[लेखाचे शीर्षक आपणास खटकले असल्यास लेख आपल्यासाठी नाही :) ]
कायप्पा व मि.पा. वरचे मराठी लेख /चर्चा/ प्रवासवर्णने/ कविता / पा.कृ. / प्रतिसाद वगैरे वाचताना बर्याचदा अशुद्धलेखनाचा इतका सर्रास वापर झालेला दिसतो की एखादे शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहिलेले लिखाण वाचताना चुकल्या-चुकल्या सारखे वाटू लागते.
शुद्धलेखनाच्या अभावाला कारणे बरीच असतील (उदा. लेखक शुद्धलेखनाविषयी अनभिज्ञ असणे, शुद्धलेखनाविषयी तिरस्कार असणे, ट॑कनातील बारकावे माहित नसणे, मराठी स्पेल-चेकची सुविधा उपलब्ध नसणे वगैरे...) पण तरीही असे लेखन वाचताना वाचकाचा रसभ॑ग तर होतोच पण पुढे पुढे वाचकही अशुद्धलेखनाबाबत बेफिकिर व अ-स॑वेदनशील बनत जातो.
सध्याच्या सोशल मिडियावरच्या मराठी लेखनात वारंवार अशुद्ध लिहिल्या जाणार्या शब्दा॑ची जंत्री फार मोठी आहे, पण वानगीदाखल काही नमुने देत आहे:
मि, हि, तु, हीला, तूला, खुप, दुध, चुक, ईतर, ईथले, ईतके, ईकडे, वैगरे ( मी, ही, तू, हिला, तुला, खूप, दूध, चूक, इतर, इथले, इतके, इकडे, वगैरे च्या ऐवजी)
भविष्यात लिखित मराठी भाषेचे स्वरूप व अवस्था काय असेल ते भाषाशास्त्रज्ञ कदाचित सा॑गू शकतील, पण शुद्धलेखनाबद्दल मराठी लेखक/वाचक असेच बेपर्वा राहिले तर प्रमाणित मराठी लेखन तेव्हा नामशेष झाले असण्याची शक्यता बरीच आहे.
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 1:10 pm | अप्पा जोगळेकर
आजकाल, कोशिश, चालला गेला (चला गया वरुन चालला गेला असावे बहुधा), जेवणाचे ताट लावले, लाश, दुष्मन, चाय, चाय पिली का, आलूची भाजी, औकात,वापस, वापसी, इमारतीची शिडी (पायर्या ). अजून बरेच आहेत. राष्ट्रभाषा या नावाखाली हिंदीचे थैमान आहे नुसते.
28 Aug 2017 - 1:45 pm | साहना
मराठी शिकावे का ? हा प्रश्न आ वासून राहिला असताना सुद्दलेखन शिकावे का हा मुद्धा लक्ष देण्याजोबा नाही.
28 Aug 2017 - 2:41 pm | अनन्त्_यात्री
मताशी असहमत
28 Aug 2017 - 8:37 pm | रानरेडा
मराठी तून शुध्ध लिहिण्याने काहीही फायदा होत नाही , खरेतर मराठी तून शिकल्याने पण नाही.
7 Jul 2018 - 11:33 am | नाखु
नोकरी करावी लागते,न शिकले तर थेट राज्य करता येते.
अशा गुंठा गर्दी महानगरपालिका परिसरात वास्तव्यास असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला
28 Aug 2017 - 2:41 pm | अत्रे
लेख वाचून पडलेला प्रश्न -
मराठीतल्या लहान इ आणि मोठा ई - यातला फरक नष्ट केला तर काय होईल? उदाहरणार्थ उद्या लोक मी-मि/ होईल-होइल आलटून पालटून लिहायला लागले तर भाषेचे कोणते नुकसान होईल? शेवटी शब्द हे रॅन्डमलीच तयार झालेले असतात - मग असे रँडम बदल त्यात घडले तर वाचकाचा रसभंग सोडून इतर काय नुकसान होईल? (शब्दाचे इन्फॉर्मेशन कन्टेन्ट तेवढेच राहील, मग बदलले काय?)
28 Aug 2017 - 2:58 pm | अनन्त्_यात्री
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा कायमचा सुटावा म्हणून प्रत्येकाने मराठी लिहिताना यदृच्छया इंग्लिश शब्दांचा वापर केला तरी काय फरक पडेल?
28 Aug 2017 - 3:28 pm | अत्रे
इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिणार का रोमन लिपीत त्यावर ते अवलंबून आहे. जर देवनागरीतच लिहिणार असू तर तोच प्रश्न पुन्हा उभा राहतो - ह्रस्व/दीर्घ यातला फरक नष्ट झाला तर नेमके काय नुकसान होणार ..
28 Aug 2017 - 3:37 pm | अनन्त्_यात्री
ह्रस्व /दीर्घ यांचा ससेमिरा कायमचा सुटावा म्हणून जर लिहायचे तर इंग्रजी शब्द रोमन लिपीतच लिहावे लागणार हे स्वय॑स्पष्ट आहे.
28 Aug 2017 - 6:38 pm | सूड
इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग चुकलेलं चालेल का कुठेही?
