रव्याचे झटपट अप्पे

रुपी's picture
रुपी in पाककृती
20 May 2017 - 6:41 am

अगदी ऐन वेळी ठरवून सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहाच्या वेळी हे अप्पे करता येतात. जितके पटकन होतात, तेवढ्याच लवकर संपतातही :)

a1

साहित्यः
१ वाटी रवा,
३/४ वाटी दही किंवा १ वाटी ताक,
खायचा सोडा,
पाणी,
मीठ,
तेल,
मोहरी,
कढीपाला,
१-२ टे. स्पून बारीक चिरलेल्या भाज्या (ऐच्छिक)

कृती:
१. फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात मोहरी घाला, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भाज्या घालून २-३ मिनिटे परतून घ्या. मी कांदा आणि ढब्बू मिरची १-१ टे.स्पून घेतली.
२. एका भांड्यात रवा आणि दही/ ताक एकत्र करुन घ्या. साधारण इडलीच्या पिठासारखे होईल अश्या अंदाजाने पाणी घाला.
३. त्यात फोडणी, परतलेल्या भाज्या घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. आवडत असेल तर बारीक चिरून हिरवी मिरची घाला (मी घातली नाही).
४. ३/४ टीस्पून सोडा घालून मिश्रण एकत्र करुन घ्या आणि पंधरा मिनिटे झाकून ठेवा.
५. हवी असेल तर तोपर्यंत कोथिंबीर-पुदिन्याची चटणी करुन घ्या.
६. अप्पेपात्र मध्यम आचेवर ठेवा. १-२ थेंब तेल घालून वर केलेल्या मिश्रण अप्पे-पात्रात घाला.
७. झाकण ठेवून ३-४ मिनिटे झाल्यावर सर्व अप्पे उलटून पुन्हा १-२ मिनिटे होऊ द्या.
८. गरम-गरम अप्पे चटणी, केचपबरोबर खायला द्या. मिरची नसल्यामुळे मुलांनीही आवडीने खाल्ले.

appe

(यात पालक, गाजर अश्या भाज्याही घालता येतील.)

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

20 May 2017 - 6:58 am | सविता००१

अत्यंत लाडका पदार्थ . छानच दिसतोय

पाकृ व फोटू मस्त! लगेच करते व कळवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2017 - 7:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबरा...!

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

20 May 2017 - 9:32 am | पैसा

मस्त आणि सोपे!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2017 - 12:17 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद... सोप्प्या पा. क्रु. साठी.

पद्मावति's picture

20 May 2017 - 1:25 pm | पद्मावति

मस्तच.

अनन्न्या's picture

20 May 2017 - 7:52 pm | अनन्न्या

लगेच करण्यासारखे

नूतन सावंत's picture

20 May 2017 - 10:45 pm | नूतन सावंत

झकास आणि पौष्टिक पाककृती.

आत्ताच हे आप्पे करून पाहिले. मस्त जमले. तोंडीलावणे म्हणून पुदिन्याची चटणी केली.
माझे प्रमाण देतिये म्हणजे आपापल्या कुटुंबासाठी पुरेसे करता येतील.
पाऊण मेजरींग कप म्हणजे माझ्याकडील १ मोठी वाटी आहे.
एक वाटी रव्याचे पुरतील की नाही असे वाटल्याने दोन वाट्या म्हणजेच दीड मेजरींग कप रवा घेतला.सर्व कालवून होताहोता आपण जास्त प्रमाण घेतल्याचे लक्षात आले.
सर्व मिश्रणाचे (फोडणीतील भाज्या, मिरच्या, सोड्यामुळे पीठ फुगणे, कोथिंबीर वगैरे) बरोबर २८ आप्पे झाले. म्हणजे पाऊण मेजरींग कपाचे १४ होतील जे आम्हाला ब्रेफाला पुरेसे आहेत. पुढीलवेळी सुधारणा करीन. तीन चतुर्थांश सोड्याऐवजी मी अर्धा टीस्पून एक वाटीला अश्या प्रमाणात घेतला तरी चांगले झाल्यासारखे वाटले एवढाच लहानसा बदल केला. आप्पेपात्रात लहान आप्पे, मध्यम व मोठे असे तीन प्रकार असतात. माझ्याकडे पिटुकले आप्पे व मध्यम आप्पे करणारी दोन पात्रे आहेत. त्यातील मध्यम आकाराच्या पात्रात केले.
ही पाकृ अतिशय छान लागली व ऐनवेळी कोणी ब्रेफाला येणार असे समजले तरी करता येतील म्हणून आनंद झाला. धन्यवाद.

रुपी's picture

23 May 2017 - 2:02 am | रुपी

अरे वा.
इतक्या सविस्तर प्रतिसादाबद्दल तेही केल्यावर आवर्जून - त्यासाठी धन्यवाद.
माझे बरोबर १४ आप्पे झाले! म्हणजे तुमच्या आणि माझ्या वाटीचे माप एकच दिसते ;)

सोड्याबद्दल सहमत आहे. कदाचित कमी चालला असता. पण कधीकधी पदार्थ हवा तसा फुगत नाही, म्हणून मी थोडा जास्त सोडा घालते- शिवाय सोडा नवीन आहे की जुना त्यावरही प्रमाण बदलत असावे. इथे सोड्याचा पुडा इतका मोठा मिळतो, के दर २ महिन्याला तो टाकून नवीन आणावासा वाटत नाही.

इडली डोसा's picture

22 May 2017 - 6:54 am | इडली डोसा

लगेच करुन बघणार.

बरखा's picture

22 May 2017 - 11:58 am | बरखा

अप्पे माझा आवडता पदार्थ आहे. रेसीपी मस्त. करून बघेन.

जागु's picture

22 May 2017 - 12:44 pm | जागु

मस्त रेसिपी.

पर्णिका's picture

24 May 2017 - 3:12 am | पर्णिका

पाकृ आवडली. नक्की करणार !

दिपक.कुवेत's picture

24 May 2017 - 12:26 pm | दिपक.कुवेत

पाकृ पण सोपी आणि कमी वेळखाउ. मी पण ट्राय केले पण माझे आप्पे पात्राला चिकटले. मिश्रण सुद्धा फार पातळ नव्हतं. फक्त मी सगळं घालून पीठ भीजवून ठेवलं आणि अगदी करायच्या अगोदर सोडा घातला....त्याने काही फरक पडला असेल का? मग भीजवलेल्या पीठाचे उत्तपे घालू असं ठरवलं तरीसुद्धा तीच गत. शेवटी पीठ चक्क ढोकळ्यासारखं उकडलं आणि केचप बरोबर संपवलं.

रुपी's picture

25 May 2017 - 12:28 am | रुपी

ओह..
खरं तर सोडा ऐन वेळी घातल्याने फरक पडायला नाही पाहिजे. मी काही वेळा अश्याच मिश्रणाचे उत्तपे बनवताना सोडा नंतरही घालते.
फार शक्यता वाटत नाही, पण अप्पेपात्र/ तवा फार गरम होते का? सोडा जुना होता का?