हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १
सरस्वती मंदिरापासून एक कच्चा रस्ता जातो तो राजवाडा परिसराकडे. तसं बघायला गेलं तर चंद्रशेखर मंदिर आणि सरस्वती मंदिर राजवाड्याच्या परिसरातच येतात पण तुलनेने ते तेथून काहीसे लांब आहेत. राजवाडा परिसर (Royal enclosure) हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं, विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली, विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील येथेच. विजयनगरचं एक सर्वांगसुंदर मंदिरही ह्याच परिसरात, आजही कर्नाटकात महत्वाचा समजला जाणारा दसरा उत्सव होई तो इथेच. विजयनगर परिसरात लांबवरुन आणलेल्या दगडी कालव्यांतील पाणी जमा होई ते इथेच. साहजिकच ह्याच परिसराची राक्षसतंगडीच्या लढाईनंतर सर्वाधिक हानी झाली. आज दिसतात त्या इमारतींचे केवळ अवशेष उरले आहेत तरीही येथील पूर्ववैभवाची कल्पना हा परिसर पाहताना नक्कीच येते. ह्या भग्न इमारतींमध्ये आजही एक इमारत तिच्या मूळच्या स्वरुपासकट उभी आहे ती म्हणजे महानवमी डिब्बा
राजवाडा परिसराचे भग्नावशेष
राजवाडा परिसराचा नकाशा (www.hampi.in संस्थळावरुन साभार).
महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल
महानवमी डिब्बा अर्थात ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र. महानवमी डिब्बाच्या समोरील पटांगणात दसरा महोत्सवाचे कार्यक्रम होत असत आणि विजयनगरचे सम्राट ह्याच इमारतीवर उच्चासनावर बसून त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत असत.
विजयनगरच्या नवरात्र महोत्सवाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला पोर्तुगीज प्रवासी दुमिंगुश पाईश ह्या इमारतीचे वर्णन कसे करतो ते बघा.
...चौकाच्या उत्तरेकडील डाव्या बाजूस एक मोठी एकमजली इमारत आहे. ही इमारत हत्तीच्या आकाराच्या आणि इतर अनेक चित्रे कोरलेल्या खांबांवर उभी आहे. इमारतीचा दर्शनी भाग मोकळा असून एका दगडी जिन्याने लोक वर जातात. इमारतीच्या खाली सभोवार चिरेबंदी फरशी असून उत्सव पाहण्यासाठी आलेले काही लोक तिथे उभे राहतात. ओरियाच्या (ओरिसा) राजास जिंकून युद्धावरुन परत आल्यावर कृष्णदेवरायाने हा राजवाडा बांधला म्हणून त्यास विजयमहाल म्हणतात. चौकाच्या उजव्या बाजूस अरुंद पण लाकडी मचाणे बांधलेली होत. ती भिंतीच्या तटावर जात इतकी उंच होती. त्यांच्या वरच्या बाजूस लाल हिरवी मखमल लावलेली असून सर्वत्र खाली-वर सुंदर कापडाने ही मचाणे सजवलेली होती...ही लाकडी मचाणे एकूण अकरा असून फक्त उत्सवासाठीच ती उभारण्यात येतात, एरवी नाही. दरवाजासमोरील दोन वर्तुळाकार आकारात सोन्यामोत्याचे व जवाहिराचे अलंकार घातलेल्या नर्तिका होत्या...इमारतींवर जाण्याला दोन सुरेख घोटीव दगडाचे जिने आहेत. पैकी एक मध्यभागी असून, दुसरा टोकाला आहे. ह्या इमारतीचे सर्व खांब, भिंती आणि छत भारी कापडाने मढवलेले आहे. भिंतीवरील कापडावर वेलबुटीचे नक्षीकाम केलेले आहे. या इमार्तींना एकावर एक असे दोन चबुतरे आहेत. चबुतर्यांवर शिल्पकाम सुंदर असून त्यांच्या बाजूवर कोरीव काम आहे. ह्या चबुतर्यांवर राजाच्या मर्जीतील लोकांची मुले आणि त्यांच्या पदरचे हिजडे उत्सव पाहण्यासाठी येतात. यापैकी वरच्या चबुतर्यावर राजाच्या जवळ क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुला याला बसवले होते. आम्हीही त्याच्या बरोबर होतो. सगळा उत्सव आणि समारंभ नीट दिसेल अशा ठिकाणी क्रिस्ताव्हो-दि-फिगैरेदुलाला बसवण्यात यावे अशी राजाची आज्ञा होती.....