28 Aug 2017 - 3:49 pm | अप्पा जोगळेकर
मग असे रँडम बदल त्यात घडले तर वाचकाचा रसभंग सोडून इतर काय नुकसान होईल?
तुम्ही प्रत्येक गोष्ट फायदा तोटा, नफा नुकसान या परिभाषेतच मोजता का ?
28 Aug 2017 - 4:46 pm | अत्रे
नाही.
29 Aug 2017 - 11:50 am | mayu4u
ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणतात त्यांना!
तुम्हाला अत्रे ऐवजी आत्रे अशी हाक मारलेली चालेल का?
ऱ्हस्व आणि दीर्घ स्वर हे उच्चारांप्रमाणे लिहिले जातात. म्हणून दिघे हे नाव दीघे असं लिहिलं तर ते चुकीचं ठरेल.
29 Aug 2017 - 1:01 pm | अत्रे
अ आणि आ, हा फार मोठा फरक आहे आणि यात कोणाची गफलत होत नाही. इ आणि ई मधला फरक फारसा नाही असे वाटते.
उच्चार वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात, म्हणून लिखित भाषा प्रत्येकाने आपापल्या उच्चारानुसार बदलावी असे तुमचे म्हणणे आहे का?
29 Aug 2017 - 2:13 pm | mayu4u
हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणूनच प्रमाणभाषेप्रमाणे उच्चार आणि लेखन गरजेचं आहे.
29 Aug 2017 - 2:29 pm | अत्रे
हा आग्रह फक्त सरकारी कागदपत्रे आणि टीव्हीवरच्या बातम्या यांसाठी आहे की
* रोजचं बोलणं
* कविता/गाणे वाचन/लेखन
यासाठी सुद्धा आहे?
29 Aug 2017 - 7:01 pm | mayu4u
आणि इतरांनीही तसं केलेलं मला आवडतं.
अवांतर: तसं (तसे), केलेलं (केलेले), आवडतं (आवडते) ही रूपं (रूपे) प्रमाणभाषेत योग्य मानतात.
3 Sep 2017 - 2:28 am | सौन्दर्य
मला वाटतं, आलेलो, गेलेलो, खाल्लेलं हे शब्द व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर नसावेत. त्यांचे बरोबर रूप आलो होतो, गेलो होतो, खाल्ल होतं असे असावे. शाळेत आमच्या वैशंपायन गुरुजींनी "आलेलो" म्हंटल्यावर कान उपटलेले आठवतात.
28 Aug 2017 - 3:56 pm | अनिंद्य
@ अनन्त्_यात्री,
फारच दुखरा विषय आहे हो हा. अगदी मराठी माध्यमातून शिकलेली मंडळी स्वतःचे नाव लिहितांना सुद्धा ज्योति, प्रगति, आंगद असे लिहितात, फार वाईट वाटते.
शाळेत मराठीच्या निबंधात मी 'आणी' असे दोनदा लिहिले त्याबद्दल शिक्षिकेने १०० दा 'आणि' लिहायला लावले होते. आजही लिहितांना / टंकतांना काही चुकले तर वाईट वाटते. इतरांना मात्र शुद्धलेखनाची चूक (चुक नाही :-) ) काढलेली अजिबात आवडत नाही - भावना पोहचण्याशी कारण असे समर्थन केले जाते. मुंबईतील एका प्रसिद्ध सुवर्ण-पेढीची प्रसिद्धी करण्यासाठी शहरभर लावलेल्या मोठाल्या होर्डिंग्सवर 'सचोटि आणि शूध्दता' वाचून फेफरे येउन पडायची गत झाली होती, पण स्वतः मराठी भाषक असलेल्या मालकांना त्याबद्दल सांगितले तर 'त्यात काय मोठेसे - लोकांना समजते बरोबर' असे उत्तर मिळाले. :-) आता कोणाला याबद्दल काही बोलत नाही, उगाच चिडतात लोकं.
भाषा फक्त भावना पोहचवण्याचे माध्यमच असेल तर चित्रलिपी आणि मूकबधिर लोक वापरतात तशी संकेत भाषा वापरण्यात काय वाईट ?
28 Aug 2017 - 4:07 pm | अनन्त्_यात्री
>>भाषा फक्त भावना पोहचवण्याचे माध्यमच असेल तर चित्रलिपी आणि मूकबधिर लोक वापरतात तशी संकेत भाषा वापरण्यात काय वाईट ?>> हे मात्र पटल॑.
माझे एक निरीक्षण असे आहे की मराठी शुद्धलेखनाबद्दल बेफिकीर असणारे अनेक लोक इ॑ग्लिश स्पेलि॑ग बिनचूक असावे याबाबत आग्रही असतात.
31 Aug 2017 - 9:54 pm | पैसा
मी माझे नाव आवर्जून ज्योति असेच लिहिते ते व्याकरणाच्या जुन्या नियमाप्रमाणे. संस्कृतमधले तत्सम शब्द तसेच लिहायचे असा तो नियम होता. मला संस्कृत येते त्यामुळे मराठीचे सोयीने बदललेले नियम मी अजूनही आत्मसात करू शकले नाही.
