बाप्पाचा नैवेद्यः ऋषिपंचमीची भाजी (ऋषीची भाजी)

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in पाककृती
26 Aug 2017 - 11:03 am

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी.

पण हि आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरायच्या. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत अजिबात तेल-तूप वापरले जात नाही. शिवाय या भाजीत मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत, तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली हि भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचे कारण म्हणजे सेंद्रीय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव.

ऋषी पंचमीचे व्रत किंवा उपवास हा आपल्या सप्तर्षींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एकप्रकारे तत्कालीन ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक मिळते. शरीरा सोबत आत्म्याची शुद्धता करण्याचे असे हे ऋषी पंचमीचे व्रत आहे. पण हे व्रत फक्त स्त्रियाच करतात, हे काही माझ्या मनाला पटलेले नाही.

माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण एकदम लहानपणी भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि हळूहळू हि भाजी आवडू लागली. बरेच जणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेली 'ऋषीची भाजी' मात्र आवडते. मीही त्याला अपवाद नाही. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.

हि भाजी कोकणतल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी येथे आमची पद्धत देते ​​आहे.

साहित्य:
अळूची पाने आणि देठे, सोलुन आणि चिरून- १ कप
लाल भोपळा, सोलुन आणि कापून- अर्धा कप
माठ, चिरून- अर्धा कप
कुरडूस, (रानातली पालेभाजी), चिरून- अर्धा कप (ऐच्छिक)
सुरण, सोलुन आणि कापून- ¼ कप (ऐच्छिक)
भेंडी, चिरून- पाव कप
श्रावण घेवडा, चिरून- पाव कप
गवार, चिरून- पाव कप
पडवळ, चिरून- पाव कप
शिराळे, सोलुन आणि चिरून- पाव कप
घोसाळे, चिरून- पाव कप
हिरव्या मिरच्या, चिरून- ३ ते ५ किंवा वैयक्तिक आवडीनुसार
चिंचेचा कोळ - अर्धा ते १ टिस्पून किंवा चवीनुसार
खवलेले ओले खोबरे- पाव कप ते अर्धा कप /आवडीनुसार
खडे मीठ- चवीनुसार

कृती:
अळू, कुरडूस आणि माठ स्वच्छ धुवून बारीक चिरा.
अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुवून टाका.
लाल भोपळ्याची सालं काढून त्यांचे छोटे तुकडे करा.
सुरणाची सालं काढून त्याचे अगदी छोटे तुकडे करून चिंचेचा कोळ चोळून ठेवा.
शिराळ्याची सालं काढून त्यांचे तुकडे करा.
भेंडी आणि घोसाळे चिरून घ्या.
पडवळाचेही आतल्या बिया काढून तुकडे करा.
गवार व घेवडा शीरा काढून मोडून घ्या.
सर्व भाज्या धुवून घ्या.
मिरच्यांचे तुकडे करा. तिखट आवडत असेल तर ठेचा करा.
एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मिरच्या आणि मीठ असं सर्व एकत्र करा.
पातेल्यावर स्टीलचे ताट ठेवून पाणी ठेवा. मध्यम ते मंद आचेवर भाजी शिजवा. भाजीत जास्तीचे पाणी टाकू नका. शिजताना भाजीला पाणी सुटते. त्यातच भाजी शिजते. वरून पाणी टाकले तर भाजी पांचट लागते.
मधून मधून ढवळत रहा. पण जोरजोराने ढवळू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल. शिजायला कठीण असणाऱ्या भाज्या बोटाने दाबून बघा. त्या शिजल्या कि भाजी शिजली.
आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि ओले खोबरे घालून एक वाफ काढा.
गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सोबत वाढा.

टिपा:
ऋषी पंचमीच्या ३-४ दिवस आधी या खास ऋषीच्या भाज्या बाजारात येऊ लागतात.
माझ्या माहेरी घरच्या अंगणात उगवणाऱ्या सर्व भाज्या या भाजीसाठी वापरतात, अगदी टोमॅटो सुद्धा.
तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी इथे भाज्यांचे प्रमाण दिले आहे. पण प्रत्यक्षात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या प्रमाणात त्या भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करावे.
उपलब्धेनुसार वर उल्लेख केलेल्या एक किंवा अधिक भाज्या वगळू शकता. किंवा दुसऱ्या भाज्या वाढवू शकता.
माझ्या सासूबाई भाजी शिजली की वरून थोडेसे घरचे लोणी घालतात.
भोपळा आणि ओले खोबरे या भाजीला गोडवा देतात.
रताळे, पांढरा गावरान मका, काकडी, कच्ची केळी, दुधी भोपळा सारख्या इतर पावसाळी/ हंगामी भाज्या पण वापरू शकता.
मका वापरणार असाल तर आधी प्रेशर कुकर मध्ये मीठ टाकून उकडून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करून भाजीत घाला.
ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदुळ मिळतात ते सुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदुळाला 'पायनु' असं म्हणतात.
या ताटात दिसणाऱ्या चटणीत फक्त ओले खोबरे आणि मिरची आहे.
.
.
1
.
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Aug 2017 - 11:40 am | पैसा

खूप छान लिहिलंस. आणि फोटोही सुरेख! बदल म्हणून अशी भाजी खूप छान लागते. बाजारात ऋषीचे म्हणून काय विकतात देवजाणे. आमच्याइकडे नाचणीही कुदळीने खणून लावतात. त्या नाचणीचे पदार्थही ऋषिपंचमीला करतात.