यानंतर पाईश तेथील महोत्सवाचे वर्णन करतो जे मूळातूनच वाचण्यासारखे आहे. पाईशचे वर्णन जालावर उपलब्ध आहे.
महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल ही आयताकृती उंच इमारत असून ती मागच्या बाजूला काही प्रचंड शिलाखंडाच्या आधाराने उभी आहे. इमारतीच्या बाहेरच दोन प्रचंड मोठे दगडी दरवाजे पडलेले आहेत. इमारतीवर जायला मध्यभागी आणि उजव्या कडेने असे दोन भक्कम दगडी जिने बांधलेले असून इमारतीच्या बाह्यभिंतीवर विविध प्रकारची शिल्पे कोरलेली आहेत. विजयनगरच्या सैन्याचे चित्रिकरण येथे केलेले आहे. गजदळ, अश्वदळ, उष्ट्रदळ, पायदळ आदि सैन्यदळांचे विविध प्रकार येथे शिल्पांकित केलेले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची शिल्पे आहेत ती उंटांची. उंटांची कोरीव शिल्पे फार कमी प्रमाणात दिसतात. महाराष्ट्रात तर मी भुलेश्वर वगळता उंटांचे शिल्प इतर कोठे पाहिल्याचे मला स्मरत नाही. येथे मात्र ती विपुल प्रमाणात आहेत. अगदी ह्याच इमारतीवर नव्हे तर विजयनगरच्या इतर भग्न इमारतींवर, मंदिरांवर देखील उष्ट्रशिल्पे बघायला मिळतात. इथल्या शिल्पपटांत प्रामुख्याने कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे चित्रण केलेले आहे.
महानवमी डिब्ब्याजवळील दोन प्रचंड दगडी दरवाजे
महानवमी डिब्बा अर्थात विजयमहाल
महानवमी डिब्ब्याच्या सर्वात खालच्या थरातील विजयनगरच्या सैन्याचे शिल्पांकन
शिकारीचे दृश्य आणि त्याखालच्या पटात कोरलेले परकिय प्रवासी
महानवमी डिब्ब्याच्या विविध थरांचे नक्षीकाम आणि शिल्पकाम
शिकारीचे दृश्य
हे बहुधा विवाहाचे दृश्य असावे
महानवमी डिब्ब्याच्या सर्वात उच्च स्थानावरुन शाही केंद्राच्या आजच्या भग्नावस्थेचे दृश्य
महानव्मी डिब्ब्याच्या उजवीकडेच एक रचना लक्ष वेधून घेते ती आहे पायर्या पायर्यांची पुष्करिणी आणि पाणी खेळवण्यासाठी बांधलेले दगडी पाइप्स.
पुष्करिणी
शाही केंद्रातले हे एक अनोखे स्थापत्य आहे. पाच ते सहा विविध थरांनी बनलेली पायर्या पायर्यांची सुंदर रचना असलेली ही चौकोनी पुष्करिणी. पावसाळ्यात ही पूर्ण भरुन जाई. पण त्यानंतर तिचे पाणी आटल्यावर ती पुन्हा भरण्यासाठी विजयनगरच्या राजांनी लांबवर असलेल्या बंधार्यातून दगडी पाईप्सद्वारे येथे पाणी खेळवलेले होते. पुष्करिणीत पाणी आणण्यासाठी एक दगडी पाईप मुख्य रांगेला जोडला असून पाणी खेळवण्यासाठी एक दगड तिथल्या खाचेत बसवला जाई जेणेकरुन पाणी पुढे जायला अवरोध होऊन सर्व पाणी पुष्करिणीत जमा होई. हेच दगडी पाईप इतर ठिकाणी पाणी पुरवून पुन्हा भूमिगत होत व दुसर्या ठिकाणी परत बाहेर निघत. येथीलच हजारराम मंदिराच्या आवारात हे दगडी पाईप परत बाहेर निघालेले मी पाहिले आहेत.
