दीर्घ विरहा नंतर आज सायकलिंग ची संधी मिळाली. खर तर अंबरनाथ ते वाडा अशी ६५/७० किमी ची राइड करायचा विचार होता, पण ज्या सायकल मित्रा कडे जाणार होतो त्यालाच अचानक ठाण्यात यावे लागले, अचानक उद्भवलेल्या कौटुंबिक कारणांमुळे. त्याचा रात्री निरोप आला ,त्यामुळे मग वाड्याला जे बघायला जायचं तेच जवळपास कुठे मिळेल याचा विचार करू लागलो. मलंग गड ,नेवाळी परिसर यासाठी योग्य वाटला. जवळ ही आणि रस्ता ही चांगला, रहदारी कमी.
वाड्याला मित्राच्या शेतावर व रानात जायचे होते, सृष्टीला लागलेल्या पाचव्या महिन्यातले सोंदर्य न्याहाळायला. रानभाज्या बघायला, त्या कशा बनवतात हे माहित करून घ्यायला.
मलंग गडाच्या रस्त्याला लागलो तेव्हा गावं,वाड्याना जाग यायची होती. काळभोर डांबरी रस्ता व दोहोबाजूला हिरवीगार भात शेती, रस्त्याच्या कडेला बहरलेला तेरडा, नुकताच फुलू लागलेला कुर्डू, तरारलेली रान केळ (चवई), बोरीच्या झाळीत लपलेली कोल्हे काकडी, मधूनच वरकड जमिनीत लावलेला भेंडा, त्याला आलेली पिवळी फुलं अशी मस्त दृष्य होती. दूरवर एक भला थोरला पडवळी चा मांडव ही दिसला. भाताच्या खाचारातल पाणी आता गढूळ नसून मस्त नितळ दिसत होते. रस्त्यावर उडणारे चतुर पाऊस कमी झाल्याची चाहूल देत होते.
मस्त लयीत सुरु होतं सायकलिंग, जोडीला नेहमीची साथ मेहदी च्या स्वर्गीय आवाजाची. मलंग गडाचा पायथा केव्हा आला ते समजलेच नाही. इतक्या लौकर परत फिरायचं ? मग एक चहा घेतला व फिरलो परत, मात्र सरळ घरी न जाता नेवाळी मार्गे जायचं अस ठरवून. मगाशी पाहिलेल्या भेंड्याच्या शेतावर तोडणी सुरु होती, देणार का विकत थोडी अस विचारल्यावर, घाऊक विकतो, किरकोळ नाही असं उत्तर आलं, मग किरकोळ च्या भावातच द्या अर्धा किलो, तागडी नको तुम्हीच ठरवा अर्धाकिलो असं सांगून घेतला. ३० रुपये दिले. पाठ पिशवीत भरायच्या आधी दोन खाल्ले कच्चेच, नाष्टा झाला, एक एक भेंडा एका वितीपेक्षा लांब आणी पांढरट हिरवा होता.
कशी देणार भेंडी असे जेव्हा विचारलं होत तेव्हा भेंडी नाही भेंडा आहे असे छान व समर्पक उत्तर मिळाले होते.
ज्या कोणा ब्रिटीश माणसाने भेंडी ला लेडीज फिंगर असे नाजूक नाव ठेवले, त्याने जर हा असा लांब भेंडा पाहिला असता तर डेव्हिल्स फिंगर अस काहीसं नाव ठेवले असते. ही जात शक्यतो पावसाळीच होते व चवीला ही जास्त उजवी असते. दलाली शिवाय भाजी खरेदी झाली याच ही समाधान वाटलं.
