शामभट्टाची युरोपवारी .. इटली, स्वीस, फ्रान्स ... लेखांक ६

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
4 Jul 2017 - 4:38 pm

दिवस ६

कॅम्पो दि मार्ट स्थानकाच्या पुलावर उभा होतो . रात्रीचे ( संध्यासमयीचे ?) पावणेनऊ वाजले होते व सूर्य पश्चिम क्षितीजावर अस्तास नुकताच गेलेला. रोम वरून व्हेनिसला जाणारी रात्रीची ट्रेन आम्हाला याच स्थानकावर चक्क पावणे दोन ला पकडायची होती. हवेत चांगलाच गारठा. इतका वेळ काढायचा तरी कसा प्रश्नच होता.येणार्‍या जाणार्‍या ट्रेन्स ची आवक जावक पहात वेळ घालविला मग.बरोबर वेळेवर ट्रेन आली. स्थानापन्न झाल्यावर डोळा लागला. युरोपात जे मिपाकर ट्रेन मधे बसले असतील त्याना तिच्या शांतपणाचे कवतिक खरेच अनुभवता आले असेल. रूळ कधी मी बदलले हे गाडी तुम्हाला बिलकूल क़ळून देणार नाही. पहाट कधीतर पाडोवा हे स्थानक आले. टूर कंपन्यांचे लाडके पाडोवा. इथे ही बरीच हॉटेल्स खास टूर ऑपरेटर शी टाय अप्स करून असतात. युरोपातील रात्रीचा प्रवास देखील किती सुखकर असतो हे अबुभवत "सान्ता लुसिया व्हैनिझिया" या व्हैनिसच्या मुख्य टर्मिनस वर उतरलो. पहाटे सवापाच चा सुमार. हवेत थंडी कायम .समुद्र किनारी असूनही.

आता दिवसभर व्हेनिसात भटकून रात्रीची मिलान ला जाणारी नाईट ट्रेन पकडायची होती त्यासाठी क्लोकरूम मधे बॅगा ठेवणे आवश्यक होते. भारतात क्लोकरूम किमान मोठ्या स्थानकांवर तरी २४ तास कारभार करीत असते. तसे युरोपात दिसले नाही. व्हेनिझियाचे क्लोकरूम सात वाजता उघडणार होते. सबब स्थानकाबाहेर आलो. हे स्थानक समुद्र किनार्यापासून फक्त तीसेक फूट अंतररावर आहे. या तीस चाळीस फूटात एक फरसबंद प्रांगण आहे. ते संपताच लगेचच व्हेनिसचा मुख्य जलमार्ग "ग्रॅन्ड कनाल " सुरू होतो. व्हेनिस शहर हे एक बेट असून त्या भोवती ही काही बेटे आहेत. कनाल या बेटाचे मुख्यतः दोन भाग करतो. व या दोन भागाना जोडणारा एकमेव पूल म्हणजे " रिआल्टो ब्रिज" . बाकी कनाल मधून फुटून निघून आत शिरणारे असे अनेक जलमार्ग आहेत. त्यावर मात्र लहान लहान असंख्य पूल आहेत. माझ्या अंदाजाने व्हेनिस मधे रस्ते व जलमार्ग यांचे प्रमाण अर्धे अर्धे असे असावे. शहरात काही चौक ही आहेत अर्थात युरोपातील इतरांचा मानाने लहान.

सान्ता लुसिया व्हेनिझिया च्या जवळ काही होटेल्स आहेत त्यात एखाद्या जागी रात्रीपर्यंत जर रूम मिळाली तर बरे अन्यथा लगेज ठेवण्याची विनंति करू या वेड्याआशेने दोन तीन जागी चौकशी केली. " नो रूम टु डे" असे उत्तर मिळाले. एका रिसेप्शनवर एक तरूण होता. तो म्हणाला की आम्ही आमच्या बॅग्ज विश्वासावर त्यांच्या जिन्याखालील जागेत ठेवू शकतो. मी ही जोखीम पत्करायचे ठरवले. व मी बॅगा घेऊन येतो असे सांगून बाहेर पडलो. त्या घेऊन परत तिथे जातो तो काय ? तिथे दुसराच माणूस रिसेप्शनवर बसला होता. त्याला माझे तेथील पहिल्या माणसाशी झालेले बोलणे सांगितले. पण त्याने साफ नकार दिला. आम्ही बाहेर आलो. परत बॅगा ओढत स्टेशनवर गेलो. आता मात्र क्लोकरूम उघडले होते. आम्हाला रात्री साडेदहा पूर्वी बॅगा ताब्यात घ्याव्या लागतील असे बजावून तेथील माणसाने आम्हाला " मोकळे" केले. आता खांद्यावरील ओझ्याखेरीज काही ताप पडणार नव्हता.व्हेनिस मधे ग्रॅन्ड कनाला मधून दहाएक मिनिटात वॉटर बसने सान्ता लुसिया ते सान मार्को चौक हे अंतर पार करता येते पण त्याला असणारे तिकिट जरा जास्तच होते. हे अंतर तसे फारसे नाही, आमच्याकडे वेळ ही होता. मग चालत चालत व्हेनिसच्या अंतरंगात शिरायचे असे बेत केला.

