मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती - भाग दोन (अंतिम)

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
17 May 2017 - 1:04 am

(पहील्या भागातून...)

फायनली आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठीकाणी पोचलो होतो. गेल्या ट्रेकच्या वेळेला जिथे राहीलो होतो तिथेच शाळेत पाठीवरच्या बॅगा उतरवल्या आणि स्वस्थ बसून राहीलो. आजच्या दिवशी बोरवाडी ते घोळ व्हाया मानगड, कुंभे घाट असा जबराच पल्ला झाला होता.

जरावेळानी उठून फ्रेश झालो जवळचे आणलेले खाल्ले आणि लगेच झोपेच्या स्वाधीन झालो.
----------------------------------

दिवस दुसरा:

काल झोपण्याच्या आधी सर्वांनी एकत्र बसून दुसर्या दिवसाच्या म्हणजे आजच्या चालीची उजळणी केली होती, तेव्हाच कळले होते की दुसर्या दिवसाची चाल पण पहील्या दिवशीएवढीच आहे, कदाचीत जास्तच :(. त्यामुळेच सर्वांना लवकर उठण्याची ताकीद देऊनच झोपायला पिटाळले होते. आजच्या दिवसाचा पल्ला होता घोळ ते टेकपावळे, टेकपावळे ते खानू, खानू ते वारंगी व्हाया बोचेघोळ घाट आणि वारंगी ते रायगड पायथा. रायगडावर आमचा मित्र किरण त्याच्या ग्रूप बरोबर आला होता, त्याला भेटूनच ट्रेकची सांगता करावी असे प्लॅनींग होते. खरे तर घोळ गावाहून रायगडला जायला किंवा कोकणात सांदोशीला उतरायला कोकणदिवा किल्ल्यामार्गे कावळ्याघाट सर्वात सोपा आणि जवळचा रस्ता पण आमचा हा रूट पुर्वी झाल्या कारणाने आम्ही रायगडाला जायला असा दुरचा मार्ग पत्करला.

आता असा गोल गोल वळश्याचा रुट असल्याने आणि घोळ ते टेकपावळे अंतर रात्रीच्या वस्तीच्या गाडीने सकाळी जायचे असल्याने लवकर उठणे भाग होते. रात्री स्वारगेटहून (स्वारगेट - घोळ, दु. ३ वा. स्वारगेटहून) वस्तीला घोळ गावात आलेली गाडी सकाळी ६.०० ला निघते आणि पानशेत मार्गे पुण्याला परतते. खरेतर हल्लीच बस घोळ गावापर्यंत यायला लागलीय. आमच्या मागच्या ट्रेकमध्ये आम्ही घोळपलीकडील दापसर गावातूनच खिंड ओलांडून घोळला आलो होतो. आता एवढ्या लवकर बस निघते म्हटल्यावर आम्हालाही सकाळी उठणे भाग पडले. घोळ गाव तसे डोंगराच्या बेचक्यात वसले असल्याने वारा नव्हता तरी थंडी भरपूर, भरपूर कसली अतीच, होती. सकाळचा अलार्म वाजला तेव्हा नाईलाजानेच सगळे उठलो आणि बस निघण्याच्या वेळेला बस मध्ये बसलो तेव्हा आमच्यातले काहीजण लगेच झोपेच्या स्वाधीन झाले (कसे काय जमते याना कुणास ठाऊक :) ). बसने आम्हाला अर्ध्या तासात ८ किमि वरच्या टेकपावळे फाट्यावर उतरवले आणि खंडीभर धूळ आमच्यावर उडवत निघून गेली. आता सिन असा होता की बस थांब्याचे नाव जरी टेकपावळे असले तरी हा टेकपावळे गावाकडे जाणारा फाटा होता आणि टेकपावळे गाव पलीकडच्या डोंगरावर होते :(. हा उलगडा आम्हाला उतरल्यावरच झाला. बरे रवीवारच्या इतक्या पहाटे टेकपावळे गावात उतरणारे आम्हीच आणि च्ढणारे कुणीच नसल्याने जायचे कुठच्या दिशेला हा प्रश्ण आमचा आम्हालाच सोडवायला लागला. दरी पलीकडील पानशेत धरणाचे बॅकवाटर आलेले दिसत होते आणि. करतो काय, सॅक्स चढवून चालायला टेकपावळेच्या दिशेने चालायला सुरुवात केली :)

