समर्थांची शिवथरघळ - उपांड्या आणि गोप्या घाटांसोबत

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
28 Jul 2017 - 1:12 pm

.

खरं म्हणजे पावसाळ्यात डोंगरदर्‍यांच्यात भटकणे म्हणजे डोळ्यांना एक सुखद पर्वणीच असते. हिरवेकंच डोंगर, खळाळत्या नद्या, डवरलेली भातशेती, पांढरेशुभ्र धबधबे, सर्वत्र पसरलेले दाट धुके आणि या सर्वांतुन आपल्याला आपल्या लक्षापर्यंत घेवून जाणारी न चकवणारी पाऊलवाट.
हे सर्व अनुभवायला आम्ही अठराजण निघालो होतो. निमित्त होतं 'धबाबा तोय आदळे' ची शिवथरघळ पावसाळ्यात पाहण्याचं.

शनिवारी रात्री जेवणं उरकुन कुंबळ्यात पोहोचायला रात्रीचे दोन वाजले. रात्रीच्या धुक्यात गाडी चालवणं म्हणजे मोठे कर्मकठीण काम. त्यामुळे पोहोचायला अंमळ उशीरच झाला होता. गावातल्या मारुती मंदीरात पथार्‍या पसरवुन आणि सकाळच्या सुचना देवून झोपायला अडीच वाजले. सकाळची आन्हीकं उरकली आणि गावातच नाश्ता करुन बिनदुधाचा फक्कड चहा मारला.
पहिल्या नियोजनाप्रमाणे गोप्या घाटाने उतरुन शिवथरघळीत पोहोचायचं आणि आंबेनळीने चढुन केळदवाडी आणि पुढे कुंबळ्यात परतायचं असं ठरलेलं होतं. घाटांचा हाच क्रम उलटाही करता आला असता पण समोर सकाळी साडेसातला कुंबळ्यातुन पुण्यासाठी सुटणारी एसटी उभी होती तिने केळदवाडी गाठणं सोपं होतं. हे असं केल्यामुळे आमचं चारएक किलोमीटर चालणं वाचणार होतं आणि संध्याकाळी चढुन थेट गाडीपाशीच येणार असल्यामुळे हाच बेत नक्की केला. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. एसटीतुन केळदवाडीत पायउतार झालो त्यावेळी एवढं धुरकटलेलं होतं की दहा फुटांवरचंही दिसत नव्हतं. अशावेळी वाटा चुकण्याची दाट शक्यता असते आणि झालंही तसंच. नदीवरचा पुल ओलांडुन डावी मारायच्या ऐवजी मळलेल्या पायवाटेने उजवी मारली आणि इथंच घोळ झाला. खरं म्हणजे नदी ओलांडल्यावर पंधरा मिनीटात घाटमाथ्यावर पोहोचायला हवं होतं पण आम्ही जवळजवळ तास-दिडतास चालुन उपांड्याच्या वाटेवरल्या केळदवाडीत पोहोचलो. आता इथुन परत आंबेनळी गाठण्याऐवजी आंबेनळी ऐवजी उपांड्याने उतरुन जाऊ असं सर्वानुमते ठरवलं. तसं पहायला गेलं तर पावसाळ्यात आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते म्हणून तो धोकादायक होतो आणि त्यामुळेच त्या वाटेने पावसाळ्यात तरी कुणी जात नाही. आम्ही निसर्गाच्या थोडं विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला होता पण निसर्गाने आम्हाला वेळीच समज दिली होती. आम्हीही आमची चुक मान्य करुन उपांड्याने कर्णवडी गाठली. याने आमचं चालणं वाढलं खरं पण प्रवास बाकी निर्धोक झाला होता.
.

घाटमाथा सोडून बरंच खाली उतरल्यावर रायगड जिल्ह्यातल्या राजवडीपासुन अगदी दहा मिनीटावर कर्णवडी आहे. पण हे गाव आहे पुणे जिल्ह्यात. कर्णवडीतील सर्व लोक त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी रायगड जिल्ह्यावर अवलंबुन आहेत. एवढंच काय या गावाला रस्ताही रायगड जिल्ह्यातुन जोडलेला आहे. पावसाळ्यानंतर त्याचं डांबरीकरण सुद्धा होईल. सरकार दरबारी कराव्या लागणार्‍या प्रशासकीय कामांसाठी, मतदानासाठी मात्र हे सर्व लोक कागदोपत्री पुणे जिल्ह्यात आहेत.
कर्णवडीतुन आता आम्हाला शिवथरघळीत पोहोचण्यासाठी दोन पर्याय होते. पहिला म्हणजे राजवडीत उतरुन पुढे बारसगावातुन शिवथरघळीत जाणारा डांबरी रस्ता गाठायचा आणि चालत किंवा गाडीने शिवथरघळ गाठायची आणि दुसरा म्हणजे कर्णवडीतल्या पदरातुनच आंबेनळी गाव गाठायचं. तिथुन पुढे आंबे शिवथरवरुन शिवथरघळीत पोहोचायचं. आम्ही अर्थातच दुसरा पर्याय निवडला. हे वेगळं सांगायला नकोच.

