct 2017 - 3:48 pm | अनिकेत कवठेकर

दादा सुंदर माहिती..अनुभावातून आल्यामुळे अधिक रोचक..अजून लिहा..

मार्मिक गोडसे's picture

15 Oct 2017 - 4:08 pm | मार्मिक गोडसे

रोचक माहिती .
बांधकाम क्षेत्रात मोजमापे मीटर मध्ये दिली जातात, मला मीटरपेक्षा फुटात मोजायला किंवा कळण्यास सोपे जाते.

कुमार१'s picture

15 Oct 2017 - 5:40 pm | कुमार१

सुंदर माहिती.. वैद्यकीय क्षेत्रातील उदा देतो.
समजा आपण रक्तातील ग्लुकोज मोजत आहोत.
भारतात आणि अमेरिकेत त्याचे युनिट आहे mg/dL
पण तेच युरोप, मध्यपूर्व आणि ऑस्ट्रेलिया त mmol/L.
पहिल्यात जी पातळी 90 असेल, तीच दुसऱ्यात फक्त 5 असते!
तेव्हा अशा वेगळ्या देशांत काम करताना आम्हाला डोक्यातील सेटिंग पूर्ण बदलावे लागते.

अनुप ढेरे's picture

15 Oct 2017 - 6:32 pm | अनुप ढेरे

मस्तं लेख आहे. आवडला.

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2017 - 6:43 pm | पिलीयन रायडर

लेख आवडला! युनिट्स चे महत्व पुरेपूर जाणून आहे. Analysis मध्ये रन बाहेर आला किंवा मजेशीर उत्तरं मिळाली की पाहिलं काय चेक करायचं तर युनिट्स! आमचे सिनियर्स सुद्धा आमचे रन तपासताना आधी युनिट्स बघायचे. केवळ युनिट्स पायी माझे कित्येक रन्स वाया गेलेत.

पण ह्यामुळे लोकांचा जीवही गेलाय हे वाचून फार वाईट वाटलं...

अमितदादा's picture

15 Oct 2017 - 7:20 pm | अमितदादा

@प्रमोद देर्देकर, डॉ सुहास म्हात्रे, अभिजीत अवलिया, अनुप ढेरे
प्रतिक्रियेबद्दल आभार.
@सुनील, मार्मिक गोडसे
बांधकाम आणि शेती क्षेत्रात नक्कीच फुट, गुंटा, आणि एकर हि युनिट वापरली जातात, यातील फुट आणि एकर हि इम्पेरीकल युनिट आहेत तर गुंटा हे कोणते युनिट आहे माहित नाही? हे भारतीय युनिट आहे का माहित नाही. काही ठिकाणी बिघा हे सुद्धा युनिट जमीन मोजण्यास वापरतात ते हि कदाचित भारतीय युनिट असावे.
@कुमार१
वैदकीय क्षेत्रातील आणखी अनुभव असतील तर कृपया लिहा.
@अनिकेत कवठेकर
मी एका विद्यापीठात प्रोजेक्ट करत असताना माझे निष्कर्ष हे माझ्या गाईड च्या वेगळ्या पद्धतीने काढलेल्या निष्कर्ष शी पडताळून पाहत असे, एकदा असेच निष्कर्ष जुळत न्हवते, काही दिवस प्रयत्न केल्यानंतर चूक लक्ष्यात आली ती म्हणजे मी १ बार चे MPa मध्ये केलेलं चुकीच रुपांतर, १ बार म्हणजे ०.१ MPa. मी केलेलं रुपांतर होत १ बार १ MPa. अर्थात माझा अनुभव हा दुर्घटनेशी संबधित नसल्यामुळे वरील लेखात दिला नाही.
@पिलीयन रायडर
तुम्ही योग्य मुद्दा उपस्थित केलात, कोणत्याही तंत्रज्ञ साठी हि एक बेसिक स्टेप आहे, युनिट चेक करणे. बर्याच वेळा संशोधनात मोठी मोठी equations असतात, साधी चूक महागात पडू शकते म्हणून कधीही दोन्ही बाजूचे युनिट चेक करणे गरजेचे असते. अनेक software मध्ये जर तुमच्या expression च जर युनिट चुकल असल्यास हि softwares कलर बदलून user ला सूचित करतात.