.
रेल्वे स्थानक हे इटाली देशाच्या किनार्‍यावर आहे व समोरच व्हेनिस बेटाला जाण्यासाठी एक पूल आहे. त्याचे नाव " पॉन्ट डेल्गी स्काल्झी" . हा ओलांडला की पुढे व्हेनिससे अरूंद, कमालीचे स्वच्छ बोळ वजा फरसबंद रस्ते, जुन्या इमारतींची सुरेख प्रतिबिम्बे दाखविणारे लहान लहान जलमार्ग व त्यातून पार्क गेलेल्या गंडोला नावा यांचा भूलभूलैया सुरू होतो. तुम्ही हमखास चुकणारच इथे हे समजून येथील प्रशासनाने प्रत्येक वळणावर "कुणीकडे रस्ता जातो? " याच्या मार्गदर्शक पाट्या लावल्या आहेत. ( तरीही घोळ होतोच व पर्यटक एकमेकाना विचारीत बसतातच ).
.
रोममधे ज्या प्रमाणे काही रहिवासी घरे देखील जुन्या काळात बांधलेली व आजही शाबूत असलेली आहेत व त्यांचे बांधकाम शाही वाटते तसे व्हेनिस मधील रहिवासी घरे "ठीक" म्हणता येतील अशी इतकीच. पण भारतीय डोळा ते पाहूनही चकित होतोच.अर्थात इथेही सहा सात अद्वितीय अशा इमारती आहेतच.या बोळाबोळातून वाट काढीत असता. मधेच काही चौकात बाहेर टेबल खुर्च्या टाकून उपहार गृहे थाटलेली दिसली. मधूनच असे होई की " ग्रॅन्ड कनाल" चे दर्शन होई पण इथे कनालच्या बाजूने फिरावे असा रस्ता नसे. असे करता असा रस्ता सापडला. कनालमधून व्हेपरेटो धावत पर्यटकाना व्हेनिसचे दर्शन घडवीताना दिसत होत्या. या कनाल चा उपयोग अनेक हॉलिवूड पटांच्या साठी लोकेशन म्हणून केलेला दिसतो. एका ठिकाणी आलो तेंव्हा एकदम " इथे जॉनी डेप येऊन गेला असेल असे वाटले. त्याच्या टूरिस्ट या चित्रपटात हे शहर बर्‍याच वेळा दिसलेय. ००७ जेम्स बोन्डच्या अल्बर्ट ब्रोकोली या निर्मात्याचे तर व्हेनिस हे आवडते लोकेशन असल्याचे शौकिनाना आढळून आले असेलच.

.
मधेच एका जागी फळांचे दुकान दिसले. आमच्याकडचा फळांचा साठा संपलेला होता. दुकान बांगला देशी माणसाचे होते. साहजिकच " बातें " हिन्दीत. आवडीची फळे विकत घेऊन पिशवीत टाकली. व एक डिश थेट वाळविलेल्या खर्‍या अर्थाने " ड्राय फॄट " असलेल्या फळांच्या कापाची घेतली. एकदम नवा व मस्त चवीचा अनुभव. मी " टूरिस्ट" चे शूटींग झाले तें आठवते का ? असा प्रश्न त्या बांगला देशी दुकानदाराला विचारला पण त्याने मान नकारार्थी केली. असो. एक जाणीव मात्र अशी झाली की बांगला देशी जिथे जिथे भेटले तिथे तिथे ते विक्रेते सौहार्दाने वागले हे नमूद करावयास हवेच.

