दिवस ८
आमच्या युरोप सहलीचा आठवा दिवस उ़जाडला. २ मे २०१७. खरे तर भूतलावर न्यूझीलंड, व्हेनेझुएला, नॉर्वे शिवाय उत्तर ब्रिटन ई असे अनेक निसर्गरम्य देश आहेत. पण स्वीटझरलंड या लहानशा देशाचा नंबर खास करून भारतीय मनांत पहिलाच मानला पाहिजे. इंटरलाकेन हे तर भारतीयांचा स्वीसमधील अड्डाच म्हणावे लागेल.स्वीसमधे बर्न, लूझर्न, झुरीच, इंटरलाकेन, बाझेल व जिनेव्हा ई मोजकीच शहरे आहेत. आपल्या शहर या शब्दाच्या व्याख्येत कदाचित गावेच. पण बहुतेकाना एकापेक्षा अधिक रेल्वेटेशनांचा लाभ झालेला आहे व जवळ जवळ सर्वच ठिकाणी विमानतळ आहेत. स्वीसचे काही भाग केलेले आहेत. त्यानुसार रिजनल पासेसही आपल्याला मिळतात. पण आम्ही "स्वीस ट्रॅवल पास " नावाचा अखिल स्वीसमधे कोणत्याही बस, ट्राम, बोट व रेलगाडी ला चालणारा असा घेतला होता. किंमत प्रत्येकी रू १७०००/- फक्त . यात "चार दिवसावर एक दिवस फ्री "अशा ऑफर मधे ५ दिवस मिळाले होते. व हा पास म्हणजे आपण स्वीस चा "राजा" आहोत याचे सर्टीफिकेट असते. नुसता फडकावला तरी " यू कॅन गो अहेड ." ( ही जरा अतिशयोक्ती. काही जागी स्कॅन करून तपासतात. )
अर्थात या पासात काही ठराविक सिनिक ट्रेन रूट्स व माउंटन रूट्स येत नाहीत. पण हा पास असेल तर २५ किंवा ५० टक्के सवलत मिळू शकते.
२ मे २०१७ ची पाहाट उगवली.
आम्हाला काहीही उपयोग नसलेला होटेलचा आकर्षक बार
हॉटेल कोरोना चा डायनिंग हॉल
आमचा जामानिमा आटोपून आम्ही खाली आमच्या हॉटेलच्या रेस्त्राँ मधे आलो. ब्रेकफास्ट साठी सज्ज . एकूण ५० एक तरी विविध वस्तू म्हणजे खाद्य वा पेये ठेवण्यात आली होती. म्हण्जे कलिंगडाची फोड ते लिकर. त्यात काय खावे ? आवडले नाही तर टाकायला नको म्हणून वरून आवडतील असे वाटलेले काही जिन्नस प्लेटमधे घेऊन नाष्टा झाला. अर्धे लक्ष घड्याळाकडेच होते. प्रवासात लागतील म्हणून एकदोन सफरचंदे व संत्री पिशवीत टाकून सामानासकट बाहेर पडलो. बाहेर तिरानो एकदम शांत व प्रसन्न.
तिरानो चे स्वीस कनेक्शन चे रेल्वे स्टेशन या शेजारीज इटली कनेक्शन चे रेल्वे स्टेशन ही आहे.
तिरानो ते लूझर्न -व्हाया- पोन्ट्रेसिना- सामेडान- क्वार - थालविल
दहा मिनिटात स्टेशन गाठले. आता सुमारे साडे सहा तास आम्ही ट्रेन मधे बसून स्वीस च्या निसर्गाला नजरेत कायमचे साठविण्यासाठी सिद्ध झालो होतो.
तिरानो ते सेंट मॉरित्झ या मार्गावर ची ही रिजनल ट्रेन.
