या रविवारी काय करायचं ? काय करायचं असा विचार करत असताना “पेने पास्ता इन व्हाइट सॉस ” करावा असं एकमत झालं . म्हणजे मत बायकोने व्यक्त केलं , त्याला मी आपली मान्यता दिली. (न देऊन सांगतो कुणाला बापडा ?) . तर असो पेने पास्ता ....
“पेने पास्ता इन व्हाईट सॉस” हे खरं तर एक अत्यंत राजेशाही अन “ईत्मिनाsssssssन से” असं बनवायचं व्यंजन आहे. भरपूर प्रमाणात चीज , दुध , भाज्या वगैरे. त्यामुळे डायेट वगैरे पाळणाऱ्या अभाग्यांनी याच्या वाटेला जाऊ नये . (आधीच सांगितलेलं बरं ... )
तर पास्ता हे एक इटालियन व्यंजन असून , फार मसालेदार वगैरे नसतं. त्यामुळे कोणत्याही ऋतू मध्ये हे तुम्ही बनवू शकता. मात्र पचनाच्या दृष्टीने थोडं अवघड व्यंजन.
साहित्य : (४-५ जणांसाठी)
1. दुध १.५ लिटर
2. कांदे २
3. लवंग १०-१२
4. मिरे १-१.५ चमचे (साधारण १०-१५ साबूत दाणे)
5. तमालपत्र (बे लीफ ) २
6. पास्ता ५००-६०० ग्राम
7. मैदा २ टेबल स्पून
8. तेल २ टेबल स्पून
9. चीज २५० ग्राम (आवडत असल्यास नंतर वरून घालण्यासाठी आणखी वापरू शकता)
10. गाजर , मिरची , बेल पेपर , ब्रोकोली ,लसूण , कांदा (लांब चिरलेला)
11. ओरेगनो , हर्ब सिजनिंग , चिली फ्लेक्स
कृती :
पास्ता = व्हाईट सॉस (बेस + थिकनिंग) + डाईस केलेल्या भाज्या + कुकड पास्ता ,
पास्ता करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे , पास्ता चं सक्सेस हे सॉस किती चांगला झालाय आणि पास्त्यात पाण्याचं प्रमाण कसं आहे यावर अवलंबून असतं. त्यामुळे पास्त्यात “सॉस” हा अत्यंत महत्वाचा आहे . तो करताना जितका मन लावून कराल तितका पास्ता ए-वन होणार.
तर आधी आपण सॉस कसा करायचा हे पाहू,
व्हाईट सॉस :
बेशमेल बेस : (Béchamel)
आधी एका भांड्यात दुध , मिरे , तमालपत्र टाका. नंतर एक कांदा (सोललेला) घेऊन त्यात लवंगा टोचा. (मंतरलेल लिंबू असतं तसं ) आणि हा कांदा सुद्धा त्या दुधात टाका. आणि दुध रटरट उकळू द्या. या सॉसला “बेशमेल” म्हणतात. या टप्प्यातच व्हाईट सॉसचं यश दडलंय .
बेशमेल
रु थिकनिंग : (Roux) (सॉस थिक करण्यासाठी)
तेलात मैदा मिसळून त्याचा साधारण शिऱ्यासारखा वास येईपर्यंत शिजवून घ्या. साधारण २ मिनटात हे मिश्रण छान दाणेदार होते. आता या मैदा-तेल मिश्रणात आपण सुरुवातीस उकळून घेतलेलं दुध मिसळायचं. (दुध टाकताना त्यातील मसाले गाळणीने वेगळे करून घ्या.)
आता हे दुध टाकलेलं मिश्रण मंद आचेवर ठेवून विस्क ने सतत ढवळत रहा. अन्यथा मिश्रण एकजीव न होता त्यात गोळे गोळे निर्माण होतात. ढवळत राहिलं की छान कंसीस्टेसीचा (साधारण केचप इतक्या) व्हाईट सॉस तयार होतो.
“रु”
पास्ता :
एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या त्यात अंदाजाने (चवीनुसार) मीठ टाका. आणि मग हे नीट उकळून घ्या. हे मीठ-पाणी नीट उकळल की त्यात पास्ता घालून थोडा शिजवा. हा पास्ता पूर्ण शिजू न देता साधारण ७०-८० टक्केच शिजवा. कारण नंतर आपण पास्ता , सॉस , भाज्या त्यात टाकून नंतर शिजवायचंय तेव्हा पास्ता उरलेला नीट शिजेल. अन्यथा जास्त शिजल्याने पास्ता गच्च होतो. हा असा अर्ध कच्चा पास्ता शिजवून झाल्यावर त्यात भरपूर (५-६ टेबल स्पून , जमल्यास वर्जिन ऑलिव्ह ) तेल टाकून हाताने मिक्स करायचा. असे केल्याने पास्ता चिकट न होता मोकळा राहतो. हातानेच तेल मिक्स करणे यासाठी महत्वाचं की चमच्याने केल्यास पास्ता तुटतो .
तेल लावलेला पास्ता
भाज्या :
आता आपल्या आवडीप्रमाणे (किंवा वर दिल्या प्रमाणे) भाज्या, थोडं तेल (किंवा बटर , चांगल्या प्रमाणात ) घेऊन त्यात शलो फ्राय करून घेणे. हे करत असताना नंतर (आवड-इच्छे प्रमाणे) वरून चीज किसून त्यात टाका. एकदा या भाज्या सुद्धा साधारण ७०-८० टक्के शिजल्या की एका मोठ्या भांड्यात व्हाईट सॉस , पास्ता व भाज्या घालून नीट एकत्र होई पर्यंत शिजवा.
भाज्या अन चीज
हे करत असताना परत वरून किसलेलं चीज टाकता येईल.
