राजमाची - सोलो!!

रणभोर's picture
रणभोर in भटकंती
30 Aug 2017 - 9:45 pm

माझ्या डायरी मधली काही खास पानं...

१९ सप्टेंबर २०१३
गुरूवार

काल होती अनंत चतुर्दशी.. १० दिवस गणपती भूतलावर येऊन गेले. ती विसर्जन मिरवणूक दर वर्षी बघायला जायच हे बहूतेक ठरूनच गेलेल असत. सकाळी लवकरात लवकर जाऊन शगुन किंवा कुंटे चौकात जाऊन वाट पहात ऊभ रहायच. पण या वेळेला माझा काही वेगळा प्लँन ठरलेला. पण मध्ये असा काही झालं त्यामुळे तो प्लँन फिसकटला

नुकतच मी गो.नी. दांडेकरांच 'स्मरणगाथा' वाचून संपवलं. ज्या धैर्याने १३ व्या वर्षी घरातून पळून गेले. आणि जाणीवपूर्वक स्वतः च आयुष्य घडवत गेले, ते स्मरणात होतं. सेम विवेकानंद, रामदास.. मला पण त्याच प्रमाणे देश पहायची ईच्छा झाली होती. आणि आमच्या धर्माधिकारी सरांचं 'भिर भिर भ्रमंती' ते पण आठवत होत. त्यामुळे मी एकट्यानी राजमाची ला जायचं ठरवलेलं. उपचार म्हणूनच जे नक्की येणार नाहीत अश्यानाच विचारलं. आणि शेवटी 'एकला चलो रे' आई आणि बाबांना विचारालाही नाही आणि सांगितलहि नाही. तसाच निघालो..

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गर्दीच व्यवस्थापन करायला चालोय असा सांगून घरातून सटकलो. धावत पळत जाऊन रिक्षा पकडली. आणि मला एकदम आठवलं आज सगळे रस्ते बंद.. माझा वेग एकदम कमी झाला. आणि मी त्या रिक्षावाल्याला विचारलं'
"आज शिवाजीनगर ला जायचा असेल तर कस जायचं?" तो म्हंटला
"आज जायचाच नाही!" माझा डोकच फिरलं,
"अरे पण एखाद्याला इमर्जन्सी असेल तर?"
"तर काळ जायचं होता ना! किंवा आता उद्या दुपारनंतर.." तरी मला आठवल कि शिवाजीनगर ला जाणारे रस्ते बंद असतील, पुणे स्टेशन ला जाणारे तर नसतील ना. मी त्या रिक्षा मधून स्वारगेट पर्यंत आलो.. टेन्शन नी मी डोक्याला हात लावलेला. शेजारी बसलेले काका सांगत होते, कि ९३ च्या हिंदू मुस्लीम दंगली सुरु असताना त्यांची आसपास राहणारे मुसलमान लोक सुद्धा गणपती ची पूजा करत असत. ऐन दंगली सुरु असताना मोहोल्यांमध्ये सुद्धा रोज पुजाअर्चा व्यवस्थित होत असे. त्यावर तो रिक्षावल म्हणतो,
"सगळे धर्म सारखेच असतात काका! आपल्या मानण्य न मानण्यावर असत सगळ!!"
त्याच्या या ऊद्गारांनी विवेकानंद, गांधीजींसकट सगळे भरून पावले असतील. माझ टेन्शन कमी झालं. आणि मी पुणे स्टेशन ला पोचलो. टीकिट काढून लोकल मध्ये जाऊन बसलो. मी असा एकटाच treaking ला चाललोय हे मी तृप्ती शिवाय कोणालाही सांगितला नव्हत. आणि शगुन चौकात मी अजून कसा पोचलो नाही म्हणून विष्णू चा सतत फोन येत होता आणि मी तो येऊ देत होतो. कासारवाडी सोडल्यावर मी त्याचा फोन उचलला आणि त्याला खर काय ते सांगितलं. तो अगदी थंडपणे ठीके म्हंटला. मला ते अपेक्षित नव्हत. मला वाटल तो चिडेल, शिव्या देईल, रागवेल.. पण त्यांनी तस काहीच केल नाही त्यामुळे मला मी काही thirrling करतोय अस मला वाटलच नाही. मग मात्र माझा पुढचा प्रवास बोर झाला.