स्वीसमधे थेट गाड्या नसल्या तरी गाड्यांची कनेक्शन अशी ठेवली आहेत की प्रवासात वेळेचा अपव्यय होऊच नये. याचाच अर्थ असाही की प्रवाशानीही पुढची गाडी रमत गमत पकडायला यायचे नाही. नाहीतर परत बरोब्बर एक तास फलाटावर माशा मारीत बसावे. आमचा प्रवास तिरानो ते लूसर्न असा होता त्यात तिरानो वरून सेंट मॉरिझ या गावाला जाणार्या ट्रेनने पॉन्ट्रेसिना पर्यंत, पॉन्ट्रेसिना पासून सामेडान पर्यंत, सामेडान पासून क्वार पर्यंत , क्वार ते थाल्विल व थाल्विल ते लूसर्न असा गाड्या बदलत प्रवास करायचा होता. ( हे इथे लिखावटीत क्लिष्ट वाटले तरी " स्वीस " कृपेने ते सोपेच आहे.) या मार्गात काही भाग बर्निना एक्प्रेसचा ही येतो.
बरोबर सात वाजून चाळीस मिनिटानी ट्रेन निघाली. ही ट्रेन वाटेतील काही गावातून चक्क चौकातून रस्त्यातून पार होते. हे पहाता मजा वाटत होती. आजूबाजूला डोंगरावरून बर्फावरून उन्हे परावर्तित होताना दिसत .
ही मालगाडी एक "अनाहिता" चालवीत होती.
दहाएक मिनिटात कॅम्पासिओ हे स्टेशन आले. वरून बर्निना भागातून एक मालगाडी आली होती. त्या मालगाडीत बर्फ काहीसे साचलेले दिसत होते. आणखी पाचेक मिनिटात मिरालागो नावाचे ठिकाण आले.
मिरलगो लेक
अत्यंत शांत अशा जलाशयाच्या काठाने ट्रेन जात होती. समोरील हिम्माच्छादित पर्वताचे पूर्ण प्रतिबिम्ब पाण्यात उतरले होते. मधे तलाव आल्याने दरी रूंदावली होती व उजव्या बाजूला तलावाला टाकीत ट्रेन तलावाच्या डाव्या बाजूने अगदी काठाला चिकटून मार्गक्रमण करीत पोस्किव्होच्या दिशेने जात होती. स्वीस मधे तलावांच्या पाण्याचा रंग बाय डिफोल्ट कोबाल्ट वा सायन ब्लू असणारच. तसे हे पाणी अगदी निळेशार दिसत होते.
ब्रुझो व्हायडक्ट
मी ज्या गाडीने गेलो ती गाडी भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज ११ वाजून २५ मिनिटानी ब्रुसो वायडक्ट पार करते. आमच्या घरातील संगणकावर ओनलाईन वेबकॅम साईट ओपन करून हा फोटो काढला आहे. चार पाच दिवशी हा उद्योग करून पाहिला गाडी रोज अगदी वेळेवरच येते.
तिरानो ते सामेडान या मार्गावर ब्रूझो नावाच्या गावाजवळ एक वर्तुळाकार व्हायडक्ट आहे.
ब्रुसो गाव मागे टाकल्यावर वास्तविक ही एक आवश्यक अशी यांत्रिकी रचना आहे. पण याचा उपयोग पर्यटन व्यवसाय वाढविण्यासाठी या देशाने अत्यंत कल्पकपणे केला आहे. स्वीसच्या सर्व प्रवासी माहितीपत्रकात या रचनेला प्रसिद्धी देण्यात येते .मलाही त्या प्रसिद्धीची भूल पडलेली होतीच. हा मार्ग युनेस्को ने जागतिक वा॑रसा म्हणून घोषित केला आहे. असंख्य पूल व बोगदे असलेला हा मार्ग आहे. ही सर्व माहिती या मार्गावरून धावणार्या सर्व ट्रेन्स मधून रेकॉर्ड वाजवून दिली जाते . पण हा व्हायडक्ट अगदी एक मिनिटात पार करून गाडी पुढे सरकते. त्यामुळे जास्त फोटो घेता येत नाहीत.
पोस्किव्हो हे स्थानक मागे टाकल्यानंतर मात्र ट्रेनने डोंगरात खाचा करून तयार केलेल्या चढावरून आरोहण करायला सुरूवात केली. दरीतली हिरवाई मागे पडून आता झाडे अखंड हिमात न्हायलेली दिसू लागली.
रूळ सोडले तर सर्व बर्फच बर्फ. लांबवर नजर टाकली तरी उन्हात तळपणारे बर्फाचे मुकुट धारण केलेले एका पेक्षा एक देखणे पर्वत. असे दृष्य या मार्गावर एप्रिल अन्त व मे चा पहिला आठवडा या काळात आल्याने दिसत होते. एरवी भर हंगाम ( जुलै ऑगस्ट) मधे हे बर्फ नाहीसे होते.