4 Sep 2017 - 2:26 pm | अनिंद्य
@ पैसा,
संस्कृतमधले तत्सम शब्द....
हिंदी, मराठी आणि संस्कृत तीनही भाषा परीक्षेला असल्यामुळे मला तर तिहेरी गोंधळ सोसावा लागलाय. म्हणजे ज्योती हे नाव मराठीत ज्योती, हिंदीत (संस्कृतोत्भव शब्द असल्यामुळे) ज्योति आणि परत संस्कृत मध्ये ज्योति :-)
आताही नागरी हिंदीत राजनीति, प्रगति हेच बरोबर आहे. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह बोलतानाही हे उच्चार अगदी आग्रहाने पण विनासायास ह्रस्व करायचे हे ऐकले / बघितले आहे.
जुन्या मराठीच्या नियमाप्रमाणे म्हणजे - 'का बरे ?' हे 'कां बरें' असे असते ना ?
4 Sep 2017 - 5:35 pm | पैसा
ते आणखी जुने झाले. आपण शिकायला सुरुवात केली त्यापूर्वीच अनुच्चारित अनुस्वार काढून टाकले होते. त्यामुळे त्यांच्याशी कधी संबंध आला नाही. दुसरे असे की विशेषनामे, म्हणजे आपली सरकार दरबारी नोंदलेली नावे आता बदलता येणार नाहीत.
मात्र नवे नियम मला तोंडपाठ नसले तरी जेव्हा मिपावर शुद्धिचिकित्सा करणारे सुधांशु नूलकर दिवाळी अंकात वगैरे एखाद्या शब्दात बदल सांगतात तेव्हा तो आम्ही कोणतीही शंका न काढता स्वीकारतो. कारण या कामाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांना याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना वेळ असता आणि या धाग्यावर त्यांनी काही लिहिले असते तर ते छान झाले असते.
6 Sep 2017 - 10:51 am | अनिंद्य
@ पैसा,
माहितीबद्दल आभार.
सुधांशु नूलकर यांचे मत वाचायला आवडेल, विशेषतः विशेषनामे मराठीत लिहितांना घ्यायच्या काळजीबद्दल.
28 Aug 2017 - 4:20 pm | कंजूस
उच्चारांतूनही बोध होतो ह्रस्व दिर्घाचा. शिवाय मराठी नंतर शिकलेल्या दिसय्रा भाषिकांना ओळखता येतं. उदा०
गोष्ट(अ)। गोष्ट्
कानडीत ए आणि ओ हेसुद्धा ह्रस्व-दीर्घ आहेत.
28 Aug 2017 - 4:47 pm | अप्पा जोगळेकर
अशुद्ध लेखनाने भाषेचे सौंदर्य ढासळते. अशुद्ध लिहून तसे लिहिण्याचे समर्थन करणे आणि मुद्दामहून फाटकेतुटके, गबाळे कपडे वापरणे हे सारखेच आहे.
28 Aug 2017 - 4:54 pm | अनिंद्य
मनातलं बोललात अप्पा जोगळेकर !
28 Aug 2017 - 5:00 pm | सस्नेह
अशुद्ध लेखन वाचताना अस्सल मराठी वाचकाला दाताखाली खडे आल्यासारखे वाटल्याशिवाय राहवणार नाही !
29 Aug 2017 - 12:07 am | ज्योति अळवणी
अगदी खरं स्नेहांकिता.
मी मिपाकर व्हायच्या वेळी अगदी नवखी होते मराठी typing मध्ये. त्यामुळे नाव चुकलं माझं. त्याच दुःख अजूनही आहे.
खरच अशुद्ध लेखन वाचताना खूप त्रास होतो
29 Aug 2017 - 12:18 am | एस
तुम्ही नीलकांत किंवा प्रशांत यांना व्यनि करून तुमचा आयडी दुरुस्त करून घेऊ शकता.
28 Aug 2017 - 6:35 pm | कंजूस
संपादन करता येत असेल तर जुने लेख पुन्हा शुद्ध करता येतील.
28 Aug 2017 - 6:48 pm | धर्मराजमुटके
मिपाच्या एक्स मालकांना मनोगतचा की अजुन कोणत्यातरी मराठी संकेतस्थलाचा शुद्धलेखनाचा आग्रह मानवला नाही म्हणून ते तिथून चपला घालून बाहेर पडले आणि मिपा चालू केले.
मिसळपाववरदेखील सुरुवातीला शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्यांना 'चपला घाला' असा संदेश मिळालेला मी या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यामुळे या संकेतस्थळावर तरी असला धागा अस्थानी आहे असे वाटते.
प्रतिसाद चुकीचा वाटल्यास सगळ्यांची आगावू क्षमा मागतो. वाटल्यास संपादक प्रतिसाद उडवू शकतील.
29 Aug 2017 - 10:23 am | अप्पा जोगळेकर
अहो, त्यांना स्वतःलाच चपला घालून बाहेर पदावे लागले. आता पुष्कळ वर्षे झाली. असो.