.

कर्णवडी
.
.
.

कर्णवडीतली भेळपार्टी

.

शिवथरघळीत पोहोचलो तोवर एक वाजला होता. सर्वांनी झटपट दर्शन घेवून खिचडीचा प्रसाद घेतला. एवढं चालुन आल्यावर, बाहेरच्या थंड वातावरणात गरमागरम खिचडीची चव काय लागली म्हणून सांगु? आहाहा!!! घरुन आणलेलं जेवणही सर्वांनी तिथेच करुन घेतलं. घळी समोरच्याच हॉटेलात चहा घेतला आणि मधल्या शॉर्टकटने कसबे शिवथरच्या पुरातन खडकेश्वर महादेव मंदीरात गेलो. आता बाकी आम्हाला घाई करायला हवी होती. ढगांमुळं लवकर अंधारुन येतं आणि अंधार पडायच्या आत आम्हाला घाटमाथा गाठायलाच हवा होता. रस्त्याने चालतच कसबे शिवथर गाठलं. गावातल्या आजींना सह्याद्रीवाडीचा रस्ता विचारला. रस्ता सांगितल्यावर आजी म्हणतात कशा 'पोराहो!! तुम्हास्नी पाऊस-बिऊस लागतो का न्हाई?'त्यांच्या आवाजातला काळजीचा सुर चांगलाच जाणवत होता. म्हटलं अहो आजी आमच्याकडं असे डोंगर बघायला मिळत नाहीत ना, म्हणून येतो आम्ही. आमचं म्हणणं काही त्यांना पटल्यासारखं वाटलं नाही. पण समजूत काढण्यासाठी आम्हालाही तिथे काही फारवेळ थांबता येणं शक्य नव्हतं.
तडक सह्याद्रीवाडीतुन गोप्या घाटाच्या वाटेला लागलो. वाट चांगली मळलेली होती. सुरवातीला असलेल्या झाडीतुन वेडंवाकडं होत एकदाचे नाळेत शिरलो. नाळेत शिरल्यावर मात्र एक खात्री असते की आता आपण नक्कीच चुकणार नाही. ही नाळ आपल्याला कसंही करुन घाटमाथ्यावर घेउन जाईलच. ठिकठिकाणी दिसणार्‍या पायर्‍यांमुळे हा घाट फार पुर्वीपासुन अतिशय वाहता असावा असं उगीचच वाटुन गेलं. चालण्याच्या वाटेवरुन जोरात पाणी वाहत होतं. पावसाळ्यात नाळेत दरड कोसळण्याची शक्यता असते आणि नाळेत असल्याने ती चुकवणंही अवघड असतं. याबाबतीत प्रत्येकाला सुचना दिल्यामुळे नाळेत शिरल्यावर फारसं कुणी थांबत नव्हतं. त्यामुळे वाटलं होतं त्या वेळेपेक्षा लवकरच घाटमाथ्यावर पोहोचलो. तिथेच असलेलं खोदीव पाण्याचं टाकं पाहीलं आणि पुढे खरगवाडीतुन गोपे गावात गेलो. गोपे गावापर्यंत सध्या डांबरी रस्ता झालेला आहे त्यामुळं इथुन पुढचं कुंबळ्यापर्यंतचं चालणं अतिशय कंटाळवाणं झालं. कपडे बदलले आणि अंधार पडण्यापुर्वी तिथुन बाहेर पडलो. चहा घ्यायला तडक वेल्हाच गाठलं. अंताक्षरी खेळत खेळत पुण्याला आल्यामुळे उरलेला प्रवासही झाल्यासारखा वाटला नाही.
हे घाटवाटांचं व्यसन तसं फार वाईट. जो कुणी कसा का असेना एकदा का घाटवाटांच्या नादी लागला की मग किल्यांऐवजी त्याला घाटवाटाचं आवडायला लागतात. सोबत असणाऱ्या बहुतेकांना घाटवाटांचं व्यसन जडलंय. त्यामुळे दिवसभरात ट्रेक सुरु असताना घाटवाटांबद्दलच चर्चा सुरू होती. महाबळेश्वरचा, प्रतापगड युद्धाचा विषय निघाल्यावर तिथं असणाऱ्या घाटवाटांबद्दल आपसुकच बोलणं सुरू झालं. तिथल्या तायघाट, गणेशघाट, जोर ते मढीमहालची अवघड वाट, पांगळ्यावरुन दर्‍यात उतरणारी वाट, निसणीचा घाट, रडतोंडी ऊर्फ अश्रुमुखीचा घाट यावर बरीच चर्चा झाली. सरतेशेवटी अफजलखान वाईहुन ज्या वाटेने प्रतापगडापर्यंत आला त्या वाटेने जाण्याचं नक्की झालंय पण त्यासाठी आता पाऊस संपायची तरी वाट पहावीच लागेल.

