प्रकाशची बर्फी
दादरच्या प्रकाशमध्ये पूर्वी ही पांढरी शुभ्र ,वर फक्त चारोळी घातलेली बर्फी मिळत असे .आता दूर राहायला गेल्यापासून प्रकाशमध्ये वारंवार जाणे जमत नाही, आणि गेलो, तरी आता ती बर्फी मिळत नाही, एकतर थोडीशी काळपट दिसते, शिवाय वर पिस्ता कप लावलेले असतात.
म्हणून म्हटलं, करून पाहू. गुगलबाबाच्या कृपेने निशामधुलिका यांची कृती मिळाली, नेहमीसारखा पाक करून खवा घालून आटवा, अशी कृती नव्हती म्हणून खूप बरे वाटले. कारण अशाप्रकारे केलेल्या कृतीमध्ये,''आधी हाताला चटके, तेव्हा मिळते बर्फी'' असा प्रकार होतो.
ती कृती पूर्ण झाल्यावर लक्षात आलं, अरे, ही तर पूर्वी प्रकाशमध्ये मिळत असलेल्या बर्फीसारखीच दिसतेय, खाऊन पाहिल्यावर तर खात्रीच पटली, यंदा बाप्पासाठी पण ही बर्फी करायची ठरवली आहे. तेवढेच त्यालापण जुन्या आठवणीतील बर्फी मिळाल्याचे समाधान. अतिशय सोपी आणि चटकन होणारी ही कृती मिपाकरांसाठी देत आहे.
साहित्यः
२५० ग्राम खवा
१२५ ग्राम साखर
चारोळ्या
कृती:
२५० ग्राम खवा किसून थोडासा भाजून घ्यावा. १२५ ग्राम साखरेचा पक्का पाक करून गॅस बंद करावा, आणि पाक तसाच ढवळत राहावे पुन्हा त्याची साखर होईपर्यंत. (ही क्रिया भराभर करावी लागते, कारण पाक पक्का असल्याने साखर होण्याची क्रिया लवकर होते. मध्यच खडेपण बनू शकतात, तसे झाले तर साखर मिक्सरमधून काढावी.)
या साखरेला बुरा साखर म्हणतात. दोन्ही वस्तू पूर्ण थंड होऊ द्यावया. आणि मग एकत्र कराव्यात, व्यवस्थित मिक्स करून तूप लावलेल्या ट्रेमध्ये बर्फी थापावी. वर चारोळी दाबून, थोड्या वेळाने सुरीने काप द्यावेत.. साधारण ८ ते ९ तासांनी बर्फी सेट होते
प्रतिक्रिया
25 Aug 2017 - 12:54 am | राघवेंद्र
वा एकदम मस्त सुरुवात !!!
बर्फी आवडली !!! करायचा नक्की प्रयत्न केला जाईल.
25 Aug 2017 - 1:00 am | श्रिपाद पणशिकर
आई ला हि रेसीपी दाखवतो. चारोळी आवडत नसल्याने ती बाद करण्यात येईल. धन्यवाद.
31 Aug 2017 - 3:48 pm | नूतन सावंत
25 Aug 2017 - 1:19 am | रेवती
सोपी आहे की गं सुरन्गीतै. छान दिसतिये.
25 Aug 2017 - 1:21 am | निशाचर
मस्त दिसत्येय बर्फी!
25 Aug 2017 - 1:28 am | पद्मावति
वाह! मस्तं दिसतेय बर्फी.
25 Aug 2017 - 1:30 am | पलाश
छान दिसते आहे बर्फी! कृतीपण सोपी दिसते आह नावामागची कहाणी पण आवडली.
25 Aug 2017 - 6:31 am | एस
भारी दिसत आहे बर्फी. चारोळ्या म्हणजे बेदाणे ना?
25 Aug 2017 - 9:44 am | आदूबाळ
नाय हो एसभाऊ, चारोळ्या म्हणजे चितळ्यांच्या श्रीखंडात सापडतो तो बारीकसा ब्राऊन नट. हिंदीमध्ये चिरौंजी. बेदाणा म्हणजे वाळवलेलं पिचपीचीत द्राक्ष.
---
पाकृबद्दल अनेक आभार! प्रकाशची ही बर्फी खूप आवडीची आहे.
या बुरा साखरेची काय भानगड आहे? असं का करायचं? डीक्रिस्टलायझेशन आणि रीक्रिस्टलायझेशन करून नेमका काय फरक पडतो?