मेट्रिक पद्दत जन्मली फ्रान्स मध्ये, तर इम्पेरीकल पध्दतच मूळ uk मध्ये सापडत, ब्रिटीश सत्ता १८ -१९ शतकात जगभर पसरल्याने इम्पेरीकल पध्दतीचा प्रभाव जगभर जाणवत होता/जाणवतो. भारतात ब्रिटीश काळात पौंड, यार्ड सारखी युनिट वापरली जात होती का हे पाहावं लागेल.

कुमार१'s picture

15 Oct 2017 - 8:15 pm | कुमार१

बाकी SI units वापरायच्या बाबतीत तर आपण फार उदासीन आहोत. चाललंय ते चालू द्या हाच आपला खाक्या असतो.

अमेरिकन त्रिशंकू's picture

15 Oct 2017 - 8:28 pm | अमेरिकन त्रिशंकू

इम्पेरिकल नव्हे इंपिरिअल

हरवलेला's picture

15 Oct 2017 - 8:40 pm | हरवलेला

१ पौंड म्हणजे ४५३.५९ किलोग्रॅम ?
१ पौंड म्हणजे ०.४५३५९ किलोग्रॅम

अमितदादा's picture

15 Oct 2017 - 9:38 pm | अमितदादा

@अमेरिकन त्रिशंकू
इंपिरिअल बरोबर. धन्यवाद. अनेक ठिकाणी imperial हा इंग्रजी शब्द इम्पेरिकल ह्या typo ने रिप्लेस केल्याने अनेक ठिकाणी चूक झाली।
@ हरवलेला
ग्राम बरोबर. Typo
सर्वात शेवटी संपादन करून लेख करेक्ट करेन कारण अजून चुका सापडू शकतात.

लेख आवडला. उदाहरणेही भरपूर दिली आहेत. आपण मिसळलेली परिमाणं वापरायचं चालूच ठेवतो कारण १) व्यावहारिक उपयोगिता,
२) महागाई.

अमितदादा's picture

16 Oct 2017 - 12:13 pm | अमितदादा

लेख आवडला. उदाहरणेही भरपूर दिली आहेत. आपण मिसळलेली परिमाणं वापरायचं चालूच ठेवतो कारण १) व्यावहारिक उपयोगिता,
२) महागाई

.
पहिलं कारण पटलं, पण दुसरं कारण काही पटत नाही. दुसरं कारण देण्यामागे तुमच्या डोक्यात सोन्याचं उदाहरणं तरी नाही ना? महागाई मुळे सोन्या सारखी गोष्ट लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकत नाहीत त्यामुळं तोळा हे युनिट बरं पडतं? परंतु मग ग्रॅम किंवा मायक्रो ग्रॅम हे युनिट आहेत च की छोट्या महाग गोष्टी मोजायला.

लेख आवडला. भारताने एसआय पद्धत वापरण्यास बरीच आधी सुरुवात केली. हे बरे झाले.

एका मशीनवर ड्रीलिंग करताना पूर्ण कॅलिब्रेट करायला लागत असे कारण ती मशीन स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्लंडवरून आणण्यात आलेली होती हे आठवलं.

तुमचा मशीन कॅलिब्रेट करण्याचा अनुभव रोचक असणार यात काही शंका नाही.

गामा पैलवान's picture

16 Oct 2017 - 12:14 am | गामा पैलवान

अमितदादा,

लेख आवडला. रोचक आहे.

