ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे

एक_वात्रट's picture
एक_वात्रट in भटकंती
16 Jul 2017 - 12:23 pm

आजचा आमचा दिवस खरं म्हटलं तर एक राखीव दिवस होता. काश्मीर खो-यात परिस्थिती कधीही स्फोटक होऊ शकते हे माहित असल्याने मी मुद्दामच आमच्या वेळापत्रकात हा एक जास्तीचा दिवस ठेवला होता. खास असे काहीच आज आम्हाला करायचे नव्हते. येथून ९० किमी दूर असलेले श्रीनगर गाठणे आणि तिथे जाताना लागणारे अवंतिपूरचे मंदिर पाहणे एवढेच आजचे आमचे किरकोळ लक्ष्य होते.

तेव्हा आम्ही उशीरापर्यंत लोळत पडण्याचा आनंद अनुभवला आणि सगळे आवरून हॉटेलात नाश्ता करून आरामात निघालो. पेहेलगामवरून श्रीनगरकडे जाणा-या रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत. सध्या मे महिना असल्याने या बागांमधे अर्थातच सफरचंदे नव्हती;तेव्हा आम्ही नुसती झाडे पाहूनच स्वत:चे समाधान करून घेतले. (नकळत काश्मीरमधे परत येण्यासाठीच्या कारणांत “सफरचंदांनी लगडलेली झाडे पाहणे” या अजून एका कारणाची भर पडली.)

साधारण दीड तासांत आम्ही अवंतिपूरला पोचलो. अवंति वर्मन (ज्याच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे) याने बांधलेले हे अवंतिस्वामी मंदीर आज भग्नावस्थेत आहे. हे मंदीर जरी भग्नावस्थेत असले तरी त्याचे अवशेष पाहून त्याच्या गतवैभवाची कल्पना येते. मंदीर नवव्या शतकात बांधले गेले असावे. मंदीराचा चौथरा मी पाहिलेल्या सगळ्य़ात मोठ्या मंदीर-चौथ-यांपैकी एक आहे हे नक्की. काळाचे घाव बसून आज मंदीराचा चौथरा नि काही खांबच उरले असले तरी ह्या मंदिराची भव्यता मनात ठसते. आज जर हे मंदीर उभे असते तर जगातल्या काही निवडक भव्यदिव्य मंदिरांमधे त्याची गणना करावी लागली असती यात अजिबात शंका नाही.

मंदिरातून निघताना एक विनोदी दृश्य दिसले. फक्त पाचच मिनिटांपुर्वी मंदिराच्या आवारात आलेल्या एका मोठ्या पर्यटकांच्या घोळक्याला त्यांचा टूर लीडर अक्षरश: हकलत होता. “चला, चला, चला. पाच मिनिटे झालीयेत. आपल्याला अजून पेहेलगामला जायचंय.” अर्थात त्याला काय म्हणणार म्हणा? सात दिवसात जर जम्मू, काश्मीर नि वैष्णोदेवी बसवायचे असेल तर त्याला अशी घाई करायलाच लागणार!

मंदिराच्या आवारात साधारण अर्धा तास घालवून आम्ही निघालो. श्रीनगरमधे पोचलो तेव्हा दीड वाजले असावेत. एखाद्या ठिकाणी गेल्यावर तिथले स्थानिक खाद्यपदार्थ चाखण्याचा आम्ही आवर्जून प्रयत्न करतो. काश्मीरचे पारंपारिक “वाझवां” जेवण सुप्रसिद्ध आहे आणि हे मिळण्याचे सर्वोत्तम ठिकाण समजले जाते श्रीनगरमधले “मुघल दरबार” रेस्त्रॉं. पण इथेही एक गंमत आहे. श्रीनगर मधल्या रेसिडेन्सी रस्त्यावर या एकाच नावाची दोन रेस्त्रॉं आहेत आणि तीही एकाच इमारतीत. एक रेस्त्रॉं आहे तळमजल्यावर आणि दुसरे पहिल्या मजल्यावर. अर्थात दोघेही आपणच “अस्सल आणि प्रसिद्ध” मुघल दरबार असल्याचा दावा करत असतात. बहुतांश लोकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही पहिल्या मजल्यावरच्या मुघल दरबारात गेलो. एकटाच मांसाहारी असल्याने वेगवेगळ्या डिशेस घेणे शक्य नव्हते तेव्हा वेटरच्या सल्ल्याने मी तिथले सगळे काही असलेले खास ताट मागवले. घरच्यांनी दम आलू काश्मीरी, काश्मीरी नान नि काश्मीरी पुलाव असे शाकाहारी खाणे मागवले. हॉटेल मांसाहारी असल्याने शाकाहारी जेवण कितपत चांगले मिळेल याबाबतीत मी साशंक होतो, पण माझी शंका चुकीची ठरली. मांसाहारी जेवण उत्तम होतेच, पण त्यांचे शाकाहारी जेवणही चांगले होते. ज्यांना काश्मीरमधे खास काश्मीरी जेवण जेवायचे आहे त्या खवय्यांनी श्रीनगरला गेल्यावर या रेस्त्रॉंला आवर्जून भेट द्यायला हवी.

या सुंदर जेवणानंतर जर सुंदर झोप मिळाली असती तर तिने या जेवणाला “चार चॉंद” लावले असते पण नियतीला ते मंजूर नव्हते (आयला, भारी झालेय ना हे वाक्य?) आमच्या मातु:श्री आमच्या बरोबर होत्या. एक स्त्री, सहलीतला शेवटची रिकामी संध्याकाळ आणि खासकरून कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ या गोष्टींचे पर्यावसन ज्यात होते तेच आमच्या बाबतीतही झाले आणि आम्ही सज्जादने नेलेल्या एका मोठ्या दुकानात शिरलो. शेवटी तिथे एक तास उलटून गेल्यावर आणि विकत घ्यायच्या वस्तुंच्या बिलाने पाच आकडे पार केल्यावर माझा संयम सुटला आणि मी आईला थांबवले. आम्ही तिथून निघालो तेव्हा चार वाजून गेले असावेत.

हाऊसबोटीवर गेल्यावर काहीही विशेष घडले नाही. काही तासांपुरतेच आमच्या वाट्याला उरलेले काश्मीर आम्ही डोळ्यात आणि कॅमे-यात साठवायचा प्रयत्न केला एवढेच.

प्रतिक्रिया

देवळाचे फोटो मस्त! आणखी काही फोटो टाका की.

काश्मिरी कशिदा सुरेख असतो, खरेदी तर होणारच :)

पद्मावति's picture

16 Jul 2017 - 10:25 pm | पद्मावति

वाह! देवळाचे अवशेष सुरेख!

दुर्गविहारी's picture

17 Jul 2017 - 5:36 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलय, मात्र फोटो थोडे जास्त टाका. सध्याची परिस्थिती बघता काश्मीर बघणे होईल कि नाही याची शाश्वती उरलेली नाही. निदान तुमच्या फोटोवर तरी समाधान मानुया.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2017 - 2:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर झाली सफर ! फोटो जितके टाकाल तितके कमीच पडतील !