बाप्पाचा नैवेद्यः गुरवळी

सविता००१'s picture
सविता००१ in पाककृती
28 Aug 2017 - 9:02 am

बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले की लगेच यावेळी आणखी कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून करता येईल याचा विचार मला वाटतं सगळ्याच घराघरांमधून चालू होतो. निरनिराळे मोदक, लाडू, यांबरोबरच अनेक प्रकारच्या पक्वांन्नांची यादीच मनात उमटत असते. यावेळी मिपासाठी काही नवीन पदार्थ देता येतो का याचा विचार करता करता अचानक लख्ख प्रकाश पडला की माझ्या मनात. वाटलं की आपल्या मराठी पदार्थांपैकी काही पदार्थ तर चक्क हल्ली माहीतही नाहीयेत फारसे कुणाला. त्यातलाच एखादा पदार्थ द्यावा की. तर ही घ्या आमच्या आजीची अशीच एक रेसिपी. आता हळूहळू विस्मरणात चाललेली... :(

गुरवळी:
.
.
1.
.
.

या पदार्थाच नाव गुरवळी. इतकं अनाकर्षक नाव असलेला पदार्थ..पण स्वाद आणि सुवास उत्तम. (हो. बरोब्बर वाचताय तुम्ही). तर आता पाहू ही गुरवळी कशी करायची ते:

साहित्यः

१. आवरणासाठी: १ वाटी बारीक रवा, १/२ वाटी मैदा, २ टीस्पून साजूक तूप, चिमूटभर मीठ, पाणी आवश्यकतेनुसार.
२. सारणासाठी: १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, १ वाटी पिठीसाखर,१ टीस्पून वेलदोड्याची पूड.
३. तळण्यासाठी: साजूक तूप
४. लाटण्यासाठी: १/२ वाटी तांदळाची पिठी
५. सगळ्यात महत्त्वाचे साहित्यः जाईच्या कळ्या.

कृती:

पहिल्यांदा रवा, मैदा, २ चमचे तूप, चिमूटभर मीठ हे सारं एकत्र करून घट्ट मळून गोळा तासभर झाकून ठेवा.
नंतर किसलेले खोबरे आणि खसखस वेगवेगळे खमंग भाजून घेउन मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. त्यात वेलदोडे पूड आणि पिठीसाखर मिसळून सारण तयार करा.

आता मळलेला गोळा किंचित पाण्याचा हात घेउन चांगला भरपूर मळा. पुरणपोळीच्या कणकेपेक्षा किंचित घट्ट गोळा हवा.
या गोळ्यातून एका पुरीएवढी गोळी घ्या, तिला वाटीचा आकार देउन त्यात हे सारण चमच्याने दाबून मावेल तितकं घाला. वाटीचं तोंड बंद करा आणि तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पुरी लाटा. या पुरीला काठ रहाता कामा नये. आता गरम तुपात ही पुरी ज्या बाजूने तोंड बंद केलं होतं ती बाजू वर ठेवून सोडा. थोडी फुगली की लगेच उलटा. पळीने त्या पुरीवर कढईमधलं तूप घालत रहा. मंदाग्नीवर सावकाश तळा. अशा प्रकारे सगळ्या गुरवळ्या तयार करा.

आता थंड झालेली एक गुरवळी हातात घेउन तिला दाभणाने चार- पाच भोके पाडा आणि त्यात चार-पाच जाईच्या कळ्या घाला. असं सगळ्या गुरवळ्यांचं करायचं.
.
.
1
.
.
1
.
.

दुसर्‍या दिवशी किंवा संध्याकाळी नैवेद्य दाखवला की द्यायची प्रत्येकाला प्रसाद म्हणून खायला.

प्रत्येक जण ही गुरवळी खाण्यासाठी फोडतो तो काय......... आतून उमललेली जाईची सुरेख फुलं बाहेर पडतात. ही दिसतात पण छान आणि त्यांचा वासही या गुरवळीला उत्तम लागतो.
.
.
1
.
.
आणि मग प्रत्येकाचा आश्चर्य, आनंदाने भरलेला चेहरा पाहून आपण पण कशी जम्माडी जम्मत आहे असा चेहरा करून आनंदाने त्यात सामील व्हायचं!

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

28 Aug 2017 - 9:31 am | राघवेंद्र

मस्तच !!!
आवडली!!!

एकदम वेगळा प्रकार

अरे वा.. आगळा वेगळा प्रकार आवडला. फुलाचा फ्लेवर द्यायची आयडिया मस्तच..