लोणावळ्याला उतरलो, स्टेशन वरचा पैदल पूर पार करून 'रस्त्याला' लागलो, लोणावळा शहर मागे टाकून, तुंगार्ली गाव मागे टाकून, जुना मुंबई पुणे रस्ता पर करून टाटाच्या धरणापर्यंत पोचलो. मस्त घाम आलेला. धरणात तोंड धुतलं, आणि पुढे चालू लागलो. उजव्या हाताला एक छोटेखानी गाव लागता. गाव कसलं ते वस्ती छोटीशी. "हा कोण येडा एकटाच कुठे चाललय?" अश्या नजरेनी माझ्याकडे पाहत होते सगळे जण. आणि मी खरच वेडा आहे हे सांगायला माझी जीभ शिवशिवत होती..ते गाव सोडून एक छोटासा चढ चढून एका टोकावर आलो. आणि बघतो तर काय? काहीच दिसत नव्हत. मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा त्या स्पॉट वरून धक्च्य बहिरी पर्यान्तचा जवळ जवळ ३०-३५ किमी चा परिसर दिसत होता. आणि आज ३० फुटावरच दिसत नव्हत. खरच निसर्गाच्या ठिकाणी दरवेळेला नवनवीन अनुभव येत असतात. मी जाताना बरोबर कॅमेरा घेतला होता. पण मला वाटायला लागलं कि उगाच आणला..

त्या गावापासून राजमाची सुमारे १८ किमी आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता चालत राहिलो! चालत राहिलो!! जवळ जवळ तास दीड तास चालल्यानंतर थोड धुक कमी झाल्यासारखा वाटल. पटकन कॅमेरा काढला भराभर क्लिक मारले. उगाच खाली बसून, झाडातून, वेगळ्या angle नी फोटो येतात का! तेवढ्यात मला काही गाड्यांचे आवाज ऐकले. पटकन कॅमेरा सॅक मध्ये टाकला आणि चालायला लागलो. कुठ कॅमेरावर नजर गेली, कुठ बघायला मागितला, आणि घेऊन पळाला म्हणजे?? तेवढ्यात त्या ३-४ गाड्या जवळ आल्या. माझ्या जवळ त्यांनी गाडी थांबवली. आणि मला विचारलं,
"एकटाच चाललायस?"
"हो"
"भीती नाही वाटत?"
"भीती काश्याची वाटायची तेव्हा?"
"कोणी लुटला तर?"
"मी अंगावरचे कपडे, पाण्याची एक बाटली, आणि केळी याच्या पलीकडे काही आणलेल नाही. काय चोरणार आणि कोण चोरणार!"
मग ते काहीच बोलले नाहीत, एकमेकांकडे पाहून हसले गाड्यांना किका मारल्या आणि निघून गेले. पुन्हा मी एकटाच. चालताना मी खरच विचार करू लागलो कि खरच एखाद्यानी लुटलं तर कॅमेरा, पैसे तर कसा करायचं.. मोबाईल, पाकिटातले विष्णू चे पैसे.. आता मला टेन्शन आलं. 'श्रीराम जय राम जय जय राम' चा जप सुरु केला. काही वेळ म्हणलो, चालण्याच्या नादात ते म्हणणं विसरून गेलो. पुन्हा केव्हा तरी आठवलं, मग परत जप सुरु केल, आणि परत विसरून गेलो. राजमाची ला चाललो असल्यामुळे मला 'माचीवरचा बुधा' आठवत होतं. आणि आश्चर्य म्हणजे माझ्या समोर बुधा अवतरला. अंगावर बंडी, डोक्याला फडक गुंडाळलेलं, कमरेला पंचा, पायात भरपूर झिजलेल्या चपला, हातात काठी असलेला म्हातारा माणूस त्याची गुरं चरायला उधेवाडी पासून इतक्या लांब घेऊन आला होता. त्याच्याबरोबर त्याचा एक कुत्रा, तो माझ्याजवळ आला, मला चारीही बाजूनी न्याहाळल, माझा वास घेतला आणि पुन्हा रानात निघून गेला.. तो म्हातारा खाली बसला, कमरेच्या पुडीतून तंबाखू काढली, हातावर चोळली. आणि ती गोळी जीभेआड लपवून ठेवली. आणि मग रानातून गोळा करून आणलेले काटे एकत्र बांधून खेकडे पकडण्यासाठी तो आकडा तयार करायला लागला.. मी त्याचे फोटो काढले ते पाहून त्याचा झुडपाआड लपलेला त्याचा कदाचित नातू असावा तो बाहेर आला, मग मी त्याचे चार-सहा फोटो काढले त्याला दाखवले आणि त्याचा चेहेर्यावरचा आनंद न्याहाळत पुढे निघालो.