.

प्रतिक्रिया

मोदक's picture

28 Jul 2017 - 1:20 pm | मोदक

भारी भटकंती..!!

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 1:15 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद मोदक

माम्लेदारचा पन्खा's picture

28 Jul 2017 - 1:31 pm | माम्लेदारचा पन्खा

अप्रतिम . . . . . . .

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 1:16 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

28 Jul 2017 - 1:36 pm | चौथा कोनाडा

एक नंबर ! सुंदर वर्णन अन फोटो !
पहिला फोटो भन्नाट !

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 1:19 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद
पाऊस खुप होता त्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

फोटोतला धबधबाच शिवथरघळीचा?

मोदक's picture

29 Jul 2017 - 11:37 am | मोदक

नाही, वेगळा आहे.

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 1:43 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद.
हा धबधबा आम्ही आंबेनळी गावातुन आंबे शिवथरला उतरताना लागला.

स्वच्छंदी_मनोज's picture

28 Jul 2017 - 7:14 pm | स्वच्छंदी_मनोज

अप्रतीम भटकंती, लेख आणि फोटो..
केळदला अनेक वेळा जाणे झालेय आणि उपांड्या घाटही दोन वेळा झालाय. ह्या दोन वेळच्या माझ्या अनुभवाबद्दल मी इथे दोन लेख लीहीले आहेत. :)

हे घाटवाटांचं व्यसन तसं फार वाईट. जो कुणी कसा का असेना एकदा का घाटवाटांच्या नादी लागला की मग किल्यांऐवजी त्याला घाटवाटाचं आवडायला लागतात >>> हे १०० % खरे आहे हे स्वानुभवावरून सांगू शकतो.

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 2:05 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद मनोज
तुम्हालाही घाटवाटांची आवड आहे पाहून आनंद झाला. अवघड असल्यानं तसं घाटवाटांच्या नादी फारच कमी लोक लागतात. पुन्हा कधी घाटवाटा करणार असाल तर मला सोबत यायला आवडेल.
उपांड्या घाटांच्या दोन्ही लेखांचे धागे द्यावेत.

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Aug 2017 - 3:56 pm | स्वच्छंदी_मनोज

पुन्हा कधी घाटवाटा करणार असाल तर मला सोबत यायला आवडेल. >>> नक्कीच कधीतरी करू प्लॅन एकत्र.

आपलीच प्रशंसा आपणच करू नये पण तुम्ही मागीतल्याच म्हणून ह्या घ्या माझ्या दोन लेखांच्या लिंक्स -

१. http://www.misalpav.com/node/22677

२. http://www.misalpav.com/node/36679

दिलीप वाटवे's picture

3 Aug 2017 - 9:39 pm | दिलीप वाटवे

वा भन्नाट राव. दोन्ही लेख भारीच जमलेत. अगदी मी स्वतः ट्रेक करतोय असं वाटलं. शेवत्या घाटाचा तर अफलातुनच. पण त्याचे फोटो दिसत नाहीत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2017 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर वर्णन आणि फोटो !

दिलीप वाटवे's picture

2 Aug 2017 - 2:06 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद डॉक्टर साहेब

>>घाटवाटांच्या नादी लागला की मग किल्यांऐवजी त्याला घाटवाटांच आवडायला लागतात >>>
मला तर किल्ले नकोच असतात. डोंगरात फिरणे हेच खरं. रॅाकपॅच नकोच. कुणाला घाई आहे इथे वर पोहचण्याची?
बाकी कुणी वाटे विचारलं "गडावर जाताय?"
"हो."
"देवाच्या दर्शनाला जाताय?"
"हो."
"इकडे एकदा पाया पडून नवस बोल्लात तर पुन्हापुन्हा यायला मिळतं!{नागेश्वर,वासोटा}"
"हो."
मज्जा!

हेम's picture

21 Oct 2017 - 7:03 pm | हेम

एकदम ओलाचिंब लेख. दिलीपजी, तुम्हाला मिपावर बघून खूप आनंद झाला. आता एकेक माहितीपर लेख वाचायला मिळतील यासाठी सरसावून बसलोय! आता येउदेत बाकीचे लेख झटपट!! :)