बाजूचा आसमंत असे " भस्म माखले दिसे चराचर "असे दिसत असताना " आल्प ग्रुम " नावाचे स्टेशन आले. ब्रूसो चे व्हायडक्ट साधारण २६०० फूट उंचीवर आहे तर आल्प ग्रूम ६८०० फूट उंचीवर . इथे ही उंची गाठताना मीटर गेज रूळ असलेली ट्रेन कॉग व्हील शिवाय हा चढ पार करते हे विशेष ! हा ट्रॅक सिंगल असल्याने दुसर्या बाजूने येणार्या गाडीसाठी आमची गाडी थांबली . पण अगदी काही मिनिटेच. लगेज पुढचा प्रवास सूरू झाला.
६८०० फूटावरून आणखी चढण चढत गेले असता " ऑस्पिझिओ बर्निना " हे सुमारे ७३०० फूट उंचीवरचे ठिकाण आले. रेल्वेमार्गाच्या डाव्या बाजूस उंच पहाडावर तर बर्फ होतेच पण लागूनच असलेल्या " लेक बियान्को " वर ही बर्फ साचले होते. काही भाग निळाशार पाण्याचा तुकडा आपल्याला दाखवीत होताच. एखादेच मिनीट थांबून प्रवास पुढे सुरू झाला तो पॉन्ट्रेसिनाची दिशा पकडून. जसा उतार चालू झाला तसा सफेदी संपून आजूबाजूस हिरवाई दिसू लागली. डाव्या बाजूस ग्लेशियर पाघळून पाणी घेऊन येणारी निळी नदी खळाळत उताराच्या दिशेने उड्या मारीत झेपावताना दिसू लागली. व आमचे उतरण्याचे ठिकाण पॉर्ट्रेसिना आले.
पॉन्ट्रेसिना हून क्वारला जाताना गाडीत ध्यानात आले की आपला कॅमेरा बरोबर आलेला नाही. मी बर्निना भागाचे चित्रिकरण मोबाईल वर करीत असताना आमचे कुटुम्ब आमच्या कॅमेर्याने ऑटो मोडवर फोटो काढीत होते.गाडी बदलण्याच्या गडबडीत " सर्व काही बरोबर घेतले आहे ना ?" ही खबरदारी आम्ही घेत होतो ती राहिली. झाले. कॅमेरा गेला म्हणून गंगा जमुना यांच्या सह शोकसभा चालू झाली. तिने आणखी काही स्वरूप धारण करून सहलीचा विचका होऊ नये म्हणून मला मग त्यात जरा अध्यात्म व मानसशास्त्र यांचा आधार घ्यावा लागला. " आपण माणूस अकाली मेला तरी तेवढाच त्याला आपला ॠणानुबंध असे समाधान करून घेतो .. इथे तर वस्तू परत विकत घेता येणारी असे म्हणून झाले. तरीही शोक चालूच. मग कदाचित माझ्या हातून तो राहिला असण्याची शक्यता ५० टक्के आहे की नाही मग मी तर शांत आहे ना ? ..ही मात्रा जर लागू पडली. मग लूझर्न येस्तोवर कोणी बोलले नाही. मी मात्र मनातून खिन्न झालो होतो. रोम, फ्लोरेन्स मिलान व व्हेनिस येथील वास्तूंचे विविध असे पॅनॉरामिक व त्रिमिती ( त्या कॅमेर्यात उत्तम ३डी फोटो काढायची सोय होती )असे १०० एक फोटो काढले होते.ते सगळे आता " बर्निनार्पणमस्तू " झाले होते.