टिव्ही वर एका मिनरल वाॅटरची जाहीरात करतात कि आमच पाणी direct हिमालयातून आणलेलं असत. त्यामुळे त्याच्यासारखा गोड आणि शुद्ध पाणी जगात मिळणार नाही, वगैरे वगैरे वगैरे!! मी ते direct हिमालयातलं पाणी काही पिलेला नाही पण माझा त्या मिनरल वाॅटरला चॅलेंज ला आहे कि काळ्या खडकातून झिरपणा-या पाण्यापेक्षा गोड आणि शुद्द पाणी मला हिमालयातून आणून दाखवावं. मनसोक्तपणे मी ते गोड पाणी प्यालो. गो.नी. दांडेकरांना संपूर्ण महाराष्ट्रात फक्त राजमाचीला जाताना भुताचा अनुभव आला होता. त्या अमानवीय शक्तीला दूर ठेवण्यासाठी मी रामरक्षा म्हणायला सुरु केली. मग अथर्वशीर्ष, असा पर राजमाची पर्यंत चालू ठेवला.. भुताचा अनुभव येवो न येवो माझ्या खात्यात पुण्य नक्की जमा होत असणार.!!
एका वळणावर डोंगरावरून कोसळणा-या धबधब्यानी माझी वाट आडवली. ते कोसळणार पाणी रस्त्यावरून वाहत होत, आणि पाणी पर करायला मध्ये दगडही दिसत नव्हते. काय कराव सुचेना! इतक्यात एक फोरव्हीलर त्या पाण्यातून गेली, सगळ पाणी डहुळल गेलं. जो तळ दिसत होता तोही दिसेनासा झाला. मग मी बूट काढले, सॉक्स काढले हातातल्या काठीला बांधले आणि ती काठी पैलतीरावर भिरकावली. आणि चालत चालत त्या तीराला पोचलो. पुन्हा पायात बूट अडकवले, हातात काठी घेऊन चालायला सुरुवात केली. वाटेत एक मारुतीचे मंदिर लागते तिथे त्या मूर्तीसमोर माथा टेकला आणि पुढे चालू लगलो.

मिनी कोकण कडा त्यावरून दरीत कोसळणा-या पाण्याच्या धारा, त्याचा तो अर्धवर्तुळात घुमणारा आवाज
, आसमंतात उडणारे त्याचे तुषार पाहून मी पुढची वाट धरलॆ. रामरक्षेचे पुढचे आवर्तन संपेपर्यंत मला उधे वाडीचा टोलनाका दिसलाच . मी मोबाईल काढून घड्याळ बघितले. घड्याळाचे काटे २.३७ वाजलेले दाखवत होते. चटकन डोक्याने गणित केले आपण ११. ५० ला चालायला सुरुवात केलेली. मी जवळ जवळ ३ तासात १८ ते २० किमी अंतर पार केले होते. हेच अंतर आम्हाला पार करायला ७ तास लागले होते. मी माझ्या चालण्याच्या स्पीड वर निहायत खुश झालो. आणि चालत राहिलो. गावातल्या एकमेव दुमजली घराजवळ पोहोचलो. घराच्या ओट्यावर ५ मिनिटे विसावलो. घरातून कमरेला पदर खोचलेल्या , ५० शी पार केलेल्या काकू बाहेर आल्या. त्यांना मागच्या वेळेची ओळख सांगितली. ह्यावेळी एकटाच आलोय हे पाहून त्याही आश्चर्यचकित झाल्या.