फूटमीटर गोंधळाचं एक अत्यंत दुर्दैवी संभावित योगदान म्हणजे १९९६ साली दिल्लीनजीक चरखी-दादरी या नगरावरील आकाशात झालेली दोन विमानांची भीषण टक्कर. अधिक माहिती : https://en.wikipedia.org/wiki/Charkhi_Dadri_mid-air_collision

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

16 Oct 2017 - 12:07 pm | अमितदादा

गामा पैलवान
तुम्ही दिलेली माहिती रोचक आहे, दुर्दैवाने 350 लोकांना जीव गमवावा लागला. मुख्य कारण पायलट चा कंमुनिकेशन प्रॉब्लेम, atc कडून आलेल्या सूचनांचा योग्य उपयोग न करणे हा दिसतो. तरीही फूटमीटर गोंधळ हे ही एक संभावित कारण आहे हे स्पष्ट लिहिलेलं आहे.
विमानाची उंची बहुतांश देश हे फूट मध्ये मोजतात तर रशिया आणि चीन हे देश उंची मीटर मध्ये मोजतात. मी लिहलेला कोरियन विमानाचा किस्सा वाचल्यास तुमच्या लक्षात येईल की कोरियन पायलट फूट मध्ये उंची अपेक्षित करत होते तर चीन च्या शांघाय ATC कडून येणाऱ्या सूचना मीटर मध्ये होत्या आणि शेवटी घोळ होऊन अपघात झाला. विमानसेवेत जगभर एकच उंची मोजण्याचा मानक नसणे हे दुर्दैवी आहे। परंतु आता सर्व विमानात उंची फूट आणि मीटर या दोन्ही मध्ये दर्शवली जाते त्यामुळं जास्त प्रॉब्लेम येत नसावा।

काही मोजमापांना फुट,इंच,बरे पडते.
पाऊस मोजायला मिमि/सेंमि/इंच मध्ये सेंमि बरे पडते. ठिकांणाचे पर्जन्यमान सेंमिटरात लक्षात ठेवल्यास सोपे जाते.
पर्वतांची,ठिकाणाची उंची मिटर्समध्येच सोपे जाते.

दुर्गविहारी's picture

16 Oct 2017 - 1:04 pm | दुर्गविहारी

जबरदस्त किस्से आहेत. एका वेगळ्या दॄष्टीकोनातून याची ओळख झाली. हा धागा व्हॉटसअ‍ॅप वर पाठविला तर चालेल काय?

अमितदादा's picture

16 Oct 2017 - 8:46 pm | अमितदादा

धन्यवाद. काही typo दुरूस्त करण्यासाठी संपादकांना विनंती केली आहे ते बदल झाल्यानंतर आपण नक्कीच शेअर करू शकता.

मिहिर's picture

17 Oct 2017 - 1:57 am | मिहिर

उत्तम लेख. नासा व हबलची उदाहरणे माहीत होती, पण बाकीची नवीन कळाली.

बाजीप्रभू's picture

29 Oct 2017 - 6:22 am | बाजीप्रभू

आवडला लेख... डिझाईन फिल्डमध्ये असल्याने रिलेट करू शकलो, युनिट्सचं महत्व समजून आहे. एखाद्या डिझाईनच्या FEA ऍनालिसिसमध्ये बुचकळ्यात टाकणारे रिजल्ट्स वाटले कि पाहिलं काम मटेरियल प्रॉपर्टीजचे युनिट्स चेक करणं...अमेरिकन, युरोपियन, जापनीज, आणि चायनीज मटेरियलच्या सप्लायर ने दिलेल्या डाटाशिटमधील फिजिकल प्रॉपर्टीजचे युनिट्स आणि ३D सॉफ्टवेअरच्या टेम्पलेटचे स्टॅंडर्ड यात जर गफलत झाली तर FEA चा आणि पर्यायाने डिझाईनचा बेंडबाजा वाजला म्हणून समजा.

भाषा लिहिण्याच्या पद्धतीनेही गैरसमज होतात... या निमित्ताने ऑफिसमधले किस्से आठवले... वेळ काढून लिहीन.

अमितदादा's picture

29 Oct 2017 - 12:13 pm | अमितदादा

तुमचे किस्से नक्की लिहा वाचायला आवडतील.

नितिन थत्ते's picture

29 Oct 2017 - 8:49 am | नितिन थत्ते

धागा व माहिती रोचक आहे.
शेवटच्या भागामुद्दा ३ नंबरबाबत (आणि आधीच्या फिलेट रेडिअसबाबत) शंका आहे.

