अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग ३
लवकर झोपी गेल्यामुळे मला दुसर्या दिवशी पहाटे ४ लाच जाग आली. उठल्यावर माझं घड्याळ बिघडलय का काय झालय हे कळेचना थोडा वेळ. सुर्य उगवायला लागला होता. मग लक्षात आलं की काल ५.३० लाच अंधारुन आलं होतं!! मग काय नवरोबाला उठवला लगेच पटपट आवरलं आणि पोर्ट ब्लेअर च्या आबर्दीन जेट्टी कडे गेलो.
आम्हाला थोडक्यासाठी एक सुंदर सुर्योदय चुकला होता, म्हंटल जाऊदेत आता उद्या पाहुयाच. बराच वेळ तिथे घालवल्यावर मग मन मारेल तस आणि रस्ता फुटतो तिथे भटकायचं ठरवलं आणि बाईक घेऊन आम्ही निघालोच. हे त्या वाटेतले काही फोटो.
ही आबर्दीन जेटी
हे जहाज बहुतेक हॅवलॉक ला निघालय
हे नॉर्थ बे बेट. ह्याला तुम्ही कुठेतरी पाहिलय (नक्की), आठवतय का काही?
आता आम्ही कोर्बिन्स कोव्ह बीच च्या रस्त्याला लागलो होतो
कोर्बिन्स कोव्ह बीच ची किनारपट्टी
कोर्बिन्स कोव्ह बीच
इथे थोडावेळ क्लिकक्लिकाट करुन पुढच्या रस्त्याला लागलो. कुठे वगैरे काही माहित नाही. वाटेत कित्येक खेडी लागली. त्या खेड्यातल्या वस्त्या, घरं, जनावरं, आणि मुख्य म्हणजे तिथले लोक यांच निरीक्षण करत आम्ही जात होतो. अंदमानी लोक खूप भोळे-भाबडे, मदतीला अत्यंत तत्पर, नियमप्रिय, प्रामाणिक , मायाळु आहेत. आपल्या घरांमधे कोणतीही भाषा का बोलेनात तुमच्याशी अगदी अस्खलित हिंदी बोलतात. जिथे जिथे आम्ही वाटेत थांबलो तिथे तिथे लोकांनी आमची चौकशी केली. आम्हाला काही हव नको ते विचारलं. ह्यामागे त्यांची कोणतीही अपेक्षा नव्हती. मला खरं सांगायचं तर त्या प्रेमाने अगदी भरून आलं.
या बेटांवर अजूनही ठिकठिकाणी त्सुनामीच्या वाताहातीच्या खुणा दिसतात. अर्थात लोकांची घरं , उडलेली छपरं , जहाजं वगैरे दुरुस्त झालीत पण तेव्हा पडलेल्या मोठमोठाल्या झाडांचे ओंडके, समुद्राच्या वाढलेल्या पातळीमुळे बुडलेले रस्ते आणि मग बांधलेले नवे रस्ते ई. इथे झालेल्या वाताहातीचा अंदाज येतो. अश्याच एका पडलेल्या झाडाचा ओंडका.
हे महाशय बराच वेळ लपाछपी झाल्यानंतर असे सापडले
मला नेहमी नव्या प्रदेशात गेल्यावर तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या घरांबद्दल, संस्कृतीबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं .ही अंदमानमधली काही घरं. ही घरं बघितल्यावर मला "गोव्याची" सय आलीच. अंदमानी लोकही आमच्या गोवेकरांसारखे रंगांच्या प्रेमात आहेत. अंदमान अजुन एका अंगाने माझा वाटायला लागला.