ती तुम्हीच लिहिलीत का ? बाकी भाजी उत्तमच लागते !

पैसा's picture

26 Aug 2017 - 12:16 pm | पैसा

ऑनलाईन लिंक देऊ शकाल का? ही पाककृती पूर्वाच्या ब्लॉगवर दोन वर्षापूर्वीच आहे. मिपावर नव्हती म्हणून आज दिली आहे.

पैसा's picture

26 Aug 2017 - 12:33 pm | पैसा

http://www.loksatta.com/lekhaa-news/ganesh-chaturthi-2017-ganpati-festiv...

सापडले. कोणा मितेश जोशीच्या नावावर टाकली आहे. चोर लेकाचे! ऑनलाईन चोर्‍या पाहिल्या. प्रिंटमधेही चोर्‍या करतात??

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Aug 2017 - 2:43 pm | माम्लेदारचा पन्खा

मीही वाचून दचकलोे होतो . . . .

प्राची अश्विनी's picture

1 Sep 2017 - 8:39 am | प्राची अश्विनी

हो ना.

अनन्न्या's picture

26 Aug 2017 - 4:06 pm | अनन्न्या

छानच लागते ही भाजी.

स्वाती दिनेश's picture

26 Aug 2017 - 5:28 pm | स्वाती दिनेश

ऑन लाइन चोरीबद्दल बाप्पा करेल शिक्षा,
पूर्वा, खूप आवडती ऋषीची भाजी. तू लिहिलेही छान आहेस.
स्वाती

इशा१२३'s picture

26 Aug 2017 - 5:31 pm | इशा१२३

छान पाकृ!

वर्णन आणि पाकृ दोन्हीही मस्तच.

विशाखा राऊत's picture

26 Aug 2017 - 6:25 pm | विशाखा राऊत

मस्त पाककृती

सविता००१'s picture

26 Aug 2017 - 6:41 pm | सविता००१

मस्त भाजी गं. खूप आवडते.
छान लिहिलं आहेस तू.

मस्त रेसिपी. या प्रथेमागची कथा वाचून छान वाटले. पायनु हा शब्द आधी ऐकला होता पण अर्थ आज समजला.

मदनबाण's picture

27 Aug 2017 - 11:51 am | मदनबाण

छान पाकॄ... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenu

मि पहिल्यांदाच पहिली अशी भाजी ,मस्त दिसतेय ग :)

नूतन सावंत's picture

29 Aug 2017 - 2:02 pm | नूतन सावंत

मस्त भाजी. आई फारच हौसेने करायची आणि खाऊ घालायची ही भाजी,आंबटपणासाठी चिंच तर असेच पण अंबाडीची फळंही वापरत असे.मका,हिरवा गावठीओला वाटाणा, हवाच. लाल भोपळा आजी आईची आई खात नसे म्हणून दुधीभोळा असायचा आणि गवार, श्रावण घेवडा नसायचा.
शिवाय सहस्त्रफळ म्हणजे घडघोसाळी हवीतच.
अळू वेगळा शिजवून भाजीत एकत्र करायची.
याशिवाय जाड्या मिरच्यांमध्ये ओले खोबरे आणि खडेमीठ चुरडून एकत्र करून भरून भारी झाल्या की त्या तव्यवर झाकणी घालून भाजून घ्यायची.
वरीच्या भाकरीसोबत ही भाजी,भाजलेल्या मिरच्या आणि दही असायचं.
शेजारपारजारच्या,नात्यातल्या आठदाहजणी उपासकर्णी असत.
त्यांचा फराळ करून झाला की,डबे नि वाट्या घेऊन येणारे 50/ 60 जण असतच.
शिवाय मला ऑफिसमध्ये डबा येई तोही 15/20 मैत्रिणी या डब्याची वाट पाहत याची जाणीव ठेवूनच.
भला मोठा डबा भरून भाजी ,20 भाकरी आणि भाजलेल्या मिरच्या,सोबत दह्याचा डबा असे.हळू हळू या भाजी,भाकरीचे चाहते वाढू लागले व हे करणे अशक्य झाले.
मी केव्हाही करते ही भाजी कारण सगळया भाज्या बारमाही आहेत.

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2017 - 4:17 pm | सानिकास्वप्निल

छान पाककृती भाजीची पूर्वा.
मला अशा सणावरी खास बनणार्‍या भाज्या फार आवडतात.
भोगीची, ऋषीची आवडता प्रकार.

प्राची अश्विनी's picture

1 Sep 2017 - 8:41 am | प्राची अश्विनी

मी पण आंबाडे घालते. आणि करांदे.
कालच केली.

जुइ's picture

7 Sep 2017 - 9:59 pm | जुइ

छान माहिती आणि पाकृ!! माझी आई अजूनही हा उपास करते.

रुपी's picture

8 Sep 2017 - 5:18 am | रुपी

मस्त! सुंदर लिहिलंय.