लूसर्न येथे मी एरिक व काटजा या जोडप्याचे बंगल्यात रूम बुक केली होती. तिसर्या मजल्यावर दोन रूम्स मधे शेअर केलेले किचन डायनिंग रूम व बाहेर हवे असेल तर टेरेस मधे शेअर्ड टेबल व खुर्च्या ." लूझर्न स्टेशन वरून २२ किंवा २३ नंबरची बस पकडून एबि़कॉन विभागातील एका स्टॉप समोरच त्यांचा॑ बंगला होता. अर्थात गुगल स्ट्रीट व्ह्यू मधून मी अगोदरच " तिथे" जाउन आलो होतो. लूसर्न हे स्वीस मधील एक महत्वाचे बेस सेंटर आहे. इथून माउंट टिटलिस, माउंट रिगी, व माउंट पिलॅटस येथे जाता येतेच शिवाय नुसते लूझर्न लेक मधून विहार करणे हा ही एक भन्नाट अनुभव आहे. लूसर्न व श्रीनगरची करूच नये पण तुलना केलीच तर श्रीनगर सरसकटपणे उणे ठरते. आजूबाजूची स्कयलाईन लूझर्न ची अफाट व कायमची बर्फाछादित असते. निळेशार नितळ पाणी . एकदम दिल्खेचक नजारा.स्टेशन समोरच अत्यंत सुरेख अस बस थांबा आहे. बसेस ट्राम पद्धतीच्या- म्हण्जे आहेत बस पण वरून तारांमधून मिळणार्या वीजेवर चालणार्या. बस अगदी लगेचच मिळाली.
आम्ही दोघे बसमधून उतरलो. आजूबाजूस पाहिले सगळे कसे लक्ख. रस्ता बसस्टॉप. काटजाने अगोदरच स्टॉप ते घर कसे यायचे तपशीलवार कळविले होते. पण बंगला गाठला तर बंगल्यात कुणीही नाही. काटजा ४ ला तिच्या नोकरीवरून म्हणजे शाळेतून येणार होती. निदान आपण आलो ते घर तरी बरोबर तेच आहे का हे पहावे म्हणून मी बंगल्याला चक्कर मारली. खिडकीतून पियानो दिसल्यावर खात्री पटली की आपण बरोबर आलो आहोत. आता दीडेक तास काटजाची वाट पहात बसणे म्हणजे आपल्या युरोप मधील अमूल्य वेळाला मुकण्यासारखे होते. पण माझा ईमेलवरून " किती ला येणार ?" हा निरोप काटजाला मिळाला असावा. अर्ध्याच तासात ती आपल्या मोटारीतून तिच्या पाच वर्षाच्या गोड मुलाला घेऊन उतरताना दिसली. काटजा माझ्या पेक्षाही उंच. आल्या आल्या नमस्कार चमत्कार झाल्यावर तिने आम्हाला आमची रूम दाखविली . इतर माहिती ही दिली. एका बाजूला आपली कामे उरकत ती आमच्याशी संवाद साधत होती. स्वीस मधे आपल्या सारख्या गृहनिर्माण संस्था अस्तित्वात नाहीत. बंगले बंगलेच फार. " इथे घर विकत घेणे फार दुरापास्त आहे. आम्हाला कसाबसा हा जुना बंगला मिळाला विकत. तो आम्ही रिनोव्हेट करून घेतलाय ! " काटजाने माहिती दिली. तिचा मुलगा गोड देखणा तिला कामात मदत करीत होता आपल्या नाजुक हातानी". दोन मुलींवर झाला ९ वर्षानी " जरा हंसतच तिने आम्हाला सांगीतले. " स्वीट बॉय " असे म्हणत मी त्याचा एक गालगुच्चा घेतला. मग आम्ही तिला काही खाजगी प्रश्न विचारले एकूण तिचा मनमोकळा स्वभाव पहाता ती खुलेल असे मला वाटले. " तुला पगार किती मिळतो ...? ? असे विचारल्यावर " सहा हजार फ्रॅन्क !! ? असे तिने उत्तर दिले" मग त्यातील कामवाल्या बाईला किती द्यावे लागतात असे विचारल्यावर " इथे महिन्याला कमीत कमी २००० फ्रॅन्कस द्यावे लागतात .... अगदी कायद्याप्रमाणे म्हणजे २४०० फ्रॅन्कस !! "
काटजाच्या घरातून एबि़कॉन परिसर
टेरेस मधे बसून पलोकडील जंगलाची हिरवाई पहात जेवण घेण्याची सोय
मी लगेच आमच्या मोलकरणीला आम्ही किती देतो याचा हिशेब केला व भारतात इतकी प्रचंड आर्थिक विषमता का याचे कोडे उलगडले. अर्थात तिथे हे रेट्स परवडत नसल्याने बरीच कामे घरी करण्याची संवय लहानपणापासून लागणे सक्तीचे ठरले आहे. "इथे तंदुरी नावाचे एक भारतीय उपहारगृह आहे ना ...? असे मी विचारल्यावर " लूझर्नला अनेक भारतीय उपहारगृहे आहेत. मी तंदुरीत गेलेय ... व मला तुमचे पदार्थ विशेषतः आमटी भात फार आवडतो ! " असे तिने सांगितल्यावर " तू आम्हाला दोघाना इथे बोलाव... आम्हाला कोणतेही काम करायची लाज नाही.. पगार नको पण आठवड्यातून एकदा तुझ्या खर्चाने स्वीस मधील एक जागा.. मग तुला रोज " राईस अॅन्ड करी !! " असे मी म्हणताच सारेच हंसत सुटलो.