खाली पाण्याजवळ जायला उतरायला सुरुवात केली आणि लक्षात आले की पाणी ओलांडायला पाण्याच्या लेवलपर्यंत खाली जायलाच लागेल, दुसरा उपाय नाही :(. तसेच त्या धूळ भरल्या कच्च्या मातीच्या रस्त्यावरून खाली उतरलो आणि पाण्यापाशी आलो तर तेथे एक बारीकसा पुल दिसला. त्याच्याच वरून शरणाचे पाणी ओलांडले आणि उतरलो तसेच परत वर चढायला सुरुवात केली. एकतर झोप पुर्ण नाही आणी सकाळी सकाळी असा भक्कम चढ उतार करत चालायला लावणार्या टेकपावळेचा रुटने आम्हाला दमवलेच. थकलेले घामेजले आम्ही गाडीतून उतरून १.३० तासाने डोंगरावरच्या टेकपावळे गावात आलो. गाव तसे छोटे पण दुर्गम नाही. असे अचानक आम्ही पाण्याकडच्या रस्त्याने गावात उगवल्यावर गाववाले चक्रावलेच :). (तेही हल्ली ह्या रस्त्याचा वापर न करता माणगावंहून येणारा दुसरा रस्ता वापरतात, जो डांबरी रस्ता आहे). सकाळी आम्ही घोळहुन आलोय आणि एवढेच नव्हे तर आदल्या दिवशी कोकणातल्या निजामपुर बोरवाडीहून आलोय हे त्यांच्या पचनीच पडेना. कोकणातून आलोय आणि परत खानूहून कोकणात चाललोय ह्याची कारण मिमांसा त्यांना कळेचना. त्यांचे म्हणणे एकच, कशाला करायचा एवढा उपद्व्याप (ट्रेकर्स सोडले तर बाकीच्यांच्या साठी खरचं आहे ते म्हणा :) ). शेवटी त्यांना समजवण्याच्या फंदात न पडता सरळ त्याना खानूला जाणारी वाट विचारली. लगेच उत्तरे आली की वाटा मोडल्यात जाऊ नका. जायचेच असेल तर लांब चांदरवरून खानुच्या डिग्ग्यावरून जावा. गाडी रस्ता झाल्याने जुन्या वाटांचा वापर बंद किंवा कमी होतोय ह्याचे हे एक उदाहरण. आता आम्हाला कळेना की पुर्वी ही माणसे अश्याच वाटा पायाखाली घालत होती ना, मग रस्ता तर असणारच. कारण अजून सगळेच काही गाडीरस्त्याचा वापर करतात असे नव्हे. गावातली जाणकार बाहेर गेलेली आणि पोराटोरांनी कधी त्यावाटेला पाऊलच घातले नव्हते त्यामुळे त्याना विचारले तर कुठले खानू अशीच उत्तरे यायची. त्यामुळे झाले काय की आम्हाला खानूला जायला रस्ता दाखवणारे कोणी भेटेचना. साधारण अर्धातास गावातील एका घराच्या अंगणात बसून कोणी रस्ता दाखवेल काय असे विचारण्यात गेला (त्या निमित्ताने आमच्या पदरी एक कोरा चहा आणि आराम पडला :) ). बरें, टेकपावळेचे भौगोलीक स्थान बघता स्वत:हून खानूचा रस्ता शोधण्याचे धाडस करणे म्हणजे जरा अतीच होते. शेवटी बरीच चौकशी (खरे तर विनंतीच :) ) केल्यावर एक मावशी तयार झाल्या, तेही अर्ध्या रस्त्यापर्यंतच. आम्ही लगेच सॅक्स खांद्यावर चढवल्या. न जाणो मावशींचा विचार फिरला तर :) :)

टेकपावळे फाट्यावरून टेकपावळे गावाकडे
Way to Tekpavale and bridge on dam

बॅकवॉटरवरील पूल. हा ओलांडून आम्ही टेकपावळ्याला गेलो.
Bridge on dam water

पानशेत धरणाचे बॅकवॉटर
Panshet Dam backwater

मावशींबरोबर खानूच्या वाटेला लागलो. माझ्या ट्रेक अनुभवांमध्ये एखाद्या मावशींना रस्ता दाखवायला घेण्याची ही पहीलीच वेळ. पण मावशी बोलघेवड्या होत्या. खानू गाव त्यांचे माहेरच होते त्यामुळे माहेराची वाट त्यांना अंधारात पण सापडली असती. त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे बिंधास्त चालत होतो. गावाच्या दक्षीणेला चालायला सुरु करून वाकडी तिकडी वळणे घेत भात शेती तुडवत होतो. ह्या एवढ्या लांब डोंगरात टेकपावळे गावाची शेती होती. शेतमळे संपता संपता एक जंगली धनगरवस्ती लागली. त्या वाडीतील लोकांनी पावण्यांना कुठे घेऊन चाललेय विचारल्यावर मावशी उत्तरल्या. "खानू, कोकणातून आलेत. घोळ ला रायले होते आता वारंगीला चाल्लेत". ह्या वर दोन प्रतीक्रीया आल्या. एक "बाय माजी एवढ्या लांब" आणि दुसरी "कशाला मरायला फिरतात ही लोकं कोण जाणे". दुसरी जास्त मनापासून आल्यासारखी वाटली :) :).

