बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर

इडली डोसा's picture
इडली डोसा in पाककृती
3 Sep 2017 - 9:37 am

मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश.

आमच्या इथे सज्जनगडावर नेहमी हा प्रसाद असतो, सगळ्यात पहिल्यांदा ही खीर मी गडावरच खाल्ली. आता स्वत: करत असले तरी गडावरच्या खिरीची सर माझ्या खिरीला मुळीच नाही. तरी प्रयत्न चालू आहेत , त्यातलाच एक प्रयत्न या गणेशोत्सवातला इथे सगळ्यांसाठी देत आहे.

चला तर मग घ्या साहित्य

दलिया - १ कप
गूळ - १ कप (मी एक कप गूळ पावडर वापरली आहे)
तूप - २ मोठे चमचे
दूध - १ कप
पाणी - २ कप
सुके खोबरे कीस - १/४ कप
वेलदोडा पूड - ४ वेलदोड्यांची पूड
काजू - ८-१०
मनुके - १२-१५
पिस्ता पूड - ५-६ पिस्त्यांची
सजावटीसाठी स्ट्रॉबेरी

कृती -

छोट्या भांड्यात किंवा कुकरमध्ये तूप गरम करायला घ्या. त्यात मनुका, काजू आणि दलिया एकत्रच परतायला घ्या. अगदी २-३ मिनिटं मध्यम आचेवर परतून झाल्यावर यात पाणी टाका, पाणी थोडं कोमट झाल्यावर (साधारण एक दोन मिनिटात ) यात गूळ, वेलदोडा पूड, खोबऱ्याचा कीस घाला. मिश्रण ढवळून एकत्र करा. आता यात दूध घाला. परत एकदा मिश्रण ढवळा. कुकर मध्ये करत असाल आणि गॅसचा स्टव्ह टॉप असेल तर माध्यम आच करून १० - १२ शिट्ट्या करा आणि गॅस बंद करा. झाली खीर तयार.
kheer

माझा फ्लॅट टॉप इलेक्ट्रिक स्टव्ह आहे त्यात पूर्वी कुकरमध्ये खीर तळाला थोडी करपली होती (खोबरं घातलं असेल तरच करपते ). नुसतीच झाकून ठेवली तरी चांगली शिजते, मधून एक दोन वेळा खिरीचं मिश्रण ढवळलं आणि तळाला चिकटलं नाहीये याची खात्री केली की झालं. अर्ध्या तासात खीर झाली सुद्धा. गरम गरम नैवेद्य बाप्पासाठी तयार.

ही खीर गार झाल्यावरही छानच लागते. गार झाल्यावर अजून सजावट करायलाही वाव असतो. गार असताना मी टॉपिंग म्हणून पिस्ता पूड आणि स्ट्रॉबेरीज घातल्या.

kheer

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 Sep 2017 - 3:14 pm | पैसा

अतिशय हेल्दी पाककृती! फोटो सुंदरच आलेत!!

पद्मावति's picture

3 Sep 2017 - 3:40 pm | पद्मावति

वाह! मस्तच.

छान आणि साधीसोपी आहे पाककृती. एक प्रश्न : पाणी हे दलियात थंडच घालायचं की आधी बाजूला गरम काढून ठेवायचं आणि मग ओतायचं? दोन्ही प्रकारांनी काय फरक पडू शकतो?

इडली डोसा's picture

3 Sep 2017 - 9:30 pm | इडली डोसा

मी थंडच पाणी घालते, पूर्वी एकदा गरम घालून पाहिलं होतं काही विशेष फरक नाही जाणवला.

कविता१९७८'s picture

3 Sep 2017 - 4:47 pm | कविता१९७८

मस्तच

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2017 - 6:46 pm | स्वाती दिनेश

दलियाची खीर आवडते,
मी दलिया मायक्रोव्हेव मध्ये शिजवून घेते.
स्वाती

इशा१२३'s picture

3 Sep 2017 - 8:24 pm | इशा१२३

या खिरिला ओल खोबरेच हवे. ओल खोबर +दलिया तुपावर खमंग भाजून, काजु बेदाणे सकट गरम पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्यायचा.नंतर गुळ, दुध घालून छान शिजवायचा(आधि शिजल्याने पटकन होते)शेवटी जायफळ पुड घालून मिक्स करावे.
आयत्यावेळी परत गरम दुध घालावे.ताज्या खवलेल्या ओल्या खोबर्यामुळे नेमकी चव येते.मस्त गरम गरम खावी.