खर म्हणजे हयावेळेची माझी ट्रीप कोंडाण्याच्या लेण्या पाहण्यासाठीची होती. कार्ले, भाजे, बेडसे आणि कोंडाण्याच्या लेणी ह्या समकालीन आहेत. ह्या चारापैकी कोंडाण्याच्या लेणी ह्या सर्वात जुन्या आहेत. गावात मला माहिती कळली ती उधेवाडीतुन अजून जवळ जवळ दिड तास चालावे लागेल तेव्हा कुठे मी लेण्यात पोहोचेन. अजून इतका वेळ चालाय्चे आहे हे ऐकून मी दचकलो खरा पण धीर धरून चालू लागलो. राजमाची रुरल development plan ला गो. नि. दा चे नाव दिलेले पाहून मला फ़ारच आनंद झाला. इतका मोठा माणुस पण पुण्यात फारसे कोणाला नाव ठावूक नाहि. पण या गावात त्यांच्या नावाने वाडी वसवलिये .. ग्रेट!!! ती वाडी पार करून मी पुढे गेलो. आतापर्यंतचा रस्ता सरळ होता पण आता त्याला अजून एक फुटला. त्याला अजून एक. आणि असे किती ! त्यातल्या त्यात जास्त मळलेली वाट धरायचा प्रयत्न करत होतो. आणि पाउस सुरु झाला. लोणावळ्याला उतरल्या पासून ढग होतेच आलेले पण पाउस नव्हता आता तो ही सुरु झाला. आणि तो ही साधासुधा नाही कडकडाटासह कोकणातला पाउस सुरु झाला. मग मात्र मी जरा माझा स्पीड वाढवला उजव्या हाताला एक खोपटे होते त्यात शिरलो. पावसापासून वाचायला. १० मि. थांबलो.पाउस ही थांबला, मग मी पुन्हा चालायला सुरुवात केली.

ते खोपट अशा ठिकाणी होत. की तिथेपर्यंत थोडेसे चढत जायचे मग ते खोपट आणि मग फक्त उतरत जायच.
उतरत जायच.. उतरत जायच.. पूर्वी एकदा पानशेत ते रायगड चालत गेलो होतो तेव्हा ही तो सह्याद्री असाच उतरायचा होता. दाट झाडीतून निघालेली पायवाट माझ्याबरोबरच पुढे पळत होती. कधी गवतात विरून जात होती. कधी अचानक प्रकट होत होती. शेजारून धबधबा कोसळत होता. अस अर्धा तास चालून मी अचानक एक वळण घेउन मोकळ्या मैदानात आलो. तिथे एक काका उभे होते. पायात स्पोर्ट शूज, अंगात बनियान, पॅन्ट घालून काहीतरी बांधत उभे होते. त्यांच्याजवळ जाउन बसलो. खूप आधार वाटला. जिवंत कोणीतरी भेटले. त्यांच्याशी बोलायच्या हेतूने मी बसलो. त्यांनी विचारले,
"एकटाच आला आहेस?"
"हो"
"एकट यायच नाही बाळा!"
मला फ़ारच बर वाटल. गावातली माणस असातातच प्रेमळ म्हणा..
"अहो काका आज अनंत चतुर्दशी! कोण येणार माझ्याबरोबर? आणि मी एकटा नाही आलोय."
त्यांनी माझ्या मागून झुडपातून कोणी येतंय का ते पाहिलं. मी saak मधून 'माचीवरला बुधा' काढल, त्यांच्या समोर धरलं. आणि म्हणलो,
"अप्पासाहेबाना आणि बुधाला घेऊन आलोय बरोबर."
त्यांनी हातातून पुस्तक घेतलं, त्याच्यावरून हात फ़िरवला आणि बोलू लागले,
"७७ साली मी डोंबिवली सोडली आणि हे गाव दत्तक घेतलं. तेव्हा अप्पासाहेब आणि बाबासाहेब पुरंदरे माझ्याबरोबर उधेवाडीत आले होते."
"तुम्ही त्यांना ओळखत होता?"
"अरे नुसतं ओळखायच काय! राजमाचीला आले कि दोघाही माझ्याच घरी हक्कानी रहायला यायचे."
"कित्ती lucky आहात तुम्ही!"
"भरपूर"
पुस्तक चाळत त्यांनी मला विचारला,
"आधी किती वेळास आलायस?"
"आलोय ८-१० वेळा! पण या वेळी किल्ला नाही बघायचा ."
"मग रे"
"कोंडाण्याच्या लेण्या बघायला चाललोय!"
"एकटाच?"
"हो! त्याला काय झालं?"
"माझं ऐक, एकटा जाऊ नकोस. हमखास रस्ता हरवशील."
"मी तेवढ्यासाठी आलोय आज"
"परत जाशील रे! भरपूर आयुष्य पडलय अजुन. अजून कोणाला तरी घेऊन परत ये."
"मग आता काय परत लोणावळ्यापर्यंत परत जाऊ?"
"कशाला? आता असाच चालत जा खाली कोंडणे गावात, तिथून तुला रिक्षा वगैरे मिळेल, त्यांनी कर्जत पर्यंत जा, तिथून पुणे!"
"मी पुण्याला जाणार हे कस कळल तुम्हाला?"
"गोनीदा मुंबईत कोणाला माहिती!! मुंबईतली लोक इतकी हौशी नाहीत कि एखाद पुस्तक वाचून ट्रेकला येतील."
मी खळखळून हसलो, उठलो त्यांच्या पाया पडलो, त्यांनी डोक्यावर हात ठेवला काहीतरी पुटपुटले. आशीर्वादच दिला असणार. मी चालू लागलो. जाता जाता त्यांनी सांगितलं कि,
"जास्तीत जास्त मळलेल्या वाटेनी जा. प्लास्टिक, कचरा अस शोधात जा म्हणजे गावापर्यंत पोहोचशील."
मी मन डोलावली, हसलो आणी झाडात शिरलो.

