समोसा

सारिका होगाडे's picture
सारिका होगाडे in पाककृती
4 Jul 2017 - 5:17 am

नमस्ते मिपाकर,
समोसा हा माझा आवडता पदार्थ, कोणाला नाही आवडत? पण कधी घरी करून बघावा हा विचार मनात नाही आला, आत्तापर्यंत! कॅनडाला स्थलांतरित झाल्यानंतर इथे बऱ्याच पंजाबी मैत्रिणी झाल्या आणि भेटीगाठी सुरु झाल्या. बोलता बोलता कळले की नान, सामोसे, छोले भटोरे, पिझ्झा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करावेत. त्याबद्दल टिप्सही मिळाल्या. मग वाट कशाला बघायची? लगेच सुरुवात केली सामोसे बनवायला. फोटोही काढले आणि लिहायलाही घेतले. संपूर्ण प्रक्रिया इथे देत आहे.
वाचकहो, तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा!
ही पाककृती मिसळपाववर असेलही पण तरीही मी, मी बनवलेल्या सामोसाची कृती देत आहे. सामोसे गरमागरम, तिखट असे छान लागतात. आमच्याकडे एवढे तिखट आणि तळलेले कोणी खात नाही म्हणून कृतीमधले माझे प्रमाण कमी आहे. तुम्ही गरजेनुसार प्रमाण वाढवू शकता.
चला तर सुरुवात करूया!

साहित्य:
१. ३ मध्यम आकाराचे बटाटे
२. १ कप मैदा (अथवा अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घ्यावे)
३. पाव छोटा चमचा – ओवा
४. चवीनुसार मीठ
५. ३ छोटे चमचे तेल
६. लसूण ३-४ पाकळ्या (इथे पाकळ्या मोठ्या असतात, भारतातील कदाचित १०-१२ पाकळ्या घेणे)
७. १ इंच आलं
८. २-४ तिखट झणझणीत मिरच्या
९. १ कप मटार
१०. मूठभर काजू
११. हळद, तिखट, गरम मसाला, जिरे परतून केलेली पूड, आमचूर पावडर, चाट मसाला – आवडीनुसार

कृती:
१. सर्वप्रथम ३ मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
२. १ कप मैदा, त्यात ओवा, मीठ आणि तेल घालून हलक्या हाताने एकत्र करून घेतले. हळूहळू पाणी घालत हलक्या हाताने कणिक मळून घेणे व झाकून ठेवणे. कमीतकमी पंधरा मिनिटे झाकून ठेवावी.
३. लसूण, आलं, मिरच्या बारीक चिरून खलबत्यामध्ये कुटून घेणे. (खलबत्यामध्ये कुटून घेतल्यावर मला समाधान मिळते, तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता, आवडीनुसार)

४. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण + आलं + मिरच्या हे वाटण परतून घ्यावे. त्यात हिरवी हिरवी मटार आणि नंतर काजू घालून अजून थोडे परतून घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ घालावे. ते मिश्रित करून त्यात उकडून बारीक फोडलेले बटाटे घालावे. सगळे एकजीव करून १-२ मिनिटे परतून घ्यावे. मग थोडा गरम मसाला आणि जिरेपूड घालावी. अजून थोडे परतून घेणे. मिश्रणाला थंड होवू द्यावे. त्यात आमचूर पावडर आणि चाट मसाला घालून एकत्र करावे.
(टीप: थंड मिश्रणात हे एकत्र केले की चव छान लागते.)
(काहींना मनुके, बडीशेप, गाजर घालून केलेले सामोसे पण आवडतात. हीच ती वेळ हे सगळे एकत्र करण्याची.)
1

५. मैद्याच्या पीठाचे काही गोळे करून पोळीसारखे लाटावे, लहान किंवा मध्यम आकाराचे. त्यानुसार सामोस्याचा आकार ठरणार आहे आणि मला बारीक आवरण हवे आहे म्हणून मी पातळ लाटले आहेत. तुम्ही आवडीनुसार जाडही लाटू शकतात.

६. चपातीला मधोमध काप देवून दोन भाग करणे. एका भागाचा एक सामोसा होणार आहे. काप दिलेल्या बाजूने दोन्ही कडा अर्धे मुडपून त्याला पाणी लावून बंद करावे. म्हणजे तळताना मिश्रण बाहेर येणार नाही. त्रिकोणी वाटीसारखा आकार तयार होईल. त्यात आधी बनवलेले सारण भरणे. आणि खुल्या बाजूला पाणी लावून ती बाजूसुद्धा बंद करणे.
2. 3

७. कढईत तेल गरम करून घेणे. चांगले तापून झाले कि आच कमी मध्यम ठेवावी. या तेलात सगळे सामोसे तळून घेणे, सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत!
(टीप: सामोसे कुरकुरीत होण्यासाठी २ वेळा तळून घेतात. पहिल्यांदा थोडे पांढरे असतानाच काढतात आणि गार झाल्यानंतर परत तळून घेतात. मी एकदाच तळलेले आहेत.)
4

८. गरमागरम झणझणीत तिखट सामोसे तयार! पुदिना चटणी, चिंचेची चटणी अथवा केचप बरोबर खा!
5

घराबाहेर सुंदर देखावा बघत आम्ही सामोसे फस्त केले.
6

सामोसे खाल्यावर माझी मुलगी म्हणते तसे:
यम यम यमी,
इन माय टम टम टमी!