29 Aug 2017 - 10:23 am | अप्पा जोगळेकर
*पडावे लागले.
29 Aug 2017 - 12:09 am | दशानन
मी काय करावे?
ना मला मराठी शुद्ध लिहता येते, ना कन्नड, ना गुजराथी, ना हरयाणवी, ना तेलगू, ना इंग्लिश.. :(
29 Aug 2017 - 1:24 pm | सुबोध खरे
मग सुधारा कि अजून.
वस्त्र( किंवा कोणतीही नवीन वस्तू) विकत घेताना त्यावर डाग असेल तर विकत घेता का?
सेकंड्स चा माल स्वस्त का असतो?
तूप घेताना भेसळ चालते का?
मध शुध्द असाव हा आग्रह असतो ना?
जिलबी सुद्धा शुद्ध तुपातली हवी असते त्यासाठी दुप्पट किंमत देतो च ना( डालडातील जिलबीपेक्षा)
औषध कमअस्सल चालते का?
मग भाषा अशुद्ध असण्याबद्दल दुराग्रह कशासाठी?
29 Aug 2017 - 4:11 am | थिटे मास्तर
हे अनंत यात्री असे हवे का ?
29 Aug 2017 - 10:26 am | अप्पा जोगळेकर
'विशेष नाम' शुद्धलेखनाच्या नियमांच्या कक्षेबाहेर असते बहुतेक. नक्की माहिती नाही.
29 Aug 2017 - 11:54 am | mayu4u
... हे बरोबर.
मात्र, जर ते नाव एखाद्या मराठी शब्दावर बेतलं असेल, तर त्याला शुद्धलेखनाचे नियम लागू केले पाहिजेत. उदा. दिपिका/दिपीका चूक, दीपिका बरोबर.
29 Aug 2017 - 1:18 pm | अत्रे
का?
29 Aug 2017 - 2:14 pm | mayu4u
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
29 Aug 2017 - 2:26 pm | अत्रे
नाही मिळालं. म्हणजे विशेष नामांसाठी शुद्धलेखनाचे नियम का असावेत, हे नाही कळालं.
29 Aug 2017 - 5:11 pm | mayu4u
स्वत:स शिणवू नका... प्रकृतीस जपा.
29 Aug 2017 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी शुद्धलेखन काळाची गरज आहे. मराठी लेखनात शुद्ध शब्द आणि शुद्ध लेखनाची गरज आहे, नसता एक दिवस प्रमाण लेखन काय असतं, त्याचं स्वरुप कसं होतं. अशा प्रकारचे लेखन मराठी भाषेच्या इतिहासात वाचावे लागेल. प्रमाण भाषा व बोली यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास मराठी संकेतस्थळावर आवश्यक आहे. सर्वच लेखन करणारे एकसारखी भाषा लिहित नाही. भाषा बोलत नाही, तरीसुद्धा भाषाव्यवहाराच्या दृष्टीने स्थानिक भेद, प्रादेशिक भेद, हे सोडून सर्वांना समजेल अशी भाषा आणि लेखन आवश्यक आहे. '' एका विस्तृत प्रदेशात बोलली जाणारी, अनेक बोली-भेदांना व स्थानिक-भेदांना समाविष्ट करुन घेणारी, राजकारण, समाजकारण, संस्कृती व शिक्षण या क्षेत्रांमधे वापरली जाणारी आणि समाजाकडून लेखनव्यवहारासाठी स्वीकारली गेलेली भाषा म्हणजे प्रमाणभाषा म्हणता येईल'' अशा प्रमाण भाषेचा वापर मराठी संकेतस्थळावर आवश्यक आहे, आणि सदस्यांना तसे लेखन करणे बंधनकारक करावे.
वाट्सपवरचं लेखन वाचायचा कंटाळा येतो. वाईट वाटतं. कला शाखेच्या विद्यार्थ्यांचेही मराठी लेखन प्रचंड अशुद्ध असतं.
विद्यार्थ्यांची संख्या मराठी अवघड आहे या कारणामुळे रोडावली आहे. मराठी लेखनासाठी अशा कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. पहिलीपासून ते पदवीपर्यंत मराठी लेखन गिरवण्याचे प्रशिक्षण आणि बक्षीस योजना जाहिरी केल्या पाहिजेत. एवढे बोलून प्रमाण भाषेबद्दलचे दोन शब्द संपवतो.