भाज्या , सॉस व पास्ता मिक्सिंग
प्लेटिंग :
आता पास्ता सर्व करताना वरून परत थोडा एक्स्ट्रा व्हाईट सॉस , ओरेगनो , हर्ब , चिली फ्लेक्स टाकून सर्व करा. (वैयक्तिक मत असं आहे की चिली फ्लेक्स न टाकताच पास्ता खालल्यास खरी चव अनुभवता येईल)
फायनल प्रोडक्ट .... सर्वड !!
तर ...
बोन अपेती ... एन्जोय पास्ता ...
आपलाच :
खादाडखाऊ
ज्याक ऑफ ऑल
प्रतिक्रिया
7 Jun 2017 - 10:27 pm | पिलीयन रायडर
मी असच करते पण दुधात मसाले कधी घातले नाहीत. आणि आक्खा कांदा सरळ टाकायचाय? ते ही लवंग टोचुन?
दुसरं म्हणजे तुम्ही फोटोला लांबी आणि रुंदी दोन्ही देताय का? ती सुद्धा एक सारखी? म्हणुन ते असे चौरसात गेल्याने विचित्र दिसत आहेत. एकच काही तरी द्या. (शक्यतो रुंदी). दुसरी बाजु आपोआप सेट होऊन नीट फोटो दिसेल.
उदाहरणार्थ, रुंदी ३०० देऊन (कारण फोटो उभट आहे. आडवा असता तर ६०० दिली असती कदाचित.) असा दिसेल फोटो.
8 Jun 2017 - 12:41 pm | ज्याक ऑफ ऑल
फोटो अपलोड करताना सूचना लक्षात ठेवतो.
आणि हो , अक्खा कांदा टाकायचाय. लवंग टोचून . हाच कांदा नंतर लांब लांब कापून पास्त्यात टाकायचा .
7 Jun 2017 - 11:24 pm | मस्तानी
कधीतरी प्रयत्न करेन जरूर !
8 Jun 2017 - 7:31 am | इरसाल कार्टं
मला अख्खा दिवस जाईल बनवायला बहुतेक :प
चीज आणायला म्हणून एक ठाणे अथवा कल्याणाची वारी करावी लागेल.
पण ट्राय करणेत येईल एवढं नक्की.
8 Jun 2017 - 12:43 pm | ज्याक ऑफ ऑल
असं राहता तरी कुठे की चीझ साठी वारी करावी लागते ?
करा नक्की ट्राय करा .. आणि सांगा कसं जमलं ते .
8 Jun 2017 - 8:42 am | सविता००१
चला, या रविवारचा मेनू ठरला बरं... :)
धन्यवाद
8 Jun 2017 - 9:50 am | त्रिवेणी
दूध फाटत नाही का कांदा टाकून उकळल्याने
8 Jun 2017 - 12:44 pm | ज्याक ऑफ ऑल
फाटायचं कारण ही नाही . कांद्यात सिट्रीक गुण असतात ?
8 Jun 2017 - 5:22 pm | त्रिवेणी
नसतात,पण असं नवीन काय करतांना विचारून घेतलेलं बर.
8 Jun 2017 - 9:58 am | केडी
मस्त रे केदार! छान पाकृ..... आवडेश!
8 Jun 2017 - 12:45 pm | ज्याक ऑफ ऑल
आपल्याच सावलीत आहोत ...
8 Jun 2017 - 10:24 am | II श्रीमंत पेशवे II
तोंडाला पाणी सुटल ......
8 Jun 2017 - 12:49 pm | मितान
मस्त पाकृ ! मसाले घालून व्हाइट सॉस करणेत यील !
यातला पास्ता वगळला की बाकी सगळं घालून बेक्ड व्हेजिटेबल पण मस्त होईल !
8 Jun 2017 - 1:42 pm | शेखर
फोटो बघुन अन पाकृ वाचून बादलीभर लाळ गळाली !!
8 Jun 2017 - 5:43 pm | एस
अहाहा!
8 Jun 2017 - 5:47 pm | सप्तरंगी
छान पाककृती ,पण २५०gm चीझ? आम्ही जरा जास्त वेळा पास्ता करतो त्यामुळे वदनी कवळ च्या ऐवजी फक्त 'say चीझ' असे
म्हणतो आणि खातो आणि whole wheat पास्ता try करा. बघा आवडेल तुम्हाला.
15 Jun 2017 - 12:32 pm | ज्याक ऑफ ऑल
पास्त्याच म्हणाल तर माझं फार बाहेरच खाणं / हॉटेलिंग होत नाही म्हणून मग घरी जे करतो अधून मधून त्यात "साग्र-संगीत" अन भरपूर टाकून करतो मग साहित्य ..
15 Jun 2017 - 8:13 pm | सप्तरंगी
हो, अगदी. घरचाच पास्ता इटालियन spices अम्मळ जास्त टाकूनच आवडतो..
11 Jun 2017 - 2:41 am | जुइ
छान आहे पाकृ! मला पेस्टो सॉस घातलेला पास्ता जास्त आवडतो. आता व्हाईट सॉस घालून करून पाहीन.
15 Jun 2017 - 12:35 pm | एकविरा
मी दुधात मसाले घालत नव्हते . आता ट्राय करते शनिवारी . आमच्याकडे रविवारी अकारण व्हेज नाही खात ब्वा ...
15 Jun 2017 - 9:24 pm | ज्याक ऑफ ऑल
जबरा
15 Jun 2017 - 9:29 pm | मोदक
नोंद घेतली आहे.
पाकृ नेहमीप्रमाणे भारी..!!!
16 Jun 2017 - 3:44 pm | ज्याक ऑफ ऑल
मनापासून , मोदक भाऊ
26 Jun 2017 - 5:22 am | एमी
लय भारी!!