साबूदाण्याचे वडे

रेवती's picture
रेवती in पाककृती
1 Mar 2009 - 3:25 am

साहित्य: दोन वाट्या भिजलेला साबूदाणा, दोन वाट्या खमंग भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट,
एक टेबलस्पून शिजवलेली वरई, एक छोटा बटाटा उकडून,छोटा चमचा अख्खे जिरे, भाजून केलेली जिरेपूड अर्धा छोटा चमचा,
लाल तिखट, मीठ, चवीपुरती साखर, तळायला तेल.

कृती: भिजलेल्या साबूदाण्यात तेलाखेरीज सर्व जिन्नस घालून नीट कालवावे.
शिजलेल्या वरईच्या गुठळ्या मोडाव्यात. कालवताना हाताला तेल लावावे,पाण्याचा हात शक्यतो लावू नये.
तयार पिठाचे लाडूएवढे गोळे करावेत व तळहातांमध्ये दाबून चपटा आकार द्यावा.
आता तेल चांगले तापल्यावर आच मध्यम करून एका वेळी दोन दोन वडे तळून घ्यावेत.
नारळाच्या उपासाच्या चटणीबरोबर वाढावेत. हे वडे कुरकुरीत होतात व दोन तीन दिवस टिकतात.
लगेच संपवण्यासाठी करायचे असतील तर पाण्याच्या हाताने पीठ मळले तरी चालेल.
वडे जर मऊ आवडत असतील तर लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची वाटून, कोथिंबीर, ओला नारळ, आंबट दही / लिंबूरस वापरता येतो.

रेवती

प्रतिक्रिया

सुक्या's picture

1 Mar 2009 - 3:55 am | सुक्या

माझी आवडती पाकृ. चटणीऐवजी दह्याबरोबर खायला खुप छान लागतात.

लगेच संपवण्यासाठी करायचे असतील तर

कसेही करा . .. लगेच संपतात :-)
सही जमलीय पाकृ. धन्यु.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मराठमोळा's picture

20 Sep 2009 - 11:27 am | मराठमोळा

>>कसेही करा . .. लगेच संपतात

+१ सहमत आहे.

बाकी फोटु एकदम सही.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

लवंगी's picture

1 Mar 2009 - 4:20 am | लवंगी

पटकन उचलून तोंडात टाकावासा वाटतोय.. फोटो झकास .

चित्रा's picture

1 Mar 2009 - 4:46 am | चित्रा

असेच म्हणते. मस्त दिसतायत.

रेवती's picture

1 Mar 2009 - 8:16 am | रेवती

घराच्या इतकी जवळ राहतेस तर ये की गरम गरम वडे खायला.
(सगळ्यांना घेऊन ये गं!)

रेवती

समिधा's picture

1 Mar 2009 - 5:01 am | समिधा

लगेच करावे आणि खावे वाटले.. ;)
मी भारतात असताना एकदम बारिक शाबुदाणा मिळतो तो वड्या साठी वापरत होते.त्याने वडे जास्ती खुसखुशित होतात.
पण इथे तो शाबुदाणा मिळत नाही. :(
आता मी जिरे पुड घालुन करुन बघते.उद्या परवाच करेन ... :)

रेवती's picture

1 Mar 2009 - 8:18 am | रेवती

असंही ऐकलय की तो साबूदाणा १० ते १५ मिनिटेच भिजवावा लागतो.
ते खरय का?
रेवती

समिधा's picture

2 Mar 2009 - 4:16 am | समिधा

अग तो इनस्ट्रंट शाबुदाणा म्हणुनच मिळतो. आणि मी तो १/२ तास भिजवते.

शारंगरव's picture

1 Mar 2009 - 5:31 am | शारंगरव

वडे बघुन तोंडाला पाणी सुटले. मस्त फोटो.

शितल's picture

1 Mar 2009 - 5:56 am | शितल

रेवती,
कसले जळवणारे फोटो लावले आहेस ग. :)
पाककृती मस्तच आहे, वरई घालुन मी अजुन शाबुचे वडे केले नव्हते, पुढच्या वेळी करताना वरई घालुन करून पाहिन आणी तुला कळविणच.

