गौरीचा नैवेद्य: गवसणीच्या पोळ्या आणि शेवयांची खीर
माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
साहित्य:
एक वाटी तांदूळ पिठी,
दीड वाटी पाणी,
एक चमचा लोणी,
मीठ.
पारीसाठी:
नेहमी पोळ्याना भिजवतो तशी कणिक
.
.
कृती:
पाणी उकळत ठेवा. त्यात चवीला मीठ आणि लोणी घाला. उकळी येऊ द्या.
उकळी आली की तांदूळ पिठी मिसळा. मोदकासारखी उकड काढून घ्या.
थोडी गार झाली की छान मळून घ्या.
तेल, मीठ घालून नेहमीप्रमाणे दीड वाटी कणिक मळून ठेवा.
उकड गार झाली की कणकेच्या गोळीएव्हढीच उकडीचीही गोळी घ्या.
पुरणपोळीसारखी कणकेत भरून घ्या.
तयार उंडा कणकेवर लाटा.
आणि नेहमीच्या पोळीसारखीच भाजा.
.
.
मऊ लुसलुशीत पोळी तयार आहे. ही पोळी शेवयांच्या खिरीबरोबर खा.
फार काही वेगळी रेसिपी नाहीय पण एक पारंपरिक प्रकार म्हणून मुद्दाम देतेय.
.
.
प्रतिक्रिया
30 Aug 2017 - 9:49 am | नूतन सावंत
गावसणीची पोळी आमरसासोबत खालीय,कोकणी सुगरणीचं आणखी एक कौशल्य.
30 Aug 2017 - 6:45 pm | सविता००१
मी पण आमरसाबरोबरच खाल्ली आहे ही पोळी. अतिशय मौ, तलम होते.
मागे दुर्गा भागवतांनी या पोळीचा उल्लेख केला होता एका मुलाखतीत.
30 Aug 2017 - 10:07 am | सूड
सुंदर!!
30 Aug 2017 - 12:59 pm | स्वाती दिनेश
छान दिसतेय खीर आणि पोळी.
आमच्याकडे गौरींना घावन घाटलं असतं.
स्वाती
30 Aug 2017 - 11:34 pm | अनन्न्या
एक वर्ष या पोळ्या, आणि एक वर्ष घावन घाटलं! माझ्या सासरी वडे, घारगे असतात.
30 Aug 2017 - 2:56 pm | पैसा
अशाच साध्या आणि पारंपरिक कृती भरपूर येऊ देत!
30 Aug 2017 - 3:31 pm | इशा१२३
वा! मी तर पहिल्यांदाच ऐकतेय या पोळ्या.
30 Aug 2017 - 5:26 pm | रेवती
मस्त प्रकार आहे. करून पाहणार. आज आमच्याकडे खीर पुरी नैवेद्याला असते पण ही पाकृ पाहून असे वाटतेय की कोकणातल्या पूर्वजांनी खिरीबरोबर गवसणीच्या पोळ्याच केल्या असाव्यात. आमच्यापर्यंत येतायेता शहरी व्हर्जन म्हणून पुर्या करत असावेत.
30 Aug 2017 - 8:04 pm | अनन्न्या
तसही किती प्रकार आहेत प्रत्येक सणाचे, ते यायला हवेत सगळ्यांसमोर!
31 Aug 2017 - 2:20 am | पिलीयन रायडर
वेगळाच प्रकार आहे अगदी हा तर. तुझ्याकडे नेहमीच वेगळ्या पाकृ असतात.
त्या फोटोत तुझा उकडीचा गोळा कसा प्लेन दिसतोय, चिरा नाहीत की काही नाही. तशी कशी होते उकड तुमची?
31 Aug 2017 - 12:11 pm | अनन्न्या
तशीच करून छान मळून घ्यायची.
31 Aug 2017 - 2:46 am | विशाखा राऊत
वेगळाच प्रकार
31 Aug 2017 - 4:31 pm | सानिकास्वप्निल
आमच्याकडेही घावन-घाटले असते नैवेद्याला.
गवसणीच्या पोळ्यांबद्दल ऐकून आहे पण कधी पदार्थ चाखला नाही. आता नक्की बनवुन बघणार मी.
शेवयांची खीर, आमरस दोन्ही आवडते प्रकार त्यामुळे या पोळ्या आता लवकरचं बनवून बघणार :)
31 Aug 2017 - 5:47 pm | अनन्न्या
अगदी मऊ लुसलुशीत होतात!
31 Aug 2017 - 6:32 pm | अजया
लावा कामाला दुष्ट सुगरणींनो. यावेळी सर्वच पदार्थ सोपे आलेत.करुन बघावे वाटणारे.
1 Sep 2017 - 8:21 am | प्राची अश्विनी
पहिल्यांदाच ऐकले. उकड ऊरली आहेच. करून बघते.
1 Sep 2017 - 4:04 pm | पूर्वाविवेक
मस्त प्रकार आहे.