प्रचंड उतार सुरु झाला. चालणहि कठीण व्हायला लागलं. जास्तीत जास्त मळलेल्या वाटेनी जायचा माझा प्रयत्न होता. चोकलेट चे कागद, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे कागद जिथे जास्त असतील तो रस्ता मी धरायचं मी प्रयत्न करत होतो. भोवती गच्च झाडी, शेजारून खळाळून वाहणारा धबधबा, अन कचरा!! हेच माझ्यासाठीच चैतन्य. माझ्याजवळच पाणी संपलं म्हणून मी पायवाट सोडली आणि पाण्याकडे गेलो. भरपूर पाणी पिलं. बाटलीत भरून घेतलं. आणि परत चालायला सुरवात केली पण घात झाला, माझी वाट हरवली, म्हणजे मी वाट चुकलो. छातीची धडधड धडधड सुरु झाली. आता मात्र फारच घाबरलो. थोडा मागे चालत गेलो. कचरा शोधायचा प्रयत्न केला. पण नाहीच रस्ता गेला तो गेलाच.

Discovery वरच man vs wild आठवलं, त्याच्या काही ट्रिक्स आठवायला सुरवात केली, आणि मला एकदम मला आठवल कि पाण्याच्या कडेकडेनी चालत राहिलो तर आपण कोणत्या ना कोणत्या गावात पोहोचु. अरे पण तो बेअर ग्रिल ला ते ठीक आहे ना. त्याचं तीन - साडेतीन वर्षाचं ट्रेनिंग झालाय. दुसरं मन सांगतो तुझाही २ वर्ष NCC झालाय घाबरायला काय झाला? मी ऐकल दुस-या मनाचं. आणि मी चालायला सुरुवात केली. प्रत्येक तीस-या पावलाला मी पडत होतो. भरपूर पावसामुळे प्रत्येक दगडावर शेवाळ साठलेलं. त्यामुळे हात पाय त्यावर ठेवला कि सटकन सटकायचा आणि जोरात लागायचं. पण एक जमेची बाजू म्हणजे इतक्या वेक पडलो तरी बघायला कोणीही नव्हतं. चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत आपटत पण चालत राहिलो. भूक आणि तहान तर भीतीनी पूर्ण मरून गेली. एक दोन वेळा तर मला चकवा लागल्याची पण भीती वाटू लागली. भोवताली प्रचंड जंगल, सूर्याचा पत्ता नाही, पावसाचा पत्ता नाही, आणि माणसांचाही पत्ता नाही. ज्या
कच-याच्या भरवश्यावर मी वाट धरली होती, तो कचराही एकदम गुप्त झाला. काय कराव सुचेना. आकाशाकडे बघितल ते दिसतच नव्हतं इतकी दाट झाडी, तरीही हात जोडले देवाला म्हणलो,
"आता माझी जबाबदारी तू घे, आणि मला सुखरूप कर्जत पर्यंत पोहोचव."
आणि त्यांनी माझं लगेचच ऐकल, समोरच्या न दिसणाऱ्या डोंगरावरून, न दिसणाऱ्या रेल्वे चा आवाज मला एकू आला. त्या आवाजाचा मला आधार वाटला. आणि मी उत्साहानी मी चालू लागलो. पाचच मिनिट चाललो असेन डाव्या हाताला मला एक झोपडी दिसली. आनंदानी मी जोरात ओरडलो तर दचकून शेजारच्या झाडावरचे पक्षी उडले. मी पळतच निघालो. 'आजी म्या ब्रह्म' पहिल्याच आनंद मला झाला कारण गुरं चरत असलेली मला दिसली त्यांच्या मागे माणसंही. तो पर्यंत ५ वाजले होते. पुन्हा एकदा चैतन्याचा अनुभव.

