जागतिक विक्रम आपल्या नावावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणार्या देश-शहरांमध्ये दुबईचा फार वर... बहुदा पहिला... क्रमांक आहे. किंबहुना असे करून आपले नाव सतत चर्चेत रहावे आणि त्याचा आपल्या महत्वाचे उत्पन्न असणार्या पर्यटन व बांधकाम व्यवसायांना उपयोग व्हावा असा दुबई प्रशासनाचा सतत प्रयत्न असतो.
असे "गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड"ने दुबईच्या नावावर नोंदवलेले ४१७ जागतिक विक्रम इथे पहायला मिळतील. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे इथे विचारणा केल्यास अजून जास्त विक्रम सापडू शकतील.
अश्याच जागतिक विक्रम ठरू शकणार्या, ड्रोन (चालकविरहित, हवाई) टॅक्सी प्रकल्पामुळे, दुबईचे नाव परत एकदा जगासमोर आले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये दुबईच्या Roads and Transport Authority ने ही व्यवस्था दुबईत लवकरच उपलब्ध होईल अशी घोषणा केल्यापासून स्थानिक आणि एकंदरीत जगातिल लोक या सेवेची उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत.
EHANG या चीनी कंपनीचे २४० किलोग्रॅम वजनाचे EHANG184 नावाचे मॉडेल या सेवेसाठी वापरले जाणार आहे. कंपनीच्या दाव्याप्रमाणे त्यांचे मॉडेल जगातले सर्वात जास्त सुरक्षित, हुशार (स्मार्टेस्ट) व पर्यावरणपूरक मॉडेल आहे. सुरक्षित असूनही वजन कमी ठेवण्यासाठी त्याच्या बांधणीत खास मटेरियल्स वापरलेली आहेत. Autonomous Aerial Vehicle (AAV) या नावाने या सेवेच्या अनेक चांचण्या पुर्या झाल्या आहेत. हवामानात अचानक मोठा बदल झाला किंवा उडत असताना इंजिनात बिघाड झाला तरी ड्रोनटॅक्सी प्रवाशासकट जवळच्या सुरक्षित स्थानापर्यंत अचूकपणे व सुरक्षितपणे पोचावी (Fail Safe system) यासाठी खास व्यवस्था आहेत आणि त्या व्यवस्था आधिक विश्वासू बनवण्यासाठीच्या चांचण्या सद्या चालू आहेत.
आरामदायक आसन व एअरकंडिशनिंगने परिपूर्ण असलेली आणि बॅटरीवर चालणारी ही हवाई टॅक्सी ३,५०० मीटर (११,५०० फूट) उंचीवरून ६० किमी प्रतितास दराने २५ मिनिटांपर्यंत ऊडत प्रवाशाला त्याच्या गंतव्यापर्यंत पोहोचवेल. तिची बॅटरी एका तासात परत पूर्णपणे चार्ज करता येईल. ड्रोनटॅक्सीतला टच-स्क्रीन वापरून नकाशावर आपले गंतव्यस्थान निवडणे आणि प्रवास सुरू करण्याचे बटण दाबणे, इतकेच प्रवाश्याने करणे अपेक्षित आहे. त्यानंतर सगळे ड्रोनटॅक्सीवर सोपवून आरामात प्रवासाची मजा उपभोगणे अपेक्षित आहे.
पुढच्या काही महिन्यांत दुबईला भेट देणार असलेल्या मिपाकरांनी या विक्रमी सेवेचा फायदा घेऊन इथे आपल्या अनुभवांवर एखादा लेख लिहिला तर आश्चर्य वाटायला नको.
ही सेवा सुरु होण्यापूर्वीच आपल्या घरात बसून तिचा व्हर्च्युअल अनुभव घेण्यासाठी ही चलतचित्रफीत पहा...
(युट्युबवरून साभार)
प्रतिक्रिया
13 Jul 2017 - 4:36 am | निशाचर
ड्रोन टॅक्सी हा स्वयंशासित वाहतूकीसाठी मैलाचा दगड असेल. परंतु या ड्रोनच्या मानवासहित चाचण्या झाल्या आहेत का आणि झाल्या असल्यास त्या कितपत यशस्वी झाल्या ही माहिती अजून मिळालेली नाही. त्यामुळे या उन्हाळ्यात टॅक्सी सेवा सुरू होणार होती, ते लक्ष्य गाठणार कि कसं हे लवकरच कळेल.