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मराठी भाषेचा शिक्षक- अभ्यासक )
मराठी लेखनात शुद्ध अशुद्ध असे काही नसते. मराठी भाषेचे मारेकरी जर आपणास व्हायचे नसेल तर अशा प्रकारची कोणतीही सक्ती करु नये. भाषेचं वैशिष्ट्य हे आहे की विचारांचे आदान प्रदान करणे. आज जगभरात सर्वत्रच निरनिराळे बोली बोलणारे लोक आपापले अनुभव सांगण्यासाठी सिद्ध व उत्सुक असल्याचे दिसून येते. लिहिण्याचा कोणताही अनुभव नसतांना अनेक लोकांनी असे प्रयत्न करुन उत्तम लेखन केल्याचे आपणास दिसून येते. र्हस्व, दीर्घ, उकार, काना मात्रा वेलांट्या यांच्या हट्टामुळे शब्दांचा अर्थ बदलतो असे असले तरी वाक्यानुसार त्या शब्दांचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. भाषेचा शुद्ध अशुद्ध ही एक समजूत आहे या लिपिबद्ध भाषेचा स्वीकार करावा असा आग्रह धरला जातो मला वाटतं तो चूक आहे. वास्तविक समाजाच्या दैनंदिन भाषा व्यवहारात बोलींचाच प्रत्यक्ष वापरत होतांना दिसतो. पुस्तकांसाठी अशी प्रमाण भाषा एकवेळ समजून घेतली तरी शासकीय पत्रव्यवहारातील भाषा समजून घेणे अवघड होत चालली आहे. सारांश शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पना नेहमीच प्रमाणभाषेला केंद्रस्थानी ठेवून मांडल्या जातात हेच मुळात चूक आहे, असे माझे मत आहे. एवढे बोलून इथे थांबतो.
अवांतर एक आठवण : मराठी संकेतस्थळावर मला सुरुवातीला लेखन करताच येत नव्हतं, त्याकाळी सालं माझ्या जाल दोस्त लोकांनी लै बदनामी केली होती. साले, सर्कीट, संजोपराव, आजानुकर्ण, आणि अजून काही लोकांना मी कध्धी, म्हणजे कध्धी माफ करणार नाही. ;)
शुद्धलेखन नियम काय बदल केले पाहिजेत, माझा एक अभ्यासपूर्ण धागा. माझा हा धागा वर कायम ठेवा राव....! :)
-दिलीप बिरुटे
(मिपाकर)
29 Aug 2017 - 2:29 pm | अनिंद्य
@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
सरकारी मराठी ! ते एक वेगळेच किचकट प्रकरण आहे :-)
- उपरोल्लेखित अभिप्रायास अधोहस्ताक्षरित व्यक्ती त्याच्या वालीवारसासह जबाबदार :-)
29 Aug 2017 - 5:09 pm | mayu4u
आपल्या, ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या, मराठीशी काही संबंध नसावा... ती नेहरूंनी सुचवलेल्या हिंदुस्तानी भाषेची बहीण वाटते!
3 Sep 2017 - 6:27 pm | अनिंद्य
@mayu4u,
हिंदुस्तानी भाषेची बहीण ?
माझ्या मते तर सरकारी मराठी म्हणजे वाघिणीच्या दुधाचे खरवस :-)
4 Sep 2017 - 4:59 pm | mayu4u
खिक्क!
4 Sep 2017 - 9:16 pm | Nitin Palkar
सर्वोत्तम प्रतिसाद.
6 Sep 2017 - 10:45 am | अनिंद्य
:-)
29 Aug 2017 - 5:00 pm | कुमार१
लेखनात प्रमाणभाषा पाहिजेच. एका चर्चेत एक बँक अधिकारी म्हणाले, "20 या अंकाला बोलीभाषेत वीस किंवा इस असे दोन्ही उच्चार आहेत. पण तो अंक चेकवर लिहिताना वीस असाच लिहावा. इस लिहिलेला चेक बँक वटवणार नाही"
1 Sep 2017 - 4:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे "इस" लिहिलेला चेक कदाचित बँकेत वटणार नाही, पण "विस" असे लिहिलेला चेकही बँकेत वटणार नाही का?
पैजारबुवा,
1 Sep 2017 - 5:51 pm | कुमार१
ते शाखा व्यवस्थापकावर अवलंबून आहे !!
4 Sep 2017 - 3:31 pm | सस्नेह
शाखा व्यवस्थापकाचे मराठी कितपत कच्चे आहे, त्यावर !
31 Aug 2017 - 8:21 pm | मित्रहो
लेखनात प्रमाण भाषा हवी पण ती नाही म्हणून लिहूच नये यासारखी घोडचूक नाही. जसे अति अशुद्ध घातक तसेच अति शुद्धतेचा आग्रह देखील घातकच आहे.
31 Aug 2017 - 8:50 pm | अभिदेश
लेखनाबद्दल काय म्हणणे आहे आपले ? तिथे तुम्ही तुम्हाला हवे ते स्पेलिंग लिहिता की प्रमाण भाषेचे ?
2 Sep 2017 - 11:57 am | उपयोजक
बरेच जण मराठीतून टाईप करताना हम्म असा शब्द वापरतात.वास्तविक हे इंग्लिशमधल्या Hmm चं मराठी रुपांतर आहे.
हं = हो
हम्म = हतबलता
उदा :
अहो ऐकलं का ?
हं
पाच मिनिटांनी
अहो ऐकलं का ?
हं
10 मिनिटांनी परत
मी म्हणत्ये ऐकलं का ?
वर्तमान पत्र ठेवत
हम्म
बोल काय म्हणालीस ?
ही हतबलता ज्या उच्चारातून व्यक्त होते तो लिखित स्वरुपात हम्म लिहिणे चुकीचे नाही का?