रेवती's picture

1 Mar 2009 - 7:21 am | रेवती

वरईमुळे कुरकुरीतपणा येतो वड्याला.
मऊसर वडे असतात त्यात वरई नाही मिसळत आपण, पण बटाटा ज्यास्त घालायचा.

रेवती

प्राजु's picture

1 Mar 2009 - 6:36 am | प्राजु

वरई घालतात साबूदाणा वड्यात हे माहीतीच नव्हते. इथे वरई मिळते का? पटेल मध्ये पहायला हवं.
जबरदस्त फोटो आहे. मस्त रेसिपी.
लेकाला खूप आवडतात साबूदाणावडे..

आवांतर : तात्या खपलो, वारलो म्हणतात ते काही उगाच नाही. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

1 Mar 2009 - 7:18 am | रेवती

वरई मिळते भारतीय दुकानात.
चक्क "व्रत का चावल" म्हणून विकतात लेकाचे!
आज आठवण आली होती अथर्वची.
त्याचं साबूदाणा वड्याचं प्रेम अचानक उफाळून येतं ते आठवलं.

रेवती

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 7:21 am | विसोबा खेचर

रेवती,

का असं वागलीस? तात्या तुझा आणि तुझ्या नवर्‍याचा चांगला मित्र होता. काय मिळालं तुला त्याला जीवे मारून??! :)

तात्या.

रेवती's picture

1 Mar 2009 - 7:26 am | रेवती

असं का बोलता तात्या?
इकडं येणारच आहात ना, कुणाकुणाला भेटायला....
फक्त फोन करून सांगा पदार्थांची लिस्ट, सगळे तयार मिळतील.
रहायला आमच्याकडेच या.

रेवती

रामदास's picture

1 Mar 2009 - 7:52 am | रामदास

सकाळी उडदाची डाळ घातलेल्या पुर्‍या आणि बटाट्याचा रस्सा खाणार होतो .आता बेत बदलून सकाळी साबुदाणा वडे आणि दुपारी रस्सा.
आजकाल मिपावरचं मेनूकार्ड भारी होत चाललं आहे.
वरईवरून आठवलं. वरईची गोड खीर (कमळ काकडीचे दाणे घालून )अप्रतीम होते.वडे खाल्ल्यावर ती पण खावी म्हणतो.

रेवती's picture

1 Mar 2009 - 8:12 am | रेवती

वरईची गोड खीर (कमळ काकडीचे दाणे घालून )अप्रतीम होते
जर खीरीची पाकृ चढवलीत तर बरे होईल. कालच मी बघून आलीये.
आमच्या इथल्या दुकानात कमळकाकडीच्या सुकवलेल्या बीया होत्या.
मोठ्ठा प्रश्न पडला होता की हा कोणता प्रकार आहे व कश्यात वापरतात.
बघा, मनापासून प्रश्न पडल्यामुळेच आज उत्तर मिळालं (पण पाकृ नाही मिळली.)

रेवती

रामदास's picture

1 Mar 2009 - 9:06 pm | रामदास

लाहीसारखे फुलतात.त्याला मखाणे म्हणतात.अगदी हलके फुलके असतात.अंगची चव फारशी नसते पण वरीच्या तांदूळाच्या खिरीत घरच्यासारखे जाउन बसतात.
दुसरा पर्याय :मखाणे तव्यावर थोडसं तूप घालून परतावे.हलका तिखटा-मिठाचा मुलामा द्यावा.तसेच खावे.
तुम्ही दुकानात पाहीले ते फुलवलेले होते की नाही ते मला कळणार नाही.

रेवती's picture

1 Mar 2009 - 10:01 pm | रेवती

आलं लक्षात!
उत्तर भारतीय बायका कुठल्यातरी व्रताचं उद्यापन करताना "मखानोंकी खीर" ने नैवेद्य दाखवून उपास सोडतात.
मला प्रसादाची छोटी वाटी खीर मिळाली होती. लाह्यांसाखे दिसतात. मग मी जे मखाने पाहिले ते न फुलवलेले होते.
धन्यवाद!