त्याशिवाय एका वेळी १०० किलोपर्यंत वजनाचा एक माणूस आणि बरोबर एक बॅग एवढीच या ड्रोनची क्षमता असल्याने ट्रॅफिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सध्यातरी विशेष फायदा होईल असं वाटत नाही. तसेच उन्हाळ्यात दुबईची उष्ण हवा आणि आर्द्रता ड्रोनच्या कामगिरीवर परिणाम करतील काय अशी शंका येते.
हायपरलूपचीही दुबईत चाचणी होणार असं वाचलं होतं. एकंदर दुबई इतरांच्या दोन पावलं पुढे आहे, हे नक्की!
13 Jul 2017 - 6:28 am | एस
रोचक!
13 Jul 2017 - 9:06 am | सतिश गावडे
भन्नाट आहे हे. पण आपल्या (भारतीयांच्या) पुर्वजांनी हे तंत्रज्ञान पाच हजार वर्षांपूर्वीच विकसित केले होते हे ही येथे गौरवाने नमूद करावेसे वाटते.
13 Jul 2017 - 9:22 am | अभिजीत अवलिया
:-D
13 Jul 2017 - 9:17 am | अभिजीत अवलिया
वजन वाहून नेऊन नेण्याची क्षमता फक्त १०० किलो असल्याने एका वेळी जेमतेम एकच माणूस आणि एखादे लहान मूल जाऊ शकेल यातून. त्यामुळे कितपत यशस्वी होईल शंका वाटते. भविष्यात वजन वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ झाली तर फार उपयुक्त होईल.
20 Jul 2017 - 3:48 pm | दीपक११७७
दुबईत १०० किलो पेक्षा जस्त वजनाची माणसे आहेत.
13 Jul 2017 - 10:32 am | अभ्या..
लंबी जुदाईची कॅसेट असणारा कारटेप आणि झंकार बिटसवाले स्पीकर असले तर विचार करण्यात येईल. बादवे "सिर्फ तुम, घर कब आवोगे, आईवडील तात्या अण्णांचा आशीर्वाद " कुठे लिहायचे?
ओपन खिडकीची सोय तर हवीच.
14 Jul 2017 - 6:11 pm | कुंदन
उदघाटनाला अभ्या... ला बोलवावे का ?
तेव्हढ्याच टॅक्स्या फुकटात रंग रंगोटी करुन मिळतील
13 Jul 2017 - 2:17 pm | पद्मावति
मस्तच!
13 Jul 2017 - 2:25 pm | मोदक
रस्ते / रूळ किंवा पाण्यात वाहनाचा मार्ग ठरवणे हा महत्वाचा भाग असतो. हवेमध्ये उंची हे एक नवीन परिमाण वाढते.
या सर्वांवर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्यासाठी किती मोठी यंत्रणा उभी राहणे आवश्यक आहे याचा विचार करता "खर्च अवाक्यात असेल का?" हा मुद्दा विचारात घेतला तर प्रत्यक्षात ही कल्पना किती यशस्वी होईल याची शंका वाटते.
अर्थात दुबई म्हटल्यावर त्यांनी अशा गोष्टींचा विचार केला असेलच - या प्रकल्पाच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असेन.
13 Jul 2017 - 7:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ १०० किलो वजनाची एक व्यक्ती व एक बॅग...
महत्वाचा मुद्दा म्हणजे, सायफाय पिक्चरमध्ये दाखवतात तसे, सगळ्या नागरिकांना उपलब्ध असलेली आणि शहरभर फिरणार्या टॅक्सीची ही सेवा नाही... ते स्वप्न सत्यात यायला अजून काही दशकांचा वेळ आहे ! ;) :) ही केवळ त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याची नांदी आहे.
चार्टर्ड हेलिकॉप्टर पेक्षा खूप कमी आणि ड्रायव्हरसकट असलेल्या चारचाकीपेक्षा काही पटींनी जास्त, असा या सेवेचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, ड्रोन सुरक्षितपणे उतरण्यासाठी खास थांब्यांची व्यवस्था जरूर असल्याने, ही सेवा सुरुवातीला तरी फक्त कार्यालयीन कामासाठी दुबईत फिरणार्यांसाठी उपयोगी आणि परवडणारी असणे सहाजिक आहे. अश्या प्रवाशांना, रहदारीत न अडकता वेळेवर गंतव्याला पोहोचणे महत्वाचे असते आणि त्यासाठी ते "योग्य तेवढा जास्त" खर्च करायला तयार असतात. दुबई एक जागतिक अर्थकेंद्र व बाजारपेठ असल्याने तेथे या सेवेला फायदेशीर होण्यासाठी आवश्यक असतील तितके प्रवासी मिळतील अशी अपेक्षा आहे.