बरंय मला तुमचा पियानो वाजवायचाय ..आणि तुझ्या मुलीनेही वाजविलेला ऐकायचाय. पण आता मला जरा डायरेक्शन दे की मी आता साडेआठ.. नउ पर्यंत लुसर्न कसे पाहू शकतो. ?" माझ्या या प्रश्नावर तिने एका कागदावर काही खरडले व आम्ही बाहेर पडलो. स्वीस पास असल्याने किती वेळा बसावे हा काही सवालच नव्हता.
" लोवेन प्लाटझ " ला उतरलात तर लायन मॉन्युमेंट चालत जाउनही पहाता येईल असे आम्हाला मिसेस काट्जा ने सुचविले होतेच त्याप्रमाणे त्या थांब्याला आम्ही उतरलो. स्वीसमधे लोकाना बर्यापैकी इंग्लीश समजते व त्या बद्द्ल इटलीमधे जो तिरस्कार त्या भाषेविषयी दिसला तसा इथे नव्हता. आम्हाला एखादे फळांचे दुकानाचाही शोध घ्यायचा होता. या चौकात एका मॉल मधे शिरलो पण फळे सोडून सगळे मिळत होते. बाहेर आलो.
लायन मॉन्योमेट लूझर्न
मोरपंखी मस्तक असलेले बदक - लायन मॉन्यूमेट
मग प्रथम लायन मॉन्युमेंट पाहू म्हणून चौकशी करता एकाने नीट रस्ता समजावून सांगितला. तो माणूस जपानी होता. पाचेक मिनिटात थोडा चढणीचा रस्ता चढून गेलो तर एका खडकात एक गुहे सारखा खोलगट भाग कोरून त्यात एका सिंहाचे शिल्प आहे. समोर पुष्करिणी असून त्यात मोरपंखी मस्तक असलेली बदके विहार करीत होती. हा मोठ्या गौरवाने खास टूरिस्ट स्पॉट म्हणून भारतीय यात्रा कंपन्या दाखवितात पण यात पहाण्यासारखे काहीही खास नाही. जी गोष्ट या लायन मॉन्युमेंट ची तीच गोष्ट त्या चॅपेल ब्रीज ची आहे. काही खास नाही. पण स्टेशन समोरचा पूल . पलीकडील व अलिक्डील इमारती. या परिसरात नुसते फिरणे आजूबाजूची बर्फाळ स्कायलाईन पहाणे हे ही रंजक ठरावे.