ही हतबलता अक्षरातून व्यक्त करण्यासाठी हम्म पेक्षा इतर काहीतरी शोधायला हवं!
ह्मं कसं वाटतं? (आता लगेच म्हशीची आठवण होईल काहीजणांना!)
तुम्हाला काय वाटतं? वापरुया हा नवीन शब्द??
2 Sep 2017 - 3:09 pm | mayu4u
आम्ही त्यावर हम्म करू. हाकानाका!
2 Sep 2017 - 12:39 pm | कुमार१
केअशु, सहमत
2 Sep 2017 - 3:41 pm | स्पा
वाॅट्स अप वर त्र हा शब्द बिनधास्त ञ असा लिहितात , जाम डोके आऊट होते वाचुन
2 Sep 2017 - 3:42 pm | स्पा
ञ हे अक्षर*
4 Sep 2017 - 5:37 pm | पैसा
अगदी अगदी!
15 Sep 2017 - 1:22 pm | पुंबा
ञ या अक्षराचा नक्की उच्चार कसा आहे?
15 Sep 2017 - 1:50 pm | पैसा
य ला जवळच पण सानुनासिक
2 Sep 2017 - 4:26 pm | मराठी कथालेखक
मराठी भाषेच्या शुद्धतेविषयी जागरुक मंडळी पाहून आनंद वाटला.
अर्धशिक्षित लोक व्याकरण , शुध्दलेखनाला महत्व देत नसल्याने लेखनात अशुद्धता निर्माण होत रहाते (जसे रंगकाम करणारे, पाट्या बनविणारे ई) तर अनेक सुशिक्षित लोक मराठीला कमी लेखून केवळ इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्यातच धन्यता मानत असल्याने असे होते.
आपल्या परीने जमेल तितके शुध्द लिहण्याचा प्रयत्न करावा , त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागला तरी चालेल. अर्थात शुद्ध लिहिता येत नाही म्हणून लिहण्याची इच्छा मारु नये. लिहित रहावे. मराठी वाचत रहावे (रोजचे वृत्तपत्र, पुस्तके). मराठीतून लिहिण्याला प्रोत्साहन देत रहावे (घरातील वाणसामानाची यादी, आपल्या गृहनिर्माण संस्थेत प्रसारित होणार्या सूचना, शक्य झाल्यास व्यक्तिगत स्वरुपाचे व्हॉटस अप वा लघूसंदेश). व्याकरणातील चुका टाळण्याचा आग्रह असावा पण त्या आग्रहाचा अतिरेक नको. (माझ्या या चार-सहा वाक्यांतही काही चुका असतीलच !!)
3 Sep 2017 - 2:43 am | सौन्दर्य
मला 'व्हॉटस अप'वर मराठीत आलेल्या संदेशात काही व्याकरणाची चूक आढळली तर मी ती चूक सुधारून संदेश पुन्हा लिहून पुढे पाठवतो. जवळच्या मित्र मंडळीनी अथवा नातेवाइकांनी चुकीचे मराठी वापरले तर शक्य असेल तेथे सुधारणा सुचवतो. सतत चुकीचे शब्द वाचून आपणाला तेच बरोबर वाटू लागतात किंवा कधी कधी बरोबर कोणते चूक कोणते ह्यात गोंधळ उडतो. तसे होऊ नये व (शक्यतो) शुद्ध मराठी लिखित स्वरूपात लोकांना वाचायला मिळावी हा त्या मागचा उद्देश आहे. माझा मुलगा, बोलायला माझी पोस्टिंग गुजरातला असताना शिकला. शाळेत देखील गुजराती व इंग्लिश भाषा शिकवली जायची, तरी देखील तो अतिशय उत्तम मराठी बोलतो. तो बोलायला लागल्यापासून, त्याने कधीही चुकीचे शब्द उच्चारले तर मी ते लगेच सुधारित असे. (आत्ता हा 'सुधारित' शब्द बरोबर लिहिला की नाही ह्या संभ्रमात मी पडलो आहे, डिक्शनरीमध्ये देखील त्याचे उत्तर सापडले नाही)
चांगली स्वच्छ मराठी ऐकायला पण छान वाटते.
3 Sep 2017 - 4:45 pm | मराठी कथालेखक
सहमत..
पण आसपासची परिस्थिती बघा काय आहे.. कित्येक पालक मुलांशी आवर्जून इंग्लिश बोलताना दिसतात, या पालकांना स्वतःला जरी बर्यापैकी चांगलं मराठी बोलता येत असलं तरी ते मुलांशी मुद्दाम अनेक शब्द इंग्लिशच बोलतात. आपण मुलाला खूप सारे इंग्लिश शब्द शिकवले नाहीत तर आपलं मुल जगात मागे राहील अशी भिती त्यांना वाटत असते की काय ...?