धन्यवाद!

प्रतिक्रिया

मस्तच की! सामोसे दोन वेळेस तळून घेण्याची टीप माहीत नव्हती. धन्यवाद.

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 5:51 am | सारिका होगाडे

_/\_

केडी's picture

4 Jul 2017 - 10:01 am | केडी

छान आहे पाककृती....

पद्मावति's picture

4 Jul 2017 - 1:28 pm | पद्मावति

मस्तं पाककृती आणि लेखनही आवडलं.

वरुण मोहिते's picture

4 Jul 2017 - 3:04 pm | वरुण मोहिते

सामोसे आवडतातच . त्यात माझ्या घरी पण बनतात पण थोडी पद्धत वेगळी असावी .म्हणजे काजू ,आमचूर पावडर आम्ही नाही वापरत.

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 5:54 am | सारिका होगाडे

आता नक्की वापरून बघा. कदाचित आवडेल. इथे कॅनडीयन लोकं वेज सामोसा, कॅजून सामोसा, चिकेन सामोसा, बीफ सामोसा या नावांनीच सामोसा विकतात, हे पाहून अप्रूप वाटले.

पिंगू's picture

4 Jul 2017 - 8:37 pm | पिंगू

मस्त बनले आहेत समोसे.

छान पाकृ. घरातून दिसणारे दृश्यही सुरेख.

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 6:05 am | सारिका होगाडे

कॅनडाची कमाल!

सविता००१'s picture

4 Jul 2017 - 9:38 pm | सविता००१

वा. मस्तच. मी असेच करते पण दोनदा नव्हते तळले. आता असे पण करुन पाहीन

अमित खोजे's picture

4 Jul 2017 - 10:36 pm | अमित खोजे

लेखकाचे नाव ना बघताच सामोसे पाहायला खाली स्क्रोल केलं. जेव्हा टेबलाच्या फोटोवर आलो तेव्हा म्हटले अरे हा तर सारिकाच्याच घराचा फोटो दिसतोय. वर जाऊन परत नाव बघितले मग कळले. आता तर घरी यायलाच हवे सामोसे खायला. :)
(मिपाकरांसाठी - सारिका माझी चुलत बहीण. ती दूर कुठेतरी जगाच्या एका कोपर्यात राहते असे मी तिला नेहमी चिडवतो. पण जगाचा तो कोपरा किती सुंदर आहे तो या फोटोतून दिसत असेलच.)

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 5:57 am | सारिका होगाडे

हो रे, भाऊराया! आता या उन्हाळ्यात नक्की ये. सामोसे पण खाऊया. 

पिशी अबोली's picture

4 Jul 2017 - 11:25 pm | पिशी अबोली

तळण वगैरे करत नसल्याने तोंडाला कितीही पाणी सुटलं तरी रेसिपीला पास, पण लिहिलंय खूप सुरेख म्हणून हा प्रतिसाद..

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 5:58 am | सारिका होगाडे

_/\_ प्रोत्साहन नक्की मिळाले.

सूड's picture

5 Jul 2017 - 1:23 am | सूड

टीप आवडली.

इडली डोसा's picture

5 Jul 2017 - 3:16 am | इडली डोसा

बादवे कॅनडात कुठे? (जवळ असाल तर तुमच्याकडे खायलाच येऊ =))

घराच्या फोटोवरुन तरी तुझ्या जवळ्च असतील असं वाटतंय ;)

आणि मी इतक्या सुंदर दिसणार्‍या समोशांसाठी कोस्ट टु कोस्ट प्रवास करायला पण तयार आहे बरं का :)

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 6:35 am | सारिका होगाडे

नक्की या!

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 6:06 am | सारिका होगाडे

निरोप ठेवला आहे.

समाधान राऊत's picture

5 Jul 2017 - 6:36 am | समाधान राऊत

इडली समोसा
*LOL*

सारिका होगाडे's picture

5 Jul 2017 - 6:37 am | सारिका होगाडे

सर्व प्रतिसादांना धन्यवाद! उमेद आली आणि प्रोत्साहन मिळाले.

काय मस्त देखावा आहे घराबाहेर..................
समोसे पण टॉपक्लास

नूतन सावंत's picture

5 Jul 2017 - 9:55 pm | नूतन सावंत

त्या घरात बसून ते समोसे खायची मजा काही औरच असणार आहे,एअरफ्रायरमध्ये करून पाहीन नक्की.

रुपी's picture

5 Jul 2017 - 11:29 pm | रुपी

मस्त पाकृ!

घरातून इतका सुंदर देखावा दिसत असेल तर मी दिवसभर तोच बघत बसेन :)

त्रिवेणी's picture

6 Jul 2017 - 2:52 pm | त्रिवेणी

खरच मी पण दिवसभर बसून राहीन बाल्कनीत.मी समोसा पेक्षा देखावाच जास्त वेळा बघितला.

रामदास२९'s picture

10 Jul 2017 - 12:49 pm | रामदास२९

सामोसे करण्याचि पद्धत छान. तयार झाल्या नन्तर निसर्ग अप्रतिम !!