पायर्या पायर्यांची पुष्करिणी
दगडी पाइप्समधून पुष्करिणीत पाणी खेळवण्यासाठी केलेली नळासारखी रचना
भूमिगत झालेले पाणी खेळवण्याचे दगडी पाईप्स
महानवमी डिब्ब्याच्या समोर आणि पुष्करीणीच्या दगडी पाइप्सच्या कडेकडेने पुढे जाताच अजून एक अनोखी रचना सामोरी येते ते म्हणजे भूमिगत खलबतखाना.
भूमिगत खलबतखाना
हा खलबतखाना जमिनीच्या आत खोदलेला असून आत जाण्यासाठी उंच उंच पायर्या उतराव्या लागतात. आतमध्ये बोळकांडेसदृश रस्ता असून मध्यभागी खलबतखाना आहे. त्याच्या बाजूने आतल्या अंधार्या बोळकांडातून गेल्यास अक्षरशः भुलभुलैयाचा अनुभव येतो. आपण अंधारातून अचान्क कुठे बाहेर पडतो ते पटकन कळतच नाही.
विजयनगरच्या राजांची मंत्र्यांसोबत येथे गुप्त खलबतं चालत असंत असे मानले जाते पण अनेकानेक उत्तमोत्तम इमारती असताना राजाला अशा अंधार्या, भूमिगत आणि लहानश्या जागी खलबतं करायची गरजच काय हा प्रश्न मला येथे पडतो. ही बहुधा खजिन्याची किंवा काही वस्तू ठेवायची जागा असावी असे मला वाटते.
गुप्त खलबतखाना
खलबतखान्यात जाण्यासाठी असलेले अंधारी प्रवेशमार्ग
ह्या खबतखान्याच्या शेजारीच आहे ते वीर हरिहराच्या राजवाड्याचे भग्नावशेष
वीर हरिहर राजवाडा
आजमितीस ह्या राजवाड्याचा फक्त चौथराच शिल्लक असून मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना हत्तींची जोडगोळी आहे. हा वीर हरिहर म्हणाजे हरिहर दुसरा. हा पहिल्या बुक्करायाचा मुलगा. ह्यानेच मदुराईच्या सुलतानाचा पराभव करुन मदुराईचे राज्य विजयनगरला जोडले.
वीर हरिहर राजवाड्याचे भग्नावशेष
ह्यानंतर समोर येते एक भव्य रचना ती आहे राजाचा जनता दरबार.
राजाचा जनता दरबार.
ही देखील इतर इमारतींप्रमाणेच एक भग्न झालेली इमारत आहे. नावाप्रमाणेच हा विजयनगरच्या राजांचा हा जनता दरबार. एका प्रचंड चौथर्यावर स्थित ही एक दुमजली इमारत असावी. राजाचे आसन दुसर्या मजल्यावर उंचभागी होते. ह्या दरबारात जनतेची गार्हाणी ऐकून विजयनगरचे राजे न्यायनिवाडा करत असत. महानवमी डिब्बा तसेच ह्या जनता दरबारातून शाही केंद्राच्या भग्नावशेषांचे उत्तम दर्शन होते. तेव्हाच्या समृद्धीची उत्तम कल्पना आजही येथे जाऊन करता येते. ह्या जनता दरबाराच्या बाहेरच एक प्रचंड आयताकृती दगडी डोणी असून ती बहुधा घोडेस्वारांना पाणी पिण्यासाठी असावी असे वाटते.
पाणी साठवण्याची आयताकृती दगडी डोणी
जनता दरबारातील राजाचे उच्चासन
जनता दरबारातून दिसणारे भग्नावशेष
जनता दरबारातून दिसणारा भग्न तट आणि महानवमी डिब्बा
जनतादरबारातून दिसणारे हजारराम मंदिर
राजवाडा केंद्रातील काही भग्नावशेष
--
ह्या व्यतिरिक्तही इकडे काही महत्वाच्या इमारती आहेत उदा. सरदारांची घरं, सैनिकांच्या बराकी, धान्याची बळदं, नाण्यांची टांकसाळ पण वेळेअभावी इकडे जायला जमले नाही. आता पुढचे आकर्षण होते ते इथले सुप्रसिद्ध असे हजारराम मंदिर. हे इथलं एक प्रमुख आकर्षण,. रामायणातील सर्व प्रसंगांची हजारावर शिल्पं असणारं एक देखणं मंदिर. त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 May 2017 - 5:58 pm | जगप्रवासी
छान चालू आहे लेखमालिका, पुलेशु
12 May 2017 - 6:15 pm | हेमंत८२
खूप सुंदर ७-८ ला असताना गेलो होतो पण त्यावेळी हा सर्व इतिहास माहीत नव्हता आता परत जाईन आणि पाहून येईन.