पर्यटकांना गंमतीची हवाई रपेट करत दुबईचे विहंगम दर्शन देणे हा तिचा दुसरा उपयोग होईल. सद्या हे काम हेलिकॉप्टरने केले जाते. त्यापेक्षा ही सेवा स्वस्त असेल... मात्र सद्या तरी ही सेवा एकल असल्याने सर्व कुटुंबाला तिचा एकत्र आस्वाद घेता येणार नाही.
दुबईस्थित असलेल्या चार-पाच माणसांच्या कुटुंबाला खरेदी अथवा फिरण्यसाठी ही सेवा सद्या तरी खूप महागडी पडेल यात संशय नाही... तसाही, महाग आणि मोजक्या गंतव्यांवर जाणार्या या सेवेचा उपयोग अश्या प्रवाशांसाठी फारसा नाही. त्यांच्यासाठी तुलनेने खूप स्वस्त, जवळ जवळ सर्व शहरभर (आणि बाहेरही) नेणार्या आणि जास्त प्रवासी वाहून नेणार्या मेट्रो व टॅक्सी सारख्या सेवा; किंवा खाजगी चारचाकी जास्त योग्य असतील.
तसे असले तरी; अशी सेवा व्यवहारात येऊ शकते हे दुबईने दाखवून दिल्यानंतर, ती जास्त उपयोगी, एका वेळेस जास्त प्रवासी वाहून नेणारी आणि जास्त स्वस्त कशी बनवता येईल इकडे जगभरच्या संशोधकांचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष रोखले जाईल, हा फार मोठा फायदा आहे... त्याचा परिणाम, अनेक इन्नोव्हेटर्स/इन्नोव्हेशन्स पुढे येऊन, अशी सेवा सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य गरजांसाठी उपलब्ध होण्यासाठी होईल, यात संशय नाही.
13 Jul 2017 - 7:57 pm | जेम्स वांड
आरारा काका लेखापेक्षा स्पष्टीकरण लंबेचवडे झाले की हो, आपण उगा मजा पाहावी फक्त (म्हणजे मी पाहतो, अश्या तांत्रिक विकासाची गम्मत) , शेखाला नाय पैश्याला ददात अज्याबात.
(थोडा खेळकर प्रतिसाद लिहिलाय पण तुमचं वरिष्ठ अस्तित्व कायम लक्षात आहे, जास्त बोलून गेल्यास माफ करा लहान समजून)
13 Jul 2017 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
वरचा प्रतिसाद केवळ तुम्हालाच नव्हता. इतर काही जणांनाही "१०० किलोचा एक प्रवासी व एक बॅग" या मुद्दलावर ही सेवा टॅक्सीपेक्षा जास्त भारी कशी असा प्रश्न पडल्याचे त्यांनी लिहिले आहे. तेव्हा, तो गैरसमज दूर करण्यासाठी, त्या दोन सेवांमधील मूलभूत फरक जरा विस्ताराने लिहिणे जरूरीचे होते. ते केले.
बाकी, "वरिष्ठ अस्तित्व" वगैरे आपापल्या जागी ठीक. पण, लेखनातला मुद्दा आणि त्यामागचे वास्तव पुरावे/विचार महत्वाचे. :) ;)
14 Jul 2017 - 4:57 pm | अकिलिज
सर्वसाधारणपणे विद्युतघटावर यांत्रिक कामे अजून तितकी फारशी उपयोगी झालेली नाहीयेत, असं आपलं गरीबाचं मत.
माझ्या बर्याच मित्रांचा त्यांच्या बॅटरीवरच्या कारचा अनुभव जाणून घेतला. सांगताना आपली निवड चूकली हे लपवण्यासाठी सांगता कि एकदम झक्कास पण जरा खोलात जाऊन विचारलं तर म्हणतात की तसं कामचलाउच आहे म्हणून. टेस्लावाले ५५० किमीची हमी देतात पण वातानुकूल यंत्रणा नुसती लावली तरी ३००च घाबरत घाबरत जाते.
तस्मात, बॅटरीवर चालणारी टॅक्सी आणि ती ही हवाई..... लैच लांब आहे अजून. खूप जास्त ताकदीच्या आणि तरीही वजनाला हलक्या बॅटर्या तयार व्हायला अजून बराच काळ जावा लागेल.