आतापर्यंत मी 'कसं बोलणार उगाच कुणाच्या मध्ये' या माझ्या स्वभावानुसार कधी कुणाला काही बोललो नाही..पण आता विचार करतोय की जवळच्या मित्रांना तरी ऐकवेन की "अरे बाबा तुझं मुल पुढे चांगलं इंग्लिश शिकेल पण मराठी बोलण्याचे संस्कार त्याला फक्त घरीच मिळतील, तेव्हा तू त्याच्याशी मराठीत बोल"
3 Sep 2017 - 5:57 pm | अनिंद्य
@ सौन्दर्य,
मला 'व्हॉटस अप'वर मराठीत आलेल्या संदेशात काही व्याकरणाची चूक आढळली तर मी ती चूक सुधारून संदेश पुन्हा लिहून पुढे पाठवतो.
- हे नेहेमी करतो :-) विशेषतः आर्शिवाद मागितले कोणी तर हट्टाने आशीर्वादच देतो :-)
3 Sep 2017 - 4:37 pm | मराठी कथालेखक
वर कुणीतरी म्हंटले आहे की इंग्लिशमध्ये चुका होणार नाहीत याबद्दल लोक दक्ष असतात वगैरे असे काहीसे.
पण तसं नाहीये... इंग्लिशमध्ये लिहिताना स्पेलचेक मुळे स्पेलिंगच्या चुका टाळल्या गेल्यात तरी बरेचदा समान उच्चार , पण वेगळे स्पेलिंग आणि अर्थ असलेले शब्द अगदी बिनधास्त घुसडलेले अनेकदा आढळतात उदा there /their , son/sun वगैरे. बाकी त्या apostrophe चा हैदोस बघून हसावे की रडावे ते कळत नाही. your आणि you're चा पण घोळ केला जातो अनेकदा.
3 Sep 2017 - 6:11 pm | अनिंद्य
@ मराठी कथालेखक,
your आणि you're चा पण घोळ केला जातो अनेकदा..... खरं तर अनेकदा.
हे वाचा: :-)
ती : Your such an idiot
मी: You’re
ती : God, your so annoying!
मी: You’re
ती : Stop doing that. Your making me very angry
मी: You’re
ती : Stop it, else I’am going to slap you’re face!
मी: Your* face :-)
3 Sep 2017 - 7:40 pm | मराठी कथालेखक
:)
आमच्या कंपनीत कॅन्टीनला लागून असलेल्या वॉश बेसिन एरियात "Do not wash tiffin's " अशी पाटी वाचून करमणूक होते. "टिफीनची धुवू नका" असं काही म्हणायचं आहे का लिहिणार्याला :)
4 Sep 2017 - 2:47 pm | कुमार१
एका स्वच्छता गुहाच्या 2 विभागावर Ladies & Gantes असे लिहिले होते!
4 Sep 2017 - 4:52 pm | शरद
मी उपक्रमवर लिहावयास सुरवात केली तेव्हा शाळा सोडून पन्नास वर्षे लोटली होती. शुद्धलेखन हा मोठा अडथळाच होता. त्या वेळी मला " शुद्धलेखन ठेवा खिशात " हे पुस्तक हाती लागले. श्री.अरुण फडके यांच्या ११००० शब्दांच्या ह्या कोशात व्याकरण वगैरे न देता फक्त शुद्ध शब्द दिले आहेत. जे नेहमी व्यवहारात चुकीचे लिहले जाते तेथे बरोबर/चुकीचे दोन्ही देऊन त्या प्रमाणे खुणाही दाखविल्या आहेत. एक ते शंभर आकडे कसे लिहावेत हेही दिले आहे. त्याच बरोबर मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले १४ नियमही दिले आहेत. खिशात मावेल एवढ्या आकाराच्या ह्या पुस्तकाने माझ्यावर अनंत उपकार केले. हे पुस्तक कायमचे संगणकाच्या टेबलावरच असते. बराहवरून लिहलेले लेखन वर्डपॅडवर घेऊन तेथे तपासतो. मला असे वाटते की मी किमान ९५% चुका दुरुस्त करतो. काही रहात असणारच. जर सुदैवाने आमच्या सौभाग्यवतींनी लेख वाचला तर त्यांच्या पन्नास वर्षांच्या ’नवर्याच्या चुका काढण्याच्या अनुभवाने " उरलेल्या चुका त्यांच्या लक्षात झटकन येतात. ते असो. घरोघरी मातीच्या चुली
अंकुर प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाची (त्या वेळची) किंमत रु. ३०. माझा सल्ला हे पुस्तक आपण लिहतांना अवष्य जवळ ठेवावे.
शरद
6 Sep 2017 - 11:20 am | अनिंद्य
@ शरद,
शुद्धलेखन ठेवा खिशात / खिशात मावेल एवढ्या आकाराच्या ह्या पुस्तकाने ......
अश्या सरळ सोप्या उपायांची गरज आहे.
पूर्वी लोक नवसपूर्तीनिमित्त रामरक्षा, मनाचे श्लोक, हनुमान चालीसा वगैरे छोटी-छोटी पुस्तके वाटायचे. तसेच ह्याबाबतीत करावे आणि अशी पुस्तके वाटावीत :-)
असे e -book असेल तर फारच छान. सुटसुटीत होईल, जास्त वापरले जाईल.
4 Sep 2017 - 5:26 pm | ओरायन
क्षमस्व !