कोंडणे गाव मागे टाकलं. कोंदिवडे गावातून रिक्षा पकडली तिने मला कर्जत पर्यंत आणून सोडला. स्टेशन वर डेक्कन क्वीन उभी होती. त्यावर 'पुणे-मुंबई-पुणे' वाचल तो आनंद शब्दात मांडता येत नाही. राजमाची ची डोंगररांग आणि रेल्वे जाते तो डोंगररांग एकमेकांना समांतर आहेत. यामध्ये प्रचंड दरी या दरी मध्ये आता अंधार झोपायला आला होता त्यावर धुक्यानी शाल पसरली होती. ट्रेन मध्ये सुखरूप असून सुद्धा मला त्या अंधाराची भयानक भीती वाटली. जर या अंधाराच्या तावडीत असतो तर त्यांनी काय मला जिवंत सोडल नसत.. त्यांनी काय केला असतं या विचारात मला झोप लागली.. जाग पुणे स्टेशन वर आली. आणि मी पुण्याच्या गर्दीत शिरलो. मी कोणी वेगळा नाहीच, तो मी नव्हेच हे दाखवण्यासाठी..

प्रतिक्रिया

II श्रीमंत पेशवे II's picture

31 Aug 2017 - 9:48 am | II श्रीमंत पेशवे II

भन्नाट ...............

सुबोध खरे's picture

31 Aug 2017 - 10:10 am | सुबोध खरे

खतरनाक

प्रसाद_१९८२'s picture

31 Aug 2017 - 10:58 am | प्रसाद_१९८२

भन्नाट !

लेणी राहिलीच की हो ! मजेदार लेखन. जिथे पाणी प्यायलात टेकाडावर तिथली पिंपळाच्या झाडावरून उजवीकडे पायय्रांची वाट ओढ्यातून कोंदिवडेकडे जाते. झाडाच्या डावीकडे उतरणारी पायवाट कोंडाणे गावात जाते. अगदी खाली उतरण्या अगोदर (१५०मि) उजवीकडे आडवी वाट सात ओढे पार केल्यावर लेणी आहे.
पण तुम्ही खूप चाललात एकटेच हे नक्कीच कौतुकास्पद.

डोंगराचा नियम : खालून वर जाताना वाट सहसा चुकत नाही. कारण सर्व वर चढणाय्रा वाटा गडावरच्या गाव/किल्ल्याकडेच जातात. वरून खाली येताना ९९टक्के वाट चुकते. भलत्याच गाव नसलेल्या दरीत नेते. उदा० सुधागड परिसर, ढाक.

दुर्गविहारी's picture

31 Aug 2017 - 11:15 am | दुर्गविहारी

उत्तम लिहीताय!!! छान. पण टाईप करून झाल्यानंतर धागा पुन्हा एकदा तपासा, काही चुका आणि ईंग्रजी शब्द दुरुस्त करता येतील.