धनगर वस्ती संपल्यानंतर शेतमळेही संपले आणि गवताळ पट्टा चालू झाला. अजूनही आम्ही गावापासून फार लांब आलो नसू. फारतर ३०-४० मिनीटे. हा गवताळ पट्टा माझ्या चांगलाच लक्षात आहे. जमीन बहुधा पाणथळ असावी कारण गवत चांगले ८-१० फुट उंच होते जानेवारी असूनही ओले हिरवे होते. मावशी एकदा इकडून आणि एकदा तिकडून वाट काढत निघाल्या होत्या. आमच्या सगळ्यांचे दिशा ज्ञान तर केव्हाच गंडले होते. आता आम्हाला गाव तर सोडाच पण धनगर वस्ती कुठे आहे विचारले तर तेही चटकन सांगता आले नसते :). आजही टेकपावळे गावात गेल्यावर मला स्वतःहून खानूपर्यंत बिनामदत जाता येणार नाही:). वाटेत एका ठिकाणी एका मोठ्या आंब्याच्या इथे एक मोठी पायवाट दुसरीकडे फुटत होती. मावशीनी सांगीतले की ह्या वाटेने गेल्यावर घोळ जवळील गारजाईवाडीला पोचायला होते. अरेच्चा... म्हणजे गारजाईवाडीवरून देखील आतल्या रस्त्याने खानूला पोचता येते तर.

असे २० एक मिनीटे. चालल्यावर एक मोठा ओढा आला. इथे छोटासा ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. ओढ्यानंतर आपण लगेचच डोंगर रीज चढायला लागतो जी डोंगररांगेच्या सर्वात उंचावर आपल्याला घेवून जाते. ह्या चढणीनेही आमची परीक्षा बघायला सुरुवात केली कारण भयानक उन आणि वाटेवर जराही सावली नाही. तश्यात ती रिजला चांगलीच स्क्रीही होती. अर्ध्याहुन अधीक चढलो तर मावशीनी सांगीतले की हिच वाट पकडून डोंगर पठारावरून उजवीकडे वळून खानूला जायला होते. मावशीना परत फिरायचे असल्याने त्यांची बिदागी देऊन आम्ही परत रिज चढायला लागलो. रिज अंतीम टप्यात असतना मागे फिरून बघीतले तर सगळ्या एरीयाचा कॅनवास दिसत होता. आम्ही चढून आलो ती रिज, गवताळ पट्टा, धनगर वस्ती आणि टेकपावळे गावाच्या खुणा. हे नजरेत भरून घेत ५ मिनीटात पठारावर आलो आणि ब्रेक घेतला. आता पुढची वाट आमची आम्हालाच शोधून चालायची होती. मावशींच्या सांगण्याने असे वाटले की पठारावरून तिस एक मिनीटात लगेच खानू येईल पण कसचे काय. पठारावरून एक खानूचा डिगा सोडला तर कुठलीही ओळखीची खुण दिसेना. खानू गाव कुठे असेल त्याचा साधारण अंदाज आला पण किती अंतर असेल ते काही इमॅजीन करता येईना. मावशींच्या सांगण्यावर भरवसा ठेऊन तसाच पश्चीम दिशा जवळ करत चाललो. असाच पठारावरून २० मिनीटे. चालल्यावर दोन ओळखीच्या खुणा दिसल्या आणि आम्ही प्रचंड खुश झालो. पहीली खानू गावाची घरे आणि दुसरा "रायगड". अश्या अवघड, रीमोट आणि निर्मनुष्य जागी रायगड दिसणे म्हणजे पर्वणीच. हवा चांगली असल्याने नशीबाने दृष्यमानता उत्तम होती आणि रायगडावरची बांधकामेही दिसत होती :) :)