प्रथमच मिपा मध्ये लिहीत असल्याकारणाने चुकून रिकामी ओळ आली.
मला स्वतः ला शुद्ध मराठी टंकता येत नाही , तरी शुद्ध , दोषविरहित मराठी नेहमीच मनाला भुरळ पाडते.
जरी जगाच्या, व्यवहारिक दृष्टिकोनातून , आंग्ल भाषेला महत्व असेल , तरी जे , चांगले मराठी बोलतात, लिहतात, वा तसा आग्रह धरतात त्यांचा मला नेहमी हेवा वाटतो.
4 Sep 2017 - 5:32 pm | मराठी कथालेखक
काय म्हणता ? हे तर सगळं शुद्धच लिहिलेलं दिसतंय की.
4 Sep 2017 - 6:02 pm | ओरायन
@ मराठी कथालेखक ,
अहो, इथे केवळ ४ ओळी खरडल्या आहेत.यातून जरी चूक सापडली नाही तरी , त्यावरून अनुमान काढणे अवघड आहे.
जेंव्हा जसे विस्ताराने लिहीन, तेंव्हा मात्र मी काही खात्री देऊ शकत नाही.
15 Sep 2017 - 1:36 pm | गामा पैलवान
सौरा,
यासाठी स्वत:च एक प्रयोग करून पाहता येतो.
क ख ग घ ङ या क्रमाने उच्चार करतांना घशातून आवाज येतो. जिभेचा मागील भाग घशास टेकलेला असतो.
आता हाच क्रम च छ ज झ यांचा उच्चार करतांना ठेवा. क ते ङ चा जसा प्रवास आहे अगदी तसाच प्रवास च ते ञ चा आहे. मात्र जिभेचा टाळूस स्पर्श झाला पाहिजे. बघा ञ चा उच्चार आपोआप उमटेल.
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 2:04 pm | पुंबा
अरे वा!!
धन्यवाद पैसा ताई आणि गापै..
15 Sep 2017 - 3:11 pm | आवडाबाई
आयुष्यात प्रथमच ङ आणि ञ यांच्या उच्चारातला फरक कळला !! भारी वाटलं
धन्यवाद दशानन
बाकी, शुद्धलेखनाला फाट्यावर मारलेल्या लिखाणापेक्षा शुद्ध लिखाण जास्त फ्री-फ्लोईंग वाटते. (पण मराठी शब्द पटकन सुचत नाहीत)
15 Sep 2017 - 5:26 pm | गामा पैलवान
आवडाबाई,
फ्री-फ्लोईंग = प्रवाही , ओघवतं
फ्री म्हणजे फुकट खरं, पण 'फुकट प्रवाही' म्हणू नका! ;-)
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 5:37 pm | गामा पैलवान
सौरा आणि आवडाबाई,
क ते म यांना वर्गीय व्यंजनं म्हणतात.
क ख ग घ ङ ==> कंठ्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा घशाजवळचा भाग वर चिकटतो.
च छ ज झ ञ ==> तालव्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा टाळूजवळचा भाग वर टाळूला चिकटतो.
ट ठ ड ढ ण ==> मूर्धन्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा मूर्ध्नीजवळचा भाग मूर्ध्नीस चिकटतो.
त थ द ध न ==> दंत्य वर्गीय व्यंजने, कारण जिभेचा दातांना स्पर्श होतो.
प फ ब भ म ==> औष्ठ्य वर्गीय व्यंजने, कारण केवळ ओठांनी उच्चारायची असतात.
प्रत्येक वर्गातल्या पहिल्यापासून पाचव्यापर्यंतच्या जिभेची हालचाल एक सारखीच होते. पण जिभेचा स्पर्श वेगवेगळ्या ठिकाणी होतो. म्हणून यांना वर्गीय व्यंजने म्हणतात.
उरलेली सगळी व्यंजने इतर व/वा मिश्र स्वरूपाची आहेत. उदा. : व हे दंतौष्ठ्य आहे, अस श ष हे सीत्कारी आहेत.
एकंदरीत ज्याने कोणी ही वर्णमाला शोधून काढली आहे, त्याला मानवी मुखाचं सखोल ज्ञान आहे. हे उच्चार जणू मानवी डीएनेत वसलेले आहेत. सांगायचा मुद्दा काये की हे ज्ञान जर राखायचं असेल तर शुद्धलेखनास पर्याय नाही.
आ.न.,
-गा.पै.
15 Sep 2017 - 5:54 pm | पुंबा
गापै, माहितीपूर्ण प्रतिसादासाठी पुन्हा एकदा आभार.
मागच्या बाकावरून आणखी एक शंका: लृ असे आणखी एक अक्षर आहे ना? त्याचा उच्चार कसा?
15 Sep 2017 - 7:48 pm | गामा पैलवान
मलाही माहिती नाही! :-( लृ आणि लॄ असे दोन स्वर की काहीतरी आहेत. पिशी अबोली यांना माहित असावं.
-गा.पै.
8 Jul 2018 - 10:57 pm | रविकिरण फडके
Learning is not mandatory. Neither is survival.
(Kindly excuse me; transliteration continues to not work.)