.
व्हेनिसच्या आत कोणतेही वाहन येऊच शकत नाही. त्यामुळे कोणताही गोंगाट नाही. स्थानिक रोजगार टूरिझम शिवाय नाही. नाही म्हणायला जवळच्या मुरानो बेटावर काचेच्या कलात्मक व शोभिवंत वस्तू तयार होतात. आज काल रहिवाशांपेक्षा पर्टकांचीच संख्या इथे जास्त असते. मूळचे पुष्कळसे लोक जगभर नोकरी व्यवसायाच्या निमिताने विखुरलेले आहेत. फक्त गंडोला नावा याच वाहनाचे साधन , मात्र मुख्य कनाल मधे मोठ्या प्रवासी बोटी वहातुक करताना दिसतात. कनालच्या दोन्ही तीरावर बहुशः हॉटेल्स आहेत.
.
पहाता पहाता आम्ही रिआल्टो ब्रीज ला आलो. हा नुसता पर्यटन स्थळ म्हणून नाही तर सर्व रित्या येथील एक महत्वाचा पूल आहे. दुसरा एक पूल व्हेनिसच्या एका दुसर्‍या विलग असलेल्या भागाकडे घेऊन जातो त्याला "पॉन्ट अ‍ॅकेडेमिया" असे नाव आहे. व्हेनिसच्या गाभ्यात मात्र हा रिआल्टो एकमेव. दोन्ही बाजूला स्मरण वस्तूंची दुकाने व उपहार गृहे असल्याने बक्खळ गर्दीने हा पूल व्यापलेला असतो. पुलाची रचना वैशिष्ट्यपूर्ण दिसते. इथे पुलाच्या वरही कमानी आहेत.
.
व्हेनिस हे फक्त पर्यटन स्थळ म्हणून आता तरी ओलखले जाते तरीही आजूबाजूच्या बेटांवर काचकलाकारीचा व्यवसाय आहे. मुरानो बेट तर यासाठी नावाजलेले आहे. अशा एका काच सामानाच्या दुकानाची शोकेस. अशीचा " मुखवटे" विकणारी दुकानेही व्हेनिसात आहेत. अगदी रूपसुंदरी ते हिडीस ओंगळ सैनान असे मुखवटे विकत मिळतात.
रिआल्टो ब्रीज च्या परिसरात थोडे थांबल्यावर आता जगातील सर्वात लोकप्रिय असे बिरूद लावले जाण्याच्या " सान मार्को " चौकात जावे म्हणून शोधत शोधत या भव्य चौकाच्या प्रांगणात येऊन पोहोचलो. " ग्रॅन्ड कॅनाल" चा एका काठावर हा चौक वसला आहे. वर्षभर नेहमी पर्यटकानी तुडुम्ब भरलेला चौक अशी याची ख्याती आहे. एका बाजूला सेंट मार्क चे अत्यंत सुरेख व वैशिष्ट्य पूर्ण कथिड्रल . विशेष असे की या वर एकूण पाच घुमट आहेत. दर्शनी भागाची कलाकुसर ही प्रेक्षणीय. चर्चच्या समोर मोठे पटांगण .
.
व्हेनिस च्या फरसबंद गल्लीतील एक कलाकार. कर्नाटक शैलीतील घटम या वाद्यासारखे हे वाद्य मात्र धातूचे. अतिशय मधुर आवाजात ते संगीताचा आस्वाद देते.
.
व्हेनिस हे काही इटलीतील मोठे शहर नव्हे पण त्याचा व्यापारामुळे एकेकाळी या भागात दबदबा होता असे म्हणतात. व्हेनिस हे खरेतर दलदलीच्या भूभागावर वसलेले शहर . अटिला नावाच्या क्क्रूरकर्मा हूण शासकाने अक्विलिया या रोमन नगरीवर हल्ला केला. तेथील नागरिक भयाने परागंदा होऊन एका दलदलीचच्या- उथळ समुदाच्या आश्रयाला येऊन राहू लागले. दलदलीत लाकडी खांब रोवून झोपड्या बांधल्या गेल्या. अशी झाली आताच्या व्हेनिस ची सुरूवात. आजही व्हेनिसचे पाणी निळे न दिसता हिरवट दिसते.नवव्या शतकापासून व्हेनिस आकारास येऊ लागले. सान मर्को चर्च चा एकूण पहेराव हा इस्लामी आहे .कारण यातील दर्शनी भागाचे बरेचसे काम हे १२०४ इ स मधे कॉन्स्त्न्टिनोपल येथून लूट करून आणलेल्या चीजांमधून बनवले. आहे असे म्हणतात.
.
मुख्य जलमार्गातून होणारी वहातुक . अमिताभच्या "ग्रेट गॅम्बलर " मधील पल दो पल की है एक जिन्दगानी हे गीत इथे आठवते.
.
या दारातून अचानक सान मार्को बॅसिलिकेला आप॑ण सामोरे जातो.