रायगड जरी दिसला तरी आम्हाला खानूला पोचायला वाटते तेवढे सोपे नव्हतेच. आम्ही होतो डोंगराच्या पठारावर आणि खानू होते पलीकडच्या दरीतल्या तळाशी :( . करणार काय, दुसरा उपाय नसल्याने तसेच निघालो आणि पठार उतरायला लागलो. पार तळातल्या ओढ्यापर्यंत उतरायला लागणार होते. ओढ्याजवळ आलो तर एक वेगळीच अडचण. गाय-बैलांचा एक मोट्ठा कळप आमच्या ओढ्याच्या वाटेवर होता जो काही केल्या हलायलाच तयार होईना उलट आमच्याकडेच खुनशी नजरेने बघू लागला. आम्ही लक्षणे ओळखून दुसरी वाट धरली आणि ओढ्यात दाखल झालो. ओढा म्हणजे स्वर्गसुख होते अगदी. थंडगार पाणी झुळुझुळु वाहते होते आणि ते पाणी आणि ओढ्यातील सावली पठारावरच्या तापत्या उन्हातून आलेल्या आम्हाला चांगलेच सुखावून गेली. बराच वेळ बसलो तरी तिथून उठायचे मन होणार नाही (ह्याचा पुढे फटका बसलाच :( ) असे भन्नाट वातावरण होते आणि खानू वरती १० मिनीटाच्या चढणीवर असल्याने आम्हीही तिथे जरा जास्तच वेळ बसून राहीलो. मग थोडक्या चढणीनंतर खानू गावात दाखल झालो तेव्हा १२.३० झाले होते.

टेकपावळेवरून खानूला जाताना टेकपावळे गावातील विहीर.
Tekpavale well enroute khanu

वाटेतल्या धनगरवस्तीकडे
Enroute dhanagar vasti enroute khanu

धनगरवस्ती संपल्यावरचा ओढा. हाच ओलांडला की खानूची चढण सुरु होते.
Odha enroute khanu

खानू गावाकडे जाणारी रिज
Ridge towards khanu

रिज अर्धी चढून झाल्यावर. मध्यभागी धनगर वस्ती. उजवीकडे आत मध्ये टेकपावळे गाव. रिज पायथ्याला गवताळ पट्टा
Ridge to khanu half way

रिज संपल्यावर दिसणारे दृष्य
View from Ridge top

पठारावरून दिसणारे रायगडाचे पहीले दर्शन
First view of Raigad khanu khore

रायगड जवळून. नगारखाना आणि जगदिश्वर मंदीर स्पष्ट दिसताहेत
Raigad top closeup

पठारावरून दिसणारे दरीतील खानू आणि गावातील घरे.
Khanu khore from platue top

खानू गावाकडे उतरताना लागणारे जंगल
Jungle while descending khanu

खानू हे गाव सरकार दरबारी जिल्हा पुणे असले तरी शहरी संपर्क फक्त नावालाच. गावात कोणी राहतात कि नाही अशी शंका येण्याएवढी कमी घरे. जी कशीबशी चालू आहेत तित फक्त म्हातारी आणि छोटि मुले. तरणी आणि कमावती केव्हाच गाव सोडून निघून गेलेली. एकंदर सगळ्या गावालाच उदासीनता आलेली. पिकणारी पावसाळी शेती जगण्याचा सगळ्या गरजा पुर्ण कऊ शकत नाही हे वास्तव आणि उन्हाळ्यात पाण्याच्या एका घोटासाठी पण नशीबी असलेली वणवण ही सत्य परीस्थीती. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, बोलायला माणसे नाही, नातलग विचारत नाहीत अश्या परीस्थीतीमध्येही पाच-सहा घरे तग धरून आहेत (तेव्हा होती. सद्य वास्तव अजून भयानक अशू शकते). पुर्णपणे निसर्गावर अवलंबून. बरे तो निसर्गही लहरीच, कधी अजीर्ण होईल इतके देईल तर कधी कमरेची लंगोटिही पळवील. मरण येईपर्यंत जगायचे हाच मुलधर्म पण कसे जगायचे हे तुमच्या हातात नाही. ते आहे निसर्गाच्या, देवाच्या किंवा शहरातून येणार्या पैशाच्या हातात. बरे ठिकाणही काही नावाजलेल्या जागी नाही की गुठामंत्री कागदी कपट्यांच्यां जिवावर ह्या गावाला विकत घेईल. साधी मिठ मिरची घ्यायची तरी सगळा घाट उतरून कोकणात वारंगीला उतरायचे आणि ते बाचके डोक्यावर घेऊन परत तेवढेच चढायचे. सगळ्यात जवळच्या शहरात जायचे म्हणजेच जिथे ४-५ तासांचा प्रवास तिथे शहरी सुविधा वाटेतच अडकून ह्या जागी पोचल्या नाहीत त्याला बिचारे खानूवासीय काय करनार. ह्या खानूच काय पण अश्या दुर्गम किंवा अतीदुर्गम गावाची/वस्तीची हीच कमीअधीक परीस्थीती आहे. लाईट, पाणी, शाळा, वैद्यकीय सुविधा म्हणजे काय हे यांना म्हाईतच नाही आणि माहीती असले तरी पोचल्या नाहीत. असो....