इथे एकही नदी नाहीये. मात्र पावसाच्या पाण्याला ते साठवतात
ही खरंतर एका मिडल स्कूल ची इमारत आहे. तिचं काम पाहिलत का? लाकडी आहे ती शाळा. पारंपारिक अंदमानी घरं अशीच असतात लाकडाची. ओट्यापासुन जमिनीपर्यंत सगळं लाकडाचं. सुनामीनंतर लोकं काँक्रिटची घरं बांधु लागले आहेत
अंदमानी मगरी कुठेही आढळु शकतात त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होऊ नये म्हणून अश्या जाळ्या/ तारा लावल्या आहेत
इथे डाव्या बाजुला एक चौथरा दिसतोय का तुम्हाला? हे टुरिस्ट हेल्प सेंटर क्म वॉशरुम होतं. सुनामीनंतर समुद्राने आपली पातळी ओलांडली, आता ते भरतीला पुर्ण बुडतं. ओहोटीला दिसतं. तिथला खर तर सगळ्या किनारी भागातला रस्ता धुऊन गेला होता, आता समुद्राच्या नव्या मर्यादेनुसार पुन्हा व्यवस्थित बांधलाय .
ही सुद्धा एक सरकारी शाळाच आहे. नो युनिफॉर्म!! इतक्या मस्त शाळेत मला आवडेल बाबा शिकायला.
केवढाले वृक्ष होते एकेक. हे उगाच माझ्या क्षुद्रतेच्या अंदाजासाठी. हे मूळ आहे फक्त झाडाचं जे सुनामी मधे मुळासकट उपटुन गेलं होतं.
हे सगळे मला माझेच वाटु लागले. माझ्या एकेकाळच्या गोव्यासारखेच डोंगर,झाडं, समुद्र तर होते इथे. पण ते खरच गोव्यासारखे होते का? खरं सांगायचं तर गोव्याहुनही खूप जास्त सुंदर आणि श्रीमंत !!! अंदमानला समुद्र इतका श्रीमंत आहे, तुम्हाला कोणत्याही किनार्यावर मेलेले /जिवंत कोरल्स दिसु शकतात.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jun 2017 - 12:47 pm | अप्पा जोगळेकर
काय भारी फोटो काढलेत. सहीच
12 Jun 2017 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
12 Jun 2017 - 2:03 pm | गॅरी ट्रुमन
हा पण भाग आवडला.
अंदमानातील राधानगरचा समुद्रकिनारा भारतातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे असे म्हणतात. त्याचेही फोटू आले तर छानच वाटेल.
दुसरे म्हणजे मुंबईत किंवा गोव्यात समुद्रकिनार्यांवर पश्चिम किनारपट्टीवर असल्यामुळे समुद्रात सूर्य मावळताना दिसतो. पण ओरिसा किंवा आंध्र प्रदेशातील समुद्रकिनार्यांवर पूर्वेकडे असल्यामुळे सूर्य समुद्रातून उगवताना दिसतो. अंदमानात काही बेटे अगदीच चिंचोळी आहेत त्यामुळे पूर्व-पश्चिम अंतर फार नाही. काही लोक सकाळी पूर्वेकडून समुद्रातून सूर्य उगवताना बघतात आणि त्याच बेटावरून संध्याकाळी पश्चिम टोकाला जाऊन सूर्य मावळताना बघतात असे ऐकले आहे. तसा प्रयत्न केला होता का?
12 Jun 2017 - 6:26 pm | प्रीत-मोहर
दादुस मी यावेळी हॅवलॊक ला नाही गेले. नाहीतर नक्कीटाकला असता राधानगर बीच चा फोटो.
हो ना केला होता. सुर्योदय आणि सुर्यास्त दोन्ही टिपलेत. फोटो पुढल्या भागांमधे येतील
12 Jun 2017 - 2:44 pm | आदूबाळ
वाचनखूण!
स्थानिक माणसांचे हृद्य अनुभव लक्षद्वीपलाही आले आहेत.
बादवे - लक्षद्वीपला एकदा जरूर जाऊन या! डोळ्यांचं पारणं फिटतं आणि तरी काही बाकी राहतं.
12 Jun 2017 - 6:32 pm | प्रीत-मोहर
नक्की जायचय. पण हा लागोपाठ तिसरा प्रवास समुद्रकिनार्यावरचा. आता कुठेतरी डोंगरात जायचय आणि मग परत समुद्र चालेल.