16 Jul 2017 - 6:04 am | चौकटराजा
तसे पाहू गेले असता आताचे कोणतेही " बॅटरी" तंत्रज्ञान हे अचाट कामे करून घेण्यासाठी प्रत्यक्ष पातळी वर अपुरेच आहे. "त्या" क्रांतिकारी विद्युटघटाची मानवाला प्रतिक्षा आहे. पण निसर्ग आपले अत्यंत महत्वाचे गुपित फोडायला तयार नाही. कोणतेही रेडीएशन नसलेली अणूउर्जा अगदी खेळण्यातही वापरण्याचे तंत्र मानवाला सापडेल काय ???
15 Jul 2017 - 3:27 am | उपाशी बोका
तंत्रज्ञ्यान उपलब्ध झाले तरी ते वापरायलाच हवे का? असा विचार डोक्यात आला.
15 Jul 2017 - 10:31 pm | तेजस आठवले
ह्या ड्रोन मध्ये फक्त एकच प्रवासी बसणार आणि ती उडत तिच्या गंतव्य स्थानी जाणार, चालकासकट का प्रवासी एकटाच ह्या यंत्रात?
मरताना कोणी सोबत नसतं, आपण जगात एकटे येतो आणि एकटे जातो अश्या गोष्टी ड्रोन टॅक्सीत बसताना आठवल्या नाहीत तरच नवल. हवेत त्रिशंकू सारखे एकटेच तरंगत राहणे... मला तर विचारानेच चक्कर येऊ लागली बघा :) माझा पास.
16 Jul 2017 - 3:44 am | गामा पैलवान
सतिश गावडे,
भन्नाट आहे हे. पण आपल्या (भारतीयांच्या) पुर्वजांनी हे तंत्रज्ञान पाच हजार वर्षांपूर्वीच विकसित केले होते हे ही येथे गौरवाने नमूद करावेसे वाटते.
अहो पण तुमचा पूर्वज माकड आहे ना? इति डार्विन. म्हणूनंच की काय माकडाने भिरभिऱ्या उडवणं तुम्हाला गौरवास्पद वाटतं!
आ.न.,
-गा.पै.
17 Jul 2017 - 8:22 pm | टर्मीनेटर
झकास... अत्यंत चांगला प्रकल्प.
दुबई ने जगभरातील पर्यटकांची मने त्या चीमुकल्या देशातील अनेक नेत्रदीपक आकर्षणांनी जिंकलेली आहेतच, त्यात अजून एक भर पडत आहे.
राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी असेल तर केवळ ५० वर्षात अत्यंत मर्यादित नैसर्गिक साधन संपत्ती असूनही वाळवंटाचे नंदनवन कसे करता येऊ शकते हे याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी दुबई हे मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन आहे. एकंदरीत तिथे उपलब्द्ध असलेल्या प्रवासाच्या सुविधा आणि त्यांचा दर्जा पाहता हा प्रकल्प देखील यशस्वी होईल अशी आशा आहे आणि ह्या सेवेचा उपयोग तेथे येणारे प्रवासीच एक थ्रिलिंग एक्सपीरियन्स म्हणून करतील ह्याची खात्रीच वाटत आहे.
12 Oct 2017 - 2:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
८ ते १२ ऑक्टोबरला दुबईत साजर्या होत असलेल्या Gitex Technology Week 2017 च्या निमित्ताने दुबईच्या रस्ते व वाहतूक प्राधिकरणाने (Roads and Transport Authority, RTA) अनेक आधुनिक तांत्रिक सेवा (स्मार्ट सेवा) उपलब्ध केल्या व इतर अनेक नजिकच्या भविष्याकालात येणार्या स्मार्ट सेवांची ओळख करून दिली. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत...
१. शाईल (S’hail) मोबाईल अॅप : याच्यावरून दुबईच्या सर्व वाहतूक सेवांचे बुकिंग आणि मुल्यभरणा करता येईल; उदा: मेट्रो, बस, वॉटरबस, टॅक्सी आणि e-Hail, Uber व Careem इ-कॅब सेवा.
२. थोड्याच दिवसांत इतर सेवासुद्धा या अॅपवर उपल्ब्ध असतील; उदा: पाम मोनोरेल, डाऊनटाऊन दुबई ट्रॉली, Volocopter या कंपनीची दोन प्रवाशांची वाहतूक करणारी स्वयंचलित (चालकाविना) हवाई टॅक्सी.
३. Volocopter ने तिच्या सेवेची चाचणी गेल्या महिन्यात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. Volocopter टॅक्सी दोन प्रवाशांना घेऊन १०० किमी प्रतितास या वेगाने ३० मिनिटे उडू शकते.
४. दुबई पोलिसांनी हॉवरबाईकच्या चांचण्या घेणे सुरू केले आहे...