ड्रॉइंग कोणत्याही स्केलमध्ये काढले असले तरी त्यावरचे प्रत्येक डायमेन्शन हे स्पेसिफाय करणे अपेक्षित असते. एखादे डायमेन्शन मिळाले नाही तर ते ड्रॉइंगवरून पट्टीने मोजून ठरवले जात नाही. डिझायनर ला विचारणा करून जाणून घेतले जाते.

त्यामुळे फिलेट रेडिअसच्या बाबतीतही समजा ड्रॉइंग सॉफ्टवेअरच्या मर्यादेमुळे १० मिमि फिलेट काढता न आल्याने ५ मिमीची फिलेट रेडिअस काढली तरी त्याचे डायमेन्शनिंग करताना ती १० मिमि आहे हे दर्शवणे अपेक्षित असते.

अमितदादा's picture

29 Oct 2017 - 11:54 am | अमितदादा

@मिहीर आणि @ बाजीप्रभू , @नितीन थत्ते प्रतिसादबद्दल धन्यवाद.
@नितीन थत्ते
त्यामुळे फिलेट रेडिअसच्या बाबतीतही समजा ड्रॉइंग सॉफ्टवेअरच्या मर्यादेमुळे १० मिमि फिलेट काढता न आल्याने ५ मिमीची फिलेट रेडिअस काढली तरी त्याचे डायमेन्शनिंग करताना ती १० मिमि आहे हे दर्शवणे अपेक्षित असते.
माझ्या बॉस च्या माहितीनुसार यामध्ये मुळात drawing मध्ये फिलेट च चुकीच्या dimensions चे काढून योग्य dimensions चा कोणताही उल्लेख केला न्हवता. काय होतंय एव्ड्याने असा अप्प्रोच होता.

ड्रॉइंग कोणत्याही स्केलमध्ये काढले असले तरी त्यावरचे प्रत्येक डायमेन्शन हे स्पेसिफाय करणे अपेक्षित असते. एखादे डायमेन्शन मिळाले नाही तर ते ड्रॉइंगवरून पट्टीने मोजून ठरवले जात नाही. डिझायनर ला विचारणा करून जाणून घेतले जाते.

तुम्ही नक्कीच बरोबर बोलताय, याबाबत मला अधिक माहिती घ्यायला हवी. यामध्ये drawing मधलं चुकीच scaling किंवा चुकीची dimensions यामुळे चुकीच्या size चे बीम coloumn बनवलेले एव्हड प्रोफेसर सांगताना ऐकलेलं आठवतंय. हा किस्सा ह्या मी ज्या शहरात राहतो तिथे घडलेला, त्या कंपनी आणि designer वर खटला भरण्यात आला होता एवड सांगितलेलं आठवतंय. जालावर शोधण्याचा प्रयत्न केला तर काही सापडलं नाही, एवड्या कारणासाठी प्रोफेसर शी contact करायला नको वाटतंय. जर त्या दुर्घटने बद्दल माझ्या सहकाऱ्यापैकी कुणाला exact माहिती असेल तर सांगेन.

अभ्या..'s picture

29 Oct 2017 - 2:37 pm | अभ्या..

मस्त लेख,
प्रिंटिंगमध्ये सुध्दा बर्‍याच गफलती होत असतात युनिटस मुळे. एकतर कागदाची जुनी मानके इंचावर ठरलेली असतात. त्यात प्रिंटिंग मशीन्स हि इंटरनॅशनल पेपर स्टॅन्डर्डनुसार चालते. जुन्या लोकांना इंचातले हिशोब परफेक्ट माहीत असतात. इंच नव्हे तर पॉइन्ट, पायका पर्यंत मेजरमेंट्स काढणारी पिढी बघितली आहे. आता एमएम नुसार सर्व डिझाइन्स बनवल्या गेल्या तरी सव्वा ईंच म्हण्जे किती एमेम हे सॉफ्टवेअर दाखवते पण डिझायनरना माहीत नसते. कोरल, फोटोशॉप सारखे अ‍ॅप्लिकेशन्स सेकंदात पूर्ण फाईलचे युनिटस बदलून जरी दाखवत असले तरी कन्व्हर्शन कसे होते ते माहीत नसते. त्यात डेमी, डबल डेमी, क्राऊन, फूल्स्कॅप अशी संबोधने सांगून त्याची परफेक्ट साईज माहीत असणारे फार थोडे. कागदाचा १/४ हा प्रिंटरचा ए ४ नसतो हे कळायला बरीच वर्षे जातात. न्युजपेपरमधील जाहीराती आधी सीसी (कॉलम सेंटीमीटर)ने मोजल्या जायच्या. आता सर्रास १० सेमी बाय १२ सेमी असे सांगितले जाते. पूर्वीचा एक कॉलम म्हणजे ४.७ सेमी हेही बर्‍याच डिझायनर्सना माहीत नसते.
रेडीमेड कपड्यांच्या, शूज आणि स्पोर्ट्सवेअरच्या बाबतीत सेम गफलती होतात. एस, एम, एल. एक्सेल च्या परफेक्ट स्टॅन्डर्ड साईजेस आणि शूजची ब्रिटिश मापे हे कायम गोंधळात पाडणारे विषय आहेत.