12 May 2017 - 6:23 pm | सूड
भारीच!!
12 May 2017 - 9:27 pm | पद्मावति
सुरेख!
12 May 2017 - 9:58 pm | अत्रुप्त आत्मा
पुष्करिणी प्रचंड लाइकल्या गेली आहे. बाकीही माहिती नेहमीप्रमाणे उत्तमच!
अवांतर~ भग्नावशेष पाहून मात्र मन विषण्ण होतय. :(
12 May 2017 - 10:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहिती आणि चित्रे. पुष्करिणीची रचना खूप सुंदर आहे.
वैभव आणि उत्कर्षाच्या काळात ही नगरी किती प्रभावी दिसत असेल याची केवळ किंचित कल्पनाच आपण करू शकतो.
पुभाप्र.
12 May 2017 - 10:47 pm | एस
पुष्करिणी फारच सुंदर.
13 May 2017 - 7:24 am | कंजूस
शत्रुसैन्याने राजवाडा परिसर उध्वस्त केला पण मंदिरांना काही केलं नाही ते हजाररामामध्ये दिसेलच. एक शिल्प उंटाला नेणाय्रा कच्छकडच्या वेशात दिसणाय्रा बाईचं आहे, दांडिया रास आहेच. ही ऐतिहासिक दगडी दस्तावेज आहेत.
13 May 2017 - 8:43 am | यशोधरा
वा!
14 May 2017 - 8:20 am | पैसा
खूप छान. एकदातरी जायचं आहे.
14 May 2017 - 4:17 pm | शिव्शक्तिकुमर
खूप सुंदर माहिती आहे.
14 May 2017 - 6:46 pm | चौकटराजा
सात आठ मिपाकर मिळून " ओर्छा "ला जाणे मस्त बेत ठरेल. अर्थात सप्टेम्बर २०१७ हा मूहूर्त मस्त. दिल्ली वरून चित्रगुप्त पुण्याहून म्हात्रे साहेब हे ज्येष्ठ आवश्यक . ते ठिकाण म्हणजे तिकडची हंपीच. बाकी प्रचेतस हे हंपीला गेल्यामुळे हंपीलाच आपल्यातले दडलेले काही उमगले असेल यात शंका नाही.
15 May 2017 - 10:31 am | दुर्गविहारी
जबरी!!!! हंपी पुन्हा एकदा बघायची ईच्छा झाली. माहितीपत्रक तर मिपावर आहेच. प्लॅन करायला घेतो.
15 May 2017 - 10:38 am | लॉरी टांगटूंगकर
पुभाप्र.
15 May 2017 - 1:22 pm | अप्पा जोगळेकर
नेहमीसारखेच माहितीपूर्ण. पण असले भग्न अवस्थेतील विजयनगरचे फोटो पाहून खिन्नता आली.
15 May 2017 - 2:14 pm | स्वच्छंदी_मनोज
भग्नावषेशांमुळे विषण्णता येतेय पण तुझ्या डिटेल माहीतींमुळे वाचालायही मजा येतेय. हंपीला जाईन तेव्हा ह्या लेखांच्या कॉपी घेऊन जाणार.
पुढचा भाग लवकर टाक.
15 May 2017 - 6:30 pm | प्रचेतस
भग्न तर आहेच. अर्थात हा भाग शाही निवासस्थानांचा असल्याने सर्वाधिक लुटालूट आणि सर्वाधिक तोडफोड ह्याच भागात झालीय. मंदिरांना त्यामानाने कमी उपसर्ग पोहोचलाय. अर्थात येथील मंदिरे जरी फारशी भग्न नसली तरी बहुतांश गाभाऱ्यात मूर्ती नाहीत.
15 May 2017 - 3:04 pm | सागर
दोन्ही भाग मस्तच.
दोन भागांतच एवढे कव्हर केलेय की पुढील भागात अजून काय काय असेल याची उत्सुकता आहे.
