घरच्या सेंद्रीय बागेत भाजीपाला उगवून खाण्याची मजा वेगळीच. वेलीवर पिकलेले टोमॅटो तर बाजारात मिळणार्या कृत्रिमरित्या पिकवलेल्या टोमॅटोपेक्षा कितीतरी लज्जतदार! आमच्या शेजारच्या आजी दर वर्षी त्यांच्या बागेतले खोकेभर टोमॅटो न्युयॉर्कला दिराच्या घरी पाठवतात. त्यांच्याकडून बागकामाचे धडे घेऊन आणि सुरुवातीला काही अवजारे उधार घेऊन आम्हीही जरा सोप्या आणि खारी-पक्षी या मंडळींना फार आवड नसलेल्या अश्या टोमॅटोनेच शेतीकाम सुरु केले.
रोपे लावल्यावर काही दिवसांनंतर एक-एक, दोन-दोन असे टोमॅटो मिळायला लागल्यावर ते असेच खाऊन संपत. पण हळूहळू वेली वाढायला लागल्या आणि त्यावरच्या टोमॅटोची संख्याही. नवर्याचं काम फक्त ते फक्त घरात आणण्यापुरतं.
पण एवढे टोमॅटो कसे वापरावे आणि कसे संपवावे?
मग नेटवर शोधाशोध केल्यावर प्युरे बनवून ठेवायचे ठरवले. ती बनवण्यासाठी -
टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. धारदार सुरीने खालच्या बाजूने '+' चिन्हासारखे दोन काप दिले. खूप आत चीर देण्याची गरज नाही, फक्त सोलायला सोपे जावे म्हणून द्यायचे. पातेल्यात टोमॅटो मावतील इतपत पाणी घेऊन उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर त्यात अलगदपणे टोमॅटो सोडले. ४-५ मिनिटे आणखी उकळू दिल्यावर आच बंद केली. टोमॅटो आता २-३ मिनिटे गार पाण्यात ठेवले. पाण्यातून काढून हाताने साल काढून घेऊन मिक्सरमध्ये पेस्ट करुन घेतली. छोट्या-छोट्या डब्ब्यांमध्ये भरुन फ्रीझरमध्ये ठेवले. अशी प्युरे नंतर सूप, ग्रेव्ही असलेल्या भाज्या यांसाठी वापरता येते.
तर ही 'प्युरे' बनवता बनवता मला टोमॅटो 'पुरी' आठवली. (आम्हांलाही शाब्दिक कोट्या करता येतात म्हटलं!) मग ती बनवून बघायची खुमखुमी आली, आणि लगेच अंमलातही आणली.
मग यातलीच वाटीभर प्युरे घेतली. त्यात मावेल तेवढी पीठे घातली - मी गव्हाचे, थोडे ज्वारीचे आणि थोडे (केप्र) भाजणीचे आणि त्याहून थोडे बेसन पीठ घेतले. तुम्ही आपापल्या अंदाजाने घ्या! ४-५ लसूण पाकळ्या ठेचून, कोथिंबीर बारीक चिरुन, मीठ, लाल तिखट, हळद, तीळ घातले. भरडसर वाटून धने आणि जीरे घातले, आणि थोडेसे तेल घालून पुरीसाठी घेतो तसे घट्ट मळून घेतले. कढईत तेल गरम करायला ठेवले आणि पुर्या तळून घेतल्या. त्या भरडसर धन्यांमुळे आणि अर्थातच टोमॅटोमुळे काय चव आली!
पावसाळ्यात एखाद्या संध्याकाळी नक्की करुन पाहा. केचप, चटणी, लोणचे, दही किंवा यातले काहीच सोबत न घेता अश्याच खा :)
प्रतिक्रिया
3 Jun 2017 - 7:12 am | जेम्स वांड
तोंडाला पाणी सुटले वट्ट. प्रयोग करायला हवा हा. एरवी बाहेरून टोमॅटो काळा होईपर्यंत भाजून सोलून केलेलं टोमॅटो भरीत सुद्धा फारच जास्त आवडीचे
5 Jun 2017 - 7:05 am | रुपी
धन्यवाद!
टोमॅटोचे भरीत कधी खाल्ले नाही. असे नक्की करुन बघेन. त्यासाठी फार पिकलेले टोमॅटो चालत नसतील ना?
3 Jun 2017 - 7:55 am | प्रीत-मोहर
रुपे काय दिसताहेत ग टोम्ॅटोज!! मला निसत बघत बसायलाच आवडेल त्याकडे. प्युरेच्या पुर्या भारी दिसताहेत! !
3 Jun 2017 - 8:47 am | मंजूताई
टोमॅटो ची असं च वाटलं फोटो त पुर्या दिसल्या रेसिपी त पुरी :) मस्त ! टोमॅटो, प्युरी, पुर्या....
3 Jun 2017 - 9:08 am | चांदणे संदीप
मसाला पुरी, पालक पुरी हे सारं फार आवडीचं. त्यात अजून एका पुरीची भर पडली.
पाकृ आवडल्या गेली आहे!
Sandy
5 Jun 2017 - 7:15 am | रुपी
बाब्बौ संदीप भाऊ पाकृ मध्ये? धन्यवाद! :)
3 Jun 2017 - 9:22 am | प्रचेतस
व्वाह...!!!
3 Jun 2017 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा
असेच म्हणतो.. +१ व्वाह...!!!
3 Jun 2017 - 11:59 am | संजय क्षीरसागर
आवडली रेसिपी !
3 Jun 2017 - 2:24 pm | एस
टंबाटी लय भारी दिसत्यात गड्या. पुऱ्या म्हंजी आक्षी पुर्नबिरम्मच की! अहाहा!
3 Jun 2017 - 3:11 pm | पद्मावति
आहाहा...मस्तच!