25 Aug 2017 - 4:56 pm | तुषार काळभोर
हाच शब्द आठवत होतो.
बादवे, चिरौंजीवरून हा पिच्चर आठवतो.
25 Aug 2017 - 5:16 pm | अभ्या..
रिक्रिस्टलायझेशनने बहुतेक व्हाईटनेस मेन्टेन होत असावा. टेक्श्चर बदलले गेल्यानेही चवीत फरक पडत असावा.
.
.
(हे सगळे हवेतले बाण आहेत. विकीपिडीतांनो क्षमस्व)
25 Aug 2017 - 6:16 pm | नूतन सावंत
बुरा साखरेने साखरेची शुभ्रता वाढते असे मला वाटते आणि दुसरे म्हणजे यप्रकाराने पाक आणि खवा मिश्रण करून बर्फी करताना बुडबुडे येऊन मिश्रण खदखदते तेव्हा हातावर उडून भाजणे टळते.
26 Aug 2017 - 7:31 pm | खेडूत
ह्या घ्या चारोळ्या!
पाकृ तर आवडलीच!
25 Aug 2017 - 9:54 am | रुपी
खासच..
चारोळ्या न घालता करुन बघेन. :)
25 Aug 2017 - 10:55 am | यशोधरा
मस्त! :) सुरंगीताईकडे एकदा धाड घालायला हवी!
25 Aug 2017 - 6:23 pm | नूतन सावंत
सुस्वागतम्।
25 Aug 2017 - 1:24 pm | सविता००१
सुरेख फोटो आलाय. नक्की करून पाहीन आता.
25 Aug 2017 - 1:49 pm | कंजूस
छान सुरुवात!
चारोळी हे चंदनासारख्याच झाडाचा बदाम- बी.
25 Aug 2017 - 5:05 pm | पैसा
पतंजलीची बुरा साखर मिळते, तीच थेट वापरली तर?
25 Aug 2017 - 6:18 pm | नूतन सावंत
हरकत नाही,मीपण वापरून पाहीन.अजून सोपे होईल,फक्त खवा भाजून तहान करून घेतला म्हणजे झालं.
25 Aug 2017 - 6:24 pm | नूतन सावंत
कृपया'थंड करून घेतला',असे वाचावे.
25 Aug 2017 - 5:39 pm | विशाखा राऊत
वाह.. तुझ्याकडे खादाडी करायची लिस्ट वाढत आहे. लक्षात असु दे ;)
25 Aug 2017 - 6:22 pm | यशोधरा
रांगेत उभी रहा! माझ्यामागे. ;)
25 Aug 2017 - 6:22 pm | नूतन सावंत
ये तर खरी.लिस्टमध्ये नसलेले पदार्थ पण करूया आपण.
25 Aug 2017 - 7:24 pm | मदनबाण
बर्फी आवडेश ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddy
25 Aug 2017 - 8:35 pm | इशा१२३
मस्त!
26 Aug 2017 - 4:00 pm | अनन्न्या
असंही बुरा साखर केव्हापासून वापरायचीय मला, घरी करता येते म्हणजे वापरून बघतेच!
26 Aug 2017 - 5:24 pm | स्वाती दिनेश
बर्फी लय भारी..
निशामधुलिकाची ही रेशिपी मी गेल्या दिवाळीला केली होती,:) मस्तच होते बर्फी..
स्वाती
31 Aug 2017 - 4:06 pm | सानिकास्वप्निल
छान दिसतेय बर्फी.
पाककृती आवडली.
1 Sep 2017 - 10:53 am | अजया
क्लासच :)
धन्य आहात तुम्ही सर्व सुगरणी.
1 Sep 2017 - 3:49 pm | पूर्वाविवेक
मी खाल्लीय एकदा प्रकाशाची बर्फी. तशीच दिसतेय. आता तुझी रेसिपी वाचून... करना तो बनता है !
2 Sep 2017 - 11:08 pm | मनिमौ
पांढरीशुभ्र दिसतेय. मी अशीच करून बघेन
3 Sep 2017 - 4:48 pm | कविता१९७८
मस्त
6 Sep 2017 - 3:26 pm | हसरी
छान दिसतेय बर्फी.
प्रकाशकडच्या ह्या बर्फीत भरपूर जायफळ घातलेलं असायचं. आता इतक्यात कधी खाल्ली नाहीये, पण इतरांकडच्या खव्याच्या बर्फ्या वेलचीच्या स्वादाच्या, पण ही मात्र जायफळाच्या स्वादाची असायची.