रेवती

विंजिनेर's picture

2 Mar 2009 - 5:30 am | विंजिनेर

म्हणजे एक तर सोळा सोमवारचे उद्यापन किंवा महा-शिवरात्रीचा सोडलेला उपवास!!
ह्या खिरी बरोबर जोडीला चुरमाचुट्टीचे लड्डु पाहिजेतच!
जय नर्मदा मैय्या!!
(उपवासाची कन्सेप्टच नसती तर काय हाल झाले असते खवय्यांचे :))

रेवती, इथे साबूदाणा, वरई शिंगाड्याचे पीठ हे पदार्थ नावाला ही मिळत नाही.
पण काहीही म्हण फोटो मात्र झक्कास आहे. आता वडे तर नाही करता येणार, नेत्र सुखानेच पोट भरूया, काय करणार

शाल्मली's picture

1 Mar 2009 - 9:30 pm | शाल्मली

काय मस्त दिसताहेत साबुदाण्याचे वडे!!
माझा फार आवडता पदार्थ. :)
वरई घालण्याचे माहित नव्हते. आता पुढच्या वेळेस असे करून बघीन.
पाकृ. बद्दल धन्यवाद!

--शाल्मली.

अनमिका's picture

1 Mar 2009 - 10:37 pm | अनमिका

वा! फारच मस्त!
लगेच करुन बघते.

मृण्मयी's picture

1 Mar 2009 - 10:42 pm | मृण्मयी

ए वन दिस्ताहेत वडे! कित्ती निगुतीने केलेत! एकाच आकाराचे, एकसारख्या रंगाला तळलेले! बढीया!

वरई (भगर) मिळते अमेरिकेतल्या देशी दुकानात. 'सामो' (Samo) म्हणजे भगर. आमच्या इथल्या दुकानात लक्ष्मी छाप मिळते. चवीला खास नसते.

गणपा's picture

1 Mar 2009 - 11:34 pm | गणपा

परवाच केल्ते हो रेवती तै.
पर आमचे वडे तेलात पोहायला लागल्या वर त्यांना वात झाला, नी त्यामूळे वड्यांची पोटं तराटुन फुगली.
काहींना तर वाताचा इतका झटका आला की त्यो (वात) वड्यांची पोटं फोडुन उकळत्या तेला सकट बाहेर आला.
मग आम्ही जे काय तांडव केलय स्वयंपाक गृहात की ज्याच नाव ते.
चवीला बरे झाल्ते. पर आमचाच चेहेरा फोटुजनीक झाल्ता. तवा वड्याचे फोटु काढायचे राहुन गेले.

बाकी तुमचे वडे झक्कास दिसतायत. एकदम साचे बद्ध ,एक आकार, एक रंग ..
पुढच्या वेळी असेच करीन म्हणतो.

-गणपा.

वर्षा's picture

2 Mar 2009 - 1:07 am | वर्षा

काय टेम्प्टींग फोटो आहे!!!!
वरई म्हणजे काय?

रेवती's picture

2 Mar 2009 - 1:35 am | रेवती

वरई म्हणजे भगर किंवा वरी म्हणतात.
अमेरीकेत असशील तर मृण्मयी म्हणते त्याप्रमाणे "सामो" किंवा "व्रत का चावल" नावाने मिळेल.
अगदी छोटे कण कण असतात.... म्हणजे असायला हवेत.... इथे चांगलीच दाणेदार भगर मिळते.

रेवती

वर्षा's picture

2 Mar 2009 - 11:18 am | वर्षा

अच्छा. मला वरीचे तांदूळ (ऐकून) माहित होते.
बघते वरई इथे मिळतेय का.
धन्यवाद रेवती आणि मृण्मयी :)

टिउ's picture

2 Mar 2009 - 8:10 am | टिउ

एक नंबर...फोटु तर कैच्याकै!