पैसा's picture

28 Aug 2017 - 10:27 am | पैसा

साहित्य बघून करंजीच्या बहिणी वाटल्या, पण फुलं नाजूक हाताने आत ठेवायची आयडिया जबरदस्त आहे! वासाच्या कल्पनेने आताच हव्याशा वाटत आहेत!

सविता, कसला भारी वेगळा प्रकार आहे, जाईच्या फुलांची जणू फॉरचून कुकीच, चायनीज हॉटेलात जेवणानंतर देतात ती! सध्या बालकोनीत जाई बहरली आहे, एकदा लवकरच करून बघेन! अश्या वेगळ्या पाककृतींबद्द्ल खरंच आभार! :-)

अनन्न्या's picture

28 Aug 2017 - 10:56 am | अनन्न्या

वा करतेच आता, किती कामाला लावता गं!

सूड's picture

28 Aug 2017 - 12:03 pm | सूड

भारीच!!

पिलीयन रायडर's picture

28 Aug 2017 - 12:33 pm | पिलीयन रायडर

अवाक झालेय मी!! जाईच्या कळया??!! खासंच !!!

मितान's picture

28 Aug 2017 - 2:38 pm | मितान

मस्त सुगंधी प्रसाद :)

पद्मावति's picture

28 Aug 2017 - 3:11 pm | पद्मावति

अफाट आहे हे सवि. जाइचा फुलोरा गुरवळीच्या आत__/\__

प्रीत-मोहर's picture

28 Aug 2017 - 4:11 pm | प्रीत-मोहर

वाह!!!

रेवती's picture

28 Aug 2017 - 5:11 pm | रेवती

वाह! मस्त पदार्थ व वेगळी आयडियाची कल्पना.

स्वाती दिनेश's picture

28 Aug 2017 - 5:55 pm | स्वाती दिनेश

किती छान!
जाईच्या कळ्यांची गुरवळी समईच्या शुभ्र कळ्यांसमोर.. अहाहा.. डोळ्यांसमोरच आलं दृश्य..
स्वाती

भन्नाट आहे ही गुरवळी. जाईच्या फुलांची कल्पना भयंकर आवडली आहे.

विशाखा राऊत's picture

29 Aug 2017 - 2:03 am | विशाखा राऊत

काय भारी आयडीया आहे सव्या.. मस्तच एकदम :)

रुपी's picture

29 Aug 2017 - 2:25 am | रुपी

मस्तच गं!

अश्या भारी नैवेद्याने बाप्पासुद्धा खूश होईल अगदी! या पाकृसाठी धन्यवाद.

स्मिता.'s picture

29 Aug 2017 - 3:00 am | स्मिता.

कसला सुंदर प्रकार आहे हा!! आगळावेगळा आणि कलात्मक...

बब्बो स्वप्नात पन अशी आयडिया नसती सुचाली मला , लै लै भारी सव्या :)

नूतन सावंत's picture

29 Aug 2017 - 2:18 pm | नूतन सावंत

हा प्रकार रुचिरामध्ये वाचला आहे,जाईच्या कळ्या आत भरणे,त्या दुसऱ्या दिवशी उमलणे हे खरंच वाटले होते,पण....पण काठ राहू न देता लाटणे आणि त्यामुळे ती गुरवळी चेंडूसरखी टम्म् फुगणे हे प्रकार वाचून हे कुणी करत असेल असेल का? असे मनात यायचे,पण सविता तुझया आजीला न तुलाही_/\_
करायला धीर आला.

अत्यंत वेगळी पाककृती.

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2017 - 4:26 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम पाकृ सव्या.
एकदम खासचं. जाईच्या कळ्या किती किती सुंदर सुवास असेल पदार्थाला.
मी नक्की बनवणार.

प्राची अश्विनी's picture

1 Sep 2017 - 8:26 am | प्राची अश्विनी

कसला गोड प्रकार आहे. मला नल राजाच्या पाककृती आठवल्या.
एक शंका ती फुलं खायची का??

सविता००१'s picture

1 Sep 2017 - 2:54 pm | सविता००१

फक्त सुवास

पूर्वाविवेक's picture

1 Sep 2017 - 3:34 pm | पूर्वाविवेक

किती आगळी वेगळी कृती ! प्रथमच ऐकतेय आणि प्रथमच पहातेय. खूप सुंदर!

जुइ's picture

8 Sep 2017 - 1:06 am | जुइ

अतिशय सुंदर प्रकार दिसत आहे. हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला. जाईच्या कळ्या काय आणि गुरवळ्या मध्ये फुले उमलेली पाहुन मौज वाटली :-)