तर खानू गावात असा विचार करत बसलो असताना मोठा ओरडा झाला कि पळ पळ... शेजारच्या घरातला (जो की आम्हाला बोचेघोळ घाट दाखवायला येणार होता) एक तरूण पोरगा पळत पळत खालच्या ओढ्याकडे जाताना आम्हाला म्हणाला की ते वारंगीचे काय ते तुमचे तुम्ही बघून घ्या. आमच्या म्हातार्याला ओढ्याजवळ बैलाने ढोसरलेय, मि तिकडे चाललोय. म्हटले हे नवीन अजून काय?? आम्ही टरकलोच. मगाशी ज्या ओढ्याजवळ आम्ही ज्यांचा कळप बघीतला होता त्यांच्यातल्या एका बैलाने शेजारच्या घरातल्या म्हातार्याला शिंगाने भोसकले होते. आता त्याला पानशेतच्या सगळ्यात जवळच्या सरकारी दवाखान्यात न्यायचे म्हणजे चांदर मार्गे २ तास :(. त्या म्हातार्याला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळो आणि तो लवकर बरा होओ अशी प्रार्थना करून आम्ही खानू गावातून निघालो तेव्हा १.१५ झाले होते. आमचा वेळेचा अंदाज चुकून रायगड पायथा गाठणे थोडेसे अवघड वाटते होते. पण ते सोडले तरी वारंगीला तरी लवकरात लवकर पोचूया हे टारगेट ठेऊन निघालो. गावाजवळच्या शेतात काम करणार्या मावश्यांना बोचेघोळ वाटेचा रस्ता विचारला तेव्हाच कळले की प्रकरण अवघड आहे. खानु आहे डोंगरांच्या मध्यात आणि त्याच्या चारी बाजूला आहेत उंच डोंगर. तिथून एक डोंगर चढून, खिंड ओलांडून, ट्रॅवर्स मारून जंगलातून बाहेर पडलो की जननी येते. खानूवासीय त्याला काळकाईचे ठाणे म्हणतात. तिथे शेजारील जंगालातून येणारा बारमाही ओढा आहे. तिथून पुढे निघाले की १०-१५ मिनिटात कोकण दिसायला लागते, म्हणजे वरून :). इथून पुढे चिंचोळ्या वाटेवरचा दृष्टीभय असलेला १५-२० मिनिटांचा आणि एका साईडला खोल दरी असलेला ट्रॅवर्स मारून आपण अॅक्चुअल बोचेघोळ घाटाच्या नाळेला लागतो. ही नाळ नावाला जागून ( :) ) दोन डोंगराच्यामधून खाली उतरणारी, चिंचोळी आणि झाडीभरली नाळ आहे. ही नाळ संपून आपण मोकळवणात आलो तरी हे घाट प्रकरण संपत नाही. मोकळवण म्हणजे हेडमाची गावाचे पठार. हेडमाची हे गाव घाटाच्या खालच्या टप्प्यावर आहे. जननी वरून इथे यायला सहज १.३०-२.०० तास जातात आणि खानू इथून पुढे ३०-४५ मिनिटे. हेडमाची गावातून इथून पुढे तसेच खाली उतरत राहीलो की ३० मिनिटात आपत सर्वात तळाशी येतो आणि १५ मिनीटानी वारंगी गावात पोचतो. बोचेघोळघाट हा सरळ देशावरून कोकणात उतरणारा घाट नव्हे तर वाकडा तिकडा, वर खाली, एक्स्पोज्ड वाटेवरून, जंगलातून, कारवीतून असा गेलेला आहे. पायवाट जरी एकच असली तरी चुकून गंडलो तर समाधीच बांधायची वेळ येणार हे नक्की. कारण जंगली श्वापदे, दुरदुर पर्यंत निर्मनुष्य भाग आणि जननीचा ओढा सोडला तर पाण्याची वानवा.