.
सान मार्को चे प्रवेश द्वार.
.
सान मार्को च्या वरच्या गॅलरीत सशुल्क जाता येते. खालूनही ते काळे चार घोडे व बाकी कलाकुसर नजरेस येते.
.
.
वर दिसणारे प्रसंग चित्र " युनिव्हर्सल जजमेंट" या नावाने ओळखले जाते. ते सर्व " मोझॅक" मधे केले आहे.
.
.
तीनशे फूट उंचीचा बेल टावर . अनेक अस्मानी संकटाना तोंड देऊन पडला. ( १९०२) मग १९१२ मधे मूळ बरहुकुम बांधला गेला. व्हेनिस मधील सर्वात उंच वास्तू.
http://i.imgur.com/eCcgNjk.png
सान मार्को चा एक कोपरा, मागे चर्चचा घुमट व बाजूस " डोज पॅलेसचा " कोपरा.
.
डोज पॅलेस ( नगरप्रमुखाचा प्रासाद ) हा नगरप्रमुख लोकनियुक्त असे. लोकशाही आपण कुठून आणली बरे ?
.
प्रासादा समोरची ही इमारत. वरचे पुतळे व अत्याकर्षक एलेव्हेस्शन
.
गंडोला नावा व त्यांचा धक्का.
.
कनालच्या बाजूला दोन स्तंभ. ( असे दोन स्तंभ गन्स ऑफ नॅव्हरॉन मधे "र्‍होडस " या ग्रीक बेटावर पहायला मिळतात ). इथे एकावर कोणा संताचा पुतळा आहे तर दुसर्यावर पंखधारी सिंह हे व्हेनिशियाचे प्रतिक,
.
सान मार्को चौकासमोरील कनाल पलीकडे एका बेटावर १५६५ ते १६१० या काळात बांधलेले एक बेनेडिक्टाईन कथिड्रल आहे.
सान मार्को चौकात फिरून एका जागी विश्रांती घेतली व परत भटकंती साठी निघालो. "टॉयलेट" ची चौकशी हा युरोपमधे एक समस्येचा भाग असतो. चौकशी केल्यावर अ‍ॅकेडेमिया पुलाजवळ आहे असे एकाने सांगितले. जाताना एक गंमत घडली. वाटेत एक माणूस अ‍ॅकॉर्डियन वर धून वाजवून पैसे मिळवीत होता. मी काहीसा जास्त वेळ थांबलो. त्याला वाटले मला वाजविता येत असावे. त्याने ते चक्क माझ्या गळ्यात अडकविले. मनस्वी आनंद झाला. काय वाजवावे याचा विचार करीत असता माशी शिंकली. मी डावखुरा व ते वाद्य " उजव्या" साठी बनवलेले. त्याच्या पियानो पट्यांवरून एक सुद्धा ओळ वाजविता येईना. त्यात तो भाता हर्मोनियम पेक्षा काहीसा वेगळा . ते एका वेळी सारे जमावे कसे. पण या वाद्याला या जन्मी आपला स्पर्श तरी झाला याचे बरीक समाधान वाटले.
दिवस कलू लागला पुन्हा व्हेनिसच्या गल्लीबोळातून भटकत स्टेशन जवळील पॉन्ट डेल्गी स्काल्झी" या पुलावर आलो. एव्हाना कालव्यात काठाच्या उपहारांचे दिवे पा॑ण्यात उतरले होते. रंगबिरंगी पाणी पुन्हा व्हेनिसास यावे असे सुचवीत असावे. आता आम्हाला मात्र रात्री १२ चा ट्रेनने मिलान गाठायचे होते. जगप्रसिद्ध " द्युमो" कथिड्रल चे मिलान. गारमेंट फॅशनचे मिलान.इटलीतील सर्वात श्रीमंत व आधुनिक मिलान. साहजिकच व्हेनिस चा जरा अतृप्त मनानेच निरोप घेत पावले "सान्ता लुसिया व्हेनिझिया " स्थानका कडे वळविली.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

4 Jul 2017 - 4:50 pm | राघवेंद्र

मस्त सुरु आहे सहल!!!

प्रचेतस's picture

4 Jul 2017 - 5:15 pm | प्रचेतस

अह्हा...!!
जबरदस्त झालाय हा भाग. सेंट मार्क बॅसिलिकाचे ते ४ घोडे मूळचे नव्हेत. ते तिथेच एका संग्रहालयात आहेत. सध्या बॅसिलिकावर आहे ती त्यांची प्रतिकृती.
मूळचे घोडे कॉन्स्टेन्टिनोपालहून युद्धातून लूट म्हणून १३ व्या शतकात आणले गेले होते.

दशानन's picture

4 Jul 2017 - 5:53 pm | दशानन

वाह देखणा लेख झाला आहे.

बबन ताम्बे's picture

4 Jul 2017 - 6:27 pm | बबन ताम्बे

मस्त सफर घडवलीत व्हेनीसची.

बरं झालं गोंडोला राइड टाळलीत. घाण वासाने लवकरच नकोसे वाटते!
मुरानो क्रिस्टलचे सेट फार सुंदर मिळतात. माझा दोन वर्षांनी पण मस्त झगमगतो बाॅक्स उघडला की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2017 - 10:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर झाला आहे हा भाग ! फोटो देखणे आहेत. मजा आ गया !

जुइ's picture

5 Jul 2017 - 2:45 am | जुइ

व्हेनिसचा हा भाग उत्तम फोटोंनी सजला आहे!

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 4:18 pm | मुक्त विहारि

सफर मस्त सुरु आहे....