वरील तिन्ही फोटो चॅपेल ब्रीज परिसर लूझर्न
वाटेत कोणीतरी एकाने सांगितले होते की तुम्हाला मॉल हवा असेल तर लूझर्न रेल्वे स्टेशनखाली एक मॉल आहे. मग त्याकडे मोर्चा वळवला. मॉल मधे ब्रेड, काही फळे व आता कॅमेरा बरोबर नसल्याने १६ जीबी जे एक मायक्रो कार्ड विकत घेतले. मधे एक गंमत झाली. एका ठिकाणी दोन मुली कसल्यातरी पेयाचे सेल्स प्रमोशन करीत एक बाटली प्रत्येकाला मोफत देत होत्या. मी एका बाजूने गेलो. बाटली घेऊन पिशवीत टाकली. मग जराशाने बायको थांबली होती तिथे आलो व तिला ही सुवार्ता मोफत सांगितली. तिने ही मग एक बाटली आणली.मग मी पुन्हा अंगावरचा कोट काढून उलट दिशेने चालत येऊन आणखी एका बाटलीची कमाई केली. पेय आम्ब्याचा फ्लेवर असलेले पण काहीसे बियर सारखे लागणारे होते. आता आपल्या पासच्या जोरावर नौकाविहार करावा म्हणून बोटीच्या धक्यावर आलो पण हाय दैवा! इथेही सेंट पीटर सारखा अनुभव आला. प्रवेशाची साखळी आता बंद झाली होती. आमच्या पासून दहा पंधरा फुटावर असलेल्या बोटीने आमच्या देखत किनारा सोडला. पलिकडे आणखी एक बोट उभी होती. त्याना आम्ही दूरून भारत देशातून आलो आहोत आमची बोट हुकली वगैरे विनवण्या केल्या पण ती बोट वेगळीच होती. काहीतरी समारंभ पार्टी वगैरे बोटीवर होणार होतीसे दिसत होते. एकूण काय बोट चार्टर्ड होती. आम्ही निराशेने परत फिरलो. जाताना एखाद्या भारतीय भोजनालयात जेवावे असा विचार करून " तंदुरी" हे भोजनालय शोधू लागलो . ते करता " कांची" नावाचे एक भारतीय भोजनालयाची पाटी लोवेन प्लाट्झ मधे दिसली. वर गेलो. आतली सजावट वगरे मस्त होती. भोजनाच्या थाळीची चौकशी केली असता ती फारच महाग असल्याचे दिसत होते. मग पार्सलची एक थाळीची चौकशी झाली. रूपये २६००/ एका थाळीला असा भाव फुटला. पण आता रूमवर जाउन काही करायचा कंटाळा॑ आला होता. शिवाय आता नव्याने फळेही विकत घेतली होती. मग एक थाळी चे पार्सल घेतले व पुन्हा लोवेन प्लट्झ ते एबि़कॉन असा प्रवास करून १० मिनिटात रूमवर पोहोचलो. व जेवण केले. एकूण थाळी चांगली नव्हती. पण युरोपातील पहिलेच भारतीय जेवण होते ते मग गोड मानून घेतले.
रूमवर पोहोचलो असतानाच काटजाचा नवरा एरिक व त्यांचे सर्व कुटम्ब त्यांच्या खालच्या मजल्यावर जमा झाले होते. मला पियानो वाजवून पहाण्याची इच्छा होती हे काटजाने लक्षात ठेवले होतेच . त्यानी पियानोसमोर मला बसविले. त्या वाद्याला मी ६४ वर्षांच्या आयुष्यात स्पर्श देखील केला नव्हता तर ते वाजविण्याचे शास्त्रोक्त शिक्षण मला असणारच कसे.पण संगीताचे ज्ञान बर्यापैकी आहे असा विश्वास असल्याने त्याना काहीतरी वाजवून दाखवावे अशा हेतूने मी बसलो.खरे तर पियानो हे वाद्य दोन हात व दोन पाय यानी वाजवायचे वाद्य आहे.
हे पेडल्स एखादा स्वर जास्त वेळ कंपित रहावा तसेच स्वर धर्म बदलण्यासाठी वापरतात. मला फक्त की बोर्ड वाजवता येत असल्याने पेडल्स वापरण्याचा प्रश्न्च नव्हता. " मी काही पियानो शिकलेला नाही ! " असे त्या सर्वाना सांगूनच सुरूवात केली. किस्मत चित्रपटातील " लाखों है यहां दिलवाले" हे गीत बरोबर लयीत वाजू लागले. दोन्ही हाताची संवय एकदम " हवी तशी नसल्याने " पण स्वरज्ञान असल्ल्याने कांही रंजक कॉर्डस आपोआपच निघू लागल्या. मी स्वतः एका स्वर्गीय कर्णसुखात न्हाउ लागलो. हे गीत " रेड रिव्हर रॉक " या र॑चनेवर आधारित आहे. पण अंतरा व बाकी सांगितिक मालमसाला नय्यर साहेबानी असा काही सजविला आहे ही आज ५० वर्षांनंतरही हे गीत ऐकले जाते. माझे वाजवून संपले . एरिकच्या कुटंबाने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. माझ्या आग्रहावरून एरिकच्या मुलीनेही दोन रचना सादर केल्या अर्थात तिने योग्य ते प्रशिक्षण घेतल्याने पेडल्सचा वापर करीत वाजवीत असल्याचे दिसत होते.