साबुदाणा वडे शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत (पाकृ माहित नाही) फार अप्रतीम लागतात...आमच्या नाशकात भद्रकालीत सायंतारा हॉटेल मधे मिळतात साबुदाणा वडे आणी ती चटणी...लेकाचा कसं बनवतो विचारलं तर फॅमिली सिक्रेट आहे म्हणाला...तिथे फक्त तेवढंच मिळतं आणी सायंकाळी ऑर्डर देण्यासाठी सुध्धा कमीत कमी १० मिनीट लागतात इतकी गर्दी असते...

असो फारच विषयांतर झालं...पण फोटो बघुन त्या वड्यांची आठवण झाली म्हणुन लिहिलं... :)

अवांतरः माझी भाची (वय वर्ष ४) या वड्यांना साबुवडे म्हणते...

रेवती's picture

2 Mar 2009 - 5:12 pm | रेवती

शेंगदाण्याच्या चटणीचा सोप्पा प्रकार मला माहित असलेला:
दाण्याचं कूट, मीठ, साखर, लाल तिखट, पातळसर दही (किंवा घट्ट ताक).
सगळे पदार्थ एकत्र करून सरबरीत चटणी उपासाचे वडे, थालीपीठ याबरोबर वाढावेत.
नाशकात भद्रकालीत सायंतारा हॉटेल मधे मिळतात साबुदाणा वडे आणी ती चटणी
आपण सांगितलेली आठवण अवांतर नाही. छान वाटले वाचून.

रेवती

स्मिता श्रीपाद's picture

2 Mar 2009 - 10:43 am | स्मिता श्रीपाद

रेवती,

काय सुरेख पाकॄ आहे गं....पाणी सुटलं ना तोंडाला :-)
नक्की करुन पाहीन :-)

-स्मिता

अनुजा's picture

2 Mar 2009 - 10:48 am | अनुजा

वडे एकदम मस्तच!!! करुन पाहीन.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Mar 2009 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, दोन वडे पोस्ट कर ना मला! बनवण्याचा त्रासही वाचेल ... फोटो फाहूनच (का पाहून? ;-) ) समजतंय वडे मस्त झाले असणार ते!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

रेवती's picture

2 Mar 2009 - 6:49 pm | रेवती

तुझ्या डोळ्यांना आनंद वाटला ना?
आपलं ठरलं होत नां.....
आठवतय का?

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Mar 2009 - 6:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थातच ... मला दोन दिवस मिपावर यायलाही फार वेळ नव्हता, पण आज धागा उघडला आणि बघूनच समाधान झालं! :-)

(तू भारतात येशील तेव्हा माझ्यातर्फे पाव किलो घरचं तूप बक्षिस तुला!) ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

रेवती's picture

2 Mar 2009 - 6:54 pm | रेवती

धन्यवाद!

रेवती

रेवतीजी....

छानच वडे आहेत... आज सकाळचा नाश्ता हाच करुन दिला होता माझ्या बायकोने...
एकदम मस्त झाले होते साबुदाणेवडे :)
अशाच छान छान पाककृती देत रहा...

धन्यवाद
सागर

जागु's picture

2 Mar 2009 - 11:53 am | जागु

रेवती मलाही हे खुप आवडतात. पण मी कधी वरी नव्हती टाकली आता टाकुन बघेन.

सहज's picture

2 Mar 2009 - 6:53 pm | सहज

जबरी आहे. :-)

रेवती's picture

2 Mar 2009 - 6:58 pm | रेवती

पाककृती आवडल्याचे कळवणार्‍या खवैय्यांचे व वाचनमात्र असणार्‍यांचे आभार!

रेवती

सोनम's picture

19 Sep 2009 - 8:08 pm | सोनम

रेवती ताई तु केलेले साबुदाणा वडे पाहून मला मी केलेल्या वड्याची आठवण झाली :( :(
मी केलेल्या वड्याना तळायला टाकले आणि साबूदाणा इकडेतिकडे पळु लागला. एक ही वडा चांगला आला नाही.
:( :( तेव्हापासून मी त्या वड्याच्या आणी वडा माझ्या वाटेला गेला नाही. :) :)
बाकी तु केलेली कृती खूपच छान आहे. =D> =D>