नेवाळी फाट्याला आत वळलो. आता तर भेंडे , शिराळी, लांब माठ यांची पोती घेऊन, बस ची वाट पाहणारे शेतकरी दिसले. पाच सहा फुट लांब अशी मस्त माठाची जुडी त्याला साडीचा कपडा गुंडाळलेला,अशी रस्त्या कडेला उभे करून ठेवलेली. जणू गौर च केल्ये उभी असं वाटलं. जवळच मामा होते उभे, मग थोड्या गप्पा मारल्या, या लांब देठाचे बोट भर लांबीचे तुकडे करून, मग चार भाग उभे करायचे ब पानांबरोबर बारीक चिरायचे, मग छान शिजतात, फार मसाले न घालता ही छान चवदार भाजी होते. ही सर्व भाजी कल्याण बाजारात बस ने जात्ये नेहमी. पुढे निघालो तो बस आलीच केडीएमटी ची, बस केव्हाही येईल म्हणून मामा शेतात जाऊन भाजी आणायला तयार नव्हते, आणि एव्हढी छान बांधलेली जुडी सोडून त्यातलीच थोडी द्या असे ही सांगावेसे नाही वाटले.
हा रस्ता पुढे तळोजा रस्त्याला मिळतो. चौकात आलो, तळोजा रस्ता लागला तसे गावपण संपले, उंच च्या उंच इमारतींचे बांधकाम दिसू लागले व त्या कामावर निघालेले शेकडो मजूर. सिमेंट च्या रस्त्यावर डांबर टाकून खड्डे भरण्याचा विचित्र प्रकार या रस्त्यावर आढळला.
चौकातून उजवीकडे वळून पाईपलाईन रोड ला आलो, मग न थांबता घर गाठले.
प्रतिक्रिया
9 Aug 2017 - 3:00 pm | धडपड्या
काकू परत आल्याचा चांगलाच फायदा झाला की...!!!
राईड करायला मिळणार, म्हणून तुमचा, आणि असेच भारी भारी वर्णन वाचायला मिळणार, म्हणून आमचा...!!!
9 Aug 2017 - 3:52 pm | प्रशांत
+१
9 Aug 2017 - 4:25 pm | स्थितप्रज्ञ
मुंबईसारख्या शहरात राहून इतका निसर्गरम्य परिसर कसाकाय शोधून काढता ब्वा!
9 Aug 2017 - 11:46 pm | मोदक
झक्कास..!!!
भारी सुरू आहे सायकलिंग...!!!!
10 Aug 2017 - 5:37 am | प्रीत-मोहर
भारी!!
काका ते गावठी भेंडे आहेत , फक्त पावसाळ्यातच लागतात. आणि इतकी अप्रतिम चव असते न यांची की काय सांगाव
10 Aug 2017 - 7:42 pm | भ ट क्या खे ड वा ला
खेड सोडल्या पासून मुकलो होतो यांना , म्हणून दोन कचेच खाल्ले तेव्हाच.. आता परत योग येईल अशा सर्व चविष्ट गोष्टींचा .. या वर्ष अखेर परत खेड ला जातोय.. बहुधा कायमचा.
10 Aug 2017 - 7:11 am | कंजूस
व्वा!
10 Aug 2017 - 4:58 pm | शलभ
सुरेख लिहिलय..
13 Aug 2017 - 10:26 pm | सविता००१
सुंदर फोटो.
ती माठाच्या भाजीची गौर खरंच खूप खूप आवडली.
आणि हो, मसाला भेंडी ची भाजी हा भेंडा वापरून करा मंडळी. नेहमीची नाजूक भेंडी फिकी पडेल हिच्यापुढे. नक्की.
मला अजिबात हा भेंडा प्रकार माहीत नव्हता. एवढ्या मोठ्या भेंद्या विचित्र वाटल्या होत्या आधी. त्या भाजीवालीनेच "घे-घे हीच. चांगलं चुंगलं खायाला घाल की बायो घरच्यांला " असं म्हणून घ्यालला लावून या भाजीच्या प्रेमात पाडलं मला..
13 Aug 2017 - 10:33 pm | पैसा
लिहीत रहा!