गामा पैलवान's picture

29 Oct 2017 - 5:14 pm | गामा पैलवान

अमितदादा,

बऱ्याचदा दोन एकके (=युनिट्स) एकाच वेळेस वापरांत असली तरी त्यावरून बाह्य परिस्थितीविषयी इतर अंदाज बांधणे इष्ट नसते. १९६२ सालचा अल इटालिया विमानाचा जुन्नरनजीक अपघात अशाच काही कारणामुळे झाला होता असं मानलं जातं.

विमान खूप उंचीवरून उडंत असेल तर त्याची उंची फ्लाईट लेव्हल या एककात मोजली जाते. उदा. : २५० फ्लाईट लेव्हल म्हणजे २५००० फूट. विमान जसजसे उतरू लागते, तसतशी त्याची उंची कमी होत जाते. उतरण्याच्या नियंत्रकाशी संपर्क झाल्यावर काही काळाने नियंत्रक विमानाची उंची फ्लाईट लेव्हल मध्ये न देता ट्रान्झिशनल लेव्हल मध्ये सांगू लागतो. ही उंची सध्या फुटांत सांगतात.

प्रस्तुत विमान बँकॉकहून मुंबईस येत होतं. हैदराबाद --> नांदेड --> अकोला या मार्गाने औरंगाबाद सेक्शन मध्ये आलं. पुढचा सेक्शन मुंबईच आहोत जिथे हे विमान उतरणार होतं. मुंबईच्या नियंत्रकाने विमानाची उंची कमी करून मुंबईच्या आउटर मार्कर वर एक घिरटी (३६० अंश) घ्यायची परवानगी दिली. नवी उंची अर्थात ट्रान्झिशनल लेव्हल मध्ये म्हणजे सध्या फुटांत होती. मोजमापाच्या एककात बदल केल्यामुळे वैमानिकाला मुंबई जवळ आलं असं वाटलं. आणि त्याने स्वत:ची उपकरणं न वापरता नियंत्रकावर भरोसा ठेवला. प्रत्यक्षात विमान घिरटी घेतांना मुंबईहून बरंच दूर ऐन सह्याद्रीवर होतं. एका दुर्दैवी वेळी दवंड्याच्या डोंगरावर अवघ्या पाच फुटांसाठी धडकलं. :-(

वैमानिककक्षातील संभाषणाची ( = कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) चिकित्सा केला गेलेला हा जगातला पहिला अपघात होता. सांगण्याचा मुद्दा असा की मोजमापाच्या सीमा व/वा एकके बदलली तरी इतर बाबी गृहीत धरू नयेत.

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

29 Oct 2017 - 9:11 pm | अमितदादा

@नितीन थत्ते
तुमच्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने आणि माझ्याकडे असणार्या माहितीच्या अनुषंगाने अनुभव न. ३ मध्ये योग्य ते बदल केला आहे.
@अभ्या
एका वेगळ्या क्षेत्रातील दिलेल्या रोचक माहितीबद्दल धन्यवाद.
@गामा पैलवान
तुमची माहिती रोचक आहे आणि शेवटी तुमचं जे analysis आहे त्याशी सहमत.