त्यांनी हातातून पुस्तक घेतलं, त्याच्यावरून हात फ़िरवला आणि बोलू लागले,
"७७ साली मी डोंबिवली सोडली आणि हे गाव दत्तक घेतलं. तेव्हा अप्पासाहेब आणि बाबासाहेब पुरंदरे माझ्याबरोबर उधेवाडीत आले होते."
"तुम्ही त्यांना ओळखत होता?"
"अरे नुसतं ओळखायच काय! राजमाचीला आले कि दोघाही माझ्याच घरी हक्कानी रहायला यायचे."

तुम्हाला भेटलेली हि व्यक्ति बहुधा मुकुंद गोंधळेकर असावी. ह्यांचे राजमाचीवरचे कार्य फार मोलाचे आहे.
सोलो ट्रेकिंग करताना असे अनुभव येतातच. मी जवळपास सव्वाशे किल्ले तरी एकट्याने पाहिले असतील, दोनदा थोडीफार वाट चुकलो पण काही पथ्य पाळल्यामुळे चटकन वाट सापडली. सोलो ट्रेकिंग हे नक्कीच धोकादायक असते, पण काही वेळा पर्याय नसतो. एकदा यावर सविस्तर लिहीणार आहे.
कोंढाणे लेणी कोंदिवडे थोड्या अलिकडेच आहेत. सध्या तिथे बरीच सुधारणा चालू आहे. चांगली फरदबंदी वाट, स्वच्छता, लेण्यांचे रिस्टोरेशन असे बरेच काम चालु आहे.
पु.लेशु.

स्वच्छंदी_मनोज's picture

31 Aug 2017 - 12:40 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच हो..
भन्नाट अनुभव शब्दबद्ध केलाय अगदी जिवंत चित्रण समोर उभे राहीले. पण एक मित्रत्वाचा सल्ला..कितिही टेम्टेशन आले तरी एकट्याने ट्रेक करू नका. सोलो ट्रेकींग करणारे त्यांच्या वतीने कितिही वकीली करू देत पण सोलो ट्रेकिंग करताना झालेले कित्येक अपघात माहीत आहेत जे की टाळता आले असते. निसर्ग प्रत्येक वेळी दयाळू होतोच असे नाही.

+११...

सोलो जाणे शक्यतो टाळा.

कंजूस's picture

31 Aug 2017 - 5:42 pm | कंजूस

सोलो ट्रेकपेक्षा सोलो सायकलिंग बरं कारण रस्त्यावरच असतो आणि मदत मिळते.

म्हणूनच सायकल खरेदी केली

Nitin Palkar's picture

31 Aug 2017 - 12:42 pm | Nitin Palkar

वाचताना मीच एकटा हा ट्रेक करतोय असं वाटलं. खूप छान लिहिलंय....

Nitin Palkar's picture

31 Aug 2017 - 12:42 pm | Nitin Palkar

वाचताना मीच एकटा हा ट्रेक करतोय असं वाटलं. खूप छान लिहिलंय....

Nitin Palkar's picture

31 Aug 2017 - 12:42 pm | Nitin Palkar

वाचताना मीच एकटा हा ट्रेक करतोय असं वाटलं. खूप छान लिहिलंय....

mayu4u's picture

31 Aug 2017 - 8:27 pm | mayu4u

सोलो ट्रेक्स केल्यासारखं वाटलं का?

इरसाल कार्टं's picture

31 Aug 2017 - 1:45 pm | इरसाल कार्टं

काही वेळासाठी घाबरवून टाकलात हो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2017 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट अनुभव !

मात्र, पुढचा सोलो ट्रेक सुरक्षेच्या पूर्ण तयारीनिशी करा.

पैसा's picture

31 Aug 2017 - 9:42 pm | पैसा

भारी लिहिलंय! पण असली धाडस बेतानी करा!

प्रमोद देर्देकर's picture

31 Aug 2017 - 11:30 pm | प्रमोद देर्देकर

मस्त भन्नाट. मलाही एकदा सोलो ट्रेक करायचाय.

शलभ's picture

2 Sep 2017 - 1:55 pm | शलभ

मस्त लिहिलंय..

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2017 - 11:19 pm | ज्योति अळवणी

भन्नाट अनुभव आणि उत्तम लेखन. खूप आवडलं. पण एकट्याने इतके साहस करू नये असं वाटतं