फोटो उत्तमपणे काढलेले आहेत हेवेसांन... उत्तम लेखमाला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
अवांतरः वल्लीला प्रचेतस कसे संबोधायचे हे माझ्यासाठी थोडे अवघड आहे. ;) इतक्या वर्षांची सवय मोडणे अवघड आहे.
15 May 2017 - 6:26 pm | प्रचेतस
तुला मिपावर परत बघून खूप आनंद वाटला.
19 May 2017 - 4:02 pm | सागर
येईन रेग्युलर इथे मित्रा. :)
पण तुझ्या सफरी सातत्याने लिहित जा.
कालांतराने हा अनमोल ठेवा पुस्तकरुपानेही पुढे येईल याची खात्री आहे मित्रा :)
15 May 2017 - 6:42 pm | अभ्या..
मस्त रे वल्ली
एका शिल्पात उंटाच्या लैनीत एकजण बैलाच्या वशिंडाला धरुन पण मस्त बैलस्वारी करायलाय. बैलावर पण फिरायचे काय लोक्स?
दरवाजा बघून भौबलीतला दरुजा आठवला. ;)
15 May 2017 - 10:14 pm | नीलमोहर
हंपीला जाऊन बरीच वर्षे झाल्याने तिथल्या आठवणीही धूसर होत्या, तर काही ठिकाणे पहायची राहून गेली होती,
या लेखमालेच्या निमित्ताने त्या आठवणी परत जागवता येत आहेत, त्यासाठी अनेक धन्यवाद.
17 May 2017 - 11:37 am | चांदणे संदीप
शेम टू शेम! डिट्टो!
Sandy
16 May 2017 - 8:42 pm | चौथा कोनाडा
भटकंतीचा हा ही भाग खतर्नाक सुंदर !
महिती अन फोटो सुंदरच, पण पुष्करणी वै अफाट सुंदर आहे.
19 May 2017 - 11:41 am | वपाडाव
अशीच माहिती ऐहोळे, पट्टडकल अन बदामीच्या ठिकाणांची येऊद्या असे म्हंतो...!
22 May 2017 - 7:26 pm | गवि
प्रचु.. लौ यू.
आता एकदा बैठक जमवा बुवा....
22 May 2017 - 8:56 pm | निशाचर
हा भागही मस्त!
23 May 2017 - 4:51 am | रुपी
हाही भाग फार उत्तम झालाय.
पुष्करिणी तर खूपच छान आहे!
23 May 2017 - 6:22 am | अत्रे
मस्त फोटो.
तिथल्या पुष्करिणीच्या पायऱ्यांची डिझाइन थोडी ऑड वाटत आहे. खालील चित्र पहा
यात त्रिकोणाचे टोक वरच्या त्रिकोणाच्या उजव्या किंवा डाव्या पायथ्याच्या बरोबर खाली येते.
खालच्या चित्रात बघा
यातली डावीकडची डिझाइन डोळ्यांना जास्त चांगली वाटते. आणि पायऱ्या उतरताना त्रिकोण संपल्यावर चालावे लागत नाही.
पण मग हंपी मध्ये (2) दुसऱ्या, हिरव्या डिझाइन प्रमाणे पायऱ्या का बनवल्या असाव्यात?
23 May 2017 - 9:45 am | अभ्या..
तुमच्या डिज़ाइनमाधले हिरव्या त्रिकोणाचे चित्र चुक आहे. थ्रीडी चा विचार करता हम्पीच्या पुष्करणी मध्ये पायऱ्या तिन्ही बाजूने उतरता येतात. त्याही सलग. ज्याना थांबुन दिशा बदलून चढायाची उत्तरायची सवय असते त्याना ही सोईची. काहीजनाना समोरून तीव्र उतार चढायाची भीति वाटते त्याना बाजुच्या पायऱ्या.
वरच्या लाल त्रिकोनात फक्त 2 बाजूने उतरता येते. डिज़ाइनचा विचार करताही हम्पीच्या सुपीरियर आहेत फक्त त्याचा फोटोत कोन आलेला नाहीये.
23 May 2017 - 9:59 am | अत्रे
ओह! थ्री डी चा आस्पेक्ट लक्षातच नव्हता आला. धन्यवाद.
23 May 2017 - 10:11 am | प्रचेतस
अगदी.
ही हंपीच्या पुष्करणीची समोरुन आणि वरील बाजूने काढलेली छायाचित्रे