इडली डोसा's picture

3 Sep 2017 - 9:33 pm | इडली डोसा

ओलं खोबरं बेस्टच, पण मी सहसा जास्त करते आणि 2 -4 दिवस खातो आम्ही, ओलं खोबरं असेल तर ते टिकायला जरा अवघड जातं.

हो ओल खोबर घालुन फारतर दोन दिवस टिकते,पण उरली तरच.

एकदम यम्मी दिसतिये. मला आवडते ही खीर. गडावरची नाही खाल्ली कधी पण आज्जीच्या हातची गव्हाची खीर म्हणजे स्वर्गसूख! तेच आठवलं. आता करणार.

अनन्न्या's picture

3 Sep 2017 - 11:09 pm | अनन्न्या

पण ते तांदूळाचे, ही खिरही एकदा झालीय खाऊन, आता मी करीन या कृतीने!

मंजूताई's picture

4 Sep 2017 - 9:46 am | मंजूताई

मस्त!

गडावरच्या खीरीत मला थोड्या खारका पण असतील की काय असं वाटलं होतं खाताना.
ही खीर करण्याची माझी पद्धत म्हणजे, लापशीचा रवा तूपावर परतून तो बोटचेपा शिजवून घेणे आणि नंतर जरा घोटून मग नारळाचा चव, गू़ळ वैगरे घालून नीट उकळी आणणे. गूळ आधीच घातला की ते आटता आटता कॉन्सन्ट्रेट होऊन मिट्ट गोड व्हायची भीती वाटते म्हणून मग तो मागाहून घालतो मी. आमच्या मेसमध्ये यात बडीशेप भरडून घालतात. पण मेसच्या काकू बनवतात तशी खीर अजून जमली नाहीय.

पैसा's picture

4 Sep 2017 - 12:16 pm | पैसा

खारकेची पूड मिळते तयार. तशी घातलीस तर अजून मिळून येईल.

खारिकपुड छानच लागते.बडीशेप अंदाज येत नाहिये चविचा.पहायला हव.

इडली डोसा's picture

4 Sep 2017 - 10:38 pm | इडली डोसा

सरसरीत असते, मला वाटतंय त्यात फक्त गूळ, वेलदोडे आणि दलिया घालतात.

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 10:04 am | सविता००१

सूड म्हणतो तशी अगदी १/२ टीस्पून बडीशेप भाजून भरड करून घातली या खिरीत तर भारी लागते अजून.

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 12:16 pm | सविता००१

कमी असली बडीशेप तरीही चलते. पण चुकुनही जास्त झाली तर मात्र चवीचा बट्ट्याबोळ उडतो.मगाशी हे लिहायला विसरले.

दलिया खीर अगदी आवडती. छान पाकृ .

सानिकास्वप्निल's picture

5 Sep 2017 - 7:36 pm | सानिकास्वप्निल

दलियाचे सर्व प्रकार आवडीचे, त्यातही सांजा जास्त प्रिय.
ही खीर नुकतीच मैत्रिण गणपतीला घरी घेऊन आली तेव्हा खाल्ली.

छान पाकृ, मला पण यात ओला नारळ अधिक आवडेल.

सारिका होगाडे's picture

6 Sep 2017 - 1:09 am | सारिका होगाडे

पाककृती खूपच छान आहे. तुझ्या हातची खाल्ली त्यामुळे चव तर अजून लक्षात आहे. अप्रतिम! आणि लहान मुलांसाठी पौष्टिक पण आहे. सगळे हेल्दी पदार्थ! लगेच करून पाहिली आणि सगळ्यांना आवडली. :)

रुपी's picture

6 Sep 2017 - 1:14 am | रुपी

मस्तच दिसत आहे खीर!

पियुशा's picture

9 Sep 2017 - 6:03 am | पियुशा

लै भारी :)

जुइ's picture

12 Sep 2017 - 2:38 am | जुइ

अतिशय आवडती खीर आहे माझी. अजूनही दर दास नवमीला आवर्जून करते :-)