हे सगळे डोक्यात ठेवून गावातून निघालो. गाव संपल्या संपल्या चढण सुरु झाली. एकच पायवाट असल्याने चढणीला लागलो. हाश्शहुश्श करत खिंडीत आलो तेव्हा खालच्या कोकणाच्या नजार्याने झलक दाखवली. खिंड पायथ्याला जननीचे ठाणे दिसत होते. लगेच खाली उतरून जननीचा ठाण्यापाशी जेवणाचा ब्रेक घेतला. छोट्याश्याच जेवणाच्या ब्रेकनंतर ओढ्यातले पाणी भरून पुढे निघालो. जननीच्या पठारावरून पुढे इंग्रजी "सी" ला तळातून उजवीकडे वळसा मारला आणि कोकणाचा कॅनव्हास उघडा झाला. आहाहा... कसले जबरी दृश्य होते. उजवीकडे डोळे फिरवणारी दरी आणि त्याही पुढे सह्याद्रीच्या उंच आणि नजर गरगरेल अश्या दर्या :). अगदी समोर हाकेच्या अंतरावर रायगड होता. तळ कोकणातली गावे, वाड्या, वस्त्या दिसत होत्या. वारंगीचेही पहील्यांदा दर्शन झाले (तिथपर्यंत जायला आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच अंतर काटायचे होते हा साक्षात्कारही झाला हा भाग निराळा :) ). समोरच्या चिंचोळ्या पायवाटेने आम्ही तसेच पुढे निघालो. सावधपणे हा घसार्याचा टप्पा पार करावा लागतो नाहीतर घसरडी वाट केव्हा तुम्हाला एक टप्पा आउट करेल ह्याचा नेम नाही :). २० मिनीटानी जेव्हा हा टप्पा संपला तेव्हा बोचेघोळ नाळ समोर आली जिच्यावरून ह्या घाटाला बोचेघोळघाट नाव पडलेय. नाळ छोटी पण मस्त आहे. दोन्ही बाजूला डोंगर खेटून आणि मधून झाडीभरल्या जंगलाच्या तळातून पायवाट गेली असल्याने उन्हाचा झालेला त्रास केव्हाच पळाला. पण ह्याचा दुसरा पण वेगळा त्रास आहे (जो बर्याच नाळेंना होतो) तो म्हणजे मोठ्यामोठ्या टोकेरी दगडांचा. ह्यांवरून उतरतना उड्या मारत कसरत करत उतरावे लागले. साधारण एक तास नाळ उतरत होतो. नाळे शेजारून ओढा वाहत असल्याने पावसाळ्यात ही नाळ म्हणजे मोठे चॅलेंज असेल यात शंकाच नाही. शेवटी शेवटी नाळेचे तोंड मोठे होते गेले आणि आम्ही हेडमाची गावाच्या पठारावर आलो.

खानूवरून निघाल्या नंतर बोचेघोळच्या वाटेतली खिंड. समोर रायगडचे टकमक टोक आणि पायथ्याचे काळ नदीचे खोरे आणि होऊ घातलेले धरणही दिसतेय.
Top of bocheghol khind with takmak and kal river view

जननी देवळाचा इथला ओढा
Odha of janani temple

जननी किंवा काळकाईचे ठाणे
Janani or Kalkai temple

जननीच्या इथून दिसणारी आपण अलो ती खानू कडील खिंड समोरील मध्यभागी
khanu khind opposite way

जननी वरून निघाल्यावर नाळिच्या अगोदरचा ट्रॅवर्स
traverse towards bocheghol_1

ट्रॅवर्स आणि समोर रायगड आणि वारंगीचे होणारे पहीले दर्शन
bocheghol traverse with raigad varangi view

ट्रॅवर्स उतरताना दिसणार्या उजवीकडील खोल दर्या
Deep valleys bocheghol

समोरील डोंगर पायथ्याशी बोचेघोळ नाळ आणि त्याच्या तळाशी हेडमाची
Bocheghol nal with hedmachi at bottom

पठारावर थोडे पुढे हेडमाचीतील लोकांची शेती आणि दुरवर घरेही लागली. पाठीमागे बघीतले तर जिथून आलो त्या कश्याच्याही संदर्भ लागणार नाही असा टेरेन होता. समोर एक सरळ वाट होती आणि डावीकडे एक वाट होती ती हेडमाची गावाकडे जाणारी. आम्हाला हेडमाचीला काही जायचे नव्हते त्यामुळे आम्ही सरळ जाणार्या वाटेने वारंगीकडे निघालो. सरळ जाणारी वाट पुढे उताराला लागली आणि हेडमाचीवरून ३० मिनिटात अगदी तळकोकणातल्या ओढ्याच्या लेव्हल पर्यंत खाली उतरलो. घाटवाट संपली तरी उन्हातून वारंगीपर्यंत जायची २० मिनिटांची चाल होतीच. ती कशीबशी संपवली आणि वारंगी गावात दाखल झालो तेव्हा ४.१५ वाजले होते.