12 Jun 2017 - 4:42 pm | दशानन
झकास!
12 Jun 2017 - 5:14 pm | गवि
अठ्ठावीस वर्षांपूर्वी अंदमान भटकलो होतो.
अाता परत गेलो तर "च्यॅक, पूर्वीचं अंदमान राहिलं नाही" असं म्हणावं लागेल या भीतीने परत जात नव्हतो.
12 Jun 2017 - 6:29 pm | धर्मराजमुटके
मस्त मालिका ! अंदमानात 'घासफुस ओन्ली' साठी काही हॉटेल्स आहेत काय ?
12 Jun 2017 - 6:33 pm | प्रीत-मोहर
हो हो. मी स्वतः शाकाहारी ओन्ली आहे. होटेल ब्लु सी हे जबरी होटेल आहे
12 Jun 2017 - 9:31 pm | पद्मावति
वाह...हाही भाग अतिशय आवडला.
13 Jun 2017 - 6:41 am | मी कोण
भाग आवडला. आम्हाला अंदमानला जायचे आहे, तेथिल पत्ते, फोन नंबर दिले तर बर होईल.
13 Jun 2017 - 10:30 pm | रुपी
मस्त झालाय हाही भाग.
ते नॉर्थ बे बेट कुठे पाहिलंय काही आठवत नाहे.. तूच सांगून टाक :)
13 Jun 2017 - 11:38 pm | प्रीत-मोहर
भारतातल्या २० रु. च्या नोटवर. :)
13 Jun 2017 - 11:03 pm | रातराणी
मस्त झालाय हाही भाग! पुभाप्र!
14 Jun 2017 - 9:07 am | प्रचेतस
भारी आहे अंदमान
14 Jun 2017 - 11:14 am | सानझरी
छानेत फोटो आणि वर्णन...!
14 Jun 2017 - 6:42 pm | सूड
कसलं सुंदर आहे हे!!
15 Jun 2017 - 4:04 pm | स्मिता चौगुले
छान झालाय हाही भाग.. वाचते आहे
15 Jun 2017 - 4:18 pm | गवि
पावसाळ्यात जॉलीबॉय आणि इतर अनेक सर्वोत्कृष्ट ठिकाणं फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे बंद असतात. तो काळ टाळावा.
15 Jun 2017 - 6:06 pm | प्रीत-मोहर
मी गेले त्यादिवसापासून तीन दिवसांनी jolly boy बंद होणार होतं. पण रेड स्किन ओपन असेल आता. तेही छान आहे
15 Jun 2017 - 6:56 pm | निशाचर
हा भागही आवडला.
19 Jun 2017 - 4:41 pm | प्रीत-मोहर
अप्पा जोगळेकर, डॉ सुहास म्हात्रे, गॅरी ट्रुमन,आदूबाळ, दशान,पद्मावति,रुपी, रातराणी, प्रचेतस, सानझरी, सूड, स्मिता चौगुले, गवि,निशाचर
@मी कोण
पत्ते , फोन नंबर देऊन खास फायदा नाही अहो. आम्ही तिथल्या पोलीसदादांचे नंबर घेतले, AFS काकांचे घेतले. आणि जॉली बॉय ला जाण्यार्या बोट च्या मॅनॅजर चे घेतले फक्त. त्याचा तसा खास फायदा नाही.
6 Jul 2017 - 11:08 am | चौथा कोनाडा
वाह, एक नंबर वृतांत ! फोटो क्लासिकच !
जाळीदार दगडांचे फोटो अप्रतिम !
6 Jul 2017 - 11:09 am | चौथा कोनाडा
वाह, एक नंबर वृतांत ! फोटो क्लासिकच !
जाळीदार दगडांचे फोटो अप्रतिम !
6 Jul 2017 - 8:35 pm | प्रीत-मोहर
ते दगड नाहीयेत अहो. मेलेले कोरल्स आहेत ते. :)