3 Jun 2017 - 4:41 pm | पलाश
सुंदर लेखन. पाककृती आणि फोटोसुद्धा मस्त!!!
3 Jun 2017 - 4:54 pm | पैसा
प्युरी आणि पुरी दोन्ही रेशीप्या एक नंबर!
3 Jun 2017 - 5:14 pm | सानझरी
झकास रेसिपी.. करून बघेन.. :D
3 Jun 2017 - 5:26 pm | त्रिवेणी
का ग टाकली पुरीची रेसिपी. फॅटी लिव्हर झालंय त्यात आम्हा खान्देशी लोकांना भाजीत कचच तेल घेतल्याशिवाय होत नाही.तिखट मिठाची अतिप्रिय पुरी उद्या करावीच लागेल. उद्या टमाटे प्युरी घालते त्यात.
3 Jun 2017 - 5:36 pm | सपे-पुणे-३०
पुऱ्या मस्त टेम्पटिंग आहेत. घरचे टोमॅटो मस्तच दिसतायत.
मी टोमॅटो प्युरी करून आईस ट्रे मध्ये ओतून त्याचे क्युब्स झाल्यावर झिप लॉक पिशवीत भरून ठेवते. हे क्यूब्ज वर्षभर आरामात टिकतात.
3 Jun 2017 - 9:19 pm | सविता००१
अप्रतिम दिसताहेत.
खूप खूप आवडतात. केल्याच पाहिजेत आता.
4 Jun 2017 - 12:58 am | पिंगू
पुर्या छानच बनल्या आहेत. मिश्र पीठ वापरुन थालीपीठ सुद्धा छान होईल ना..
5 Jun 2017 - 7:16 am | रुपी
धन्यवाद. कल्पना छान आहे.. एकदा करुन पाहाय्ला पाहिजेत
4 Jun 2017 - 1:40 am | पिलीयन रायडर
एखादा बॉक्स पाठवुन दे! मला गेले अनेक दिवस अत्यंत भंगार टोमॅटो इथे मिळत आहेत. त्यामुळे पुरी पेक्षाही त्या फोटोने जास्त जळजळ झाली.
4 Jun 2017 - 8:09 pm | रुपी
या वर्षीचे टोमॅटो अजून 'मेकींग' मध्ये आहेत!
तयार झाले की पाठवते. तुमचा पत्ता द्या ;)
4 Jun 2017 - 8:12 pm | रुपी
सर्वांना धन्यवाद :)
4 Jun 2017 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुर्या लै भारी दिसताहेत. आवडल्या. (टमाटे पण आवडले, गोल मस्त)
आने दो, और भी.
-दिलीप बिरुटे
5 Jun 2017 - 9:19 am | इडली डोसा
पुर्या पटकन उचलुन खाव्याश्या वाटतायेत. फारच टेम्टिंग दिसतायेत.
किती छान छान पदार्थ करतेस रुपी, तू माझ्या शेजारी का राहात नाहिस? ;)
5 Jun 2017 - 9:38 am | केडी
स्वतःच्या बागेत पिकवून ते खाणे ह्याची लज्जत कमाल असेल... फोटो आणि पाककृती मस्तच!
5 Jun 2017 - 11:41 am | सप्तरंगी
घरचे टोमॅटो, सही..
5 Jun 2017 - 11:59 am | सूड
टम्म फुगलेल्या पुर्या बघून जीव गार्डन गार्डन झाला.
5 Jun 2017 - 11:15 pm | रुपी
प्रतिसाद देणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद :)
5 Jun 2017 - 11:38 pm | रातराणी
टोमाटो अगदी दृष्ट काढण्याऐवढे गोंडस दिसतायेत. पुऱ्या आयत्या मिळाल्या तर खायला मजा येईल ;)
6 Jun 2017 - 10:52 am | जुइ
स्वत:च्या बागेतील टॅमॅटोची पुरी करण्याची मौज काही औरच!! शिवाय टोमॅटोचा वेल व्हवा यासाठी लागणारे चांगले हवामान पाहुन अंमळ जळजळ झाली :-)
6 Jun 2017 - 11:40 am | नूतन सावंत
झकास!मस्त टोमॅटो! मस्त प्युरे! मस्त पुऱ्या!T
7 Jun 2017 - 6:48 am | उल्का
अतिशय सोप्या पद्धतीने छान सांगितलं आहेस. टोमॅटो तर फोटोतून काढून तसेच कापून खावे असं वाटलं. मस्तच!
12 Jun 2017 - 4:39 pm | स्मिता चौगुले
मस्तच.. :)
12 Jun 2017 - 11:45 pm | रुपी
नव्याने प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
जुइ, इडो, पिरा, रातराणी आणि इतरही ज्यांना टोमॅटो, पुर्या खाव्याश्या वाटत आहे, केव्हाही या :)
13 Jun 2017 - 11:16 am | सस्नेह
वाह, भारीये प्युरीची पुरी !
मी अशीच पालक पुरी करते. पालकाची प्युरी करून.
13 Jun 2017 - 7:57 pm | यशोधरा
एकदम झक्कास!! :)
14 Jul 2017 - 2:48 am | दीपा माने
छान आहे ही पाकृ. प्रवासासाठी अगदी योग्य.
16 Jul 2017 - 12:29 pm | पियुशा
अग कसल्या भारी दिसताहेत !
16 Jul 2017 - 12:36 pm | स्वाती दिनेश
मस्त आहेत ह्या पुर्या,
ही माझी टोमॅटो पुरी
स्वाती
17 Jul 2017 - 2:10 am | रुपी
नव्याने प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद!
@स्वातीताई - पुर्या आणि चटणी सुंदर दिसत आहे. खूप दिवसांनी मिपावर पाहून छान वाटले :)