हेडमाची गावाकडे जाणारा रस्ता
Route to hedmachi village

हेडमाचीवरून दिसणारी बोचेघोळ नाळ (समोरील सर्वात उंच डोंगराच्या उजव्या भागाच्या अगदी अंतर्भागात)
Bochoghol location from hedmachi

वारंगी गाव
Warangi Village

कोकणातले, रायगड जिल्ह्यातले, ऐन सह्याद्रीच्या पोटात असलेले वारंगी गाव बरेच मोठे. पक्की घरे, पक्की सडक, मंदीर, शाळा, एक किराणामालचे दुकान, रिक्षा आसा सगळा मोठ्या गावाच्या लायकीचा जामानीमा. आम्ही गावकर्यांना विचारले की रायगड पायथा किंवा गेला बाजार निजामपुर किंवा वाडी किती लांब आहे तर उत्तर आले की चालत किमात २.३० तास. तसा जोर लावला असता तर शक्य झाले असते आणि आमचा प्लॅन ठरल्या प्रमाणे पुर्णही झाला असता पण एकतर वारंगीत फोन रेंज नसल्याने किरणशी संपर्क होऊ शकत नव्हता आणि जर उशीर झाला असता पोचायला तर रायगडावरून परतीची महाड गाडी चुकण्याचा संभव होता (असे झाले मग पडा अडकून गावातच दुसर्या दिवसापर्यंत :) ) आणि थकलेल्या शरीराला आरामही हवा होता. अश्या सगळ्याच बाजूने विचार करता वारंगीतच ट्रेक एंड केला. काल सकाळी ६.०० ला बोरवाडीला सुरु केलेला ट्रेक आज दुपारी ४.३० ला वारंगीत थांबवला. आजची चालही भन्नाटच झाली. घोळमधून निघून टेकपावळे, खानु मार्गे वारंगीला शेवट. गावातल्या किराणामालाच्या दुकानात चौकशी करून गावातल्याच एका सहाआसनी रिक्षावाल्याला महाडला सोडायला तयार केले आणि वारंगीतून ५ वा महाडसाठी निघालो .

वारंगीतून दिसणारा रायगड
Raigad form Warangi Village

वारंगीतून दिसणारा लिंगाणा
Lingana from Warangi

विकिवर साधारण मार्क केलेला आमचा दुसर्या दिवसाचा नकाशा (घोळ ते खानू)
ghol te khanu

विकिवर साधारण मार्क केलेला आमचा दुसर्या दिवसाचा नकाशा (खानू ते वारंगी)
khanu te warangi

वारंगीतून महाडला येताना काळनदीतले वाळणकोंडीतले मोठ्ठे मोठ्ठे मासे बघूनच पुढे निघालो. ही वाळणकोंड म्हणे ७ मजली उंच आहे आणि इथले मासे म्हणे १०-१० फुट लांब असतात. "अवं पाव्हण. काय सांगू, सगळ्यात तळाशी १५ फुटी मासे हाईत. ते जेव्हा वर येणार तेव्हा जगबूडी व्हणार ह्ये लिहून ठ्येवा" इती आमचा वारंगीचा रिक्षावाला :) :)

महाडला संध्याकाळी पोचलो तो गाड्यांच्या गर्दी बघूनच जाणवले की दोन दिवसांची आनंदयात्रा संपली आता नुसतेच भारवाही चालणे.

भेटुच पुढच्या ट्रेकला. धन्यवाद.
------------------------------------

फोटो सगळे माझ्या कॅमेरातून.

प्रतिक्रिया

मस्त वर्णन आणि फोटो. बैलाने का भोसकले?

प्रचेतस's picture

17 May 2017 - 8:53 am | प्रचेतस

जबरदस्त लिहिलंय.
अफाट चाल केलीत. रायगड, लिंगाणा ह्यांचे दर्शन केवळ अविस्मरणीय.

