साहित्य
१/२ किलो मटण, धुवून, कोरडे करून
३ मोठे कांदे बारीक चिरून
१ लसूणाचा गड्डा, सोलून, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
१ बडी इलायची
५ ते ६ हिरवे वेलदोडे
३ ते ४ लवंग
१ चमचा जिरे
२ चमचे धने
१ चमचा बडीशेप
१ चमचा मेथ्या
१ तुकडा दालचिनी
३ तमालपत्र
१ चमचा लाल तिखट
२ चमचे हळद
१ चमचा कसुरी मेथी
५ ते ६ चमचे आमचूर पावडर (हे आवडीनुसार कमी जास्त)
२ ते ३ मोठे चमचे तेल
मीठ चवीनुसार
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
मटणाला लिंबाचा रस, १ चमचा हळद आणि मीठ लावून ते किमान २ तास मुरत ठेवावे. रात्रभर ठेवलं तर उत्तम. (अर्थातच फ्रिज मध्ये). सगळे गरम मसाले कोरडे भाजून, मग गार करून त्याची जाडसर भरड काढावी.
एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकर मध्ये तेल तापवून, त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला कि त्यात मुरलेलं मटण घालून ते परतून घ्या. हे सगळं आपल्याला एकदम मंद आचेवर करायचे आहे. (मटण कोवळे असेल तर लवकर शिजेल, साधारण १ तासात आपल्याला मटण मऊसूद वाफेवर शिजवून घायचे आहे. हे सुरु असतांनाच इतर मसाले व जिन्नस टाकत राहायचे आहेत).
झाकण ठेवून साधारण २० ते २५ मिनिटे मटण शिजू द्या. अधून मधून परतून घेत राहा. [मटणाला पाणी सुटेल, त्यामुळे पाणी घालायची गरज लागणार नाही]. आता भांड्यात बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालून परतून घ्या. अजून १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. मटणाला सुटलेले पाणी आटत आले, कि त्यात लाल तिखट आणि उरलेली हळद घालून पुन्हा ढवळून घ्या. झाकण ठेऊन अजून १० मिनिटे शिजू द्या. झाकण उघडून, एकदा परतून त्यात आता मसाल्याची भरड घाला. थोडे परतून मग आमचूर पावडर घालून मटण पुन्हा परतून अजून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा.
साधारण २ कप पाणी गरम करून, आपल्याला रस्सा हवा त्या प्रमाणात गरम पाणी घालून, अजून ५ मिनिटे वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून गरम गरम भात बरोबर हे खट्टा मटन खायला घ्या! वाढण्यापूर्वी, कसुरी मेथी हाथाने चुरून वरून भुरभुरावी.
[साध्या तेला ऐवजी सरसू/मोहोरी चे तेल असेल तर ते वापरा, अजून लज्जत वाढेल. आमचूर मुळे एक वेगळीच चव आणि रंग येतो. पाणी न घालता देखील सुक्क म्हणून छान लागेल. कांदा, लसूण आणि आले हे मिक्सर मधून न काढता सुरीनेच बारीक चिरून घ्या, म्हणजे ते जळणार नाही. मटण शिजले नाही, किंवा इतका वेळ वाट पाहायची नसेल तर, कुकर मध्ये ३ ते ५ शिट्ट्या मारून शिजवू शकता (पाणी घालून).]
प्रतिक्रिया
14 Jun 2017 - 6:43 pm | आदूबाळ
खतरनाक!
(मटण न घालता ही पाकृ... :) )
15 Jun 2017 - 10:14 am | केडी
:-)
एक प्रयोग म्हणून मटणा ऐवजी कच्चे बटाटे, सोलून घालून पाहायला हरकत नाही. खट्टे आलू छान लागतील बहुदा.
15 Jun 2017 - 12:35 pm | ज्याक ऑफ ऑल
केडी ... व्हेज व्हर्जन घरी करून पाहेन नक्की ...
15 Jun 2017 - 1:11 pm | केडी
येस! सोया पण उत्तम लागेल....गुड आयडिया!
14 Jun 2017 - 7:10 pm | वरुण मोहिते
पहिले बुकमार्क केले आणि मग वाचले . आता करून पाहीनच. किंवा कोणाला तरी करायला लावेन :))
14 Jun 2017 - 7:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
पाहून त्या मटणाला
कलिजा खलास झाला ! :)
14 Jun 2017 - 7:17 pm | मुक्त विहारि
पाकृ करून बघीन.
14 Jun 2017 - 7:26 pm | अभिजीत अवलिया
भारी दिसतय. करुन बघेन लवकरच.
14 Jun 2017 - 9:55 pm | निमिष ध.
हैला लै भारी दिसतंय. लगेच ताटात घेऊन खायला बसावं असं वाटतं आहे !! जबरी - नक्की करून बघणार.
15 Jun 2017 - 7:10 am | जेम्स वांड
जबरी झकास आहे, तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन मटनात 'खट्टा' वाचून मात्र एकदम कसेसे झाले. आंबट मटन कन्सेप्ट स्वीकारली जात नाहीये प्रभू.
15 Jun 2017 - 9:02 am | केडी
मला देखील हेच वाटलेलं, पण आमचूर पावडर मुळे अगदी हलका आंबटपणा येतो, आणि इतर मसाल्यांची चव खुलून आली, अर्थात हा माझा अनुभव.
15 Jun 2017 - 9:08 am | सविता००१
आधीच तुला म्हणाले तसं खात नाही पण पाहून खूप मस्त वाटतंय. कसले सुरेख फोटो काढतोस....लाजवाब प्रेझेंटेशन.
मस्त दिसतंय फार
15 Jun 2017 - 10:15 am | केडी
धन्स ग ...बटाटे वापरून करून बघ... छान लागेल....
15 Jun 2017 - 12:38 pm | ज्याक ऑफ ऑल
लिखाण , प्रेझेन्टेशन , फोटोंची रचना व कोलाज ... हे पण टिपून ठेवलंय .
जे जे चांगले ते शिकावं माणसाने .. या तत्वावर ...
बाकी लाजवाब ... कधी खाऊ घालता ?
(जाता जाता - आपण दोन केडी नी मिळून एक फिरतं हॉटेल काढूया का ? )
15 Jun 2017 - 1:14 pm | केडी
...अगदी मनातला बोललास....हे जरा मनावर घेऊयात.....एखादा फूड ट्रक?
15 Jun 2017 - 12:53 pm | झेन
असे फोटो आणि प्रेझेन्टेशन असेल तर दोन गोष्टी नक्की होतील
- बरीच व्हेज जनता नाँन-व्हेज होईल आणि
- तुमच्या पा.क्रू. त येण्यासाठी कोंबड्या/ बकर-यांची लाईन लागेल.☺
15 Jun 2017 - 2:58 pm | नूतन सावंत
टोमॅटो, दही,लिंबू घालून मटण केलंय पण इतकी आमचुरपावडर घालून नाही केलाय कधी. आता करून पाहीन.फोटो सुरेखच!
16 Jun 2017 - 7:28 am | केडी
हो, म्हणूनच, जरा वेगळी वाटली, म्हणून करून पहिली ही पाककृती, करून बघा, एक वेगळी चव.
20 Jun 2017 - 6:26 pm | पुंबा
मांसाहारी नसूनसुद्धा तुमचे फोटोज बघून पदार्थ कावेसे वाटतात हो
21 Jun 2017 - 5:34 pm | केडी
...आभारी आहे
_/\_