हे सगळे उरकल्यावर एरिकचे आमचा दुसर्या दिवशीचा काय प्लान आहे अशी विचारणा केली. आम्ही माउंट टिटलिस चा उल्लेख केल्यावर तो म्हणाला " तिथे जाण्याचा काय खास उद्देश ?" " बर्फ बर्फ आणि बर्फ ... ! " असे मी उत्तर दिल्यावर त्याने मोबाईल वर वेदर वेबकॅम ची साईट उघडून काही वाचन केले. " तुमच्याकडे स्वीस पास आहे ना ... ? मग तुम्ही माउंट रिगीला का जात नाही. तिथे उद्या तुम्हाला बर्फ भरपेट अनुभवायला मिळेल व त्याच बरोबर लूसर्न लेक सफर, रीगी बान कॉगव्हील ट्रेन व केबल कार हे सगळे अनुभव एकही जादा फ्रॅन्क खर्च न करता !! " मग मी मान्यता दिल्यावर त्याने एका कागदावर कच्चा नकाशा खरडून दाखविला. "गुड नाईट टू ऑल ऑफ यू !! " असे म्हणत मी रूमवर आलो व निद्राधीन झालो.
प्रतिक्रिया
29 Jul 2017 - 2:45 am | कंजूस
फार छान चालली आहे सहल.
29 Jul 2017 - 6:57 am | प्रचेतस
जबराट डिटेलिंग आहे. मजा येतेय वाचून.
29 Jul 2017 - 8:14 am | रुपी
छान.. लेखन आणि फोटो आवडले.
आधी कधीही हात लावलेला नसताना पियानोअवर गाणे वाजवणे विशेष आहे!
29 Jul 2017 - 9:31 am | सिरुसेरि
मस्त लेखन . पण फोटो दिसत नाहीत .
29 Jul 2017 - 11:53 am | वरुण मोहिते
शैलीदार लिखाण आणि मस्त चालूये लेखमालिका .
29 Jul 2017 - 1:58 pm | कंजूस
कॅम्रा गेला हे वाइट झाले.
29 Jul 2017 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट चालली आहे सफर !
शेवटचे बर्फाळ फोटो पाहून जुन्या स्विस आठवणी जाग्या झाल्या. तुमचा कॅमेरा हरवला त्यामुळे आम्हीही तुमच्या फोटोंना पहायला मुकलो. मात्र, असे छोटेमोठे अपघात फिरताना होतात आणि ते त्वरीत विसरून जाऊन परत सहलीची मजा अनुभवणेच फायद्याचे असते.
चॅपल ब्रिजवरून फेरी मारली की नाही ? बर्याच रोचक इतिहासाचा तो साक्षीदार आहे.
ल्युत्झर्न तलावातली फेरी चुकली हे वाचून चुकल्याचुकल्यासारखे झाले होते. फार सुंदर अनुभव असतो तो आणि त्यामध्ये शहरातल्या काही महत्वाच्या इमारती व खाणाखुणा दिसतात. पण, नंतर पुढच्या दिवशी ल्युत्झर्न लेकची सफर करत असल्याने त्याची आपोआप भरपाई होईल !
पुढच्या स्विस भ्रमंतीची वाट पाहत आहे. टाका लवकर ! :)
29 Jul 2017 - 4:24 pm | चौकटराजा
तुमची ग्लेशियर व आमची बर्निना असे दोन्ही मार्गावर फिरणे झाले. झेर्माट येथेही गेलो होतो. तिथल्या फोटोची वेगळी शोकांतिका आहे पण ते पुढील विवेचनात येईल. पण एक खरे तुमची आठवण स्वीस मधे वारंवार येत होती.
29 Jul 2017 - 5:09 pm | पद्मावति
मस्तच!
30 Jul 2017 - 11:13 am | अजया
मस्त सुरु आहे सफर :)
31 Jul 2017 - 11:49 pm | राघवेंद्र
मस्त चालू आहे सफर !!!
6 Aug 2017 - 4:40 am | अत्रुप्त आत्मा
+१