रायगडाच्या भोवताली पुष्कळ घाटवाटा आहेत त्यांचे वर्णनही येऊ देत.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 May 2017 - 12:17 pm | स्वच्छंदी_मनोज

धन्यवाद मित्रा.
रायगड परीसरात अनेक घाटवाटा आहेत. काही हल्लीच्या काही जुन्या. काही अवघड, काही सोप्या. काही वापरातल्या, काही मोडलेल्या.
जमेल तसे लिहीन ह्यांवरती.

शैलेन्द्र's picture

17 May 2017 - 9:09 am | शैलेन्द्र

जोरदार वर्णन...

काय चालणे झालेय मस्त...

अभिजीत अवलिया's picture

17 May 2017 - 9:40 am | अभिजीत अवलिया

मस्त ट्रेक

झक्कास वर्णन... अजुन येउद्या..!

दुर्गविहारी's picture

17 May 2017 - 1:12 pm | दुर्गविहारी

अफलातून वर्णन !!! _/\_
बाकी रायगडाच्या घेर्‍यातली गावे आता उठायला लागली आहेत. आता गारजाईवाडीपर्यंत रस्ता आल्याचे कळते, पण तिथेही तीच परिस्थिती. गावात फक्त वृध्द माणसे शिल्लक आहेत. रस्ते, वीज या सोयी, हा भाग पुणे जिल्ह्यात असून उशिरा आल्याचे म्हटले पाहिजे. असो.
ट्रेकमधे चरणार्‍या जनावरांच्या वाटेला न जाणेच चांगले, एक तर आपल्याला त्यातले मारके जनावर माहित नसते.
असे ट्रेक प्लॅन करण्यपुर्वी विकीवरून नकाशा तयार करून जाणे चांगले, एक तर त्यावर अंतर मोजता येते आणि त्याप्रमाणे वेळेचा अंदाज येतो.
वाटेत विश्रांती घेतली कि बरेचदा उठायची ईच्छा होत नाही आणि त्याचा परीणाम पुढे होतो, त्यामुळे किमान एकाने तरी खमकेपणा दखवून सगळ्याना "हल्ल्या" करयची कामगिरी घेतली पाहिजे. ( आमच्या ग्रुपमधे अर्थातच ये नेक काम मै करता हूं, त्यासाठी सोबत्याच्या शिव्या खाव्या लागतात , पण पर्याय नाही)
फोटोही उत्कृष्ट आहेत.
पुढच्या ट्रेकचे वर्णन लवकर येउ देत. पु.ले. शु.

सूड's picture

17 May 2017 - 2:09 pm | सूड

मस्त वर्णन!!

फारच चांगली झाली भटकंती. खाने गावाची परिस्थिती आता अशा बऱ्याच इतर दुर्गम गावांची आहे हे दुर्दैव. माणसं तरी काय करतील!

या वर्षी बोचेघोळ नाळ केलीच पाहिजे. फार पूर्वी आम्ही पावसाळ्यात एकदा बोराट्याची नाळ केली होती. तिची ती प्रसिद्ध घसरडी ट्रॅव्हर्स पावसात पार करणे हा अविस्मरणीय अनुभव होता. नंतरही खाली पाने गावात पोहोचल्यावर एसटी बंद झाल्याचे कळाल्यावर पुढे केलेली तंगडतोड आणि महाडला मुसळधार पावसात कसेबसे एसटीत घुसून तसाच केलेला पुण्यापर्यंतचा प्रवास, हे सगळं डोळ्यांसमोर आलं तुमचा ट्रेक वाचताना. भारीच. आता मात्र इतकं चालणं होईल का याबद्दल शंका आहे ;-)

स्वच्छंदी_मनोज's picture

18 May 2017 - 12:14 pm | स्वच्छंदी_मनोज

तुमची भटकंतीही मस्तच. ह्या फेब्रूवारीमध्ये लिंगाणा किल्ला केला तेव्हा बोराट्याच्या नाळेतून जायचा योग आला. पावसाळ्यात तुम्ही ती केलीत म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला.

अरिंजय's picture

17 May 2017 - 7:56 pm | अरिंजय

जबरदस्त झालाय तुमचा ट्रेक. फारच मस्त वर्णन केलंय तुम्ही.

सुमीत's picture

17 May 2017 - 9:00 pm | सुमीत

भारी ट्रेक, नवीन वाटा आणि गावे कळलि तुमच्या मुळे

प्रशांत's picture

17 May 2017 - 10:27 pm | प्रशांत

मस्त वर्णन...

स्वच्छंदी_मनोज's picture

18 May 2017 - 12:12 pm | स्वच्छंदी_मनोज

सर्व प्रतीसादकांचे धन्यवाद. __/\__